पत्रव्यवहार

स.न.वि. वि.
‘आजचा सुधारक’ च्या जून ९४ च्या अंकात प्रा. श्री. गो. काशीकर यांचे सातारच्या विचारवेध संमेलनाविषयी एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यातील सर्व मुद्द्यांचा परामर्श येथे घेत नाही. त्यांच्या शेवटच्या वाक्याविषयी थोडेसे लिहितो. ते वाक्य असे, “एकंदरीत हे विचारवेध संमेलन विचारवेधाऐवजी विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले संमेलन झाले, असे खेदाने म्हणावे लागेल.”
प्रा. काशीकरांच्या या विधानाची वस्तुनिष्ठता तपासून घेण्यासाठी वाचकांना मदत होऊ शकेल, अशा फक्त एका घटनेचा तपशील येथे देतो. या संमेलनात २० फेब्रुवारी रोजी एका परिसंवादात मी आणि श्री. रमेश पतंगे यांच्यात विचारांची काही देवाणघेवाण झाली. महाराष्ट्रातील दूरदूरच्या ठिकाणांवरून आलेल्या सुमारे एक हजार श्रोत्यांच्या समोर हा परिसंवाद झाला. या श्रोत्यांत अनेक पत्रकारही होते. २१ फेब्रुवारीच्या अनेक वृत्तपत्रांनी स्वतंत्र चौकटीमध्ये या चर्चेचा वृत्तांत दिला आहे. प्रा. काशीकरांनीही सातार्यारहून नागपूरला परतल्यानंतर १७ मार्च ९४ च्या नागपूर ‘तरुण भारत मध्ये संमेलनाचा आढावा घेणारा लेख प्रकाशित केला आहे. श्री. पतंगे यांच्याबरोबर झालेल्या माझ्या चर्चेचा वृत्तांत देताना या लेखात प्रा. काशीकर लिहितात, “श्री. पतंगे यांनी आपल्या भाषणात असा विचार मांडला की, ‘मनुस्मृती आता कालबाह्य झाली आहे, ती आज अंमलात नाही व पुढेही येणे शक्य नाही. तेव्हा मनुस्मृतीच्या आधारे संघर्ष निर्माण करणे योग्य नाही. परंतु यातील विधायकता लक्षात न घेता ‘मनुस्मृती’ शब्दाचा उल्लेख ऐकूनच डॉ. साळुखे भडकले व त्यांनी मनुस्मृतीवर तोंडसुख घेतले.”
याच घटनेचा वृत्तांत दैनिक सकाळने ‘कैवारी की मारेकरी?’ अशी चौकट टाकून दिला होता. तो वृत्तांत असा, “ साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांनी या परिसंवादात बोलताना ‘मनुस्मृतीला ऊठसूठ झोडले जाते. त्यामुळे मनुस्मृतीवर आघातकेल्यास प्रत्याघात होणार’, असे स्पष्ट केले. या विधानाचा परामर्श घेताना परिसंवादाची मांडणी करणारे डॉ. आ. ह. साळुखे म्हणाले, की मनुस्मृतीवर आघात केल्यास प्रत्याघात सहन करावा लागेल, असे म्हणणारा हिंदूधर्माचा कैवारी नसून मारेकरी आहे. या संदर्भात कोणत्याही तज्ज्ञांशी कोणत्याही व्यासपीठावर मनुस्मृती घेऊन संवाद करण्याची आपली तयारी असून ते विधान खोटे ठरल्यास माझी सर्व पुस्तके जाळून मी मनुस्मृतीचे पूजन करीन, असे डॉ. साळुखे यांनी सांगितले. यावर मनुस्मृती ही कालबाह्य झाली आहे, असे आम्हीही मानतो. पण त्यावरच आघात करून काही साध्य होत नाही, असे मला म्हणायचे होते, असा खुलासा पतंगे यांनी केल्यावर परिसंवादातील वातावरण निवळले.
इतर अनेक नियतकालिकांनी सकाळसारखाच वृत्तान्त दिला आहे. शिवाय या संपूर्ण चर्चेचे ध्वनिमुद्रणही करण्यात आले आहे. जिज्ञासू वाचक या साहित्याचा उपयोग करून आपले निष्कर्ष काढू शकतात.
माझ्या दृष्टीने प्रा. काशीकरांचा वृत्तान्त इतर वृत्तान्तांच्या शेजारी ठेवणे पुरेसे आहे. अधिक भाष्याची खरे तर गरज नाही. त्यांनी ज्या असभ्य भाषेत आपला एकूण लेख आणि आपले पत्र यांचे लेखन केले आहे, त्या भाषेचा आश्रय करण्याचीही गरज नाही. तरीही प्रा. काशीकरांनी केलेल्या चलाखीकडे थोडेसे लक्ष वेधतो. मूळ चर्चेत श्री.पतंगे यांनी मनुस्मृतीवर आघात केल्यास प्रत्याघात करू असे म्हटल्यानंतर मी त्यांच्या मतावर टीका केली आणि त्यानंतर अखेरीस त्यांनी मनुस्मृती कालबाह्य झाल्याचे कबूल केले. प्रा. काशीकर यांनी मात्र अत्यंत जाणीवपूर्वक व तितक्याच धूर्तपणाने क्रमविपर्यास केला आहे. श्री. पतंगे यांनी अगोदरच मनुस्मृती कालबाह्य झाल्याचे म्हटले आणि तरी देखील मी अविवेकाने मनुस्मृतीवर टीका केली, असे ते सुचवीत आहेत. येथे श्री. पतंगे यांचे मत योग्य की माझे मत योग्य, हा मुद्दा अगदी वेगळा आहे. श्री. काशीकर घडलेल्या घटनेचा वृत्तान्त वस्तुनिष्ठ स्वरूपात देत आहेत काय, एवढाच मुद्दा येथे प्रस्तुत आहे.
स्वतः असा विकृत वृत्तान्त देणारे प्रा. काशीकर सातार्याुच्या विचारवेध संमेलनाला विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले ही विशेषणे लावत आहेत. सभ्यता सोडून ही विशेषणे लावायचीच असा कुणी आग्रह धरला, तर ती कुणाला लागू पडतात, याचा तर्क वाचकांना सहजपणे करता येईल. मी स्वतः तो शब्दबद्ध करणार नाही. प्रा. काशीकरांच्या इतर मतांविषयी अजून खूप,लिहिण्यासारखे आहे पण ते सर्व पुन्हा केव्हा तरी, पुन्हा कोठेतरी.
प्रा. काशीकरांनी ‘प्रा. कुळकर्णी यांच्या विश्लेषणाशी मी जवळजवळ १०० टक्के सहमत आहे असे म्हटले आहे. याचा अर्थ ‘प्रा. कुळकर्णी हे प्रा. काशीकर यांच्या विश्लेषणाशी जवळजवळ १०० टक्के सहमत आहेत’, असा होतो. प्रा. कुळकर्णी यांना हा निष्कर्ष मान्य नसावा, असा विश्वास वाटतो.
आ. ह. साळुखे
“लोकायत”
१३ यशवंतनगर, गेंडा माळ, सातारा- ४१५ ००२

तत्त्वज्ञानप्रेमी महाराष्ट्रीयांस विज्ञापना
महाराष्ट्रातील विद्यापीठीय अभ्यासात मराठी माध्यम प्रविष्ट झाल्याला आता चाळीसाहून अधिक वर्षे लोटली आहेत. या काळात शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा उपयोग आज थेट एम्. ए. आणि पीएच्. डी. या परीक्षांपर्यंत जवळजवळ शंभर टक्क्यांनी होत आहे. परंतु पाठ्यपुस्तकांची निर्मिती मात्र या चाळीस वर्षांत दहा-पाच पुस्तकांपलीकडे झालेली नाही. तत्त्वज्ञानाचे साहित्य एक तर इंग्लिशमध्ये किंवा संस्कृतमध्ये आहे, परंतु या दोन्ही भाषा अलीकडे कोणासही येईनाशा झाल्या आहेत, आणि त्यामुळे एम्. ए. च्या वर्गातही विद्यार्थी प्राध्यापकांनी दिलेल्या टिपणांवर विसंबून असतात. केवळ तुटपुंज्या टिपणांच्या अभ्यासाने एम्.ए. झालेली मंडळी प्राध्यापक होतात आणि त्याच टिपणांच्या साह्याने शिकवतातही. त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन यांचा दर्जा दरवर्षी अधिकाधिक खालावत आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ ह्या सरकारी संस्थांनी या कामी बरीच धडपड केली आहे. पण तो प्रयत्न अतिशय अपुरा आहे. त्यातही तत्त्वज्ञानविषयाची स्थिती आणखीच शोचनीय आहे. विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाकडे आता तत्त्वज्ञान विषयाला द्यायला पैसा नाही असे ऐकतो.
ही कोंडी फोडण्याचा एक प्रयत्न आम्ही करण्याचे योजिले आहे. हा प्रयत्न म्हणजे तत्वज्ञान विषयाला वाहिलेले एक षण्मासिक सुरू करावयाचे आणि त्यातून महत्त्वाच्या इंग्रजी व संस्कृत पुस्तकांचे अनुवाद, संक्षेप इत्यादि तसेच प्रत्येकी सुमारे शंभर पानांची तत्त्वज्ञानातील शाखोपशाखांची माहिती देणारी छोटेखानी पुस्तके प्रसिद्ध करावयाची.
या कामी मुख्य अडचण आहे पैशाची, आणि त्याहीपेक्षा ग्राहकांची. पुस्तकांचा उठाव जर झाला नाही तर नवीन पुस्तकांकरिता पैसा उपलब्ध होणार नाही. सुमारे तीनशे कायम ग्राहक जर मिळाले तर ते काम चालू शकेल.
महाराष्ट्रात महाविद्यालयांची संख्या मोठी आहे, आणि तसेच तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांची संख्याही तीन-चारशेच्या घरात जाते. या दोन्ही मिळून तीनशे कायम वर्गणीदार मिळणे कठीण नाही अशी आमची समजूत आहे.
प्रस्तुत षाण्मासिकाची वर्गणी अत्यल्प, म्हणजे व्यक्तींकरिता रु. ८०/- आणि संस्थांकरिता रु. १००/- इतकी ठेवण्याचा विचार आहे. त्यात सुमारे दोनशे पृष्ठांचा मजकूर मिळेल. पुस्तकांच्या किंमतीचे सध्याचे मान पाहिल्यास ८० रुपयांत दोनशे पाने म्हणजेअतिशय स्वस्त किंमत झाली हे मान्य करावे लागेल.
या ग्रंथमालेत येणार असलेली काही पुस्तके :
१. ग्रीक तत्त्वज्ञानाचा संक्षिप्त इतिहास
२. प्लेटोच्या काही संवादांचे अनुवाद
३. अनुभववादी तत्त्वज्ञ – लॉक, बाक्र्ली, ह्यूम, मिल
४. प्रज्ञावादी तत्त्वज्ञ – देकार्त, स्पिनोझा, लाइब्नित्स
५. कांट
६. विसाव्या शतकातील पाश्चात्त्य तत्त्वज्ञान
७. विसाव्या शतकातील नीतिशास्त्र
८. तर्कशास्त्राचे तत्त्वज्ञान
९. अर्थमीमांसा – फ्रेगे, रसेल, स्टेसन यांचे निबंध
१०. मिल् – उपयोगितावाद
११. तर्कसंग्रह
१२. आभिरौचिकी (सौंदर्यमीमांसा)
१३. राज्यशास्त्राचे तत्वज्ञान
१४. तात्त्वज्ञानिक मानसशास्त्र.
महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानप्रेमी लोकांनी या प्रयत्नात सामील व्हावे अशी आमची त्यांना विनंती आहे. जर त्यांनी आपण वर्गणीदार होण्यास तयार आहोत असे आम्हाला कळविले तर आम्ही त्यांचे आभारी होऊ.

  • दि. य. देशपांडे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.