पुस्तक परिचय: अमेरिका: अवचटांना दिसलेली

अमेरिका
ले. अनिल अवचट मॅजेस्टिक प्रकाशन, ऑगस्ट ९२ मूल्य ६५ रु.

कॉलेजात शिकत असताना मनाला अमेरिकेची ओढ वाटायची. खरं तर मुळात इंग्लंड, इटाली, ग्रीस हे कुतूहलाचे विपय असत. ‘नेपल्स पाहावे मग मरावे’ असे भूगोलाच्या पुस्तकात पढलो होतो. ‘Rome was not built in a day अशा म्हणी, सीझर, सिसेरो, अँटनी-क्लिओपाट्रा यांचे इतिहास या साऱ्यांमुळे इटाली, व्हेनिस, पिरॅमिड्स यांच्याबद्दल जबर आकर्षण वाटे. अमेरिकेला चारशे वर्षांमागे इतिहास नाही. पण कॉलेजात राजा म्हणायचा, ‘प्रभू, इतिहास सोड. वर्तमानात ये. आज अमेरिका नंबर वन आहे. कधी ऐपत आलीच तर अमेरिका पाहा. आता ऐपत आली तर अमेरिकबद्दलचा उत्साह पार आटलेला. वरून अवचटांसारख्यांचे अमेरिकावर्णन वाचले की मन सुन्न होते.
रशियाची शकले झाली आणि अमेरिका जगातली एकमेव महाशक्ती उरली. तशी तिसऱ्या जगात कधीचीच अमेरिकेची दांडगाई चालू होती. अण्वस्त्रे, अंतराळातील स्वामित्व यांच्या जोरावर तिने जरब उत्पन्न केली आहे. पाकिस्तान भारतात कितीही कारस्थाने करो अमेरिका तसे म्हणेपर्यंत आपल्या चडफडण्याला अर्थ नाही. आणि स्वतःला सोयीचे झाल्याशिवाय अमेरिका तसे म्हणायला तयार नाही. एका आग्नेयेकडच्या देशातला किस्सा अवचट सांगतात. त्या देशाने सिगरेटवर घातलेली बंदी अमेरिकन कारखानदारांना जाचक झाली. त्यांच्या लाभासाठी अमेरिकेने त्या देशावर दडपण आणून ही बंदी उठवली. देशातले शस्त्रास्त्रांचे कारखाने बंद पडू नयेत म्हणून तिसऱ्या जगात युद्धे खेळविण्याची चालही याच आसुरी नीतीची..
अमेरिकेच्या आणि अमेरिकनांच्या श्रीमंतीच्या कथा आपण वाचलेल्या असतात. कुठल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याकडून दुर्लक्ष झाले म्हणून एका झटक्यात आख्खं हॉटेल विकत घेणारे, हजारो बसेसच्या वाहतूक कंपन्याच नाही तर हजारो मैलांचे रेल्वेमार्ग आणि रेलगाड्यांची मालकी ठेवणारे कुबेर तिथे आहेत. पण त्यांच्या ह्या समृद्धीची मुळे कशात आहेत हे अवचट सांगतात. अगदी थोडक्यात. सहजतेने एखाद दुसऱ्या फटकाऱ्याने पेंटरने चित्र उभे करावे तसे आणि अलिप्ततेने.
कोलंबसने पाऊल ठेवल्यापासून तीनशे वर्षे, नवागतांच्या स्वागताला मित्रभावनेने सामोऱ्या आलेल्या रेड इंडियन भूमिपुत्रांना बायकामुलांसकट गोळ्या घालून यांनी भुईसपाट केले. त्यातून उरल्या सुरल्यांना आरक्षित क्षेत्रात बंदिस्त केले आणि त्यांचेही ख्रिस्ती पादांनी हळू हळू धर्मांतर घडवून आणले. सरकारने त्यांच्यासाठी शाळा उघडून इंग्रजी शिकलेल्यांना नोकऱ्या दिल्या. धर्मांतरानंतर त्यांची मूळ संस्कृती, भाषा आणि जीवनमूल्ये यांचा अंत झाला. माडखोलकरांनी १९५७ साली या प्रदेशांना भेट दिली तेव्हा आपल्या अस्तमान होत चाललेल्या अस्मितेबद्दल खंत व्यक्त करणारे हताश रेड इंडियन्स त्यांना भेटले. तीस वर्षांपूर्वी सव्वापाच लाख लोकसंख्या असलेले रेड इंडियन अवचट गेले तेव्हा प्रवाशांना नमुने दाखवण्यापुरते उरलेले दिसतात. त्यांची खेडी, त्यांची घरे, घोडे-गाड्या अजून दाखवतात – पण – हॉलिवूडचे सेट उभारावेत तसे सेट उभारून, रेड इंडियन्स आपल्यात अमेरिकनांनी कसे जिरवले याचे आणखी एक रहस्य माडखोलकरांनी सांगितले होते. त्यांच्या बायका मुली अमेरिकनांना विशेष काम्य वाटत. कारण गोऱ्यांच्या २२ टक्के बायकांना लग्न नको असे. विवाहितांपैकी ३३ टक्के बायकांना मूल व्हायला नको असे व ज्यांना हवे त्यातल्या बहुतेकींना फक्त एकच मूल हवे असे. यांच्या मानाने त्यांना रेड इंडियन स्त्रिया खूपच कुटुंबवत्सल वाटल्या. तीस वर्षांत रेड इंडियनांचा प्रश्न आणि रेड इंडियन्स विलोपले ते असे!
अवचट म्हणतात रेड इंडियन्स आणि निग्रो यांच्याबद्दल बोलायला अमेरिकन्स नाखूष असतात.
निग्रो त्यांचा पोटशूळ आहे. त्यांना होईल तितकी उपेक्षेची वागणूक अमेरिकन समाज देत असतो. बरेचदा उपेक्षेची जागा द्वेषाने आणि द्वेषाचीही जागा क्रौर्याने घेतली जाते. निग्रोंच्या हलाखीचे अवचटांनी केलेले वर्णन वाचत असताना वाटते, जगभर मानवी अधिकार-संरक्षणाच्या नावाखाली हवे तिथे नाक खुपसणारे, सबुरी आणि संयमाचे धडे देणारे हेच का ते अमेरिकन्स!
शेतीवर राबायला दीडशे वर्षांपूर्वी आफ्रिकेतून बोटी भर-भरून सक्तीने आणलेले हे निग्रो. त्यांना गुलाम म्हणून विकताना एक अमानुष तत्त्व पाळत. नवरा-बायकोंना विभागून विकायचे. एकत्र राहिले तर कामावरून घरी परतायची नवऱ्याला ओढ लागेल. कुटुंब वाढले की संघटना बांधतील. म्हणून ही दूरदृष्टी(!).
शिवाय या निग्रो बायका गोऱ्या मालकांना मनमुराद उपभोगायला सापडत. त्यातून संकरित प्रजा झाली. त्यामुळे त्या देशात शुद्ध बीजाचा निग्रो बहुधा नाहीच अशी स्थिती आली. इतकेच काय श्वेत अमेरिकन म्हणून मानले जाणाऱ्या लोकसमूहातदेखील २१ टक्क्याहून जास्त लोक मूळ आफ्रिकन बीजाचे आहेत असे समाजशास्त्रज्ञांचे दाखले आहेत. संकरातून झालेल्या गौर संततीलाही निग्रोच गणले जाते. त्यांतील काहींनी प्रदेशान्तर (क्रॉसिंग द लाईन) करून ‘गोऱ्यांत मिसळून जाण्याचे प्रयत्न केले. पण असे प्रयत्न बहुधा फसले. त्यांचे मूळ उघडकीला येई आणि त्यांच्या कपाळीचा ‘निग्रोपणा’चा शिक्का कायम होई.
अमेरिकेत जसजशी समृद्धी वाढली तसतशी संपन्न गौर कुटुंबे गावाबाहेर मोकळ्या हवेशीर वस्त्यांत सटकली आणि जुन्या वस्त्यांचे निग्रोवाडे, घेट्टो बनले. त्या घेट्टोबाहेर गोऱ्यांच्या वस्तीत आजही त्यांना घरे मिळत नाहीत. टॅक्सीवर, हॉटेल्समध्ये ‘फॉर व्हाइट्स ओन्ली’ असे फलक अजूनही आहेत. न्यूयॉर्क, डेट्रॉइट सारख्या शहरांचे महापौर किंवा व्हर्जिनिया राज्याचा गव्हर्नर कृष्णवर्णीय असूनही सामान्य निग्रोची तीच परवड कायम आहे. यावर अवचट मार्मिक भाष्य करतात : आपल्याकडे गवई सभापती झाले किंवा जगजीवनराम उपपंतप्रधान झाले तरी खेड्यातले पाणवठे दलितांना मोकळे झाले असे होते काय? ज्या न्यूयॉर्कचा मेयर कृष्णवर्ण, तिथे भर हिवाळ्यात, भुयारी रेल्वे स्टेशनावर, बस कंपन्यांच्या थांब्यांपाशी हजारो बेघर निग्रो फाटक्या कपड्यांत थंडीत कुडकुडत रात्र कंठत असतात. असाही अमेरिकन दिव्याखाली अंधार! व्यसनमुक्ति केंद्रातून परावृत्त होऊन आलेला डिक सी. हा तरुण अवचटांना सांगतो, ‘बहुतेक बेघर ब्लॅक्स हे ड्रग अॅडिक्टस् आहेत आणि बहुतेक ड्रग अॅडिक्टस् एड्स्चे पेशन्ट आहेत.’ अवचटांना मिळालेल्या आकडेवारीप्रमाणे एकट्या न्यूयॉर्कमध्ये अडीच लाख एड्सग्रस्त रुग्ण आहेत.
तिथे बेकार नागरिकाला दरमहा भत्ता मिळतो पण वेलफेअरचा हा चेक यायला पोस्टाचा पत्ता लागतो. या बेकार-बेघर निग्रोंना तोही अप्राप्य आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिकच अंधार आहे.. कूक्लक्स क्लॅन (के के के) या नावाची कृष्णवर्णीयांना छळणारी एक संघटना आहे. दक्षिणेत निग्रो कमी म्हणून त्यांचा छळ अधिक. शहरांचे मेयर्स गोरे ते पोलीसदलाचे प्रमुख असतात. न्यायदानात अजून ज्यूरीची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. परिणामी बलात्काराच्या खटल्यात आरोपी निग्रो असेल तर शिक्षा दीर्घतम आणि कडक. पण तोच आरोपी गोरा असेल तर सुटण्याची संधी जास्त आणि शिक्षा झालीच तर सौम्य. कायद्याने निग्रोना हॉटेलात खाता येते. पण निग्रोंना दहशत बसावी म्हणून पाटी लावली जाते, ‘या हॉटेलचा दहा टक्के फायदा के के के ला जातो.’ मग निग्रो जिवाच्या भीतीने दूरच राहातात. ‘कूक्लक्स’ या ग्रीक शब्दाचा अर्थ वर्तुळ. एक मण्डळ या अर्थी हा शब्द वापरला जातो. कृष्णवर्णीय निग्रोंना मताधिकार आहेत खरे. पण मतदानाच्या दिवशी KKK ही अक्षरे असलेली बुरखेवजा टोपी घालून गाडीच्या खिडकीबाहेर दोराचा फास लटकावून हे कार्यकर्ते कृष्णवस्तीत फेऱ्या मारतात. काय मजाल आहे निग्रोंनी मतदानाला बाहेर यायची! बिहारच्या गुंडानीही यांच्या पायाचे तीर्थ घ्यावे अशी यांची योग्यता! न्यूयॉर्कच्या क्वीन्स भागात घडलेली एक घटना अवचट सांगतात. ‘कार विकणे’ची जाहिरात वाचून एक निग्रो चौकशीसाठी गेला. सोबत मित्र होता. इटालियन गोऱ्यांची ती वस्ती. त्याच्या चौकशीनेच तीनचार गोरे तरुण मोटरसायकलस्वार चिडले. त्यातल्या एकाने सरळ गोळी घालून या निग्रो तरुणाला ठार केले.
नुकताच गाजलेला लॉस एंजेलिस येथील किंग चा खटला! या किंगचा गुन्हा काय तर जादा वेगाने त्याने कार चालविली. या अपराधातून तर प्रेसिडेंट आयझेनहॉवर सुटले नाहीत. पण एवढ्यासाठी पोलिसांनी पाठलाग करून त्याला कारबाहेर काढले. लाथा बुक्क्यांनी तुडवले. तेवढ्यानेही त्यांचा द्वेषाग्नी शांत न होता त्यांनी लोळागोळा होऊन पडलेल्या किंगला दण्डुक्यांनी अर्धमेले केले. ह्या सगळ्या प्रकाराची व्हिडिओ फिल्म खटल्यात सादर केली गेली. तरी गोऱ्या ज्युरीने पोलिसांना निर्दोष ठरवले. ह्या ‘न्याया’ची जगभर नाचक्की झाली. तेव्हा कुठे मिश्र ज्युरीपुढे पुन्हा खटला चालवला आणि त्या मारेकरी पोलिसांना शिक्षा ठोठावल्या गेल्या.
के के के बद्दल तिथल्या एका विचारवंताने म्हटले ते खरे आहे. तो म्हणाला : क्लॅनचे प्रत्यक्ष सभासद थोडे आहेत… पण सर्वसाधारण गोऱ्या अमेरिकन माणसाच्या मनात क्लॅन अस्तित्वात आहे तोपर्यंत क्लॅन अमेरिकेतून समूळ नष्ट होणे शक्य नाही.
निग्रोंची लोकसंख्या बारा टक्के आहे. त्यांना नागरिकत्वाचे अधिकार आहेत. पण त्यांचा प्रश्न परस्पर एड्स् ने सुटावा असे वंशद्वेष्ट्या अमेरिकनांना वाटते की काय नकळे! रेड इंडियन्स अमेरिकेचे मूळ भूमिपुत्र. पण त्यांना नागरिकत्व मिळायला १९३५ साल उजाडले.
वर्तमान अमेरिकेचे ऐश्वर्य रेड इंडियन्स आणि निग्रो यांच्या बलिदानावर जसे उभे आहे तसेच ते आणखी एका आजतागायत चालू असलेल्या अत्याचारावर आरूढ झालेले आहे. हा तिसरा घटक आहे जुलूम, शोषण आणि पिळवणूक यांची शिकार झालेले मेक्सिकन मजूर. कॅलिफोर्निया हे पृथ्वीतलावरील नंदनवन! (असे पुन्हा भूगोलाच्या पुस्तकात लिहिलेले असायचे.) कॅलिफोर्निया, न्यू-मेक्सिको, अॅरिझोना, टेक्सास ही राज्ये पूर्वीची मेक्सिको देशातली. ती १८४६ च्या सुमारास अमेरिकेने बळजबरीने हिसकावून घेतली. कॅलिफोर्नियात पुढे सोन्याच्या खाणी सापडल्यावर मूळच्या मेक्सिकन वंशाच्या गावांना आगी लावून त्यांना हुसकावून लावले.
मेक्सिको हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिणेचा देश. भारतासारखाच दरिद्री. भ्रष्टाचाराने पोखरलेला. त्यातून एकाधिकारशाही असलेला. अफू-गांजा गर्द तस्करांचे सरकारवर वर्चस्व. जगण्यासाठी वाटेल ते दिव्य करून गोरगरीब अमेरिकेत घुसतात. बिनापरवाना प्रवेशाबद्दल ५ महिने कारावास होतो. ही शिक्षा ऐकली की ते खुशीने हात उंचावून दाद देतात. तुरुंगात कॉट, गाद्या, मांसाहारी जेवण अशी पाच महिने चैन. पण पुढे काय? सरहद्दीवरच्या दलालाला जवळचे असेल नसेल ते किडूक मिडूक विकून कमिशन दिलेले असते. पकडलेल्यांना अमेरिकन अधिकारी मेक्सिकोत दूर कुठेतरी आणून सोडतात आणि हे पुनःपुन्हा त्या भूलोकीच्या स्वर्गात घुसत राहतात. त्यांच्या दुर्दैवाच्या या फेऱ्यांवर पुस्तके निघाली आहेत. चित्रपट झाले आहेत. दलाल काय काय अघोरी उपायांनी त्यांना अमेरिकेत घुसवतात हे वाचून अंगावर शहारे येतात. कारची डिकी तर सुखासन समजावे. काँक्रीट मिसळणाऱ्या मिक्सर ड्रममध्ये त्यांना लपवतात. वर शंका येऊ नये म्हणून चेकपोस्टवर ते ड्रम फिरते ठेवतात. लहान मुलांना कारच्या खाली झोळी करून किंवा कधी बॉनेट आणि इंजिन यांच्या पोकळीत दडवून नेतात.
अमेरिकनांचे या बाबतीत दुटप्पी वर्तन असते. कॅलिफोर्निया आणि दक्षिणेतील अनेक राज्यांची शेती या मजुरांच्या भरवशावर चालली आहे. फ्लोरिडा राज्यात जमीन मऊ म्हणून यंत्राने ऊस तोडता येत नाही. माणसेच लागतात. पिकलेलं फळ ओळखणे, ते अलगद तोडणे त्यांची वर्गवारी करणे इ. कामे यंत्रे करू शकत नाहीत. म्हणून यंत्रसिद्ध अमेरिकेतही मजुरांची गरज. मजुरांचे बाजार असतात. अमेरिकन संपन्न शेतकरी आपली व्हॅन घेऊन या बाजारात जातो. तेथे हे मजूर ‘मी येतो’, ‘मी याच्यापेक्षा कमी मजुरीवर येतो म्हणून विनवण्या करतात. हा अमेरिकन त्यांचे दंड चाचपून धट्टेकट्टे मजूर निवडतो. त्याला स्थानिक मजूर नको असतात. त्यांना यांच्या चारपट मजुरी जास्त द्या. शिवाय संडास, नळ इ. सर्व सोयी द्या आणि कामाचे तास ठरलेले. उलट या बेकायदा आलेल्या मजुरांकडून कितीही तास काम घ्या, तक्रार नाही. कोणी केलीच तर पोलिसांच्या हवाली करायला मोकळे. घरेदारे, त्यातल्या सोयी सवलती द्यायची गरज नाही. हे मजूर उतरत्या टेकाडांत गुहा करून वरून दिसणार नाहीत अशा सोयी (!) करून बिळासारख्या घरांत राहतात. शुद्ध जनावरांचा जीवनक्रम जगतात. रासायनिक खते, जंतुनाशके, हवाई फवारणी इ. उपायांचे यांना अपाय भोगावे लागतात. स्थानिक मजूर ही कामे करायला तयार नसतात.
आणि हेच काय? स्थानिक लोक जी जी कामे करायला नाकारतात तीच कामे करायला प्रायः बाहेरच्या लोकांना बोलावतात. मध्यंतरी डॉक्टर्स लोकांच्या आगमनावर जवळजवळ बंदी होती. आता हॉस्पिटल्समध्ये एड्सच्या रुग्णांना उपचार करायला, प्रयोगशाळेत त्याच्या तपासण्या करायला स्थानिक डॉक्टर्स, परिचारक तयार नसतात. म्हणून त्यांच्या आगमनावरचे निबंध सैल केले जात आहेत. ‘गरज सरो नि वैद्य मरों ह्या तत्त्वाप्रमाणे पुढे नकोसे झाले की साऱ्यांचाच वांशिक पातळीवरचा छळ सुरू होतो. भारतीय स्त्रिया कुंकू लावतात. त्याला हे लोक डॉट म्हणतात. भारतीयांचा छळ संघटितपणे करायला निघालेले स्वतःला ‘डॉटबस्टर्स म्हणवतात.
अवचटांचे पुस्तक ऑगस्ट ९२ चे. परत आल्यावर दोन अडीच वर्षांनी लिहिलेले. पुस्तक वाचताना मधून मधून वाटते ‘यांची भूमिका मूर्तिभंजकाचीच तर नाही?’ मागे जैन साधु-साध्वींबद्दल, रामदासी पालखीबद्दल लिखाण वाचले होते तेव्हाही असेच वाटल्याचे आठवले. पण कोण्याही समाजसुधारकाला मूर्तिभंजक व्हावेच लागते. अमेरिकेत जाणारांचा रेटा मुंबईच्या अमेरिकन काऊन्सुलेटमध्ये व्हिसा काढताना त्यांना जाणवला. सकाळच्या चार वाजल्यापासून नंबर लावून बसलेल्या ‘मनुष्याणां सहस्रेषु’ पैकी एखादा व्हिसा मिळाला की स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखा नाचत हर्षध्वनी करत परत यायचा. विशेषतः गुजराती शहा-पटेल मंडळी म्हणजे टोकाची उदाहरणे. ज्या भारतीय भाग्यविधात्यांना त्यांनी पुस्तक अर्पण केले त्यांचीच गोष्ट घ्या. आपल्या समाजातल्या सगळ्या का, महत्त्वाकांक्षी तरुणांच्या योग्यतेला एकच कसोटी आपण लावली आहे. अमेरिकेत जायची पात्रता. आमच्या उमलत्या पिढीतल्या कर्तबगारांचे डोळे आशाळभूतपणे तिकडे लागलेले. त्यांनी अवचटांच्या ‘अमेरिका मधले भारतीय एवढे एक प्रकरण तरी आधी वाचावे.
आयोवा इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रॅमतर्फे अवचटांना तीन महिन्यांसाठी बोलावले होते. तेथे पोचताच झालेल्या स्वागतसमारंभात एक उंच अमेरिकन त्यांच्यापाशी आले. ते पूर्वी फॉरिन सर्व्हिसमध्ये होते. ते म्हणाले, ‘जगात सगळ्यात भारतीय हुशार! इकडे यायला तुम्ही ज्या शक्कली लढवता त्यांना तोड नाही’. अवचटांना वाटले आपल्याला कुणीतरी अगदी उंच उचलून खाली आपटत आहे. त्या शक्कलीची एक वानगी अशी : भारतात अनेक वर्षे संसार केलेला एखादा पोक्त मनुष्य कागदोपत्री घटस्फोट घेतो. तिकडे जाऊन तिथल्या धंदेवाईक बाईशी लग्न लावतो. ग्रीनकार्ड मिळवतो. मग घटस्फोट घेतो. इकडे येऊन पुन्हा मूळ बायकोशी लग्न आणि अखेर अमेरिकेला, मेरे पितर सरग भये या खुषीत. तिकडे गुजराती पटेलांनी मोटेल्स काढून चांगलीच बदनामी मिळवली आहे. घाणेरडी पण स्वस्त. सर्व वाममार्गाचे आश्रयस्थान अशी मोटेल्स. लहान मोठी जेलयात्रा मालकांना घडली तरी त्यांना त्याचे काही वाटत नाही. आपले मराठमोळे नोकरदार मुख्यतः पांढरपेशे. एका हिंदी खेडुताचा निचोड आपल्याला लागू पडतो. तो म्हणतो ‘थोडा पढा काम छोडा, ज्यादा पढा गाँव छोडा। बहुत ज्यादा पढा तो देश छोडा।। अवचट एका इंजीनीअर मित्राकडे गेले तेव्हा त्यांच्या बॅचचे गॅदरिंग होते. मित्र म्हणाला- ‘आमच्या बॅचच्या १०० पैकी ६० अमरिकेत आहेत.’
भारतीय माणसाचे सगळेच वेगळे. संस्कृती, भाषा, धर्म ! स्थलांतरितांची पहिली पिढी हे टिकवायची केविलवाणी धडपड करते. वयात आलेल्या मुलामुलींचे डेटिंग त्यांना खुपते. एक पालक हिंसाचाराच्या आणि कामाचाराच्या बातम्या कापून पेपरची चाळणी मुलांच्या हाती देत. १९५७ चे सव्वापाच लाख रेड इंडियन्स पाहता पाहता अमेरिकेने फस्त केले. उद्या आपली तीच गत होणार या विचाराने हे पालक धास्तावतात. दुसऱ्या पिढीतले भारतीय तिथे कितीही समरस झाले तरी त्यांना हे आपले वाटतच नाहीत. तहत-हेची मानहानी होते. जागा भाड्याने द्यायचे नाकारतात. त्यांच्या मोटेल्समध्ये रात्रीपुरता निवारादेखील न देणे, भरती, बढती करताना पक्षपात करणे हे नित्याचेच. सामान्यपणे तिथे क्यू कोणी मोडत नाही. पण क्यू मधला भारतीय जणू कोणीच नाही असे समजून खुशाल पुढे जातात. अमेरिकेला ‘मेल्टिंग पॉट’ म्हणा हवे तर पण त्या लोकांच्या नजरेत ‘हे कशाला इथे आले ?’ हा भाव अवचटांना दिसतोच.
तिथे राहून निष्ठा कुठे ठेवायची, अमेरिकेवर की भारतावर ? असा प्रश्न अवचट उपस्थित करतात. तिथल्या भारतीयांनी भारताचे भले चिंतणे आपल्यास आवडते पण भारतातल्या मुसलमानांनी पाकिस्तानच्या टीमला उत्तेजन देणे खपत नाही. हा एक मुद्दा आणि दुसरा असा की, निग्रोंनी आफ्रिकेला चालते व्हावे असे म्हणणारे के के के चे कार्यकर्ते आणि मुसलमानांना पाकिस्तानला किंवा अरबस्तानला चालते व्हा म्हणणारे जातीयवादी यांची तुलना करून जगातले जातीयवादी सगळीकडे सारखेच. असे भाष्य अवचट करतात. ज्यूंना जेरुशलेमकडे, कॅथलिकांना रोमकडे आणि मुसलमानांना मक्केकडे पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. धार्मिक केंद्र म्हणून. तो नाकारणारा धर्मद्वेष आहे. पण धर्मनिष्ठा राष्ट्रनिष्ठेपेक्षा वरचढ आहे हे नाकारणे जातीयवादी कसे? राष्ट्रवादी आणि के के के सारखेच कसे? गरज होती तेहा जबरीने गुलाम बनवून अमेरिकनांनी निग्रो आणले तसे भारतीयांनी मुसलमान इथे आणले की काय? त्यांना भारताबाहेर जागा नाही हे – एखादा मेमन पाकिस्तानात जाऊ शकतो म्हणून – त्यांनी विसरू नये, असे म्हणणे म्हणजे के के के टाईपचा जातीयवाद आहे का डॉ. अवचट?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.