अकुतोभय गीता साने -२

विनोबांची पदयात्रा होऊन गेल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर ६१ मध्ये गीताबाई चंबळ-घाटीत गेल्या. जिथे जिथे विनोबा गेले तिथे तिथे बाई गेल्या. सोबत अर्थात् विनोबांनी स्थापन केलेल्या शांतिसमितीच्या कार्यकर्त्यांची होती. घाटीतील जनता अशा प्रकारच्या चौकश्यांना सरावली होती. ठरीव साच्याची पढविल्याप्रमाणे उत्तरे येत. म्हणून गीताबाईंनी आपला मोर्चा अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्याकडे वळवला. कारण आचार्यांच्या पदयात्रेवेळी खरा पीडित अस्पृश्य वर्ग अलक्षित राहिला होता. स्त्रियांशी संवाद साधल्यामुळे त्यांना सत्याच्या अधिक जवळ जाता आले.
चंबळ घाटीत जाण्यापूर्वी डाकूच्या प्रश्नावरचे साहित्य त्यांनी धुंडाळले, तेव्हा त्यांना दोनच पुस्तके मिळाली. ‘अभिशप्त चंबळ हे देश या बंगाली साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या श्री. तरुणकुमार भादुडी यांच्या लेखांचे संकलन आणि दुसरे चंबळके बेहडों में हे विनोबांच्या पदयात्रेचा दैनंदिनीच्या स्वरूपात वृत्तान्त देणारे श्रीकृष्णदत्त भट्ट यांचे पुस्तक. पण दोन्ही पुस्तके एका अर्थी वर्तमानपत्री लेखन होते. डाकू समस्येचा मुळापासून ऊहापोह त्यात अपेक्षित नव्हता. चंबळमधील स्वतःच्या निरीक्षणांना गुन्हेशास्त्रावरील साहित्याच्या अभ्यासाची जोड देऊन ‘चंबळची दस्युभूमी हे पुस्तक दोन वर्षांनी प्रकाशित करण्यामागे या विषयावरील अभ्यास-ग्रंथांचा अभाव अंशतः तरी दूर करावा हा बाईंचा हेतू होता.
पूर्वतयारीचा एक भाग म्हणून ग्वाल्हेरच्या एका परिसंवादात त्यांनी भाग घेतला. जुलैमध्ये दादा धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘अपराध व अहिंसा’ या विषयावर एक परिसंवाद झाला. डाकूची समस्या नुसती कायदा आणि सुव्यवस्थेची नाही; ती सामाजिक व नैतिक समस्या आहे, हे एक सूत्र तेवढे दादांच्या भाषणात कामाचे होते. बाकी सारे वक्तृत्व. त्यात आचार्यांचा पराजय झाल्याची कबुली मात्र दादांनी दिली होती.
एवढ्या तयारीनिशी गीताबाई चंबळ घाटीत उतरल्या. त्यावेळी त्यांचे वय ५५ वर्षांचे होते. स्वतः घेतलेल्या शोधानंतर आपले निष्कर्ष आचार्यांच्या विरोधात जातात, म्हणून त्यांनी आचार्यांची भेट घेतली. त्याबद्दल त्यांचा अभिप्राय गमतीदार आहे. त्या म्हणतात ‘आचार्य खूप कार्यव्यग्र असतात पण घाईत मात्र नसतात असा अनुभव मला आला. ते म्हणाले, तुम्हाला वाटते ते तुम्ही अवश्य लिहा. एखादी कादंबरी लिहा. शोधप्रबंध लिहिण्याऐवजी कादंबरी लिहा अशी शिफारस आचार्यांनी करावी याचे त्यांना नवल वाटले. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर प्रबंध तयार झाल्यावर गीताबाई पुन्हा एकदा चंबळ घाटीत जाऊन आपल्या मध्यप्रदेशाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस श्री. रुस्तुमजी यांची भेट त्यांनी घेतली. आपल्या वादग्रस्त ठरलेल्या रेडिओ-भाषणाची हस्तलिखित प्रत रसुत्तुमजींनी वाचायला दिली. दरम्यान डाकू समस्येवर एक चित्रपट झाला होता. रुस्तुमजींनी त्याची भलावण केली. स्त्रीप्रेमाच्या सामर्थ्याने एखा डाकूचे ह्रदयपरिवर्तन झाल्याची ती कथा रुस्तुमजींना भावली होती. पण प्रश्न सामुदायिक ह्रदयपरिवर्तनाचा होता. स्त्रीप्रेम हे त्याचे उत्तर नव्हते.
चंबळ घाटीतली समस्या डाकूची नसून डाकूवृत्तीची आहे आणि तिला प्रादेशिक आशय आहे हे गीताबाईंच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांना दिसून आले की, डाकू बेपत्ता झाले तरी त्यांनी लुटून आणलेल्या संपत्तीचा उपभोग त्यांचे परिवार सुखेनैव घेत होते. त्यांची प्रतिष्ठा कमी न होता वाढत होती. खेडा-राठोड च्या मानसिंग डाकूला लोकांनी राजा मानसिंग केले होते. सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्योत्सवात त्याने मणोगणती मिठाई वाटली होती. त्याचे घर म्हणजे एक भुईकोट किल्ला होता. त्याच्या नातवांच्या लग्नाच्या जल्लोषात सरकारी अधिकारी हजेरी लावून गेले होते. त्यामुळे त्याच्या स्वयंघोषित प्रतिष्ठेला जणू राजमान्यता लाभली होती. जवळजवळ दोनशे हत्या करणारा निर्गुण मानसिंग वृत्तीने धार्मिक होता. रोज जपजाप्य करीत होता. तुलसी-रामायण वाचत होता. ब्राह्मण प्रतिस्पर्ध्यावर सूड घ्यायला निघाला तेव्हा ब्रह्महत्या होईल अशी भीती घालणाऱ्या बायकोला तो उत्तर देतो : प्रभू रामचंद्राने रावणाचा नाही का वध केला. तोही ब्राह्मणच होता. मानसिंग मदिरा आणि मदिराक्षीच्या मोहापासून मुक्त होता. दरवड्यातही स्त्रियांच्या अब्रूला तो जपत असे. तो दानधर्म करी. गोरगरिबांच्या लग्नाकार्याला पैशाची मदत करी. शाळांना साहाय्य देई. लोकांना वाटे, लोकांना पिळूनच सावकार गबर होतात. मग हे डाकू त्यांना लुटतात त्यात
गैर काय?
मानसिंगाचा मुलगा तहसीलदारसिंग १९५४ मधे पकडला गेला होता. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. तो ५९-६० मधे आग्रा जेलमध्ये शेवटचे दिवस मोजत होता. त्याने फाशी जाण्यापूर्वी आचार्यांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याच्या अर्जावर राष्ट्रपतींनी दया दाखवून फाशी ऐवजी जन्मठेप अशी शिक्षा कमी केली. सरकारने याप्रमाणे आचार्याच्या पदयात्रेला अनुकूल अशी वातावरण-निर्मिती केली होती. मागे सांगितल्याप्रमाणे आचार्यांच्या पदयात्रेत सत्ताधारी नेते, वरिष्ठ अधिकारी, पोलिस आणि डाकू असे सगळेच सामील झाले होते. पदयात्रेनंतर जवळजवळ दोन वर्षे शांतता नांदली. पण १९६२ च्या अखेर पुन्हा सुमारे २१ टोळ्या सक्रिय झाल्या. त्यावर इंग्रजी वृत्तपत्रे, हिंदी सरिता, मराठी महाराष्ट्र टाईम्स अशी वृत्तपत्रे तुटून पडली. आचार्यांनी विलक्षण संयमाने मौन राखले. त्यामुळे हे वादळ लौकरच शांत झाले.
यमुनेला मिळणारी चंबळ ही भारताच्या सोळा पवित्र नद्यांपैकी एक आहे. तिची लांबी पाच-साडेपाचशे मैल असली तरी उतारांमुळे तिचा प्रवाह जोरकस होतो. कधीकधी तीनशे मैल अंतर कापलेल्या नदीचे पात्र देखील तीन मीटर इतके अरुंद होते. शेवटच्या पन्नास साठ मैलांत बेहड लागतात. लहान मुलाने पाटीवर वेड्यावाकड्या रेघोट्याओढाव्या तसे वरून दिसणारे हे ओहोळ तिच्या दोन्ही तीरांवर विखुरले आहेत. चंबळेच्या काठची माती मऊ आहे. ती पाण्यात पटकन विरघळते. ती वाहून वाहून ओहोळांचे पात्र निर्माण होते. दरवर्षी नवनवे ओहोळ बनतात. या ओहोळांनाच बेहड म्हणतात. चंबळचे खोरे असे बेहड आणि जंगलांनी व्याप्त आहे.
चंबळ घाटीतील दरवडेखोरीची कारणमीमांसा अनेक प्रकारे केली गेली आहे. एकीकडे भयानक दारिद्र्य आणि दुसरीकडे बेसुमार संग्रह यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा उदय होतो, असा विचार व्हिक्टर व्ह्यूगो या फ्रेंच कादंबरीकाराने मांडला. तो बराच लोकप्रिय झाला. मात्र भारतात आणि विदेशातही झालेल्या संशोधनात त्याला आधार सापडला नाही. लायकीपेक्षा अधिक पैसा मिळविण्याची संधी हेच गुन्हेगारीचे आकर्षण आहे. ‘गुन्हेगारी फायद्यात पडते असा निष्कर्ष ए स्टडी इन इंडियन क्राईमच्या लेखिकेने काढला आहे. गीताबाईंनी या विषयावर अभ्यासलेल्या अनेक ग्रंथांतून हा निष्कर्ष काढलेला त्यांना आढळला. शिवाय त्यांना आढळले ते असे की, ‘बेहडमें चला गया ह्या वाक्याने बोलणारा डाकूगिरी ही एक सन्मान्य वृत्ती समजत असतो. ह्या सामाजिक प्रतिष्ठेला ऐतिहासिक परंपरेचीही जोड मिळाली आहे.
इतिहास सांगतो की सुधारणेत उणे पडलेले समाज जास्त लढाऊ वृत्तीचे असतात. विज्ञानाच्या बळावर हस्तगत केलेले श्रेष्ठ युद्धतंत्र वापरले तरच त्यांना पराभूत करता येते. चंबळमध्ये डाकूच्या पाठलागावर असणाऱ्या पोलिसदलात असे श्रेष्ठत्व दिसले नाही. आणखी एक गोष्ट : कुटुंबाच्या भरणपोषणाची बाजू पक्की झाल्यावाचून माणसे हिरिरीने लढू शकत नाहीत. तीही बाजू त्या लढ्यात कोणी लक्षात घेतलेली दिसली नाही. पोलिसदलाला जंगल-घाटीत हालचालींचे विशेष प्रशिक्षण दिले होते असेही नाही. या सर्व बाबींत डाकूची बाजू उजवी होती.
अस्पृश्यांना समानतेचे मुळी अधिकारच नाहीत अशी डाकूची श्रद्धा होती. जातिबंधनांना कवटाळून बसलेल्या राजपुतांनी राज्यघटना पुरस्कृत समतावादी अधर्मा (!) च्या नाशासाठी सिद्ध व्हावे हे त्यांना स्वाभाविक वाटत तहोते. तो त्यांना पटलेला न्याय होता. काल परवापर्यंत पंजाबात पोलिसी अत्याचारांचे जे गाहाणे गाइले जाई तसेच गा-हाणे घाटीतील जनता विनोबांपुढे गात राही. ते ऐकून आचार्य पोलिस बरोबर दस्यू असा सिद्धान्त मांडते झाले. तिथली जनता म्हणजे ब्राह्मण आणि ठाकूर. इकडे तेच शूद्रातिशूद्रांना रगडत राहात.
स्वतंत्र भारतात अस्पृश्य बरेच स्वतंत्र झाले. दस्युभूमीत चमार (चांभार) वस्ती जास्त. तो मेहनती आणि त्याचे कुटुंबही सगळे कामकरी. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. उच्चवर्णीयांची परिस्थिती खालावत गेली. परिणामी अस्पृश्यांना सुरक्षेबद्दल चंदा (खंड) भरावा लागे. नाहीतर गोळ्या खाव्या लागत. गीताबाईंना दिसले की, ते खेड्यांत राहतात, पण सदैव दबून, प्राणभय बाळगून. आपले लोकसत्ताक राज्य त्यांना संरक्षण देण्यास असमर्थ ठरले आहे. हा पराभव डाकूवृत्तीच्या समस्येचा गाभा आहे. चंबळच्या ओहोळांमधील दंगल ही सरंजामशाहीने नव्या युगाला दिलेली धडक आहे. नव्या जगाचे कायदे पसंत नसलेल्या जुन्या आधारस्तंभांनी केलेला विद्रोह हे डाकूगिरीचे प्रमुख कारण.
लोकशाहीचा भर शस्त्रांवर नसतो, प्रचारावर असतो. भारतीय जनतेचा हुकूमशाहीला तीव्र विरोध आहे. परंतु लोकशिक्षणाचे या दस्युभूमीत पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. नाही म्हणायला ग्वाल्हेर नरेशांनी १९२४ साली एक प्रयत्न करून पाहिला. शिंद्यांच्या प्रयत्नातून हे उघड झाले की खुनी दंगलींना राजपूत कारणीभूत होते आणि ते दिसतात तेवढे निर्भय नाहीत.
दुसरा प्रयत्न आचार्य विनोबांचा. आचार्यांना तेलंगणात यश आले होते. पण चंबळच्या भूमीत त्यांचे पाय जमिनीला लागलेच नाहीत. ज्या अस्पृश्यांसाठी त्यांनी आपल्या जीवनाची १२ वर्षे तपश्चर्या केली त्यांचा ओझरता स्पर्शही त्यांच्या या यात्रेत झाला नाही. त्यांच्याकडून वसूल केल्या जाणाऱ्या खंडणीबद्दल ते अवाक्षर बोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचे पात्र आशयहीन झाले. डाकूची धार्मिकता, पोलिसी जुलूम यांनी प्रभावित होऊन आचार्यांनी सामुदायिक ह्रदयपरिवर्तनाचा प्रयोग करून पाहिला पण तो व्यर्थ ठरला.
विदेशात सांघिक गुन्हेगारीचा अभ्यास सुरू झाल्याला दोन तीनशे वर्षे झाली. भरपूर संशोधन झाले. त्यावरील ग्रंथ, मध्ययुगीन भारताचा इतिहास, इंग्रजी राजवटीने ठग, पेंढारी यांची बंडे मोडण्याचे जे प्रयत्न केले त्यांचे इतिवृत्त, अशा नव्याजुन्या साठसत्तर ग्रंथांची साधनसामग्री अभ्यासून गीताबाईंनी चंबळची दस्युभूमी हा प्रबंध सिद्ध केला आहे. त्यातून त्यांच्यातला अकुतोभय सुधारक दिसतो तसाच सत्यशोधक संशोधकही.

१६, शांतिविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर-१
(या लेखाच्या पूर्वार्धाच्या शीर्षकात अकुतोभय’ याऐवजी ‘अकुतोथय’ असे छापले गेले. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तसेच त्या लेखातील एका विधानाला एक दुरुस्ती गीताबाईंच्या कन्या डॉ. वसुधा धागमवार यांनी सुचविली आहे. त्यांचे वडील कम्युनिस्ट (म्हणजे cardholder सदस्य) नव्हते, ते सहप्रवासी होते. संपादक)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.