पुस्तक परीक्षण- “हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद”

डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे पुस्तक इतिहासातून आजच्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. आज झालेले धर्मशक्तींचे ध्रुवीकरण व त्यातही नवहिंदुत्ववाद्यांची वाढती आक्रमकता लेखकास पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करते. अध्यात्माचे राजकारण’ वा राजकीय कारणांसाठी धर्माचा वापर करण्याची वृत्ती, याने लेखक अस्वस्थ झाला आहे. राजकीय हेतूसाठी अशा शक्तींनी केलेल्या बुद्धिभेदाला बळी पडलेल्या पुरोगामी वआंबेडकरवादी लोकांना जागे करणे हाही या ग्रंथाचा उद्देश दिसतो.
सहाशेहून अधिक पानांचा हा ग्रंथ बहुतांशी मूळ साधनांवर आधारित आहे. शिवाय विषयसूची व संदर्भसूची दिल्याने त्यास स्वतःचे वजन प्राप्त झाले आहे. ग्रंथाचा उद्देश सद्यःपरिस्थितीशी संबंधित असला, तरी ग्रंथाचा मुख्य विषय इतिहास व त्याचे विश्लेषण हा आहे. श्री. स. ह. देशपांडेलिखित ‘सावरकर ते भाजप’ हा ग्रंथ व श्री. शेषराव मोरे लिखित ‘सावरकरांचा बुद्धिवाद’ व ‘सावरकरांचे समाजकारण हे दोन ग्रंथ, प्रस्तुत पुस्तकाची प्रमुख पाश्र्वभूमी ठरले आहेत. या दोन लेखकांनी केलेला बुद्धिभेद किंवाविपर्यास किंवा त्यांचा उडालेला गोंधळ, यांना उघडे पाडणे हा डॉ. कसबे यांच्या पुस्तकाचा उद्देश आहे.
तसे पाहता, देशपांडे-मोरे हे लेखकद्वय नवहिंदुत्ववादी पठडीतले नाही किंवा त्यांच्या मान्यतेलाही पोचलेले नाही. मात्र त्यांची विषयमांडणी हिंदुत्ववाद्यांच्या सोयीची आहे. कदाचित अशा काठावरच्या विचारवंतांच्या विचारधारेचे भविष्यात होऊ शकणारे ‘हिंदुत्वीकरण’ मोडून काढणे हे लेखक फार महत्त्वाचे समजतो. नवहिंदुत्ववाद्यांच्या अशाच प्रयत्नांकडे मात्र लेखकाने दुर्लक्ष केलेले दिसते.
श्री. देशपांडे यांच्या पुस्तकावर डॉ. कसब्यांचा मुख्य आरोप म्हणजे, आंबेडकरांचे संदर्भविरहित दाखले देणे हा आहे. आंबेडकरांनी मुस्लिम धर्मावर व त्यापासून असलेल्या धोक्यांवर जे लिहिले ते श्री. देशपांड्यांनी उद्धृत केले. पण त्यासोबत त्यांनी हिंदुधर्मावरही तितकीच, किंबहुना अधिक टीका केली आहे, ती मात्र श्री. देशपांडे लपवितात, असा लेखकाचा आरोप आहे.
मुस्लिम समाज स्वातंत्र्यपूर्व काळात आक्रमक होता, हे म्हणणे डॉ. कसब्यांना मान्य आहे असे दिसते. मुस्लिम समाजातील मूलतत्त्ववाद, त्याचा सुधारणांना असलेला विरोध; हे मान्य करूनही लेखकास असे वाटते की, हिंदूंचे प्रत्याक्रमणवादी उत्तर अयोग्य आहे. या संदर्भात पुरोगाम्यांची प्रतिक्रिया समन्वयाची आहे, व तीच योग्य आहे असे लेखकाचे म्हणणे आहे. मात्र श्री. देशपांड्यांनी याबाबत घेतलेली ‘व्याख्यात्मक समन्वयाची भूमिका ही बुद्धिभेद का वैचारिक गोंधळ, हे स्पष्ट करण्यात लेखकअपयशी ठरला असे वाटते.
सावरकरांवरील दोन पुस्तकांनी खळबळ उडवणार्या, श्री. मोरे यांच्याबद्दल मात्र डॉ. कसबे अनुदार भूमिका घेतात. श्री. मोरे यांची कोणी दखल घेतली नाही, त्यांनी तांत्रिक पुराव्यांच्या कसरती केल्या आहेत, त्यांना विश्लेषणशक्ती नाही, ते आपल्या अभ्यासपुरुषाच्या दैवतीकरणात गुंतले आहेत, या पद्धतीचे आरोप पुस्तकात जागोजागी विखुरले आहेत. मोरे यांनी डॉ. कसब्यांवर प्रत्यक्ष टीका केल्याचा तर हा परिणाम नाही नाही ना, असा संशय बर्यातचदा येतो. किंवा मोर्यां्नी “आंबेडकरांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे लेखकाला राग आला आहे, असेही वाटते.
सावरकरांचा हिंदुत्ववाद हा गोळवलकरांच्या आध्यात्मिक हिंदुत्ववादापेक्षा (किंवा इथे वापरलेला शब्द म्हणजे ‘नवहिंदुत्ववाद) बराच वेगळा आहे. सावरकर राष्ट्रवादी असल्यामुळे इतर कोणत्याही राष्ट्रवादी माणसाप्रमाणे संकुचित विचारांचे होते. याविरुद्ध प्रामुख्याने आंबेडकर व गांधी हे विश्वबंधुत्ववादी होते, व्यापक विचारसरणीचे होते. सावरकरांना समाजव्यवस्थेची जाण नव्हती, त्यांचा व्यक्तिविषयक विचार अनुदार होता, ते उत्क्रांतिवादी असल्याने वंशवादी बनले होते, शुद्ध वंश व नीत्शेस्फूर्त नाझीवाद त्यांना आकर्षक वाटत असे, ते आयुष्याच्या शेवटी मनोरुग्ण बनले होते – अशा त-हेचे, काही नेहेमीचे व काही खळबळजनक आरोप लेखकाने केले आहेत. केवळ स्वतःच्या विश्लेषणशक्तीवर भरवसा ठेवून, मनोविकारतज्ज्ञांचे संदर्भ न देता केलेला मनोरुग्णावस्थेचाआरोप मात्र आकसपूर्ण वाटतो.
डॉ.कसब्यांची विश्लेषणशक्ती श्री. देशपांडे श्री. मोरे यांच्याहून उजवी वाटते. विशेषतः सावरकरांच्या मनस्वीपणाचा त्यांनी घेतलेला मागोवा, संघपरिवाराची सावरकरांकडे बघण्याची दृष्टी व अशाच काही प्रश्नांची उकल छान केली आहे. त्यामुळे पुस्तक बहुतांशी वाचनीय होते. सावरकरांवर डॉ. कसब्यांनी जशी टीका केली आहे, तशीच अनेक स्तुतिसुमनेही उधळली आहेत. मात्र दोन्हीमध्ये आत्यंतिकता आणल्याने विवेकीपणात, व त्यामुळे पुस्तकाची अभ्यासपूर्णता यात घट होते.
आपल्या ‘झोत’ या पुस्तकात गोळवलकर व सावरकरांना एकाच पंक्तीत आणणे ही चूक होती, हे डॉ. कसब्यांनी मान्य केले असते, तर बरे झाले असते असे वाटते. कारण त्यावरील युक्तिवाद पटत नाही, व डॉ. कसब्यांचे म्हणणे वस्तुतः तसे नाही असेच या पुस्तकातून वाटत राहते. मोत्यांनी ‘दैवतीकरण केलेल्या सावरकरांचे डॉ. कसब्यांनी जसे निर्दैवतीकरण केले आहे, त्याप्रमाणे आंबेडकरांचेही केले असते, तर पुस्तकाचा ढळलेला तोल सावरला गेला असता. तशी संधी आंबेडकरांच्या मुस्लिमप्रश्नविषयक भूमिकेत व त्यांच्या आर्येतिहासाच्या विश्लेषणात जिथे लेखकाचे व आंबेडकरांचे विचार जुळत नाहीत तिथे लेखकास प्राप्त झाली होती.
जो जेता आहे त्याच्या तत्त्वज्ञानात वा वागणुकीत पराजितापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे, अशी भूमिका लेखकाने बर्याचचदा घेतली आहे. हिंदुमहासभा व काँग्रेस; तसेच मुस्लिम राज्यकर्ते व हिंदू राज्यकर्ते यांच्या जयापजयात लेखकाने असाच काहीसा शोध घेतला आहे. अशा पद्धतीच्या विवेचनामुळे ग्रंथ बरयाचदा उथळ बनतो. हाच विचार आपल्याविरुद्धही वापरला जाऊ शकतो, हे लेखकाच्या लक्षात आलेले दिसत नाही.
एकंदरीत सद्यःस्थितीवर प्रतिक्रियात्मक लिहिलेला हा ग्रंथ इतिहासात बराच गुंतला आहे. पुढील विचारमंथनास चालना देत असल्याने याचे स्वागत केले पाहिजे. तात्कालिक प्रश्नांचा उलगडा जरी या पुस्तकातून झाला नाही तरी श्री. देशपांडे व श्री. मोरे यांनी केलेला बुद्धिवाद व त्यांचा उडालेला गोंधळ, यावरील उत्तर म्हणून या ग्रंथाचे महत्त्व मोठे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.