पत्रव्यवहार

समतावादी कुटुंब!
संपादक आजचा सुधारक यांस,
ऑक्टो. ९२ च्या ‘आजचा सुधारक’मध्ये ‘विवाह आणि नीती-आमची भूमिका’ या संपादकीयात समतावादी कुटुंबाची केलेली तरफदारी केवळ भयानक आहे. समतावादी कुटूंब कोणाला नको आहे? प्रत्येक गृहस्थाला व गृहिणीला ते हवेसे वाटते. ते सहजी होणारे नाही हे खरे, पण प्रयत्नसाध्य तर आहेच. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ह्या व्यवहार्य तत्त्वालाही कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण वरील संपादकीयात तथाकथित समतावादी कुटुंबाची ज्या पद्धतीने भलावण केली गेली आहे ती समाजस्वास्थ्यावरच घाला घालणारी आहे.
कामप्रेरणा ही भुकेसारखी स्वाभाविक व प्रबल प्रवृत्ती असल्याने तिची पुरुषार्थात गणना होऊन तिला वाट मिळून विवाहसंस्थेत तिचे उदात्तीकरण झालेले आहे. तीच प्रेरणा अपत्यामुळे वत्सलतेची वाट धरते व संयत गृहस्थाश्रमात स्थिरपद होते.
अपत्यांविपयी मातापित्यांना वाटणार्‍या स्नेहाखातर एरव्ही मोडू पाहणारे (समतावादी) कुटुंब दीर्घकाळ अभंग राहू शकेल हे पटण्यासारखे आहे. मातापित्यांना अपत्यांविपयी निःस्वार्थ प्रेम वाटत असते हेही मान्य. पण ती अपत्ये त्याच मातापित्यांची असतील तर व ते मातापिता बाहेरगावी नसतील तरच; अन्यथा निःस्वार्थ अपत्यप्रेम निरर्थक नसेल काय? पण ‘आजचा सुधारक’च्या संपादकीयात तर, सध्या पत्नी ज्याप्रमाणे नवर्‍याच्या विवाहबाह्य संबंधांकडे काणाडोळा करते तसा नवर्‍यानेही बायकोच्या विवाहबाह्य संबंधांकडे काणाडोळा करावा, असे सुचवितात, ही तर बुद्धिवादाच्या धाडसाची कमालच म्हणावी लागेल. एक तर, सध्या पत्नी पतीच्या विवाहबाह्य संबंधांकडे काणाडोळा करते असे सरसकट विधान करणे विवाहित स्त्रियांवर धडधडीत आरोप करण्यासारखे आहे व समस्त  नवरोबांनाआपल्या बायकांच्या विवाहबाह्य संबंधांकडे काणाडोळा करायला सांगून स्वतःच्या विवाहबाह्य संबंधांची अनायास तरतूद करण्याची त्यांना फूस दिल्याचा वासही येतो. हा विवाहित पुरुषांवरही अन्याय आहे. बरे, अशी विवाहबाह्य संबंधांतून जी अपत्ये जन्माला येतील त्यांच्यावर नक्की कोणते मातापिता प्रेमाचा वर्षाव करतील हा भाग संपादकीयात अनुत्तरितच आहे. हीच अपत्ये पुढे कशीबशी मोठी झाली व त्यांना त्यांच्या खर्‍या पराक्रमी आईबापांचा पत्ता लागला (आणि हा पत्ता लागणारच, कारण विवेकवादात सगळे उघड) तर ती समाजात कशी वागतील यावरही ‘आजचा सुधारक’ने विचार करून ठेवावा; कारण एकदा निखळ बुद्धिवाद पत्करला की शेवटचे टोक गाठलेच पाहिजे!
पुढे तर आणखी एक (सुखप्रद!) धक्का आहे. संपादकीय म्हणते, ‘या (समतावादी) कुटुंबातील स्त्री आणि पुरुष क्वचित, परस्परांशी एकनिष्ठ राहात नसले तरी, जर हे उभयतांच्या संमतीने होत असल तर त्यातून असुखापेक्षा सुखाची मात्रा अधिक प्रमाणात निर्माण होईल हे गृहीत धरायला हरकत नाही.’ गृहीतच धरायचे तर कोण हरकत घेणार? (निष्ठेत/व्यभिचारात) स्वातंत्र्य व समता ही प्रधान साधनमूल्ये आहेत व (रति) सुख हे प्रधान स्वतोमूल्य आहे. विवाहित स्त्री व पुरुष दोघेही स्वतंत्र आहेत व समान आहेत. उभयतांच्या संमतीने ते परस्परांशी क्वचित् एकनिष्ठ न राहिले तरी असुखापेक्षा सुखाची मात्रा अधिक प्रमाणात वाढणार! सगळे कसे अगदी साधे, सरळ, सोपे, निर्व्याज व मनोहर!
प्रश्न एवढाच उरतो की क्वचित् परस्परांशी ते एकनिष्ठ राहात नसले तरी, इतर वेळी ते परस्परांशी एकनिष्ठ असतील याची ग्वाही काय? उभयतांची केवळ संमती हीच ग्वाही समजायची यापरता दुसरा कोणता मार्ग उरणार! शिवाय क्वचित एक टक्का व्यभिचार व नव्याण्णव टक्के निष्ठा अशी निष्ठेत टक्केवारी असते काय? असू शकते काय? आमची जुनी सनातन समजूत अशी होती व आजही आहे की निष्ठा एकतर (पूर्ण) असते किंवा नसते. ती टक्केवारीत कधीच नसते. पण विवेकवादाच्या धारदार पात्याखाली कोणाची मान कशी, केव्हा येईल कुणी सांगावे?
(विवाहित) पतिपत्नींना परस्परांच्या विवाहबाह्य संबंधांकडे दुर्लक्ष करायला सांगण्यापेक्षा विवाहाइतकाच विवाहविच्छेद सुलभ असणे केव्हाही व्यवहार्य राहील.
विवाहबाह्य संतती, कुमारी किंवा विधवा यात हे प्रश्न स्वच्छंद समाजाने (permissive Society ) उत्पन्न केलेले व पाश्चात्त्य देशात, विशेषतः अमेरिकेत, भेडसावणारे झालेले आहेत. त्यांची लागण आपल्यालाही इथे होते आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ह्या प्रश्नाकडे अत्यंत सहानुभूतीने व मानवी दृष्टिकोनातूनच पाहिले गेले पाहिजे. परंतु सर्वश्रेष्ठ गृहस्थाश्रमाचा बळी देऊन ते सुटणारे नाहीत. उलट त्यात भरच पडून गुंतागुंत आणखी वाढेल याचे भान सुटता कामा नये. मुळातच मानवाचा पुत्र असहायआहे. त्या असहायतेत आणखी भर कां म्हणून?

  • गं.र. जोशी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.