गोमंतकातील रसोत्सव

गर्दीचा निकष लावला तर गेल्या महिन्यात गोव्याला झाले तसे साहित्य संमेलन आधी कधी झाले नाही. या गर्दीचे मानकरी तिघे. साहित्य, सृष्टिसौंदर्य आणि शेवाळकर. वहाड आणि मराठवाड्यातले जुने प्रियजन कितीतरी वर्षांनी तिथे भेटले. शेवाळकरांचे अध्यक्षपद आपल्याच माणसाचा बहुमान समजून आलेले.
खुद्द गोंयकराची तर सत्त्वपरीक्षेची वेळ होती. कोंकणी ही तिथली बोलभाषा, ती राजभाषा झाली आणि मराठीला मात्र मज्जाव. सर्वोच्च न्यायालयाने भलेही न्याय दिला, तरी सरकार दाद देत नाही. त्यामुळे तो चिडलेला. मराठीभाषिकांचे विराट शक्तिप्रदर्शन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हा शेवटचा धक्का द्यायचा असा निर्धार केलेला.
पार्श्वभूमी ही अशी. समुदाय मोठा जमेल ही अपेक्षा. पण तीही दरिद्री वाटावी अशी गर्दी झाली. जगन्नाथाचा रथोत्सवच जणू. अठ्ठावीस तारखेला लोकांचे लोंढ्यामागून लोंढे फुटत होते. खुद्द पणजीची हॉटेले शिगोशीग भरली. तेव्हा म्हापसा, फोंडा अशा ठिकाणच्या हॉटेल-होस्टेलची नावे निघू लागली. आपली सोय पणजीत नाही दूरच्या गावी कुठेतरी आहे या कल्पनेने भेदरलेले लोक दिसू लागले. चिडाचीड ऐकू येऊ लागली. यातली खरी गंमत अशी की गोव्याच्या भूगोलाचे आपल्याला ज्ञान नसते. तिथल्या वाहतुकीच्या सोयी माहीत नसतात. मापुसा-गोंयकर म्हापशाला मापुसा म्हणतो- पणजीपासून बसने जेमतेम अर्ध्या तासावर. बसेस दर १०-१५ मिनिटांनी. आणि भाडे फक्त अडीच रुपये. बसेस सरकारी जितक्या त्याहून खाजगी जास्त. रिक्षा आहेतच; पण मोटरसायकल हाही एक भाडे-वाहन प्रकार आहे. एकट्या सुटसुटीत प्रवाशाला नेणारे मोटर-सायकलस्वार सज्ज असतात. बसने अर्धा तास लागतो ते अंतर हे १५-२० मिनिटांत कापतात. रस्ते छान आहेत. स्वच्छता डोळ्यात भरते.
गोव्याचा भूगोल माहीत नसल्याने कधी कधी विनोद घडतात. तीनचार वर्षांपूर्वीची गोष्ट. गोव्यात रामनाथीला संस्कृत पंडित आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक यांचे एक शिबिर होते. पणजीहून आपल्या मुक्कामी कसे पोचायचे याचे प्रोफेसर रेग्यांचे एक रसभरीत माहितीपत्र रवाना झाले होते. त्यावर राजस्थान विद्यापीठातले जयपूरचे तत्त्वज्ञानातले एक मिाराजे यांचे रेग्यांना पत्र आले की, पणजीहून पुढे कसे जायचे ते कळले, पण मुख्य राहिलेच. गोव्याहून पणजीला कसे जायचे ते तुम्ही लिहिलेच नाही ! का आपला देशच इतका मोठा आहे की कोणी कोणाला हसू नये. महाराष्ट्रात देखील लोक गोवा हे गाव समजतात. एका लहान जिल्ह्याएवढा हा प्रदेश दहा वर्षे केंद्रशासित होता. आता स्वतंत्र राज्य झाला आहे.
तीन दिवसांचे संमेलन खरे तर अडीचच दिवसांचे असते. पहिल्या दिवशी संध्याकाळी उघडते. त्यात पाचसहा परिसंवाद. एक महाकविसंमेलन, एक लहानांचे. मुलाखती, मनोरंजन असे भरगच्च कार्यक्रम. संख्येचे विराटपर्व उद्घाटनाच्या वेळी जाणवले. व्यासपीठावरही मंडपासारखीच गर्दी. पहिल्या रांगेत उत्सवमूर्तीच्याच तेरा खुा. मागच्या रांगेत निदाम तेवढ्याच असतील. संमेलनाला सर्व पूर्वाध्यक्षांना व्यासपीठावर बसवण्याची परंपरा बंद करायची वेळ कधीतरी येणार आहेच. कारण आयुर्मान वाढत चालले हे एक आणि हजेरी लावण्याचा सोसही कमी होत नाही हे दुसरे. हे साहित्य संमेलन ६६ वर्षांचे झाले आणि त्यात एक पूर्वाध्यक्ष आपला ९४ वा वाढदिवस साजरा करताहेत असे दृश्य यावेळी दिसले.
साहित्य संमेलनाचे अंतरंग किती बदलत चालले आहे पाहा ! साहित्यानंद ही सविकल्प समाधीच आहे अशी औपपत्तिक चर्चा अध्यक्षीय भाषणात आता कोण करू धजणार? साहित्यिक प्रश्नांची जागा अस्तित्वाच्या प्रश्नांनी घेतली आहे. मराठी ही राजवाड्यांच्या भाकिताप्रमाणे मेली नाही, पण उपेक्षेचे जिणे जगते आहे याची खंत अध्यक्षीय भाषणात आणि सर्वच भाषणांत होती. शेवाळकरांच्या मीमांसेप्रमाणे याची कारणे दोनः राज्यकर्त्यांच्या ठिकाणी प्रबळ इच्छाशक्ती नाही हे एक, आणि मराठी माणसाचे औदासीन्य हे दुसरे.
दूरदर्शनच्या दडपणामुळे भाषणे आटोपशीर आणि उद्घाटन देखणे झाले.
कविसंमलेन हा आयोजकांसाठी मंत्रिमंडळ बनवण्याइतका अवघड प्रकार असतो. राजकीय चातुर्य वापरून हल्ली त्यात एक तडजोड काढण्यात आली आहे. मुख्य कविसंमेलनात आमंत्रित कवींनीच फक्त एक कविता म्हणायची. कविकट्ट्यावर मात्र मुक्तांगण. आपल्या व-हाडात महालक्ष्म्या मांडतात, त्यावेळी ज्येष्ठा-कनिष्ठांच्यापुढे त्यांची बाळेही सजवून बसतात, तसे मुख्य मंडपाशेजारी एक लघुमंडप उभारला होता, तो कविकट्टा. खरे कविसंमेलन एकत्रच- एकाच रात्री. पण कविकट्याला काळ नाही. वेळ नाही. त्या लघुमंडपात कवीच कवी. माइकवरचे खुर्त्यांवर आणि खुर्त्यांवरचे माइकवर असा खो खो तिन्ही दिवस चाललेला. मुख्य मंडपात काही चालो न चालो, हे काव्यकुंड सदा पेटलेले असे. पण आयोजकांनी तरुण पिढीच्या धुमसत्या प्रतिभेला अशी वाट दिली नसती तर मुख्य कार्यक्रमांची काही खैर नव्हती. उमेदवार नवकवी नावाचा त्रस्त समंध शांत होण्याचे कविकट्टा हे मोठे उपयुक्त ठिकाण झाले आहे.
गोमंतकाचे सौंदर्य आणि रससिद्ध आतिथ्य चहुबाजूंनी खुणावत असता दिवसातले चार चार परिसंवाद कोण ऐकणार ! पण त्याने बिघडले मात्र फारसे नाही. कोणत्याही वेळी हजार-दोन हजार श्रोते समोर बसलेले दिसल्यावर वक्त्यांचे अवसान कमी होण्याचे कारण नव्हते.
‘मराठी साहित्याने माझ्या कलेला काय दिले हा दुसऱ्या दिवशीचा पहिला परिसंवाद. तो सुरू असताना – तिकडे मंडपात एक आणि बाहेर दुसरे तळवलकर गाजत होते. शरद तळवलकरांनी ‘भावबंधनातला कामण्णा आणि एकच प्यालातला तळीराम यांचे विनोदी संवाद (पुष्कळ – बहुसंख्य श्रोते ते पहिल्यांदाच ऐकत होते) श्रोत्यांना ऐकवून हासवले. गडकरी शब्दसृष्टीचे ईश्वर. विसंगती, अतिशयोक्ती, कारुण्य यांच्याद्वारे नाट्य मूर्तिमंत उभे करण्याचे त्यांचे सामर्थ्य त्यांच्या साहित्यपठनाने आपण आत्मसात केले अशी पावती त्यांनी दिली. त्यांच्या मुखातून तळीरामच बोलतो आहे असे वाटत होते.
दुसरे तळवलकर, भाषण की कीर्तन ? असा अग्रलेख लिहून महाराष्ट्र टाइम्समधून शेवाळकरांना हिणवत होते. गोविंदराव तळवलकर मराठीतले अग्रगण्य पत्रकार. पण मुंबईची जागतिक मराठी परिषद असो की भारतीय पातळीवरचे गोव्यातले मराठी साहित्य संमेलन, त्यांच्या हेटाळणीचा विषय का व्हावा समजत नाही.
शेवाळकरांच्या मुद्रित भाषणात कीर्तनपरंपरेचा वारसा सांगितला आहे. तळवलकर दोघांवरही उखडले आहेत. तळवलकरांना लो. टिळकांच्या मालिकेतले पत्रकार मानतात. स्वतः टिळकांना कीर्तनकार होता आले नाही याची खंत होती. ज्ञानदेवांनी शारदेचे नमन करताना तिला ‘अभिनव वाग्विलासिनी’, ‘विश्वमोहिनी असी विशेषणे वापरली आहेत. मग तळवलकरांना वाक्चातुर्याचे एवढे वावडे का?
धार्मिक विषय, शिवाजी महाराज अशा विषयांवर व्याख्याने दिली की वक्ता लोकप्रिय होतो हे त्यांचे म्हणणे पटण्यासारखे नाही. दहा दहा हजार श्रोत्यांसमोर ‘कालिदासाच्या नायिका या विषयावर व्याख्यान देऊन त्यांना खिळवून ठेवण्याची किमया शेवाळकरच करू जाणोत. पण हे तळवलकरांना माहीत नसावे. कीर्तन मुळात भक्तिमार्गी आहे, चिकित्सेचे नाही हे त्यांचे म्हणणे मान्य केले, तरी ते येथे अप्रस्तुत आहे. कारण त्याच अग्रलेखात अभिव्यक्ति-स्वातंत्र्यासंबंधी शेवाळकरांनी स्पष्ट विचार मांडले याबद्दल त्यांना शाबासकी दिली आहे. त्याबाबत केलेला युक्तिवाद लक्षात घेण्यासारखा आहे अशी कबुली दिली आहे. म. टा. च्याच अशोक जैनांनी मात्र शेवाळकरांच्या समारोपाच्या भाषणाला मनापासून दाद दिली आहे.
मुळात शेवाळकर लोकसंग्राहक. चाळीस वर्षांपूर्वी वाशीमला आरंभीच्या दिवसात नुकतीच लोकमान्यता मिळवू लागले होते. त्या भरीच्या दिवसातही त्यांनी एक भान ठेवले होते. स्तुती आणि निंदा एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत. एक आली की दुसरी येणारच. म. टा. कारांनी नाण्याची मागची बाजू होणे पत्करावे याला कोण काय करणार? वणी-पांढरकवडा, पुसद ते परतवाडा, लाखनी भंडाऱ्यापासून मेहकर-रिसोडपर्यंत आडवा उभा विदर्भ शेवाळकरांनी साहित्याभिमुख केला आहे. मराठवाड्याची माझी माहिती शब्दप्रामाण्यावर आधारित आहे. उद्घाटनवेळी मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष सुरेश द्वादशीवार कोणाला उद्देशून म्हणाले ते नीट ऐकायला आले नाही. पण ऐकायला आले ते असे की, शेवाळकर नुसते साहित्यिक नाहीत, कार्यकर्ते साहित्यिक आहेत. त्यामुळे म. टा.च्या दिवशीच्या अग्रलेखात संपादकांच्या पूर्वग्रहांनी नेहमीच्या विवेकावर मात केली असे मात्र वाटले.
अशोक रानड्यांनी संगीतकलेला शब्दकलेची जोड कशी उपकारक झाली ते सांगितले. संस्कृत साहित्यशास्त्राच्या उपपत्तीप्रमाणे रसनिर्मिती हे काव्याचे साध्य, निर्माता कवी असो की संगीतकार त्याची निर्मिती रसिकांपर्यंत पोचवण्याचे भांडे रसवाहक. म्हणून ते नटाला पात्र म्हणतात. ही उकल मोठी उद्बोधक वाटली.
आजच्या साहित्याला सामोरे जाण्यास समीक्षा अपुरी पडते’ या दुपारच्या परिसंवादात आनंद यादव, प्रा. दत्ता भगत हे अस्तिपक्षाचे प्रवक्ते. भगत तरुण रक्ताचे तळमळीचे कार्यकर्ते. त्यांचे म्हणणे, प्रस्थापितांना उपेक्षितांचे अंतरंग समजणारच कसे ? माणसाला जात चोरून जगावे लागणे, भडवा हा पोटापाण्याचा धंदा असणे, ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत. ‘चर्चची बेल वाजली, सारे आत गेले. मशीदीतून बांगआली, सारे आत गेले. देवळातून आरतीची घंटा वाजली अर्धे आत गेले, अर्धे बाहेरच राहिले.’ या ओळींमध्ये काव्य दिसायला तुम्ही सोसलेले असायला पाहिजे. सौ. अ.ना. आठवले यांचे म्हणणेही लक्षात घेण्यासारखे होते. समीक्षा हा ज्ञानात्मक व्यवहार आहे. समीक्षा कधीही पुरेशी नसते, तरी समीक्षक हवेतच हा मुद्दा त्यांनी श्रीमान योगी ही रणजित् देसाईंची कादंबरी, रायगडाला जेव्हा जाग येते, इ. लोकप्रिय कलाकृती, त्यांचे लेखक आणि समीक्षक यांच्यात दावे प्रतिदावे यांची उदाहरणे देत देत मांडला. संभाजी मोगलांना जाऊन का मिळाला या प्रश्नाचे उत्तर मानसशास्त्रीय उत्तर- त्याची उपेक्षा, सावत्रपणाचा बळी ठरणे, इ. दुसरे उत्तर हे की, एकत्र कुटुंबपद्धतीच्या त्या काळी एका युवराजाची इतकी उपेक्षा होणेअशक्य. एकूणच जीवन समग्र कळले असा कोण आहे ? असा त्यांनी सवाल केला. साहित्य म्हणजे सामग्री. ती उन्नयनाची सामग्री ठरावी. वाङ्मयीन समीक्षाही संस्कृतिनिर्माणकर्ती व्हावी अशी अपेक्षा सौ. आठवल्यांनी व्यक्त केली. प्रा. सुधीर रसाळ सूत्रसंचालक होते. त्यांची तक्रार होती साहित्य पिकते उदंड, पण ते कसदार नाही याची.
तिसऱ्या दिवशी सकाळी गंगाधर गाडगिळांची जाहीर मुलाखत हे मुख्य आकर्षण होते. मुंबईच्या प्रा. सुधा जोशी यांच्या नेतृत्वाखाली प्रश्नकर्ते होते शंकर सारडा आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर.
एका मुंगीचे महाभारत ह्या नावाचे गाडगिळांचे दोनखंडी आत्मवृत्त नुकतेच बाहेर आलेले.
मढेकर, मुंबई आणि जी.ए. कुळकर्णी यांच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे रंगली. गाडगिळांचे म्हणणे असे : मढेकरांकडून आपल्याला मोकळेपणा मिळाला. आपण लिहितो ती कथाच नाही, आपले साहित्य हे साहित्यच नाही, अशी टीका होत असे. पण आपण तिला दाद दिली नाही. मुंबईचा प्रभाव म्हणाल तर आपल्याला मुंबईनेच घडवले. नवे विचार दिले. नव्या कल्पना दिल्या. मी कोणीच नाही, नसतो, हे मुंबई शिकवते. हा निनावीपणा (anonymity) आपल्याला आवडतो. त्यानेच मोकळेपणा येतो. आपण आता पोहोचलो असे कधीच होत नाही. तुटलेपणाची भावना (alienatedness), यांत्रिकपणा, घाई-गर्दी ह्यामुळे आपण वेगाला सरावतो. मुंबई हे मागे न पाहणारे शहर आहे. इथे अनंत प्रकारे काम करता येते. आव्हान मिळते. पैसा उत्पन्न होतो आणि तो आपल्यालाही मिळू शकतो, इ.इ. ही मुंबईची देणगी. हातकणंगलेकरांनी मधेच अडवले. गाडगीळ जुनीच कथा पुनःपुन्हा लिहिताहेत असा सारंगांचा आक्षेप आहे. त्यावर गाडगीळांनी जे उत्तर दिले ते वावटळीला कारण होऊ शकते. गाडगीळ म्हणाले : माझ्यावर आरोप आहे की मला सामाजिक बांधिलकी नाही, वगैरे. पण मला वाटते की मी गंगाधर गाडगीळ ऐवजी गंगाधर सुर्वे असे नामांतर केले असते तर बरे झाले असते.
बरे म्हणजे काय ? गाडगिळांना सामाजिक बांधिलकी आहे, पण त्यांच्या नावामुळे ती झाकली गेली आहे ? की विशिष्ट नावे पाहून लोक बांधिलकीचे समीकरण मांडतात ? की लोकांना काही समजत नाही ? असे अनेक अर्थ-अनर्थ त्यातून निघू शकतात.
हातकणंगलेकरांच्याच जी.एं.बद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले : त्यांच्या शैलीत चेटूक करण्याची शक्ती आहे. तिचे नाते गडकरीपरंपरेशी आहे. तिच्यात एक ठसठशीतपणा loudness आहे. मराठी मनाला असं बोलणं खरं वाटतं. मला ते आवश्यक वाटत नाही. शिवाय जी.ए. नियतिवादी कथा लिहितात. मला ही बांधिलकी अमान्य आहे. ते जे प्रश्न मांडतात त्यांच्यात नेमकेपणा नाही.
साठोत्तरी नवकथेत निर्मितीच्या अंगाने काही नवीन आहे की नुसता अनुभवविस्तार, उदा. दलित साहित्य. या प्रश्नाचे उत्तर म्हणून ते एवढेच म्हणाले की, बाहेर ठेवलेल्यांचा हा राग रास्त आहे.
तुमच्या लेखनप्रक्रियेचे स्वरूप, ritual काय या सारडांच्या प्रश्नावर ते म्हणाले : माझे लेखन सहज असते. चांगले जेवण, वामकुक्षी झाल्यावर मी लिहायला बसतो. कथेत शेवट काय होणार हे मला आधी माहीत नसते. आत्मवृत्त आणि शुद्धाशुद्ध साहित्य या प्रश्नासंबंधी त्यांचे मत पडले की, बहुधा कविताच तेवढी शुद्ध साहित्य ठरेल. पण मिश्र साहित्यही चांगलेच असते. अभिव्यक्तीची तन्हा आणि निवड ही निर्मितिप्रक्रियाच आहे. आपल्या कल्पकतेला मर्यादा आहे असे आत्मवृत्तात जे म्हटले त्याचा अर्थ असा की ग्रामीण जीवनातल्या माणसाचे मन मला सापडले नाही. माझी वाक्यरचना, शब्दयोजना कशी एका शिस्तीत असते. कविता ही मला पायातली बेडी वाटते. उलट बोरकर म्हणाले होते की आमचे शब्द कसे तालाछंदात नाचतात आणि तुमचे आपले रांगेत शिस्तीत उभे. आस्वादक समीक्षेची कल्पना अशी की, वाचकाला जे आवडले ते काय आहे आणि का आवडले त्याची कारणे शोधणे आणि त्यात पुन्हा अनेकांच्या उत्तरात काय साम्य आहे ते धुंडाळून पुढे मांडणे. साम्यवादी, भाषाशास्त्री, सौंदर्यशास्त्री असे चष्मे लावून समीक्षा नको. केवळ तर्काने चुकीची तत्त्वज्ञाने उभी राहिली. तशी समीक्षाही आस्वादक नसते. नोबेल प्राईज कसं मिळतं. ते मराठीला मिळेल का या सारडांच्या प्रश्नावर गाडगीळ म्हणाले मराठी समाज बाहेरच्या समाजात मिसळत नाही. त्याच्याबद्दल असा ग्रह आहे की तो दुराग्रही, मोकळा नसलेला असा वर्ग आहे. तो सदा संघर्षग्रस्त असतो. त्याचा इतरांशी संवाद व्हायला हवा. तामीळचा अभ्यास शिकागोत होतो. वेगळेपणा राखून आपलं स्थान उत्पन्न करण्यात बंगाली तेवढे यशस्वी झाले आहेत.
साहित्य संमेलने हवीतच, अशी मागणी करीत त्यांनी ही मुलाखत संपवली.
शांतिविहार, चिटणीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.