पत्रव्यवहार

संपादक आजचा सुधारक यांस, स. न. वि. वि.
श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘मनस्मृती व विवेक’ (आजचा सुधारक, फेब्रु. ९४) या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे मनुस्मृतीचा त्याग करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच तिचा विसर न पडू देणे हेही महत्त्वाचे, कारण तिच्यासंबधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ती तिच्या समर्थनार्थ पुढे येत राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याकडे बऱ्याच सुधारणावादी लोकांचे पुरेसे लक्ष जात नाही. हिटलरच्या जर्मनीचा विसर पडू न देण्याचा इझराएल व अनेक यहुदी संस्था यांचा जसा सारखा प्रयत्न असतो तसा काही प्रमाणात तरी आपणही मनुस्मृतीबाबत दृष्टिकोन ठेवायला हरकत नाही. सामाजिक समतेची जागरूकतेने जपणूक न केल्यास विषमतावादी व शोषणावर जगू पाहणाऱ्या वृत्ती कशा डोके वर काढतात या संदर्भात मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात अभ्यास आवश्यक असावा.
सहस्रबुद्धे यांच्या लेखात ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ या श्लोकाचा संदर्भ मात्र किंचित गाफीलपणाने आला आहे असे वाटते. मनूच्या पूजकांनी त्याच्या आदर्श समाजव्यवस्थेचे गोडवे गाण्यासाठी ज्या चलाखीने हा श्लोक वारंवार वापरला आहे त्यावर कुणी पुरेसा प्रकाश टाकलेला माझ्या पाहण्यात नाही. या बाबतीत सहस्रबुद्धे यांनीही निराशा केली आहे. मनुस्मृतीतला माझ्या मते हा श्लोक सर्वात जास्त लोकांना परिचयाचा असावा. (त्या मानाने मनुस्मृतीतले शूद्रविरोधी श्लोक बहुतेक लोकांना अपरिचित असतात. कित्येक सुशिक्षित मित्रांना मनूचे गर्हणीय श्लोक वाचून दाखविल्यावर ‘मनूने असे काही लिहिले असेल यावर विश्वास बसत नाही ही त्यांची प्रतिक्रिया मी वारंवार अनुभवली आहे.) सहस्रबुद्धे यांनी हा श्लोक अप्रत्यक्षपणे मनूच्या अपवादात्मक का असेना, पण चांगुलपणाचा निदर्शक मानला आहे असे वाटते. पण हा श्लोक संदर्भासह पाहिल्यास तसा गैरसमज होण्याचे काही कारण नाही. ज्या तिसऱ्या अध्यायात हा श्लोक आहे तेथील संदर्भ वि. वा. बापटांच्या अनुवादात खालीलप्रमाणे आहे.
वरापासून आपल्या कन्येच्या बद्दल धन घेणे हा मोठा दोष आहे हे जाणणाऱ्या पित्याने थोडेसुद्धा धन घेऊ नये. कारण लोभाने ते घेणारा पुरुष अपत्यविक्रयी होतो (३-५१). जे पिता, पती, इ. स्त्रीचे संबंधी मोहाने स्त्री, कन्या, वस्त्रे इत्यादी कोणतेही धन घेऊन त्यावर उपजीविका करितात ते पापी नरकास जातात (३-५२). आर्ष विवाहात गाय व बैल यांच्या जोड्या वराकडून घ्याव्या असे जे आचार्य सांगतात तेही बरोबर नाही, कारण थोड्या असो वा अधिक मूल्याचा असो, तो विक्रयच यात संशय नाही (३-५३). आता ज्या कन्यांच्या प्रेमामुळे वराने दिलेले धन पिता किंवा भ्राता न घेता ते कन्येसच उलट देतात तो मात्र विक्रय नसून केवळ दयालुत्वच होय (३-५४). (केवळ विवाहसमयी वराने दिलेले धनच परत कन्येस द्यावे असे नाही तर विवाहानंतरही) पिता, भ्राता, दीर, पती, इ. बहु कल्याणाची इच्छा असणाऱ्यांनी स्त्रियांची पूजा (सत्कार) करावी व त्यांस वस्त्रालंकारांनी भूषित करावे (३ ५५). ज्या कुलामध्ये स्रियांची पूजा होत असते तेथे देवता प्रसन्न राहतात…'(३-५६).
हा ‘यत्र नार्यस्तु’ चा संदर्भ पाहता मला तरी यात स्त्रियांचा काहीच गौरव दिसत नाही. स्त्रियांना अलंकारांनी सजवणे वेगळे व त्यांची (गौरवाने) पूजा करणे वेगळे. मनू हा एवढा कट्टर स्त्रीद्वेष्टा होता की त्याला अंगावर दागिने घालणे या पलिकडे स्त्रियांचा दुसरा काही गौरव असू शकतो हेच मान्य नव्हते. तो स्त्रियांकडे गाय, बैल या प्रमाणे एक मालकीची वस्तू म्हणूनच पहात होता. पोळ्याच्या दिवशी बैल सजवणे ही जशी बैलाची पूजा तशी कन्यादानप्रसंगी दागिने घालून स्त्रियांची पूजा त्याला अपेक्षित होती. सजविण्यापलिकडे स्त्रियांना माणूस म्हणून कुटलाही सन्मान मानूस मुळीच अभिप्रेत नव्हता. पण संदर्भाशिवाय ‘पूज्यन्ते’ या शब्दाचा पारंपारिक अर्थ घेण्यामुळे या श्लोकाने लोकहितवादींपासून जवाहरलाल नेहरूपर्यंत भल्याभल्यांची फसगत केली आहे. आणि वारंवार हा श्लोक वापरून मनुमहाराजांचे स्तोम माजविणाऱ्या पुनरुज्जीवनवादी शक्तींना हे अर्थात पथ्यावर पडणारेच आहे.

१०३५ वेस्ट रिव्हरव्ह्यू ड्राइन, ग्लेण्डेल, WI. 53209 यु. एस. ए. मधुकर देशपांडे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.