प्रतिक्रिया

‘संदर्भ न पाहता लावलेले अर्थ’ या शीर्षकांतर्गत डॉ. के. रा. जोशी ह्यांची दोन टिपणे आजचा सुधारक (मे, १९९४) च्या अंकात प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील दुसर्या टिपणासंबंधीची माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे.
डॉ. के. रा. जोशी हे माझे शिक्षक. ते गंभीरपणे करीत असलेल्या ज्ञानसाधनेविषयी पूर्ण आदर बाळगून मी मतभेदाचे मुद्दे नमूद करू इच्छिते.
दुसर्या् टिपणाच्या शेवटच्या चार ओळीत सरांनी एका दगडात बुद्धिवादी, पुरोगामी, स्त्रीमुक्तिवादी असे अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतः स्त्रीमुक्तीच्या विचारांना मानणारी व त्यानुसार आचरण करणारी एक व्यक्ती आहे. स्त्रीमुक्ती ह्या शब्दाला दोन अतिशय चुकीचे अर्थ चिकटविले जातात. एक, ही चळवळ पुरुषांच्या विरोधात संघर्ष करायला उभी ठाकली आहे, व दोन, ज्याप्रमाणे काही पुरुष ‘स्वैर’ जीवनजगतात तसे जीवन स्त्रियांनाही जगायचे आहे.
स्त्रीमुक्तीचा मला अभिप्रेत असलेला अर्थ असा की स्त्री हीदेखील मानव आहे. मानव या पातळीवर स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत. कोणी कोणापेक्षा श्रेष्ठ नाही की कोणी कोणापेक्षा कनिष्ठ नाही. स्त्रीमुक्तीची चळवळ ही स्त्रियांना मानव म्हणून प्रतिष्ठा मिळविण्यासाठी चालवलेली चळवळ आहे असे मी मानते.
सरांनी त्यांच्या टिपणात मनूने सांगितलेला राजधर्म (राजाची कर्तव्ये) सांगितला आहे. त्यांना तो आदर्श वाटतो हे त्यांच्या लिखाणावरून वाटते. त्यातील महत्त्वाचा मुद्दा, विचार असा की स्त्रियांचे घरी तर सोडाच, पण त्या बाहेर नाटक, सिनेमा, सर्कस, संगीत, नृत्य ह्यामध्ये जरी रममाण झालेल्या असतील, तरी त्यांना संबंधितांनी संरक्षणाचे भक्कम कवच अर्पण करावे. स्वतःच्या संरक्षणासाठी स्त्रियांना स्वतःवरच निर्भर ठेवू नये. ही जबाबदारी पिता, पती, पुत्र ह्यांनी किंवा हे जर नसतील तर इतर कुटुंबीयांनी पार पाडावी.
प्रश्न असा की बदललेल्या काळाच्या संदर्भात हे विवेचन कितपत प्रस्तुत आहे?मनुस्मृतीचा कालखंड इ.पू. दुसरे शतक! तर आम्ही एकविसाव्या शतकाकडे जात आहोत. आज किमान काही स्त्रियांना स्वत्वाची ओळख पटलेली आहे. स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत निर्भयपणे वावरताहेत. मनूने सांगितलेले चित्र जर स्वीकारले तर पिता, पती, पुत्र ह्यांची, ही आजची स्त्री ज्या ज्या ठिकाणी वावरते त्या त्या ठिकाणी जाऊन तिला संरक्षणाचे भक्कम कवच बहाल करताना फारच तारांबळ उडेल. बरे, ह्या पुरुषांना तेवढेच काम असेल का?
स्त्रियांना संरक्षण कोणापासून हवे? पुरुषांपासून?पुरुषांपासून संरक्षण हवे असताना पुरुषांकडूनच संरक्षणाच्या कवचाची अपेक्षा करण्याच्याकल्पनेत सरांना व्याघात आढळला नाही का?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ‘पति-पत्नीच्या हातून एकमेकांच्या बाबतीतील कर्तव्यपालनात चूक झाली तर त्याविषयी पति-पत्नींपैकी एखाद्याची तक्रार आल्यास राजाने राजदंडाद्वारे ती व्यवस्था पुन्हा निर्माण करणे आवश्यक कर्तव्य होय ….’ (पृ. ६१)
माझा प्रश्न असा की आज अशी तक्रार कोणाकडे करायची?
आजही स्त्रीसंरक्षणासाठीचा जो आक्रोश ऐकू येतो तो मनुने सांगितलेला राजधर्म आम्ही पाळत नाही म्हणून नव्हे, तर पुरुषांचा स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोण बदललेला नाही, तसेच स्त्रीचाही स्वतःकडे बघण्याचा देहनिष्ठ दृष्टिकोन बदललेला नाही. हे दृष्टिकोन जेव्हा बदलतील तेव्हा काही प्रमाणात परिवर्तन होईल ही अपेक्षा बाळगता येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *