बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये

पत्र पहिले

भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत. माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपणे करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते. मी हे का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतोः

‘विश्वाचा गाडा आपोआप आपल्या नियमानुसार चाललेला आहे, त्याच्यामागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही.’
‘स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूत आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही.’
वरील दोन्ही विधाने बुद्धिवादी मंडळी अनेकदा करतात. मी श्रद्धाळू वगैरे नसलो तरी मला ही विधाने पटत नाहीत. का पटत नाहीत ते सांगतो.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘जडवाद’ या पुस्तकाचा संदर्भ मी घेत आहे. पृष्ठ ३२ वर त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, अचेतन व अजीव द्रव्यातून जाणीवयुक्त सचेतन पिंड निर्माण होतो. द्रव्यात प्रथम जीव निर्माण होतो आणि नंतर जाणीव निर्माण होते. पृष्ठ ६३ वर ते म्हणतात की, ‘विश्वाच्या गतिस्थितीला परमात्म्याची गरज नाही. कारण प्राण्याच्या व मनुष्याच्या देहात पृथक् चैतन्य वस्तू आहे याला कोणतेच प्रमाण उपलब्ध होत नाही. या चैतन्य वस्तूवरूनच विश्वचैतन्याची उत्पत्ती होते.’ (उत्पत्तीऐवजी ‘कल्पना उत्पन्न वाचावे असे शुद्धिपत्रात म्हटले आहे)

अणूंच्या गर्भात चेतना तर असतेच म्हणून त्यांना अचेतन म्हणता येत नाही. अणू अजीव, जाणीवविरहित असतात इतके खरे. सृष्टीच्या नियमानुसार अणूंचे मॉलीक्यूल बनतात व हे मॉलीक्यूल विशिष्ट तऱ्हेने एकत्र जमले की तिथे तत्पूर्वी नसलेला जीव निर्माण होतो. शास्त्रीबुवांचे प्रतिपादन असे आहे की, जीवसृष्टीची पुढची पायरी म्हणजे चेतनसृष्टी. चेतन म्हणजे जिच्या ठिकाणी बुद्धी किंवा जाणीव आहे अशी सृष्टी. (जाणीव हा शब्द महत्त्वाचा आहे.) जीव व नंतर जाणीव निर्माण होण्याची क्रिया सृष्टिनियमानुसार आपोआप होते असे त्यांचे म्हणणे आहे. हा त्यांचा युक्तिवाद आपण पुढे नेऊ.

गर्भाशयात असलेली एक सजीव पेशी दुसऱ्या एका पेशीशी संयोग पावते व मग तिचे विभाजन सुरू होते. एकाचे दोन, दोनाचे चार असे होता होता लाखो पेशी – सर्व अगदी एकसारख्या – जमून एक पुंज तयार होतो. या पुंजात जीव आहे पण जाणीव नाही असे समजायचे.
लवकरच मग असा एक क्षण येतो की त्या क्षणी त्या पुंजातली कुठली तरी एक पेशी ठरवते की मी डोळा हे इंद्रिय बनवणार. हे तिला आपोआपच निसर्गनियमानुसार समजते! मग ती पेशी दुभंगते व तिचा दोन अर्धुके – दोन्ही एकसारखीच – होतात त्यांतल्या एका अर्धकाला कळते की आपल्याला डावा डोळा व्हायचे आहे. मग त्या पुंजात कशी कोण जाणे, पण एक मध्यरेषा ठरवण्यात येते व त्या रेषेच्या डावीकडे एक अर्धक सरकू लागते व उजवीकडे दुसरे अर्धक सरकू लागते. हेसुद्धा आपोआप होत असते! त्या दोन अर्धकांना हे ठाऊक असते की त्या काल्पनिक मध्यरेषेपासून किती दूर जाऊन थांबायचे. त्याप्रमाणे ती थांबतात. यामुळे चेहऱ्यावरची सीमेट्री साधणार आहे हे त्यांना ठाऊक असते – आपोआपच ठाऊक असते. कारण तिथे जाणीव नाही!

मूत्रपिंडे, कान, फुफ्फुसे, वृषण, हात, पाय हे सगळे जोडीजोडीचे अवयव बनवणाऱ्या पेशी याप्रमाणेच आपल्या कार्याला प्रारंभ करतात. या सर्वांना डावी बाजू कोणती व उजवी बाजू कोणती याचे भान असते आणि त्याबरोबरच सीमेट्रीचेही भान असते. हे भान त्यांना आपोआप येते. जाणिवेचा इथे काही संबंध नाही! सृष्टिनियमानुसार ही सर्व मांडणी आपोआप होते. प्रत्येक अवयवाच्या पेशीच्या अर्धकांचा एकमेकांत काहीही संपर्क नसता त्यांना सीमेट्रिकल मांडणी कशा तऱ्हेने होईल हे आपोआप समजत असते! कसलीही जाणीव नसताना हे आपोआप समजते!

एक ‘डोळा’ नावाचे इंद्रिय. त्याच्या घडणीसाठी शेकडो प्रकारच्या पेशी लाखांनी बनवायच्या; त्या योग्य जागी बसवायच्या, सप्तरंगांच्या तरंगांची लांबी ओळखू शकणारे शंकू व शलाका लाखावारी बनवून त्यांची व्यवस्थित मांडणी रेटिनावर करायची. ही कामे करण्यासाठी लागणारे आराखडे डोळा बनू पाहणाऱ्या पेशीच्या जीन्समध्ये आलेले असतात. संपूर्ण मनुष्यदेह बनवण्यासाठी लागणारे अब्जावधी आराखडे गर्भाशयातल्या फलित पेशीच्या क्रोमोझोम्सवर असतात, पण त्यांतून डोळ्यांसाठी आवश्यक तेवढेच आराखडे वेगळे करून डोळा-पेशीमध्ये घालण्याचे ज्ञान किंवा जाणीव कुठे वावरत असते? डावा डोळा व उजवा डोळा यांची रचना एकसारखीच असते पण मांडणी आरशातल्या प्रतिबिंबासारखी असते. ही अशी मांडणी करण्याचे भान नेमके कुठे असते? सीमेट्री राखण्याची जाणीव कोण सांभाळते? या सगळ्या अॅब्स्ट्रॅक्ट कल्पना जर जीन्स सांभाळत असतील तर त्यांच्यात ‘जाणीव नाही’ हे कसे म्हणता येईल? जाणीव काय किंवा स्मृती काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गर्भस्थ पेशीपुंजात या दोन्ही गोष्टी नाहीत, सर्व काही आपोआप होते, या म्हणण्याचा अर्थ तरी काय?

‘आपोआप सर्व काही घडते’ हे उत्तर जोतिषी लोकांच्या सोयीचे आहे. शनीची पीडा कशामुळे होते? तर ती आपोआप सृष्टीच्या नियमानुसार होते, असे उत्तर ते देतील तर तेही आता मान्य करावे लागेल!

सजीव पिंडाची वाढ पूर्ण होत आली की तिथे जाणीव आपोआपच निर्माण होते, असे शास्त्रीबुवा म्हणतात. पण पृष्ठ ५६ वर त्यांनी दुसरा सिद्धान्त सांगितला आहे तो असा की, संपूर्ण अभावातून सत् वस्तू उद्भवत नाही. एक सत् वस्तू दुसऱ्या कोणत्या तरी सत् वस्तूचीच बनलेली असते.

असे जर आहे तर मूळच्या मॉलीक्यूलमध्ये जीव नव्हता, तो नंतर निर्माण झाला, किंवा मूळच्या पेशीपुंजात जाणीव नव्हती, ती नंतर निर्माण झाली, हे म्हणताना तो जीव किंवा जाणीव कोणत्या सत् वस्तूतून निर्माण झाली हे नेमकेपणाने सांगायला हवे. जिवाचा आणि जाणिवेचा मूलस्रोत कोणता? या सत् वस्तू ‘आपोआप सृष्टिनियमानुसार निर्माण होतात’ हे या प्रश्नाचे उत्तर नव्हे. एका पेशीपासून प्रारंभ करून संपूर्ण मनुष्यदेह बनवण्याच्या प्रक्रियेत जाणीव या चिजेचा काहीही संबंध नाही, सर्व काही आपोआप होते हे म्हणणे म्हणजे एकतऱ्हेचा सांप्रदायिक आग्रह आहे असे म्हणण्यावाचून पर्याय नाही.

माझे म्हणणे असे की, प्रत्येक वेळी अशी न पटणारी उत्तरे देत बसण्यापेक्षा, एकदाच हे मान्य करावे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता असून तिचा अंश सजीवात असतो. या सत्तेला मी ईश्वर, आत्मा वगैरे कसलेच नाव देत नाही. निसर्गातलाच तो एक घटक आहे, बस्स एवढेच!

दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जाणीव आहे तिथे स्मृतीही आहेच. म्हणून स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदू, हे अव्याप्तीचा दोष असलेले विधान ठरते असे माझे म्हणणे आहे.

पत्र दुसरे

आपले पत्र २५/७ चे पोचले. बौद्धिक चर्चा करण्याचा जो एक आनंद असतो तो या पत्राद्वारे मिळाला. तुमचा दृष्टिकोण समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला. मला तो खरोखरीच समजला आहे की नाही याबद्दल मी जरा साशंकच आहे. म्हणून तुमचे म्हणणे मला जे व जसे कळले ते काय ते तुमच्याच पत्रातील वाक्यांचा आधार घेऊन मांडतो.

तुमचे वाक्य :- माझे उत्तर असे आहे की, ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय शक्ती’. हे उत्तर प्रथमदर्शनी जरी सयुक्तिक वाटले तरी ते वस्तुतः कसलाही सुसंगत विचार व्यक्त करीत नाही. मागच्या पानावरील वाक्य :- ‘खरी गोष्ट अशी आहे की कारणाच्या नियमानुसार कारण-कार्याची परंपरा अनादि आहे असेच मानावे लागते.’

आता यावरून विवेकवादी माणसाची बाजू कशी समजायची? मी समजतो ती बाजू अशी :- सृष्टीचे अस्तित्व आणि तिचा व्यापार यामागे कोणतेही ‘कारण’ असे नाही. सृष्टी स्वयंभू आहे आणि तिचा व्यापार प्रेरणेशिवाय चालू आहे. हे मला समजले ते बरोबर आहे का, ते तुम्हीच सांगितलेले बरे.

आणखी पुढचे एक वाक्य :- “कारण त्या तथाकथित अज्ञेय शक्तीचे कसलेही निश्चित स्वरूप कोणी सांगू शकत नाही. काही तरी आहे, पण काय आहे ते माहीत नाही असे म्हणणे खरोखर आत्मवंचना करणे होय”.

आजच्या घटकेला तरी गुरुत्वाकर्षण आणि विद्युत् या दोन गोष्टींना वरील वर्णन तंतोतंत बसते. परंतु त्या शक्ती विवेकवादी मान्य करतो. का? तर त्या गोष्टींची बिनचूक प्रतीती येते. तथाकथित अज्ञेय शक्तीची तशी प्रतीती त्याला येत नसल्यामुळे तो तिचे अस्तित्व मान्य करीत नाही. बरोबर आहे?

सजीव सृष्टीचा अभ्यास करणाऱ्याला ती प्रतीति येते. माझ्या पुस्तकांत मी शेवटच्या दोन पानांवर जे काय म्हटले आहे ते वाचून तुमचे काय मत होते ते मला जरूर कळवा.

‘सृष्टीच्या व्यापारामागे अज्ञेय शक्ती आहे’ हे वाक्य अज्ञान कबूल करते. अज्ञेय, अज्ञात म्हणजे अज्ञानच नव्हे का? याउलट, ‘सृष्टीच्या व्यापारामागे कसलीही शक्ती नाही’ हे वाक्य असे दर्शवते की सांगणाऱ्याला काहीतरी पक्के ज्ञान झाले आहे, व त्यामुळे तो एवढ्या खात्रीने बोलत आहे. ही त्याची खात्री ढासळू शकेल, जर तो प्रांजळपणे सजीवाचा अभ्यास करील तर! असो.

ज्याला शरण जावे असा ईश्वर तुम्ही मानीत नाही आणि मीही मानीत नाही. आपला वाद केवळ ॲकॅडेमिक स्वरुपाचा आहे. ‘ईश्वर (आदिकारण) आपोआप उत्पन्न झाला, त्याच्यामागे कारण नाही,’ असे म्हणणाऱ्यांना तुमचे उत्तर हे की तो जर आपोआपच उत्पन्न झाला असेल तर जगही आपोआपच उत्पन्न झाले असे का म्हणू नये? ठीक आहे. मी मग आणखी खाली उतरतो. पृथ्वीसुद्धा आपोआपच उत्पन्न झाली असेल, जीव आपोआपच निर्माण झाला असेल, प्रजोत्पत्तिसुद्धा आपोआपच होत असेल! कारणे शोधायची गरजच काय? आदिकारणाचा जन्म कसा झाला हे जर सांगता येत नाही तर मेरीला ख्रिस्त कसा झाला त्याची उठाठेव कशाला?

कुठल्याही तत्त्वज्ञानात First Principles असतात ते मी तुम्हाला सांगायला नको. ती मुकाट्याने स्वीकारायची असतात. अधिकार (authority) याचीही स्थिती तशीच आहे. कुठेतरी थांबावे लागतेच. लोकसभा सर्वशक्तिमान, पण तिला हवे तसे कायदे करण्याचा अधिकार नाही असे सर्वोच्च न्यायालय सांगणार. पण ते सांगण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला? जनतेने दिला असे समजू. पण तसा अधिकार देण्याचा अधिकार जनतेला कोणी दिला? इथे थांबावे लागते. पण, “शेवटी तरी थांबायचेच ना? मग आम्ही आम्हाला हवे तिथे थांबू” असे म्हणता येईल का? अज्ञात, अज्ञेय असे काही असू शकेल हे मान्य करण्यास विवेकवाद्यांना कमीपणा वाटतो, म्हणून ‘तसले काही नाहीच’ असे म्हणून ते आपल्या चौकस बुद्धीला गप्प करतात, असे माझे म्हणणे आहे.

मा. श्री. रिसबूड
२, वासवी, २१०१ सदाशिव पेठ, विजयानगर कॉलनी, पुणे-३०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.