पुस्तकपरिचय

सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या अंकाचे स्वरूप आहे. स्त्रीजीवनावर परिणाम करणार्‍या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक-अंगांचा ऊहापोह तर यामध्ये केला आहेच, परंतु समाजापासून सहसा दडवून ठेवलेले असे जे स्त्रीचे कौटुंबिक जीवन, त्यावर या अंकात विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम या अंकातील स्त्री कुटुंबातील आई म्हणून कशी आहे ते बघू .

कुटुंबातील स्त्री, एक आई म्हणून
‘कृष्णवर्गीय मायलेकीची गोप्ट’ ही मर्लिन नॉरबेस फिलिप यांची वीणा गवाणकर यांनी अनुवादित केलेली कथा. कथा असूनही ही अतिशय वास्तव आहे. कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या वेस्ट इंडियन कुटुंबातील मार्गारेट ही मुलगी. काळेपणाचा न्यूनगंड आणि पुरुषी अहंकारअसलेल्या आपल्या वडिलांना ती त्यांची जागा दाखवून देते. त्यासाठी नवर्‍याला सारे स्वत्व अर्पण केलेल्या आपल्या आईमधील स्वाभिमान फुलवते आणि त्याचबरोबर त्या दोघांमधील नातेसुद्धा. पति-पत्नी, आई-मुलगी, मैत्रिणी अशा अनेक नात्यांचे पदर लेखिकेने हळुवारपणे उलगडून दाखवले आहेत.

‘’श्यामची आई’ मधील आई’ या लेखात (लेखन-शांता गोखले, अनुवाद- वासंती दामले) साने गुरुजींनी वर्णिलेली श्यामची आई आणि श्यामचे त्याच्या आईशी संबंध याचा ऊहापोह केला आहे. स्त्री-पुरुष-समानता, स्त्रियांचे अधिकार यांच्या बाबतीत अनेकदा पुरोगामी दृष्टिकोन अंगीकारणारे गुरुजी (पुस्तकातील निवेदक) मधूनच अचानक प्रतिगामी विचारांचे बनतात. ते मूलतः बुद्धिवादी नसून भावुक आहेत. त्यामुळेसमाजरचनेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न ते करीत नाहीत. इतकेच नाही तर समाजात आढळणार्‍या विसंगती आणि दुष्ट रूढी यांना तोंड न देता येऊन ते आईच्या सुरक्षित कुशीतच परत जाण्याची इच्छा सूक्ष्मपणे प्रकट करतात.

आपल्या मातेच्या मृत्यूनंतर जगातील सर्वच स्त्रिया आपल्या माता आहेत असे मानून साने गुरुजींनी मातृत्वाच्या नात्याला एक भव्य व्यापक परिमाण मिळवून दिले. त्याचाच अंगीकार करणारी आणखी एक व्यक्ती या अंकात आपल्याला भेटते ती म्हणजे रेणू गावस्कर. आपल्या स्वतःच्या मुलाव्यातिरिक्त ज्यांची काळजी घेणारे कुणी नाही त्यांना आपले मानते ते मातृत्व धन्य होय. ‘न घरकान घाटका’ या लेखात उन्मागीं (delinquent) मुलांची परवड लेखिकेने वर्णन केली आहे. ‘डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या अशा मुलांच्या संस्थेत गेली दहा वर्षे या बाई जात आहेत. तिथल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनेक मार्ग त्यांनी त्याच्याबरोबर काम करताकरताच शोधून काढले. अनेक प्रकारांनी त्यांना लिहिते बोलते केले, मन मोकळे करायला प्रवृत्त केले. त्यांच्यातील सुप्त गुण शोधून त्यांना चालना दिली आणि आईच्या मायेने त्यांच्या चुका पोटात घालून, त्यांच्यातील कमीपणा स्वीकारून त्यांना घडवले, माणसाळवले, वाईट मार्गापासून परावृत्त केले. आजमितीस ‘स्कूल’ मधून बाहेर पडलेली अनेक मुले बाईंशी व्यक्तिशः संबंध ठेवून आहेत.

मातृत्वाचा खरा अर्थ हाच आहे. ‘तुझा नवरा मुलीला छळत असेल तर मी त्याला माझ्याजवळ ठेवून तिचा सांभाळ करीन’ असे म्हणणारी ‘कृष्णवर्णीय मायलेकींची गोष्ट मधील मार्गारेटची आई, ‘मातृप्रधान कुलपद्धती ते पितृसत्ताक कुटुंबसस्था’ मधील पशुपक्ष्यांच्या पिलांना स्वतःचे स्तन्य देऊन वाढवणार्‍या आदिवासी स्त्रिया, यांच्यामधूनही हेच मातृत्व प्रकट झाले आहे.

कुटुंबातील स्त्री : एक पत्नी म्हणून
पति-पत्नीचे नाते हे अनेकपदरी आहे. ते जेवढे वरून सुंदर दिसते, तेवढेच आतून कुरूपही असू शकते. पत्नीत्वाच्या नात्यामधून स्त्रीला भावनिक सुरक्षितता, मानसिक बळ प्राप्त होते असे आपण समजतो. पण प्रत्यक्षात मात्र अनेकदा त्यामध्ये तिच्या शक्तीचा हास होतो, व्यक्तिमत्त्वाचा बळी दिला जातो. या विपयावरील लेखांमधून, कुठे पती व्यसनाधीन आहे म्हणून, तर कुठे तो अहंकारी आहे म्हणून, इतकेच काय तर कुठे तो कलावंत आहे म्हणून, पत्नीत्वाचे भोग भोगणारी स्त्री आपल्या दृष्टीस पडते.

‘दूरत्व-स्वत्व शोधण्याची संधी’, या लेखामध्ये-नोकरीधंद्याच्या निमित्ताने पतीपासून दूर राहणार्‍या/रहावे लागणार्‍या स्त्रियांची मानसिकता, त्यांना सोसावे लागणारे ताणतणाव, यांचे वर्णन विद्या विद्वांस यांनी केले आहे. नवरा दूर असल्याचे अनेक फायदेतोटे या बायका अनुभवतात. काहींच्या मते अशा परिस्थितीत त्यांना जी जवाबदारी, अनुभव, निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, स्वावलंबन, खंबीरपणा वाढतो. पण त्याचवेळी एकटेपणाचा कंटाळा, शेअरिंगसाठी कुणी नसल्याची रुखरूख,नातेवाईकांची दया दाखवण्याची वृत्ती, sexual deprivation हेही सहन करावे लागते. ज्या पति-पत्नीमध्ये बेबनाव आहे, त्यांना मात्र हेच बरे वाटते.

‘व्यसनाधीनता आणि आमचे कुटुंब’या लेखामध्ये एका अनामिकेने दारुड्या नवर्‍याबरोवर संसार करतांना झालेली स्वतःची आणि मुलांची कुतरओढ वर्णिली आहे. आज ती मुलांना घेऊन स्वतंत्रपणे राहू लागली आहे आणि नवर्‍याला त्याच्या व्यसनासकट तिने समंजसपणे स्वीकारले आहे. तिच्या मनातील अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी ‘ऑल अनॉन ग्रूप्स’ची (मद्यग्रस्तांच्या कुटुंबासाठी वैठकी) तिला फार मदत झाली. मद्यपाश हा एक रोग आहे. उपचार करून घेण्याची इच्छा नसणे हे त्या रोगाचे लक्षण आहे, आणि त्याची लागण व्यक्तीला न होता संपूर्ण कुटुंबालाच होते हे तिला समजले.

याच आजाराचा अधिक विस्ताराने सैद्धान्तिक पातळीवर विचार आणि दैनंदिन जीवनात त्यावर व्यावहारिक उपाय शोधण्याचा प्रयत्न ‘मद्यपाश’ या लेखात विनीता चितळे यांनी केला आहे. दारूच्या व्यसनाचे मानसिक, शारीरिक, सामाजिक, कौटुंबिक, दुष्परिणाम, तसेच ‘ऑल अनॉन गटा’ची प्रश्नावलीही त्यांनी प्रकाशित केली आहे.

‘निर्मिक पती पत्नी आणि समीक्षक’ हा लेख सुनीता देशपांडे यांनी आपल्या ‘आहे मनोहर तरी ’ या पुस्तकाला उद्देशून एका समीक्षकाने पाठवलेल्या पत्राच्या उत्तरादाखल लिहिला आहे. लक्ष्मीबाई टिळकांपासून सुनीता देशपांड्यांपर्यंत सर्व कलावंत पत्नींना आपल्या पतींना समजूनच घेता आले नाही हा त्या पत्रलेखकाचा आरोप. यावर एखाद्या संवेदनशील बाईला ‘आपला आयुष्याचा जोडीदार…. विश्वातल्या सर्व गोप्टींचं सुखदु:खं समजून घेणारा…. आपल्याबाबतीत इतका आंधळा, निर्लेप राहूच कसा शकतो असा प्रश्न पडणे अनैसर्गिक आहे काय?’ अशा शब्दांत आपली व्यथा व्यक्त केली आहे. कलावंत असणार्‍या आणि स्वतःला कलावंत समजणार्‍या तमाम पुरुषवर्गाच्या स्त्रियांची ही प्रतिनिधिक व्यथा म्हणावी लागेल. त्याचप्रमाणे कोणताही कलावंत हा कायम सर्जनशील असत नाही. कलावंताचे आलस्य मर्यादित काळापुरते असते आणि कलावंत हा वेंधळा, व्यसनी, चक्रम असलाच पाहिजे हा एक धादांत गैरसमज आहे. अशा काही लाखमोलाच्या गोष्टी आपल्या लेखातून जाहीरपणे मांडल्याबद्दल सुनीताबाईचे अभिनंदनच करायला हवे.

कुटुंबाबाहेरील स्त्री
पत्नीत्वाच्या नात्याबाहेरही, एकट्यादुकट्या राहणार्‍या, विविध क्षेत्रात वावरणार्‍या अनेक स्त्रियांच्या वाट्याला कधी त्या ‘एकट्या, ‘टाकलेल्या’, ‘अनाथ’ आहेत म्हणून, तर कधी तसे काहीही नसताना निव्वळ त्या स्त्रिया आहेत म्हणून, घाणेरडे,अभद्र प्रसंग येतात.

चांगल्या म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत, आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा स्त्रियांच्या वाट्याला पुरुषांचा छळ येत नसतो असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ‘पण,………..आणि मी मधुश्री’ मधील मधुश्री दत्ता ही नाट्यदिग्दर्शिका बोरिवली रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी पुरुषांच्या, तेही पोलिसांच्या, छेडछाडीचा कसा बळी ठरली, या अन्यायाविरुद्ध ती व तिच्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या मैत्रिणींनी मिळून कसा लढा दिला व देत आहेत, ते जयश्री वेलणकर यांनी सांगितले आहे. मधुश्री रात्री अडीच वाजता बोरिवली स्थानकावरच्या दुकानात सिगारेटस् आणि बिस्किटे घ्यायला गेली. तिथेच तिच्यावर प्रसंग गुदरला. त्यानंतर आरोपींना शिक्षा आणि मधुश्रीला न्याय मिळावा म्हणून आणि पोलिसांना त्यांच्या कृत्याची लाज वाटावी म्हणून स्त्री संघटनाअनेक आघाड्यांवर अजूनही लढत आहे.

अशिक्षित, सामाजिक प्रतिष्ठा नसलेल्या स्त्रीची गत तर आणखीच वाईट आहे. ‘सीतेच्या लेकी’या लेखात छाया दातार यांनी टाकलेल्या स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल लिहिलेआहे. टाकलेल्या स्त्रियांचा प्रश्न हा खूप भारतीय आहे आणि सीता ही येथील आद्य परित्यक्ता आहे, म्हणून त्यांनी या आजच्या परित्यक्तांना ‘सीतेच्या लेकी’ म्हणून संबोधिले आहे. आपल्या समाजाच्या आर्थिक विकासावरोवरच बायका टाकण्याचे प्रमाणही वाढले, कारण विकासाचे झुकते माप पुरुषांना मिळाले. त्यांची प्रतिष्ठा तर वाढलीच, शिवाय नोकरी धंद्याच्या निमित्ताने दुसर्‍या गावाला जाऊन समाजाच्या नजरा चुकवता येतात, आणि बायको कोर्टात गेलीच तरी कायद्याला गुंगारा देणे किती सोपे आहे ते त्यांना माहितीच असते. स्त्रीला टाकण्याची कारणे वरकरणी कोणतीही दिली गेली, तरी त्यांमधून तिच्याकडे दुय्यम म्हणून पाहण्याची मनोवृत्ती व्यक्त होते. ‘घरबसल्या काम, नाही लाभ, नाही आराम’ या लेखात नंदिता शहा, नंदिता गांधी यांनी self-employed स्त्रियांची परवड सांगितली आहे. या स्त्रिया घरच्या घरी काम करून पैसे मिळवतात, पण प्रत्येक वस्तू तयार करण्याचा दर फार कमी असतो. जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त काम करण्यास भाग पडलेल्या स्त्रियांना स्वतःचे असे खाजगी आयुष्य राहात नाही आणि त्यांचे घर हे घर राहात नाही.

नवर्‍याकडून, समाजाकडून पीडलेल्या स्त्रीने न्यायालयात जावे, तर तिथेही परिस्थिती फारशी आशादायी नाही. १५-१६ वर्षे चळवळ केल्यानंतर स्त्रीमुक्ती संघटनेची कौटुंबिक न्यायालयाची मागणी मान्य तर झाली; पण तीही मोजक्या शहरांमध्ये, आणि तिथलीही अवस्था आगीतून फुफाट्यात पडावे तशी झाली आहे. इतर न्यायालयांप्रमाणेच कामातील ढिलाई, लालफीत, गलथानपणा इथेही भरपूर आहे. शिवाय या निकालावर हायकोर्टाच्या निकालाची तलवार आहेच. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे न्यायालय कुटुंबव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे, तिला अबाधित ठेवू पाहणारे आहे. आता कुटुंबव्यवस्था टिकवायची म्हणजे त्यासाठी स्त्रियांनी बळी जावे हे आलेच! इथे आलेल्या अनेक स्त्रिया वेळ, पैसा, शक्ती खर्च करून शेवटी अपयश आणि मनस्ताप यांच्याच धनी होऊन बसल्या आहेत. (कौटुंबिक न्यायालय-एक मृगजळ’ ले. मीना देवल, अरुंधती सरदेसाई).

अन्यायग्रस्त (विशेषतः अशिक्षित) स्त्रीला त्यामधून मुक्त होण्यात दोन अडचणी असतात, निवारा आणि उपजीविकेचा प्रश्न, नवर्‍याकडून पोटगी मिळवणे किती कठीण असते ते आपण वर पाहिलेच. घरे जेव्हा बाईला सामावून घेत नाहीत तेव्हा निवारागृहांची गरज भासते. (‘स्त्रियांसाठी निवारागृहे’ ले. छाया दातार) अनेक स्त्रियांची निवार्‍याची तातडीची गरज या संस्था भागवत असल्या तरी तेथेही अनेक समस्या उद्भवतात. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक परिसरांतून आलेल्या मुलींना एकत्र राहणे अनेक कारणांनी कठीण असते. संस्थेच्या बंदिस्त जीवनातून अशा स्त्रियांची सुटका करायची म्हणजे समाजानेच त्यांना स्वीकारले पाहिजे.

स्त्री आणि आरोग्य
स्त्रियांचे बहुतेक आजार त्यांच्या वंशसातत्य राखण्याच्या जवाबदारीतूनच उद्भवत असले तरी त्यांचे आरोग्य हा अत्यंत दुर्लक्षित विषय राहिला आहे. आधुनिक ओषधे, गर्भनिरोधके आणि सुप्रजननशास्त्राविषयी एकूण वैद्यकीय धोरण यामुळे स्त्रियांचा वंशच नष्ट होतो की काय असे वाटण्याची पाळी आली आहे. या अंकातील तीन लेखांनी मात्र या विषयाचा चांगला परामर्श घेतला आहे. ‘विज्ञान-एक सांस्कृतिक आविष्कार’मध्ये स्वातीजा, चयनिका यांनी स्त्रीमुक्ती व तिच्याशी संबंधित मूलभूत वैज्ञानिक प्रश्नांची चर्चा करताना स्त्रियांवर लादलेली गर्भनिरोधके आणि त्यांनी त्यांच्या आरोग्याला होणारा अपाय यांचे वर्णन केले आहे. भारतातील स्त्रियांची आरोग्यविषयक स्थिती किती गंभीर आहे ते ‘फिनरेजच्या निमित्ताने’ या लेखात मालिनी कारकल यांनी सांगितले आहे. गर्भनिरोध आणि खरे खोटे वंध्यत्व यावर उपाय करून घेण्यासाठी स्त्रियांनाच बळी जावे लागते. भारतातील गर्भवतींमध्ये/मातांमध्ये पाचशेहून अधिक मृत्युमुखी पडतात. (हे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.) सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रियांची बाळंतपण अशिक्षित व्यक्तींकडून होतात. आपल्या समाजात स्त्रियांची ओळख मातृत्वानेच होत असते. म्हणून माता न झालेल्या स्त्रियांना सामाजिक व मानसिक यातना भोगाव्या लागतात. त्यातून बाहेर पडण्याची त्या वाटेल ती किंमत चुकवायला तयार असतात, आणि याचाच फायदा डॉक्टरांकडून उचलला जातो. याचाच परिणाम म्हणून आज मातांच्या मृत्यूदराची चिंता न करता वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स आपला बराच वेळ खर्च करतांना दिसतात, त्याचे कारण त्या क्षेत्रातील जास्त कमाई हेच आहे. वंध्यत्व फार मोठ्या प्रमाणाचे वैगुण्य असल्याचा प्रचारही तेच करतात. निसर्ग-मानव संबंध, स्त्रियांची लैंगिकता, जननक्षमता या संदर्भात कार्य करणार्‍या ‘फिनरेज’ या संघटनेची माहितीही लेखिकेने दिली आहे.

स्त्रियांच्या जगण्याचा हक्क या लेखात रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी जन्माला न येऊ दिलेल्या मुलींची कहाणी सांगितली आहे. गर्भलिंगचिकित्सेने आपल्या समाजाने स्त्रीअर्भकहत्येची पुढची पायरी गाठली आहे. हमखास मुलगा होण्याच्या तंत्राला जगात सगळीकडे आज इतकी जास्त मागणी आहे की दीडशेहून अधिक वैज्ञानिक चमू याच एका प्रश्नावर काम करीत आहेत. पॉल एरिलिश नावाचा दोन नोबेल पारितोषिकांचा मानकरी म्हणतो की, ‘पृथ्वीवरील लोकसंख्या नियंत्रणाचा एकच मार्ग आहे – तो म्हणजे हमखास मुलगा होईल असे तंत्र शोधून काढणे.’ गर्भलिंगकेंद्रे आज सर्रास सगळीकडे पसरलेली आहेत. त्या व इतर तंत्रांचा परिणाम म्हणून १९८१ ते ९१ मध्ये भारतातील स्त्रियांची संख्या ७९,७८,००० ने घटली आहे. डॉक्टर्स, संशोधक, राज्यकर्ते सगळेच या कटात सामील आहेत. उत्तर प्रदेशासारख्या काही ठिकाणी बहुपतित्वाची चाहूल आत्ताच लागते आहे. या देशात बायकांना जगू तरी देणार आहेत की नाहीत?

संकीर्ण लेख :
‘मातृप्रधान कुलपद्धती ते पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था’ या लेखात वसंत गुप्ते यांनी स्त्रिया या नैसर्गिकतः कमकुवत वा दुय्यम नाहीत हे मानववंशशास्त्रातील संशोधनाच्याआधाराने सिद्ध करून दाखवले आहे. आठ हजार वर्षांपूर्वीचा मातृप्रधान समाज कसा सुदृढ होता, त्याकाळी स्त्रियांनीच अनेक शास्त्रांचा, कलांचा पाया कसा घातला, शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठी विविध प्रथा, रूढी सुरू केल्या; परंतु त्यांचे विषर्यस्त रूप आज स्त्रियांनाच अवला ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी कसे वापरले जात आहे तेसांगितले आहे. ‘नवे औद्योगिक धोरण’ मध्ये नलिनी पंडित यांनी दारिद्र्यनिर्मूलन आणि सामाजिक न्याय हे उद्देश आपल्या औद्योगिक धोरणामधून साध्य होत नाहीत. त्यासाठी पर्यायी विकासनीतीचा अवलंब करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आहे. गणिकांची खेळी’ या लेखात शुभा खांडेकर यांनी पुरुषी अहंकाराला, वर्चस्वाला गणिकांनी अप्रत्यक्षपणे कसा शह दिला आणि मर्यादित स्वरूपाची का होईना समांतर सत्ता कशी प्रस्थापित केली याचे वर्णन आहे. ‘अश्लीलतेची अंधारी रात्र’ मध्ये प्रकाश बुरटे यांनी शरीर मनाची फारकत आणि परस्पर आदरप्रेमाची भावना नष्ट झाल्यामुळे अश्लीलता संभवते. नुसत्या शारीरिक पातळीवरील वासना आणि नुसत्या मानसिक पातळीवरील प्लेटॉनिक लव्ह या दोन्ही विकृतीच आहेत असे म्हटले आहे.

अंकाचे संपादन विद्या विद्वांस यांनी व संपादन साहाय्य स्त्री उवाच गटाने केले आहे. मुखपृष्ठावर अमृता शेरगिल यांचे ‘दो औरतें’ हे चित्र आहे. एकशेबावन भरभक्कम पृष्ठांच्या या अंकातील बहुतांश लेखन उद्बोधक व संग्राह्य आहे. मुलाखती, सर्वेक्षण, आकडेवारी यांच्या आधाराने लेख लिहिले आहेत आणि कार्यकर्तेच लेखक आहेत. या स्त्रीच्या तोंडचे शब्द तिच्या अनुभूतीचे असल्यामुळे त्यांना वाङमयीन, लालित्यपूर्ण भाषेचे अवगुंठन लागत नाही. उलट कथा, कादंबर्‍या यांच्यामुळे वास्तव जाणण्यात अडचणच निर्माण होते असे ‘गणिकांची खेळी’, ‘मद्यपाश’ या लेखांमध्ये स्पष्ट म्हटले आहे. ‘निर्मीक पती पत्नी…., ‘मातृप्रधान कुलपद्धती’………, हे लेख आणि, ‘कृष्णवर्णीय मायलेकींची….ही कथा कथा असूनही उत्कृष्ट, ‘गंधार गाज’ सारखा ललित लेख प्रकाशित करून मात्र काय साधले ते समजत नाही.या अंकातील स्त्रिया दिलखुलासपणे बोलत्या आहेत. त्यांचे मन मोकळे करण्यासाठी आणि त्यांचे खरे बोलणे ऐकूण घेण्यासाठी हे फार चांगले व्यासपीठ असल्याचे जाणवते. विविध नात्यांमध्ये आणि रूपांमध्ये दिसणार्‍या स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचे अपरिचित पैलू प्रकट करणारा हा अंक परिस्थितिशरण वाटत नाही.

प्रतिकूलतेतही स्त्रियांची वाटचाल सुरू आहे. मूठभर का होईना प्रकाशयात्री स्त्रियांचा आवाज आज ना उद्या सगळ्यांना ऐकावाच लागणार आहे.

स्त्री. उवाच वार्षिक, १९९२. ३०३ नवीन आशा, दादासाहेब फाळके मार्ग, दादर मुंबई – ४०० ०१४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.