पत्रव्यवहार

श्री. सम्पादक आजचा सुधारक यास
स.न.वि.वि.
ऑगस्ट ९४ च्या आजच्या सुधारकमध्ये श्री. पळशीकर ह्यांचे ‘निसर्गाकडे परत चला ह्या मथळ्याखाली आजचा सुधारकमध्ये दिलेल्या अवतरणाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त – करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी रसेल यांचे “अडाणीपण” वऔद्धत्य” वरील अवतरणात व्यक्त झाले आहे असा आरोप केला आहे. वस्तुतः पळशीकरांच्या प्रतिक्रियेवरून त्यांचा रसेलच्या विचारांशी फारसा परिचय नाही व त्या विचारापुरते तरी त्यांचे मतप्रदर्शन हे “अडाणीपणाचे” व “औद्धत्याचे आहे असे म्हटल्यास अन्यायाचे होणार नाही. लाओत्से, रूसो, रस्किन व म. गांधी यांची “निसर्गाकडे चला” ही पुकार तत्कालीन परिस्थितीला उचित होती असे पळशीकरांचे म्हणणे. ते कसे हे त्यांनी दाखवून दिलेले नाही. निसर्ग म्हणजे काय याबद्दल वरील लेखकांच्या मनात बराच गोंधळ होता, हे स्पष्ट आहे. ला ओत्सेला रस्ते, पूल व बोटी या निसर्गाविरुद्ध वाटत होत्या. रूसोला रस्ते, पूल वगैरे वस्तु निसर्गाविरुद्ध वाटत नव्हत्या. तो दरबार व नाचगाणी यांना निसर्गविरुद्ध मानी. आमचे वडील विजेच्या दिव्यांच्या विरुद्ध तक्रार करीत. त्यांना मातीच्या तेलाचे कन्दील पसन्त होते. याचे कारण विजेचे दिवे परावलम्बी असतात, शक्तिकेन्द्र बिघडले की सारे शहरच अन्धारात पडते, कंदील वापरण्यात असे परावलम्बन नाही असे ते याचे कारण देत. यान्त्रिक सुधारणांना विरोध करण्यात प्रत्येकाची कारणे सारखीच नसतात. पण तीच कारणे आपण जे पसन्त करतो त्यांच्या विरुद्धही लागू होतात हा विचार केला जात नाही. मातीच्या तेलाच्या कंदिलाने देखील माणूस परावलम्बी होतो, कारण शेकडो मैल दूर असलेल्या खाणीतून ते काढावे लागते. या खाणीच्या कामगारात संप झाला वा दळणवळणाच्या साधनात खण्ड पडला की मातीचे तेल न मिळून अन्धारात राहायचा प्रसंग येतो. तेव्हा कंदिलापेक्षा समया बर्याू, कारण त्यांत वापरले जाणारे तेल आपल्याला आपल्याच शहरात तेल्याकडून मिळू शकते. नवीन तान्त्रिकीला विरोध करणारे आणखी एक कारण ती महाग आहे ही समजूत. बसपेक्षा बैलगाडी करण्यास कमी पैसे लागतात, यावरून बसचा प्रवास बैलगाडीच्या प्रवासापेक्षा महाग असेल अशी समजूत होते. पण वस्तुस्थिति याच्या उलट आहे हे आज पटवून देण्याची जरूर नाही.
यान्त्रिक सुधारणेला विरोध करण्याची म. गांधी यांची कारणे वेगळी होती. आपल्याजवळ भांडवल नाही म्हणून आपले अर्थकारण श्रमप्रधान असावे, भांडवलप्रधान असू नये” या शब्दात म. गांधीचे मत अर्थशास्त्रज्ञ मांडतो. पण म. गांधींना अत्यंत व्यवहारी गोष्टी आध्यात्मिक परिभाषेत मांडण्याची सवय होती त्यामुळे आपल्या मनुष्यबळाचा शक्य तेवढा उपयोग करा, परदेशातून यंत्रे आयात करण्यावर विसंबून राहू नका’ वगैरे शंभर टक्के वैज्ञानिक भाषा बोलण्याऐवजी “श्रम ही पूजा आहे” वगैरे भाषा ते बोलत.
“निसर्गाकडे चला” असे म्हणताना आपण ज्याचे समर्थन करीत आहोत त्या गोष्टीही अनैसर्गिकच आहेत इकडे निसर्गवादी लक्ष देत नाहीत हे रसेलचे म्हणणे खरेच आहे. व्यायामाने रोग बरे करण्याच्या पद्धतीला प्राकृतिक चिकित्सा असे म्हणतात. म्हणजे व्यायाम नैसर्गिक आहे व डॉक्टरने दिलेले औषध अनैसर्गिक आहे अशी याच्या मुळाशी कल्पना आहे. वस्तुतः विज्ञान निसर्गाच्या नियमावरच आधारलेले असते.
पर्यावरणाच्या समस्येला उत्तर म्हणून “निसर्गाकडे चला” हा नारा बरोबर नाही. पर्यावरणाची समस्या विज्ञानाने निर्माण केली तसेच ती समस्या आहे व तीवर उपाय काय हेही विज्ञानच सांगते. विज्ञानामुळे जे नुकसान होते त्यावर उपाय अधिक विज्ञान हेचआहे.
विज्ञानाची कास सोडून “निसर्गाकडे जायचे ठरविले तर “सिव्हिलाइज्ड जगातील ९० टक्के लोकांना जगता येणार नाही असे रसेल म्हणतो, त्याचा विपर्यास करून रसेलला “सिव्हिलाइज्ड” म्हणजे गोरी राष्ट्रे अभिप्रेत आहेत, फार तर तो जपानी लोकांना “सिव्हिलाइज्ड” समजेल, भारतीय मेले तर त्याचे त्याला दुःख नाही असा श्री. पळशीकरांचा आक्षेप आहे. या आरोपात रसेलच्या विचाराबद्दलचे अज्ञान स्पष्ट दिसून येते. सिव्हिलाइज्ड” या शब्दाने रसेलला वैज्ञानिक उपकरणांच्या आधारावर जगणारा समाज अभिप्रेत आहे. काही वन्य जमाती सोडल्या तर आजचे सगळेच मोठे समाज वैज्ञानिक उपकरणांच्या आधारेच जगत आहेत. भारत याला अपवाद नाही. भारताला स्वतःला लागणारी बहुतेक महत्त्वाची वैज्ञानिक उपकरणे तयार करता येत नाहीत, म्हणून ती उसनी आणावी लागतात. पण म्हणून भारत हा वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे जगणारा देश नाही असे सिद्ध होणार नाही.
पर्यावरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी “निसर्गाकडे चला” ही हाक निरुपयोगी असून पर्यावरणरक्षक विज्ञान शोधून काढा” हीच खरी हाक असायला पाहिजे.
आपला
नी. र. वर्हााडपाण्डे
३८ हिन्दुस्तान कॉलनी अमरावती रोड, नागपूर ४४० ०१०


अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या संपादकीयाच्या संदर्भात :- (अंक ४ जुलै ९४)
डॉ. दाभोलकरांची शंका आणि संपादकीयामध्ये दिलेले उत्तर यामधून एक शृंगापत्ति निर्माण होते ती अशीः- जर धर्मावर विवेकाचे शस्त्र चालविले तर ज्या लोकांचे प्रबोधन करायचे ते विवेकनिष्ठांकडे पाठ फिरवितात ( म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य तडीस जाणे अशक्यप्राय) आणि जर धर्माचा आश्रय घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले तर धर्मच अंधश्रद्धेचे उगमस्थान किंवा उलटरीतीने (म्हणून अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य तडीस जाणे अशक्यप्राय)
निष्कर्ष : अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य कालबद्ध कार्यक्रमाने होणे नाही.
सुधारकाग्रणी आगरकरादि प्रबोधनकार आणि गाडगे महाराजादि प्रबोधनकार या दोन परस्परांविरोधी मार्गाचा अवलंब करतात. आगरकरांनी संपादकीयांमध्ये स्वीकृत केलेल्या मार्गाचे प्रवर्तन केले तर गाडगे महाराजादि प्रबोधनकारांनी धर्माचा आश्रय घेऊन कीर्तनाद्वारा अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य केले.
या दोन मार्गांनी गेलेल्या प्रबोधनकारांनी कितपत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले, याचा तौलनिक अभ्यास केला पाहिजे (असा अभ्यास शक्य आहे की नाही कोणास ठाउक) मगच विशिष्ट मार्गाची परिणामकारकता ठरविता येईल.
अन्यथा एकतर स्वमार्गावर श्रद्धा ठेविली पाहिजे किंवा शृंगापत्ति स्वीकारली पाहिजे असे वाटते.
र. ग. दांडेकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.