पत्रव्यवहार

– १ –

स.न.वि. वि.
सीतारामपंत देवधर यांचे ‘माझा जीवनवृत्तांत’ (१९२७) हे आत्मचरित्र वाचण्यात आले. ते आगरकरांचे सुधारक चालविण्यात प्रथमपासूनचे सहकारीआगरकरांच्या निधनानंतरही दीर्घकाल त्यासाठी धडपडणारे. त्या पुस्तकातील पृ. १०५ ते १६७ हा भाग आपल्या पाहण्यात आला नसल्यास आपल्याला कुतूहलाचा वाटेल. या मजकुरातील खूपच भाग ‘आद्य सुधारक या शीर्षकाखाली आपल्याला प्रसिद्धही करता येईल असे वाटते.
वाचताना काही निर्देश आढळले.
(१) सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत (पृ. १५५).
(२) १४ ऑक्टोबर १८९५ चा सुधारकचा अंक. न्या. रानड्यांनी याच्या दहा हजार प्रती काढून वाटल्या होत्या. तो अंक किंवा त्या मुद्रितातील प्रत उपलब्ध नाही. या अंकात सीतारामपंत देवधरांनी इतर कोणताही मजकूर न घालता विस्तृत लेख लिहिला होता. त्या लेखात काँग्रेसच्या पुढार्‍यांचे परिषदेबद्दल काय अभिप्राय होते, तिचे उद्देश काय आहेत, तिने आठ वर्षांत पास केलेले ठराव देशहितास कोणत्याही प्रकारे विघातक नसून उलट साधकच कसे आहेत, व सुधारणेच्या बाबतीत परिपद उठल्याबसल्या कायद्याचे साह्य घेऊ इच्छिते, हा आरोप वस्तुस्थितीस अगदी सोडून कसा आहे वगैरे गोष्टी काँग्रेसच्या व परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टाच्या आधारे स्पष्ट करून दाखविण्यात आल्या होत्या. (पृ. १४०-१४१).
नंतरच्या काळात आता हे उपलब्ध आहेत काय? आपल्याला किंवा आपल्या वाचकांपैकी कोणाला माहीत असल्यास कळवावे. कळावे ही वि.

आपला देवदत्त दाभोलकर
४३ गुरुकृपा कॉलनी गोडोली, सातारा – ४१५००१

– २ –

संपादक, आजचा सुधारक, नागपूर
ललिता गंडभीर ह्यांच्या पत्राला मी पुढचे उत्तर देत आहे. त्यांनी केलेले विश्लेषण (स्त्री मुक्तीच्या व्याख्येचे) बरोबर आहे. अशी परिस्थिती आपोआप निर्माण होत नाही. ती करावी लागते व त्याकरता घाबरून चालावे लागत नाही. आज भारतात देखील माझ्या सारख्या केक स्त्रिया अविवाहित राहून स्वतंत्र (कुटुंबीयाबरोबर नव्हे) राहतात. लग्न हे option आपल्या आपण होत नाही. ते option करावे लागते. म्हणजेच कुणीतरी स्वतःपुरते तरी “मला लग्न करायचे नाही असे म्हणावे लागते. ते पाश्चात्य देशात स्त्रियांनी केले. त्याची किंमत मोजली.
दाखवून लग्न ठरविण्याच्या प्रयत्नाला भारतात राहून उडवून लावण्याची हिंमत हवी. ती देखील काही मुली दाखवतात. अमेरिकेचे आयते पीठ त्याला कशाला लागते. संघर्ष करायची, वाईटपणा घ्यायची–विशेषतः लैंगिक शुद्धतेच्या बाबतीत किंवा अविवाहित । मातृत्वाच्या बाबतीत- कणखर तयारी हवी. सगळे आमच्या बाजूचे दुसर्‍या कुणी तरी करून द्यावे व मग आम्ही दाखवून लग्न करून घेण्याच्या सूचनेला हसून उडवून लावू ह्याला स्त्री-मुक्ती कसे काय म्हणायचे? ते देखील प्रवाहाबरोबर जाणेच झाले.
सध्या स्त्रीमुक्तीची चळवळ Single woman कडे लक्ष वेधून घेते आहे. भारतात.
कळावे.

वसुधा धागमवार
११३-स शाहापूर जाट, आझाद व्हिले जवळ, नवी दिल्ली ११००१६

– ३ –

स.न.वि.वि.
एप्रिल ९४ चा अंक अगदी ३१ मार्चला मिळाला. धन्यवाद! मुखपृष्ठावर अविवाहित मातृत्व पाप नाही!” या शीर्षकाखाली समर्पक अशी माहिती दिली आहे. पण व्यवहारातील अनुभव तर अतिशय निराळा आहे.
आज शैक्षणिक दर्जा वाढत आहे. स्त्री वेगळा व स्वतंत्र विचार करू लागली आहे. त्यामुळे लग्नाची वये वाढत आहेत. वय वाढते तसे मानसिक तणावही वाढत जातात. स्त्री असो वा पुरुष एका विशिष्ट वयात स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाढत जाते, त्यात शारीरिक आकर्पणही फार जबरदस्त असते. सामाजिक बंधनात जगत असतानासुद्धा तोल ढासळतो. नव्हे! नैसर्गिक भावनात्मक भूक शमविण्याच्या जबरदस्त ओढीपायी दोघे एकत्र येतात. शुद्ध मैत्रीत विकार नसतो वगैरे बोजड शब्दात खूपसे सोवळ्या साहित्यात, आध्यात्मिक साहित्यात उल्लेख असले तरी निसर्गाशी प्रतारणा करण्याचे कारण असू नये! लैंगिक विषयाची चर्चा करणे भारतीय संस्कृतीत अब्रह्मण्यम् मानले जाते. त्यामुळे अभावानेच ती चर्चा व्हायची! नि झालीच तर ती सामान्यांना समजू नये इतक्या उच्च पातळीवरील असते. डॉ. श्री. व्यं. केतकर म्हणतात, अविवाहित मातृत्व पाप नाही. पण पापपुण्याच्या कल्पनेत वावरण्याचे दिवस संपले आहेत. विज्ञानाने मातृत्व टाळण्याचे सुलभ सोपे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. नि त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात वापरही होत आहे. तरीपण एखादी लता कामत सारखी सुजाण स्त्री जाणीवपूर्वक गर्भ वाढू देते व त्याचा सामनाही करते. परंतु ज्या समाजात ती वावरते, त्या समाजात स्टेजवर बोलणारी व्यक्ती व घरात बोलणारी व्यक्ती एक असली तरी वक्तव्ये मात्र नेहमीच भिन्न व दोन प्रकारची असतात, हे कुणी नाकारू शकणार नाही.
अविवाहित मातृत्वाच्या संबंधाने पाप-पुण्य ह्याची चर्चाच कशाला करावयाची तरी पण डॉ. श्री. व्यं. केतकरांनी समाज मनावरील धूळ झटकण्यासाठी केलेला हा उचित प्रयत्न म्हणून अभिनंदनीय आहे.

मोरेश्वर वडुलकोंडावार
मूल, 441224 जि. चंद्रपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.