पत्रव्यवहार

श्री. प्र. ब. कुळकर्णी यांसी
स.न.वि.वि.
ऑगस्ट १९९३ (आजचा सुधारक) च्या अंकात ‘रक्तपहाट’ ह्या पुस्तकावरील आपले परीक्षण वाचले. ह्यांतील काही उद्धरणे खालीलप्रमाणे आहेत:
तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरू वेगळ्या त-हेने (रीतीने) तत्त्वभ्रान्त होते. धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरविण्यासाठी विचारात घेतला नाही. लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विरोध का करावा ? त्यांचा पाकिस्तानच्या संबंधातला तत्त्वभ्रान्तपणा या रीतीने पुन्हा एकदा प्रकट झाला. तात्पर्य राजकारण्यांच्या सत्तालोभाने आणि वार्धक्यातील टुबळेपणाने त्यांनी जो उतावळेपणा केला तो केला नसता तर हिंदुमुसलमान प्रजेची प्राणहानि टळली असती.’
अवतरणातील मजकूर तळवलकरांचा आहे. तात्पर्य आपले आहे. दोघांतील निष्कर्ष खालीलप्रमाणे निघू शकतो. लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल व्हावी असा विचार फाळणीच्या वेळेला निघाला होता. त्याला पं. नेहरूंनी विरोध केला.
या विषयाचा एक अभ्यासक म्हणून मला ही दोन्ही विधाने असत्य वाटतात. फाळणीबाबत निर्णय घेण्याच्या वेळी येवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची अदलाबदल होईल ही कल्पनाच तेव्हा नव्हती. काही लोक दोन्हीकडून जातील. पण हे स्वेच्छेने होईल असेच तेव्हा वाटले होते. संपूर्ण लोकसंख्येचे (गैरमुसलमान) पाकिस्तानातून उच्चाटन होईल ही कल्पनाच तेव्हा आली नाही. आणि इतिहास असे सांगतो की जेव्हा पाकिस्तानातून हा लोंढा भारतीय पंजाबात आला त्यानंतरच भारतीय पंजाबातून मुसलमानांची जबरदस्तीने हकालपट्टी शिखांनी केली. फाळणीच्या वेळेला असे होईल असे वाटले असते तर अशी फाळणी झालीच नसती. आणि स्थलांतर पाकिस्तान आणि पंजाब ह्यांपुरतेच सीमित राहिले. भारतातील संपूर्ण मुसलमानी प्रजेने पाकिस्तानात जावे असा सूर केव्हाच निघाला नाही. तेव्हा पं. नेहरूंच्या विरोधाचा प्रश्नच कसा निर्माण होतो हे समजले नाही.
दुसरे असे की चार कोटी मुसलमान भारतातून घालवावयाचे म्हणजे आजच्या पाकिस्तानात त्यांचा समावेश कसा झाला असता ? अर्थातच ह्या परिस्थितीत भारताला आपला आणखी काही भाग द्यावा लागला असता.
मी शेजवलकरांचे पुस्तक निवडक लेखसंग्रह वाचले नाही. परंतु महात्माजींच्या राजकारणामुळे….. पाकिस्तान देण्यात आला हे खरे नाही. पाकिस्तान दिले गेले नाही ते घेतले गेले. त्या गोष्टीला भारतातील कोणाही मान्यवर व्यक्तीची संमती नव्हती. इंग्रजांकडून जी सत्ता आपण घेतली त्या सत्तान्तराचाच तो एक भाग होता. दोन्ही (काँग्रेस व मुस्लिम लीग) पक्षांनी मान्य केलेली ती तडजोड होती. असे कोणी विचारील की काँग्रेसने हे मान्य का केले? याचे कारण सामोपचाराने सत्तांतरण करण्याचा तो एकमेव मार्ग होता. आणि तेव्हा मी, मी म्हणणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ पुढाऱ्यांनीसुद्धा पंजाब व बंगालची फाळणी मान्य केली होती. (श्री. एन्. सी. चॅटर्जी व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे तर नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये होते.) त्यांची मागणी होती की पाकिस्तान झाले तर पंजाब व बंगालची फाळणी व्हावी.
आज फाळणीला जवळजवळ ४७ वर्षे होत आहेत. पण आजही काश्मीरमध्ये पाकिस्तानची हिंसक चळवळ सुरू आहे. इस्राइलचा राजदूत म्हणतो की ‘काश्मीर जरी पाकिस्तानला दिले तरी त्याची भूक शमणार नाही.’ म्हणजे आणखी काही तरी खुसपट निवेलच.
माझे व्यक्तिगत मत असे आहे की फाळणीमुळे जास्त नुकसान मुसलमान समाजाचे झाले आहे. त्यांची एकी आता पाकिस्तान, भारत व बांगला देशात विभागली गेली. भारताच्या लोकसंख्येचा चौथाई भाग मुसलमान होता. परंतु पाकिस्तानला फक्त British India तील बहुसंख्य मुसलमान वस्तीचा भाग मिळाला. देशी संस्थाने सर्व (भावलपूर सोडून) भारतात आली. त्यांचा कोणताही भाग पाकिस्तानला मिळाला नाही. व बांगलादेशच्या स्वातंत्र्यामुळे भारतीय मुसलमानांचे तथाकथित राष्ट्रीयत्वही प्रश्नचिन्हांकित झाले आहे.
आपल्या लेखात राजकारण्यांच्या सत्तालोभाने व वार्धक्याने दुबळेपणामुळे हिंदुमुसलमान प्रजेची प्राणहानी झाली असे म्हटले आहे. अर्थात आपला रोख पं. नेहरूंवर दिसतो. परंतु सामोपचाराने जर सत्तांतर व्हावयाचे होते तर ह्याशिवाय दुसरा कोणता मार्ग होता? कोणीतरी तेव्हा असा सूर काढला काय की हे सर्व चूक होते?
In retrospect I feel that the partition of India was a blessing in disguise! It enabled the emergence of the present Bharat by the integra tion of Indian States. Otherwise with the muslim leadership how could we have achieved this in the way we did ? And the price demanded by Jinah for joining the Congress was beyond the capacity of any Indian today.
Today or tomorrow thc Pakistani Muslims will realise what they have lost both politically, cconomically and culturally. Politically they are devided, economically they are conlined to a very small part of India, and culturally Agra, Aligarh and Ajmer are not in Pakistan.
Therefore some time there is still a possibility of a United India. I am prepared for a discussion with you on your remarks on Pandit Nehru il you give me an opportunity.
With regards
Yours sincerely सिव्हिल लाइन्स,
रा. कृ. पाटील नागपूर, – ४४०००१

श्री. मोहनी यांना स.न.वि.वि.
आजचा सुधारक (ऑगस्ट १९९३) च्या अंकात आपण मांडलेली ‘विषमतेची समस्या’ वाचली. आजच्या काळातील एक मोठी व खरी समस्या आपण मांडली त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना ही समस्या जाणवत होती पण नेटकेपणाने मांडता येत नव्हती. आपण ती तशी मांडली हे फार चांगले केले. आपण सुचविलेले तीनही उपाय एकदम मान्य होण्यासारखे नाहीत. कारण आपली गतानुगतिकता. दुसऱ्या उपायामुळे तर वादळच उठेल. परंतु हे उपाय विचारार्ह तर निश्चितच आहेत. यांतूनच नवी सामाजिक मूल्ये निर्माण होतील असे वाटते. ती जितक्या लवकर स्थिर होतील तितक्या लवकर आपला समाज स्वतःला सावरू शकेल. नवीन विषय समर्थपणे मांडल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. कळावे.
आपला
न. ब. पाटील अ३७ कमलपुष्प वान्द्रे रिक्लमेशन, मुंबई – ५०

स.न.वि.वि.
सुधारक चे गेल्या तीनही वर्षांचे खंड माझ्या हाती आल्यानंतर मी त्यातला ‘सेक्युलरिझम’ वरचा संपूर्ण पत्रव्यवहार सलगपणे वाचून काढला.
एका बाजूला भोळे-पळशीकर-मोहनी व दुसऱ्या बाजूला स.ह.दे. व स. रा. गाडगीळ असा हा वाद मुख्यतः झाला.
शेवटचे पत्र स. रा. गाडगीळांचे, नोव्हें/डिसें. ९२ अंकातले. (त्यानंतर ६ डिसेंबरला बाबरी ढाचा पडला, आणि नवे पर्व सुरू झाले.) 10 एप्रिल ९१ ते डिसेंबर ९२ ह्या काळात झालेल्या वादातून इत्यर्थ काय निघाला ? माझ्या अल्पमतीप्रमाणे मी काढलेला निष्कर्ष असा :
धर्मनिरपेक्षता म्हणजे-धर्मवेड्या हिंदू समाजाविरुद्ध मुक्तपणाने मतप्रदर्शन करणे, पण धर्मवेड्या मुस्लिम समाजाविरुद्ध एक अक्षरही न उच्चारणे म्हणजेच खरी धर्मनिरपेक्षता होय.
आज तरी बहुसंख्य हिंदू आणि हिंदू नसलेल्या विचारवंतांना हीच व्याख्या मान्य आहे.
कळावे. पुणे – ३०
आपला
मा. श्री. रिसबूड
(मुस्लिम समाजाच्या प्रबोधनात आम्ही कमी पडत आहोत हे खरेच आहे. ते आम्हास कसकसे करता येईल ह्याविषयी वाचकांनी आपल्या विधायक सूचना पाठवाव्या; त्याचप्रमाणे त्या दिशेने ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा वृत्तान्त पाठवावा ही विनंती. – संपादक )

प्रा. दि. य. देशपांडे
यांस स.न.वि.वि.
दि. ३१ जुलै च्या ‘साधना’च्या अंकात आपल्या दि. १४ जुलैच्या व्याख्यानाचे वृत्त वाचले, दोन दिवसांपूर्वी. त्यात शेवटी खालील वाक्ये आहेत.
“सर्व धर्म-समभाव जर प्रामाणिक असेल तर त्याच्या पुढची अपरिहार्य पायरी सर्वधर्मत्याग हीच असू शकते. सर्वधर्मसमभाव याचा अर्थ कोणताही धर्म पूर्णपणे खरा नाही अशी खात्री. ही एकदा झाली की सर्व धर्मांचा त्याग अपरिहार्य ठरतो.”
हे तर्कशास्र अचंबित करणारे आहे. वृत्तात काही चूक. असू शकेल किंवा बोलण्याच्या भरात काही विधाने निसटली असतील. (म्हणून ‘साधना’ला न लिहिता ‘आजचा सुधारक’ साठी लिहिले.) एरवी आपली मांडणी व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी आहे एवढेच नाही तर ज्या तर्कशास्त्रावर व तात्त्विक विचारावर आपल्या सर्व मांडणीची भिस्त असते त्यांच्या दृष्टीने ही चूक आहे.
कळावे ही विनंती.
आपला ४३, गुरुकृपा कॉलनी, गोडोली,
देवदत्त दाभोलकर सातारा- ४१५००१

प्रा. देवदत्त दाभोलकर यांस उत्तर
प्रा. देवदत्त दाभोलकर यांस स.न.
आपण म्हणता तसा माझ्या युक्तिवादातील निष्कर्ष अनुपपन्न वाटतो हे खरे आहे. परंतु माझ्या भाषणाचे साधना साप्ताहिकात आलेले वृत्त संक्षिप्त आहे. माझ्या भाषणात या मुयाचे थोडे अधिक स्पष्टीकरण आले होते. ते स्पष्टीकरण असे.
सर्व धर्म सारखेच आहेत अशी खात्री होणे म्हणजे कोणताही धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा वरीय किंवा कनीय नाही असा निश्चय होणे. म्हणजे कोणताही धर्म अन्य कोणत्याही धर्मापेक्षा अधिक स्वीकरणीय आहे असे मानता न येणे. याचा अर्थ असा होतो की कोणत्याही धर्माच्या वैशिष्ट्यांची (कारण कोणत्याही धर्माची वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे सारे, त्याची) साधक प्रमाणे निर्णायक नाहीत. पण हे लक्षात येणे म्हणजे कोणत्याही धर्माच्या कोणत्याही अंगाचे निर्णायक समर्थन देता येत नाही हे मान्य करणे. आणि हे एकदा मान्य केले की आपण एकही धर्म स्वीकारण्याचे कारण नाही हे ही लक्षात येण्यास वेळ लागत नाही. म्हणजेच सर्व धर्माचा त्याग अपरिहार्य होतो.
आपला
दि. य. देशपांडे

संपादक, आजचा सुधारक यांस स.न.
…..ज्याचा सार्थ अभिमान बाळगता यावा असे, सातत्याने वैचारिक साहित्य पुरविणारे, काळजीपूर्वक विषय निवडून व्यक्तिगत पातळीवर न उतरता वादविवाद घडवून आणणारे, चटावरचे श्राद्ध न उरकता मोजक्याच पुस्तकांचा परिचय करून देणारे, थोडक्यात, समाजभवितव्याची आस्था असणारे एकही नियतकालिक महाराष्ट्रात असू नये ही शरमेची बाब आहे.
एका बाजूला दूरदर्शनचा असह्य मारा, थिल्लर साहित्याचा प्रचंड खप आणि दुसऱ्या बाजूला वैचारिक साहित्य निर्मिणारे आणि वाचणारे यांची नगण्य संख्या हे दृश्य चिंताजनक आहे.
सात कोटी (किंवा जवळपास) लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात एखाद्या चांगल्या नियतकालिकाला ५० हजार वर्गणीदार वा आश्रयदाते मिळू नयेत हा समाजाचा करंटेपणा की अशा प्रकारचे साहित्य वाचणाऱ्यांची व प्रसवणाऱ्यांची संख्या नगण्य असणे ही मानवी समाजाची अपरिहार्य शोकांतिका ? किमान शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर्स, एंजिनियर्स, वकील, पत्रकार, उद्योजक यांच्याकडून तरी अपेक्षा करावयाला हरकत नसावी ना?
पदरचा पैसा, वेळ खर्चुन, प्रसंगी मनस्ताप सोसून एकांड्या शिलेदाराप्रमाणे अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे आणि जी आजही अस्तित्वात आहे. तरीसुद्धा त्यांच्या कार्याचे वृक्ष फोफावताना का दिसू नयेत ?
सारी नीतिमूल्ये गुंडाळून ठेवून पैशांच्या पाठीमागे धावत सुटलेला समाज, फोफावलेला अतिरेकी चंगळवाद, मोकाट सुटलेल्या समाजविघातक वृत्ती, आणि ज्यांच्याकडून समाजभवितव्याच्या चिंतेची अपेक्षा आहे तेही (किरकोळ अपवाद वगळता) अगतिक होऊन प्रवाहाबरोबर वाहत आहेत की असहाय्यपणाच्या नावाखाली वाहत्या गंगेत धुऊन घेत आहेत ?
या पार्शवभूमीवर आजचा सुधारकचा जन्म व कार्य महत्त्वाचे आहे. आपल्याला ह्या कार्यात सुयश लाभो हीच इच्छा ! कळावे.
आपला नम्र टिळकनगर,
प्रमोद वासुदेव नाईक डोंबिवली (पूर्व) मुंबई

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.