सातार्‍याचे विचारवेध संमेलन

साताऱ्याला जायची फार दिवसांची इच्छा होती. परवा अचानक योग आला. ‘विचार करू शकणाच्या माणसांची मतं बनविण्याची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी सातार्‍याला चार मित्रांनी एक धडपड सुरू केली आहे. समाजपरिवर्तनाचे काम ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धम्‍’ या कोटीचे असते. या मित्रांनी त्या कामासाठी एक मंडळ स्थापन केले. त्याला ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी’ असे नाव दिले. विसाव्या शतकातील वैचारिक घडामोडींचा वेध अकादमीने घ्यायचे ठरवले. त्यातून हे विचारवेध संमेलन आकाराला आले. विषयधर्मजिज्ञासा. या शतकात आपल्या देशात धर्माच्या नावावर मोठमोठे उत्पात घडले. देश दुभंगला. लक्षावधींचे प्राण, वित्त आणि अब्रू लुटली गेली. धर्मांधतेमुळे उत्पन्न झालेल्या धोक्यातून भारत अजून सावरलेला नाही. पंजाब, काश्मीर, अयोध्या हे सगळे धार्मिक धक्के आहेत. राजकारण्यांना धर्माचा आधार होतो, पण समाजकारण्यांना तो अडसर ठरतो. म्हणून अकादमीकारांनी विचारवेध घेण्यासाठी अग्रक्रमाने धर्माची निवड केली. या विषयाच्या अभ्यासकांना आणि आस्थेवाइकांना आमंत्रणे केली. आजचा सुधारक हाही समाजपरिवर्तनाच्या मार्गातला सहप्रवासी म्हणून त्या विचारमंथनात सहभागी होण्यासाठी आम्हालाही आमंत्रण आले.
फेब्रुवारीच्या १९-२० तारखांना शनिवार-रविवार पाहून हे संमेलन झाले. आयोजकांनी जी साद घातली तिला महाराष्ट्राने चांगलाच प्रतिसाद दिला. उद्घाटनसमयी शाहू कला मंदिर शिगोशीग भरले होते, म्हणजे हजारेक लोक सहज असतील. कार्यक्रमपत्रिका उघडली अन् छाती दडपून गेली. पूर्वात उद्घाटन सोहळा, अपरात एका मागोमाग एक असे दोन परिसंवाद. संध्याकाळी पुन्हा जाहीर सभा. किती ऐकावे अन् किती नाही? सगळीच नावे मोठमोठी – संध्याकाळचे चंदेरी आकर्षण तर खुद्द डॉ. श्रीराम लागू! सारी मिळून निदान वीसेक भाषणे होणार होती. “आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें हा तुकोबांचा अभंग देवदत्त दाभोलकरांनी स्मरणिकेत उद्धृत केला आहे; पण तो वेगळ्या संदर्भात. ‘विमुक्त हस्तें विद्वद्वरांनीं देतां किती घेशिल दो करांनी’ अशी आमची गत होणार होती.
उद्घाटन केले न्यायमूर्ती धर्माधिकारींनी. ते न्यायमूर्तिपदावरून निवृत्त झाले असले तरी धर्म आणि अधिकार त्यांच्या नावात जन्मसिद्ध आहेत असा त्यांचा परिचय करून देण्यात आला. प्रा. मे. पुं. रेगे हे विख्यात तत्त्ववेत्ते यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी योजना झाली होती. त्यांचाही धर्म या विषयाचा व्यासंग किती सखोल आणि चिंतन किती सूक्ष्म आहे याची ओळख डॉ. नरेन्द्र दाभोलकरांनी सभागृहाला करून दिली आणि अवांतर उत्सवी उपचारांना फाटा देऊन थेट कामकाज सुरू झाले. न्या. मू. धर्माधिकारी यांचे भाषण श्रोत्यांना आवडले. त्यातली कोटीबाज वाक्ये, खुमासदार चुटके पहिल्यांदाच ऐकणार्‍यांना सुखवून गेले.
धर्माधिष्ठित राष्ट्र ही कल्पना त्याज्य आहे असा त्यांचा एक मुद्दा होता. धर्मातराला मान्यता देणे म्हणजे एक धर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रचाराला मान्यता देण्यासारखे आहे. सेक्युलरिझमची व्याख्या घटनेत नाही. ती जनताराज्यात ‘equal respect for all religions’ अशा शब्दांत करण्याचा प्रयत्न झाला. पण खुद्द काँग्रेसनेच राज्यसभेत तो हाणून पाडला. आता सेक्युलरिझम म्हणजे काय समजावे? सर्वधर्म समभाव,… अभाव… की… ममभाव? धर्माची तत्त्वे गुहेत दडलेली असतात म्हणून ‘महाजनांचा कित्ता घ्यावा असा सोपा धर्म सांगतात. पण महाजन कोण? राजस्थान हायकोर्टाच्या प्रांगणात मनूचा पुतळा उभारला आहे! लोक आपापल्या तोलाचे महाजन निवडतात. शॉ म्हणाला ते खरे आहे. We punish great men by being their disciples. धर्माचा जन्म भीतीतून होतो. आणि Fear is a dark-room where only negatives are developed. सरकारे लोकांच्या व्यसनाधीनतेचा व्यापार करतात, अन् धर्माधिकारी त्यांच्या पापपुण्याचा. धर्मनिष्ठाला लालूच स्वर्गाची! पण स्वर्ग हे हरामखोरांचे राज्य आहे. तेथे कष्ट न करता मजा मारता येते. लाग्नबंधनावाचून अप्सरांशी मुक्तविहार करता येतो..वगैरे, वगैरे. ऐकायला भाषण छान, पण सार काढणे कठीण.
रेग्यांची अध्यक्षीय भाषणाची वेळ आली तोवर उशीर झाल्याची जाणीव श्रोत्यांना झाली आहे हे त्यांनी ओळखले. समोरच्या विशाल जनसमुदायाकडे, डोळे किंचित आकुंचित करीत नजर टाकून ते म्हणाले, ‘धर्माचा तात्त्विक, संकल्पनात्मक पातळीवरचा शोध इथे अशा जमावात कसा शक्य होईल?’ उघडच रेग्यांची विचारवेध संमेलनाची अपेक्षा वेगळी होती. पन्नास-साठ जिज्ञासू अभ्यासू श्रोते एखाद्या लंबवर्तुळाकार टेबलाभोवती समोरासमोर बसून ‘सहवीर्यं करवावहैं च्या धर्तीवर चर्चा करीत आहेत अशी कल्पना रेग्यांनी मनाशी केलेली असणार! त्यामुळे असेल किंचित् अनुत्साहाने आपल्या मुद्रित भाषणाचा अल्पसा गोषवारा सांगून प्रो. रेग्यांनी वेळ साजरी केली.
प्रो. रेग्यांचा मूळ प्रदीर्घ निबंध समाज प्रबोधन पत्रिकेने संपूर्ण आणि साधना, म. टा. यांनी अंशतः छापला आहे.
धार्मिक असणे म्हणजे प्रतिगामी असणे हे समीकरण रेग्यांना अमान्य. त्यांच्या मते धर्म बदलत असतो. ख्रिस्ती धर्मात हे टप्पे ठळक आहेत. आपल्याकडे शंकराचार्यांनी धर्मसुधारकाचेच काम केले. पाश्चात्त्यांच्या संपर्काने १९ व्या शतकात पुन्हा धर्मपरिष्करणाचे काम सुरू झाले. विनोबा हे शेवटचे धर्मसुधारक. आपल्या भाषणात रेग्यांनी ख्रिस्ती धर्मातील परिष्करणाचे मुख्य टप्पे कथन केले. युरोपातील ग्रीक संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि प्रबोधनकाल या मुख्य ऐतिहासिक वळणांचा आढावा घेतला. प्लेटोची विवेक संकल्पना, १८ व्या शतकातील आक्रमक विवेकवाद, कांट-हेगेलकृत विवेकाची मांडणी (तिचा मार्क्सवरील प्रभाव) सांगून, श्रद्धेच्या बाजूने कांटने मांडलेले अतीताचे तत्त्व काय आहे याचा संक्षिप्त परिचय त्यांनी दिला. शेवटी ते म्हणाले की, ‘हे उत्तर कुणाला समाधानकारक वाटो न वाटो, एक ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता म्हणून स्वतःला ओळखणार्‍या माणसाचे विश्वात कोणते स्थान आहे, या प्रश्नाचे सर्वात चांगले दिग्दर्शन या उत्तराने होते असे मला वाटते.’
दोन दिवसांत मिळून चार परिसंवाद होते. त्यांचे विषय लांबलचक शब्दावलीत गुंफलेले. ते सुटे केले तर : (१) राजकारणावरील प्रभाव, (२) नवे प्रवाह, (३) जमातवादाचे पोषण आणि (४) धर्मनिरपेक्षता. विसाव्या शतकातील ‘भारतीय’ आणि ‘धर्म हे संदर्भ कायम ठेवले की झाले.
परिसंवादांची रचना अशी : त्याला एक मान्यवर विद्वान अध्यक्ष असणार. मांडणीकर्ता प्रधान वक्ता आणि तीन किंवा चार सहभागी व्याख्याते. श्रोत्यांनी नुसते ऐकावे. लिखित प्रश्नांना मोकळीक, पण त्यांची उत्तरे वक्त्याने परस्पर श्रोत्याला द्यायची (पोस्टाने?) असा न ऐकू येणारा संवाद. चर्चा वक्त्या-वक्त्यांमध्ये होतेच असे समजायचे. पण एखाद्या वक्त्याच्या भाषणात काही मौलिक मुद्दे असतील तर त्यांचे नीट आकलन होण्यासाठी या व्यवस्थेत वाव नव्हता.
प्रो. रेग्यांचे अध्यक्षीय भाषण या अर्थी वाया गेले. आधीच त्यांची मांडणी (काहीशी) कवठाच्या कवचासारखी कठीण असते. त्यांच्याशी तसेच नंतरच्या वक्त्यांशी वाद-संवादाची काहीतरी सोय असायला हवी होती. त्यामुळे वक्त्यांच्या विचारांचे आकलन आणि ग्रहण व्हायला मदत झाली असती.
समजा, बीजभापण सहवक्त्यांच्या हाती आठवडाभर तरी आधी पडले आणि स्वतःच्या स्वतंत्र विचारांसमवेत त्यांनी या भाषणावर क्रिया-प्रतिक्रिया नोंदवल्या असे झाले तर? तर दोन फायदे होतील. (एक) वक्त्यांची लोकसंख्या अर्ध्यावर येईल आणि (दोन) श्रोत्यांना सहभागी व्हायला आपोआप वेळ उरेल.
एखाद्या स्वयंवरात राजकुमारांचाच लक्ष्यवेध घेण्याचा अधिकार असणे आणि इतरांनी बघे बनून वेळोवेळी टाळ्या वाजवणे असा प्रकार असतो. म्हणून काय विचारवेध संमेलनातही तसेच घडावे?
बरे, श्रोत्यांमध्ये जे केवळ ‘परिसणेया योग्य होतीं’ अशांचाच भरणा होता म्हणावे तर तसेही नाही. नागपूरचेच एक मित्र सांगत होते, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पुरोगाम्याचे नाव घ्या, ते तिथे हजर होते म्हणून समजा.
भारतीय राजकारणावरील धार्मिक प्रभाव
हा पहिला परिसंवाद, अध्यक्ष : भा. ल. भोळे, मुख्य मांडणीकर्ते : य. दि. फडके, फडक्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून सुरुवात करून टिळक, गांधी, भा.ज.पा. ते थेट अमेरिकेपर्यंत या प्रभावाचा पाठपुरावा केला. इंग्रजांनी आपल्याला हरविले यात आपल्या धर्माचा काय दोप? कुठे कुप्रथा पडल्या असतील त्या काढल्या की झाले अशी मलमपट्टीची उपाययोजना सांगून शास्त्रीबोवांनी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषाभिमान दृढ करण्याचे आवाहन केले. टिळकांनी गीतारहस्यात स्वधर्मे निधनं श्रेयः ‘हीच भाषा केली. त्यांना धर्म म्हणजे अर्थात् वर्णाश्रमधर्म अभिप्रेत होता. टिळक गांधींना सांगतात – ‘Politics is not the game of a Sadhu’. गीतेतल्या ‘ये यथा मां प्रपद्यन्ते’ या वचनासारखा किंवा रामदासांच्या ‘उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट’ या उक्तीसारखा ह्यांचा बाणा, तर गांधींची भूमिका ‘शठं प्रति सत्यम्’ अशी. जातीचे, भाषेचे असे करता करता आता धर्माचे आवाहन करून राष्ट्रनिर्मितीची भाषा सुरू झाली आहे. शीखांचे आणि भा.ज.पा. चे राजकारण याच दिशेने चालले आहे. घटनेतील ‘The State shall not profess, practise or propogate any religion’ या secular आशयाला भा.ज.पा. चा विरोध आहे. त्यांच्या National Heroes च्या यादीत पारश्याला सुद्धा जागा नाही. यावरून त्यांचा हिंदुत्वाचा आशय सांस्कृतिक आहे हा दावा किती पोकळ आहे हे दिसून येते. अमेरिकेतसुद्धा १९८० आणि १९८४ साली प्रेसिडेंट रेगनने आपण fundamentalist आहोत आणि कायदे सुद्धा तसे करू असे जाहीरपणे म्हटले होते.
महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक कुमार केतकर, प्रा. सुहास पळशीकर, पुणे आणि आचार्य शांताराम गरुड, कोल्हापूर हे इतर सहवक्ते होते. कुमार केतकरांच्या मते १९७७ च्या निवडणुकीपासून दिसू लागलेला धर्माचा प्रभाव १९८० च्या निवडणुकीनंतर ठसठशीत झाला. राजकारण हा सत्तासंपादनाचा व्यवहार झाला आहे. यात फारसे वावगे नाही. पण वैचारिक आणि व्यावहारिक पातळीवर हिंदू असलेला वीस कोटी मध्यमवर्गीय समाज धर्माच्या आवाहनाला फसतो हे वावगे आहे. मुसलमानांनीही शाहाबानो प्रकरणी धर्माच्या आधाराने भावनिक राजकारणच केले. मतदारांना आकर्षित करण्यासाठी इतर धर्मीयांबद्दल द्वेष आणि स्वधर्माच्या सर्वच बाबींचे समर्थन सुरू झाले ते अपायकारक आहे.
सुहास पळशीकरांचे भाषण गतिमान, पाठ म्हटल्याप्रमाणे वाटले. १९५२ नंतर धार्मिक प्रथांची चिकित्सा थांबली, आणि १९८० नंतर तर काँग्रेसने निधार्मिकतेला तिलांजलीच दिली. भा. ज. पा.चा विजय हा भावनिक राजकारणाचा विजय आहे. एवढेच विचारकण त्यांच्या भाषणातून हाती लागले.
आचार्य शांताराम गरुडांचे म्हणणे होते की, हिंदूंच्या हाती सत्ता आल्याने हिंदूंचे काही भले होणार नाही. मुसलमानांच्या हाती सत्ता गेल्याने मुसलमानांचे काही भले झाले नाही (पाकिस्तानात आपल्याकडे लोहिया-जयप्रकाश यांनी केलेल्या चुका आपल्याला भोवताहेत. बिगरकाँग्रेसवादाची हाक लोहिया-जयप्रकाशांनी दिली आणि धर्मवाद्यांना प्रतिष्ठा मिळाली. चार राज्यात भा.ज.पा. चे राज्य आले होते. त्यांनी कोणाचे आणि काय कल्याण केले?
भा. ल. भोळ्यांनी समारोप केला. राज्यसत्तेने अल्पसंख्यक गंड उत्पन्न केला. आपल्या विकृत, संधीसाधू धोरणांपायी राजकारणाचा पोत बदलला. गरीब कष्टकरी जनतेच्या प्रश्नांऐवजी मध्यमवर्गीयांच्या भावनिक आधारावर राष्ट्रवादाची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक प्रकारचा ideological vacuum सर्वत्रच आहे. युरोपातयुगोस्लाव्हियातसुद्धा decadent राजवट गेली तरी forward-looking चळवळ का नाही? तेथेही ethnic obscurantists पुढे येत आहेत. आणि भारतही त्याला अपवाद नाही असा असहाय सूर!
उरलेल्या तीनही परिसंवादांचे गोषवारे या पद्धतीने सादर करण्यात काही अडचणी आहेत. काही वक्त्यांनी पुरेशा गांभीर्याने आणि पूर्वतयारीने विषय मांडला हे म्हणणे कठीण आहे. मुंबईचे, शिवसेनेशी टक्कर दिल्यामुळे ख्याती पावलेले वागळे छातीचे पत्रकार असतील, पण आपल्या विषयाचे काही वाचन, मनन त्यांनी केलेले असेल असे वाटले नाही.
आपापल्या धर्मातील नवे प्रवाह सांगण्यासाठी हिंदु, मुस्लिम, ख्रिस्ती, जैन आणि बौद्ध अभ्यासकांना पाचारण होते. ह्या दुसर्‍या परिसंवादात लक्षात राहण्यासारखी भाषणे दोन. एक प्रा. यशवंत सुमंत यांचे हिंदुधर्माबद्दलचे अन् दुसरे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे ख्रिस्ती धर्माबद्दलचे. जैन प्रवक्ते हजर नव्हते. मुस्लिम प्रवक्त्यांनी धर्मविचारांपेक्षा धर्मसुधारकांच्या चरित्रावरच जास्त भर दिला, आणि बौद्ध प्रवक्त्यांना त्यांच्या धर्मात सांगण्यासारखा नवा विचारप्रवाह दिसला नाही. प्रा. सुमंतांनी आपले लिखित भाषण वाचून दाखवले. (वाचण्यापेक्षा बोलणे अधिक परिणामकारक झाले असते.) सुमंतांनी प्रार्थनासमाज, टिळक, गांधी, रामकृष्ण-अरविंद ते विनोबा असा धावता आढावा घेतला. नाही म्हणायला प्रो. रेग्यांच्या अध्यक्षीय भाषणाशी नाते सांगणारे हे एवढेच भाषण.
परंपरा आणि नवता यांचा समन्वय प्रार्थनासमाजिस्टांनी १९ व्या शतकात घालण्याचा प्रयत्न केला, अर्थातच ख्रिस्ती प्रभावामुळे विसाव्या शतकातील नवप्रवाहांचे त्यांनी ६ विभाग केले. (१) नीतिशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानात्मक, (२) साधकानुभूतीचा, (३) साधनेद्वारा-योगानुभवाचा, (४) सौंदर्यानुभूतीचा, (५) ज्ञानानुभूतीचा आणि (६) निषेधात्मक.
हिंदूंकडे नीतिशास्त्र नाही असा मिशनच्यांचा आवडता आक्षेप असे. Utilitarianism (उपयुक्ततावाद) केवळ आधिभौतिक सुखवाद आहे अशा त्यातील त्रुटी दाखवून आध्यात्मिकता हा नीतिशास्त्राचा पाया आहे असा विचार टिळकांनी गीतारहस्यात मांडला. लोकसंग्रह हे सार्वजनिक धर्माचे आणि निष्कामकर्मयोग हे व्यक्तिगत धर्माचे स्वरूप हिंदू धर्माला अभिप्रेत आहे असे टिळकांना वाटले.
गांधी ‘जनीं जनार्दन’ मानणारे साधक. दीनदबुळ्यांची सेवा हा ख्रिस्तीधर्माचा विशेष त्यांनी आत्मसात केला आणि त्याची प्रेरणा आपल्या सनातन हिंदू धर्मातच आहे अशी मांडणी त्यांनी केली. त्यांचा अनासक्तियोग पर्यायाने अहिंसेची गाथा ठरली.
रामकृष्ण-विवेकानंद-अरविंद हे साक्षात्कारवादी योगी. अखिल वस्तुजात दिव्यत्वाची वाहक आहे आणि प्रत्यक्षानुभूती हाच धर्माचा आधार आहे असा हा मतप्रवाह.
टागोर बंगाली वैष्णव परंपरेने प्रभावित झालेले. सौंदर्यवादी धर्मचिंतक. सृष्टीतील संवाद, सर्जनशीलतेतले सौंदर्य अनुभवणारे प्रतिभावंत. साहित्य-कला-संगीत यांद्वारे ईश्वराच्या श्रेष्ठतेचा अनुभव मिळतो असे मानणारे तत्त्वचिंतक.
विनोबा आत्मज्ञान ही ज्ञानाची परिसीमाः समजणारे. त्यांनी धर्म आणि आध्यात्मिकता यांची फारकत केली आहे. त्यांच्या धर्मपरिष्कारात गांधीप्रणीत धर्माला प्रामाण्य आहे. वैदिक आणि अवैदिक परंपरांचा मेळ घालण्याचा प्रयत्न आहे. ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ ही व्यतिरेकपद्धती आणि ‘ब्रह्म सत्यं जगत् ब्रह्म ही अन्वयपद्धती वापरून त्यांनी जगत् स्फूर्तीचा सिद्धान्त मांडला आहे. अध्यात्म आणि विज्ञान या समांतर आणि स्वायत्त विद्या आहेत असे त्यांना वाटते. आत्मज्ञान म्हणजे चित्ताच्या पलीकडील (स्वतःचे) रूपदर्शन आहे. ते अंतर्विश्व आहे. पूर्णपुरुषदर्शन आहे.
विनोबांच्या मताप्रमाणे अध्यात्म म्हणजे शाश्वत नैतिक मूल्ये, जीवनाची अखंडता, प्राणिमात्रांचे पावित्र्य, विश्वातील व्यवस्था व तिची बुद्धिगम्यता, आणि ग्रामोद्योगभवन हेच ब्रह्मविद्यामंदिर या ५ निष्ठांचा पुरस्कार.
फादर दिब्रिटोंची वैचारिक स्पष्टता आणि रोखठोख मांडणी यामुळे त्यांचे भाषण उठावदार झाले. ते म्हणाले १९६३ च्या Ecumenical Council (पंथोपपंथ संगम) नंतर मूळ चर्चमध्ये आमूलाग्र रूपांतर झाले. उदाहरणार्थ –
१. आता ख्रिस्ती धर्मपीठ राजकीय स्वरूपाच्या हस्तक्षेपांपासून मुक्त झाले आहे. पूर्वी ‘ज्याचे राज्य त्याचा धर्म या लॅटिन म्हणीप्रमाणे धोरण असे. ते आता आमचे ब्रीदवाक्य राहिलेले नाही.
२. लोकशाही कार्यपद्धतीचा स्वीकार हा दुसरा बदल झाला आहे. पोप, कार्डिनल, बिशप, फादर आता अनुमतीचे व्यवस्थापन करतात.
३. जिज्ञासातृप्तीचे प्रामाणिक स्वातंत्र्य आता मान्य करण्यात आले आहे. पूर्वी ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांनी जी पुस्तके वाचू नयेत अशांची Index प्रसिद्ध होई.
आज्ञाभंगाबद्दल जातीबाहेर टाकत. विचारांची ही ‘नसबंदी’ आता नाही.
४. सक्तीचे धर्मातर, छळवाद पूर्णपणे वर्ज्य मानण्यात आला आहे.
५. ख्रिस्तीतरांना मुक्ती नाही हा सिद्धांत आता सैल करण्यात आला आहे. सर्व धर्माबद्दल समान आदर कबूल आहे, पण म्हणून सर्व धर्म सारखे आहेत असे मात्र मानले जात नाही.
६. नास्तिक मतवाद्यांशीही संवाद करण्याला आता बंदी नाही.
हे नवे विचार प्रसृत झाले आहेत हे सांगून दिब्रिटो म्हणाले की, फ्रॉईड मात्र खोटा ठरला आहे. समाजजीवनातून धर्माची हकालपट्टी झालेली नाही. धर्म ही सामाजिक आणि मानसिक गरज आहेच. समाजसुधारकांनी धर्मातील पुरोगामी अंशाचा विचार करावा. ख्रिस्तीधर्माचा आग्रह आता faith आणि morals पुरताच सीमित झाला आहे. दत्तक, वारसाहक्क, घटस्फोट या बाबींसाठी त्यांना common civil code मान्य आहे. कुटुंबनियोजनही मान्य आहे, पण ते कृत्रिम, सरकारी उपायांनी नाही. ते ऐच्छिक असले पाहिजे.
श्री. वसंत मून यांनी बौद्धमताचे प्रतिनिधित्व केले. आमचे धर्मग्रंथ हे नीतिग्रंथ आहेत. आमच्यात ग्रंथप्रामाण्य नाही. महाजनो येन गतः स पंथाः’ असे म्हणत डॉ. आंबेडकरांसारख्या महाजनांचा पंथही नाकारावयाचा अशी तक्रार त्यांनी हिंदू आणि वैदिकांविरुद्ध केली.
धार्मिकतेमुळे जमातवादाला खतपाणी मिळते काय?
हा दुसर्‍या दिवशीचा पहिला परिसंवाद. त्याची मांडणी प्रा. आ. ह. साळुख्यांनी केली. धर्म’ शब्दाचा अर्थ पक्का करून बोला अशी विनवणी करताना ते म्हणाले, लोक म्हणतात तुम्ही धर्म मानता की नाही? एका शब्दात ‘हो’ की ‘नाही’ एवढेच उत्तर द्या. कोर्टात सरकारी वकील आरोपीला म्हणतो, एका शब्दात सांग, तू दरवडे घालणे सोडले की नाही? हो म्हटले तरी संकट, नाही म्हटले तरी संकट असा तर्काभास वरील प्रश्नात आहे.
एक धर्म (धर्म-१) तुकारामाचा आहे. निश्चल – निष्कपट वृत्तीने वागणे. दुसरा धर्म आहे हितसंबंधांचा समुच्चय. यातला पहिला मी मानतो. धारणात् धर्म हा तिसरा, महाभारतातला धर्म म्हणजे दाखवायची मुलगी एक अन् द्यायची दुसरी असा प्रकार ‘जमातवाद’ हा शब्दही तसाच. मर्यादित अर्थाने चांगला. उदाहरणार्थ कोणी आदिवासी जमातीच्या उन्नतीसाठी झटत असेल. तो चांगला उपयोग. अज्ञजनतेचे धर्म (१) बद्दलचे प्रेम exploit करून धर्म (२) चे पुरस्कर्ते त्यांच्या अज्ञानाचा लाभ उठवतात.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध नाटककार गो. पु. देशपांडे या परिसंवादाचे अध्यक्ष होते आणि सर्वश्री बेन्नूर, मोरजे, मोरे हे प्राध्यापक आणि पतंगे हे पत्रकार सहवक्ते होते. प्रा. फक्रुदिन बेन्नूर खंदे वक्ते आणि सडेतोड विचार करणारे. त्यांचे मत असे. धार्मिकतेमुळे जमातवादाला खतपाणी मिळत नाही. मुस्लिम जमातवादाबद्दल नेहमी साचेबंद मांडणी होत असते. उदा. अ. भि. शाह, कुरुंदकर यांचे लेखन. त्या लेखनात इस्लाम १०० टक्के जमातवादाचा पोषक दाखवला आहे. एकोणिसाव्या शतकात साळुख्यांनी नाव दिलेल्या धर्म२ चा आधार सर सय्यद अहमद सारख्यांनी घेतला. जहालवंगीय राष्ट्रवादाची धर्माच्या आधाराने मांडणी झाली. धर्म समाजाला संघटित करण्याचे माध्यम आहे हे ओळखून वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून नेतृत्वाची एक स्पर्धा उत्पन्न झाली. मुगलसत्ता दुबळी झाल्यावर या दशकात पडली तशी धर्माची काठी हिंदूंनी तेव्हा हाणली नाही. जमातवाद फोफावला तो राष्ट्रवादाच्या चुकीच्या मांडणीतून. उलेमा जमालुद्दीन अफगानी, सर सय्यद, मो. इक्बाल, शरियतुल्ला इ.नी इस्लामचा वापर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेतून केला. औरंगजेबाच्या काळीही कुराणीय समीकरणे राजकीय कामासाठी वापरली गेली होती. ‘कौम’ म्हणजे ‘राष्ट्र’. कौमी मिल्लत म्हणजे राष्ट्रवाद, हा इस्लामला मान्य आहे. आंतरराष्ट्रीयत्व फक्त धार्मिक अर्थाने पुरस्कारले आहे. मौलाना आझादांसारखे धर्मवेत्ते नास्तिकतेपर्यंत जाऊन परत फिरले ते धर्माची mobilizing power लक्षात घेऊनच.
धर्म लोकमानसात असतोच. तो इतका रुजलेला असतो की त्याचे उच्चाटन अशक्य आहे. हे युरोपमधे वर्तमान घटनांनी दाखवून दिले आहे. सध्या संघर्ष ऐरणीवर आला आहे. तो मूळ खर्‍या धार्मिकतेमुळे नसून तिच्या विपर्यस्त मांडणीमुळे आहे. तुम्ही औरंगजेब, बाबर, जीना आमच्यावर लादताहात. आता इतिहासाचे ओझे फेकून द्या. १९९४ ची बात बोला. हा विचार मुंबईत किंवा केवळ सभागृहात न थांबता बाहेर जाऊ द्या.
श्री. रमेश पतंगे हे दुसरे वक्ते. मुंबईच्या विवेक साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक. ते म्हणालेः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता हा माझा परिचय मुद्दाम सांगण्यात आला असे वाटते. आम्ही वैचारिक अस्पृश्य. या विचार मंथनात येण्याची संधी दिली याबद्दल आभार. मला बेनूरांनी केलेल्या मांडणीने नवी दृष्टी दिली. या देशातला बहुसंख्य हिंदू समाज कसा वागेल यावर शांती अवलंबित आहे. माझा हिंदूधर्म मला जमातवादी बनवत नाही. वेदांपासून गांधीपर्यंत सर्व सर्वधर्मसत्यभाव सांगतात. जमातवादी धोका उत्पन्न होण्यासाठी धर्माचे नुसते एक असणे पुरेसे नाही. धर्म ही संघटक शक्ती असली पाहिजे. आमचा धर्म विविध उपासनापंथांचा समूह आहे. हिंदू माणूस आग्रही बनत चालला याची कारणे त्याच्या धर्मात नाहीत. श्रीपाद जोशींसारखे गांधीवादी, गिरीलाल जैनांसारखे सेक्युलर पत्रकार का बदलले याचा विचार करा.
हिंदूंची भीती आहे – स्वदेशातच आम्हाला दुय्यमत्व येत चालल्याची, आमच्या हजारो वर्षांच्या उदारमतवादी निष्ठा आत्मघातकी ठरतील की काय याची. जिनांच्या विजयापासून ही भीती सुरू झाली. हिंदू नेतृत्व हा शरणागतीचा इतिहास आहे. मौ. शौकत अलींनी वंदेमातरम् – कापलेलं सुद्धा, नाकारलं. आम्ही चूप बसलो. मतदारांना फोटोसहित ओळखपत्रे हवीत असा आग्रह धरणार्‍या शेषनची मुस्लिम महिलांच्या बुरख्यासमोर शेळी होणार, मुंबई हायकोर्टात न्या.मू. सुजाता मनोहरांचे खंडपीठ मुस्लिम महिलेच्या दाव्यात शरियतप्रमाणे निर्णय करा असे म्हणते. काश्मिरातून निर्वासित झालेल्या ३-४ लक्ष हिंदू पीडितांच्या छावण्यांना एकही पंतप्रधान भेटू इच्छित नाही. बांगला देशातून निघालेल्या दीड कोटी घुसखोरांनी शेजारच्या प्रांतातले लोकसंख्येचे संतुलन बिघडवले आहे. जोशी आणि जैन अस्वस्थ होताहेत ते अशा गोष्टींनी. या बाबतीत मानवतावाद्यांची भूमिका काय? सर्वच धर्मात अंधश्रद्ध आहेत, मग हिंदूंनाच ठोका असं का? हे कथित पुरोगामी आपले मित्र नव्हेत अशी दुराव्याची दरी निर्माण होते. लोकशाही, समाजवाद, कास्टलेस सोसायटी ही बोलण्याची भाषा, करणी मात्र सोयीची. बहुसंख्य हिंदू-समाज या देशाचा कणा आहे. तो सुधारल्याशिवाय परिवर्तन अशक्य.
प्रा. गंगाधर मोरजे (नगर) परिसंवादातले तिसरे वक्ते, त्यांनी धर्म पशुपातळीपेक्षा वर येण्यासाठी – उन्नयनासाठी आहे असा मुद्दा मांडला . तर प्रा. सदानंद मोरे (पुणे विद्यापीठ) यांनी धर्मसंस्थाच नष्ट करा हे म्हणणे आपल्याला पटत नाही असे मत मांडले. आपल्याला जमातवादी न होताही इतरांच्या जमातवादाला शह देता येईल. धर्माचे लक्षण परंपरेत, ‘अभ्युदय-निश्रेयसकर’ असे केले आहे. धर्माचे मूर्त प्रमाण साळुखे म्हणतात तसे तुकोबारायांसारखे आहेत. स्थितप्रज्ञ हा धार्मिकतेचा कित्ता आहे. महाजन कोण हे ठरवताना तो वेदप्रामाण्य मानणारा असावा ही कल्पना घुसडणे हा परंपरेचा दोष आहे. जमातवादाचा धर्मासह प्रतिवाद करणे शक्य आहे असा मोत्यांचा पक्ष.
समारोपापूर्वी ‘आपण आता न बोललो तर कर्तव्याला चुकलो असे वाटत राहील’ असा खुलासा करीत मांडणीकर्ते प्रा. साळुंखे म्हणाले, आघात-प्रत्याघाताची भाषा पतंगे यांनी वापरली आहे. वादाकरिता, मुसलमानांना झुकतं माप दिलं जातं असं क्षणभर मानलं, तरी हिंदूंच्या अंतर्गत सुधारणांचे काय? आम्ही मनुस्मृतीला ऊठसूठ झोडतो असे पतंगेंना वाटतं. त्यांनी ती वाचली आहे का? त्यांनी किंवा त्यांच्यातर्फे कोणीही मनुस्मृती वाचली असेल त्यांनी पुढे यावे. त्यांच्याशी मी वाद करायला तयार आहे. ज्यांना मनुस्मृतीवर आघात केल्यावर प्रत्याघात करावा अशी भावना होते ते हिंदूंचे कैवारी नसून मारेकरी आहेत हे लक्षात ठेवावे. माझे म्हणणे कोणाला आव्हानाचे वाटेल. मी भावनेच्या आहारी जाऊन बोलत नाही. वादात माझा पराभव झाला तर मी माझे सर्व लेखन अग्निसात् करून मनुस्मृतीचे पूजन करीन. साळुंख्यांच्या या भावनिक वाटणार्‍या पण तसे नसणाच्या आव्हानावर श्री. पतंग्यांनी खुलासा केला की, मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन आपल्याला अभिप्रेत नाही. साळुख्यांच्या मनुस्मृतीवरील आक्षेपांशी आपण १०० टक्के सहमत आहोत.
अध्यक्षीय समारोपात गो.पु.दें.नी राहून गेलेल्या मुद्द्यांचा निर्देश केला. उदा. – धार्मिकता आणि जमातवाद यांचा घनिष्ठ संबंध आहे का याचा ऊहापोह झालाच नाही. दुसरे, जमातवाद कधीचा, १९२० चा की आजचा? कारण समाजाला भेडसावणारे प्रश्न स्थलकालनिविष्ट असतात. पन्नास वर्षापूर्वी आजच्या इतक्या नियोजित, contract देऊन, जातीय दंगली होत नव्हत्या. विकसनशील देशांच्या भाषा, संस्कृती, समुद्र आणि निसर्गही नाहीसे होत आहेत. आता उरल्या आहेत फक्त श्रद्धा. Ideological vacuum ची भाषा व्यर्थ आहे, International capitalism will survive. मग अप्रगत देशांत संस्कृतिसंवर्धन कसे करणार? विवेकानंदांना अध्यात्म मान्य होते. सावरकरांना नव्हते. राष्ट्र अध्यात्मावर उभे राहात नसते. धार्मिकतेने राष्ट्र उभारणीचा पायाच विसविशीत होईल. बंगालचा आध्यात्मिक राष्ट्रवाद सावरकरांनीच निकालात काढला. धार्मिकतेला ऐतिहासिक आणि भौगोलिक पैलू असतात. तिचा स्थलकालनिरपेक्ष विचार करता येणार नाही. आज अशी फळी उभारणे आवश्यक आहे की जिच्यात मुसलमानांनासुद्धा सहभागी होता येईल. तापलेल्या सभागृहात खुसखुशीत विनोदी शैलीने मननीय विचारांची पखरण करीत देशपांड्यांनी सौहार्द आणले.
धर्मनिरपेक्षता असली किती, नकली किती?
मुंबईच्या प्रा. नलिनी पंडित यांच्या अध्यक्षतेखाली विषयाची मांडणी केली. कोल्हापूरच्या प्रा. अशोक चौसाळकरांनी. त्यांच्याशिवाय ५ सहवक्ते.
चौसाळकरांचे व्याख्यान अभ्यासपूर्ण आणि मांडणी इतकी प्रभावी की इतर गोष्टींकडे लक्षच जाऊ नये.
धार्मिक राजकारणाचा साम्राज्यवादी संदर्भ सांगून १९२० नंतर गांधींनी ते राजकारण थांबवण्याचा प्रयत्न केला तरी १९४० नंतर जमातवाद वाढत गेला असे त्यांनी दाखवले.
भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य दिले, समूहाला नाही. Common civil code ची भलावण घटनेने केली त्यातून सामाजिक सुधारणांचा आग्रह दिसतो. तो सुधारणांचा मार्ग लोकशाहीचा-मतपरिवर्तनाचा आहे. नेहरूंना बहुसंख्यकांचा जमातवाद हा भारतीय फॅसिझम वाटत होता. तुर्कस्तानात ४० वर्षे हुकूमशाहीने सेक्युलरिझम आणण्याचा प्रयत्न झाला. अल्जेरिया हा अत्याधुनिक मुस्लिम देश. तिथली धर्मनिरपेक्षता इजिप्तप्रमाणेच फसली. हुकूमशाहीच्या आडून अभिजनांच्या स्वार्थप्रणीत वृत्तीने मात केली.
भारतात ६ डिसेंबरच्या घटनांनी भारतीय धर्मनिरपेक्षता नकली आहे हा प्रचार पाक रेडिओने सुरू केला. भारत सरकारला हिंदू सरकार म्हणणे सुरू केले. याउलट लालकृष्ण अडवाणींच्या मते या धर्मनिरपेक्षतेत मुस्लिमांचा इतका अनुनय आणि लाड सुरू असतो की, ती नकली आहे हे कोणालाही पटावे.
१९६९ नंतर जातीय दंगलींची चढती कमान सुरू झाली. भागलपूर बोस्नियाच्या मागे नाही हे वसंत पळशीकरांना दिसले. १९८० नंतर पोलिसदल कम्युनल झालेले दिसते. महाराष्ट्रात १९६६-६७ मध्ये स्थापन झालेली शिवसेना काँग्रेसच्या आशीर्वादाने वाढली. गुजरात-कर्नाटकात सत्ताधारी किती विधिनिषेधशून्य असतात हे दिसून आले. साम्राज्यशाहीला कसेही होवोत भारताचे तुकडे झालेले हवे आहेत.
त्यानंतर पहिली तोफ वागळ्यांनी डागली. रेशनच्या धान्यात भेसळ असते म्हणून विष प्या हे म्हणणे जितके शहाणपणाचे तितके भारतीय धर्मनिरपेक्षता बेगडी आहे म्हणून हिंदू राष्ट्र हवे असे म्हणणे आहे. १९५५ साली लोकसभेत common civil code ला खुद्द श्यामाप्रसाद मुखर्जीनी विरोध केला होता. हमीद दलवाईंचा रोख चुकलेला होता. तो मुस्लिमांना कधी आपला वाटलाच नाही. जातीयवाद्यांनी पवित्रे, माध्यमे अन् परिभाषा बदलल्या आहेत. मनुस्मृतीचा धिक्कार दर्शनी आहे. आंबेडकरांना सुद्धा पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोहियाप्रणीत गैरकाँग्रेसवादामुळे जातीयवाद्यांना सत्तेत घुसण्याची संधी मिळाली. काँग्रेसने जमातवाद्यांचे लांगूलचालन केले. डाव्यांनी आणि पुरोगाम्यांनीही तेच केले. धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा रोजच्या आयुष्याशी आणि दुःखाशी जोडला जावा. इ.इ.
वागळ्यांना उत्तर अरविंद लेल्यांनी दिले. ते भा.ज.पा. चे माजी आमदार, श्यामाप्रसादांचा common civil code ला विरोध हा वागळ्यांचा जावईशोध आहे असे त्यांचे म्हणणे. इंदिरा गांधींचा ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ या कल्पनांचा पुतळा किती बेगडी होता हे काळानेच दाखवले आहे. हिंदुराष्ट्र म्हणजे हिंदुराज्य नव्हे. राज्याने धर्माच्या आधारे प्रजेत भेदभाव करू नये हे पथ्य या देशात हजारो वर्षे पाळले गेले. आमच्या पूर्वजांना हा शब्द माहीत नव्हता. पण ही संकल्पना त्यांच्या व्यवहारात होती. युरोपच्या इतिहासात एक पंथ दुसर्‍याच्या विनाशासाठीच निघतो. या नकाराच्या कल्पनेतच धर्मनिरपेक्षतेचा जन्म झाला. आम्ही सहअस्तित्ववादी आहोत. Secularism does not mean abolition of religion हे डॉ. आंबेडकरांचेही मत होते.
या देशात मुस्लिमसमस्या अस्तित्वातच नाही असे म्हणणे ही शहामृगी भूमिका आहे. वसंत पळशीकर काही संघपरिवारातील नाहीत. त्यांचा पुढील उतारा पाहा.
समाजाचा मुख्य व मध्यवर्ती घटक असलेल्या हिंदू समाजामध्ये धार्मिकसामाजिक सुधारणेची, उन्नत धर्मकारणाची समर्थ चळवळ सतत क्रियाशील राहिली आणि हिंदू समाज हिंदू राहून उदार, सहिष्णु प्रगल्भ बनला व तसा टिकून राहिला तरच भारतातले शासन सफलतापूर्वक धर्मनिरपेक्ष वर्तन करू शकणार आहे. त्याने आपले हिंदूपण टाकून द्यावे ही अपेक्षा गैर आहे. ती गोष्ट होणारी नाही. सुजाण, प्रगल्भ, आत्मविश्वाससंपन्न भयमुक्त हिंदू समाज, या अर्थाने समर्थ हिंदू समाज ही भारतातील अन्यधर्मीय समाजाच्या आंतरिक धार्मिक-सामाजिक सुधारणेची पूर्व शर्त आहे. (नवभारत, वर्ष४६, अंक ४,५,६, पृ. ४३)
उदारमतवादी हिंदूंनाही परिवर्तन हवे आहे. आणि rabid Hinduism वाद्यांपासून पुरोगाम्यांएवढाच त्यांनाही धोका आहे.
लेल्यांच्या भाषणावर वागळे पुन्हा उठले. मी शाहाबानो प्रकरणी काँग्रेसचाही निषेध केला आहे असा खुलासा त्यांनी केला. पण श्यामाप्रसादांनी common civil code चा विरोध कधी केला या लेल्यांच्या पृच्छेवर ते काही बोलले नाहीत.
कॉ. गोविंदराव पानसरे यांना स्यूडो-सेक्युलरिझमचा धोशा घेतलेल्यांचा कावा दिसतो. तो असा. धर्माच्या आधारे सत्ता संपादावी. सत्तेवर येऊन स्वधर्म वृद्धिंगत करावा, परधर्म उद्ध्वस्त करावा. पुन्हा सत्ता मिळवावी असे त्यांचे डावपेच दिसतात. डॉ. गोवारीकरांचे लोकसंख्येचे आकडे घेऊन मुस्लिम लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढत आहे हा हिंदुत्ववाद्यांचा कांगावा किती फसवा आहे हे त्यांनी सांगितले. घटनेत धर्माधारे प्रचारस्वातंत्र्याला मोकळीक आहे, नीती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था यांना इजा न करता. हे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेशी सुसंगत आहे की कसे याचा विचार केला पाहिजे. धर्म ही वास्तविकता आहे. धर्मजाणीव ही वास्तविकता आहे. पण तिचा उपयोग राजकारणासाठी करून द्वेष पसरवणे हा जमातवाद आहे. लोक धार्मिक असल्यामुळे त्यांनी निवडलेले शासन धर्मनिरपेक्ष असावे ही अपेक्षा अवघड आहे असे त्यांचे प्रतिपादन.
परिसंवादातले चौथे वक्ते अन्वर राजन, हे मुस्लिम परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते. आश्चर्य म्हणजे मुस्लिम युवकांचा हमीद दलवाईंच्या नावाला जो विरोध आहे तो जास्त प्रामाणिक वाटतो. मुखात गांधी अन् व्यवहारात विरोध करणार्‍यांपेक्षा समाजवादी नेतृत्वाने मुस्लिम हिताची भूमिका घेतली, पण काही हित साधले का? असा सवाल करून ते म्हणाले ६ डिसेंबरनंतर हिंदूंची भूमिका बचावात्मक, उलट मुस्लिमांची जादा उत्साही झालेली दिसते.
आचार्य शांताराम गरुड याही परिसंवादात बोलले. भारतीय धर्मनिरपेक्षता नकली नाही असलीच आहे असा त्यांनी दावा केला. उत्तर प्रदेशात जनतेने काँग्रेसच्या मुस्लिमाला झिडकारले, मुलायमच्या मुस्लिमाला निवडले यातून काय ते सिद्ध होते. काँग्रेस एक नंबरचा गुन्हेगार आणि हिंदुत्ववादी दोन नंबरचे, भा.ज.पा. गनिमी काव्याने लढतो. इ.इ.
या परिसंवादाच्या अध्यक्ष प्रा. नलिनी पंडित (मुंबई) या होत्या. चर्चासत्रांत आणि सभागृहातही महिलांचा अभाव त्यांना बोचला. आपल्या घटनेत (१) नागरिकत्वाचा अधिकार सर्वधर्मीय स्त्रीपुरुषांना असणे, (२) श्रद्धा, विचार, आचार आणि प्रसार यांचे स्वातंत्र्य असणे आणि शासनाची धर्मापासून फारकत करणे, या तीन गोष्टी असतील असे आश्वासन १९३० च्या कराची अधिवेशनात दिले होते. आपले राज्यकर्ते हे विसरले आहेत. सर्वधर्मसमभाव हा अर्थ गांधींचे नाव घेऊन प्रसृत केला गेला. गांधींना तो अभिप्रेत नव्हता. सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा हिंदूंना पूर्ण अधिकार आहे, पण शासनाने त्याशी संबंध ठेवू नये’ असे गांधीजी म्हणाले. गांधी प्रार्थना आणि उपवास याखेरीज धर्माचा उपचार पाळत नसत. तीर्थयात्रा, मूर्तिपूजा करत नसत. गोहत्या कायद्याने बंद व्हावी असे त्यांचे मत नव्हते. कायदा ही सक्ती आहे. विनोबांनी गोवधबंदीसाठी उपवास केला तेव्हा खुलासा केला की हा माझा सत्याग्रह आहे, गांधींच्या नावाने नाही.
अ. भि. शाह, कुरुंदकर, हमीद – समान नागरी कायदा स्वीकारून हिंदुजमातवादी भाषा वापरतात. ती तपासून घ्या. बहुविधतेत एकता हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. समान नागरी कायदा म्हणजे हिंदूंचा कायदा मुसलमानांना लावणे नव्हे. युरोपात एकेक करून क्रांत्या झाल्या. आम्हाला सर्व प्रकारच्या क्रांत्या एकदम घडवून आणायच्यात असे नेहरू म्हणत. बुद्धाची प्रज्ञा, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ही धर्माची भाषा हिंदुत्ववादी का बोलत नाही? मुंबईच्या दंगलीनंतर मुसलमान पुरोगामी मंडळी disillusion झाली आहेत. गांधींप्रमाणे आम्ही दुःखपीडितांमध्ये गेलो का? कलकत्त्याला सुर्‍हावर्दी सत्तेवर असताना ‘डायरेक्ट अॅक्शन’चा सूड घेण्यासाठी जमलेल्या क्षुब्ध हिंदू-जमावात गांधी गेले असता त्यांच्यावर पहिली काठी पडली ती संघवाल्याची. आध्यात्मिक बळाने दंगल आटोक्यात येत नाही. गॅट हा बेकारी परदेशी पोचवण्याचा प्रकार आहे. हुकुमशाही शक्तींना ती उपकारक आहे. पुढील १० वर्षे जमातवाद्यांना अनुकूल आहेत. इ.इ.
विचारवेधच्या व्यासपीठावर आदल्या दिवसापासून आतापावेतो मी मोजून चोवीस भाषणे ऐकली होती. आता समारोपात य. दि. फडक्यांकडून सिंहावलोकन होईल, त्यात आपले सुटलेले धागे जुळवता येतील अशी आशा होती. फडके काय सांगताहेत ते समजत होते, पण याचा कोणत्या परिसंवादाशी काय संबंध आहे ते कळेना. शेवटी बोध झाला, ‘या सत्रात अनुल्लेखित मुद्देच आपण आता सांगितले असा खुलासा त्यांनी केला तेव्हा.
सातारच्या या विचारवेध संमेलनाकडे आम्ही फार गांभीर्याने आणि आशेने पाहात होतो. आमच्या वाचकांपैकी अनेकांना असेच वाटत असेल. जे तेथे येऊ शकले नाहीत त्यांची दुधाची तहान निदान ताकावर भागावी या हेतूने आमच्या मगदुराप्रमाणे शक्य तितका प्रामाणिक अहवाल – भाषणांचे सारांश आम्ही सादर केले आहेत. आपले फार महत्त्वाचे मुद्दे यात गाळले गेले असे वक्ते म्हणू शकतील, पण त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास केला असे म्हणणार नाहीत असे वाटते. विपर्यास झाला असे कोणाला वाटले तर त्याने क्षमा करावी. (कारण तो सहेतुक नाही याची खात्री ठेवावी.) तसे निदर्शनाला आणल्यास अवश्य दखल घेण्यात येईल.
फडक्यांनी धार्मिक सत्ये व वैज्ञानिक सत्ये असे सत्याचे प्रकार सांगितले. धार्मिक सत्यात सापेक्षता असते. हरघडीच्या सत्यात (everday truth) निरपेक्षता असते. उदा. प्रिन्स चार्लस एलिझाबेथ राणीचा पुत्र आहे. मनुष्याला arbitrary assumption अधिकार आहे, हे मनःपूत गृहीत मानवी जाणिवेपलीकडचे, स्पष्टीकरणापलीकडचे असू शकेल. धार्मिक सत्य वैज्ञानिक प्रयोगात मावत नाही.
‘धर्म’ या संज्ञेचा अर्थ प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. उदा. बौद्धमतात धर्म = नीती, आणि धर्मप्रवचन = नीतिप्रवचन.
मध्यपूर्वेत ट्यूनिशियात हबीब बोर्गिबाने ३१ वर्षे (१९५६ ते ८७) राज्य केले. शरियतचा अंमल रद्द केला. कायद्याने बहुभार्याप्रथा बंद केली. रमजानचे उपवास बंद केले. तुर्कस्तान, ईजिप्त, अल्जेरिया या सर्वांना मागे टाकले. तरी आता तिथे इस्लामवादी राज्यावर आले आहेत. धर्माच्या काहीही व्याख्या केल्या तरी कर्मकांड हाच व्यवहारी धर्म असतो. धर्मबळाने तिकडे एकपक्षीय लष्करी राजवटी उधळल्या गेल्या. भारतातली लोकशाही उधळण्याची भीती आहे. धर्म ही लाखो लोकांची गरज असते. सेक्युलर स्टेट म्हणजे धर्माचा अभाव असे नाही. त्यात नास्तिकमताचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. कट्टरतावादी गनिमी कावा ओळखला पाहिजे, ‘राष्ट्र’ या शब्दाचा आजचा अर्थ ते चाणक्याच्या अर्थशास्त्रात पाहातात. तेथे राष्ट्र म्हणजे जमीन महसूल असा अर्थ आहे. धर्मापेक्षा धर्मसंसद मोठी म्हणणार्‍यांनी मुसलमानांना दोष देऊ नये.
वरील धर्मचिंतनावर चर्चा अपेक्षित आहे. पुढील अंकी तिला तोंड फोडू. त्याआधी एक पावती देणे जरूर आहे. विचारवेध संमेलन योजण्यापासून पार पडेपर्यंत साळुंखे, दाभोलकर, बेडकिहाळ आणि अगणित मित्र मंडळींनी किती परिश्रम घेऊन हे प्रचंड संमेलन उभे केले असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. त्यांच्या उपक्रमशीलतेला आमचे अभिवादन. सकौतुक.

प्र. ब. कुळकर्णी
१६, शांतिविहार, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४० ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.