खुळा प्रश्न

सगळ्या विश्वात बातमी पसरली की प्रश्नांची उत्तरं देणारं एक यंत्र निघालं आहे. यंत्र कुणी घडवलं, कसं घडवलं, काही माहीत नाही. यंत्राबद्दलची माहिती विश्वातल्या सर्व सुजाण जीवांना कशी कळली हेही माहीत नाही. फक्त येवढंच कळलं, की कोणताही योग्य आणि नेमका प्रश्न विचारा, आणि प्रश्नोत्तरयंत्र तुम्हाला उत्तर देईल. सोबत पत्ताही होता.

तरुण सेवकानं वृद्ध शास्त्रज्ञाला रॉकेटच्या खुर्चीत बसवलं. म्हणाला, “चला. प्रश्नोत्तर यंत्राकडे नेतो तुम्हाला. काय विचारायचं ते ठरवलं असेलंच, ना ?” शास्त्रज्ञ म्हणाला, “ हो तर ! दोनच प्रश्न, जीवन म्हणजे काय ? मृत्यू म्हणजे काय ? बस्स !”

लिक आणि त्याचे मित्र जांभळं द्रव्य गोळा करून कंटाळले होते. मोठ्या ताऱ्यांजवळ जांभळं द्रव्य नेहमीच विरळ असायचं; का ते कुणालाच माहीत नव्हतं. लिक आणि त्याचे जातवाले जांभळं द्रव्य गोळा करून त्याची एक मोठी रास बनवत होते. यानं काय होणार, तेही कुणालाच माहीत नव्हतं. लिक म्हणाला, “मी चाललो आता प्रश्नोत्तर यंत्राकडे”. लिक म्हणाला, “काय विचारणार ? जांभळ्या द्रव्याबद्दल ?” “इतर आहेच काय विचारण्याजोगं ?” लिक उत्तरला.

ते एका जागी अठरा होते. एक जण म्हणाला, “अरे ! आपण अठरा झालो !” एक नवा तिथे आला. आता ते एकोणीस होते. नव्यानं विचारलं, “मी कुठे आलोय ?” त्याला समजावून सांगायला एकानं दूर नेलं. आता ते सतराच उरले.

एक जण अस्वस्थ झाला, “आता मला त्या प्रश्नोत्तर यंत्राकडे जायलाच हवं. ” दुसऱ्यानं विचारलं, “कां ?”

पहिला म्हणाला, “हेच विचारणार अठरा असतात तिथे एकोणिसावा कुठून येतो? इथून तिथे जाताना मधलं अंतर का नाहीसं होतं ? आता हे सुटायलाच हवं हे कोडं.”

लिक एका ताऱ्यावरून दुसऱ्यावर उड्या मारीत अखेर प्रश्नोत्तर यंत्राजवळ पोचला. हातात यंत्र उचलून घेऊन त्यानं ते डोळ्याजवळ आणलं, आणि विचारलं, “तूच ते प्रश्नोत्तरांचं यंत्र ना ?” यंत्रातून होकार आला. लिकनं विचारलं, “मी कोण आहे ? मी काय आहे ?” “तू लिक आहेस. एक अपूर्णत्व”, उत्तर आलं. “मी आणि माझे साथी जांभळं द्रव्य गोळा करून त्याची रास रचतोय. याच्यामागे हेतू कोणता ?” लिकनं पुढचा प्रश्न विचारला. प्रश्नोत्तरयंत्राला खरं उत्तर माहीत होतं. पण ते उत्तर एका मोठ्या प्रश्नाच्या उत्तराच्या एका लहानशा, अविभाज्य भागासारखं होतं. लिकनं विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पूर्ण प्रश्नाकडे निर्देशही नव्हता. यंत्रानं उत्तर दिलं, “प्रश्न अपूर्ण, आणि म्हणून अयोग्य. ” लिकनं वेगवेगळ्या रूपात प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. एकही प्रश्न योग्य नव्हता. लिक कंटाळला. यंत्र तिथेच सोडून तो परत मित्रांकडे गेला.

एक आला. अजस्र भासणाऱ्या यंत्रापुढे उभा झाला. यंत्राला म्हणाला, “आम्ही अठरा असलो की एकोणीस का होतो ?”

एका मोठ्या प्रश्नाच्या लहानशा उप-उत्तराचा हा प्रश्न. यंत्र गप्प बसलं. एकानं पुढे विचारलं, “एका जागेहून आम्ही दुसरीकडे पोचतो. मधल्या अंतरांचं काय होतं ? ती कां नाहीशी होतात ?” प्रश्नोत्तर यंत्राला माहीत होतं, की अंतरंनाहीशी होत नाहीत. पण हे ज्यावर उत्तर म्हणून सांगावं, असा प्रश्नच आलेला नव्हता. यंत्र स्वतःशीच योग्य प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुटपुटू लागलं. एक हताश होऊन निघून गेला.

“चला ! पोचलो योग्य जागी !”, असं म्हणत सेवकानं वृद्ध शास्त्रज्ञाला रॉकेटमधून बाहेर आणलं, आधार देत भिंतीसारख्या पडद्यापुढे नेलं. वाट चालताना सेवक म्हणाला, “आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, की आपण आश्चर्यानं स्तंभित होऊ, नाही ?” “आणि कृतकृत्य !”, शास्त्रज्ञ म्हणाला.

शास्त्रज्ञ अपेक्षेनं तरतरीत झाला. त्यानं विचारलं, “जीवन म्हणजे काय ?” “प्रश्नात एका आंशिक वस्तूचा उल्लेख आहे, म्हणून प्रश्न अयोग्य’, पडद्यावर अक्षरं उमटली. “जीवन हा कोणत्या पूर्णत्वाचा अंश आहे ?” “या संज्ञांच्या रूपात या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही.” “मग तुमच्या संज्ञा वापरून सांगा. “त्या तुम्हाला समजणार नाहीत.’ ” शास्त्रज्ञ विचारात पडला. कोणत्या रूपात ‘योग्य’ प्रश्न विचारायचा ? पण सेवकाच्यानं राहवेना. त्यानं मध्येच विचारलं, “मृत्यू म्हणजे काय ?” पडद्यावर अक्षरंउमटली, “मानवकेंद्री कल्पनांचं स्पष्टीकरण अशक्य”. शास्त्रज्ञाला पुन्हा हुरूप आला. म्हणाला, “चला ! मृत्यू ही मानवकेंद्री कल्पना आहे, हे तरी कळलं !” त्यानं प्रश्न घडवला, “मानवकेंद्री कल्पना असत्य असतात का ?” “कधी असत्य, कधी अपूर्ण’, उत्तर आलं ! “इथे काय आहे, मृत्यूचं ? असत्य की अपूर्ण ?” “दोन्हीही. ”

अनेक निष्फळ प्रयत्नांनंतर शास्त्रज्ञ गप्प झाला. थकून तो जमिनीवर बसला. तरुण सेवक मात्र चडफडत होता. “त्याला सर्व विश्वाचं रहस्य माहीत आहे, आणि आपण नेमका प्रश्नही विचारू शकत नाही !” शास्त्रज्ञ गप्पच बसला. जरा वेळानं क्षीण आवाजात म्हणाला- “असं समज एखाद्या आदिवासीला समजावून सांगायचं आहे, की त्याचा बाण सूर्यापर्यंत का पोचत नाही ते. त्याला गुरूत्वाकर्षण, गतीचे नियम, काहीच माहीत नाही सापेक्षतावाद तर सोडून द्या.

“म्हणजे काय आपण या यंत्रापुढे रानवट, आदिवासीसारखे आहोत ?”, सेवकानं तडकून विचारलं, “त्यानं समजावून सांगावं, जरा तरी !” शास्त्रज्ञाला दिसत होतं, की आपण आणि आदिवासी या दरीपेक्षा यंत्र आणि आपल्यातली दरी मोठी आहे. ते यंत्र समजावून द्यायचा प्रयत्नही करू शकत नव्हतं ! आणि समजावून देणं हे त्याचं कामही नव्हतं. त्याचं काम होतं, योग्य प्रश्नांची उत्तरं द्यायचंच फक्त. शास्त्रज्ञाचे डोळे मिटले. श्वासही बंद पडला. यंत्राला दिसत होतं की हेही उत्तर नव्हे. प्रश्नही नव्हे.

विश्व, जीव, जांभळं द्रव्य, अठरा, मृत्यू, अंतर. एका मोठ्या चित्राचे तुकडे. कण. पूर्ण चित्र समजणाऱ्यानं एकच कण जाणणाऱ्याला कसं सांगायचं, पूर्ण चित्र कसं आहे ते ? त्या चर्चेची भाषा तरी कुणाला समजणार ? यंत्रानं स्वतःला प्रश्न विचारला. उत्तरही दिलं. यंत्र घडवणाऱ्या ज्ञानी लोकांनाही हे सुचलं नव्हतं की – प्रश्न विचारायला सुद्धा जवळजवळ पूर्ण उत्तर आधींच समजलेलं असायला लागतं.

(रॉबर्ट शेकली (Robert Sheckley) या विज्ञानकथा लेखकाच्या “आस्क अ फूलिश क्वेश्चन” या विज्ञानकथेचं हे “स्वैर” रूपांतर. तत्त्वज्ञान, विज्ञान, तार्किक ज्ञान, या संदर्भात हिची अनेक अंगं सूचक आणि विचारप्रवर्तक वाटली, म्हणून हे रूपांतर. नंदा खरे)
१९३, शिवाजीनगर, नागपूर- १०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.