पत्रव्यवहार

आजचा सुधारकच्या चौथ्या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या (एप्रिल-मे १९९३) जोड अंकाच्या संपादकीयातील मला महत्त्वाची वाटलेली वाक्ये उद्धृत करून त्यांना अनुलक्षून मी काही सूचना करू इच्छितो. ही वाक्ये अशी- “बालमृत्यू घडवून आणणाऱ्या कारणांना न सुदृढ होत जुमानता आजचा सुधारक ज्या चिवटपणाने उभा आहे त्यावरून हे बाळ असेच जाईल आणि दीर्घायुषी होईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. परंतु ते अजून स्वावलंबी होण्याइतके सुदृढ झालेले नाही हेही सांगितलेच पाहिजे.”

(अ) मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराविषयीच्या सूचना

१) कोणताही लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा म्हणजे मासिकाच्या तीन पानांइतकाच राहील याची सर्व लेखकांनी कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे. अन्यथा, संपादकांनी आपला संपादकीय अधिकार वापरून तो या मर्यादेत बसवावा. २) ‘पत्रव्यवहार’ सदराखालील मजकूर जास्तीत जास्त तीनशे शब्दांचा म्हणजे मासिकाच्या एक पानाइतकाच राहील याची खबरदारी वाचकांनी घेतली पाहिजे. अन्यथा, वरीलप्रमाणे संपादकांनी आपला अधिकार बजावावा. ३) मजकूर पाल्हाळकारक न करता आपल्याला जे मुद्दे मांडायचे आहेत किंवा जे खोडून काढायचे आहेत त्यांचा, लेखकावर शेरे न मारता किंवा ताशेरे न उडवता, मोजक्या व निःसंदिग्ध शब्दांत परामर्श घेतल्यास वरील दोन सूचना सहज अमलात येतील व संपादकांवरही कटुकर्तव्य पार पाडायची पाळी येणार नाही. ४) मजकुरात तात्त्विक काथ्याकूट, शब्दांचा कीस काढणे, चर्वितचर्वण, आणि ‘ बोजडपणा राहणार नाही याची लेखकांनी काळजी घ्यायला हवी. ‘ॲकॅडेमिक’ चर्चा, परिसंवादातील प्रबंध यासारखे त्याचे स्वरूप न ठेवता ते जास्तीत जास्त सुबोध कसे होईल याचा विचार करून विषयाची मांडणी जितकी चित्तवेधक करता येईल तितकी ती करण्याचा प्रयत्न व्हावा. समजायला अवघड आणि क्वचित रूक्ष वाटणारा विषयही लेखक किती सहजतेने आणि आकर्षक शैलीत मांडू शकतो हे काही इंग्रजी व मराठी लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांवरून स्पष्टपणे समजते. ५) बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकशीलता यांची दैनंदिन जीवनाशी सांगड कशी घालता येईल, त्यासाठी आचरणात कोणते परिवर्तन करावे लागेल हा सर्व लिखाणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. केवळ सैद्धान्तिक लिखाण नसावे.

(ब) सर्वसामान्य सूचना

१) मासिक प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित असावी. एखादा अंक महिन्याच्या प्रारंभी मिळतो तर एखादा तिसऱ्या, चौथ्या आठवड्यात मिळतो असे होऊ नये. मासिक प्रकाशित होण्याच्या तारखेची माहिती वर्गणीदारांना द्यायला हवी. आगरकर, र. धों. कर्वे, हे एक-एकटे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपापल्या नियतकालिकांच्या प्रकाशनाची नियमितता कटाक्षाने पाळत होते, तर मग त्यांच्या तुलनेने अत्यंत अनुकूल परिस्थिती असलेल्या आणि एक-दोन नव्हे तर दहा व्यासंगी विद्वानांच्या संपादक मंडळाने समृद्ध-संपन्न असलेल्या ‘आजच्या सुधारकाला’ ही गोष्ट का जमू नये ? २) एखाद्या महिन्यात अंक न काढता त्याच्या पुढील महिन्यात जोड-अंक काढायचा झाल्यास यासंबंधीची पूर्वसूचना अगोदरच्या अंकात द्यायलाच हवी. ३) वर्गणीदारांची नावे, पत्रे, त्यांची वर्गणी केव्हापासून केव्हापर्यंत आहे, या सर्वांची अचूक नोंद व्हायला हवी. ४) या मासिकाने अंगीकारलेल्या प्रबोधन कार्याशी तरुण पिढीला कशाप्रकारे निगडित करता येईल याचा विचार व्हावा व त्या दिशेने काही निश्चित उपक्रम सुरू करण्यात यावे. हे मासिक सुदृढ करण्याच्या कामी तिचा सहभाग आवश्यक आहे. ५) वाचकांचे-वर्गणीदार नसलेले सुद्धा – वेळोवेळी मेळावे भरवून त्यांचे विचार, सूचना जाणून घेतल्या जाव्या. वरील सूचनांवरही वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्याव्या. र. वि. खांडेकर श्रीधाम, रहाटे कॉलनी- नागपूर – ४४० ०२२

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा विचारवेध संमेलन (१९, २० फेब्रुवारी १९९४) कार्यालय – ‘मुक्तांगण’, ४९० अ, गुरुवार पेठ, सातारा ४१५००२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीतर्फे पहिले राज्यव्यापी ‘विचारवेध’ हे संमेलन दि. १९ व २० फेब्रुवारी रोजी सातारा येथे भरविले जात आहे. विसाव्या शतकातील निरनिराळ्या क्षेत्रांतील घडामोडींचा चिकित्सक आढावा यानिमित्ताने घेतला जाणार असून या वर्षी हे संमेलन विसाव्या शतकातील धर्मविषयक घडामोडींवर होणार आहे. सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ प्रा. मे. पुं. रेगे यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. य. दि. फडके यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होईल.

प्रा. रेगे यांचे अध्यक्षीय भाषण ‘विसाव्या शतकातील धर्मचिंतन’ या विषयावर होईल. अध्यक्षीय भाषणाखेरीज ‘विसाव्या शतकातील धर्माचा राजकारणावरील प्रभाव,’ ‘विसाव्या शतकातील विविध धर्मांमधील नवे प्रवाह’, ‘लोकांच्या धार्मिकतेमुळे जमात- वादाला खतपाणी मिळते काय?’ व ‘विसाव्या शतकातील धर्मनिरपेक्षता असली किती ? नकली किती ?’ या विषयांवर परिसंवाद होणार आहेत. या सर्व परिसंवादांमध्ये डॉ. नलिनी पंडित, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा. भा. ल. भोळे, प्रा. गंगाधर मोरजे, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. सदानंद मोरे, प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, श्री अब्दुल कादर मुकादम, प्रा. राम बापट, डॉ. अशोक मोडक, श्री कुमार केतकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. चौसाळकर आदि मान्यवर सहभागी होणार आहेत.

या संमेलनासाठी परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची भोजन व निवासव्यवस्था रु. १२५/- शुल्क घेऊन केली जाईल. इच्छुक व्यक्तींनी आपली आगाऊ नोंदणी १५ जानेवारी १९९४ पर्यंत रु. १२५ ची मनीऑर्डर, चेक किंवा डी.डी. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी’ या नावाने कार्यवाह, डॉ. आंबेडकर अकादमी, ‘मुक्तांगण’, ५९० अ, गुरुवारपेठ, सातारा ४१५००३ या पत्त्यावर पाठवावी.

किशोर बेडकिहाळ, कार्यवाह साभार पोच कमळकाचा, ले. सुमती लांडे (अक्षर चळवळ प्रकाशन, ३ श्रीनाथ अपार्टमेंट, ३, हनुमान चौक, मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१). मूल्य रु. पन्नास. दुसऱ्या फाळणीपूर्वीचा भारत, ले. दत्तप्रसाद दाभोळकर (मनोविकास प्रकाशन, आमदार निवास आवार, चर्चगेट, मुंबई ४०० ०३२) किंमत रु.८०/- आम्ही बिघडलो : ले. अनुताई लिमये (समाजवादी महिला सभा, पुणे) कि ६० रु.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.