डॉ. भीमराव गस्ती – एक व्रतस्थ जीवन

‘चोर-दरवडेखोर’ अशी मुद्रा धारण करणार्‍या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशातील बेरड-रामोशी जमातीत जन्माला आलेला एक कर्तृत्ववान माणूस – भीमराव गस्ती. उच्चभ्रू सभ्य समाजाच्या कुत्सित निंदेचे विषारी बाण सहन करीत केवळ जिद्द आणि कष्ट यांच्या भरंवशावर अत्युच्च शिक्षण घेऊन एक उच्च विद्याविभूषित शास्त्रवेत्ता झाला, केमिस्ट्रीत पीएच्.डी. ही अत्युच्च पदवी मिळविली. मनात आणले असते तर इतर विद्याविभूषितांसारखेच डॉ. गस्तींनाही सुखासमाधानाचे पांढरपेशी जीवन जगता आले असते. पण आपली आरामाची सरकारी नोकरी सोडून देऊन आपल्या बेरड-रामोशी जमातीच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येणारा छळ, निंदा, मनस्ताप वगैरे सर्व निमूटपणे सहन करून डॉ. गस्तींनी एकदा अंगीकारलेले व्रत अव्याहतपणे चालू ठेवले. हळूहळू त्यांच्या कार्याला उचित अशी मान्यता प्राप्त होऊ लागली. त्यांच्या कार्याची आणि त्यांनी आपल्या चळवळीबद्दल लिहिलेल्या आत्मकथनाची मोठमोठे प्रसिद्ध नेते आणि साहित्यिक मुक्त कंठाने प्रशंसा करू लागले. डॉ. गस्तींना अनेक बहुमान मिळाले – अनेक पुरस्कार मिळाले. पण सुरुवातीच्या काळात वाट्याला आलेल्या उपेक्षेमुळे ते जसे खचून गेले नाहीत तसेच पुढे मिळालेल्या मानसन्मानांनी फुगूनही गेले नाहीत. वैर्‍याशीदेखील निर्वैर वर्तन करणारा हा नम्र स्थितप्रज्ञ अजूनही आपली वाट चालतोच आहे.
अशा या डॉ. भीमराव गस्तींना इचलकरंजी येथील ‘फाय फाउंडेशन’चा सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून या पुरस्काराद्वारे त्यांच्या अविश्रांत कार्याचा उचित असा गौरव केला गेला आहे. हा पुरस्कार जाहीर होताच भीमरावांच्या कार्याचे नेहमीच कौतुक करीत असलेल्या पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, ग. प्र. प्रधान, शंकरराव खरात, बाबा आमटे, यदुनाथ थत्ते वगैरे अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
या निमित्ताने डॉ. गस्तींची ही एक अनौपचारिक मुलाखत.
प्रश्न :- भीमरावजी, तुम्ही गेली २० वर्ष बेरड-रामोशी समाजाच्या उत्थानासाठी जी चळवळ करीत आहात त्या चळवळीत समाजाचे सहकार्य तुम्हाला कितपत मिळतं?
उत्तर :- आमची बेरड-रामोशी जमात ही सरकार आणि उच्चभ्रू सभ्य समाजाकडून आपल्या हितसंबंधांसाठी वापरली जात असलेली जमात आहे. अर्थात्, या चळवळीला , सुरुवातीला खूपच विरोध झाला. गंमत म्हणजे आमच्या जमातीतल्या लोकांनीही सुरुवातीला काहीसा विरोधच केला. अनेकदा माझ्यावर हल्लेसुद्धा झाले. तीन वेळा माझ्यावर मारेकरी सोडले गेले. हा सगळा इतिहास मी माझ्या ‘बेरड’ आणि ‘आक्रोश’ या आत्मकथनपर पुस्तकांमध्ये मांडला आहे. इंडाल फैक्टरीनं आम्हा बेरड-रामोशांच्या जमिनी हिसकावून घेतल्या. त्यावेळचे सरकारी अधिकारी फॅक्टरीच्याच बाजूनं होते. १९७४ साली या अन्यायाकिद्ध आम्ही लढा सुरू केला. हे सगळंच प्रवाहाविरुद्ध पोहणं होतं. पण या लढ्यात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. बेळगावच्या ‘तरुण भारत’ चे तत्कालीन संपादक कै. बाबूराव ठाकूर हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, आणि ‘तरुण भारत’ मधून आमच्या व्यथांना त्यांनी वाचा फोडली. ‘दलित पँथर’च्या कार्यकर्त्यांनीही खूप मदत केली. अखेर इंडाल संघर्ष यशस्वी झाला. इंडालनं आमच्या बेरड-रामोशांना आपल्या फॅक्टरीत रोजगार दिला. आता हा संघर्ष मिटला असून फॅक्टरीनं सहकार्याची समंजस भूमिका घेतली आहे.
प्रश्न :- तुमच्या कार्यात अनेक अडथळे आले असतील. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झालात का?
उत्तर :- पुष्कळ अडथळे आले. खोटे आरोप केले गेले. सुरुवाती-सुरुवातीला त्यामुळे मी अस्वस्थ व्हायचो. पण आता या सार्‍याची सवय झालेली आहे. ‘उत्थान’ ही देवदासींच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेली संस्था. बाबा आढावांच्या सूचनेप्रमाणे ती रजिस्टर्ड करून घेतली. उत्थान मध्ये प्रवेश घेणार्‍या देवदासींसाठी ११ रु. सदस्यत्व शुल्क ठेवलं. काही मंडळींनी माझ्यावर पैसे खात असल्याचा आरोप केला. बेरड या माझ्या चळवळीसंबंधीच्या आत्मकथनपर पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा साहित्य-पुरस्कार मिळाला. या पुस्तकातल्या वास्तव निवेदनामुळे बरेच लोक दुखवले गेले. त्यांनी माझं चारित्र्यहनन करणारे लेख वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध केले. आता असले आरोप बंद झाले आहेत. पण एकीकडे हे आरोप जिव्हारी लागत असतानाच एस्.एम्. जोशी, नानासाहेब गोरे वगैरे मान्यवरांची शाबासकीची थापही पाठीवर पडली. या काळात माझ्या पाठीशी उभे राहून माझं मनोधैर्य टिकवण्यास सर्वोदयी कार्यकर्ते श्री. सदाशिवराव भोसले, श्री. नारायण पवार, तसंच श्री. शिवाजी कागणीकर, श्री. राम आपटे, श्री. अशोक देशपांडे, श्री. सुरेश शिरपूरकर, श्री. रमेश शिरपूरकर वगैरे हितचिंतकांनी मोलाची मदत केली.
प्रश्न :- चळवळ करता करता तुम्ही साहित्यनिर्मितीकडे कसे वळलात?
उत्तर :- कॉलेजात शिकत असल्यापासूनच मला दैनंदिनी लिहायची सवय होती. त्यामुळे माझ्या चळवळीचा वृत्तांत मी लिहून ठेवत असे. त्यावेळी दलित आत्मकथनांची एक लाटच आली होती. त्या लाटेचाही काही प्रभाव पडला असेल. नानासाहेब गोरे, बाबा आढाव, शंकरराव खरात वगैरे मंडळींनी माझे अनुभव पुस्तकरूपानं प्रसिद्ध करण्याची सूचना केली, आणि खूप प्रोत्साहन दिलं. अशा त-हेनं १९८५ साली ‘बेरड’ चे हस्तलिखित तयार झाले. बेरडेच्या प्रकाशनासाठी बरेच प्रतिष्ठित प्रकाशक पुढे आले. पण अखेर आपल्या गावातले प्रकाशक म्हणून बेळगावच्या पारख प्रकाशनाला मी ‘बेरड’ प्रकाशनासाठी दिले. १९८७ साली ते प्रकाशित झाले. माझ्या चळवळीसंबंधीचे पुढचे पुस्तक ‘आक्रोश’ हे १९९० साली बेळगावच्या ‘तरुण भारत’ मध्ये क्रमशः प्रसिद्ध झाले, आणि नंतर ‘राजहंस प्रकाशन’ तर्फे ते पुस्तकरूपानं प्रकाशित झाले. ‘बेरड’ ला १९८९ सालचा ‘बा. सी. मर्ढेकर’ साहित्य पुरस्कार मिळाला.
प्रश्न :- सध्या काही लेखन-प्रकल्प हाती घेतलेला आहे का?
उत्तर :- होय. ‘कौरव या नावाचे एक पुस्तक लिहिण्याच्या तयारीत आहे. समाजातल्या कौरवांवर प्रकाश झोत टाकणारं हे पुस्तक असेल.
प्रश्न :- आजमितीला विधायक सामाजिक कार्य म्हणून कोणकोणत्या योजना तुम्ही राबवत आहात?
उत्तर :- उपेक्षितांसाठी आणि महिलांसाठी शिवणकेंद्र, हस्तकला केंद्र, प्रौढ शाळा, बालवाडी वगैरे विधायक कार्य आमच्या संस्थेमार्फत चालू आहेत. मात्र या संस्था केवळ बेरड-रामोशांपुरत्याच मर्यादित नाहीत. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आणि उपेक्षित अशा सर्वच जाती-जमातींच्या व्यक्तींना या संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.
प्रश्न :- सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं?
उत्तर :- पूर्वीपेक्षा आता समाज अधिक जागृत आहे. पण या जागृतीचा उपयोग केवळ सत्तेच्या राजकारणासाठी केला जात असलेला दिसतो. नेते एकदा निवडून गेले की समाजाकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे थोडसं निराशेचे वातावरण आहे. पण नेते काही आकाशातून पडत नसतात. सामान्य माणसांमधूनच नेते निर्माण व्हायला पाहिजेत.
प्रश्न :- साहित्याबद्दल तुमची काय भूमिका आहे?
उत्तर :- दलित-शोषितांच्या जीवनाशी निगडित असलेले अण्णाभाऊ साठे यांचे. तसेच ग्रामीण जीवनाशी निगडित असलेले व्यंकटेश माडगूळकर यांचे साहित्य आवडते. ना. सं. इनामदार, शिवाजी सावंत, विजय तेंडुलकर यांचेही साहित्य आवडते. पु. ल. देशपांडे आणि नानासाहेब गोरे यांचाही मी चाहता आहे.
प्रश्न :-तुम्ही आणि तुमच्यासारखेच इतर शोषित समाजात जन्माला आलेले कार्यकर्ते आपल्या अनुभवातून येणारं जे साहित्य प्रसवू शकतात, ते साहित्य अशी पार्श्वभूमि नसलेल्या लेखकांना निर्माण करता येणार नाही. त्यामुळे स्थूल अर्थानं त्यात सामाजिक बांधिलकी नसल्यासारखं भासेल. अशा साहित्याला आपण ‘शुद्ध साहित्य किंवा ‘साहित्यासाठी साहित्य’ म्हणू या. या प्रकारच्या साहित्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मुळात साहित्य हीच आपल्या परीने एक समाजसेवा नव्हे का?
उत्तर :- कोणत्याही सच्च्या साहित्यात आपल्या परीनं सामाजिक बांधिलकी असतेच. ‘शुद्ध साहित्याचासुद्धा समाजहितासाठी खूप उपयोग होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही सकस साहित्य निर्माण करणे ही नक्कीच एक प्रकारची समाजसेवा आहे.
प्रश्न :- आता एक जरा व्यवहारी प्रश्न. तुमच्या कार्यासाठी खूप पैसा लागत असणार हे अगदी उघड आहे. हा पैसा तुम्ही कसा उभा करता? काही सरकारी मदत तुम्हाला मिळते का?
उत्तर :- सरकारी मदत वगैरे तशी नाही. पण अनेक व्यक्ती आणि संस्थांनी माझ्या कार्याची गरज लक्षात घेऊन मला सढळ हाताने मदत केली आहे. बाबा आमटे, बाबा आढाव, पु. ल. देशपांडे यांचा या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल. सामाजिक कृतज्ञता निधीतून मला दरमहा ५०० रुपये मिळतात. १९८७ सालापासून ही मदत कायमस्वरूपी झाली आहे. याशिवाय, माझ्या पुस्तकांची रॉयल्टी, मला मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम यांचाही हातभार लागतो. माझी १५ एकर शेती असल्यामुळे माझ्या कुटुंबाचा चरितार्थ या शेतीवर बर्‍यापैकी चालू शकतो. त्यामुळे चरितार्थासाठी इतर मार्गांनी मिळालेल्या पैशावर मला अवलंबून राहावं लागत नाही.
प्रश्न :- आता एक शेवटचा प्रश्न. खूप कष्ट सोसून, मनस्ताप सहन करून तुम्ही सध्याच्या अवस्थेला येऊन पोहोचलात. तर आपल्या वैयक्तिक जीवनात आणि कार्याच्या बाबतीत तुम्ही संतुष्ट आहात का?
उत्तर :- एवढा विरोध झाला, एवढी निंदा-नालस्ती झाली, अजूनही अनेक अडचणी येतात, सहानुभूतीने मदत करणारे थोडे आणि कुचेष्टा करून निरुत्साह करू पाहाणारेच जास्त – हे सगळे असूनदेखील मी माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्या परीने माझे काम करतो आहे याबद्दल मला समाधान आहे. एक मात्र खरं की या कार्याच्या व्यापामुळे माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. मुलांना खूप शिक्षण द्यायची इच्छा होती. पण ते जमले नाही. माझ्या पत्नीनं मात्र खूप त्रास सोसून मला आधार दिला असून अजूनही ती माझ्या पाठीशी उभी आहे.

सुधाकर देशपांडे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.