पत्रव्यवहार

मा. संपादक, आजचा सुधारक, नागपूर. स.न.वि.वि.
आजचा सुधारक मध्ये आपण लिहिलेले विवेकवादावरील लेख, माझ्या पत्रांना व इतरही व्यक्तींच्या (उदा. दाभोलकर) प्रतिक्रियांना आपण दिलेली उत्तरे यांमुळे माझे समाधान झाले नाही. म्हणून पुन्हा हा पत्र लिहिण्याचा उपद्व्याप करीत आहे.
१. विवेकवाद्यांच्या मतानुसार “विश्वाचे ज्ञान मिळवण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे.” (आजचा सुधारकनोव्हेंबर १९९०). मी स्वतः विज्ञानाशी संबंधित शाखेचा स्नातक आहे व असा दावा विज्ञानाने वा वैज्ञानिकाने केल्याचे माझ्या तरी वाचनात आले नाही. पत्रलेखकाच्या प्रत्येक विधानास संदर्भ मागणाऱ्या देशपांडेसाहेबांनी कृपया याचा एखादा संदर्भ असेल तर तो उद्धृत करावा.
माझ्या अनुभवानुसार विज्ञान कुठल्याही पद्धतीने मिळालेले ज्ञान त्याज्य मानत नाही. परंतु ते ज्ञान प्रयोग करून पारखून घेतल्याशिवाय विज्ञानाच्या पुस्तकात येणार नाही. तोपर्यंत ते ज्ञान चूक वा खोटे असे विज्ञान म्हणत नाही. विज्ञानाविषयी विज्ञानाचे अभ्यासक काय म्हणतात ? Robert Schules व Eric S. Rabkin हे त्यांच्या Science Fiction या पुस्तकात पृष्ठ १६ वर म्हणतात:
Many people think of the knowledge of Science as somehow better knowledge than the sloppy ramblings of philosophy or the ‘groundless’ knowledge of religion. While it is certainly true that the scientific knowledge may be quite different from other kinds of knowledge, and while scientific knowledge is more usually susceptible to mathematical measurements, one must recognize that science itself is a system of beliefs.”
यावरून वैज्ञानिक ज्ञान येवढा एकमेव प्रकार नाही व इतर प्रकारचे ज्ञान मिळवण्याच्या पद्धती या वैज्ञानिक पद्धतीहून वेगळ्या असणार. अर्थात विश्वातील ज्ञान मिळविण्याची वैज्ञानिक पद्धती हीच एकमेव पद्धती हा विज्ञानाचा दावा (असलाच तर) फोल ठरतो.
आता विवेकवाद्यांचे मुकुटमणी बरट्रॅन्ड रसेल विज्ञानाच्या अभ्यासाविषयी काय म्हणतात. हे पाहू. (दुर्दैवाने मला मूळ इंग्रजी पुस्तक उपलब्ध नसल्याने अनुवादावर अवलंबून रहावे लागते. तरीही हा अनुवाद मला तोंडघशी पाडणार नाही अशी आशा करतो.)
“विज्ञानाच्या अभ्यासकाने नेहमीच नियतिवाद (Determinism) हा कामचलाऊ गृहीततत्त्व आहे असे धरून चालले पाहिजे. परंतु जेथे त्याला कार्यकारणाचे नियम आढळले असतील त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीही तसे नियम असतात असे ठामपणे सांगण्यास तो बांधलेला नाही. तसे केल्यास तो खरोखरच मूर्ख ठरेल. परंतु कार्यकारणाचे नियम लागू न पडणारा असा एखादा विषय आपल्याला माहीत असल्याचे तो ठासून सांगेल तर तो अधिकच मूर्ख ठरेल… मूर्खपणा अशाकरिता की एखाद्या विषयास कार्यकारण सिद्धांत लागत नाही असे म्हटल्यास त्याविषयीचे संशोधन खुंटते… असे परस्परविरोधी आग्रही प्रतिपादन पुढे झाल्यास विज्ञानाने निव्वळ अनुभवावर विसंबून रहावे आणि जे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होईल त्या पलिकडे कोणतीही गोष्ट ठामपणे सांगू नये अथवा त्या गोष्टीचा इन्कार करू नये.”
बड रसेल यांच्या सल्ल्यानुसार काही गोष्टींचा साफ इन्कार न करणारे वैज्ञानिक बहुधा अध्यात्माविषयी फाजील नम्र वा फाजील उदार भूमिका घेणाऱ्या वैज्ञानिकांच्या सदरात श्री. देशपांडे यांच्या मतानुसार बसत असावेत. न्यूटन, कुव्हियन, गॅलिलिओ, डेकार्ट, कोपर्निकस यांनी तर देशपांडेसाहेबांची फारच पंचाईत करून टाकली आहे. अर्थात त्यांचेविषयी देशपांडेसाहेबांची भूमिका रोखठोक ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ अशा प्रकारची असणे स्वाभाविकच आहे.
पण विज्ञानाविषयीच देशपांडेसाहेब तशी भूमिका घेऊ शकतील काय ? कारण विज्ञानानेच आता अतींद्रिय शक्ती वगैरे गोष्टीत लक्ष घालण्यास सुरवात केली आहे व तेही अलीकडे नव्हे तर विवेकवादावर देशपांडे यांची लेखमाला लिहावयास सुरवात होण्यापूर्वी, म्हणजे तब्बल इ.स. १९४७ वा त्याही पूर्वी !
सध्या मी The Reach of Mind हे J. B. Rhine यांचे १९४७ मध्ये प्रकाशित झालेले (William Slone Associates Inc. Publisher) पुस्तक वाचत आहे. हे Dr.J. B. Rhine कुणी भोंदूबुवा किंवा संत महंत नसून ते Duke University मध्ये Psychologist आहेत. त्यांच्याविषयी ओळख अशी आहे.
………is the world’s outstanding authority and scientific pioneer in the field of ESP. Dr. Rhine’s proofs have altered the basic scientific concepts of the world. It is now evident that there is an active factor in man which is not controlled by physical laws governing time, space, mass and number.
Dr. Rhine ESP (Extra-Sensory Perception), parapsychology या विषयावर इतरही चार पुस्तके लिहिली आहेत. डॉ. हाइन आपल्या पुस्तकात असे आश्चर्य व्यक्त करतात, “Science cannot explain what the human mind is … It will be surely a source of amazement to historians in the twenty-first century that man so long delayed to attack with concentrated research the problem of what he is himself.” सुदैवाने भारतीय तत्त्वज्ञांनी यावर फार पूर्वी चिंतन केले होते. फक्त त्यांचे निष्कर्ष डॉ. व्हाईनसारख्यांनी मांडल्यावर कदाचित् देशपांडे साहेब मान्य करतील, परंतु कमीत कमी काही प्रश्न विज्ञानाच्या कक्षेबाहेर आहेत हा दुराग्रह तरी त्यांनी सध्या सोडून द्यावयास हरकत नाही. तसेच Times of India च्या १२ सप्टेंबर १९९३ च्या रविवारीय पुरवणीत View from Outside हा श्री. विठ्ठल नाडकर्णी यांचा लेखही श्री. देशपांडे यांनी वाचून पहावा. त्यात OBTE (out-of-body experience) वर काही केलेले प्रयोग व वैज्ञानिकांची मते दिली आहेत.
साक्षात्कार हासुद्धा ESP चाच एक प्रकार आहे वESP काही विशिष्ट व्यक्तींमध्येच आढळते. तसाच प्रकार साक्षात्काराबाबतही घडत असावा. परंतु विज्ञानाचे मतही श्री. देशपांडे यांचे प्रमाणेच हे “सबझूट” असे असेल तर त्यावर प्रयोग करण्यात वेळेचा अपव्यय ते करणार नाहीत. विज्ञानाच्या क्षेत्रात काय चालू आहे याची कल्पना नसताना विज्ञान काय करू शकते किंवा करू शकत नाही याविषयी ठामपणे मत व्यक्त करणाऱ्या देशपांडेसाहेबांनी याच पत्रांतील बरड रसेलच्या उद्गाराचे भान ठेवावे. सप्टेंबर १९९३ च्या आजच्या सुधारक मधील ताहेर पूनावाला यांच्या लेखातील बोहरी समाजाला सय्यदना सांगेल ती धर्माची आज्ञा असे मानावे लागते तसेच विवेकवादी ज्याला विज्ञान म्हणतील तेच विज्ञान, ते ज्याला अध्यात्म म्हणतील तेच अध्यात्म व ते ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोण म्हणतील तोच वैज्ञानिक दृष्टिकोण अशी विवेकवाद्यांची धारणा असेल तर श्री. रिसबूड यांची ‘विवेकवादाचा पंथ होण्याची भीती अगदी सार्थ वाटते.
यमाई, तंत्रनगर, औरंगाबाद – ४३१ ००५
आपला विश्वासू
श्या. ग. कुलकर्णी

संपादक, ‘आजचा सुधारक’ यांना स.न.वि.वि.
‘समाजातील मुलींची घटती संख्या : कारणमीमांसा व उपाययोजना’ या शीर्षकाचा एक लेख ऑगस्ट १९९३ च्या आजच्या सुधारक मध्ये आलेला आहे. निरनिराळ्या जनगणनांतून दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया कमी पडतात हे स्पष्ट करणारे आकडे त्या लेखात दिलेले आहेत. त्यांवरून दिसते की उत्तरोत्तर स्त्रियांचे प्रमाण एकूण लोकसंख्येत घटत आहे.
मला वाटते हे आकडे एकांगी आहेत. त्यामुळे लेखकद्वयांची कारणमीमांसा चुकीची असणे संभवते. लोकसंख्येत दर हजार पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत ही एक बाजू झाली. दुसरी बाजू पाहिली पाहिजे ती अशी की जननसंख्येत पुरुष आणि स्त्रिया यांचे प्रमाण काय आहे. विज्ञानविषयक एका नियतकालिकात मी असे वाचल्याचे स्मरते की मानवात आणि इतर सस्तन प्राण्यातही स्त्रियांपेक्षा पुरुष अधिक जन्मतात.
निसर्गाचे असे गृहीत कृत्य असावे की टोळी युद्धे ही अपरिहार्य आहेत. आणि त्यांत पुरुषांचा संहार अधिक होणार. त्याची भरपाई करून समतोल साधण्यासाठी पुरुषांची जननसंख्या अधिक असावी. पण आता टोळी युद्धे थांबली आहेत. निसर्गाला आपले चुकलेले गणित सुधारण्यास थोडा अवधी लागतो.
दुसरे असे की पुरुषांची स्वाभाविक रोगप्रतिकारशक्ती स्त्रीच्या मानाने कमी असते. कोणत्याही साथीच्या रोगात स्त्रियाहून पुरुष अधिक मरतात असे दिसून येईल. पण आधुनिक वैद्यकामुळे जे पुरुष निसर्गतः जगण्यास अक्षम असतात ते जगू लागले आहेत.
या दोन कारणांमुळे, म्हणजे युद्धे थांबल्यामुळे आणि वैद्यकात प्रगती झाल्यामुळे लोकसंख्येतील स्त्रीपुरुषांचे प्रमाण विषम झाले आहे.
अनुसूचित जातीत आणि वनवासी समाजात स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या संख्येतील अंतर इतर समाजातील अंतरापेक्षा कमी आहे याचे कारण आधुनिक वैद्यकाच्या सुविधा त्यांना मिळत नाहीत हे असावे. त्यांच्यातील स्त्रीपुरुषाविषयक चालीरीतींचा याच्याशी संबंध नसावा. रोगाला बळी पडण्याचे प्रमाण पुरुषामध्ये जे निसर्गतः अधिक असते त्यात वैद्यकाने अडथळा आणला जाण्याची संधी या समाजात मिळत नाही, हे कारण असावे.
गर्भजलपरीक्षा ही फार अलीकडची गोष्ट आहे. तिची माहितीही फार थोड्या लोकांना आहे. १९८१ च्या आणि त्या आधीच्या जनगणनेच्या आकड्यांवर त्याचा काहीच परिणाम झालेला असणार नाही. मुलींच्या संगोपनाविषयी अनास्था असते असे एक कारण सुचविण्यात आले आहे. ते खरे नसावे. अगदी अलीकडच्या कालापर्यंत श्रमजीवी वर्गात मुलीच्या बापाला वर पित्याकडून हुंडा मिळत असे. मुली असणे हे भाग्याचे समजले जाई. मुलगी देण्याच्या अटीवर तरुण मुले भावी सासऱ्याच्या घरी दोन तीन वर्षे गडी म्हणून काम करीत. बहुजन समाजात मुलीच्या संगोपनाची उपेक्षा करावी अशी परिस्थितीच नव्हती.
म्हणून मला वाटते की समाजाला आज स्त्रियांची संख्या पुरुषांच्याहून कमी आहे. याचे कारण स्त्रिया अधिक मरतात हे नसून निसर्गतःच अधिक जन्मणाऱ्या पुरुषांचे मृत्यू युद्धे थांबवून आणि आधुनिक वैद्यकाच्या साहाय्याने आपण कमी केले आहेत हे आहे. जी परिस्थिती आहे ती भयानक आहे; गुन्हेगारीला उत्तेजन देणारी आहे हे खरे, तिच्यावर उपाययोजना काय करावयाची हे मला माहीत नाही. तरीही कारणमीमांसेत चूक होऊ नये अशी इच्छा आहे. दी आयडीयल सोसायटी सागरमाळ, कोल्हापूर ४१६००८
श्रीनिवास दीक्षित

संपादक, आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
ऑक्टोबरच्या अंकात पुण्याच्या रिसबुडांचे पत्र आले आहे. त्यात ते म्हणतात, “धर्मवेड्या हिंदू समाजाविरुद्ध मुक्तपणाने मत-प्रदर्शन करणे, पण धर्मवेड्या मुस्लिम समाजाविरुद्ध एक अक्षरही न उच्चारणे म्हणजेच खरी धर्मनिरपेक्षता होय. इ.”
अगदी असेच विचार अनेक हिंदुत्ववादी व्यासंगी विद्वान बोलून दाखवितात. रिसबुडांनी त्यांच्या विधानाच्या पुष्ट्यर्थ ज्या विद्वानांची नावे दिली आहेत त्यावरून असे दिसून येते की केवळ एकच विद्वान धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने जादा आहे.
व्यासंगी विद्वान टाईम्स ऑफ इण्डिया वाचत असतीलच. त्याच्या ता. १४-१-९३, १०-३-९३, १३-४-९३ आणि ८-५-९३ च्या अंकांत मुस्लिम जातीयवादाविरुद्ध टीका आहे.
सध्या श्रीकृष्ण कमिशनपुढे मुंबईच्या दंगलीची चौकशी चालू आहे. त्यात राजदीप सरदेसाईंना नेमका असाच प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी स्वतः मुस्लिम जातीयवाद्यांविरुद्ध अनेकदा लिहिलेले लिखाण कमिशनपुढे सादर केले.
इतकेच कशाला? निखिल वागळे व बाळ ठाकरे ह्यांच्या वादातून बाळ ठाकरे ह्यांनी निखिल वागळे ह्यांना जाहीर सभेत आव्हान दिले होते की “वागळ्यांनी बहुसंख्य मुस्लिम असलेल्या मदनपुऱ्यात मुस्लिम जातीयवाद्यांविरुद्ध सभा घेऊन दाखवावी इ.”
निखिल वागळ्यांनी मदनपुऱ्यात सभा घेतली. मुस्लिम लीग, इमाम बुखारी, सय्यद शहाबुद्दीन, सुलेमान सेठ, बनातवाला इ. सर्वांवर टीका केली. त्यांचे समवेत कॉ. अबदुल जब्बार, जावेद अहमद, सईद मिा, साजीद रशीद इ. वक्ते होते. अनेकदा त्यांनी टाळ्या मिळविल्या. (त्याचा टाइम्समधीलता. २१-९-९३ चा वृत्तांत सोबत पाठवीत आहे. मराठी वृत्तपत्रांत हा वृत्तांत आला नाही. मुस्लिमांनी सभा उधळली नाही. वागळ्यांच्या शिवसेनेविरुद्धच्या अनेक सभा उधळल्या आहेत. तेव्हा गुंडगिरी कोण करते ? आणि पवारांची साथ कोणाला आहे ? त्याचा बोध व्हावा.
दुसरे असे की शहाबानो प्रकरणाच्या वेळी जुलै ते डिसें. ८५ ह्या सहा महिन्यांच्या काळात चाळीस ते पन्नास लेख मुस्लिम विद्वानांनी लिहिलेले आहेत. कॉ. सैफुद्दीन चौधरी त्यांचे प्रमुख प्रवक्ते आहेत. अरिफ महंमद खानांचा पण लेख आहे. तात्त्विक मुद्द्यावरून राजीनामा देणारे ते एकमेव काँग्रेस खासदार आहेत. माझ्याकडे सर्व कात्रणे आहेत.
ज्यावेळी जे प्रकरण गाजत असते त्यावेळी त्यासंबंधात लिहिले जाते. आज बाबरी मशीद प्रकरणापासून हिंदू जातीयवाद्यांनी जोर केला आहे त्यामुळे त्या संबंधात लिहिले जाते.
नरहर कुरुंदकरांनी ‘जागर’ ह्या पुस्तकांत इस्लामवर टीका केली आहे. दिल्लीच्या रॅशनॅलिस्ट असोशिएशनचे कार्यवाह जोसेफ एडामारक ह्यांनी पैगंबराबद्दल पुस्तक लिहिले आहे. त्यात ते म्हणतात.
“The prophet was schizophrenic due to the sense of insecurity and deprivation he had, when he was an orphan. Koran is most detrimental to humanity”. हाच मजकूर पुण्याच्या “सोबत”च्याच ता. ३०-८-८७ च्या अंकांत माझ्या पत्रात आहे.
दुसरा एक मुद्दा असा की, माझ्या शेजाऱ्याच्या चुका मी माझ्या पत्नीजवळ बोलून काय उपयोग? मी त्या चुका माझ्या शेजाऱ्याला त्याच्या भाषेत (उर्दूत) सांगावयास हव्यात तरच त्या चुका शेजारी दुरुस्त करील; नव्हे का? आजचा सुधारकचेवाचक बहुसंख्येने ब्राह्मण असावेत. दलितसुद्धा अल्प आणि मुस्लिम एकही नसावा. तेव्हा त्यात मुस्लिम जातीयवादाविरुद्ध लिहून फायदा नाही. हिंदूंच्या बाजूने लिहिणारे विद्वान सहदे, काशीकर, वैद्य ह्यांनीसुद्धा मुस्लिम जातीयवाद्यांविरुद्ध टीका कोठे केली आहे ? त्यांचा अट्टाहास हिंदू जातीयवाद हा जातीयवाद असूच शकत नाही हे सिद्ध करण्याचा आहे.
मुस्लिमांचे कुराण किंवा शरियत इ. वाङ्मय फारशीत आहे. ते वाचल्याशिवाय त्याच्यावर टीका कशी करणार? आजच्या सुधारकानसेतु माधवराव पगडींच्या मदतीने असे काही करावे. त्यायोगे तात्त्विक दृष्टिकोनातून टीका करता येईल. किंवा भाजपाचे खासदार शिकंदर बख्त ह्यांची मदत घ्यावी.
हिंदूंच्या जहाल जातीयवादी कारवायांमुळे अल्पसंख्यकांमध्ये असुरक्षिततेची भावना जास्तजास्त वाढीला लागते. त्यांच्यांत केवळ चारच टक्के लोक दहावी पास झालेले आहेत. साहजिक ते धार्मिक अंधश्रद्ध आहेत. असुरक्षिततेपोटी अंधश्रद्ध समाज मुल्ला मौलवींच्याच आधीन होतो. ते सुशिक्षित झाल्यावाचून त्यांच्यात विवेकवाद कसा निर्माण होणार ? वास्तविक हिंदू जातीयवाद्यांनीच ह्याचा जास्त विचार केला पाहिजे. म्हणूनच मुस्लिमांना प्रथम सुरक्षितता पटली (फील झाली) पाहिजे.
त्या मानाने दलित समाज जास्त सुशिक्षित होऊनसुद्धा आंबेडकरांसारखे महामानव “आगरकर” होऊ शकले नाहीत हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यांना धर्म नाहीतर धम्माची आवश्यकता वाटलीच. मग मुसलमानांमध्ये “आगरकर” निर्माण व्हावेत म्हणून त्यांना किती सुरक्षित वाटले पाहिजे ह्याचा विचार करावा.
आजचा काळ मध्ययुगीन तलवारीचा व राजेपदाचा नाही. ज्याचेजवळ “मनीपॉवर व मसलपॉवर” आहे तेच निवडणुका जिंकतात आणि सत्ता गाजवतात. महाराष्ट्रात पंचवीस टक्के मराठा आमदारकीच्या जागा मात्र पन्नास टक्क्याहून जास्त मिळवतात आणि छत्तीस टक्के दलितांना वीसच टक्के आमदारकी मिळते. आमदारकीच्या जागांना मंडल अहवाल लावला पाहिजे.
भारतात ज्या पंचाहत्तर भांडवलदारांच्या ताब्यात आर्थिक नाड्या आहेत त्यात मुस्लिम नाहीत. सरकारी नोकऱ्यांतसुद्धा टक्केवारीने ते अत्यल्प आहेत. त्यांना राखीव जागा नाहीत. लोकसभेच्या ५४५ जागांपैकी फक्त ४५ खासदार मुस्लिम आहेत.
आणखी एक विचार मांडतो. साम्यवादी रशिया आणि चीनविरुद्ध जितके लिहिले जाते त्यामानाने भांडवलशाही आणि अमेरिका जास्त आक्रमक असूनसुद्धा त्यांच्याविरुद्ध किती लिहिले जाते ह्याचा शोध घ्यावा. वास्तविक रशिया, चीनमध्ये त्यांच्या-त्यांच्या नागरिकांना त्रास देतात; पण अमेरिका ह्या ना त्या कारणाने इतर देशांत हस्तक्षेप करिते. पण टीका नाही. असो.
आपला चेक नाक्या जवळ, नेरळ, ४१०१०१
केशवराव जोशी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.