पत्रव्यवहार

प्रा. दि.य. देशपांडे यांस, स.न.
आपले दि. ३ मार्चचे पत्र पोचले. त्यापूर्वीच एक आठवडा आजचा सुधारकच्या जास्तीच्या प्रती मिळाल्या होत्या व मी त्या काही निवडक मंडळींना माझ्या पत्रासह पाठविल्याही होत्या. सोबत त्या पत्राची प्रत आपणास माहितीसाठी पाठवीत आहे. त्यांपैकी दोघांचा (नरेन तांबे व ललिता गंडभीर) वर्गणी पाठवीत असल्याबद्दल फोन आला. (एकाचे ‘माझा आजकाल अशा लेखनाचा समाजावर काही परिणाम होऊ शकतो यावरचा विश्वास उडाला आहे’ असेही नकारात्मक पत्र आले.) आणखीही काही जणांकडून वार्षिक वर्गणी निश्चितच येईल असे वाटते. मध्यंतरी काही कामामुळे ‘बृहन्महाराष्ट्रवृत्तासाठी अर्धवट लिहून ठेवलेला मजकूर पूर्ण करून पाठविणे जमले नाही, ते या महिन्यात पूर्ण करीन.
मी येथे Marquette University मध्ये गणित विषयाचा प्राध्यापक आहे. गेली पंचवीस वर्षे अमेरिकेत याच विद्यापीठात आहे. भारतास दर दोन ते तीन वर्षांत एकदा येत असतो. (गेल्या वर्षी आलो तेव्हा योगायोगानेच आपल्या मासिकाचा अंक पहायला मिळाला होता.) भारतात सामाजिक कार्य करणाऱ्या प्रकल्पांना भेटणे व जमेल तेवढा सहभाग ठेवणे करीत असतो. बाबा आमट्यांच्याकडे १९८६ साली गेलो तेव्हा आपले सहकारी दिवाकर मोहनी यांच्याशी भेट व चर्चा झाली होती, ते कदाचित त्यांना आठवत असावे- अगर नसावेही. त्यांचा ‘हिंदु असणे म्हणजे काय’ हा ‘सुधारक’मधला लेख व त्यावरील चर्चेस उत्तर आवडले होते हे त्यांना अवश्य कळवावे.
इकडे राहणाऱ्या मंडळींना मी वार्षिक वर्गणी १० डॉलर हवाई मार्गे असे कळविले आहे. मी आपणाशी पत्रव्यवहार केला तेव्हा हवाई आणि समुद्रमार्गे टपालखर्चात फार फरक नसल्याचे आठवते. तेव्हा मी आपली १० डॉ. वर्गणी हवाई मार्गेच असणार असे गृहीत धरले आहे.
कळावे. 1035 W. Rivewier Drive, Glenale W153209, USA
आपला,
मधुकर देशपांडे

श्री देशपांडे ह्यांनी आपल्या मित्रांना पाठविलेल्या पत्राची प्रत.
सप्रेम नमस्कार,सोबत आपणास “आजचा सुधारक” या मासिकाची एक नमुना प्रत संपादकातर्फे पाठवीत आहे.
मी गेल्या वर्षी भारतास गेलो होतो त्यावेळी हे मासिक माझ्या पाहण्यात आले. मला ते विशेष आवडले. मी लगेच त्याचा वर्गणीदार झालो (सर्व मागील अंकांसह) व संपादकांना कळविले की या मासिकाविषयीचा माझा अनुकूल अभिप्राय अमेरिकेतील निवडक मित्रमंडळींपर्यंत नमुना प्रतीसह पोचवायला आवडेल. संपादकांनी माझे अर्थातच स्वागत केले. आणि हवाई टपालाने वार्षिक वर्गणी १० डॉ. (संस्थांसाठी १५ डॉ.) हा आकडा मला त्यांनी कळविला. माझ्या मते एवढ्या अल्प किंमतीत हे उत्तम वैचारिक व दर्जेदार मासिक मिळत आहे त्याचा आपण फायदा घ्यावा. मराठीत चांगल्या नियतकालिकांची वाण असल्यामुळे अशा मासिकांस पुरेसे ग्राहक मिळवून देऊन स्थैर्य प्राप्त करून द्यावे व पर्यायाने मराठीची थोडीबहुत सेवा करावी ह्या (दुय्यम) हेतूनेही वर्गणीदार व्हावयास हरकत नाही. १०० वर्षापूर्वी सुरू केलेल्या ‘सुधारक’चा आदर्श समोर ठेवून, समाजसुधारणेचे काम चालू ठेवण्यासाठी (‘ज्याची आजच्या समाजाला किमान आगरकरांच्या काळायेवढीच गरज आहे’ या भूमिकेतून) हे मासिक सुरू केले असे मनोगत पहिल्याच अंकात (एप्रिल १९९०) संपादक दि.य. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. ही भूमिका ‘आजचा सुधारक ने गेली तीन वर्षे इमानेइतबारे सांभाळली आहे. Bertrand Russel च्या Marriage and Morals या पुस्तकाचा क्रमशः अनुवाद, भगवद्गीतेवर व विवेकवादावर (rationalism) लेखमाला, निरीश्वरवाद, हिंदुत्व, सावरकर, ऐहिकता (secularism), ग्रामीण महिलांच्या लैंगिक व मानसिक समस्या, कै. वा. म. जोशी यांच्या लेखनावर आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर एकेक विशेषांक, आंबेडकर, र.धों.. कर्वे, पं. रमाबाई, आदींबद्दल लेख, असे या मासिकाचे रूप मला माहितीपूर्ण व मौलिक वाटले. प्रा. दि.यं. चे लेख या मासिकात असतातच, याखेरीज स.रा. गाडगीळ, गो.पु. देशपांडे, मा. गो. वैद्य, प्र.ब. कुलकर्णी, मे. पुं. रेगे, आ. ह. साळुखे, वसंत पळशीकर, शेषराव मोरे, नी.र. व-हाडपांडे, भा.ल. भोळे, यदुनाथ थत्ते, आदींचे लेख ही मला एक बौद्धिक मेजवानी वाटली. वाचकांचा पत्रव्यवहार हा काहीसा काथ्याकूटात्मक वाटला, पण त्यातही काही मौलिक चर्चेत नावाजलेली मंडळी (सुनीता देशपांडे, श्रीराम लागू, वसंत कानेटकर, य.दि. फडके, दुर्गा भागवत, देवदत्त दाभोळकर, इ.) अहमहमिकेने भाग घेतात. आजचा सुधारकच्या वाचनाने माझे मराठी चांगलेच सुधारले. बऱ्याच आधुनिक संकल्पनांना मराठी प्रतिशब्द माहीत नव्हते व ज्यांवर विचार बहुतेक परदेशस्थ मराठी माणसांप्रमाणे मला इंग्रजीतच व्यक्त करता येतो, असे प्रतिशब्द या मासिकात मला मिळाले, ते मूळ इंग्रजी शब्दांहून आवडायला लागले व मराठीत विचार (व्यक्त) करण्याची माझी क्षमता उंचावली हा मला माझा उल्लेखनीय फायदा वाटतो.
आपणासही माझ्याप्रमाणे अशा मासिकात रस असावा या कल्पनेने मी ही शिफारस करीत आहे. अधिक माहिती हवी असल्यास, अथवा आणखी एखादा अंक पहायला हवा असल्यास मला अवश्य दूरध्वनी करावा, Xerox प्रत पाठवेन. मासिकात वर्गणीदारांसाठी पत्र्यवहाराचा पत्ता आहेच. रस नसल्यास, मजजवळ मोजक्याच नमुना प्रती (अवघ्या आठ) असल्यामुळे, अंक कृपया परत पाठवावा. मी आणखी एखाद्यास वानगीदाखल पाठवू शकेन. धन्यवाद.
क.लो.अ., ही वि.
आपला,
मधुकर देशपांडे

संपादक,
आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
मला दि.य. देशपांडे आणि दिवाकर मोहनी ह्यांच्याबद्दल आदर वाटतो. पूर्वीच्या काळी पश्चिम महाराष्ट्रात न.र. फाटक, पु.ग. सहस्रबुद्धे, दिवाकर, कर्वे, इ. विद्वान बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करीत. आमचेकडील आजचे विद्वान पैशासाठी अथवा मानमरातबासाठी तडजोड करितात. त्याबद्दल खेदही होतो. असो.
मोहनींनी त्यांच्या “डोक्यात गोंधळ उडाला आहे” असे म्हणावे याचे आश्चर्य वाटते. ते खरे वाटत नाही. वास्तविक हिंदू कोड बिल पास झाले तेव्हा कितीतरी पटीने विद्वान असलेले लोक घटनासमितीत होते. त्यांपैकी एकानेही हिंदू धर्म म्हणजे हिंदू ‘रिलिजन नव्हे असा आक्षेप घेतलेला नाही.
‘हिंदू’ ची व्याख्यासुद्धा who is not a Muslim, Christian, Parsi or Jew by religion अशी आहे. तेव्हासुद्धा कोणीही आक्षेप घेतला नाही. आजही कोणतेही न्यायालय धर्म-धम्म-रिलिजन ह्यांचे विभिन्न अर्थ आहेत असा निवाडा देणार नाहीत. कोणताही शब्दकोश धर्माचा अर्थ रिलिजनशिवाय इतर देणार नाही मग अर्थासंबंधी एवढा आटापिटा कशाला?
वास्तविक सिंधू नदीच्या खोऱ्यातील रहिवाशांना इ.स. पूर्व ५०० च्या सुमारास ‘हिंदू’ असे नामाभिधान मिळाले. तोच अर्थ आज मान्य केला तर त्या अर्थाने फक्त पाकिस्तानातील प्रजाजन हिंदू ठरतात. तेव्हा ह्या जगात जगावयाचे असेल तर शब्दांचे वापरातील प्रचलित अर्थच लक्षात घ्यावे लागतात.
‘संपुष्ट’ म्हणजे छोटी डबी – प्रचलित अर्थ संपूर्ण नष्ट होणे. ‘शिष्ट माणूस’ म्हणजे चांगला माणूस; प्रचलित अर्थ गर्विष्ठ माणूस. एखाद्याचा ‘मामा’ केला किंवा ‘मोरू’ केला असे म्हटले तर ती व्यक्ती ‘मामा-मोरू ह्या शब्दांचे मूळ अर्थ लक्षात घेत बसणार नाही. तेव्हा नेहमी शब्दांचे प्रचलित अर्थ लक्षात घेऊनच व्यवहार सांभाळावे लागतात.
अलिकडेच ‘धर्म’ शब्दाचे विवरण चालू झाले आहे. आर्य हे मूळ भारतीयच होते असा शोध लावला जाऊ लागला आहे. ह्या सर्व राजकीय डावपेचाच्या दृष्टिकोणातून करण्यात येणाऱ्या हालचाली आहेत.
भारतीय, तत्त्वज्ञानात प्रसिद्ध असणाऱ्या सहा दर्शनांपैकी कणादाचे वैशेषिक. गौतमाचे न्याय आणि कपिलाचे सांख्य ही दर्शने ईश्वरकल्पना नाकारतात. हिंदू धर्माचे कोणतेही शंकराचार्य ह्या तीन दर्शनांचा पुरस्कार करीत नाहीत. .
भाषा हे संपर्काचे साधन आहे. प्रचलित अर्थानेच कोणताही शब्दप्रयोग केला तरच विचार आरसपानी (क्रिस्टल क्लिअर) ठरतात आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचतात.
– २ –
हिंदू धर्मीयांना असे वाटते की फक्त हिंदू धर्मच इतका व्यापक आहे की तो धर्माच्या व्याख्येत बसू शकत नाही. आपल्या वाचकांसाठी विश्वकोशामधील माहिती खाली देत आहे.
विश्वकोश खंड ८, पान १७ “निसर्गातील अत्यंत पवित्र, संपूर्ण मानवी भवितव्याशी संबध जीवन व विश्व अथवा निसर्ग यांची नियंत्रक अशा अलौकिक शक्तीवर (किंवा अशा शक्तींवर) माणसाची श्रद्धा असते.. त्या शक्तीचा स्वतःशी अनुकूल, पवित्र व घनिष्ठ संबंध स्थापित करणारी वैयक्तिक अथवा स्वाभाविक मनःप्रवृत्ती आणि त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म अथवा रिलिजन होय.’
“रिलिजन अथवा धर्माच्या एकूण पन्नास व्याख्या आहेत. त्या सर्व अपुऱ्या आहेत.”
सेक्युलरिझम म्हणजे काय ?
विश्वकोश खंड ८, पान ३१ :: “ऐहिक जीवनाची व्यवस्था लावताना धर्मकल्पना अप्रस्तुत मानणे. त्याऐवजी शास्त्रीय ज्ञान, मानवी मूल्ये आणि विवेकनिष्ठा ह्यांचे साहाय्य घेणे म्हणजे धर्मनिरपेक्षता (secularism) होय.”
सेक्युलॅरिझमचा अर्थ सर्वधर्म समभाव असा विश्वकोशात दिलेला नाही. कळावे.
आपला,
केशवराव जोशी

संपादक आजचा सधारक यांस
श्री. वसंत पळशीकर यांनी मार्च ९३ च्या अंकात डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या संदर्भातील संपादकीयावर घेतलेल्या आक्षेपांबाबत प्रतिक्रिया.
श्री वसंत पळशीकर यांनी संपादकीयावरून व्यक्त केलेल्या विचारांवर बरेच ठिसूळ आक्षेप घेतले आहेत व आक्षेप घेतानाही बऱ्याच गफलती केल्याचे जाणवते !
श्री. पळशीकर यांच्या प्रतिपादनाप्रमाणे ईश्वर आहे हे वादाकरिता गृहीत धरले तर मोठीच पंचाईत होते. मग प्रश्न उपस्थित होतो की ईश्वराचा निर्माता कोण? त्या निर्मात्याचा निर्माता कोण? आणि हे मारुतीचे शेपूट कधीच संपत नाही!
श्री. पळशीकर यांचे म्हणणे असे दिसते की श्रबळू माणूस विवेकी असू शकतो. हे विधान सर्वस्वी चुकीचे आहे. चुकीचे कसे आहे ते पाहू. श्रद्धा शब्दाची व्याख्या (१) जिचे अस्तित्व फक्त कल्पनेतच आहे अशा गोष्टीच्या अस्तित्वावरील दृढ विश्वास किंवा (२) एखाद्या प्रत्यक्ष क्रियेच्या काल्पनिक परिणामावरील दृढ विश्वास. उदाहरण अ.नं. १ चे ईश्वर अ.नं. २ चे – प्रत्यक्ष क्रिया भाद्रपदातील भरणी श्राद्ध. काल्पनिक परिणाम पितरांना स्वर्गप्राप्ती. म्हणजे श्रद्धा ही मुळातच आंधळी आहे. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना अस्तित्व आहे असे समजणाऱ्या श्रद्धाळू व्यक्तीला विवेकी व्यक्ती म्हणता येणार नाही.
श्री. पळशीकर हे श्रद्धा व विश्वास हे समानार्थी शब्द आहेत असे मानतात. हे चुकीचे आहे. श्रद्धा बसण्यासाठी प्रत्यक्षात अस्तित्वाची गरज नसते. विश्वास बसण्यासाठी प्रत्यक्षात अस्तित्वाची गरज असते. अविश्वास बसण्यासाठी प्रत्यक्षात गरज असते. डॉक्टरावर श्रद्धा आहे हा चुकीचा वाक्प्रयोग होईल. डॉक्टर प्रत्यक्षात असतो. रोग्याला तो औषध देतो. गुण आल्यास विश्वास बसतो. गुण न आल्यास अविश्वास बसतो. श्री. पळशीकर यांनी माणसाच्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे असा चुकीचा वाक्प्रयोग केला आहे. माणूस प्रत्यक्षात असतो, त्याच्या चांगुलपणाचा प्रत्यक्ष अनुभव असतो. म्हणून माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. हा वाक्प्रयोगच उचित ठरतो. श्री. पळशीकरांनी श्रद्धा व विश्वास हे समानार्थी शब्द आहेत असे गृहीत धरल्याने वरील गफलत झालेली दिसते.
श्री. फळशीकर म्हणतात “माणसे अश्रद्ध व धर्मविरहित बनविणे हे आजचा सुधारकचे उद्दिष्ट नसावे. विवेकनिष्ठा रुजविणे हे उद्दिष्ट असावे”. वरील विधान हे लाडू बशीतही राहिला पाहिजे व पोटातही गेला पाहिजे या विधानासारखे आहे.
श्री. पळशीकर यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्मसंस्था, धर्मप्रवर्तक, ऋषिमुनि, साधुसंत यांच्यावर लोकांना श्रद्धाळू’ बनविण्याचा सरसकट आरोप करायला नको. पण वस्तुस्थिती अशी आहे की या सर्वांनी लोकांना विवेकी बनविण्याऐवजी ‘श्रद्धाळू बनवून थोतांडांचे उपासक बनविले. म्हणून वरील आरोप चुकीचा नाही. म्हणून लोकांना अश्रद्ध म्हणजेच विवेकी बनवून त्यांची अडाणी समजुतींपासून मुक्तता केली पाहिजे.
ईश्वर आहे असे मानणाऱ्या व्यक्ती ईश्वर अजन्मा आणि अमर आहे असे मानतात आणि वर उल्लेख केलेला मारुतीच्या शेपटीचा प्रश्न निकालात काढतात. जर अस्तित्वात नसलेला ईश्वर अजन्मा व अमर असू शकतो तर प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले शाश्वत भौतिक विश्व हे अनिर्मित किंवा अनुत्पन्न व अविनाशी असण्यात कोणता वांधा आहे? doet ‘uncreatedness and indestructibility of matter E21 dalifah सिद्धांताप्रमाणे ज्या घटकांचे (matter) अनिर्मित आणि अविनाशी असल्याने भौतिक विश्व हे सुद्धा अनिर्मित आणि अविनाशी आहे. सतत परिवर्तन हा सृष्टिनियम असल्याने तो विश्वाच्या घटकांनाही लागू पडतो. त्यामुळे घटकांचे परिवर्तन होत असते. ते कधीच नाश पावत नाहीत. त्यामुळे भौतिक विश्व हे भूतकाळात सदासर्वकाळ अस्तित्वात होते. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे कधीही झालेले नाही असा निष्कर्ष निघतो. आज आहे त्या स्वरूपात ते अस्तित्वात आहे. भविष्यकाळातही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात असेल. त्याचा विनाश होणार नाही असा निष्कर्ष निघतो. याचाच अर्थ भौतिक विश्व शाश्वत म्हणजेच सत्य आहे; मिथ्या नाही.
म्हणून माणसांना अश्रद्ध व धर्मविरहित बनविल्याखेरीज ती विवेकी होणार नाहीत व पूर्वसूरींच्या शिकवणुकीमुळे श्रद्धाळू बनून थोतांडांच्या मागे धावत राहणार.
भौतिक विश्व हे अनिर्मित किंवा अनुत्पन्न व अविनाशी असल्याने त्याचे कारण, कार्य व परिणाम या तिन्ही गोष्टी त्याच्यातच सामावलेल्या आहेत व ते स्वनियंत्रित असल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी कोणत्याही विश्वबाह्य शक्तीची गरज नाही. तशी. विश्वबाह्य शक्ती अस्तित्वात असणे शक्य नाही.
जाता जाता
(१) श्री. पळशीकर स्वतःच्या मुद्द्याचा पाठपुरावा करतात तेव्हा We are seven या कवितेची आठवण होते.
(२) श्री. पळशीकरांना उत्तर देताना संपादकांनी केलेला ‘या अर्थाने गांधीजींची अहिंसेवरील निष्ठा ही श्रद्धाच होती हा वाक्प्रयोग खटकतो. गांधीजींचा अहिंसेवर विश्वास होता किंवा निष्ठा होती हा प्रयोग युक्त वाटतो. अहिंसा हे काल्पनिक मूल्य नाही. तसे ते असते तर श्रद्धा शब्द योग्य ठरला असता.

हितसंबंधीयांना मार्क्सवादापेक्षा प्रबोधनाची अधिक भीती वाटते !
प्रस्थापित हितसंबंधी लोक रशियातील कम्युनिझमचा पराभव म्हणजे मार्क्सवादाची इतिश्री, म्हणजेच भांडवलशाहीचा विजय अशी समीकरणे मांडीत असले तरी ती चुकीची आहेत. श्री. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या म्हणण्याप्रमाणे रशियात स्टॅलिन छाप कम्युनिझमचा अंत झाला आहे. परंतु समाजवादाचा विचार (म्हणजेच मार्क्सवाद) टिकून राहणार आहे. वरवर पाहता मार्क्सवादाची आज थोडीशी पीछेहाट झाल्याचे दिसत असले तरी, या परिस्थितीला भांडवलदारांपेक्षा मार्क्सवादीच जास्त जबाबदार आहेत. नुसते कामगार वर्गाचे आर्थिक लढे लढवून, त्यांच्या पदरात आर्थिक लाभ टाकून भारतात मार्क्सवाद कधीच यशस्वी होणार नाही. या आर्थिक लाभाचा उपयोग भारतातील कामगार वर्ग बहुतांश देव, धर्म, कुळाचार, कुळदैवते, नवस-सायास, व्रतवैकल्ये, त्यांची सांगता, तीर्थक्षेत्रांच्या यात्रा असल्याच बाबींवर खर्च करतो. कारण कामगार नेत्यांनी त्या वर्गाच्या प्रबोधनाकडे सर्वस्वी दुर्लक्ष केलेले असते ! कामगार वर्गाचे सर्व क्षेत्रांतील प्रबोधन ही मार्क्सवादाच्या यशाची पूर्व-अट होऊ शकते. परंतु ही पूर्व-अट हा ‘शॉर्टकट’ नसल्याने डावलली जाते !
भारतातील वृत्तपत्रसृष्टी बहुतांश भांडवलदारांच्या हातात असल्याने तिला लोकशिक्षणाचे व प्रबोधनाचे वावडे असल्यास आश्चर्य वाटायला नको. भांडवलदारी वृत्तपत्रसृष्टी उघडपणे किंवा प्रच्छन्नपणे, लोकांची अडाणी धार्मिकता, अंधश्रद्धा, इत्यादींना खतपाणी घालीत असते. काही वर्षापूर्वी ठाण्याचे टिल्लू दांपत्य व त्यांचा १४/१५ वर्षांचा मुलगा असे तिघेजण बहुधा संकष्ट चतुर्थीला अष्टविनायकांपैकी खोपोली जवळच्या महडच्या गणपतिदर्शनास गेले होते. दर्शन घेऊन परतताना, १०, १५ मिनिटांत घर गाठण्याच्या परिस्थितीत असताना, ठाण्याजवळ त्यांच्या मोटर सायकलला एका टॅकरने ठोस दिली व अपघातात तिघेही जागीच ठार झाले. दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या वर्तमानपत्रात, टँकरची मोटर सायकलला ठोस. तीन जण जागीच ठार अशा प्रकारच्या मथळ्याखाली हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु एकाही वृत्तपत्राने ‘विघ्नहर्ता विघ्न-निवारण करू शकला नाही अशा अर्थाचा मथळा त्या वृत्ताला दिला नाही. अशा प्रकारच्या वृत्तपत्रसृष्टीकडून लोकांच्या प्रबोधनाची आशा कोण बाळगील?
प्रस्थापित धर्म स्थापन झाले त्या काळी विज्ञानाची वाढ अत्यंत तुटपुंजी होती. मनुष्याला पुरेशी प्रगल्भता आली नव्हती. धर्मसंस्थापकही भ्रामक समजुतींपासून मुक्त नव्हते. द्रष्टे तर नव्हतेच नव्हते. कारण मानव विज्ञानात प्रचंड प्रगती करील हे त्यांना कळलेच नव्हते. त्याकाळच्या परिस्थितीत प्रजोत्पादन करा असा अडाणी आदेश देऊन ठेवला. संयमाने मर्यादित प्रजोत्पादन करा असा आदेश धर्मसंस्थापकांनी दिलेला नाही. सर्वच धर्म अडाणीपणाच्या शिकवणुकीने ओतप्रोत भरले आहेत असा निष्कर्ष धार्मिक म्हणवणाऱ्या व्यक्तींचा अडाणीपणा पाहून काढता येतो. धार्मिकतेने पछाडलेल्या मनुष्याचे प्रबोधन करणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु प्रबोधन हे अवघड कार्य असले तरी सोडता येणार नाही. कारण कालबाह्य झालेल्या धर्मसंस्थेपासून मानवाला फक्त प्रबोधनच मुक्त करू शकते. अशा प्रकारे प्रबोधन झाल्यास हितसंबंधी शोषक वर्गाला शोषित वर्गाचे शोषण करणे अशक्य होईल या भीतीने प्रस्थापित हितसंबंधीयांचा प्रबोधनाला विरोध व अडाणी धार्मिकतेला पुरस्कार असतो. भांडवलशाहीच्या बाल्यावस्थेत भांडवलशाहीने लोकांची अडाणी धार्मिकतेपासून सुटका करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु प्रौढ भांडवलशाही समाजवादाच्या भयाने त्रस्त व ग्रस्त आहे. समाजवाद थोपविण्याचा जालिम उपाय म्हणून लोकांची अडाणी धार्मिकता जोपासण्याचे व परिणामी त्यांचे प्रबोधन न होऊ देण्याचे प्रयत्न तिने कसोशीने चालू ठेवले आहेत. परंतु लोकांचे सर्व क्षेत्रातील प्रबोधन सतत चालू ठेवल्यास कालबाह्य झालेल्या धार्मिकतेचा लोक अटळपणे त्याग करीत जाणे अपरिहार्य आहे. म्हणून समाजवादाची यशस्विता लोकांच्या सर्व क्षेत्रातील प्रबोधनावर अवलंबून आहे. म्हणून हितसंबंधीयांना प्रबोधनाची जास्त भीती वाटते.
ग. य. धारप

जळगाव ३-४-९३
……..निसर्गात काय केव्हा घडेल हे सांगता येत नसल्याने त्याला लहरी म्हटले जाते. त्याचप्रमाणे निसर्गाची कृती म्हणजे मानवीय नसल्याने तिच्यामागे हेतू असू शकत नाही म्हणून ती निर्हेतुक असे समजण्यात काही चूक नाही. पण श्री. वसंत पळशीकर म्हणतात त्याप्रमाणे या निसर्गकृतींच्या मागे काही शक्ती असल्याने तिची ही लीला असते असेही शक्ती योजनाबद्ध व सहेतुक कार्य करते, असे गृहीत धरून, केवळ अनुमान वा तर्क म्हणून मांडणे एकदम चूक म्हणता येणार नाही. पण ही शक्ती निसर्गबाह्य असते असे मानण्याला काहीही आधार नाही. विश्वाला विश्वाहून वेगळा असा निर्माता आहे, याला प्रमाण नसल्याने, विश्व स्वयंभू आहे, हे मानणे जर चूक नसेल तर निसर्गही स्वयंभू मानल्यावर निसर्गच ती शक्ति बनून जातो असे मानायला हरकत नसावी. मात्र, शक्ती ही योजनाबद्ध व सहेतुक कार्य करू शकते असे सिद्ध होईपर्यंत वरील अनुमान, अनुमानच रहायला हवे; त्याचे प्रमेयात रूपांतर करता कामा नये.
हिंगोली
य.ज. महाबळ

मा. दि.य. देशपांडे
सादर नमस्कार
आमच्या संस्थेला एक स्वातंत्र्यसैनिक अनंत नथोपंत साठे यांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून, विवेकवादाचा प्रचार व अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी पत्रकारिता वा साहित्य निर्मिती याद्वारे प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस एक पारितोषिक आम्ही सुरू केले आहे. हा पुरस्कार ‘सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ या नावाने देण्यात येईल. पुरस्कार अडीच हजार रुपयांचा आहे. सोबत सन्मानपत्र असेल. पुरस्कार द्वैवार्षिक आहे. पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे. यासाठी साप्ताहिक सकाळचे संपादक सदा डुंबरे, सुप्रसिद्ध साहित्यिक अनिल अवचट व मी अशा तिघांच्या समितीने एकमताने आपली निवड केली आहे, हे कळवताना आनंद होतो. कृपया आपण होकार तारेने कळावा ही विनंती.
पुरस्कारवितरण ता. १८ ते २२ जूनच्या दरम्यान पुणे येथे होईल. नक्की तारीख लवकरच कळवितो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.