देव ताओवादी आहे का?

देव ताओवादी आहे का?

रेमंड स्मल्यन (Raymond Smullyan) याच्या ‘द ताओ इज सायलंट’ ह्या पुस्तकातील ‘इज गॉड अ ताओइस्ट?’ हा संवाद हाफस्टाटर आणि डेनेट यांनी संपादित केलेल्या The Mind’s I या पुस्तकात उद्धृत केला आहे. या संवादाचे हे स्वैर व बोली भाषेतील मराठी रूपांतर आहे.
मानव : म्हणून म्हणतो, परमेश्वरा, तू जर खरोखरच कृपाळू असशील तर मला इच्छास्वातंत्र्याच्या शक्तीतून मुक्त कर.
देव : काय, मी दिलेली सर्वात मोठी देणगी तू नाकारतोस?
मानव : जबरदस्तीने दिलेली ‘देणगी’ कशी होईल? मला इच्छास्वातंत्र्य आहे, पण माझ्या इच्छेमुळे नव्हे. मला विचारलं असतं तर मी कधीच हे मागितलं नसतं. आता मात्र मला आवडो की न आवडो, मला इच्छास्वातंत्र्य आहेच!
देव : पण तुला ते का नको आहे?
मानव : कारण इच्छास्वातंत्र्य आलं की नैतिक जबाबदारी आली, आणि ती मला झेपत नाही रे.
देव : नैतिक जबाबदारी तुला इतकी का असह्य वाटते?
मानव : काय की बुवा, पण वाटते खरी.
देवः बरं, मग तुझी नैतिक जबाबदारी काढून घेतली आणि इच्छास्वातंत्र्य राहू दिलं तर चालेल?
मानव : (जरा विचार करून) : नाही. ते नाही चालणार.
देव:मला वाटलंच होतं.नुसतंच नैतिक जबाबदारीचं कारण नाही आहे. इतर काय खुपतंय तुला इच्छास्वातंत्र्याबाबत?
मानव : इच्छास्वातंत्र्य असलं की मी पाप करू शकतो, आणि मला हातून पाप घडायला नको आहे.
देव : मग नको करूस पाप. का करतोस पापं?
मानव : माहिती नही बुवा. वाईट इच्छा होतात, प्रलोभनं वाटेत येतात आणि ती टाळता येत नाहीत.
देव : जर तू प्रलोभनं टाळूच शकत नसशील तर तू तुझ्या इच्छेने पाप करत नाहीस. म्हणजे माझ्या लेखी तरी तू पापच करत नाहीस.
मानव : नाही, नाही. तसं नाही. मला नेहमी वाटतं की जरा प्रयत्न केला तर प्रलोभनं टाळता येतील. मला माहिती आहे की इच्छाशक्ती पूर्ण ताकदीनं वापरली तर माझ्या हातून पाप व्हायचं नाही.
देव : एक ठरव, तुला पाप टाळायचा प्रयत्न करता येतो की नाही? मानवः जेव्हा मी टाळत असतो ना, तेव्हा वाटतं की मी पूर्ण जोर करतोय; पण नंतर
मात्र नेहमी वाटतं की मी जरा कचरलोच.
देवः म्हणजे तुला तू खरंच प्रलोभनं टाळतोयस का हेच माहीत नाही. मग तू पापं करतच नसशील, हेही शक्य नाही का?
मानव : पण खात्री नाही ना? भीती वाटते रे, हातून पापं होत असतील अशी!
देव : त्यात भिण्यासारखं काय आहे?
मानव : नीट माहीत नाही. पण तू पाप्यांना जबर शिक्षा करतोस म्हणे.
देव : अच्छा, अच्छा. त्याला घाबरतोयस तू! सरळ शिक्षा करू नको असं का नाही म्हटलंस? उगीच इच्छास्वातंत्र्य आणि नैतिक जबाबदारीचा घोळ नुसता!
मानव : तू शिक्षा न करणं मानणार नाहीस हे माहीत आहे मला.
देव : मी काय मानणार नाही हे तुला माहीत आहे? बरं बाबा, मी असं करतो- तुला खास ‘गुन्हापूर्व माफी’ देतो. तू वाट्टेल तेवढी पापं कर. मी तुला ईश्वरी वचन देतो, की मी तुला शिक्षा करणार नाही. आता तर झालं?
मानव (घाबरून) : नको, नको, तेवढं मात्र करू नकोस!
देव : का? अरे माझ्या शब्दावर विश्वास नाही तुझा?
मानव : तसं नाही रे, पण शिक्षा-बिक्षा सोडली तरी मला पाप करण्याविषयी मनःपूर्वक घृणा वाटते.
देव : हत्तेच्या. तसं असेल तर आपण तुझी घृणा काढून टाकू. हं, ही घे जादूची गोळी. एकदा ही घेतलीस की मग घृणाबिणा कुछ नहीं. तू आनंदाने पापं करायला लागशील आणि तुला कोण्णी कोण्णी शिक्षा करणार नाही. मी नाही, तू नाही….
मानव : थांब. थांब. असं करू नकोस!
देव : असा कसा रे तू? घृणा वाटणं हा शेवटचा अडथळा मी काढून टाकतोय आणि…. ।
मानव : मी नाही घेणार ती गोळी.
देव : पण का?
मानव : मला वाटतं त्या गोळीनं मला पुढे वाटणार आहे ती घृणा नाहीशी होईलही, पण माझी आजची घृणा इतकी तीव्र आहे की मी गोळी घेणार नाही.
देव : मी तुला गोळी घ्यायची आज्ञा करतो!
मानव : मी तुझी आज्ञा पाळणार नाही! देव : हे तू स्वतःची स्वतंत्र इच्छा वापरून म्हणतोयस? मानव : हो!
देव : उपयोगी दिसतंय हे इच्छास्वातंत्र्य!
मानव : म्हणजे काय?
देवः नाही, म्हटलं तुला इच्छास्वातंत्र्य नसतं तर तू माझी आज्ञा मोडू शकला नसतास. तुझी इच्छा गेली उडत. घेतोस की नाही गोळी?
मानव (गयावया करत) : अरे नको रे!
देवः नाही, मी सक्ती करत नाही आहे. पण काय रे, मी तुझी मूळ प्रार्थना ऐकली; तुझं इच्छास्वातंत्र्य काढून घेतलं आणि तुला सांगितलं की इच्छास्वातंत्र्य गेल्याबरोबर तू ही गोळी घेशील, तर मग? ।
मानवः इच्छास्वातंत्र्य गेल्यावर मी कशी घेईन गोळी
देव : आपणहून नाही म्हणत आहे मी, पण नियत घटना अशा घडतील की तू ती घेशीलच.
मानव : नको. मला हे पण नको.
देव : मग आधी काय मागे लागला होतास इच्छास्वातंत्र्य नको म्हणून? असू दे ते तुझं तुझ्याजवळच.
मानवः आता समजलं तू काय युक्ती करतोयस ते! पण मी असा फसणार नाही. पुन्हा एकदा आपण काय काय बोललो ते सांगतो.
देव: हो. सांग.
मानव : दोन परस्परविरोधी गोष्टी तू सांगतोयस. आधी तू म्हणालास की स्वतःच्या इच्छेनं क्रिया केल्याशिवाय पाप होत नाही. आणि आता म्हणतोयस की गोळी घेऊन इच्छास्वातंत्र्य सोडून दिल्यावर मी पोटभर पापं करू शकेन. एकदा इच्छास्वातंत्र्य गेल्यावर मी पापं कशी करू शकेन?
देव : एक मिनिट, एक मिनिट – मी असं म्हटलं नाही की गोळी घेतल्यामुळे इच्छास्वातंत्र्य जाईल. मी म्हटलं की गोळीमुळे पापाबद्दलची घृणा जाईल.
मानवः आं? काय घोळ झाला?
देव : थांब. पुन्हा सुरुवात करतो. मी तुझं इच्छास्वातंत्र्य काढून टाकतो. पण एका अटीवर. ते गेल्यानंतर तू अशी अनेक कृत्यं करशील की ज्यांना तू पाप समजतोस. पण तू ही कृत्यं स्वेच्छेनं करत नाहीयेस, म्हणून कायद्याच्या दृष्टीने तू पापी नाहीस. आणि याबद्दल नैतिक जबाबदारी, शिक्षा वगैरे काही तुला होणार नाही. पण तुला सध्या जे काही वाटतंय, त्याप्रमाणे ही घृणास्पद पापं असतील. अर्थात गोळीमुळे तुला तेव्हा तसं वाटणार नाही. चालेल? ।
मानव : पण सध्या घृणा वाटतेय ना! नाही बाबा, नाही चालायचं.
देव : मग तुझं इच्छास्वातंत्र्य काढून टाकू नको?
मानव (नाखुशीन) : नको.
देव : पण काय रे, तुझा विचार का बदलला, एकदम?
मानवः तूच तर म्हणालास ना की इच्छास्वातंत्र्य गेल्यावर मी सध्यापेक्षा जास्त पाप करीन म्हणून?
देवः कसा रे तू! इच्छास्वातंत्र्य नाही तर पापच करता येत नाही.
मानव : पण आत्ता मी इच्छास्वातंत्र्य भोगतोय, म्हणून जर मी ते सोडून दिलं तर पुढच्या सर्व पापांचा क्षण हाच नाही का येणार?
देवः चांगलाच फसलायस की लेका तू!
मानव (कोपरापासून हात जोडत) : चांगलं दुहेरी पेचात धरलं आहेस! इच्छास्वातंत्र्य राखलं तर पुढे आयुष्यभर पापं आणि आत्ता ते सोडलं, तर सोडायचं पाप. छ्याः.
देव : अरे पण हा दुहेरी पेच मलाही नाही का? मी तुला वर देऊ इच्छितो. पण तुला इच्छास्वातंत्र्य असूनही समाधान नाही आणि नसूनही नाही.
मानव : हो ना!
देव : पण ह्यात माझ्यावर चिडण्यासारखं काय आहे?
मानव : तू मला मुळात ह्या लफड्यात अडकवलंसच कशाला?
देव : अरेच्च्या! तुला दोन्हीत समाधान नाही ना?
मानव : आता नाही, पण आधी?
देव : काय करता आलं असतं मला?
मानव : मुळात मला इच्छास्वातंत्र्य दिलंसच का? एकदा दिलं की मग मला सुटका नाही.
देव : अच्छा! म्हणजे दिलंच नसतं तर! पण त्याने काय झाल असतं?
मानव : मला पापच करता आल नसतं!
देव : ठीक आहे. मला चुका सुधारायला नेहमीच आवडतं.
मानव : काय?
देव : पाखंडी वाटलं ना माझं बोलणं तुला? की विरोधाभास वाटला? एकीकडे सचेतन जीवानं मी चुकू शकतो हे मानणं अनैतिक आहे. दुसरीकडे मी काहीही करू शकतो. आणि मी सचेतन आहे. मग मीच मी चुका करू शकतो असं मानावं की नाही?
मानव : काय वाटेल ते बोलतोस! सचेतन जीवानं तू चुकू शकतोस असं मानणं गैर नाही – मर्त्य जीवानं ते मानणं गैर. आणि तू मर्त्य नाहीस.
देव : मग मला चुका सुधारायला आवडतं म्हटल्यावर तू का दचकलास?
मानव : कारण तू चुका करूच शकत नाहीस, हे मला माहीत आहे.
देव : मी चुका करू शकतो असं मी म्हटलंच नाही. मी फक्त म्हटलं की मला चुका केल्याच तर त्या सुधारायला आवडतं.
मानवः ते जाऊ दे रे. तुला पटलं की नाही मला इच्छास्वातंत्र्य देण्यात तुझं चुकलंच.
देव : पाहू ना आपण काय आहे ते. ऐक. तुला इच्छास्वातंत्र्य नकोय, कारण ते असताना तू पाप करू शकतोस, आणि तुला पाप करायचं नाही. का कोण जाणे, पण तुला पाप करायचं नाही. आणि आता जर तू इच्छास्वातंत्र्य सोडलंस तर तू पुढच्या सर्व कृत्यांना जबाबदार होतोस. म्हणून मी तुला मुळातच इच्छास्वातंत्र्य द्यायला नको होतं.
मानव : एक्सॅक्ट्ली! |
देव : मला तुझं मन समजतंय. अगदी धर्ममार्तंडसुद्धा बरेचदा असं म्हणतात की मी त्यांना न विचारता इच्छास्वातंत्र्य द्यायचं ठरवलं आणि मग मात्र त्यांना जबाबदार धरायला लागलो. थोडक्यात म्हणजे असा करार असा नव्हताच.
मानव : एक्झक्ट्ली!
देव : तुमचं म्हणणं मला समजतं, पण मुख्य मुद्दा काय आहे, हेच न समजल्यामुळे तुम्हाला तुमच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे. मी तुला खरी भानगड काय आहे ते सांगतो. एकदा का ती कळली की तुला उगीच पश्चात्ताप व्हायचा नाही.
ऐक. मी एक नवीन विश्व तयार करतो. पूर्णपणे नवीन. आणि त्यात अगदी तुझ्याचसारखा एक मर्त्य मानव बनवतो. तुझाच पुनर्जन्म करतो म्हण ना. आता याला इच्छास्वातंत्र्य द्यायचं की नाही, हे अजून ठरायचं आहे. काय करून हवं आहे तुला, सांग.
मानव (सुटकेचा निःश्वास सोडून) : सोडून दे रे त्याला. का ssही देऊ नकोस?
देवः बरं. तू म्हणतोस तर नाही देत इच्छास्वातंत्र्य. पण हा नवा तू भयंकर कृत्य करील बरं.
मानव : पण इच्छास्वातंत्र्य नसल्यामुळे ती पापं होणार नाहीत.
देवः पापं म्हणा की नका म्हणू, इतर सचेतन जीवांना त्या कृत्यांचा त्रास तर होईलच.
मानव (थांबून) : पुन्हा पकडलंस मला! मी जर हा नवा प्राणी इच्छास्वातंत्र्याशिवाय बनव म्हटलं आणि त्यानं काहीही घोरकर्म केली की पाप सगळं माझ्या माथी येणार.
देवः तसं असेल तर मी असं करतो. मी आधीच इच्छास्वातंत्र्य द्यायचं की नाही ते ठरवतो. हे बघ, ह्या चिठ्ठीवर लिहून ठेवतो. कध्धी कध्धी बदलणार नाही हे. आता बघ, तुझ्यावर काहीही जबाबदारी नाही. आता सांग, मी काय ठरवलं असेल अशी तुला आशा आहे?
मानव (खूप वेळाने) : देऊन टाक त्याला इच्छास्वातंत्र्य.
देव : अरे व्वा! मी तुझ्यावर काssही जबाबदारी येणार नाही असं केलं आहे. तरी तुला आशा आहे की मी त्याला इच्छास्वातंत्र्य देईन?
मानवः पाप वगैरे सोड. तू म्हणतोयस की इच्छास्वातंत्र्य नसेल तर तो लोकांना त्रास देत फिरेल. ते मला नकोय.
देव (एक अनंत काळाचा सुस्कारा सोडून) : चssला. तुला शेवटी खरी ग्यानबाची मेख कुठे आहे ते कळलं!
मानव : कुठे?
देव : पापाला महत्त्व नाही. दुसर्‍यांना होणारया त्रासाला आहे..
मानव : तू तर काय उपयोगी आहे, तेवढंच बघतोयस.
देव : मग? आहेच मी उपयुक्ततावादी!
मानव : विश्वास नाही बसत.
देव : तुला काय वाटलं, मी नीतिवादी किंवा धर्मवादी आहे?
मानव : मला काय बोलावं हेच सुचत नाही.
देवः बरंss झालं. नाहीतरी तू फार बोलतोस. काय रे, मी मुळात तुला इच्छास्वातंत्र्य का दिलं असं तुला वाटतं?
मानवः मी धर्मग्रंथांत काय वाचलं आहे ते सांगतो हं, ऐक. इच्छास्वातंत्र्य नसेल तर पाप करता येत नाही, आणि पुण्यही मिळवता येत नाही. म्हणजे स्वर्गात जाऊन राहणंही जमत नाही, मुक्ती मिळत नाही.
देवः अस्सं! म्हणजे माझी मजाच मजा आहे, म्हणतोस!
मानव : मला कळलं नाही, तू काय म्हटलं ते.
देव : बघ. मी स्वर्गातच आहे. आणि अगदी अनंत काळापर्यन्त आहे. पण मला पुण्य कमवायची झिगझिग काही करावी लागली नाही कधी. तुम्हाला मात्र नीति-अनीतीचे झगडे सोडवावे लागतात, पुण्य कमवावं लागत, पाप टाळावं लागतं. येवढं करून स्वर्ग आहे याची काही खात्री नाही. मी तुमच्या वागण्यानं खूष झालो आहे, ह्याचीही खात्री नाही. कितीही चांगलं वागलं तरी मी हेच म्हणू शकतो की ‘नो, पुरेसं नाही झालं. आणि या उलट मी आत्ताच मुक्त
आहे, स्वर्गात आहे. मजा आहे की नाही माझी? जळतोस की नाही माझ्यावर?
मानव : तुझ्यावर जळणं पाखंडी होत नाही का?
देव : सोड रे! तू पोरीटोरींना इम्प्रेस करायला बोलत नाही आहेस. तू चक्क परमेश्वराशी बोलतोयस. काय, हेवा वाटतो की नाही माझा?
मानव : नाही, म्हणजे तसा वाटतो म्हणा!
देवः तुझ्या सध्याच्या जगाकडे पाहायच्या दृष्टीनं मी हेवा करण्यालायकच आहे. पण तुला जग खरं कसं आहे ते कळलं तर मात्र तुला असं वाटायचं नाही. काय रे, तुला खरंच वाटतं की मी तुमची परीक्षा घ्यायलाच फक्त तुम्हाला इच्छास्वातंत्र्य दिलं आहे. तुम्ही नेहमी जाहिराती करता तेवढा मी दयाळू असतो, तर सरसकट सगळ्यांना मुक्ती, सगळ्यांना स्वर्ग असं का नाही केलं?
मानव : मला असं शिकवलं आहे की तुझा नीति-अनीतीचा विचार इतका न्यायनिष्ठुर आहे की पुण्याला बक्षीस आणि पापाला शिक्षा दिल्याशिवाय तुला बरं वाटत नाही.
देव : काय चुकीचं शिकलायस तू!
मानव : पण धर्ममार्तंड तर सांगतात की तू पाप्यांना रागानं जळत्या निखान्यांवर धरतोस आणि दयाळू असल्यानं आत टाकत नाहीस. तुझ्या सगळ्या शत्रूशीही तू असं वागतोस.
देवः मी देवाच्या दयेनं धर्ममार्तंडांशी कधी बोलतच नाही. पण तुझ्या म्हणण्यात मात्र तीन ठोस चुका आहेत. मी कधीच रागवत नाही, मला पाप-पुण्याशी कर्तव्य नाही आणि मला कोणी शत्रूच नाहीत.
मानव : म्हणजे तू कोणाला शत्रू मानत नाहीस की तुला शत्रू मानणारे कोणी नसतात?
देव : पहिलंच मी म्हणत होतो, पण दुसरंही बरोबरच आहे.
मानव : असं तुला वाटतंय! लोकांना तुझा खूप राग येतो, अगदी मलासुद्धा. पण कधीकधीच हं.
देव : ते तुम्हाला मी कसा आहे असं वाटतं, त्याबद्दल असतं. खुद्द माझ्यावर राग नसतोच तुमचा.
मानव : तुझं काय म्हणणं आहे? तू जसा आहेस असं वाटतं त्यावर रागावणं ठीक आहे, पण तू जसा खरा आहेस त्यावर रागावणं गैर आहे?
देवः छे. मी त्यापेक्षाही पुढे जातोय. गैर-योग्यशी मला कर्तव्य नाही. मी खरा कसा आहे हे कळल्यावर कुणी माझ्यावर रागावूच शकणार नाही.
मानव : काय रे, आमच्या समजुती जर येवढ्या चुकीच्या आहेत, तर तू आम्हाला खरं काय ते सांगत का नाहीस?
देव : कोण म्हणतं सांगत नाही म्हणून?
मानवः नाही, तू आमच्या डोळ्यांना दिसत नाहीस, कानांना ऐकू येत नाहीस, हातांना जाणवत नाहीस. असा दृश्य रूपात समोर येऊन आमच्या चुका दूर का नाही करत?
देव : अरे भोळ्या जीवा, मी तुमच्या ज्ञानेंद्रियांना का दिसणार आहे? मीच तुमची ज्ञानेंद्रियं आहे म्हणणंच जास्त योग्य होईल!
मानव : तू माझी ज्ञानेंद्रियं आहेस?
देव : अगदी तसंच नाही, पण मी ज्ञानेंद्रियांना दिसण्यातला मात्र नाही. असं पाहा, तू एखादा आंबा पाहतोस. आंबा दिसतो. तुझं आंबा पाहणं मात्र दिसत नाही. तुला स्वतःचे विचार तरी कुठे दिसतात? मी आंब्यापेक्षा आंबा पाहण्याच्या जास्त जवळ आहे.
मानव : पण जर तू मला दिसलाच नाहीस, तर तू आहेस, हे कशावरून?
देवः खरंच, कशावरून तुला मी आहे असं वाटतं?
मानवः तुझ्याशी बोलतोय की मी!
देव : असं कर उद्या ठाण्याला जा, आणि तिथल्या डॉक्टरांना सांग, “मी काल देवाशी बोललो”! काय म्हणतील ते?
मानवः ते काय म्हणतील ते त्यांच्यावर आहे. पण बहुतेक सर्वजण म्हणतील की मी स्वतःशीच बोलत होतो.
देव : आणि त्यांचं म्हणणं योग्य असेल!
मानव : म्हणजे काय, तू नाहीयेस?
देव: काय मस्त तर्कशास्त्र वापरतोस रे तू? तू स्वतःशीच बोलतोयस म्हणून मी नाही!
मानव : नाही, मला जेव्हा मी तुझ्याशी बोलतो आहे असं वाटतं तेव्हा जर मी स्वतःशीच बोलत असेन, तर कोणत्या अर्थी तू आहेस?
देव : दोन तर्कदोष आणि एक घोटाळा! तू माझ्याशी आत्ता बोलतो आहेस का, आणि मी आहे का हे पूर्णपणे वेगळे प्रश्न आहेत. तू आत्ता माझ्याशी बोलतोयस. पण तसं नसतं तरी मी आहे की नाही हे ठरतच नाही.
मानव : म्हणजे ‘मी स्वतःशीच बोलतोय म्हणून तू नाहीस’ असं म्हणायच्या ऐवजी मी म्हणायला हवं होतं की मी स्वतःशीच बोलतोय म्हणजेच मी तुझ्याशी बोलत नाही आहे.
देव : हे वेगळंच म्हणणं आहे, पण हेही चूकच!
मानव : वारे वा. मी जर स्वतःशीच बोलतो आहे तर तुझ्याशी कसा बोलत असेन?
देवः “स्वतःशीच” म्हणू नकोस. ‘च’ नी घोटाळा होतोय. अनेक तर्कशुद्ध प्रकारांनी तुझं स्वतःशी बोलणं आणि माझ्याशी बोलणं एकाच वेळी होऊ शकतं.
मानव : एखादा प्रकार तरी सांग.
देव : ऐक. तू आणि मी एकच असलो तर?
मानव : पुन्हा पाखंड!
देव : काही धर्माप्रमाणे. सगळ्या धर्मात नाही असं. काही धर्म तर तू आणि मी एकच आहोत हे साधं, उघड, सत्य मानतात.
मानव : म्हणजे मला तू आणि मी एकच आहोत असं मानायला हवं?
देवः नाही रे! ते एक मत झालं. असंही असेल की तू माझा भाग आहेस आणि सध्या ह्या ‘तू’ असलेल्या माझ्या भागाशी बोलतोयस. किंवा मी तुझा भाग असेन आणि सध्या तू ह्या ‘मी’ असलेल्या तुझ्या भागाशी बोलतोयस. किंवा तू आणि मी यांचा काही भाग एकच असेल आणि तू त्याच्याशी बोलतोयस. स्वतःशी बोलणं म्हणजे माझ्याशी नाही असं मानायचं असेल, तर आपण पूर्ण वेगवेगळे हवे. पण त्यातही तू एकाच वेळी दोघांशीही बोलू शकतोसच.
मानव : म्हणजे तुझं म्हणणं आहे की तू आहेस.
देव : असण्याचा संबंध कुठे आला? माझं फक्त म्हणणं आहे की तू स्वतःशी बोलतोयस यावरून माझ्याशी बोलत नाहीस हेसुद्धा सिद्ध होत नाही. मी आहे की नाही ते दूरच!
मानव : ए. सरळ सांग, तू आहेस का?
देव : काय विक्षिप्त प्रश्न विचारतोस!
मानव : का? सगळी माणसं हे नेहमीच विचारत आली आहेत.
देव : ते माहीत आहे रे, पण मलाच हे विचारणं विक्षिप्त नाही का? असं पाहा, तुला मी आहे की नाही याची काळजी वाटतेय. ठीक आहे? तुला सध्या हे जे चाललंय तो भास वाटतोय. मग अशा ‘भासमान माझ्याकडून तुला माझ्याबद्दल ठोस असं काय मिळणार?
मानव : सरळ ‘सांगत नाही’ म्हण ना!
देव : अरे मुद्दाम नाही करत आहे मी असं. समजा मी म्हटलं की मी नाही आहे. काय ठरेल यावरून? आणि उलट मी म्हटलं की हो, मी आहे. यावरून तरी काय कळेल तुला?
मानव : मग कोण सांगू शकेल मला याबद्दल?
देव : काय की बुवा. तुलाच शोधायला हवं ते.
मानव : पण मी तरी कसं शोधू?
देव : काय की बुवा. तेही तुलाच शोधायला हवं.
मानव : म्हणजे तू मला मदत करणार नाहीस तर?
देव : असं कुठे म्हणालो मी? मी तुला सांगू शकणार नाही. मदत करीन की.
मानव : कशी?
देव : ते माझ्यावर सोड. पण पुन्हा मूळ प्रश्नावर येऊ. तुला मी इच्छास्वातंत्र्य का दिलं असं वाटतं तुला?
मानव : ज्यू लोक असं मानतात की मुक्ती कमावल्याशिवाय आम्ही तिची कदर करू शकत नाही आणि ‘कमवायला’ इच्छास्वातंत्र्य हवंच.
देव : जरा जास्त बरं वाटतं हे. पण मी काही देवदूत, यक्ष, अप्सरा वगैरेही बनवलेत की. ते नेहमी माझ्याजवळ असतात आणि त्यांना पाप भुलवू शकतच नाही, कारण त्यांना पुण्यानं भारून टाकलेलं असतं. तुझ्या ज्यू मित्राला विचार, की सगळ्यांना देवदूतच का केलं नाही ते.
मानव : का नाही केलंस, रे?
देव : हा सर्व वादच चूक आहे. मी काहीही देवदूत वगैरे बनवलं नाही. माणसं जशी उत्क्रांतीतून बनली तसेच देवदूतही विश्वाच्या उत्क्रांतीतून बनले आहेत. सुष्ट आणि दुष्ट यांत फक्त वयाचा फरक आहे. खूप वर्ष गेल्याशिवाय हे कळतच नाही की ‘पाप’ म्हणजे दुःख, दुसरं काही नाही. पापाच्या विरोधात सांगितली जाणारी सर्व कारणं या एका कारणापुढे क्षुल्लक ठरतात.
मी उपयुक्ततावादीच आहे, नीतिवादी नाही. मला लोक नीतिवादी समजतात ही खरी फार खेदाची गोष्ट आहे. जगाच्या रचनेत माझं कार्य असलंच तर ते शिक्षा देणं किंवा मुक्ति देण्याचं नाही, तर फक्त सचेतन जीवांना पूर्णत्वाकडे नेण्याच्या क्रियेला मदत करायचंच आहे. खरं तर हेही अगदी काटेकोर नाही, पण…
मानव : काटेकोर नाही का म्हणतोस?
देवः दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे ‘माझं कार्य’ म्हणणंच बरोबर नाही. जगाची रचना म्हणजेच मी. दुसरं म्हणजे पूर्णत्वाकडे नेणाया क्रियेला मी मदत करतो, असंही नाही. ती क्रिया म्हणजेच मी. पूर्वी ताओवादी पंथाचे लोक मला ‘ताओं म्हणायचे. ते म्हणायचे की मी काहीच करत नाही, पण जे काय घडतं ते माझ्यामार्फतच. अद्ययावत भाषेत ‘वैश्विक क्रियेचं कारण’ मी नाही, मी वैश्विक क्रियाच आहे. जर माझी काटेकोर व्याख्या सध्याच्या माणसांना समजेल अशी करायची असेल, तर असं म्हणा की मी म्हणजे उद्बोधनाची क्रिया आहे. आणि जर तुम्हाला सैतानाची व्याख्या हवीच असेल, तर तो म्हणजे या क्रियेला लागणारा प्रचंड काळ आहे. खरं तर येवढा काळ हवाच. मी काही हा काळ कमी करू शकत नाही. पण जर तुम्हाला माझं हे रूप कळलं, तर तुम्ही या दिरंगाईनी दुःखी होणार नाही. हळूहळू तुमचं हे दुःख, सध्याचा हा त्रास, सारं काही नाहीसं होईल.
मानव : मीही असलं काहीतरी ऐकलं आहे. पण इतर जीवांबाबत माझी काही कर्तव्यं नाहीत का?
देव : आहेत तर! हे पहा, ज्ञानोदय ही थोडीशी वैयक्तिक थोडीशी सामाजिक क्रिया आहे. स्वतःचं उद्बोधन करून घ्यायचा प्रयत्न केलाच, तर इतरांचाही ज्ञानोदय होतोच.
मानवः एकच गोष्ट मला जरा विचित्र वाटते. तू म्हणतोस की तू एक क्रिया आहेस. हे जरा तिर्‍हाईतासारखं वाटते. बर्‍याच लोकांना व्यक्तिगत देव हवा असतो.
देव : म्हणून मी व्यक्तिगत होऊ? खाजगी होऊ?
मानव : नाही पण धर्मानं माणसाच्या गरजा पूर्ण करायला नकोत का?
देव : हो पण ‘व्यक्ती’ असणं हे बघणार्‍याच्या नजरेत आहे. तुम्हाला मुंग्यांमधल्या व्यक्ती समजतात? मंगळावरचा एखादा ‘माणूस’ आला तर त्याला तुम्हीही भौतिक नियम पाळणाच्या रचना आहात, येवढंच वाटेल. कोणत्याही गोष्टीकडे व्यक्ती म्हणून पाहणं आणि तिहाइतासारखं पाहणं यात बरं-वाईट काहीच नाही. जास्त पहचान झाली की थोडं व्यक्तिपण जाणवायला लागेलही. आता तुझंच पाहा, तुला काय वाटतं? मी व्यक्ती आहे की नाही?
मानव : आता बोलतोय की मी तुझ्याशी!
देवः झालं तर. पण माझ्याकडे व्यक्ती म्हणून न पाहणंही ठीक आहे.
मानव : पण तू जर फक्त एक क्रिया असलास, तर तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ?
देव : ‘फक्त’ किती गोड म्हणतोस रे तू? तू फक्त विश्वातच तर राहतोयस. आणि प्रत्येक गोष्टीत ‘अर्थ’ हवाच का? तू कधी झाडांशी बोलतोस?
मानव : कधीच नाही!
देव : पण बरीच मुलं आणि आदिवासी बोलतात.
मानव : पण मी मूलही नाही आणि आदिवासीही नाही.
देवः दुर्दैवानं.
मानव : दुर्दैवानं का?
देव : पोरांना आणि आदिवासींना काही चांगल्या अंतर्ज्ञानी क्रिया येतात. पण ते सोड. आपण मी तुला इच्छास्वातंत्र्य का दिलं यावर बोलत होतो.
मानव : मीही त्याचा विचार करतोच आहे.
देव : म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही म्हण की!
मानव : लक्ष आहे रे, पण वेगळ्या पातळीवर मात्र त्याचाच विचार करतोय.
देव : मग काय ठरलंय?
मानव : तू आम्हाला तपासायला इच्छास्वातंत्र्य दिलं नाही म्हणतोस. मुक्ती कमावणं वगैरे झूट आहे म्हणतोस. पण लोकांच दुःख कमी करायचं म्हटल्यावर तुला बरं वाटलं. बहुधा असं असेल की इच्छास्वातंत्र्य असल्यामुळे मी इतर जीवांना जेवढा त्रास देतो त्यापेक्षा जास्त त्रास ह्या स्वातंत्र्याशिवाय दिला असता. आणि म्हणून तू आम्हाला इच्छास्वातंत्र्य दिलंस.
देव : शाब्बाश! जर मी तुम्हाला इच्छास्वातंत्र्य दिलं असतं तर ह्याच कारणासाठी!
मानव : म्हणजे तू आपणहून आम्हाला इच्छास्वातंत्र्य दिलंच नाहीस?
देव : तुला इच्छास्वातंत्र्य देण्यात ‘आपणहून’चा तेवढाच भाग होता जेवढा समभुज त्रिकोणाचा समकोन त्रिकोण करण्यात असतो. मुळात समभुज त्रिकोण करायचा की नाही हे ठरल्यावर तो आपोआपच समकोन होणार.
मानव : मला वाटलं की तू वाट्टेल ते करू शकतोस!
देव : जे तर्कशुद्ध असेल तेवढंच.
मानव : मला अजूनही हे कोडं उलगडत नाही. तुझं म्हणणं काय, तू आम्हाला इच्छास्वातंत्र्य दिलं नाहीस?
देव : खूप झालं. अरे तू सारखा नीतीच्याच पातळीवर बोलतोयस. मी तुम्हाला इच्छास्वातंत्र्य द्यावं, न द्यावं, यात मला कसलं स्वातंत्र्य आलंय? तू तत्त्वमीमांसेच्या नजरेनं बघ जरा! सगळाच तर्कदुष्ट कारभार!
मानव : म्हणजे कसं?
देव : आधी तुला इच्छास्वातंत्र्य आहे का, ते ठरव.
मानव : मला वाटतं की आहे.
देव : वाटायचं काय त्यात?
मानव : ए, सांग की आहे का ते.
देव : आहे.
मानव : म्हणजे माझं अंतर्मन सांगत होतं तेच बरोबर! मला कधी कधी वाटायचं की हे नियतिवादी तर शेवटी खरे ठरणार नाहीत.
देव : खरेच आहेत ते.
मानव : एक मिनिट. मला इच्छास्वातंत्र्य आहे की नाही?
देव : आहे, पण म्हणून नियतिवादी खोटे पडत नाहीत.
मानव : माझ्या क्रिया निसर्गनियमांनी ठरतात की नाही?
देव : ‘ठरतात’ म्हणण्यानंच हा सारा घोळ होतो. तुझ्या क्रिया निसर्गनियमांप्रमाणेच घडतात. पण ते नियम काही तुझ्या क्रिया ठरवत नाहीत. तुझी इच्छाशक्ती निसर्गनियमांशी लढते आहे आणि नियम जास्त तगडे असल्यामुळे ते तुझ्या क्रिया ठरवतात, असं नाही.
मानव : समजा मी निसर्गनियम पाळायचे नाहीत असं ठरवलं, तर कोण थांबवू शकणार आहे मला? पुरेशी इच्छाशक्ती वापरली तर तूसुद्धा मला रोखू शकणार नाहीस.
देव : अगदी बरोबर. तुला कोSSणी थांबवू शकणार नाही कारण तू सुरुवातच करू शकणार नाहीस. तुला दिसत नाहीये का? हे सारे नियम म्हणजे तू कसा वागू शकतोस याची फक्त वर्णनंच आहेत! तू कसं वागावं, हे ते सांगताहेत का?
मानव : तुला खरंच असं म्हणायचंय की माझं वागणं निसर्गनियमांविरुद्ध करायचं ठरवू शकत नाही?
देव : ‘नियत’ म्हणजे काय? ठरीव. ठीक आहे? तू पुन्हा पुन्हा वागायचं ठरवण्याविषयी बोलतोयस. तुला म्हणायचंय की ‘मी निवडू शकतो का,’ आणि म्हणतोयस मात्र ‘ठरवू शकतो का’. तुझ्या मनात नियतिवाद आणि इच्छास्वातंत्र्य फारसे दूर दिसत नाहीत.
इच्छास्वातंत्र्याचा सिद्धान्त म्हणतो की ‘तू’ ठरवतोस. नियतिवादी म्हणतात की निसर्ग ठरवतो. तू कुठे संपतोस आणि बाहेरचा निसर्ग कुठे चालू होतो? हा खोटा विभाजनाचा प्रकार सोडून दे. सगळं एक आहे. समज दोन वस्तू एकमेकांना गुरुत्वाकर्षणानं ओढतायत. जर दोन्ही सचेतन असल्या तर काय होईल? प्रत्येकीला वाटेल की दुसरी आपल्याला ओढतेय. खरं तर दोन्हींचा परस्परसंबंधच फक्त महत्त्वाचा.
मानवः बरं. हे समजलं. पण तू मघाशी ‘तर्कदुष्ट कारभार’ म्हणालास, ते कशाबद्दल?
देव : तुला गुरुत्व नसलेली वस्तू कल्पनेत आणता येते का? नाही ना? मग इच्छास्वातंत्र्य नसलेली सचेतन गोष्ट कशी आणता येते? तुला काय वाटलं की मी साध्या सचेतन गोष्टींना रांगेत उभं केलं, आणि मग खिरापत वाटल्यासारखं इच्छास्वातंत्र्य वाटलं? इच्छास्वातंत्र्य नसलेली सचेतन रचना कोणत्या तत्त्वमीमांसेत बसते?
मानव : मग इतका वेळ नीति-अनीति मध्येच मला का घोळसलंस? आधीच का नाही सांगितलास हा तत्त्वमीमांसेचा रस्ता?
देव : मला तुझ्यातलं सर्व “नैतिक” विष काढून टाकायचं होतं. चुकीच्या नैतिक कल्पनांमुळे तू तत्त्वमीमांसेत चुकत होतास.
बरं तर. आता मला जायला हवं. पण पुन्हा तुला गरज पडेपर्यन्तच. आणि ऐक. झाडांशी बोलत जा. म्हणजे अगदी मोठ्यानं नको बोलू, पण झाडं, दगड, नद्या वगैरेंपासून खूप शिकण्यासारखं आहे. निसर्गाकडे बघ आणि पाप-पुण्य, इच्छास्वातंत्र्य, नैतिक जबाबदारी वगैरे विकृत विचार सोडून दे. पूर्वी राजेरजवाडे असत तेव्हा त्यांना नरकाची भीती दाखवण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. नाहीतर ते सर्रास अनाचारानं वागले असते. पण आता ह्या अघोरी कल्पनांची गरज नाही.
मी एकदा सेंगत्सान ह्या झेन कवीच्या तोडानं काय म्हटलं होतं ते :
“साधं सत्य हवंय, तर चिंता सोड बर्‍यावाईटाची.
लढाई बर्‍यावाईटाची, मनाच्या आजारात असते.”
तू सुखावलेलाही दिसतोयस आणि घाबरलेलाही. कशाला भितोयस? बर्‍यावाईटाच्या लढाईला मानसिक आजार मानले तर तुझ्या हातनं जास्त वाईट घडेल, असं का वाटतंय तुला? नीतिविचार न मानणारे प्रत्यक्षात मात्र नीतीनं वागतात, हे नीतितज्ज्ञांनाही पटतंय. तुला माहीत आहे मी आदमला ज्ञानवृक्षाचं फळ खाऊ नको म्हटलं होतं? त्या फळात नीतितत्त्वविचार होता. आदमच्या वागण्यात नीती आधीही होतीच. ऐकलं नाही बावळ्यानं आणि सारा घोळ करून बसला. त्या फळाचं विष मात्र फार पिढ्या टिकून राहिलंय.
आता खरंच जातो, पण लाओ त्से कॉन्फूशियसला काय म्हणाला होता ऐक –
“चांगुलपणा आणि कर्तव्याच्या ह्या सगळ्या चर्चेनं ऐकणार्‍याला सारखी टोचणी लागते. तो चिडचिडा होतो. खरं तर तू आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र कसे हलतात पाहा. त्यांची चमकदमक पाहा. पशुपक्ष्यांचे थवे पाहा. झाडाझुडपांची राज्यं पाहा. यातूनच तुला निसर्गाची वाट चालायला आतून शक्ती मिळेल. मग चांगुलपणा आणि कर्तव्याच्या जाहिराती करत फिरावं लागणार नाही.
हंसाला पांढरं राहायला रोज आंघोळ करावी लागत नाही.”

नंदा खरे
१९३ शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.