पुस्तक परीक्षण – समतामूलक पर्यावरणवादी वैश्विक समाजरचनेचा वेध

या विश्वपसाऱ्यामध्ये माणसाचे स्थान खरे तर बिंदुवत्. परंतु निसर्गाने बहाल केलेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रापेक्षा वरचढ ठरला, तर सुखासीनतेच्या लालसेतून एका शोषणयुक्त समाजव्यवस्थेचा तो प्रेरक ठरला. आज पृथ्वीवरील सृष्टीचे एकूणच अस्तित्व माणसाच्या विवेकी वा अविवेकी वागणुकीने ठरणार आहे. माणसाचे जीवसृष्टीतील नेमके स्थान, त्याच्या प्रेरक व कारक शक्ती, त्याच्या स्वभावाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील ईश्वरी प्रेरणेचे स्थान, मानवी जीवनाचे प्रयोजन हे नेहमीच अध्यात्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांचे चिंतनाचे विषय राहिले आहेत. श्री. श्रीकांत कारंजेकर यांनी लिहिलेल्या “वैश्विक जीवनाचा अर्थ ” या छोट्या पुस्तकातून अशाच प्रश्नांचा इहवादी दृष्टिकोनातून मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. श्री कारंजेकर जसे या विषयांचे अभ्यासक आहेत तसेच सामाजिक परिवर्तनाविषयी तळमळीने विचार करणारे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा अभ्यास करताना समतामूलक शोषणविरहित समाजव्यवस्थेच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने परिवर्तनाची दिशा कशी असेल व त्यात सामान्य माणसाची भूमिका काय राहू शकेल याचाही वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकातून केला आहे.

“विश्वाची निर्मिती” या पहिल्या प्रकरणातून विश्वाची निर्मिती, आकाशगंगेचे स्वरूप, त्यात पृथ्वीचे स्थान, तीवरील जीवनसृष्टीची निर्मिती, मानवी उत्क्रांतीचे टप्पे याविषयीची संक्षिप्त माहिती दिली आहे व शेवटी या निर्मितीमागे काही योजकत्व आहे का व त्यामागे ईश्वरी वरदहस्त आहे का हे प्रश्न उपस्थित केले आहेत. पुढील एका प्रकरणात या प्रश्नांचा विस्ताराने परामर्श घेऊन सविस्तर व मुद्देसूद चर्चा केली आहे. या चर्चेतून लेखकाने ईश्वराच्या अस्तित्वविषयक कल्पनेचे इहवादी दृष्टिकोनातून खंडन केले आहे. त्यासोबत हेही नमूद केले आहे की, “ईश्वराचे अस्तित्व मानून जीवन जगणाऱ्यांना जीवनाचे प्रयोजन काय या प्रश्नाचे तुलनेने सोपे उत्तर मिळाले आहे. इहवादी लोकांसमोर इतकी सोपी उत्तरे नाहीत. परंतु त्यांच्या जीवनाचेही नैतिक आधार आहेत.” सर्वसामान्य माणसाला त्याच्यापुढील खडतर जीवनाची वाटचाल करतांना ईश्वरी काठीचा आधार घेण्याची सोय असते व त्या मानसिक आधारावर तो आपल्या आयुष्यातील अपयश, निराशा झेलत जाऊन उद्यासाठीच्या सुखी जीवनाची आशा शोधत असतो. परंतु इहवादी माणसाला अशी सोय नसते. आयुष्यातले खाचखळगे समजून उमजून त्याला पार करावे लागतात व त्यासाठी त्याने आयुष्यात स्वीकारलेली नैतिक मूल्येच प्रेरक व आधारभूत ठरतात. एकापरी सामान्य माणसापेक्षा त्याचे जीवन जास्त खडतर असते.

“जीवनाचा अर्थ” या प्रकरणात लेखकाने मानवी जीवनाच्या प्रयोजनाची चर्चा केली आहे. सुखदुःखाची संवेदना व “मी” पणाची जाणीव ही संपूर्ण अखिल जीवसृष्टीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. परंतु इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत माणसात ही वैशिष्ट्ये जास्त प्रगल्भावस्थेत असतात. सुखदुःखाची जाणीव ही एक मूलभूत प्रेरणा आहे व माणसामध्ये या संवेदनांचा अत्युच्च दर्जाचा आविष्कार झालेला दिसतो. “मी पणाच्या जाणिवेमुळे प्रत्येक प्राणी स्वतःचे हित वा स्वार्थ बघत असतो. परंतु माणसामध्ये ही भावना केवळ शारीरिक मर्यादेने नियंत्रित नसते. त्यामुळे माणूस स्वतःसोबतच इतरांच्या “मी’पणाची दखल घेऊन इतरांच्या भल्याचाही विचार करू शकतो. स्वतःचा विचार करतांना समष्टीचाही विचार करू शकतो. अनागरी अवस्थेतून नागरी अवस्थेकडे वाटचाल करतानाच्या प्रत्येक विकासटप्प्यातून माणसाच्या मनात या वैश्विक “मी’पणाची जाणीव जास्त जास्त प्रगल्भ होत गेली. टोळी करून राहायला लागल्यापासून कुटुंबापर्यंत, जातिव्यवस्था आल्यावर आपल्या जातीपर्यंत, धर्मव्यवस्था निर्माण झाल्यावर आपल्या धर्मापर्यंत आणि राष्ट्रसंकल्पना उदयास आल्यानंतर राष्ट्रांपर्यंत या जाणिवेचे उदात्तीकरण तो करू शकला. विसाव्या शतकातील माणसाच्या आचाराविचारांतून कुटुंब, जात, धर्म, राष्ट्र यांची बंधने हळूहळू तुटून पडलेली दिसतात. म्हणून लेखकाला असा विश्वास वाटतो की, वैश्विक “मी”पणाची जाणीव माणसामध्ये रुजायला हा काळ सर्वात अनुकूल आहे.

समाज परिवर्तनाचा विचार करतांना मानवी स्वभावातील मर्यादांचेही भान ठेवणे आवश्यक आहे. “मानवी जीवनाचा पेचप्रसंग” या प्रकरणातून लेखकाने या मर्यादांचा विस्ताराने परामर्श घेतला आहे. गेल्या ५००० वर्षातील मानवेतिहासाचा आढावा घेतल्यास समाजव्यवस्था एका खडतर प्रक्रियेतून गेलेली दिसते. या विकासात प्रसंगी समन्वयाची व परस्परसहकार्याची भावना दृग्गोचर होत असली तरी ज्ञात इतिहासात प्रामुख्याने संघर्षाचे व हिंसेचे प्राबल्य राहिलेले दिसते. असे का व्हावे याचा कांही मूलभूत सत्यांच्या व मानवी स्वभाववैशिष्ट्यांच्या संदर्भात लेखकाने मागोवा घेतला आहे. यासाठी मानवी स्वभावाची गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्वार्थाची भावना ही सर्व प्राणिमात्रातील सहजप्रवृत्ती असली तरी इतर प्राण्यांप्रमाणे ती माणसात केवळ नैसर्गिक मर्यादेत राहात नाही, तर खूप व्यक्तिवादी रूप धारण करते. त्यामुळे प्रत्येक माणसाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन “व्यक्तिनिष्ठ” होतो. वैश्विक “मी”च्या जाणिवेने माणूस स्वार्थाला मर्यादा घालून कांही प्रमाणात निःस्वार्थी बनू शकतो. त्यामुळेच दुसऱ्याच्याही “व्यक्तिनिष्ठ” भूमिकेची तो कदर करू शकतो. असे असले तरीही माणसाच्या निःस्वार्थीपणाला मर्यादा आहेत. पैशाचे साम्राज्य असलेल्या आजच्या भांडवलशाही व्यवस्थेत माणूस जास्त स्वार्थी व व्यक्तिवादी झाला आहे. या व्यवस्थेत स्वार्थाची जी निरनिराळी प्रलोभने त्याच्यासमोर उभी आहेत ती नाकारणे आजच्या सर्वसामान्य स्थितीत शक्य नाही. पुढे कधी काळी नवीन समतामूलक पर्यावरणवादी समाजरचना उभी राहिल्यास माणसाची स्वार्थाची भावना कमी होऊन तो कदाचित जास्त निःस्वार्थी होऊ शकेल असे लेखकास वाटते.

सुखाभिलाषा ही सुद्धा माणसाची सहजप्रवृत्ती आहे. जाणूनबुजून माणसाने खडतर जीवन स्वीकारले तर ती अवस्था फार काळ टिकत नाही व कालांतराने माणूस परत सुखाभिलापी बनतो. याचे भान ठेवले नाही तर माणूस दुटप्पी बनतो. त्यामुळे परिवर्तनाचा विचार करतांना नव्या समाजरचनेत माणसाच्या प्राथमिक गरजांसोबत इतर सर्वसाधारण गरजा पूर्ण होतील याचे भान ठेवणे आवश्यक आहे. यासोबत हेही खरे आहे की आजच्या भांडवलप्रधान समाजरचनेत माणसाच्या गरजा बेलगाम वाढताहेत. त्यामुळे त्याची सुखासीनताही वाढतेच आहे. परंतु नैसर्गिक साधनांचा वारेमाप वापर करून व पर्यायाने पर्यावरणाचाच ऱ्हास करून सुखे चिरकाल ओरबाडता येणार नाहीत. बेगडी सुखासीनतेवर अंकुश घालावयाचा असल्यास पर्यावरणाशी संतुलन साधणारी नवी समाजव्यवस्था उभी करावी लागेल.

माणसाचे वागणेही सर्वकाळ सुसंगत नसते. कालानुरूप त्याच्या विचारात व आचारात बदल होत जातो. त्यामुळे पूर्वायुष्याच्या तुलनेत उत्तरायुष्यात माणसाचे वागणे विसंगत वाटू शकते. परंतु त्याच्या वागण्याची प्रेरणा अनुभवसिद्ध असल्यामुळे हा विसंगतीचा आविष्कारही प्रामाणिकच मानला पाहिजे. क्रांतीने, ध्येयाने किंवा एखाद्या विचारसरणीच्या प्रभावाने भारून जाणे हा देखील माणसाचा स्वभावधर्म आहे. तरीही प्रत्येकजण व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून एखाद्या क्रांतिविचाराकडे पाहत असल्यामुळे अशा परिवर्तनवादी शक्तीमधील सर्व घटकांमध्ये ध्येयाचा किंवा विचारसरणींचा प्रभाव सारखा नसतो. त्यामुळे परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल एकवाक्यता नसते. त्यामुळेच एका मुख्य क्रांतिविचाराचे पुढे अनेक पंथ झालेले दिसतात आणि या पंथाच्या पाइकांना आपलीच सिद्धांतप्रणाली योग्य असल्याची खात्री वाटते.

माणसाची सहिष्णुता वास्तविकरीत्या खूपच मर्यादित असते. कांही निवडक पाळीव प्राण्यांबद्दलचे ममत्वही अखिल जीवसृष्टीविषयीच्या सहिष्णुतेमध्ये परिवर्तित होत नाही. असे असले तरी काळानुरूप या सहिष्णुतेची, मर्यादाही वाढत गेलेली दिसते. आजच्या कालखंडात कुटुंब, जात, धर्म, वर्ग, राष्ट्र या सर्वांची बंधने तुटून जाण्याची शक्यता आहे व यामुळे त्याच्यामध्ये वैश्विक “मी’पणाची जाणीव रुजण्याच्या दृष्टीने ही परिस्थिती योग्य आहे अशी लेखकाची धारणा आहे.

आदिवासी कालखंडाचा अपवाद वगळता इतर कालखंडांमध्ये स्त्रीपुरुषसंबंधाचे नाते सदैव असमानतेचे राहिले आहे. साधारणतः सरंजामशाही समाजव्यवस्थेपासून स्त्रीला पुरुषाची गुलाम व खाजगी मालमत्ता बनविण्यात आले. आजच्या भांडवलशाही समाजव्यवस्थेत स्त्री बरीच स्वतंत्र होत असली तरी दुसरीकडे तिला बाजारातील उपभोग्य वस्तूंचे स्थान दिले जात आहे. विशुद्ध प्रेम, आंतरिक जिव्हाळा व एका “मी”ची दुसऱ्या “मी” शी एकरूपता या आधारावरून हे नाते समानतेचे राहू शकते. पुढील मानवी जीवनाच्या समृद्धतेसाठी हे आवश्यक आहे असे लेखकास वाटते.

मानवेतर प्राण्यांमध्ये जगण्याची पद्धत मूलभूत नैसर्गिक स्वरूपात असल्यामुळे त्यांच्यातील हिंसेची भावना शारीरिक भूक शमविण्याइतकीच नैसर्गिक असते. परंतु माणसात त्याच्या विकसित बुद्धीमुळे एक प्रकारचा परात्मभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे माणसाची हिंसा इतर प्राण्यांच्या हिंसेसारखी निर्हेतुक व नैसर्गिक नसते. मानवेतिहासात माणसांनी परस्परांवर वर्चस्व गाजविण्यासाठी, दुसऱ्याचे शोषण करण्यासाठी वा दुसऱ्याचे शोषण नष्ट करण्यासाठीही हिंसेचा आधार घेतलेला दिसतो. परंतु माणसात वैश्विक “मी”- पणाची जाणीव ज्या प्रमाणात रुजेल त्या प्रमाणात मानवी जीवनातील हिंसेची भावना कमी होईल असे लेखकास वाटते.

प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यक्तिनिष्ठ भूमिकेतून तिला ज्याप्रकारे सत्याचे आकलन होईल त्याप्रमाणे जगत असते व तिला दिसणारे सत्यदर्शन हेच फक्त खरे आहे असे प्रत्येक माणूस मानत असल्यामुळे तो स्वमताविषयी आग्रही असतो.

जगताना कशामध्ये तरी भावनेने गुंतून जाणे हाही माणसाचा स्वभावधर्म आहे. त्यामुळेच माणसे आयुष्यात काही भव्य, दिव्य करायला तयार होतात. ही गुंतून जाण्याची प्रक्रिया टाळायची म्हटले तर माणूस भावनिक सखोलता, सहृदयता व ममत्व या गोष्टींना पारखा होईल.

माणसाच्या सर्व शुभाशुभ प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व “मी”च करीत असल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये जसा बुद्ध असतो तसा चंगीजखानही असतो, जसा गांधी असतो तसा हिटलरही असतो, व हीच मानवी जीवनाची खरी शोकांतिका आहे.

भविष्यातील शोषणमुक्त समतामूलक समाजरचनेचा विचार करताना मानवी स्वभावातील उपरिनिर्दिष्ट वैशिष्ट्यांचा व गुंतागुंतीचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार व्हावा म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे पाऊल योग्य दिशेने पडण्यास मदत होईल असे लेखकास वाटते.

“बहुपरिमित वास्तव” या प्रकरणात जीवनातील मूलभूत सत्ये व सापेक्ष सत्ये यांविषयीची चर्चा आहे. ज्या वास्तवामध्ये माणूस जगत असतो ते मूलभूत सत्ये व सापेक्ष सत्ये यांच्या सरमिसळीतून बनत असते. त्यामुळे या वास्तवाला बहुपरिमित आयाम प्राप्त होतात. वास्तवाचा अनुभव माणसाला त्याच्या “मी” पणाच्या जाणिवेतून होत असल्यामुळे तो वास्तवाकडे व्यक्तिनिष्ठ भूमिकेतून व बहुपरिमित आयामाच्या नजरेने बघत असतो. त्यामुळेच माणसाला अथवा समूहाला त्याच्यापुरते जसे वास्तवाचे आकलन होते तशी त्याची कृती ठरते. याचाच अर्थ असा की वेगवेगळ्या व्यक्तींना अथवा समूहांना एकाच वास्तवाचे आकलन कदाचित वेगवेगळ्या प्रकारे होईल व त्याप्रमाणे त्यांची कृतीही भिन्न ठरेल. सामान्य जीवनातील काही उदाहरणे घेऊन लेखकाने हा मुद्दा स्पष्ट केला आहे. या बहुपरिमित वास्तवाच्या स्वरूपामुळेच सापेक्ष सत्याची इष्टानिष्टता ठरत असल्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींना वा समूहांना वास्तवाच्या बहुकोणीय स्वरूपाचे भान ठेऊन परिवर्तनाचा इष्ट मार्ग व त्या मार्गाचे टप्पे ठरवावे लागतील अशी लेखकाची धारणा आहे.

“सद्यःस्थितीतील समाजव्यवस्था” या प्रकरणात माणसाच्या ज्ञात इतिहासातील विकासाच्या टप्प्यांचा आढावा घेऊन आजच्या मानवी समाजव्यवस्थेची विस्ताराने चर्चा केली आहे. या भांडवलशाही समाजव्यवस्थेत उत्पादनाचा उद्देश गरजेकरता नसून बाजारपेठेसाठी व केवळ नफा कमविण्यासाठी असल्यामुळे पैसा कमाविण्यालाच आजच्या जगात सर्वोच्च प्राधान्य मिळाले आहे. नवनवीन वस्तूंचे उत्पादन करून कृत्रिम गरजा निर्माण केल्या जातात व त्यामुळे या यंत्रयुगात माणसाला स्वतंत्र अस्तित्व उरले नसून तो उपभोग्य वस्तूंचा गुलाम झाला आहे. उपभोग्य वस्तूंच्या मुबलकतेमुळे माणसाच्या कृत्रिम गरजाही वाढत चालल्या आहेत. वाढत्या सुखवस्तूपणासोबत माणसाचा हावरटपणा व ओरबाडण्याची प्रवृत्तीदेखील वाढीस लागली आहे. त्यामुळे एका बाजूला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेला, पर्यावरणाचा नाश करणारा, प्रचंड प्रमाणात ऊर्जावापर करणारा, वाढत्या गरजा व वाढते उत्पादन यांच्या दुष्टचक्रात सापडलेला शोषण करणारा समाज वा समाज घटक आहे, तर दुसऱ्या बाजूला दैनंदिन किमान व अत्यावश्यक गरजाही भागवू न शकणारा शोषित घटक आहे. शोषणाची ही प्रक्रिया वर्ग, समाजघटक, राष्ट्र, निसर्ग अश्म विविध स्तरांवर आहे. जंगलाचा नाश, पर्यावरण ऱ्हास व प्रदूषण, आजची कृषिव्यवस्था व शेतकऱ्यांची दुरवस्था, विकासाच्या प्रक्रियेचे स्वरूप, ऊर्जाविनियोग, नियोजनाचे स्वरूप, या शोषित समाजातील शासन व्यवस्था व दहशतवाद, लोकसंख्यावाढ, आजच्या विज्ञान व संशोधनाचे स्वरूप आणि त्याचा जनमानसावरील प्रभाव, शारीरिक व बौद्धिक श्रमांचे स्वरूप, आजच्या समाजव्यवस्थेतील जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून उद्भवलेले मानसिक ताणतणाव व व्यसनाधीनता – अशा विविध मुद्द्यांचा परामर्श घेऊन लेखकाने आजच्या समाजव्यवस्थेचे स्वरूप विस्ताराने स्पष्ट केले आहे. आजच्या समाजव्यवस्थेचे हे चित्र काहीसे निराशाजनक असले तरी माणसाच्या सुजाणतेवर लेखकाचा विश्वास आहे. त्यामुळे यातून मार्ग निघेल व योग्य परिवर्तनाच्या दिशेने जग मार्गक्रमण करील अशी लेखकास आशा वाटते.

यापुढील प्रकरणात लेखकास जाणवणारे भविष्यातील समाजरचनेचे स्वरूप कसे असेल याविषयीचे विवेचन आहे. सर्वसामान्य माणसे परिस्थितिशरण असली तरी भविष्यातील आदर्श समाजाची स्वप्ने ज्यांना पडतात तेच परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. म्हणूनच परिवर्तनाची आच असणाऱ्या व्यक्तींचा व समूहांचा परिवर्तनासंबंधीचा दृष्टिकोन कसा आहे याचा परिवर्तनाची दिशा कशी राहील हे ठरविण्यात वाटा राहील. लेखकाच्या चिंतनाप्रमाणे भविष्यातील ही समाजरचना समतामूलक, पर्यावरणवादी व वैश्विक असेल. सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्यावर, माणसासाठी अत्युच्च दर्जाचे सुख (केवळ भौतिक सुख नव्हे) मिळवून देण्यावर व दुःख किमान पातळीवर ठेवण्यावर तिचा भर राहील. पृथ्वी ही एकट्या मानवी जीवनसंवर्धनासाठी नाही तर सर्व जीवसृष्टीसाठी आहे या भूमिकेतून नैसर्गिक संसाधनांचा वापर होईल. संपूर्ण जीवसृष्टीमध्ये “मी” असल्यामुळे व माणसामध्ये वैश्विक “मी” पणाची जाणीव असल्यामुळे तो फक्त वैश्विक समाजरचनेत संपूर्ण सुखी राहू शकतो. त्याच्या “मी”पणाला जात, धर्म, वर्ग, राष्ट्र यांच्या सीमा मानवणार नाहीत. या मूलभूत संकल्पनेच्या आधारे भविष्यातील समाजरचनेतील इतर वैशिष्ट्यांचे लेखकाने सविस्तर विवेचन केले आहे. अशा प्रकारची समाजरचना खरोखरच अस्तित्वात येईल काय? लेखकाला वाटते की याचे उत्तर सर्वांच्या आंतरिक इच्छाशक्तीवर व सामूहिक प्रयत्नावर अवलंबून राहील. तसेच अशा प्रकारची समाजरचना अस्तित्वात येण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे निखळ लोकशाहीवादी राहतील. भविष्यातील समाजरचनेचा असा आराखडा आदर्शवादी व स्वप्नरंजनात्मक भासला, व तो वास्तवात येण्याच्या शक्यतेविषयी संभ्रम असला, तरी इहवादी माणसांनी आजच्या समाजरचनेचा अर्थ लावून भविष्यातील सुयोग्य विश्वाची तार्किक कल्पना केली तरी काय बिघडणार आहे? उलट अशा आराखड्याच्या समग्र आकलनामुळे अंधारात चाचपडण्याची परिस्थिती न येता परिवर्तनाच्या दिशेने एखादे तरी पाऊल टाकण्यास मदत होईल अशी लेखकाची भूमिका आहे.

शेवटच्या प्रकरणात सद्यःपरिस्थितीतून परिवर्तनाच्या दिशेने वाट कशी काढता येईल याविषयीचे दिग्दर्शन आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या परिवर्तनाचे पाईक कोण असतील? सर्वसामान्यपणे क्रांतिकारी, असामान्य धैर्याच्या धनी, सुखाच्या वाटेकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविणाऱ्या, आदर्श त्यागी, निःस्वार्थी अशा व्यक्ती डोळ्यांसमोर येतात. या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की, या संदर्भात लेखकाने सर्वसामान्य माणसांवर विलक्षण विश्वास दर्शविला आहे व ते परिवर्तनाचे वाहक असू शकतात हे ठामपणे मांडले आहे. या दृष्टीने लेखकाचे विवेचन मुळातच वाचण्यासारखे आहे. “सर्वसाधारणपणे सामान्य माणसे परिवर्तनवादी का असू नयेत? दहा रुपयांची लाच नाकारणारा, जातीच्या आधारावर सवलती नाकारणारा, हुंडा न घेता साधेपणाने लग्न करणारा, आंतरजातीय विवाह करून जातिव्यवस्थेला नाकारणारा, आपल्या मुलांना कॉन्व्हेन्टमध्ये न पाठविता जाणूनबुजून मातृभाषेतून शिक्षण देणारा यापैकी कोणीही परिवर्तनवादी का मानू नये? मर्यादित सुखाभिलाषेने जगणारा परंतु कोणतेही ढोंग वा अवडंबर न माजविणारा, दुटप्पी नसलेला प्रामाणिक माणूससुद्धा परिवर्तनशील असू शकतो. व्यवस्थापरिवर्तनाच्या प्रक्रियेत आपल्याला सर्वांना सहभागी करून घेता आले पाहिजे. आजच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत छोटे, मध्यम, मोठे प्रयत्न या सर्वांचे योगदान लक्षात घ्यावे लागेल.”

या छोटेखानी पुस्तकातून श्रीकांत कारंजेकरांनी काहीसा गहन वाटणारा विषय सर्वसामान्य वाचकाला समजेल अशा सुबोध पद्धतीने मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यातील विवेचन अतिशय अभ्यासपूर्ण, मुद्देसूद व उद्बोधक आहे. शेवटी उपसंहार, टीपा व संदर्भ-वाङ्मय सूची दिलेली आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचकांची सोय झालेली आहे. सर्वसामान्य लोक परिस्थितीसमोर हतबल होतात. परंतु लहान सहान घटनांमधून सामान्य माणूसही ताकद मिळवू शकतो आणि सामाजिक नीतिमूल्यांच्या व विवेकाच्या आधाराने जीवन जगून व्यवस्थापरिवर्तनाच्या प्रक्रियेत आपला खारीचा वाटा उचलू शकतो असा व्यक्त झालेला आशावाद ही या पुस्तकाची मोठी देणगी आहे. एका विचारप्रवर्तक व सुंदर पुस्तकाच्या निर्मितीबद्दल लेखक अभिनंदनास पात्र आहे.

पानोपानी आढळणारे मुद्रणदोष हे या पुस्तकास लागलेले एकमेव गालबोट आहे व यातून प्रकाशकाचा निष्काळजीपणा दिसून येतो. कांही मुद्द्यांची झालेली पुनरुक्ती व अधूनमधून डोकावणारा लेखकाचा “मी” हे गौण अपवाद सोडले, तर हे पुस्तक लेखकाच्या हातून चांगलेच उतरले आहे व लेखकाकडून पुढील पुस्तकाविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गोपुरी, नालवाडी, वर्धा ४४२००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.