चर्चा – पण पूर्वग्रह पुराव्यांपेक्षा प्रबळ होऊ नयेत

प्रा. शेषराव मोरे यांनी वाचकांचा त्यांच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून केलेला खुलासा माझे आक्षेपच अधिक बळकट करणारा आहे. माझ्या परीक्षणाचा एकूण रोख जाणीवपूर्वक लक्षात न घेता त्यांनी आत्मसमर्थनार्थ बरीच मखलाशी केली आहे. जाणीवपूर्वक हा शब्द मी मूळ परीक्षणातही मुद्दाम दुहेरी अवतरणचिन्हांत टाकला होता। (आजचा सुधारक – १९९२ पृ. २७६). फडके-पळशीकरादी टीकाकार फक्त सावरकरांची बदनामी करण्यासाठीच किंवा त्यांच्यावर खोटीनाटी टीका करण्यासाठीच लिहितात अशा आशयाची डझनोगणती वाक्ये प्रा. मोरे यांच्या ग्रंथात आहेत. माझा प्रश्न एवढाच की या संशोधकांचे हे हेतू’ एवढ्या ठाम शब्दांत मांडण्याजोगे कोणते पुरावे लेखकापाशी आहेत? हे अभ्यासक जाणीवपूर्वक तसे करतात हे सिद्ध करणारा पुरावा प्रा. मोरे यांच्या ग्रंथात तर नाहीच, पण प्रस्तुत खुलाशातही नाही. किंबहुना तो तसा देताच येणार नाही, कारण त्यांचा आरोप पुराव्यांवर नव्हे तर पूर्वग्रहांवर आधारित आहे. टीकाकारांच्या मतांचा व प्रतिपादनांचा प्रतिवाद समजू शकतो; पण त्यांना अप्रामाणिक, धूर्त किंवा दुष्टबुद्धी ठरवणे गंभीर वैचारिक विश्लेषणात बसत नाही. आजचा सुधारकाच्या उपरोक्त अंकात पृ. २७७ वर डॉ. य. दि. फडके यांच्या संदर्भातील प्रा. मोरे यांची काही विधाने आणि तत्सम आणखी विधानांचे पृष्ठांक नमूद केले आहेत. वाचकांनीच हे ठरवावे की त्यांत पुराव्यांचा भाग किती आणि पूर्वग्रहांचा किती आहे.
परीक्षणातील माझे एक वाक्य उद्धृत करून मोरे असा निष्कर्ष काढतात की माझा मुख्य आक्षेप “आरोपाच्या गुणवत्तेबद्दल नसून आरोपाच्या भाषाशैलीबद्दल आहे.” जे स्पष्टपणे कोणी अमान्य केलेले असेल ते त्याला मान्यच आहे असे समजणे ही प्रा. मोरे यांची खास सवय दिसते. वस्तुतः आरोपाच्या गुणवत्तेबद्दल अनुकूल वा प्रतिकूल काहीही अभिप्राय न देण्यातून दोन्ही शक्यता असतात. परीक्षणाच्या मर्यादेत आरोपाच्या गुणवत्तेची शहानिशा शक्य नसल्यामुळे फक्त भाषाशैलीपुरते विवेचन सीमित ठेवले आहे. शिवाय असे की गुणवत्तेसंबंधी मतभेद संभवतात पण गंभीर वैचारिक लेखनाची भाषा व शैली कसी असावी यासंबंधी बरीच एकवाक्यता संभवते असाही विचार त्यामागे होता. परीक्षणात मी उपस्थित केलेल्या अनेक मुद्दे व आक्षेपांना बाजूला ठेवून फक्त एकाच “महत्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे याचा अर्थ (त्यांच्या पद्धतीने) त्यांना माझे इतर मुद्दे व आक्षेप मान्य आहेत असा मी काढावा काय?”
प्रा. मोरे यांनी केवळ पुरोगाम्यांवर नव्हे तर सावरकरानुयायांवर व हिंदुत्वनिष्ठांवरही टीका केली आहे हे खरे आहे, पण ती “तशीच कठोर” असल्याचे मात्र दिसत नाही. त्याचप्रमाणे सावरकरांचे समर्थक आणि विरोधक यांच्याशी सारख्याच तटस्थ,सहिष्णू व समन्वयबुद्धीने वागणेही प्रा. मोरे यांना साधलेले नाही. तमाम समर्थकांना त्यांनी लावलेली गौरवपर विशेषणे आणि तमाम विरोधकांना त्यांनी दिलेली दूष त्यांच्या व्यासंगी लेखनाला कलंकित करतात. सत्यशोधकाने आपपर भावनेच्या वर उठायला पाहिजे. सर्व पुरोगामी/माक्र्सवादी जणू सरसकट सारखेच आहेत असे समजून आणि त्यांना शत्रुपक्षात । बसवून बडवणे अशास्त्रीयच म्हणावे लागेल. प्रा. मोरे ज्यांना या प्रवाहात बसवून टीकापात्र ठरवतात त्यांच्यापैकी अनेक अभ्यासक ‘माक्र्सवादी’ लेबलाखाली येत नाहीत असे त्यांच्या लेखनाचा जुजबी परिचय असणारांनाही ठाऊक आहे.
रा. पळशीकर माझ्या स्नेहसंबंधातील आहेत हा प्रा. मोरे यांचा अंदाज बरोबर आहे. पण आमच्या नांदेडच्या गाडगीळांशी मी व पळशीकर संघर्ष करीत असल्याचा त्यांचा कंसांकित उल्लेख अप्रस्तुत आहे. डॉ. फडकेही माझ्या स्नेहसंबंधातीलच आहेत. पण म्हणून मी त्या दोघांना प्रा. मोरे यांच्या आरोपांचे खंडन करण्याचे आवाहन वा विनंती करावी हो अपेक्षा अनाठायी आहे. आपल्या लेखनावर घेण्यात आलेले आक्षेप निराकरणपात्र असल्यास त्यांची दखल घेऊन सविस्तर प्रतिवाद करायचा, आणि जर ते ग्राह्य असतील तर ते जाहीरपणे स्वीकारायचे असा या दोन्ही मान्यवर अभ्यासकांचा शिरस्ता आहे असा माझा पूर्वानुभव आहे. प्रा. मोरे यांच्या आक्षेपासंबंधी खुलासा करायचा झाल्यास स्नेहसंबंधातील कोणीतरी आवाहन करण्यासाठी थावणे त्यांच्याबाबतीत संभवतच नाही. परीक्षणाच्या मर्यादेत काय शक्य आहे आणि काय नाही याची यथार्थ जाणीव प्रा. मोरे यांनीच आपल्या उपान्त्य परिच्छेदात व्यक्त केली आहे. तरीसुद्धा मी परीक्षणात जेव्हासावरकरांच्या या टीकाकारांचे म्हणणे बरोबर की प्रा. मोर्‍यांचे याबद्दल आम्हाला येथे काही म्हणावयाचे नाही” असे विधान करतो तेव्हा त्याची वासलात प्रा. मोरे पळवाट म्हणून का लावतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. माझे अधिक महत्त्वाचे आक्षेप डावलून त्यांनी पळवाटाच जवळ केल्या असे मीही म्हणावे काय?