‘धारणाद्धर्म इत्याहुः’ – प्रा. देशपांडे यांना उत्तर

धर्म म्हणजे रिलिजन नव्हे; धर्माचे मुख्य स्वरूप समाजधारणेचे म्हणजे ऐहिक स्वरूपाचे आहे ह्या माझ्या विधानाच्या समर्थनार्थ माझ्या लेखात मी धर्मशास्त्राचे गाढे व्यासंगी व विद्वन्मान्य लेखक भारतरत्न म. म. डॉ. पां. वा. काणे यांनी केलेली धर्माची व्याख्या उद्धृत केली होती. (आजचा सुधारक, फेब्रु. १९९३). परंतु प्रा. देशपांडे यांना ती विचारात घेण्यासारखी वाटली नाही. त्यावर त्यांची टीका अशी की डॉ. काणे यांनी केलेली व्याख्या काहीही असली तरी धर्मशास्त्रावरील आपल्या ग्रंथात धर्माचा आधार वेद आहे असे त्यांनी म्हटले आहे व त्यात उपनयन, चार आश्रम, विवाह, दैनिक पंचमहायज्ञ, चाळीस संस्कार ह्यासारख्या विषयांचाच ऊहापोह केला आहे. हे विषय ‘सर्वार्थाने रिलिजिअस आहेत. अर्थात् त्यांच्या व्याख्येत ऐहिक अर्थ अभिप्रेत आहे असे मानणे कठिण आहे.’ बिच्चारे डॉ. काणे ! आयुष्यभर धर्मशास्त्राचा व्यासंग करून त्यांना धर्माची विषयाला सुसंगत व्याख्याही करता आली नाही ! उपरोक्त सर्व विषय ‘सर्वार्थाने रिलिजिअस असूनही तसा उल्लेख त्यांच्या व्याख्येत नाही. मात्र प्रा. देशपांडे डॉ. काणे यांच्या मदतीला धावून जातात व सुचवितात की शब्दरचना ऐहिक असली तरी त्यातील अभिप्राय ऐहिक मानणे कठिण आहे!

डॉ. काणे यांनी तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात केलेली धर्म शब्दाची व्याख्या मी माझ्या लेखात उद्धत केली होती. त्याच ग्रंथात इतरत्र त्यांनी धर्माची सार्वकालीन व्याख्याही दिली आहे. ती अशी – “धर्मशास्त्रकारांच्या मताप्रमाणे ‘धर्म’ ह्या शब्दाची व्याप्ती एक उपासनेचा पंथ एवढीच नसून त्या शब्दात प्रत्येक मनुष्याने व्यक्ती ह्या नात्याने व्यक्तीचा विकास करण्याकरिता आणि समाजाचा एक घटक ह्या नात्याने मानवी समाजाचा विकास करण्याकरिता करावयाच्या कृत्यांचा आणि पाळावयाच्या निबंधांचा समावेश होतो.’ (धर्मशास्त्राचा इतिहास, पूर्वार्ध, प्रकरण २५, पृ. १०७) ऐहिकाहून वेगळा असा कोणता अर्थ ह्यात अभिप्रेत दिसतो?

वरील व्याख्येनेही प्रा. देशपांडे यांचे समाधान होत नसेल तर Discovery of India ह्या ग्रंथात पं. नेहरूं धर्म शब्दाबद्दल काय म्हणतात हे तरी त्यांनी लक्षात घ्यावे. ते म्हणतात, ‘The central idea of old Indian civilization, or Indo-Aryan culture, was that of dharma, which was something much more than religion or creed; it was a conception of obligations, of the discharge of one’s duties to oneself and to others.’ (१९८९ ची आवृत्ती, पृ. ८७). यात काय अभिप्रेत आहे ह्याबद्दल शंका राहू नये असे वाटते.

‘आजही प्रा. वैद्यांचे लिखाण सोडले तर अन्य सगळीकडे धर्म हा शब्द religion ह्या अर्थी वापरात आहे’ असे प्रा. देशपांडे म्हणतात. वस्तुस्थिती अशी आहे की इंग्रजी विद्येने विशेष प्रभावित झालेला तथाकथित बुद्धिवादी वर्ग सोडला तर भारतात सर्वत्र – आणि विशेषतः ग्रामीण विभागातील देशाच्या बहुसंख्य समाजात ‘धर्म’ शब्दाचा ‘समाजधारणेला योग्य असे आचरण हाच अर्थ प्रचलित आहे. आजही बुद्धिवाद्यांमुळे थोडाफार बुद्धिभेद झाला असला तरी मुख्यतः रामायण महाभारतावरील दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या धारावाहिकांमध्ये जवळ जवळ प्रत्येक पात्र ‘ह्यावेळी माझा धर्म काय?’ असा प्रश्न उपस्थित करते. त्यात त्याला ‘माझा रिलिजन काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते असा अर्थ कोणीही काढीत नाही ह्यावरून उपरोक्त विधानाची प्रचीती यावी.

तरुण भारतातसुद्धा प्रा. वैद्य सोडून कोणीही इतर लेखक रिलिजनहून वेगळ्या अर्थाने धर्म शब्दाचा वापर करीत नाहीत असे प्रा. देशपांडे म्हणतात. अलीकडेच तरुण भारतात प्रसिद्ध झालेले ‘रिलीजन म्हणजे धर्म नव्हे हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान डॉ. पंढरीनाथ प्रभू यांचा लेख (दि. ३१-१-१९८८) व डॉ. सुरेश डोळके यांचा ‘डॉ. भाऊजी दप्तरींनी केलेला उपनिषदांचा अर्थ (दि. १४-२-१९९३) ह्या लेखांकडे मी त्यांचे लक्ष वेधतो. ‘हिंदुत्वनिष्ठ व संघवादी तरुण भारतच काय पण त्याविरुद्ध असलेल्या ‘टाइम्स ऑफ इंडिया मध्येही १९९०-९१ च्या दरम्यान श्री चतुर्वेदी बद्रीनाथ ह्या मद्रासकडील निवृत्त आय्. ए. एस्. अधिकाऱ्याचे ‘धर्म विषयावरील सात-आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांतील एका लेखाचे शीर्षकच ‘Dharma is not religion’ असे आहे (दि. २०-१-१९९०). टाइम्सचे भूतपूर्व संपादक श्री. गिरिलाल जैन यांचेही लेख त्यांत प्रसिद्ध झाले आहेत. इतर इंग्रजी वृत्तपत्रांत श्री. एम्. व्ही. कामथ इ. लेखकांचेही ह्यासंबंधी लेख आहेत.

धर्माच्या खऱ्या स्वरूपाबद्दल जसजसे सुशिक्षितांचे प्रबोधन वाढत जाईल व रिलिजनसाठी एखादा पर्यायी शब्द जसजसा रूढ होत जाईल तसतसा रिलिजनसाठी होणारा धर्म शब्दाचा वापर कमी होत जाईल.

परंतु प्रा. देशपांडे यांचा मुख्य मुद्दा हा की धर्म म्हणजे रिलिजन हा अर्थ गेली दीडशे वर्षे प्रचलित आहे व म्हणून तो तसाच घेतला पाहिजे. परंतु तो अर्थ जर चुकीचा असेल तर त्याचाच आग्रह धरणे कोणत्या बुद्धिवादाला धरून आहे? दीडशे वर्षांपूर्वी हजारो वर्षे धर्म शब्दाचा विशिष्ट अर्थ प्रचलित होता व आजही सामान्य जनमानसात तो अर्थ जिवंत आहे – त्यावर काही धूळ उडाली असली तरी-हे मुद्दे जास्त महत्त्वाचे नाहीत काय? ही धूळ काढून धर्म शब्दाचा खरा अर्थ पुनः प्रस्थापित केला तर त्यामुळे धर्मप्रवण भारतासमोरील अनेक समस्या सोडविण्याचा मार्ग सुकर होऊ शकेल हे त्यांच्या लक्षात येत नाही काय?

धर्माचा आधार वेद आहेत हे डॉ. काणे यांचे मत उद्धृत करून त्यावरून धर्माचे स्वरूप ऐहिक नाही असा प्रा. देशपांडे निष्कर्ष काढतात. अपूर्ण आधार विधान (premise) घेऊन पूर्ण निष्कर्ष काढण्याचा हा अयोग्य प्रकार आहे. वेदाबरोबरच ‘स्मृति, सदाचार, स्वतःला इष्ट वाटणारे आचरण आणि पूर्ण विचारांती उत्पन्न होणारी कामना इतक्या गोष्टी धर्माची आधारस्थाने आहेत व परंपरेने तीच मानण्यात आली आहेत असे डॉ. काणे म्हणतात (पृ. ४). डॉ. काणे पुढे असेही म्हणतात की वेदवाङ्मयात धर्माचरणाविषयी सुसंगत विवेचन नाही, त्यात सुटी सुटी वचनेच फक्त आहेत; धर्माचरणाविषयी सुसंगत विवेचन धर्मशास्त्रांत येते. ह्यावरून धर्मनिर्धारणात वेदाचा वाटा अल्प आहे हे अगदी स्पष्ट आहे.

वेदवाङ्मयात अध्यात्म, गणित, खगोलशास्त्र, निसर्ग, धर्म इ. अनेक विषयांचा समावेश आहे. त्यातील धर्मविषयक म्हणजे सामाजिक आचरणविषयक जे विचार आहेत ते विजिगीषु व समृद्ध ऐहिक जीवनाचा पुरस्कार करणारे असेच विचार आहेत. अध्यात्माशी त्यांची सांगड घातली तरी प्रामुख्याने ते समाजधारणेशीच संबद्ध आहेत. वेदांतील बाकीच्या भागासंबंधी आपणांस काही समजत नाही अशी प्रांजळ कबुली देऊन ह्या भागासंबंधी मात्र पं. नेहरू म्हणतात, ‘The vitality and affirmation of life prevading them are extraordinary’ (पूर्वोक्त ग्रंथ पृ.७९).

डॉ. काणे यांच्या विवेचनाच्या संदर्भात धर्म शब्दाचा अर्थ पूर्णपणे ऐहिक आहे असे मी म्हणतो असा प्रा. देशपांडे यांनी माझेवर आरोप केला आहे. वास्तविक धर्म शब्दाचा अर्थ ‘स्पष्टपणे ऐहिक आहे, त्याचा मुख्य हेतू ऐहिक आहे असे शब्द मी वापरले आहेत. धर्माचे क्षेत्र सर्वव्यापी असल्यामुळे त्यात रिलिजनचा अंतर्भाव होतो असेही मी म्हटले आहे. अशा स्थितीत आपल्या सोयीसाठी ‘स्पष्टपणे’ याचा पूर्णपणे’ असा सोयीस्कर अर्थ प्रा. देशपांडे यांनी घेतला हे पूर्णपणे स्पष्ट आहे.

‘धर्मशास्त्रांत आलेले उपनयन, चार आश्रम विवाह, दैनिक पंचमहायज्ञ, चाळीस संस्कार, अशौच, श्राद्धे, महापातके, उपपातके, प्रायश्चिते इ. या सर्व गोष्टी पूर्णपणे ऐहिक आहेत काय?’ असा प्रा. देशपांडे प्रश्न उपस्थित करतात. यातही माझ्या विधानाचा विपर्यास आहे, ‘पूर्णपणे ऐहिक’ असे मी कधीही म्हटले नाही ‘मुख्यतः’ ऐहिक असे म्हटले आहे. धर्मशास्त्रात मुख्यतः ऐहिक अभ्युदयाचा हेतू असला तरी आध्यात्मिक निःश्रेयसाचे भान त्याने सोडले नाही. धर्मशास्त्रांची भूमिका मानवी जीवनाचे साकल्याने नियमन करून समाजधारणा साधावयाची असल्यामुळे हे स्वाभाविक आहे. वरील विषयांचा तपशील पाहिला तर त्यांचे स्वरूप मुख्यतः ऐहिक आहे हे सहज लक्षात येईल. उपनयन हा विद्याप्राप्तीचा संस्कार आहे, चार आश्रमांचे वर्णनही धर्मशास्त्रांत व्यक्तिजीवनाच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भात केलेले असते. मोक्षप्राप्तीचा आचार-विचार त्यात प्रामुख्याने येत नाही. त्यांसाठी योगशास्त्र, तत्त्वज्ञान, अध्यात्मशास्त्र, तंत्रशास्त्र इ. स्वतंत्र रचना आहेत. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतचे चाळीस संस्कार तत्कालीन समाजरचनेच्या पोषणासाठी सांगितले आहेत. अशौच – श्राद्धे यांत सामाजिक स्वच्छता व पूर्वजांबद्दल सदिच्छा व्यक्त करणे हाच प्रमुख भाग आहे. पंचमहायज्ञ म्हणजे सृष्टिकर्त्या शक्तीबद्दल (यालाच देव म्हटले आहे) आदर व्यक्त करणे तो देवयज्ञ, पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तो पितृयज्ञ, भूतमात्रांवर दया करणे तो भूतयज्ञ, अतिथिसत्कार व गरिबांना दान करणे तो मनुष्ययज्ञ, आणि ज्ञानार्जन करणे तो ब्रह्मयज्ञ. यातील यज्ञ शब्द आलंकारिक आहे असे आपस्तंबाने म्हटले आहे व त्या सर्वांचा संबंध व्यक्तिजीवन व समाजजीवन उन्नत करणे ह्यांच्याशी आहे. पातकांमध्ये सुरापान, चोरी करणे, व्यभिचार इ. पातके सांगितली आहेत व त्यांच्या निराकरणासाठी प्रायश्चित्ते दिली आहेत. ह्या पातकांत ब्रह्महत्या हेही एक पातक आहे. त्याबद्दल थोडा खुलासा केला पाहिजे. ब्राह्मणाची मूळ संकल्पना वैभव व सत्ता ह्यांच्या मागे न लागता ज्ञानक्षेत्राला वाहून घेतलेली व्यक्ती असा आहे. अशा व्यक्तीचा वध करणे हे पातक सांगितले आहे. परंतु असा ब्राह्मण जर आततायी असेल तर त्याचा वध करावा असे मनूनेच सांगितले आहे. अशा ज्ञानी व समाजाचे वैचारिक नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने इतर गुन्हे केले तर इतरांच्यापेक्षा त्याला चौपट शिक्षा करावी असेही धर्मशास्त्रात सांगितले आहे.

वरील सर्व विषयांचा मुख्य हेतू ऐहिक आहे हे स्पष्ट करण्याकरिता हा खुलासा केला आहे. धर्मशास्त्रांत सांगितलेले बहुतेक सर्व विधी करताना प्रारंभी संकल्प म्हटला जातो. त्यात सामान्यतः आमच्या सर्वांच्या आयुरारोग्यासाठी, ऐश्वर्याभिवृद्धीसाठी, शांतीसाठी, पुष्टीसाठी, तुष्टीसाठी आम्ही हा विधी करीत आहोत अशीच शब्दरचना असते. त्यावरूनही धर्मशास्त्रांचा मुख्य हेतू ऐहिक आहे हेच दिसून येते. मोक्षप्राप्तीसाठी आम्ही ही कर्मे करीत आहोत असा संकल्प सहसा कोठे आढळत नाही.

याचा अर्थ धर्मामध्ये रिलिजन नाही असा मात्र होत नाही. अभ्युदय साधता साधता त्यातून निःश्रेयसाचाही शक्य तितका लाभ घ्यावा ही धर्माची दृष्टी आहे. परंतु त्यामुळे अभ्युदय व निःश्रेयस एकच आहेत व धर्म = रिलिजन हेच समीकरण आहे असे म्हणणे दूरान्वित होईल. धर्म हे समाजधारणेच्या दृष्टीने केलेले संपूर्ण मानवी जीवनासंबंधीचे व्यापक शास्त्र आहे. त्यामुळे प्रा. वैद्य म्हणतात त्याप्रमाणे व्यष्टि – समाष्टि – सृष्टि – परमेष्टि अशा सर्व विषयांचा त्याचेशी संबंध येतो. धर्माचा रिलिजनशी संबंध येतो म्हणून धर्म म्हणजेच रिलिजन असे म्हणणे म्हणजे राज्यशास्त्राचा अर्थशास्त्राशी वारंवार संबंध येतो म्हणून राज्यशास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र असे म्हणण्यासारखे आहे. धर्म सकारात्मक ऐहिकवादी आहे. तेव्हा धर्मशास्त्रातील कोणता भाग रिलिजननिरपेक्ष आहे हा प्रा. देशपांडे यांचा प्रश्न अप्रस्तुत आहे. रिलिजन हा धर्माचा मुख्य विषय किंवा गाभा नाही; समाजधारणा त्यात मुख्य आहे.

वरील सर्व विवेचनाचा हेतू धर्माचे स्वरूप विशद करणे हा आहे, त्यातील सर्व विषयांचे पूर्णपणे समर्थन करण्याचा नाही. आजच्या समाजधारणेच्या दृष्टीने त्या विषयांतील जो जो भाग आज जनमानसाला अनुपयुक्त वाटेल किंवा विचारमंथनाने तसा सिद्ध होईल तो तो भाग वगळण्याचा, त्यात आवश्यक ते बदल करण्याचा किंवा त्याचे आधुनिकीकरण करण्याचा समाजाला अधिकार आहे. युगधर्म व कलिवर्ण्य ह्या संकल्पना त्यासाठीच आहेत. वेगवेगळ्या धर्मशास्त्रकारांनी आपापल्या काळाला अनुरूप वाटणारे असे बदल पूर्वी केले आहेत. अगदी वेदांनी सांगितलेल्या नियमांतही बदल केले आहेत. (डॉ. काणे, पूर्वार्ध. पृ. ५७३) जुन्यात जे चांगले असेल ते ठेवून बाकीच्यात कालोचित बदल करण्याला धर्मशास्त्राची मान्यता आहे. म्हणूनच, धर्म ही संकल्पना गतिशील आहे. कलिवर्ध्याच्या संदर्भात डॉ. काणे म्हणतात, ‘पौर्वात्य लोक प्रगमनशील नसतात असे म्हणणाऱ्यांना कलिवर्ण्य प्रकरण हे अत्यंत समर्पक उत्तर आहे (पूर्वोक्त ग्रंथ पृ. ५९७).
जुन्यात जे चांगले असेल ते ठेवू व चांगले नसेल ते बदलू हीच आगरकरांची सुधारकी भूमिका होती असे आजचा सुधारक च्या नोव्हें, डिसें. १९९२ च्या अंकाच्या मुखपृष्ठावर उद्धृत केलेल्या त्यांच्या वचनावरून दिसून येते. आजच्या बुद्धिवादी सुधारकांनी डॉ. काण्यांच्या नाही तर निदान आगरकरांच्या तरी वचनाचे पालन करावे. आगरकर म्हणतात, ‘कोणतेही आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसही आहे … सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचेच आम्ही पालन करणार आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.” ह्या भूमिकेला धर्मशास्त्राची मान्यता आहे हे बहुधा आगरकरांना माहीत नसावे असे त्यांच्या एकूण उताऱ्यावरून वाटते. नाहीतर त्यांच्या भाषेचे स्वरूप जरा वेगळे राहिले असते व त्यांचे विचार अधिक प्रभावी झाले असते.

धर्म शब्दाचे अनेक अर्थ आहेत असे प्रा. देशपांडे म्हणतात व ते खरेही आहे. परंतु त्या सर्व अर्थांचा गाभा एकच आहे. ब्राह्मणधर्म, क्षात्रधर्म, राजधर्म, गृहस्थधर्म, पुत्रधर्म ह्या सर्व शब्दांत ‘समाजधारणेच्या दृष्टीने त्या त्या व्यक्तीचे न्याय्य आचरण किंवा कर्तव्य’ असाच प्रत्येक ठिकाणी अर्थ आहे. ह्यावरून दिसून येईल की ह्या परस्परसंबद्ध अर्थांमुळे धर्म शब्द रिलीजनच्या फार’ जवळ आला नसून उलट त्यापासून भिन्न झाला आहे.

आता प्रा. देशपांडे यांच्या इतर आक्षेपांसंबंधी थोडेसे.

माझ्या लेखात मी वंशभेद, जातिभेद हे आता कालबाह्य झाले आहेत असे म्हटले आहे. त्यावरून एकेकाळी त्या संस्था कालोचित होत्या असा माझा अभिप्राय प्रा. देशपांडे यांनी गृहीत धरला आहे. वस्तुतः त्या पूर्वी कालोचित होत्या की नव्हत्या ह्याबद्दल मतमतांतरे असल्यामुळे मी माझे विधान वर्तमानकालापुरतेच मर्यादित ठेवले होते. त्यातून वरील अभिप्राय काढण्याचे कारण नव्हते. परंतु असे करण्यात प्रा. देशपांडे यांचा काही विशिष्ट ‘आर्य’ शब्दाचा अर्थ पूर्वी वंशवाचक नव्हता. तो अर्थ त्याला प्रथम इंग्रजी अभ्यासकांनी दिला असे दिसते. जातिसंस्था मात्र पूर्वी होत्या. त्या काळात आजच्यासारख्या धंदे व कला शिक्षणाच्या स्वतंत्र सोयी नसल्यामुळे वडिलांकडून मुलाला व्यावसायिक व कलाशिक्षण मिळत असे. सामाजिक, आर्थिक इ. क्षेत्रांत आजच्या सहकारी संस्थांचे कामही जातिसंस्था करीत असतः ह्या दृष्टीने त्या त्याकाळी कालोचित होत्या असे म्हणता येईल. भारतीय इतिहास व तत्त्वज्ञानाचे एक प्रदीर्घ अभ्यासक व फ्रेंच लेखक रियांकू (Reincourt) ह्यांनी आपल्या The Soul of India ह्या ग्रंथात असेही म्हटले आहे की प्राचीन भारतात राजकीय एकात्मतेची भावना क्षीण असल्यामुळे आत्मसहकारी व परस्परपूरक अशा जातिसंस्थेमुळेच भारताची राष्ट्रीय एकात्मता टिकून राहिली. परंतु जन्मावर आधारलेले व्यक्तीचे समाजातील स्थान आणि भिन्नजातीतील उच्चनीच भाव हे त्या काळात जातिसंस्थेचे दोष होते. त्यामुळे ती त्या काळात काही प्रमाणात कालोचित होती एवढेच म्हणता येईल. माझ्या विधानातून प्रा. देशपांडे यांनी काढलेला अर्थ योग्य नव्हे. पं. नेहरू यांच्या पूर्वोक्त ग्रंथात जातीसंबंधी व्यक्त केलेले विवेकानंदांचे पुढील मत मलाही मान्य आहे. ‘Caste, which was necessary and desirable in its early forms, and meant to develop individuality and freedom, had become a monstrous degradation, the opposite of what it was meant to be, and had crushed the masses.’ (पृ. ३३७)

जातींना मी कालबाह्य म्हटले यातून अनावश्यक असा अर्थ काढण्याचा प्रा. देशपांडे यांनी प्रयत्न केला. आता त्यांच्या एका विधानातून काय अर्थ निघू शकतो, तो पाहू या. ते म्हणतात, ‘अभ्युदयाचा संबंध ऐहिक उन्नतीशी आहे असे म्हणतात. म्हणजे त्यांना स्वतःला ह्या संबंधाबद्दल शंका आहे असेच दिसून येते. अभ्युदय म्हणजे ऐहिक उन्नती हा अर्थ सर्वमान्य असूनही त्याबद्दल प्रा. देशपांडे शंका उपस्थित करतात हे बंद मनाचे (closed mind) तर लक्षण नव्हे ना!

अभ्युदय व निःश्रेयस् ह्या विभक्त गोष्टी नाहीतच असे प्रा. देशपांडे म्हणतात. तेव्हा पारमार्थिक कल्याणाला उपकारक ठरतील असे म्हणता येईल. परंतु त्यात मुख्य हेतू ऐहिक उन्नती आहे व पारमार्थिक कल्याण हे त्याचे संभाव्य अतिरिक्त फल आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. उपनयन, पहिले तीन आश्रम, चाळीस संस्कार, वास्तुप्रवेश, रोजचे भोजन यांत जो धार्मिक विधी असतो त्याचा पारमार्थिक कल्याणाशी दूरान्वयानेही संबंध नसतो. आपण करीत असलेल्या कार्यात जे कोणते जगच्चालक तत्त्व आहे त्याचे आशीर्वाद मिळावेत किंवा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी एवढाच त्यात हेतू असतो. ह्याबद्दल अधिक विवरण पुढे केले आहे.

रिलिजनला उपासना-पद्धतीसारखा पर्यायी शब्द रूढ करण्यासंबंधी प्रा. देशपांडे म्हणतात, “येथे जर एखादे हुकूमशाही राज्य आले तरच ते करता येण्याची शक्यता आहे. एरव्ही ते साध्य होण्याची सुतराम शक्यता नाही.” म्हणजे तर्कावर, विचारमंथनावर, प्रा. देशपांडे यांचा विश्वास नाही काय? की आपला तर्क संपला अशी यातून त्यांनी कबुली दिली आहे? सामान्यतः ज्यांचा तर्क संपला तेच हुकूमशाहीसारखा आरोप करणारी शिवराळ भाषा वापरत असतात. तर्कसंगत चर्चेमध्ये तिला स्थान असू नये. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ हे ब्रीदवाक्य असलेल्या विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंकल्पनेचा जे पुरस्कार करतात ते हकूमशाहीचे पायीक होऊच शकत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे.

सरतेशेवटी प्रा. देशपांडे असा सल्ला देतात की आम्ही त्यांच्या ‘इहवादी विवेकवाद्यांच्या पंथात सामील व्हावे. यातून त्यांना जर असे सुचवावयाचे असेल की आम्ही इहवादी विवेकवादी नाही तर तो आमचेवर अन्याय ठरेल. आम्हीही इहवादी विवेकवादी आहोत, पण निव्वळ इहवादी विवेकवादी नाही. आमचा विवेकवाद निःश्रेयसालाही व्यापून आहे; व त्याचे विवेकवादी कारणही आहे. परमेश्वर इ. ‘ज्याच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये’ असे प्रा. देशपांडे म्हणतात. या ठिकाणी प्रसिद्ध इतिहासशास्त्रज्ञ अरनॉल्ड टॉयनबी व सुप्रसिद्ध जपानी तत्त्वचिंतक दाईसाकू इकेदा यांच्या Choose Life ह्या ग्रंथातील एका मताचा मी उल्लेख करू इच्छितो. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा आहे की आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्याचा खरा स्रोत बुद्धी किंवा अनुभूती नाही, तर तो मानवी मनात अत्यंत खोलवर असलेल्याअवचेतनात (subconscious) आहे. वैज्ञानिक आविष्कार, काव्य, तसेच धार्मिक अंतर्दृष्टी ह्या सर्वांचा स्रोत मानवी अवचेतन आहे. (Choose Life चे हिंदी भाषांतर सृजनात्मक जीवन की ओर’, ऑक्सफर्ड युनि. प्रेस, १९९२, पृ. ५७). ह्या अवचेतनातून अंतःप्रज्ञा प्रादुर्भूत होते व तिचे निश्चितीकरण बुद्धी किंवा अनुभूतीच्या द्वारे होते. ह्या दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की परमेश्वर ही संकल्पना – चराचर सृष्टीला व्यापणारी व तिचे संचालन करणारी आदिशक्ती ह्या अर्थाने – इतिहासकालापासून आजच्या वैज्ञानिक युगातही सर्वत्र टिकून आहे, ती नष्ट करण्याचे पद्धतशीर प्रयत्न होऊनही टिकून आहे, त्या अर्थी मानवी अवचेतन हाच तिचा मूलभूत स्रोत असला पाहिजे. अज्ञान, भीती. इ. कारणे असलीच तर ती वरवरची असली पाहिजेत. तेव्हा परमेश्वर ही संकल्पना एक शास्त्रीय संकल्पना (scientific hypothesis) म्हणून मान्य करण्याला त्याबद्दलची सार्वत्रिक धारणा हा पुरेसा पुरावा आहे व विवेकवादाची त्याला आडकाठी असू नये. अर्थात परमेश्वराचे अस्तित्व अद्याप विज्ञानाने सिद्ध किंवा असिद्धही झालेले नाही. अध्यात्मवादी अनुभूतीच्या द्वारे ते सिद्ध झाले आहे असे म्हणत असले तरी त्यात प्रात्यक्षिकाद्वारे परावर्तनीयता नाही. त्यामुळे विवेकवादी दोन्ही विचारांबद्दल साशंक राहील. परंतु ही साशंकता ठेवूनही परमेश्वर नाही ही संकल्पना जितकी विवेकवादी आहे तितकीच परमेश्वर आहे ही संकल्पनाही विवेकवादी आहे हे मान्य केले पाहिजे. अरनॉल्ड ब्रेख्त ह्या राजकीय तत्त्वज्ञाने तर असेही म्हटले आहे की शास्त्रीय संकल्पनेत ती खोटी ठरविण्यास अवसर असला पाहिजे, परमेश्वर नाही अशी संकल्पना केली तर ती खोटी ठरविण्याची शक्यताच राहणार नाही व म्हणून परमेश्वर आहे ही संकल्पना शास्त्रीय दृष्टीने अधिक योग्य आहे (Political Theory टाइम्स ऑफ इंडिया प्रेस, १९६५, पृ. ४७९). विसाव्या शतकातील विज्ञान भारतीय वेदान्त तत्त्वज्ञानाच्या जवळ येत आहे ही गोष्ट लक्षात घेतली तर परमेश्वरविषयक संकल्पना वैज्ञानिक दृष्टीनेही सिद्ध होण्याकडे झुकत आहे असे दिसून येईल. (याचा ऊहापोह माझ्या आता नवविवेकवादाची गरज आहे ह्या लेखात केला आहे.)
ज्या विवेकवादी पंथात सामील होण्याची प्रा. देशपांडे आम्हाला सूचना करतात, त्या विवेकवादाचे आजचा सुधारकमधून प्रकट झालेले स्वरूप असे आहे.

१. बुद्धी, विवेक किंवा तर्क यांना सोडून भावना, श्रद्धा, इत्यादींना मानवी जीवनात काहीच स्थान नाही ही ह्या विवेकवादाची भूमिका दिसते.
२. विज्ञान हा ह्या विवेकवादाचा आधार आहे, परंतु ह्या विवेकवाद्यांचे विज्ञानविषयक ज्ञान १९ व्या शतकापलीकडे गेलेले नाही. २० व्या शतकात विज्ञानाने ज्या भराऱ्या मारल्या आहेत त्यांचे ह्यांना भानही नाही, मग त्यांच्या आधारे आपले विचार तपासून पाहणे दूरच राहिले.
३. ज्या प्राचीन संस्थावर व विचारांवर हे कडाडून हल्ला चढवितात त्यांचे पुरेसे ज्ञान न संपादन करताच हा हल्ला चढविला जातो.
४. ज्ञानार्जनाचे अंतिम साधन जणू काय आपणासच गवसले आहे अशा आविर्भावाने इतर विचारांकडे तुच्छतेने पाहण्याची ह्यांची दृष्टी दिसते. त्यामुळे त्यांच्या प्रतिपादनात योग्य संतुलन आढळत नाही.
५. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी आपल्या विवेकवादाचा एक पंथ बनविला आहे. त्यामुळे त्यांनी आपली मने जणू काय बंद (closed mind) करून घेतली आहेत.

अशा ह्या त्रुटिपूर्ण ‘विवेकवादी पंथात आम्ही कसे बरे सामील व्हावे?

विवेकवादासंबंधी माझी भूमिका पुढीलप्रमाणे आहे:
१. विवेकवाद हे सामान्यतः अतज्ज्ञांचे क्षेत्र आहे. ज्या विषयांत जे तज्ज्ञ असतात मग ते वैज्ञानिक असोत की अध्यात्मशास्त्री असोत- त्यांनी आपल्या विषयाबद्दल आग्रही भूमिका धरणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांनी जीवनाच्या इतर क्षेत्रात विवेकवादी भूमिका धारण केली पाहिजे.
२. विवेकवादी माणासाने निरनिराळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी आपापल्या विषयांबद्दल काय म्हणतात याचे पुरेसे ज्ञान करून घेतले पाहिजे व त्यांच्या भिन्नभिन्न विचारांचा आपल्या बुद्धी-नुसार पण सर्व बाजूंचे पुरेसे अवधान ठेवून व पुरेशा वस्तुनिष्ठ भूमिकेने – सम्यक आढावा घेतला पाहिजे व त्यातून आपली जीवनविषयक दृष्टी बनविली पाहिजे.
३. ज्ञान-विज्ञानाच्या विभिन्न क्षेत्रांत होत असलेल्या विकासांबद्दल त्याने सतत जागरूक असले पाहिजे व त्यांच्या अनुषंगाने आपल्या जीवनदृष्टीत योग्य ते बदल करण्यास तयार असले पाहिजे. त्याने आपले मन सर्व प्रकारांच्या विचारांसाठी ‘उघडे ठेवले पाहिजे व
४. श्रद्धा, भावना इ. सर्वस्वी त्याज्य आहेत असे काही तथाकथित विवेकवादी म्हणतात, ते योग्य नाही. निसर्गाने किंवा जगन्नियन्त्या शक्तीने बुद्धीबरोबरच श्रद्धा, भावना, इ. ची मानवी मनात निर्मिती केली ती निष्कारण म्हणता येणार नाही. पर्यावरणाच्या संतुलनात व परस्परपूरकतेने कृमिकीटकांपासून सर्व वस्तुजाताचा अनिवार्य संबंध आहे हे आज पर्यावरणविज्ञान सांगते, तशीच स्थिती मनोव्यापारात बुद्धी, श्रद्धा, भावना यांची असू शकते. ज्याच्या काहीही श्रद्धा किंवा भावना नाहीत असा मनुष्य- मुक्त अवस्थेला पोचलेल्या व्यक्तीचा कदाचित अपवाद करता येईल- सहसा आढळणार नाही. श्रद्धेला त्याज्य मानणारे तथाकथित बुद्धिवादी जर आपल्या मनात डोकावू शकतील तर त्यांनाही तेथे काही श्रद्धा असलेल्या आढळतील. तेव्हा श्रद्धा किंवा भावना असणे वाईट नाही; त्या डोळस मात्र असाव्यात. विकसित होणाऱ्या ज्ञानाच्या संदर्भात त्यांना योग्य मुरड घालता आली तर त्या हानिकारक न ठरता उपकारक ठरू शकतील.
५. ईश्वराचे अस्तित्व मानावे की नाही हा जणूकाय विवेकवादाचा निकष मानला जातो.

वर सांगितल्याप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असिद्ध आहेत. परंतु दोन्ही वैज्ञानिक संकल्पना (hypothesis) म्हणून गृहीत धरता येतात. अशा स्थितीत विवेकवादाचे तीन पर्याय संभवतात. १. ईश्वर आहे हे गृहीत धरणारा आस्तिक विवेकवाद; २. ईश्वर नाही हे गृहीत धरणारा नास्तिक विवेकवाद. आणि ३. ह्या प्रश्नाबद्दल उदासीन असणारा अज्ञेयवादी विवेकवाद. ज्याच्या त्याच्या मनाच्या कलानुसार तो ह्यांपैकी एका विवेकवादाचा स्वीकार करील. निव्वळ विवेकवादाच्या निकषावर ह्यांपैकी कोणताही विवेकवाद निकृष्ट किंवा उत्कृष्ट ठरवता येणार नाही. तेव्हा एका प्रकारच्या विवेकवादाने दुसऱ्या प्रकारच्या विवेकवादाबद्दल योग्य आदर ठेवला पाहिजे.

ईश्वर नाही ह्या धारणेवर आधारलेला आजचा सुधारक मधील विवेकवाद वरील कसोट्या पूर्ण करीत नाही ही मुख्य अडचण आहे. त्यामुळेच मला तो निखळ विवेकवाद वाटत नाही.

केवळ विवेकवादाच्या दृष्टीने तिन्ही प्रकारांचे विवेकवाद सारख्याच तोलाचे असले तरी विशेषतः भारतीय समाजाच्या संदर्भात आणि स्थूलपणे जागतिक संदर्भात देखील ईश्वर आहे ह्या धारणेवर आधारलेला विवेकवाद मला अधिक उपयुक्त वाटतो.”

धर्म नष्ट करण्याचे जगात झालेले प्रयत्न अपयशीच ठरले आहेत. भारतात तर धर्म ही संकल्पना जनतेच्या हाडीमांसी मुरलेली आहे व त्यामुळे साम्यवाद्यांनाही आता ती मान्य करणे भाग पडले आहे. सुदैवाने भारतातील मूळ स्वरूपाची धर्म-संकल्पना रिलिजनहून वेगळी आहे व तिचे मुख्य स्वरूप ऐहिक आहे म्हणून भारतातील विवेकवादाने तिच्याच आधारावर आपली उभारणी केली पाहिजे. तरच तो समाजावर प्रभाव टाकू शकेल. सर्व नष्ट करण्याचा क्रांतीचा मार्ग जगात सर्वदूर अपयशी ठरला आहे. क्रांतीने बदला घेता येईल पण पुरेसा बदल घडवून आणता येत नाही हेच ऐतिहासिक सत्य आहे. उलट, उत्क्रांतीच्या मार्गाने आवश्यक ते सर्व महत्त्वाचे बदल घडवून आणता येतात ह्याची भारत, इंग्लंड, जपान इत्यादि देशांचे इतिहास साक्ष देतात. वर्तमान भारतात देखील आज अनेक रिलिजियस आचार-विचारांना रिलिजन मानणाऱ्या लोकांनी देखील – आज त्यांत काही अर्थ दिसत नाही म्हणून – फाटा दिला आहे व इतर अनेक विधींमध्ये सुटसुटीतपणा आणला आहे. हे कसले धर्मवाले असे म्हणून त्यांचा उपहास करण्याऐवजी सर्व प्रकारच्या विवेकवाद्यांनी त्यांचे स्वागतच करावयास पाहिजे.

ईश्वराविषयीची भारतात मान्यता पावलेली विवेकवादी संकल्पना पाश्चात्य संकल्पनेहून वेगळी आहे. ईश्वर म्हणजे विश्वाच्या बाहेर असलेला कोणी हाडामांसाचा पुरुष नसून ते म्हणजे सृष्टीचे उत्पत्तिस्थान असलेले व सर्व सृष्टीत आविष्कृत असलेले सनातन ब्रह्मतत्त्व आहे ही भारतीय संकल्पना आहे. निरनिराळ्या देवता व त्यांच्या मूर्ती प्रतीकमात्र (जसे राष्ट्रध्वज हे राष्ट्राचे प्रतीक आहे) आहेत. ब्रह्मतत्त्वाची ही संकल्पना २० व्या शतकातील विज्ञानाच्या अविरोधी आहे; इतकेच नव्हे तर जुळती आहे. अध्यात्म व विज्ञान यांत विरोध नाही हीच भारतीय अध्यात्मशास्त्राची धारणा आहे.

विज्ञान सर्व जगाला भौतिक-स्वरूप मानते तसेच भौतिक द्रव्य ज्ञानरहित आहे असेही मानते. मनुष्य ही देखील अशीच भौतिक वस्तू आहे. तर मग माणसातील ज्ञान मिळवू शकणारे द्रव्य कोणते? ते भौतिकाहून वेगळे असले पाहिजे. त्यालाच भारतीय तत्त्वज्ञान आत्मा किंवा जीव म्हणते. तो ब्रह्माचाच एक अंश आहे, जीवो ब्रह्मैव नापरः ही भारतीय तत्त्वज्ञानाची बुद्धिनिष्ठ धारणा आहे. (ह्या पूर्वी ज्ञानाचे उगमस्थान म्हणून ‘अवचेतना’चा उल्लेख आला आहे. त्या अवचेतनाबद्दल अधिक तपशील देताना टॉयनबी म्हणतात, ‘मेरा यह विश्वास है कि मानव मन के गहन अवचेतन गर्त की निम्नतम परत उस चरम सत्ता से भिन्न नहीं है जो संपूर्ण ब्रह्माण्ड का आधार है।’ इकेदा यालाच ‘ब्रह्माण्डीय जीवन-शक्ती असे नाव देतात. पूर्वोक्त ग्रंथ, पृ. ५९). जे आहे ते नष्ट होत नाही आणि जे नाही ते उत्पन्न होत नाही ह्या भारतीय तत्त्वज्ञानाला व आधुनिक विज्ञानाला मान्य असलेल्या तत्त्वानुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे सर्व भाग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जसे विद्यमान असतात त्याप्रमाणेच त्याचा आत्मा किंवा जीवही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विद्यमान असला पाहिजे हे भारतीय तत्त्वज्ञानाचे बुद्धिनिष्ठ अनुमान आहे.

सेमेटिक रिलिजन्समध्ये ज्ञान हे मूल्य (value) नाही; उलट ते अधःपाताचे कारण आहे. पौर्वात्य रिलिजन्समध्ये ज्ञान हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे, ‘ज्ञानात् मुक्तिः’ ही त्यांची धारणा आहे.

ह्याचा अर्थ बुद्धिव्यतिरिक्त श्रद्धा, भावना यांना जीवनात स्थान नाही असे मात्र नाही. निव्वळ बुद्धीचा किंवा तर्काचा आश्रय घेऊन समता, सत्य, अहिंसा, न्याय इ. अनेक महान् सामाजिक तत्त्वांचा कीस काढावयाचे म्हटले तर सहसा हाती काहीच लागणार नाही. बुद्धि, श्रद्धा, भावना यांचा कालानुरूप योग्य समन्वय करूनच समाजधारणा होत असते. बुद्धीच्या साहाय्याने आपल्या श्रद्धा व भावना डोळस असणे मात्र आवश्यक आहे.

वरील वैचारिकतेमुळे आस्तिक विवेकवादाला भारतीय धर्मसंकल्पना अत्यंत मोलाची व समाजधारणेला उपयुक्त वाटते. ती मुख्यतः ऐहिक असली तरी पारमार्थिकाचेही अवधान त्यात ठेवले आहे.

विवेकवाद हे अतज्ज्ञांचे क्षेत्र आहे हे वर सांगितले आहेच. त्यामुळेच नास्तिक विवेकवादी आपल्याला न समजणाऱ्या गोष्टींबद्दल वैज्ञानिक तज्ज्ञांवर जसा अवलंबून असतो तसाच आस्तिक विवेकवादी आध्यात्मिक तज्ज्ञांवर अवलंबून असतो. त्याबरोबर तो वैज्ञानिक तज्ज्ञ व आध्यात्मिक तज्ज्ञ यांच्या विचारांची तुलना करून दोहोंत विरोध आढळला तर वैज्ञानिकांची बाजू अधिक ग्राह्य मानतो. विज्ञानाप्रमाणे अध्यात्मशास्त्रात प्रायोगिक दर्शनीयता नाही ही उणीव तो मान्य करतो. तसेच विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन्हीही क्षेत्रांत विश्वाच्या स्वरूपाबद्दल एकच एक सर्वमान्य सिद्धान्त नसून निरनिराळे विचारप्रवाह आहेत त्यामुळे दोन्ही क्षेत्रे अद्याप पूर्ण विकसित झालेली नाहीत अशीही त्याची धारणा असते.

इतरांच्या वाढदिवस, विवाह, परीक्षाप्रारंभ इ. प्रसंगी बहुधा नास्तिक विवेकवादी देखील शुभेच्छा व्यक्त करतात व वरील प्रकारच्या आपल्या प्रसंगी शुभेच्छांची अपेक्षा करतात. केवळ विवेकवादाच्या दृष्टीने हे प्रसंग व शुभेच्छा यांचा काहीही संबंध नसतो. तथापि मानसशास्त्रीयदृष्ट्या त्या उत्साहवर्धक व उपयुक्त वाटतात. तीच स्थिती मृताच्या स्मृतिदिनी त्याच्या छायाचित्राला हार घालण्याची किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याची. आस्तिक विवेकवाद्याला आपल्या बुद्धीच्या द्वारे ब्रह्मतत्त्वाचे अस्तित्व जाणवत असल्यामुळे त्याचे निराधार किंवा प्रतीकात्मक सगुण रूपात ध्यान-पूजन करण्यात त्याला वरील प्रकारचाच मानसशास्त्रीय लाभ होत असतो. आपल्याला ज्ञात असलेल्या क्षेत्रापेक्षा अज्ञात असलेले क्षेत्र कितीतरी मोठे आहे ह्याची जाण राहून त्याला आपल्या बुद्धीचा गर्व होत नाही, इतरांच्या विचारांचा तो स्वाभाविकपणे आदर करू लागतो व त्याच्या एकंदर वागण्यात नम्रता येते. शिवाय तो पूर्वग्रह न ठेवता साकल्याने विचार करीत असल्यामुळे सामान्यतः त्याच्या बुद्धीला प्रगल्भता येते व त्याचा आत्मविश्वास वाढतो.

बरेच नास्तिक विवेकवादी वाढदिवसाच्या प्रसंगी केक कापणे व मेणबत्ती विझवणे, उद्घाटनप्रसंगी फीत कापणे, मृताच्या स्मरणार्थ एखादा उपक्रम सुरू करणे, गणराज्यदिनी झेंडा उभारणे ह्यासारखे विधी करतात. वस्तुतः त्या प्रसंगांचा व त्यावेळी करण्यात येणाऱ्या विधींचा काही खास परस्पर संबंध नसतो. असा संबंध केवळ जुळविला जातो. त्यामुळे ते संबंध म्हणजे एक प्रकारच्या अंधश्रद्धाच असतात. परंतु त्यांतून उत्पन्न होणारे मानसशास्त्रीय व सामाजिक लाभ ह्यांसाठी ते विधी केले जातात. हे मानसशास्त्रीय व सामाजिक लाभ वृद्धिंगत करावयाचे असतील तर वरील विधींच्या ऐवजी समाजात परंपरेने चालत आलेले विधी करणे अधिक योग्य होईल. ह्या विधींमधला आज अनावश्यक किंवा अनिष्ट वाटणारा भाग गाळणे, त्याला कालानुरूप सुटसुटीत व मुख्यतः ऐहिक स्वरूप देणे यांनी ते लाभ वाढण्यालाच मदत होईल. आस्तिक विवेकवादी ह्या दृष्टीनेच परंपरागत विधींना अनुकूल असतो. भारतीय धर्मसंकल्पनाही अशा सुधारणांना अनुकूल आहे.

आस्तिक विवेकवादाचे स्वरूप वरील प्रकारचे आहे. हा विवेकवाद तज्ज्ञांना – यात वैज्ञानिक तसेच आध्यात्मिक तज्ज्ञही आले – त्यांच्या तज्ज्ञक्षेत्रांत अर्थातच लागू नाही. इतरांनी आपल्या सर्व क्षेत्रांत आणि तज्ज्ञांनी आपल्या तज्ज्ञेतर क्षेत्रांत सुरवातीला सांगितलेल्या तीन विवेकवादांपैकी कोणत्याही एकाचा स्वीकार करण्यास हरकत नाही. परंतु धर्मप्रवण भारतामध्ये सामाजिक दृष्टीने धर्मसंकल्पनेवर आधारलेला आस्तिक विवेकवाद हाच जास्त लाभकारक ठरेल.

श्री. मोहनी यांना उत्तर
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ ह्यावर प्रा. देशपांडे यांनी घेतलेल्या आक्षेपांवरील उत्तर आजचा सुधारक कडे पाठविल्यानंतर ह्या मासिकाचा एप्रिल-मे १९९३ चा अंक माझ्याकडे आला. त्यात श्री. दिवाकर मोहनी यांनी वरील विषयांसंबधी आपल्या लेखात काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांना माझे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

धर्म आणि रिलिजन ह्या संकल्पना किती जवळच्या, त्यांत नेमका भेद कोणता व त्यांची व्यवच्छेदक लक्षणे कोणती असा व्यापक प्रश्न श्री मोहनी यांनी विचारला आहे. थोडक्यात त्याचे उत्तर असे की धर्म ही समाजजीवनाची मूलभूत सर्वव्यापी आधार व्यवस्था आहे. उदाहरणाने स्पष्ट करावयाचे तर असे म्हणता येईल की आजच्या नियोजनाच्या काळात सर्व प्रमुख जीवन विभागांचे (आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक इ.) कार्य व मर्यादा निर्धारित करणारी जशी व्यापक स्वरूपाची (micro-level) राष्ट्रीय योजना असते तशी धर्म ही समाजजीवनाची व्यापक व्यवस्था होय. राष्ट्रीय योजनेच्या अंतर्गत व तिला अविरोधी अशा प्रत्येक जीवनविभागाच्या तपशीलवार (micro-level) योजना असतात त्याप्रमाणे धर्माच्या अंतर्गत व त्याला अविरोधी अशा अर्थ, काम व मोक्ष यांच्या स्वतंत्र व्यवस्था असतात. धर्माचे स्वरूप master-plan सारखे आहे. हेच त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. को रिलिजन हे मोक्षपुरुषार्थाचे साधन आहे. ज्यांना मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करावयाचा असेल त्यांचे साठी अनुकूल अवसर व साधन धर्म प्राप्त करून देतो परंतु त्यांत समाजधारणेला अपाय होणार नाही असे अंकुशही धर्म ठोवतो. (उदा. आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाची व्यवस्था केल्याशिवाय संन्यास घेऊ नये हा धर्मनियम.) हा दोहोंतील संबंध आहे. धर्म व्यापक व्यवस्था आहे तर रिलिजन ही मोक्षसाधनेच्या मर्यादित क्षेत्राची परंतु तपशीलवार अशी (micro-level) व्यवस्था आहे. हा दोहोंतील भेद आहे. श्री मोहनी यांच्या इतर शंकांची उत्तरे अशी
१. धर्मशास्त्रांत वर्णिलेली धार्मिक कृत्ये ही मुख्यतः ऐहिक स्वरूपाचीच कशी आहेत याचे तपशीलवार विवरण प्रा. देशपांडे यांना दिलेल्या उत्तरात केले आहे. ते श्री मोहनी यांनी पाहावे. धर्म शब्द नेहमीच पारलौकिकाशी, पापपुण्याशी संबंधित राहिला आहे, इहाविषयी वापरला गेल्याचे आढळत नाही ह्या श्री. मोहनी यांच्या शंकेतील ‘नेहमीच हा शब्द योग्य नव्हे. केवळ आधुनिक काळात ‘रिलिजन साठी ‘धर्म’ शब्द वापरला गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही ‘धर्म शब्द त्याच्या मूळ अर्थाने आजही कसा जिवंत आहे याचा ऊहापोह मी प्रा. देशपांडे यांना दिलेल्या उत्तरात केला आहे. त्याची उदाहरणेही दिली आहेत.
२.धर्माचा पारलौकिकाशी असलेला संबंध पाहता धर्म स्पष्टपणे ऐहिक राहात नाही असे श्री. मोहनी म्हणतात. ‘स्पष्टपणे शब्दाने जर त्यांना अर्थ स्पष्ट होत नसेल तर त्यांनी ‘मुख्यतः हा शब्द लक्षात घ्यावा; व धर्मशास्त्रांत सांगितलेले बहुतेक सर्व विधी मुख्यतः ऐहिक कसे आहेत याचे प्रा. देशपांडे यांना दिलेल्या उत्तरात मी केलेले विवरण पाहावे अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यावरून त्यांच्या लक्षात येईल की ‘पारलौकिक लाभाकडे दृष्टी ठेवूनच धर्मकृत्ये केली जातात असे म्हणणे म्हणजे पगाराऐवजी बोनस व महागाई भत्ता यांचेवर दृष्टी ठेवूनच नोकरी स्वीकारली जाते असे म्हणण्यासारखे आहे. शेवटी पगार मुख्य : बोनस व महागाई भत्ता गौणच राहणार.
३. ‘धर्म शब्दांत चार संकल्पनांचा अंतर्भाव आहे; सनातन किंवा शाश्वत धर्म, युगधर्म, आपद्धर्म आणि कलिवर्य. सत्य, अहिंसा, अस्तेय, इंद्रियनिग्रह इ. तत्त्वे सनातनधर्मात येतात. ते सदाचरणाचे देखील नियम आहेत : तेवढ्यापुरता सर्व जगतात ‘धर्म’ एकच आहे असे मानता येईल. तथापि युगधर्म- ज्यात समाजरचना, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिष्टाचार, संस्कृती इ. चा समावेश होतो – वेगवेगळ्या समाजांकरिता वेगवेगळा राहू शकतो. इतकेच नव्हे तर एकाच समाजात वेगवेगळ्या काळी व स्थळी त्यांत परिवर्तने देखील होऊ शकतात.
धर्मान्तराबाबत गहजब होतो तो उपरोक्त धर्माबद्दल नसून रिलिजनबाबत असतो. आणि तेथेही प्रामाणिक मत परिवर्तनाने होणाऱ्या रिलिजन- परिवर्तनाबाबत नसतो; तर प्रलोभन, छद्र, राजकीय हेतू इ. कारणांमुळे होणाऱ्या परिवर्तनाबाबत असतो.
४. अखिल मानवमात्राला लागू होणाऱ्या धर्माला हिंदुधर्म का म्हणावयाचे असा श्री. मोहनींना प्रश्न पडला आहे. ख्रिश्चन सायन्स यात सायन्सला ‘ख्रिश्चन’ का म्हणावयाचे असा त्यांना कधी प्रश्न पडला की नाही कुणास ठाऊक? हिंदुधर्म याचा विग्रह हिंदूंनी विकसित केलेला धर्म असा येथे करावयास पाहिजे. पूर्वी धर्माला ‘धर्म’ असेच नाव होते. हिंदुस्थानात राहणारांना कालांतराने हिंदु ही संज्ञा मिळाली म्हणून त्यांच्या धर्माला हिंदुधर्म म्हणू लागले. त्यामुळे धर्मकल्पनेला संकुचितता प्राप्त झाली असे समजण्याचे कारण नाही. हे मात्र मान्य केले पाहिजे की ‘हिंदु’ ह्या शब्दाला अनेक अर्थ आहेत व सध्या ‘धर्म ह्या शब्दालाही दोन अर्थ आहेत – धर्म आणि रिलिजन. त्यामुळे ‘हिंदुधर्म’ शब्दाने भाषिक समस्या (Semantic problem) निर्माण होते. ह्याबाबतीत भाषिक निश्चितता निर्माण होण्याची गरज आहे,एवढेच.
धर्मात सदाचाराचा मुख्य आधार समाजधारणा आहे. धर्म रिलिजनलाही स्पर्श करीत असल्यामुळे पापपुण्यादि कल्पनांचाही सदाचाराला आधार मिळतो. परंतु सदाचार हे ऐहिक क्षेत्रांतीलच वर्तन असल्यामुळे त्याच्या ऐहिकतेला त्यामुळे बाधा येत नाही. जे ऐहिक आहे त्याला पारलौकिकाचा स्पर्शच असू नये ह्या केवळ इहवादी किंवा नास्तिक विवेकवादातून अशा स्पर्शामुळे ऐहिकाची ऐहिकता विटाळते अशी शंका निर्माण होते. त्यांच्या दृष्टीने ती रास्तही आहे. परंतु आस्तिक विवेकवाद अशी अस्पृश्यता मानीत नाही. जसे कायद्याला घटनात्मक दृष्टीने केवळ राजसत्तेचाच आधार असतो, परंतु त्याला नीतितत्त्वांचाही आधार मिळाला तर त्याला ते उपकारकच ठरते तसेच हे आहे.
हिंदुधर्म मानणारांपेक्षा इतर रिलिजन मानणारे अधिक प्रभावशाली, अधिक संपन्न असे का ही श्री. मोहनी यांची शंका रास्त आहे. त्याची अनेक कारणे असू शकतात. केवळ धर्माच्या दृष्टीने विचार करावयाचा तर हिंदूंनी सनातनधर्मातील तत्त्वांचा अतिरेक केला व युगधर्म आणि आपद्धर्म ह्यांकडे बरेच दुर्लक्ष केले हे त्यांच्या अवनतीचे थोडक्यात कारण सांगता येईल. कोणत्याही तत्त्वाला – त्याला धर्मतत्त्वही अपवाद नाही – कालौघात ‘ग्लानी’ येते हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्या तत्त्वाला नव्या परिस्थितीला अनुरूप अशा स्वरूपात पुनरुज्जीवित करणे हाच त्यावर उपाय आहे.
परंतु अशा धर्मच्युतीमुळे हिंदू हा हिंदू राहात नाही हे म्हणणे म्हणजे माणूस शेळ्यामेंढ्या खायला लागला म्हणून तो माणूस न राहता हिंस्र पशू बनला हे म्हणण्यासारखेच आहे. तर्क टोकापर्यंत ताणला की पुष्कळदा तो तर्क न राहता त्याचे तर्कट बनते. कालौघात हिंदू आपल्या धर्मातील काही तत्त्वांचे विस्मरण झाले किंवा त्यांचे आकलन चुकले असे म्हणणे अधिक यथार्थ होईल.
६. हिंदुस्थानात धर्म आहे तसे रिलिजन्सही आहेत. रिलिजनकरिता पूर्वी पंथ किंवा संप्रदाय हे शब्द प्रचलित होते; जसे, शिखपंथ, बौद्ध संप्रदाय, नाथपंथ, जैन संप्रदाय इ. हे शब्द पुन्हा मूळ अर्थाने प्रचलित करणे शक्य आहे. धर्म शब्द त्याच्या मूळ अर्थात स्थिर झाला तर हे काम अधिक सुकर होईल. Religion साठी संप्रदाय’ आणि Sect साठी पंथ’ हे शब्द रूढ व्हावेत असे मला वाटते.
७. सनातन धर्म आणि युगधर्म यांत कशाचा अंतर्भाव होतो ह्याचा वर निर्देश केला आहे. सनातन धर्म सर्वकाळ सनातन धर्मच राहतो. त्यात युगानुसार परिवर्तन होत नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत त्याला अपवाद करता येतो. ह्यालाच आपद्धर्म म्हणतात. आपद्धर्म हा धर्म नव्हे हे म्हणणे बरोबर नाही. केवळ स्वहितासाठी केलेले अनैतिक आचरण हा आपद्धर्म नव्हे. तो अधर्म आहे. मात्र समाजधारणेला पोषक-निदान अविरोधी असे वरवर अनैतिक दिसणारे आचरण – दुसरा अधिक चांगला पर्याय विद्यमान किंवा शक्य नसेल तर धर्माला संमत आहे. हाच आपद्धर्म होय. तो अपवादात्मक परिस्थितीतच क्षम्य आहे व तो तात्पुरता उपाय आहे. अहिंसा ह्या सनातन तत्त्वाला छेद देणारे राम-रावण युद्ध किंवा कौरव-पांडव युद्ध, तसेच सत्यतत्त्वाला छेद देणारे युधिष्ठिराचे खोटे किंवा अर्धसत्य बोलणे हे आपद्धर्म होत. वर्तमानकाळात अयोध्येला जे घडले तोही आपद्धर्म आहे. एखाद्या समाजाचे सनातनधर्माच्या तत्त्वानुसार मन वळविण्याचे प्रयत्न सगळ्या जगात जेवढे झाले नसतील तेवढे मुस्लिम समाजाच्या बाबतीत हिंदुस्थानात झाले. तरी त्यांत अपयशच येत गेले. म्हणून हिंदु समाजाने आपद्धर्माचा स्वीकार केला. त्याचे इष्ट परिणामही दिसू लागले आहेत. मुस्लिम मानसिकता योग्य दिशेने बदलू लागली आहे. ती तशी बदलणे मुसलमानांच्या, हिंदूंच्या व संपूर्ण भारताच्या हिताचे आहे. ज्या लोकांनी ह्या आपद्धर्माचा स्वीकार केला – त्यांत लोकांनी हा आपद्धर्माचा स्वीकार केला – त्यांत सिंघलही येतात – त्यंनी तो तात्पुरता उपाय म्हणूनच निरूपायाने स्वीकारलेला आहे. मुस्लिमांना कायमचे दडपून टाकावयाचे हा त्यांचा उद्देश नाही, त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणावयाचे हाच त्यांचा हेतू आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून व अन्यत्र होणाऱ्या आचरणावरून अगदी स्पष्ट आहे. उभयपक्षी सन्मान्य तडजोड त्यांना हवी आहे. परंतु त्यासाठी मुस्लिम मानसिकता योग्य स्तरापर्यंत येत नाही तोवर त्यांच्यासाठी आपद्धर्माचा स्वीकार करणे आवश्यक आहे आणि योग्यही आहे. ‘धर्म शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याचे ते पायीक असल्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक काळ ते आपद्धाला चिकटून राहणार नाहीत आणि राहिले तर हिंदुधर्म व तज्जन्य हिंदू मानसिकता त्यांना तसे करू देणार नाही ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. अशा स्थितीत त्यांना फासिस्ट, आडमुठे सिंहलवादी, प्रतिक्रियावादी, जातीय, हिंदुत्वविरोधी इत्यादि शेलकी विशेषणे लावणे हे धर्म तत्त्वांचे योग्य आकलन न झाल्याचे किंवा क्षुद्र प्रचारपद्धतीचे द्योतक आहे. आमचे बुद्धिवादी लोक पूर्वग्रह सोडून विचार करायला कधी शिकणार आहेत?
8. आधुनिक विज्ञान भारतीय तत्त्वज्ञानाच्या – विशेषतः वेदान्त तत्त्वज्ञानाच्या – कसे जवळ येत आहे हे मी ह्यापूर्वीच्या लेखात स्पष्ट केले आहे. ईश्वर ही संकल्पना वैज्ञानिक संकल्पना (hypothesis) म्हणून कशी उपयुक्त आहे हेही प्रा. देशपांडे यांना दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे. अशा स्थितीत धर्माचा पारलौकिकाशी म्हणजे संप्रदाया (Religion) शी असलेला संबंध आजही कालबाह्य ठरत नाही. निदान आस्तिक विवेकवादाच्या दृष्टीने तर तो मुळीच तसा ठरत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.