चर्चा

श्री. मा. श्री. रिसबूड यांना उत्तर
स.न.

आपले दि. १५-७ चे पत्र आणि आपले पुस्तक ‘फलज्योतिष’ दोन्ही मिळाली. त्याबद्दल आभारी आहे.

आधी आपल्या पत्राला उत्तर देतो, मग आपल्या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये’ या परिशिष्टाविषयी लिहितो.

प्रथम विवेकवाद्याच्या तोंडी आपण जो युक्तिवाद घातला आहे त्यात थोडी दुरुस्ती सुचवितो. आपण म्हणता की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ति हा आजच्या घटकेला तरी दुर्भेद्य स्तर आहे.’ यावर माझे म्हणणे पुढीलप्रमाणे आहे असे आपण म्हणता. ‘त्या दुर्भेद्य स्तरापर्यंत जायचेच कशाला? थोडे आधीच थांबावे, म्हणजे सृष्टीला आदिकारण नसून हे सर्व आपोआप चालले आहे असे मानावे.’ आणि असे म्हणण्यात बुद्धिवादी लोक ‘स्वतःच्या बुद्धीशी प्रतारणा करतात असे आपल्याला वाटते.

परंतु माझ्या तोंडी आपण जे उत्तर घातले आहे ते माझे उत्तर नव्हे. माझे उत्तर असे आहे की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ती’ हे म्हणणे सर्वथा निरुपयोगी, पूर्णपणे व्यर्थ आहे. कारण एकतर आदिकारणाची कल्पना वदतोव्याघातयुक्त आहे. कशाचेही कारण आपण शोधतो कारण ‘प्रत्येक गोष्टीला कारण असते’ हा सिद्धांत आपण मान्य करतो. परंतु एखादे कारण आदिकारण आहे असे म्हणण्याचा अर्थ त्याला कारण नाही, आणि हे म्हणणे त्या आधारभूत सिद्धांताला अपवाद आहे असे सुचविणे होय. पण जर प्रत्येक गोष्टीला कारण असते हा सिद्धांत निरपवाद नसेल, आणि एखादे कारण – समजा परमेश्वर – त्याला अपवाद असेल, तर सबंध विश्वच तो अपवाद का असू शकत नाही? ह्या प्रश्नाला उत्तर नाही. परमेश्वर आदिकारण आहे याचा अर्थ तो अनादि आहे; पण जर परमेश्वर अनादि असू शकत असेल तर जग अनादि का असू शकत नाही हे सांगणे कठीण आहे.

हे एक झाले. दुसरे असे की जगाला सृष्टी म्हणणे म्हणजे ते सृष्ट आहे, निर्मिलेले आहे ही गोष्ट गृहीत धरणे होय. तसे केल्यावर सृष्टीला स्रष्टा असतो ह्या स्वयंसिद्ध नियमाचा हवाला देऊन तो स्रष्टा परमेश्वर आहे असे म्हणणे शक्य होते. परंतु हे विश्व सृष्ट आहे काय हाच येथे प्रश्न असल्यामुळे ते गृहीत धरता येत नाही.

तिसरे असे की सृष्टीचे आदिकारण एक अज्ञेय शक्ती आहे असे म्हणण्याने कोणत्या प्रश्नाचा उलगडा झाला हे सांगणे कठीण आहे. आदिकारण जर अज्ञेय शक्ती असेल तर ते आहे हे आपल्याला कसे कळले? बरे हे आदिकारण एक शक्ती आहे असे म्हणताना ‘शक्ती’ शब्दाने आपल्याला काय अर्थ अभिप्रेत असतो? ही शक्ती वारा, पाणी किंवा वीज यासारखी अचेतन शक्ती आपल्याला अभिप्रेत नसावी. आपल्याला अभिप्रेत शक्ती म्हणजे एखादी चेतन, बुद्धिमान शक्ती. अशी शक्ती काय असेल यासंबंधी वितर्क पुष्कळ झाले आहेत, परंतु त्यापैकी एकानेही त्या शक्तीचे स्वरूप, कार्यपद्धती इत्यादीविषयी कसलीही स्पष्ट कल्पना येत नाही. त्यामुळे हे जग अशा शक्तीने (परमेश्वराने) निर्माण केले आहे असे म्हणणे आणि हे जग कसे निर्माण झाले, किंवा ते निर्माण झाले की नाही, यासंबंधी आपण पूर्ण अज्ञ आहोत असे म्हणणे – या दोन उत्तरांत काय फरक आहे? दुसऱ्या उत्तरात निदान आपले अज्ञान कबूल करण्याचा प्रांजळपणा आहे; पण पहिल्यात कृतक समाधान व आत्मवंचना आहे.

इथे विवेकवादी नेमके काय म्हणतो ते नीट लक्षात घेतले पाहिजे. ‘सृष्टीच्या व्यापारामागे कसलीही शक्ती नाही’ असे तो म्हणत नाही. तो म्हणतो ते एवढेच की सृष्टीच्या व्यापारामागे कसलीही शक्ती आढळून येत नाही. आपल्याला अज्ञात अशी एखादी शक्ती असेलही कदाचित. पण ती आहे असे मानायला कसलेही कारण दिसत नाही. ‘परमेश्वर नाही’ असे तो म्हणत नाही; तो एवढेच म्हणतो की परमेश्वराच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा सापडत नसल्यामुळे तो आहे हे मत मला मान्य नाही.

एखादी वस्तू आहे किंवा तिला अस्तित्व आहे हे कसे दाखवायचे हे सांगणे सोपे आहे. पण एखादी वस्तू नाही हे दाखविणे दुरापास्त असते. या विषयाची चर्चा आजचा सुधारक, मार्च । १९९३, पृ. ३६३ वर आली आहे. तिच्याकडे मी आपले लक्ष आकृष्ट करतो.

आता फलज्योतिष या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा पंथ होऊ नये’ या परिशिष्टाकडे वळतो.

या परिशिष्टातील श्री रिसबुडांची भूमिका पत्रातील भूमिकेहून बरीच वेगळी आहे. येथील युक्तिवाद सजीव सृष्टीच्या अवलोकनातून, अभ्यासातून उद्भवलेला आहे. सजीव सृष्टीच्या अवलोकनातून सुचणारा (आणि त्यांच्या मते सिद्ध होणारा) एक निष्कर्ष ते असा मांडतातः ‘जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता आहे, आणि तिचा अंश सजीवात असतो.’ या निष्कर्षाचा साधक पुरावा त्यांनी काय दिला आहे तो आधी पाहू.

कोणत्याही जीवाचा आरंभ मातेच्या गर्भाशयातील एक अंडपेशी आणि पित्याची एक शुक्रपेशी यांच्या संयोगाने होतो, आणि त्यानंतर तिचे विभाजन सुरू होते. एकाचे दोन, दोनाचे चार असे होता होता लाख पेशी जमून त्यांचा पुंज तयार होतो. नंतर आधी एकसारख्या असणाऱ्या पेशींमध्ये विभेदन (differentiation) होते. त्या पुंजातील एक पेशी ठरवते की मी डोळा नावाचे इंद्रिय बनविणार. मग ती पेशी दुभंगते, आणि तिची दोन अर्धुके होतात. त्यांतल्या एकाला कळते की आपल्याला उजवा डोळा व्हायचे आहे, आणि दुसऱ्याला कळते की आपल्याला डावा डोळा व्हायचे आहे. मग त्या पुंजात कशी कोण जाणे, पण एक मध्य रेषा ठरविण्यात येते, आणि त्या रेषेच्या डावीकडे एक अर्धुक सरकू लागते व उजवीकडे दुसरे अर्धुक. मूत्रपिंड, कान, फुफ्फुसे, वृषण, हात, पाय हे सगळे जोडीजोडीचे अवयव बनविणाऱ्या पेशी आपल्या कामाला प्रारंभ करतात, आणि कालांतराने पूर्ण शरीर तयार होते. मग आता श्री रिसबुडांचा प्रश्न असा आहे की हे सर्व व्यवहार, व्यापार त्या पेशी जाणिवेशिवाय करू शकतात, ते सगळे आपोआप घडते, असे मानणे अशक्य आहे. एका पेशीपासून आरंभ करून संपूर्ण मनुष्य देह बनवण्याच्या प्रक्रियेत जाणीव या चिजेचा काही संबंध नाही, सर्व काही सृष्टिनियमानुसार आपोआप घडते हे म्हणणे म्हणजे एक तऱ्हेचा सांप्रदायिक आग्रह आहे. त्यांच्या मते या अभ्यासाचा निष्कर्ष असा आहे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता आहे, आणि तिचा अंश सजीवात असतो.

आता श्री रिसबूड शरीरातील पेशींना जाणीव असते एवढेच म्हणत नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. ते त्या जाणिवेची पातळी किंवा स्तर काय आहे हेही सुचवीत आहेत. ते म्हणतात की पेशी काय करायचे ते ठरवितात; त्यांना आपण काय व्हायचे आहे हे कळते. एखादी कृती करायचे ठरविणे किंवा आपण काय करणार आहोत ह्याची पूर्वकल्पना असणे हे मनोव्यापार घडण्याकरिता प्रगल्भ मन लागते. मनुष्याखेरीज असे मन कोणाही प्राण्यात असण्याची शक्यता नाही. जीवनसोपानात पुष्कळ वरच्या पातळीवर असणाऱ्या कुत्रा या प्राण्यातसुद्धा ठरविणे आणि भविष्याची पूर्वकल्पना असणे हे व्यापार घडताना दिसत नाहीत. पण हे प्रगल्भ व्यापार आपल्या शरीरातील पेशी करू शकतात असे रिसबूड म्हणत आहेत. असे म्हणायला त्यांच्याजवळ काय कारणे आहेत मला माहीत नाही. परंतु मला ही गोष्ट अशक्य वाटते. प्राणिजीवनाच्या इतिहासात प्राण्यांना मेंदू प्राप्त झाला आणि त्यात असंख्य सुधारणा होत होत मनुष्याच्या मेंदूला त्याचे वर्तमान रूप प्राप्त झाले. असा मेंदू आणि त्याला सहायक मज्जासंस्था असल्याशिवाय मनुष्य ज्या मानस कृती करतो त्या अन्य जीव करू शकतील हे असंभवनीय वाटते.

पण समजा रिसबुडांना ज्या स्तराची जाणीव पेशींना असते असे वाटते ती नसेल. पण पेशी जिवंत असतात एवढे तरी खरे आहे ना? आणि जिवंत असणे म्हणजे निदान अन्नग्रहण, विसर्जन आणि प्रजनन या क्रिया करू शकणे. म्हणजे त्याकरिता आवश्यक असणारी जाणीव तरी त्यांना असेल की नाही? तशी तेवढी जाणीव पेशींना असणे हे आपण मान्य करू या. ते मानल्याने पेशींचे बह्वीभवन, विभेदीभवन इत्यादि व्यापार पेशी करतात असा कर्तरिप्रयोग जे सुचवितो ते शक्य वाटत नाही. ज्याप्रमाणे अचेतन निसर्गातील क्रिया यांत्रिकपणे घडतात त्याचप्रमाणे पेशींचेही व्यवहार होतात असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही. नाही तर वाऱ्याचे वाहणे, पावसाची वृष्टी, ग्रहांची प्रदक्षिणा आणि उंचावरून वस्तूंचे पडणे याही क्रिया जाणिवेसह ठरवून घडतात असे म्हणावे लागेल. पर्वतावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याचे कण ज्या वेगाने पडतात, वाटेत अडथळ्यांमुळे ज्यांचा वेग मंदावतो व दिशा बदलून ते पुन्हा पुढे जातात – या सर्व गोष्टी नियमबद्ध असतात. पण म्हणून ते पाणी नियमांचे पालन करते असे म्हणणे चूक ठरेल. नियमांचे पालन करण्याकरिता नियमांचे पूर्वज्ञान अवश्य असते, आणि त्या नियमाप्रमाणे कृती करण्याचे सामर्थ्य असावे लागते. तसेच हा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होतोच असे नाही. जिथे नियमबद्धता (नियमाचे पालन नव्हे) असते तिथे नियमांचे ज्ञान किंवा प्रयत्न यांना स्थान नसते. खरे म्हणजे अशा प्रकारची नियमबद्ध हालचाल बुद्धिहीन तथ्ये, यांत्रिकतेचे लक्षण मानले जाते. जिथे बुद्धी आहे, ज्ञान आहे, हेतुपूर्ण कृती आहे, तिथे हालचाल यांत्रिक नसते. ती क्वचित् विफल होण्याची शक्यता असते.

आता शेवटी श्री रिसबुडांच्या निष्कर्षाकडे येऊ. तो निष्कर्ष असा आहे की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता आहे. त्यांचे म्हणणे आहे की हे उत्तर ‘या गोष्टी सृष्टिनियमानुसार होतात’ या न पटणाऱ्या उत्तरासारखे नाही. निदान ते थोडे जास्त पटणारे आहे असा त्यांचा अभिप्राय आहे. परंतु ते तसे आहे काय?

‘जाणीव एक विश्वव्यापी सत्ता आहे’ या वाक्याचा अर्थ काय आहे? जाणीव विश्वव्यापी आहे म्हणजे काय? जाणीव ही गोष्ट विश्व व्यापणारी गोष्ट आहे काय? गुरुत्वाकर्षण विश्वव्यापी आहे हे कळू शकते, आणि ते तसे आहे याला पुरावेही आहेत. पण सबंध विश्व जाणिवेने व्यापले आहे असे म्हणणे निरर्थक नाही काय? सबंध विश्व जाऊ द्या. एखादी लहानशी खोलीही जाणीव व्यापू शकत नाही. या खोलीत मी एक जाणीव असलेली वस्तू आहे, आणि क्वचित् दिसणारे डासही जाणीवयुक्त आहेत. पण या खोलीचा उरलेला भाग जाणीवरहित आहे. तिच्यात भरून राहिलेली हवा, खोलीतील फर्निचर, पुस्तके इत्यादि वस्तू याही जड, अचेतन, कसलीही संज्ञा नसलेल्या आहेत. खोलीबाहेरचे विश्वही असेच आहे. म्हणजे त्यात काही मोजक्या पदार्थांना जाणीव आहे आणि बाकीचे सबंध विश्व अचेतन, जड पदार्थांनी भरलेले आहे. तेव्हा जाणीव ही विश्वव्यापी गोष्ट आहे हे म्हणणे अनुपपन्न दिसते.

श्री. रिसबूड म्हणतात की जाणीव ही एक विश्वव्यापी सत्ता आहे. ‘सत्ता’ म्हणजे काय? सत्ता म्हणजे सत् + ता, म्हणजे असणे. म्हणजे जाणीव आहे एवढाच अर्थ आहे की आणखी काही, उदा. शक्ती, अधिकार हाही अर्थ अभिप्रेत आहे. जगात ठिकठिकाणी जाणीव असलेले पदार्थ आहेत हे खरे आहे; पण जाणिवेला सत्ता म्हणायचे प्रयोजन काय?

जाणीव ही गोष्ट स्वतंत्रपणे राहू शकणारी गोष्ट नाही. तिला कोणत्यातरी शरीराची गरज असते. अशी शरीरे विश्वात फारच थोड्या ठिकाणी, कदाचित् फक्त आपल्या पृथ्वीवरच आहेत. म्हणजे हा विश्वाचा चिमुकला कोपरा सोडून दिला तर सबंध विश्व जाणीवरहित आहे. अशा स्थितीत जाणीव विश्वव्यापी सत्ता आहे अशा प्रकारची निरर्थक गोष्ट आपण मान्य करून टाकावी असे रिसबूड म्हणतात. पण तसे करणे म्हणजे बुद्धीची रजा घेणे होय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.