गांधींचे सत्य – डॉ. उषा गडकरींना उत्तर

‘गांधींचे सत्य- एक प्रतिक्रिया’ या लेखात डॉ. उषा गडकरी यांनी माझ्या ‘गांधींचे सत्य’ या लेखातील माझ्या प्रतिपादनावर अनेक आक्षेप घेतले आहेत. हे सर्व आक्षेप एकतर चुकीच्या माहितीवर आधारलेले आहेत, किंवा गांधीजींच्या वचनापेक्षाही अधिक दुर्बोध अशा भाषेत लिहिले आहेत. केवळ तीन पानांत त्यांनी इतके मुद्दे उपस्थित केले आहेत की त्या सर्वांना उत्तरे देण्याकरिता त्याच्या अनेकपट पाने खर्ची घालावी लागतील. म्हणून त्यातील प्रमुख मुद्द्यांना संक्षेपाने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
(१) प्रथम existence आणि subsistence या दोन प्रकारची अस्तित्वे मानणाच्या लोकांच्या मताविषयी. काही तत्त्वज्ञ स्थलकालात असलेल्या वस्तूंनाच अस्तित्व आहे असे मानतात; परंतु अन्य काही तत्त्वज्ञ (उदा. प्लेटो, फ्रेगे, इ.) स्थलकालातीत अस्तित्वही मान्य करतात. उदा. ज्यांना सामान्ये (universal) म्हणतात त्या अवकृष्ट (abstract) गुणांनाही अस्तित्व असते, म्हणजे गुणी पदार्थात नव्हे, तर केवळ गुणांना स्वतंत्र अस्तित्व असते, असे ते मानतात. उदा. स्थलकालात विस्तारलेल्या जगात सुंदर वस्तू आहेत, पण त्यात केवळ सौंदर्य, म्हणजे सुंदर वस्तूवाचून असणारे सौंदर्य, असत नाही. परंतु प्लेटोच्या मते केवळ सौंदर्यालाही स्थलकालातीत असे अस्तित्व आहे. भाववाचक नामांनी निर्दिष्ट होणारे पदार्थ (उदा. मनुष्यत्व, गोत्व, इ.) आहेत आणि त्यांना वर सांगितलेल्या प्रकारचे अस्तित्व आहे. या प्लेटोच्या मताचा उल्लेख मी अशाकरिता केला की गांधीजींनी ‘God is Truth’ आणि ‘Truth is God’ या वाक्यात ‘Truth’ हे भाववाचक नाम वापरले होते, आणि त्यांना त्या शब्दाने काय अभप्रेत असावे याचा शोध मी घेत होतो. (स्थलकालात असणार्याच अस्तित्वाला ‘सत्ता’ (cxistence) आणि कालातीत अस्तित्वाला भाव (subsistence) अशी नावे सामान्यपणे वापरली जातात.
आता डॉ. गडकरी म्हणतात की ‘ब्रह्म सत् आहे हे साधु वाक्य आहे असे एक वेळमानता आले असते; पण जर ब्रह्म भाववान पदार्थ असेल तर त्याला स्थलकालात अस्तित्व नसल्यामुळे ‘ब्रह्म सत् आहे हे विधान असाधु होईल. परंतु ते विधान केवळ असत्य होईल, असाधु आणि निरर्थक होणार नाही. शिवाय ब्रह्माला जरी स्थलकालात अस्तित्व (म्हणजे सत्ता) नसली तरी ते भाववान असू शकेल, आणि त्याला भाववान पदार्थाचे अस्तित्व (म्हणजे) भाव असू शकेल, आणि म्हणून ते असाधु होणार नाही.
(२) डॉ. गडकरी म्हणतात की, भावपदार्थांना आत्मसात् करणारे जे मन आहे त्यावर भावपदार्थाच्या विविध अर्थच्छटांचा इतका विलक्षण परिणाम होतो की त्यामुळे त्याची जीवनदृष्टीच बदलून जाते. त्याच्या जाणिवेचा स्तर बदलतो आणि या नव्या पातळीवर भाषाविन्यासशास्त्रीय भेद वितळून जातात. सत्ताशास्त्रीय, ज्ञानशास्त्रीय, नीतिशास्त्रीय या विचाराच्या चौकटी गळून पडतात. मग जे सत् आहे तेच सत्य, तेच चित् आणि आनंद, व तेच प्रेम होऊन जाते. हे असे घडते हे मी नाकारीत नाही (म्हणजे मी ते स्वीकारतो असे नव्हे). पण ते अनाकलनीय आहे एवढीच माझी तक्रार आहे, आणि ते कोणीतरी समजावून सांगावे अशी माझी मागणी आहे. ज्या पातळीवर सत्, सत्य, साधु, प्रेम इत्यादि गोष्टी एकचआहेत असा साक्षात्कार होतो ती पातळी दुर्दैवाने मला अप्राप्य आहे. परंतु डॉ. गडकरी ज्याअर्थी तिचे समर्थन करीत आहेत त्याअर्थी त्यांनी ती पातळी गाठली असावी असे मी गृहीत धरतो,आणि आता हे कसे शक्य होते ते त्यांनी प्राकृत भाषेत समजावून सांगावे अशी माझी विनंती आहे. भाषाविन्यासशास्त्रानुसार असाधु असणार्यात अशा अनेक वाक्यांचे असे प्राकृत स्पष्टीकरण देता येते. उदा. परमेश्वर म्हणजे प्रेम या असाधु वाक्याचा अर्थ परमेश्वर अतिशय प्रेममय आहे या साधु वाक्यात सांगता येतो. तसा कोणीतरी गांधीजींच्या वचनांचा अर्थ साधु वाक्यात व्यक्त करून दाखवावा अशी माझी मागणी आहे. नुसते त्यात फार मोठा आशय भरलेला आहे असे म्हणून चालणार नाही. हा अर्थ गांधीजी सामान्य लोकांपर्यंत ‘संप्रेषित करू शकले असे जे डॉ. गडकरी म्हणतात त्याला प्रमाण काय? ते त्यांच्या चळवळीत सहभागी झाले हे त्याचे प्रमाण म्हणता येणार नाही.
(३) डॉ. गडकरींनी अनेक थोर तत्त्वज्ञांच्या मतांचे दाखले दिले आहेत, पण ते बहुतेक सर्व चुकीचे आहेत. उदा. त्या म्हणतात की विधानांचे analytic व synthetic हे विभाजन लाइब्नित्सने केले. पण हे विधान प्रथम कांटने केले, आणि कांट लाइब्नित्सच्या मृत्यूनंतर (१७१६) आठ वर्षानंतर (१७२४) जन्मला. Analytic व Synthetic हा भेद लाइब्नित्सला अभिप्रेत नव्हता, उलट सर्वच सत्य विधाने ज्यांना कांटनंतर analytic’ म्हणू लागले तशी असतात असे त्याचे मत होते. तसेच व्हिगेन्स्टाइनविषयी त्या लिहितात की त्याने Tractatusया आपल्या ग्रंथात कृत्रिम भाषा निर्माण केल्याशिवाय अचूक कथन होणार नाही असा पवित्रा घेतला होता. दुर्दैवाने मला अशा प्रकारचे विधान Tructatusमध्ये सापडले नाही. उलट याच ग्रंथात तो ५.५६०३ या परिच्छेदात ते म्हणतो, ‘All propositions of everyday language are actually, just as they are, logically completely in order’.
(४) डॉ. गडकरी म्हणतात : ‘ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व, संकल्पस्वातंत्र्य यांची सिद्धता देणे आपल्या बौद्धिक कुवतीच्या बाहेरचे असले, तरी आपल्या व्यावहारिक जीवनाचे मूलाधार म्हणून त्यांना स्वीकृती द्यावीच लागते. परंतु वर उल्लेखलेल्या तीन गोष्टींपैकी पहिल्या दोन आपल्या व्यावहारिक जीवनाचे मूलाधार आहेत हे खरे नाही. ईश्वर न मानता आणि आत्मा अमर आहे ही गोष्ट न स्वीकारता जगणे शक्य आहे, एवढेच नव्हे तर उत्तम प्रकारे जगणे शक्य आहे हे अनेक नास्तिकांनी दाखविले आहे. आणि संकल्पस्वातंत्र्याविषयी म्हणाल तर आपल्याला संकल्पस्वातंत्र्य आहे असे आपण सर्व नैसर्गिकपणेच मानतो, आणि त्यावाचून आपल्याला कर्म करणेच अशक्य होईल. म्हणून ते आहे असे मानणे अवश्यच आहे. पण त्याचे आणखी कोणते अतिभौतिकीय स्पष्टीकरण देता येते असे नाही.
(५) वैज्ञानिकांनाही भाषेची चौकट अपुरी वाटते असे त्या म्हणतात, आणि त्याचे उदाहरण म्हणून wave or particle चे देतात. पण येथे अडचण भाषेची नाही, वर्त्य विषयाची आहे. तसेच त्या म्हणतात की ज्ञानाची दालने जसजशी विस्तृत होत जातात तसतसे प्रचलित भाषेचे वळण अपुरे वाटू लागते, आणि याचे उदाहरण म्हणून ‘क्वार्कचे देतात. पण याने काय सिद्ध झाले? एक नवीन पदार्थ सापडला आणि त्याला पूर्वी कोणी दिलेले नाव नसल्यामुळे त्याला नवीन नाव दिले. ही प्रक्रिया तर भाषा निर्माण झाल्यापासून अव्याहत चालू आहे. त्याकरिता ‘क्वॉर्कची साक्ष काढण्याचे कारण नव्हते. ‘टेबल’, ‘खुर्ची, हे शब्दही एका काळी नवे होते. पण नवीन शब्द बनविण्याकरिता किंवा जुन्या शब्दाला नवीन अर्थ देण्याकरिता नवीन अर्थ असावा लागतो. माझ्या मनातील ‘काहीतरी, काय ते माहीत नाही’ (something I know not what) याचा वाचक शब्द कोणी बनविला आणि वापरला तर ते व्यर्थच होईल.
(६) डॉ. गडकरी लेखाच्या शेवटी म्हणतात की ‘God is Truth’ आणि ‘Truth is God’ ही वाक्ये असाधु नसून उलट ती सर्वांत साधु विधाने आहेत असे म्हणावे लागेल. हे त्या कशावरून म्हणतात ते त्यांनी स्पष्ट केलेले नाही. उघड उघड असाधु असलेल्या वचनांना त्या नुसतेच साधु म्हणत नाहीत, तर सर्वात साधु म्हणतात. असे करणे म्हणजे साधु या शब्दाचा अर्थ बदलणे होय. आणि माझ्या मते हे तात्त्विक चर्चेत बसत नाही.

ऋणनिर्देश
मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक श्री. जयवंत दळवी यांचे दि. १६ सप्टेंबर रोजी निधन ले झाले. ते आजचा सुधारक परिवाराचे पहिल्यापासूनच सदस्य होते. त्यांचे पहिले पत्र सोबत देत आहोत.

आणखी असाच एक ऋणनिर्देश करावयाचा राहिला आहे. गेल्यावर्षी अमरावतीचे माजी खासदार सुदामकाका देशमुख यांचे निधन झाले. मृत्यू डोळ्यांपुढे दिसत असणार्याअ शेवटच्या आजारात आजचा सुधारक मधील आमचे आवाहन वाचून ते आजीव वर्गणीदार झाले होते.
अशा सहृदय वाचकांच्या भरवशावरच आजचा सुधारक जिवंत आहे.
श्री जयवंत दळवी काय किंवा श्री सुदाम देशमुख काय, त्यांचा आमचा पूर्वपरिचय नव्हता आणि नंतरही कधी भेट झाली नव्हती.
श्री. दळवी व देशमुख यांच्या स्मृतीला आमची कृतज्ञतापूर्वक आदरांजली.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.