प्रोफेसर रेगे –एक उत्तमपुरुष

प्रोफेसर रेगे हे एक कूट आहे. त्याला अनेक उपांगे आहेत. त्यातली काही उकलतात. काहींच्या उत्तरासाठी त्यांनाच बोलते करावे लागेल.

एक सोपे कोडे असे की प्रो. रेगे यांची योग्यता आणि त्यांना मिळालेली मान्यता यांत एवढी तफावत का?

तत्त्वज्ञान हा रेग्यांचा प्रांत. त्यात आज अग्रपूजेचा मान त्यांचा. महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतात. तो त्यांना लाभलेला अजून दिसत नाही. मात्र त्याचे दुःख त्यांना नाही. इष्टमित्रांनाच तेवढी हळहळ. भारतात स्वातंत्र्याच्या पहाटेच तत्त्वज्ञानाला बरे दिवस लाभले. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च स्थापन झाली. निवडक विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अध्ययनास्तव अॅडव्हान्स्ड सेंटर्स उघडली गेली. नॅशनल प्रोफेसर, सुप्रतिष्ठ प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस), अमुक फेलो, तमुक डायरेक्टर ही भाषा ऐकू येऊ लागली. पण ती रेग्यांना लागू पडली नाही. का? हे एक कोडे. त्याचे उत्तर असे.

रेग्यांनी अनेक मठाधिपतींना दुखावले आहे. त्यांत तत्त्वज्ञानातले आहेत. बाहेरचेही आहेत. भल्याभल्या दुड्ढाचार्यांची फजीती केली आहे. फक्त एक किस्सा. केवळ उदाहरणार्थ. सुमारे २५ वर्षांपूर्वीची गोष्ट. महाराष्ट्रभर कुरुंदकरांचे नाव दुमदुमत होते. त्यांच्या वक्तृत्वाने पंडित अपंडित सारेच मोहित झाले होते, आणि किती सर्वस्पर्शी प्रज्ञेचा हा विचारवंत असे गोडवे गाण्याची चढाओढ सुरू झाली होती. आश्चर्य म्हणजे माडखोलकरांसारखे विचक्षण संपादकही तीत मागे नव्हते. समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र ह्या विभागाचे सर्वोत्कृष्ट ग्रंथाचे सरकारी पारितोषिक कुरुंदकरांच्या रूपवेधं या पुस्तकाला मिळाले होते त्यावेळची गोष्ट. तेव्हा सत्यकथाही जोरात होती. रेग्यांनी सत्यकथेत रूपवेधचे प्रदीर्घ परीक्षण केले.

ग्रंथाचा लेखक झीट येऊन पडावा आणि परीक्षामंडळाच्या सभासदांना भूकंप झाल्यागत वाटावे असे ते लेखन होते. प्रत्यक्षात काय झाले ते माहीत नाही. पण त्यानंतर कुरुंदकरांनी सौंदर्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान या प्रांतात स्वैर विहार करणे बंद केले.

पुढे पाटणकरकृत ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथाच्या निमित्ताने आणखी एक द्वंद्व उभे राहिले. तत्त्वज्ञानातील एक स्वयंघोषित भीष्माचार्य शरपंजरी लोळत आहेत हे दृश्य महाराष्ट्राला पाहायला मिळणार होते. थोडक्यात राहिले.

आपल्याकडे बुवाबाजी फार. धर्माच्या, अध्यात्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्याही नावाने. गेल्या शंभर वर्षात पाश्चात्य तत्त्वज्ञानात क्रान्ती झाली आहे. तर्कशास्त्र, भाषिक विश्लेषण, भाषिक तत्त्वज्ञान अशा नवनवीन शाखा बहरल्या आहेत. त्यांची अक्षरओळख झाली, एखादी परदेशवारी घडली की आपण तज्ञ झाल्याचा साक्षात्कार अशा विद्यासेवकांना होतो. हे तज्ञ बरेचदा विद्यापीठात मोठ्या पदावर आसन्न असतात. लगेच बुकमेकर बनून ती अभ्यासाला लावायची तत्परता दाखवतात. कधी सरकारी आश्रयाने लठ्ठ पुस्तके छापवून भरपूर रॉयल्टीचे धनी होतात. असे लाभार्थी एरवीच्या वागण्यात सौजन्यशील असतात. त्यामुळे सुजाण वाचक मौन धरतात. पण रेग्यांना ती प्रतारणा वाटते. सत्याशी, ज्ञानाशी अशी बेइमानी त्यांना खपत नाही. रेग्यांनी अशांवर टीकास्त्र सोडून अनेक तत्त्वज्ञ-पंडितब्रुवांना घायाळ केले आहे. त्यांच्या एखाद्या शाळकरी पोराने कराव्या अशा घोडचुका त्यांनी सप्रमाण पदरात घातल्या तरी त्या कबूल करायचा उमदेपणा ही मंडळी दाखवत नाहीत. आपल्या शागीर्दाकरवी रेग्यांचे परीक्षण ‘व्यक्तिलक्षी’ असते असा बोभाटा करतात. याशिवाय उच्चपदी विराजमान झालेले आणि मानमरातबांची खैरात करूं शकणारे संभाव्य आश्रयदाते प्रशंसेच्या प्रतीक्षेत असतात. त्यांना कधी लिहायचा प्रसंग आलाच तर रेगे डॉ. जॉन्सनने लॉर्ड चेस्टरफील्डला लिहिलेल्या पत्राची नक्कल तेवढी पाठवतील याबद्दल शंका नाही.

प्लेटो ॲरिस्टॉटलचा साक्षात् गुरू. गुरूवर टीका करण्याचा प्रसंग आला तेव्हा तो म्हणतो : ‘प्लेटो थोर आहे. सॉक्रेटीस त्याहून थोर आहे. पण सत्य सर्वांहून थोर आहे.’

सत्यनिष्ठा आणि निर्भयता ही तर तत्त्वज्ञाची अचूक वैशिष्ट्ये. त्यांच्या जोडीला निरिच्छता हे प्रो. रेग्यांचे आणिक वैशिष्ट्य आहे. प्रोफेसर मेघश्याम पुंडलीक रेगे, आपण थोर तत्त्वज्ञ आहात. वनामध्ये मृगांकडून अभिषेक होत नाही म्हणून सिंह सिंह व्हायचा थोडाच राहातो! त्याची असते स्वयमेव मृगेन्द्रता!

प्रत्येक थोर तत्त्वज्ञाची कामगिरी दुहेरी असते. एक विध्वंसक आणि एक विधायक. रेग्यांची विधायक कामगिरी कितीतरी महान आहे. ज्यांना कळली त्यांनी दाद दिली आहे. पण त्यांच्या हाती तुताऱ्या नाहीत. तेही त्या स्वभावाचे नाहीत. आणि आपला समाजही तेवढा संवेदनशील नाही. रेग्यांच्या कामगिरीचा समग्र आलेख काढण्याचे हे स्थळ नाही आणि माझा तो अधिकारही नाही. पण मला दिसलेल्या प्रकाशाचे काही कवडसे असे छंद मासिकात सौंदर्यशास्त्रीय प्रश्नांचा उहापोह करणारा एक लेख रेग्यांनी फार पूर्वी लिहिला. आणि बरे झाले. म्हणजे सौंदर्यशास्त्रावर लिहिले हे. कारण मराठीत तत्त्वज्ञानाच्या सौंदर्यशास्त्र या शाखेकडेच वाचकांचे थोडेबहुत लक्ष जाते असे दिसते. रेग्यांच्या अभ्यासाकडे लक्ष जाण्याचे श्रेय साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांनाच आहे. कारण पुढेही पाटणकरांनी उपस्थित केलेली सौंदर्यमीमांसेवरील चर्चा सोडली तर रेग्यांनी नीतिशास्त्र, तत्त्वज्ञानातले प्रश्न, तर्कशास्त्र आणि धर्म व समाजकारणावर जे विपुल लिखाण केले त्याकडे सुज्ञ वाचकांचे जावे तेवढे लक्ष गेलेले नाही. रेग्यांनी प्रभाकर पाध्ये आणि त्यांच्या पत्नी कमलताई यांना आपले एक पुस्तक अर्पण करताना लिहिले आहे : ‘पीटरचे पॉलविषयीचे मत आपल्याला पॉलविषयी जेवढे सांगते त्यापेक्षा पीटरविषयी अधिक सांगते.’

संदर्भ असा.. प्रभाकर पाध्ये ‘सौंदर्यानुभव’ च्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘कोणाचाही मूलभूत दृष्टिकोण मुळातच उडवून लावण्याचा प्रयत्न न करता तो दृष्टिकोण शक्य तितका निर्दोष कसा होईल असे मार्गदर्शन करण्याची रेग्यांची हातोटी विलक्षण आहे. …त्यांचा एखाद दुसरा उद्गार पुष्कळदा विषयाची अगदी नवी क्षितिजे उजळतो.

पाटणकर ‘कांटची सौंदर्यमीमांसा’च्या प्रास्ताविकात म्हणतातः ‘प्रा. रेग्यांनी केलेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख करायला हवा…. रेग्यांच्या मार्गदर्शनाचे एक वैशिष्ट्य असे की, ते (दुसऱ्याच्या लेखनात कोणतीही घोडचूक राहू देत नाहीत. पण… आपल्याला न पटणारे निष्कर्ष दुसऱ्याने काढले तर त्यांना ते हवेच असतात.

समाज प्रबोधन पत्रिकेच्या पूर्वावतारात रेग्यांनी पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास ही लेखमाला लिहिली. ती नंतर पुस्तकरूपाने बाहेर आली. ती लेखमाला लिहिण्यामागे त्यांचा हेतू हा होता की, ‘आपला समाज कुंठित, भ्रष्टाचारी झाल्यासारखा दिसतो… (कारण) . पोरंपरिक नीतीचा आपल्या मनावरील काबू सुटला आहे आणि आधुनिक नीतीला पायाभूत असलेली मूल्ये व दंडक आपण आत्मसात् केलेले नाहीत. आपल्या समाजाचे प्रतिनिधी व नेते असलेल्या विचारवंतांनी ही मूल्ये किती स्पष्टपणे हेरली होती या प्रश्नाकडे लक्ष वेधावे. आपली पारंपरिक मूल्ये आणि पाश्चात्यांकडून आपण घेतलेली व्यक्तिस्वातंत्र्य, समता आदी मूल्ये यांचा समन्वय साधण्याचा त्यांचा ध्यास आणि प्रयत्न आज २० वर्षे तरी सुरू आहे. ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ या विषयावर नवभारत मासिकात त्यांनी १५ लेख संपादकीय स्वरूपात लिहिले. १९९१ मध्ये ही लेखमाला संपत नाही तोच ९२ च्या जानेवारी-फेब्रुवारी अंकापासून ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’ ही लेखमाला सुरू केली आहे. रेनेसान्स, रेफर्मेशन आदी कालखंडावरील मूळ साहित्य, बायबल हे मूळ ग्रंथ आणि त्यावरील अधिकारी व्यक्तींचे लिखाण, हिंदूंचे अद्वैत वेदान्त, कुराण मीमांसा असे वैदिक परंपरेचे अभिमानी मूळ साहित्य-या सगळ्या सामग्रीचे परिशीलन करून हे लिखाण होत आहे. मराठीतल्या मान्यवर प्रकाशकांनी ग्रंथरूपाने ते उजेडात आणल्याशिवाय कमी विदग्ध वाचकांचे तिकडे लक्ष जाणार नाही.

सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी नवभारत मासिकात गेन्ट्झेनच्या गणिती तर्कशास्त्राची ओळख आणि ल्युकाझिविक्स या पोलिश तर्कवेत्त्याच्या कार्याचा परिचय रेग्यांनी करून दिला. आधुनिक गणिती तर्कशास्त्रावरील मराठीतील ते पहिले लिखाण. त्याची दाद एवढीच की ते काय आहे याची माहिती अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्रोफेसर दि. य. देशपांडे यांनी आम्हाला दिली. १९७० च्या सुमारास नागपूर विद्यापीठात डॉ. सुरेंद्र बालिंगे, प्रा. दि. य. देशपांडे आदींच्या प्रयत्नाने सांकेतिक तर्कशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. पाठोपाठ पुणे विद्यापीठानेही तो सुरू केला. मराठीत या विषयावर मोजकीच पुस्तके, तीही प्रारंभिक स्वरूपाची होती. त्यावेळी प्रो. रेग्यांनी ‘आकारिक तर्कशास्त्र’ हा सुमारे तीनशे पृष्ठांचा समर्थ ग्रंथ लिहिला. त्याचा पुरेपूर लाभ घेण्याइतपत आमचे विद्यार्थी तयार झाले नव्हते हे तर खरेच, पण आम्हा प्राध्यापकांची पोचही बेताचीच होती.

तत्त्वज्ञानातील समस्या हे बीड रसेलच्या प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसफी या छोटेखानी पुस्तकाचे भाषांतर. ते भाषांतर खरेच. पण त्याला जोडलेली त्याच तोडीची प्रस्तावना हे ‘त्यावरील भाष्य आहे. ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने संपादित करणाऱ्या राजवाड्यांनी जशी प्रस्तावना लिहावी त्या तोलाची मर्मग्राही ही प्रस्तावना आहे. रसेलच्या तत्त्वज्ञानात ब्रिटिश अनुभववादी परंपरा आणि युरोपीय तत्त्ववेत्त्यांची विवेकवादी परंपरा यांचा झालेला संगम या प्रास्ताविक भाष्यात त्यांनी उकलून दाखविला आहे.

रसेलसंबंधी त्यांनी इतरत्रही पुष्कळ लिहिले आहे. आपला समाज ब्रिटिश समाजाइतका सुबुद्ध असता तर त्याने रेग्यांना रसेलची योग्यता अर्पण केली असती. आमची बौद्धिक प्रगल्भता कमी पडते म्हणून म्हणा, की रेग्यांची भाषणशैली जितकी नर्मविनोद आणि सूक्ष्म उपरोध यांनी नटलेली असते तितकी लेखनशैली नसते म्हणून म्हणा, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांबाहेर इतरांचे तिकडे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. सौंदर्यशास्त्रीय लिखाणाने रेग्यांनी आरंभ केला हे बरे झाले असे वर जे म्हटले ते यासाठीच.

तत्त्वज्ञानाच्या प्रांतात मात्र अगदी ‘येथे समस्त बहिरे बसतात लोक’ अशी गत नाही. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या वयाला ७५ वर्षे झाली त्यानिमित्त पुण्याच्या परामर्श या. त्रैमासिकाने जो विशेषांक काढला त्यात, आपल्या तत्त्वचिंतनाचा प्रवास कथन करताना देशपांड्यांनी प्रो. रेग्यांची योग्यता आणि ऋण यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. त्यांच्या मते, ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे आपल्या देशात जवळजवळ अजोड असे प्रभुत्व तर त्यांच्या (रेग्यांच्या) जवळ आहेच, पण सांकेतिक (गणिती) तर्कशास्त्रात त्यांचा हात धरू शकेल असा क्वचितच कोणी येथे सापडेल.’ प्रा. देशपांडे पुढे लिहितात, ‘त्यांच्या सान्निध्यात असताना मला आपले खुजेपण विशेषत्वाने जाणवते.

प्रोफेसर रेगे कर्ते तत्त्वज्ञ आहेत. मिलिन्द महाविद्यालय, औरंगाबाद, कीर्ती कॉलेज, मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे असा प्रवास करून त्यांनी वाईप्रस्थ घेतला. तेव्हा मराठी विश्वकोशाशिवाय त्यांनी प्राज्ञपाठशाळेतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘धर्मकोशाचे काम अंगावर घेतले. त्याचा पसारा त्यांनी इतका वाढवला की त्याची दुसरी शाखा त्यांना बंगलोर येथे उघडावी लागली. या धर्मकोशाबद्दल एक गमतीची गोष्ट त्यांनी सांगितली ती अशी की, त्याचे ग्राहक भारतापेक्षा भारताबाहेरच जास्त आहेत. हे काम त्यांना अतिशय प्रिय आहे.

पण गेली काही वर्षे त्यांनी जे काम उभे केले आहे त्याला तोड नाही. जगाच्या ज्ञानपेठेत आपण उसने घेतलेले तत्त्वज्ञान कितीसे मांडणार? त्यापेक्षा आपल्या देशात अगदी खास आपले म्हणता येईल असे केवढे प्रचंड तत्त्व भांडार आहे. हजारो वर्षे आपल्या समाजातल्या एका अत्यल्प गटाने ते प्राणपणाने सांभाळले आहे. जगातल्या अद्यतन तर्कशास्त्राच्या तोडीचा तर्कशास्त्राचा अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला आहे. पण तो प्रवाह वाहायचा थांबला आहे. इतका की, ती गंगाजळी आता आटते की काय असे वाटावे अशी अवस्था आली आहे. पाश्चात्य तत्त्वज्ञानातल्या आधुनिकतम प्रवाहात अवगाहन करून आपण आपल्या भागीरथीला पुन्हा वाहते केले पाहिजे. यासाठी आपल्या दर्शनांच्या पारंपरिक संस्कृत अभ्यासकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि त्यांचे सामर्थ्यशाली तर्कशास्त्र याची ओळख करून दिली पाहिजे. आणि पाश्चात्य तर्कप्रवीण अभ्यासकांना आपल्या न्यायशास्त्राची ओळख झाली पाहिजे. असा हा पूर्वपश्चिम संवाद झाला म्हणजे पाश्चात्यांचेच सेकंड हँड सणंग पुन्हा त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रसंग येणार नाही. रेग्यांच्या या प्रकल्पाच्या अखेरीस संस्कृत भाषेत आपल्या ग्रंथरचनापद्धतीने, सूत्र- कारिका-वृत्ती अशा आकृतिबंधात पाश्चात्य गणिती तर्कशास्त्र ग्रंथबद्ध होणार आहे. येत्या सहा महिन्यात या कामाला प्रारंभ झालेला असेल.

या कार्याच्या सिद्धीसाठी गेली ७-८ वर्षे रेगे किती झटत आहेत याचा मी साक्षी आहे. त्यासाठी फोर्ड फौंडेशनचे अर्थसाहाय्य ते मिळवू शकले. राजस्थान विद्यापीठाच्या प्रोफेसर दयाकृष्ण यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पाला त्यांनी पंडित- फिलॉसॉफर-प्रॉजेक्ट (PPP) असे नाव दिले आहे. १९८७ च्या मे महिन्यात या प्रकल्पासाठी पहिले शिबिर वाई येथे घेण्यात आले. या मालिकेतले ७ वे शिबिर १९९३ च्या मेमध्ये मुंबईला सोमय्यांच्या विद्याविहारमध्ये घेण्यात आले. त्या सातही शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले याची नोंद करण्याचा मोह मला होतो. हे काम संपले की आपली अखंड भ्रमन्ती आपण थांबवू असे ते एकदा म्हणाले. भारतीय तत्त्वज्ञानाला संजीवनी देणारे, त्याचा पुनर्जन्म घडवून आणणारे हे काम असेल यात मला संशय नाही. प्रो. रेग्यांचा तर तो जीवितध्यास आहे. आठ वर्षांपूर्वी प्रो. रेग्यांचे संस्कृतचे ज्ञान जुजबी होते. पण गेल्या उन्हाळ्यात मुंबईला प्रवचनार्थ आलेले आचार्यही त्यांनी केलेल्या प्रगतीने थक्क झालेले दिसले.

शिक्षक म्हणून रेग्यांची योग्यता काय वर्णावी! कितीही अचानक प्रश्न आला तरी त्यांना तो अडचणीचा नसतो. त्यानिमित्ताने त्यांच्यातली मिष्कीलपणा, नर्मविनोदप्रियता बाहेर येते. प्रश्न कितीही क्षुल्लक वाटला तरी ज्याअर्थी तो कोणाला पडतो त्याअर्थी गंभीरपणे त्याची दखल घेणे ते आपले कर्तव्य समजतात. वर उल्लेख केलेल्या ‘पी पी पी’ योजनेच्या निमित्ताने लक्षात आले की भारतभर सर्वांना सुट्या असतील असे सलग महिनाभर घडत नाही. म्हणून प्रादेशिक शिबिरे आली. त्यातही अडचणी राहातातच. त्यामुळे त्यांनी विद्यार्थी निवडले, प्रगतिशील असे, आणि त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या सोयीच्या सुटीच्या काळात त्यांना शिकवायचा परिपाठ सुरू केला. लहानगे मूल असणाऱ्या गृहिणी-पंडितांची यामुळे शिकण्याची सोय झाली. रेगे शिकवायला उभे राहिले की घड्याळ बंद असते. तीन तास = १८० मिनिटे म्हणजे काहीच नाही. मधे ५ मिनिटांची सुटी असते ती आपल्याला हवी असते म्हणून. अर्थात् हे प्रौढ-प्रगत अभ्यासकांच्या वर्गांचे वर्णन आहे. पण तिथेही वर्ग सुरू झाल्यावर प्रवेश करणे हे धोक्याचेच अशी कडक शिस्त असते. गेली आठ दहा वर्षे ते नागपूरला चातुर्मास करतात. वर्षातून एक-दोनदा आठ-दहा दिवसाचा मुक्काम ठोकून स्वाध्याय शिबिर चालते. पी पी प्रॉजेक्टमध्ये त्यांचे मदतनीस म्हणून काम करताना आम्हाला हा स्वाध्याय उपयोगी होतो. यू.जी.सी. च्या उजळणी वर्गामध्ये पाहिले की, विद्येच्या क्षेत्रात दुर्बल पार्श्वभूमी असलेले शिकाऊ प्राध्यापक रेग्यांच्या खास जिव्हाळ्याचे विद्यार्थी असतात. आता कोडे असे पडते की अध्ययन आणि अध्यापन यांच्यात एवढी उंची आणि एवढे क्षितिज रुंदावलेल्या रेग्यांना राज्यसरकारने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देऊन त्या पुरस्काराचे वलय का बरे वाढवले नसेल?

रेग्यांचा पूर्वायुष्यात डॉ. आंबेडकरांशी संबंध आला. मुंबईत गेल्यावर महाराष्ट्रातल्या अनेक पुरोगामी चळवळींशी आणि मित्रमंडळीशी त्यांची आपोआपच जवळीक झाली. युवक क्रांतिदल ही युवकांची संघटना त्यातलीच. गोवर्धन पारीख, ए.बी. शाह, हमीद दलवाई यांचे ते अत्यंत विश्वस्त सहकारी होते. आणि या मित्रांच्या मृत्यूनंतर आजही त्यांचे कार्य ते पुढे नेत आहेत. द इंडियन सेक्यूलर सोसायटीशी संबंध किंवा द न्यू क्वेस्ट या द्वैमासिकाचे त्यांचे संपादन याच मैत्रीचे निदर्शक आहे. हमीदभाईंच्या तसेच अरुण लिमयांच्या कुटुंबीयांशी आणि त्यांच्या मृत्युपत्रातल्या तरतुदींशी उत्तराधिकाऱ्याच्या नात्याने अजून त्यांचा संबंध कायम आहे, जबाबदाऱ्यांचे निवारण सुरू आहे. हे सगळे पाहून मनाला कोडे पडते की एवढी लोकहितकारी कार्ये आयुष्यभर केलेल्या माणसाला पद्मश्री सारखे सन्मान मिळत नसतील तर मग ते कोणाला मिळतात? याही कोड्याला उत्तर आहे. ते हे की सत्कार्ये पुरेशी नाहीत. जाहिरातीची तुतारी सरकारी कानावर आदळावी लागते.

आम्ही नागपूरला रेगे मुंबई, पुणे, वाई अशा त्रिस्थळी, पत्रांना उत्तरे देणे याबद्दल त्यांचे संकेत काही वेगळे आहेत. ते कोडे असे सुटले. रसेलचा विद्यागुरू आणि पुढे ज्येष्ठ सहकारी असलेल्या व्हाइटहेडची गोष्ट. रसेलने एकदा गणितातली काही शंका पत्राने त्याला विचारली. वाट पाहून तारेने आठवण दिली. तरी उत्तर नाही. शेवटी खुद्द भेटून रसेलने शंका समाधान करून घेतले. पत्राचे उत्तर का दिले नाही म्हणून विचारले तेव्हा व्हाइटहेड म्हणाले, पत्रांची उत्तरे देत बसलो तर मग माझे काम केव्हा करू? रेग्यांकडून हा किस्सा ऐकल्यानंतर आम्ही उत्तरांची अपेक्षा करणे सोडून दिले. आमच्यापैकी पत्राने कोणी अभ्यासाच्या शंका विचारल्या तर मात्र रेग्यांची उत्तरे न चुकता येतात आणि तीही चांगली विस्तृत.

रेग्यांवर रागावणे सोपे नाही. मुंबईच्या तत्त्वज्ञानाच्या वर्तुळाचे अध्वर्यू प्रोफेसर चब हे पाश्चात्य शिस्तीचे कडवे भोक्ते. वक्तशीरपणाचा केवळ आदर्श. एकदा रेगे कीर्ती कॉलेजचे प्राचार्य असताना चबांनी त्यांच्याशी फोनवर भेटीची वेळ घेतली. ठरलेल्या वेळी चब गेले पण रेगे गायब. नुकतेच कुठे बाहेर गेले असे समजले. दुसरे कोणीही असते तर चबांनी जन्मात पुन्हा त्याचे तोंड पाहिले नसते. पण या प्रकारानंतरही चबांचे रेग्यांशी पूर्ववत् संबंध पाहून अंतरकरांनी त्यांना याचे रहस्य विचारले. त्यावर चब म्हणाले की काय करावे, रेग्यांवर रागावण्यात नुकसान आपलेच आहे. रेगे जानेवारीच्या २३ तारखेला सत्तर वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि भारतीय तत्त्वज्ञानाची आणि आपल्या समाजाची अशीच सेवा त्यांच्या हातून घडो ही शुभेच्छा.

शांतिविहार, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.