निसर्ग आणि मानव : श्री वसंत पळशीकरांना उत्तर

१८ जुलैच्या साधनेत श्री नानासाहेब गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या उत्तरार्धात नानासाहेबांनी गांधीवादी पर्यावरणवाद्यांवर परखड टीका केली आहे. तिला श्री वसंत पळशीकरांनी २९ ऑगस्टच्या साधनेत उत्तर दिले आहे. त्या उत्तरावरील ही प्रतिक्रिया.

ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथमतः भौतिक, निर्जीव पदार्थांचा आणि शक्तींचा, आणि नंतर वनस्पती आणि प्राणी यांचा, त्यांच्या जीवनव्यवहारांचा बनलेला आहे. यांपैकी भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन, निर्जीव अशा शक्तींचा आणि त्यांच्या घडामोडींचा वनलेला आहे; परंतु निसर्गाचा जो भाग वनस्पती आणि प्राणी यांचा बनलेला आहे त्यात जीव, संज्ञा, हेतुपुरस्पर कृती या गोष्टी आढळून येतात. वनस्पती आणि प्राणी यांचे जीवन पूर्णपणे सहजप्रवृत्तीनी (instinct) बद्ध असते. वनस्पतींचे जीवन तर फारच मर्यादित असते; परंतु प्राण्यांमध्येही त्यांची बुद्धी अतिशय प्रांरभिक स्वरूपाची असल्यामुळे त्यांच्यात सहजप्रवृत्तीहून भिन्न, नवीन प्रकारच्या कृती घडत नाहीत. प्राणिजीवनात जे बदल घडून येतात त्यात कर्तृत्व प्राण्यांचे नसते. आपले सहजप्रवृत्तिवद्ध जीवन जगत असताना ज्यांना आपण उत्क्रांती म्हणतो ते वदल त्यांना नकळत घडत असतात.

प्राण्यांच्या प्रत्येक पिढीतील व्यक्तींची एक प्रकारची चाळण चालू असते. जणू निसर्ग त्या व्यक्तींपैकी काहींची निवड करून बाकीच्यांना मृत्युमुखात लोटत असतो. वस्तुतः निसर्ग हे घडवून आणतो असे म्हणणे आलंकारिक आहे. निसर्ग नावाची कोणी चेतनायुक्त व्यक्ती नाही की जी हेतुपुरस्पर बदल घडवून आणते. हेतुपुरस्पर कृती घडते ती फक्त व्यक्तीत; कारण जाति नावाची गोष्ट व्यक्तींच्या बाहेर नसतेच. बंधनात अडकलेला प्राणी सुटण्याकरिता धडपड करतो, किंवा भुकेला प्राणी भक्ष्याचा शोध घेत इतस्ततः भटकतो हे हेतुपूर्ण व्यापार आहेत असे मानायचे झाल्यास निम्न कोटीच्या प्राण्यातही सहेतुक कृती घडतात असे म्हणावे लागेल. प्राण्यांच्या या सर्व कृती सहजप्रवृत्तींनी स्फुरविलेल्या असतात. ह्या सहजप्रवृत्ती प्रामुख्याने दोन आहेत. अन्न मिळवून आत्मरक्षण करणे आणि कामपूर्ती करून वंशरक्षण करणे. या दोन प्रवृत्तींनी प्रेरित होऊन प्राणी क्रिया करीत असताना नैसर्गिक निवड (natural selection) आणि क्षमतमांचा टिकाव (survival of the fittest) या प्रकिया घडून येतात. या प्रक्रिया त्या प्राण्यांच्या हेतूचा भाग नसतात; त्या त्यांना नकळत घडत असतात. ही नैसर्गिक निवडीची प्रक्रिया शेकडो-हजारो पिढ्या सदैव चालू असते. प्राण्यांच्या कोणत्याही पिढीतील व्यक्ती जरी बर्या्च परस्परांसारख्या असल्या तरी व्यक्तीव्यक्तीत फरकही असतात. हे फरक जीवनार्थ कराव्या लागणार्‍या झगड्यात एकतर उपकारक असतील, किंवा अपकारक असतील, किंवा ते तटस्थ म्हणजे उपकारकही नाहीत आणि अपकारकही नाहीत असे असतील. त्यामुळे ज्यांचे फरक (उदा. पलायनाचा वेग) जीवनसंघर्षात टिकण्यास अनुकूल असतील ती अपत्ये प्रौढ होईपर्यंत जगतात, आणि अपत्यांना जन्मही देतात. परंतु ज्यांचे फरक अपकारक असतील ते त्यांना जगण्यास प्रतिकूल असल्यामुळे त्यांचे क्रमाने निर्मुलन होत जाते. अशा तर्हेाने घडून येणारे सूक्ष्म बदल पिढ्यानपिढ्या साचत जाऊन कालांतराने एक नवीन जीवजाती अस्तित्वात येते. ही उत्क्रांतिप्रक्रिया, उत्क्रांति म्हणजे कोणीतरी बुद्ध्या करीत असलेली कृती नव्हे. असंख्य व्यक्तींच्या प्रत्येकीच्या चिमुकल्या जीवनार्थ संघर्षातून घडून येणारी अहेतुक, अनुद्दिष्ट, त्यांना अज्ञात प्रक्रिया आहे.

कोणत्याही पिढीतील जगण्याकरिता धडपडणार्‍या व्यक्तींना सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते; आणि या स्पर्धेत जे टिकून राहतात ते अर्थातच त्या त्या परिस्थितीत टिकून राहण्यास सर्वांत समर्थ असतात. उदा. थंड प्रदेशात ज्यांना केसाचे नैसर्गिक आवरण आहे असेच प्राणी टिकून राहतात, आणि पाण्यात विरघळलेला प्राणवायू जे मिळवू शकतात असे प्राणीच पाण्यात राहू शकतात. परिस्थिती आणि तिच्यात राहणार्‍या व्यक्ती यांच्यात आढळून येणार्‍या या अनुरूपतेत काही लोकांना अज्ञात शक्तीचा हात दिसतो. पण येथे क्षमतमांचा टिकाव याखेरीज कसलेही तत्त्व नसते. जे पाण्यात श्वासोच्छ्वास करू शकतील असेच प्राणी पाण्यात टिकून राहतात, अन्य नाहीसे होतात. जे थंड प्रदेशात थंडीपुढे टिकाव धरू शकतात, तेच म्हणजे केसाळ प्राणीच फक्त त्या प्रदेशात टिकून राहतात, अन्य नाहीसे होतात. कोणत्याही काळी निसर्गात परिस्थिती आणि तिच्यात राहणारे प्राणी यांचे थोडेबहुत सामंजस्य किंवा आनुरूप्य दिसते त्याचे कारण हे आहे.

जीवन अस्तित्वात राहण्याकरिता विशिष्ट हवामान लागते. ते समशीतोष्ण, म्हणजे ज्यात पदार्थ द्रव रूपात राहू शकतील असे असावे लागते. तसेच आपल्याला ज्ञात असलेल्या प्राण्यांना प्राणवायूची आवश्यकता असते. म्हणून जोपर्यंत पृथ्वीवर अशी। परिस्थिती नव्हती तोपर्यंत येथे जीवोत्पत्ती अशक्य होती. ती कालांतराने शक्य झाली त्यावेळी पृथ्वीचा पृष्ठभाग पुरेसा थंड झाला होता. आणि तिच्या दैनंदिन गतीमुळे तिला उष्णता आणि थंडी दोन्ही आलटून पालटून मिळत होत्या. जेव्हा दिवसाचे तापमान १२०० फारेनहाइटच्या वर आणि रात्रीचे उष्णतामान ३२° फा. च्या खाली फारसे जाईनासे झाले, तेव्हा येथे जीवोत्पत्ती झाली. प्रथम वनस्पतीसृष्टी उद्भवली, आणि त्याद्वारे पृथ्वीवर प्राणवायूचा थर तयार झाल्यावर प्राणिसृष्टी निर्माण झाली. परंतु यात कोठेही कोणा चेतन शक्तीची हेतुपुरस्पर कृती दिसत नाही. पृथ्वीच्या उत्पत्तीची भरतीची उपपत्ती (tidal theory) खरी असेल तर अब्जावधि वर्षांपूर्वी पृथ्वी सूर्यापासून फुटून निघाली. अब्जावधि वर्षे तिला थंड होण्यास लागली. जीवोत्पत्ती व्हावी या हेतूने हे जग कोणी बुद्धिमान शक्तीने निर्माण केलेले असते तर जीवोत्पत्तीला इतकी वर्षे खासच लागली नसती.

म्हणून जेव्हा पळशीकर म्हणतात की पृथ्वीवरील निसर्गसृष्टी ही एक व्यवस्था आहे, आणि त्या व्यवस्थेचा इतिहास आहे, तेव्हा त्याचा अर्थ नैसर्गिक परिस्थितीत जगण्याकरिता सर्वांत क्षमतम असेच जीव-वनस्पती आणि प्राणी-तिच्यात केव्हाही राहतात,राहू शकतात यापेक्षा जास्त आहे असे म्हणता येत नाही. त्यात देव, ईश्वर किंवा अन्य कसल्याही चेतन शक्तीचा हात असल्याचा काडीचाही पुरावा आढळत नाही. निसर्गात जी व्यवस्था दिसते ती भौतिक आणि जैव नियमांचा परिणाम आहे. भौतिक निसर्ग भौतिक नियमांनी बद्ध आहे, आणि जैव निसर्ग जैव नियमांनी. भौतिक परिस्थितीत जीवांची जी चाळण सदैव चालू असते तिच्यामुळे जीव आणि निसर्ग यांत सामजंस्य, अनुरूपता दिसून येते. हे सामंजस्य कोणी बुद्धिपुरस्सर केलेली व्यवस्था असेल असे समजण्यास काहीही कारण नाही; कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी निसर्गात अशी व्यवस्था घडत जाते. त्या परिस्थितीत टिकू शकणारे जीव त्या परिस्थितीत अनुरूप असतात. पण त्याचे कारण त्या परिस्थितीत जगू न शकणारे जीव नाहीसे झालेले असतात, वगळले गेलेले असतात.

आता या प्रक्रियेचे पळशीकर काय वर्णन करताता ते पाहू. ते म्हणतात ‘विश्व, पृथ्वी आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टी व्यवस्था आहेत. आणि त्यांना एक इतिहास आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा विचार जेथे करावासा वाटतो तेथे ‘लहरी, ‘निर्हेतुक, [हे। नानासाहेबांनी वापरलेले शब्द हे वर्णन फार असमाधानकारक वे एकांगी वाटते. एकपेशीय जीव ते मनुष्य येथपर्यंत जीवसृष्टी उत्क्रांत होत आली आहे असे म्हणणे सार्थ असेल, तर किमानपक्षी ही एक अगम्य व अद्भुत लीला आहे असे तरी म्हणावे लागते.

आता विश्व, पृथ्वी आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत असे म्हणताना श्री पळशीकरांना काय अभिप्रेत आहे? सबंध विश्व निदान गुरुत्वाकर्षणाच्या नियमाने बद्ध आहे या अर्थाने ती एक व्यवस्था आहे, त्यातील सर्व घटक परस्परसंबद्ध आहेत हे खरेच आहे. तीच गोष्ट पृथ्वीची. तिच्यात आणि तिच्या पृष्ठभागावर घडणार्‍या घडामोडी सर्व नियमबद्ध आहेत असे वैज्ञानिक मानतो, आणि ते नियम हुडकून काढून त्यांचे काटेकोर ग्रथन करणे त्याचे काम आहे. पृथ्वीवरील सजीवसृष्टी म्हणजे जीवसृष्टी – वनस्पती आणि प्राणी – हीही नियमबद्ध व्यापार करणारी एक विराट व्यवस्था आहे, आणि तिच्यावर भौतिक नियमांबरोबरच जीवशास्त्रीय नियमांचेही साम्राज्य चालते. विश्व, पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी या व्यवस्था आहेत असे म्हणताना जर वर म्हटले तेवढेच अभिप्रेत असेल तर हे सर्व निर्हेतुक आहे असे म्हणण्यात कोणती अडचण आहे? वर म्हटल्याप्रमाणे निसर्गात जे काय हेतू असतील ते वैयक्तिक प्राण्यांचे वैयक्तिक हेतू काय ते आहेत. पण सबंध सृष्टीची जी एकूण वाटचाल आहे ती नियमबद्ध असूनही निर्हेतुक आहे हे नाकारण्याला काय कारण आहे? आता लहरी’ या विशेषणाविषयी. ते नियमबद्धतेच्या विरुद्ध जाणारे आहे हे खरे; पण आपल्याला निसर्गाच्या नियमांचे आणि वास्तव परिस्थितीचे ज्ञान इतके कमी असते की घडणार्‍या घटना नियमबद्ध आणि पूर्वकथ्य (predictable) असूनही आपल्याला अनपेक्षित वाटतात, आणि म्हणून आपण निसर्गाला लहरी म्हणतो. उदा. पावसाचे पडणे जरी एक अर्थाने पूर्ण नियमबद्ध असले तरी तो केव्हा, कोठे आणि किती पडेल हे सांगणे कठीण असते. तसेच समुद्रावरील वादळे, धरणीकंप, किंवा ज्वालामुखीचे उद्रेक या सर्वघटना पूर्णपणे नियमबद्ध असूनही आपल्याला अपघातात्मक वाटतात. तेव्हा निसर्गाला ‘लहरी’ आणि ‘निर्हेतुक म्हणणे यात गैर काही नाही.

पळशीकर म्हणतात की एकपेशी जीवापासून ते मनुष्यापर्यंत जीवसृष्टी उत्क्रांत होत आली असे म्हणणे सार्थ असेल तर किमानपक्षी ही सबंध प्रक्रिया लीला आहे असे म्हणावे लागते. आता जीवसृष्टी उत्क्रांत झाली याचा अर्थ नैसर्गिक निवडीत जे शक्तीने किंवा आणि बुद्धीने अधिक समर्थ होते ते सतत टिकत गेले, आणि म्हणून स्थूलमानाने अधिकाधिक समर्थ जीवनप्रकार निर्माण होत गेले, एवढाच असेल, तर त्यात कोठेही हेतूचा आढळ होत नाही हे वर म्हटलेच आहे. परंतु अमीबा ते मनुष्य ही वाटचाल सरळ एकमार्गी झाली असे कुणाला वाटेल तर ते चूक होईल. उत्क्रांतीने किती वळणे घेतली आहेत, तिला किती फाटे फुटले आहेत हे लक्षात घेतले तर एखाद्या आंधळ्याने खाचखळग्यातून धडपडत जावे तशी उत्क्रांतिप्रक्रिया राहिली आहे. तिच्यात अनंत विविधता होती. हजारो मार्गानी प्रवास होत होता. त्या प्रवासाचे सूत्र एकच होते. आणि ते म्हणजे कोणत्याही जीवाला जे लाभदायक वैशिष्ट्य यदृच्छया प्राप्त होई ते अनुवंशाने अपत्यापर्यंत सामान्यपणे संक्रांत केले जाई. ही गोष्ट आणि नैसर्गिक चाळण यांचा परिणाम म्हणजे उत्क्रांतीचा इतिहास. तो इतका कमालीचा विविध, गुंतागुंतीचा, आहे की तो पाहून आपली मती गुंग होते. पण तिला पळशीकर लीला म्हणतात त्याचा अर्थ काय आहे?

लीला म्हणजे क्रीडा, खेळ. विश्वव्यापार म्हणे परमेश्वराची लीला आहे. एखादे लहान मूल आपली खेळणी घेऊन विविध खेळ खेळते तसे परमेश्वर करतो असे ईश्वरवादी लोक म्हणतात. त्याच अर्थाने पळशीकर लीला हा शब्द येथे वापरीत आहेत असे दिसते. असे का म्हणावे लागते ते ते सांगत नाहीत. आता विश्वव्यापार म्हणजे जर लीला असेल तर तिच्यामागे कोणा तरी चेतन शक्तीचा हात आहे असे मानावे लागेल. परंतु असे मानून कसलाच हेतू साध्य होत नाही हे ‘लीला’ या शब्दाने सूचित होते. बालकांच्या खेळण्यात मनोविनोद होण्यापलीकडे आणखी हेतू नसतो. परमेश्वराच्या कृतीना लीला म्हण्यात त्यांचा हेतू कळत नाही हीच गोष्ट सूचित होते. खेळणे ही निर्हेतुक क्रिया असते. तिच्यातून मौजेखेरीज आणखी काही साध्य होत नाही. म्हणजे वैज्ञानिक जे म्हणतो की उत्क्रांति ही निर्हेतुक प्रक्रिया आहे, त्याहून लीलेच्या कल्पनेत काहीच जास्त आशय नाही. तिला लीला म्हणण्याने ती अगम्य, अतर्क्स आहे असेच सूचित होते. म्हणजे उत्क्रांतीत काही हेतू आहे असे म्हणावयाचे आणि लगेच ती क्रिया अगम्य आहे हेही कबूल करावयाचे ह्या धरसोडीचा अर्थ काय?त्यापेक्षा वैज्ञानिक म्हणतो की या प्रक्रियेत कोणताही हेतू दिसत नाही हे अधिक समंजस, अधिक प्रामाणिक नाही काय?

पळशीकर म्हणतात की ‘विश्व ही एकाच वेळी नियमबद्ध आणि नियमापलीकडे जाण्याची क्षमता असलेली व्यवस्था आहे. विज्ञानच आपल्याला ही गोष्ट सांगते, असे ते म्हणतात. हे कोणते विज्ञान सांगते? कुठे सांगते? याचा खुलासा पळशीकर करीत नाहीत. ते पुढे म्हणतात, ‘विश्वाची वाटचाल एखाद्या हेतूने, एखाद्या लक्ष्याच्या दिशेने चालली आहे काय, तो हेतू वा लक्ष्य कोणते, हेतू कोणाचा वा लक्ष्य कोणाचे या प्रश्नांची उकल विज्ञान करूशकणार नाही… या प्रश्नांची जी कोणती उत्तरे आपण देऊ ती ‘शास्त्रीय सत्य’ या कसोटीला उतरणारी नसतील, पण म्हणून ती असत्यच असतील असे विज्ञानाच्या आधारे म्हणजे योग्य नाही असेच वैज्ञानिक म्हणेल.’

वैज्ञानिक काय म्हणेल याविषयी पळशीकरांना जी खात्री वाटते ती कशाच्या आधारे ते कळत नाही. ते पुढे म्हणतात : ‘या प्रश्नांची उत्तरे साक्षात्कारी स्वरूपाचीच असणार. त्यांचे समर्थन तार्किक युक्तिवादाच्या आधारे करता येईल. पण वैज्ञानिक पुरावा देता येणार नाही.’ विश्वाच्या वाटचालीविपयीचे, तिच्या हेतूचे प्रश्न ज्या साक्षात्कारी पद्धतीने सोडविता येतात असे पळशीकर म्हणतात त्या पद्धतीची एक दोन उदाहरणे ते देतील तर बरे होईल. तसेच साक्षात्कारी पद्धतीने दिलेली उत्तरे ‘सत्य’ आहेत की ‘असत्य ते ठरविण्याचे उपाय कोणते आहेत तेही त्यांनी सांगावे. आपल्या लेखांत पुढे त्यांनी विश्वाविषयी जी विधाने केली आहेत ती साक्षात्कारी पद्धतीने मिळाली असतील, तर ती उघडच पूर्णपणे निराधार आहेत असे म्हणावे लागेल.

उदाहरणार्थ ते म्हणतात, ‘नित्य उत्क्रांत होण्याची क्षमता ज्या अनियमित, स्वायत्त व स्वयंभू सृजनशीलतेमध्ये असते ते सृजनशील चैतन्य ओतप्रोत असलेली नियमवद्ध व्यवस्था असे विश्व, पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे स्वरूप आहे. या साक्षात्कारी उत्तराविषयी आपण काय म्हणणार आहोत? साक्षात्कारी सत्याचे समर्थन तार्किक युक्तिवादाच्या आधारे करता येईल असे पळशीकर म्हणतात. परंतु तार्किक युक्तिवाद त्याच्या समर्थनाप्रमाणेच त्याच्या खंडनार्थही वापरता येईल.

तसा तो वापरायचा तर वरील वर्णनात विश्वव्यवस्थेचे वर्णन अनियमित आणि नियमवद्ध असे दोन्ही केले आहे ते अनाकलनीय आहे. त्याचे पळशीकर काय समर्थन करतील ते करोत. आपण पुढे जाऊ. ते म्हणतात की या विश्वव्यवस्थेत नित्य उत्क्रांत होण्याची क्षमताआहे. वस्तुतः उत्क्रांती ही गोष्ट विश्वात कदाचित् एकट्या पृथ्वीवर, आणि तीही येथे जीव निर्माण झाल्यापासून, सुरू झालेली आहे. बाकीच्या पृथ्वीच्या कोट्यवधि पट मोठ्या असलेल्या विश्वात कोठे जीवसृष्टी असल्याची माहिती नाही. पृथ्वीवरही येथील घडामोडींवर दोन प्रकारच्या नियमांचे प्रभुत्व आहे. अचेतन पृथ्वीवरील भौतिक घडामोडींचे भौतिक नियम, आणि जीवसृष्टीवर अधिकार चालविणारे जीवशास्त्रीय नियम. जीवसृष्टी मात्र सतत नव्याला जन्म देणारी हे खरे आहे. हाच निर्जीव आणि सजीव यांतील भेद आहे. जीवांच्या प्रत्येक पिढीतील व्यक्ती मृत्युमुखी पडतात आणि नवीन जन्माला येतात. याला कवी नवनवोन्मेषशालित्व म्हणतात. परंतु यातही नियमांचा व्यापार आहेच. कोणत्याही जीवजातीतील नर आणि मादी एकत्र आले की अपत्यसंभव होतो हा नियम आहे,आणि अपत्यजन्म म्हणजे नवीनाची उत्पत्ती.

पळशीकर पुढे म्हणतात, ‘माणूस हा निसर्गसृष्टीचेच एक अपत्य आहे. अपत्याच्या ठिकाणी जर आत्मभान, विवेक, सहेतुकता आढळत असतील तर निसर्गसृष्टी ‘लहरी ‘निर्हेतुक असे कसे म्हणता येईल? परंतु मानव निसर्ग-सृष्टीचे अपत्य आहे हे म्हणणेआलंकारिक आहे, आणि म्हणून जर अपत्य हेतुमान असेल तर निसर्गसृष्टी निर्हेतुक कशी असू शकेल? हा प्रश्न उघडच भाबडेपणाचा आहे.
पळशीकर पुढे म्हणतात.’निसर्गसृष्टीचा प्रत्यय माणसाला एकाच वेळी शक्ती, चैतन्य व व्यवस्था म्हणून निरंतर येत आला आहे. ज्या तर्क किंवा विवेकाच्या आधारे ती कार्य करते, ते तर्क व विवेक आपणास समजण्याच्या पलीकडे आहेत, हा देखील प्राचीन काळापासून आजतागायत माणसाचा अनुभव आहे.’

‘निसर्गसृष्टी तर्क व विवेकाच्या आधारे कर्म करते;’ असे पळशीकर म्हणतात. पण हे ते कशावरून म्हणतात? मुळात सृष्टी कार्य करते ही भापाच आलंकारिक आहे; आणि ती तर्क आणि विवेकाच्या आधारे कार्य करते हे म्हणणे तर पूर्ण निरर्थकआहे.

ते पुढे म्हणतात;’मधल्या काळात जी बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका अंगीकारली गेली तिच्या आधारे उपस्थित केले जाणारे प्रश्न अविवेकी व असमंजस ठरत असल्यास नवल नाही. विश्व व पृथ्वी या स्वरूपांत जी गतिमान शक्ती कार्यरत आहे, तिचे अस्तित्व मान्य करणे, मानवाच्या मर्यादा स्वीकारणे, हा विज्ञानयुगापूर्वीच्या माणसांच्या अज्ञानाचा भाग नव्हता हे आज आपल्या ध्यानात येत आहे.प्रतिनिर्मिकाचे सामर्थ्य व क्षमता प्राप्त झालेल्या माणसाने या क्षमतासामथ्र्याबद्दल पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे ऋणी राहावे, आपला मायलेकराचा संबंध जाणावा व मर्यादेने वागावे हा विवेक पर्यावरणीय दृष्टी व भूमिका यांच्या गाभ्याशी आहे.’ पृथ्वी व निसर्ग यांच्या ऋणाची भाषा, तसेच मायलेकराच्या संबंधाची भाषाया सर्व आलंकारिक आहेत. त्यांच्या वाच्यार्थाने आशय काय आहे हे सांगणे अशक्य आहे. मायलेकरांच्या संबंधाविषयी वर लिहिले आहेच. तीच गोष्ट पृथ्वी व निसर्ग यांच्या ऋणाची, ऋण हे कोणातरी चेतन, बुद्धिमान व्यक्तीकडून मिळते, आणि त्याबद्दल कृतज्ञ राहणे उचित असते. पण निसर्गाचे कृतज्ञ राहावे म्हणजे काय हे सांगणे अशक्य आहे. पळशीकरांना या विषयात उपमारूपकाशिवाय बोलताच येत नाही, यावरून त्यांचे या विपयाचे विचार किती अस्पष्ट आहेत हेच दिसून येते.

निसर्गावर मात करण्याची भूमिका अहंमन्य, उन्मत्त व अविवेकी आहे असे पळशीकर म्हणतात. एका अर्थाने निसर्गावर मात करण्याची भामही आलंकारिकच आहे. पण तिचा अर्थ एवढाच आहे की निसर्गनियमांच्या ज्ञानाचा उपयोग करून मानवी जीवन समृद्ध करावयाचे. हे मनुष्य करू शकतो याची चुणूक तर विज्ञानाने दाखविलीच आहे. आजपर्यंत त्याला ‘न भूतो’ असे यश मिळाले आहे. त्यामुळे भविष्याविषयीही त्याला विश्वास वाटतो. यात उन्मत्तपणाचा प्रश्न कोठे येतो ते कळत नाही. पळशीकर म्हणतातः ‘प्रार्थना, कृपा यांची गरज उरणार नाही इतके सर्वंकष नियंत्रण विज्ञानाच्या आधारे प्रस्थापित करणारे तंत्रज्ञान आपण हस्तगत करू ही धारणा घमेंडीचाच भाग आहे. पण प्रार्थना कोणाची करायची? कृपा कोणाकडून अपेक्षायची? निर्जीव निसर्गाची प्रार्थना करणे दगडधोंड्यांपुढे लोटांगण घालण्याइतकेच अविवेकी आहे. स्वाभिमानी मनुष्याला अशी भूमिका शोभणारी नाही, कारण प्रार्थना ज्याची करावी असे श्रेष्ठ कोणी समोर नाहीच. आहे फक्त हेतुशून्य विराट शक्ती. तिला वश करणे हीच तिच्याविषयी घ्यावयाची योग्य भूमिका आहे.

पळशीकर बुद्धिप्रामाण्यवादी जीवननिष्ठा आणि उपभोगवादी जीवनपद्धती एकच आहेत असे धरून चालतात, आणि जी नावे उपभोगवादाला ठेवायची ती नावे ते बुद्धिप्रामाण्यवादाला ठेवतात. परंतु विवेकवाद उपभोगवादाला मान्यता देत नाही. आपले जीवन विवेकाने, संयमाने नियंत्रित असावे असेच तो शिकवितो. विज्ञानवादी, जीवननिष्ठा ही सबंध जीवनाला व्यापणारी निष्ठा नाही; पण तिच्या क्षेत्रात ती सार्वभौम आहे. हे क्षेत्र म्हणजे ज्ञानाचे क्षेत्र, या क्षेत्रात ज्ञान मिळविण्याचा उपाय आणि पद्धती एकच आहे-वैज्ञानिक पद्धती. निसर्गाचे, विश्वाचे ज्ञान मिळविण्याचा विज्ञानाला उपलब्ध नसलेला कोणताही उपाय कोणालाही उपलब्ध नाही. मात्र विज्ञानाचा अधिकार ज्ञानक्षेत्रापुरता मर्यादित आहे.आपण काय करावे? आपली ध्येये,साध्ये काय असावी? याविषयी विज्ञान काही सांगत नाही. पण विवेकाचे क्षेत्र ज्ञानापेक्षा, विज्ञानापेक्षा मोठे आहे. त्यात ज्ञानाबरोबर कर्मही येते, आणि कर्म विवेकी असावे असा विवेकवादाचा आग्रह असतो. आपण कोणाही मानवाला केवळ साधन म्हणून वापरू नये, तो स्वतः साध्य आहे हे आपण लक्षात ठेवावे ही विवेकाची कर्मक्षेत्रातील प्रमुख शिकवण आहे. जास्तीत जास्त जीवांचे जास्तीत जास्त सुख ज्याने निर्माण होईल अशी कर्मे आपण सर्वदा करावी, केवळ स्वार्थाने सापडेल ते ओरबाडून आपली धन करीत राहणे ही अनीती आहे असे विवेकाचे सांगणे आहे. आणि जास्तीत संख्येत केवळ मानवांचाच विचार करावा असे नव्हे, तर त्यात सर्व संज्ञावंतांचा अंतर्भाव उपयोगितावाद्यांच्या आद्यसूरींनी केला आहे.

‘जे जीवन अद्ययावत् व आधुनिक ते प्रगत, ज्यात उपभोगांची रेलचेल, जे जास्त तंत्रज्ञानाधिष्ठित ते उच्चतर हे म्हणणे वस्तुनिष्ठ नाही हे पळशीकरांचे म्हणणे योग्यच आहे. पण ते वस्तुनिष्ठ आहे असे विवेकवादी म्हणत नाहीत. एखाद्या जीवनप्रकारात तंत्रविज्ञानाचा उपयोग जास्त आहे एवढ्यानेच तो प्रकार उच्च, प्रगत हे म्हणणे कोतेपणाचे आहे. जीवनाला उच्चता, प्रगतता येतो ती नैतिकतेमुळे हेही पळशीकरांचे म्हणणे बरोबर आहे. पण पळशीकर असे सुचविततात की तंत्रविज्ञान वापरणारे समाज त्यामुळे खालच्या दर्जाचे ठरतात, आणि ते चुकीचे वाटते. गांधीजींच्या ग्रामोद्योगी संस्कृतीचा ते जो पुस्करार करतात त्यातून हेच सूचित होते. ग्रामद्योगी संस्कृती ज्यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान अविकसित होते तेव्हा योग्य होती. पण आज तिचा आग्रह धरणे म्हणजे दरिद्री, भरड जीवनाकडे मानवाला घेऊन जाणे होय. त्याला मानव संमती देणार नाही. विज्ञानाचे फायदे असंख्य आहेत. त्याने ज्ञानाची क्षितिजे ‘न भूतो इतकी विस्तारली आहेत हे तर आहेच. परंतु त्याचे मानवावर अन्यही इतके उपकारआहेत की त्याच्याविरुद्ध ब्रही उच्चारू नये. फक्त एकाच उपयोगाचा उल्लेख करावयाचा झाला तर वैद्यकशास्त्रातील प्रगतीचा करता येईल. आधुनिक वैद्यकाने मनुष्याचे सरासरीआयुर्मान ६० वर्षाइतके गेले आहे. प्राण घेणारे रोग जवळपास नाहीसे झाले आहेत. आज मनुष्याला मरण येते ते बहुधा वार्धक्याने येते आणि ते योग्यच आहे. जेव्हा विविध प्रकारचे सुखोपभोग घेऊन झालेले असतात, आणि अधिक उपभोग घेण्याचे सामर्थ्य कमी होऊ लागलेले असते. अशा वेळी शांतपणे मृत्यूला सामोरे जाणे यात शहाणपणा आहे. ती अवस्था आज विज्ञानाने मनुष्यापुढे आणून ठेवली आहे. पळशीकर म्हणतात. ‘सुसंस्कृतता’ ही भौतिक उपभोगाचे मान केवढे, सत्ता, मानमरातब, कीर्ती किती मोठी, यावर ठरत नाही. ती माणसाची, समाजाची नैतिक उंची किती, वागणे माणुसकीला साजेसे किती, करुणा व प्रेम यांनी ओतप्रोत किती यावरून मोजली जाते. हे खरेच आहे. या मुद्द्यावर बुद्धिप्रामाण्यवादी आणि पळशीकर यांत मतभिन्नता नाही.

लेखाच्या शेवटच्या भागात पळशीकर माणसाने निसर्गासहित वाटचाल केली पाहिजे हे नानासाहेब गोव्यांचे म्हणणे उद्धृत करून विचारतात : ‘विज्ञानाचा विनाशकारी तंत्रवैज्ञानिक आविष्कार रोखावयाचा असेल तर कोणत्या गोष्टींचा पुनर्विचार होणे अगत्याचे आहे?’ या प्रश्नाला त्यांचे उत्तर आहेः ‘धर्माची व विज्ञानाची सांगड घातली पाहिजे. धर्मश्रद्धांचा उच्छेद करून नव्हे तर त्यांचे परिष्करण करून, धर्मश्रद्धा उन्नत वनवून, विभिन्न धर्मातील संत/फकीर/साधू यांना अनुसरून अशी सांगड घालणे अधिक व्यवहार्य आहे.

परंतु धर्माचा इतिहास पाहिला तर धर्मानी आजपर्यंत मानवसमाजात फूट पाडण्यातच मदत केली आहे. जोडण्याची नाही. धर्माचे अनेकत्व हे धर्माचे अवश्य अपरिहार्य अंग आहे. धर्म हा हिंटू तरी असतो, इस्लाम तरी असतो, किंवा आणखी तिसरा एखादा धर्म असतो. या प्रत्येक धर्माच्या प्रणेत्याने आपल्या धर्माच्या सच्चेपणावर आणि श्रेष्ठत्वावर भर दिलेला असतो, आणि प्रत्येक धर्माच्या अनुयायांना आपल्या धर्माचे सर्वश्रेष्ठत्व पटलेले असते. सर्व धर्म एकच आहेत, त्यांच्यात विरोध नाही असे कोणत्याही धर्मात म्हटलेले नाही, आणि तसे म्हणणे भावडेपणाचे आहे. सर्व धर्म समान आहेत असे अनेक लोक म्हणतात; पण ते खरे असेल तर आपण हिंदू आहोत किंवा मुसलमान आहोत हे म्हणणे निरर्थक होईल, आणि आपण कोणत्याही एका धर्माचे नाही असे आपल्याला कबूल करावे लागेल. पण अशी तयारी किती लोकांची असते? परधर्माविषयी सहिष्णुता वाटण्याकरिता आपली स्वतःच्या धर्माविपयीची निष्ठा कमी व्हावी लागते. म्हणून धर्माचा फोलपणा, धर्मश्रद्धांचा अविवेकीपणा ह्या गोष्टी स्पष्ट करूनच परधर्मसहिष्णुता वाढू शकण्याचा संभव आहे. सर्वधर्मसमभावाचे तत्त्व आचरण्याचा गांधीनी जेवढा प्रयत्न केला, आणि विशेषतः मुसलमान आणि हिंदू यांच्यात वंधुभाव निर्माण करण्याची जेवढी धडपड केली, तितकी आजपर्यंत कोणी केली नाही आणि कदाचित् भविष्यातही कोणी करणार नाही. पण त्यांना किती यश आले? जवळ जवळ शून्य! म्हणून धार्मिक सहिष्णुता निर्माण करण्याचा एकमेव उपाय म्हणजे धार्मिक श्रद्धा शिथिल करणे. या श्रद्धा जोपर्यंत पक्क्या आहेत तोपर्यंत विविध धर्मीयांत वैरभाव निर्माण होणे अपरिहार्य दिसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.