निसर्ग आणि मानव – परिसंवाद

निसर्ग आणि मानव – परिसंवाद
साधना साप्ताहिकाच्या १८ जुलै १९९२ च्या अंकात श्री. ना. ग. गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात गांधीवादी पर्यावरणविचाराविषयी काही प्रतिकूल मते व्यक्त केली होती. त्या लेखाला २९ ऑगस्ट ९२ च्या साधनेत श्री वसंत पळशीकर यांनी उत्तर दिले. या उत्तराला मी साधनेत (नोव्हेंबर ९२) दिलेले उत्तर आजचा सुधारक (नोव्हेंबर-डिसेंबर १९९२) मध्ये पुनर्मुद्रित झाले. या लेखावर दोन प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत. एक आहे प्रा. सु.श्री. पांढरीपांडे यांची, आणि दुसरी अर्थात् श्री. पळशीकरांची. या दोन्ही प्रतिक्रियांचे प्रतिपादन असे आहे की ज्या विज्ञानाच्या आधारे मी श्री पळशीकरांना उत्तर दिले होते ते विज्ञान आता जुने झाले असून, आज वैज्ञानिक पद्धतीचा एक नवाच आदर्श (paradigm) निर्माण झाला आहे, आणि त्यानुसार माझे म्हणणे आता जुने आणि कालबाह्य झाले आहे. मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी नसल्यामुळे या आक्षेपाचा खरेखोटेपणा मला स्वतःला तपासता येण्यासारखा नाही. म्हणून मी विज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक आणि प्राध्यापक असलेल्या काही मित्रांकडे प्रा. पांढरीपांडे आणि श्री. पळशीकर यांचे लेख पाठविले आणि त्यांचे अभिप्राय मागविले. अशी दोन उत्तरे आतापर्यंत आली आहेत. एक प्रा. पु.वि. खांडेकर (भौतिकीचे निवृत्त प्राध्यापक) आणि दुसरे श्री नंदा खरे (विज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक) यांचे. हे सर्व लेख एका अंकात समाविष्ट करून तो एप्रिल-मे ९३ चा जोडअंक विशेषांक म्हणून प्रसिद्ध करीत आहोत. माझा लेख नोव्हेंबर-डिसेंबरच्या आजचा सुधारक मध्ये आधीच प्रसिद्ध झाला असल्यामुळे तो पुन्हा या अंकात छापला नाही. तसेच श्री वसंत पळशीकरांच्या लेखाचा पूर्वार्ध मार्चच्या आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झाला असल्यामुळे त्याचा उत्तरार्धच तेवढा या अंकात प्रसिद्ध करीत आहोत.
हे एकूण सात लेख मिळून एका महत्त्वाच्या विषयासंबंधी बराच विविधांगी विचार होत असल्यामुळे वाचकांना तो एकत्र मिळणे उपयुक्त वाटेल, आणि ते त्याचे स्वागत करतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.