पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक स.न.
‘अंधश्रद्धानिर्मूलन आणि धर्म या लेखामधून मधून तुम्ही ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना धर्मविरोध करावाच लागेल असे प्रतिपादिले आहे. गेल्या ७ वर्षातल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला काही मते नोंदवावीशी वाटतात.
हिंदू म्हणून समजल्या जाणार्या. इथल्या समाजात हिंदू धर्माची समजली जाणारी मूळ बैठक आणि धर्मग्रंथ एकीकडे, आणि विचित्र/विकृत कर्मकांड आणि भ्रष्ट धर्मग्रंथ दुसरीकडे अशी काहीशी विभागणी झालेली आहे. इथला हिंदू वेद-उपनिषदे, दर्शने जाणणारा क्वचित आढळतो. ग्रामीण भागात तर नगण्यच! पण ‘निर्मला मातेचे अध्यात्म ‘गाणगापूरचे माहात्म्य’, ‘ज्ञानेश्वरी, संतोषी माता व्रत/स्तोत्र अशी व्रतवैकल्ये व ग्रंथ तो उराशी कवटाळून असतो. यातही वैविध्य आहे. रामायण-महाभारत-वेद यातील काही विचारहे भ्रष्ट धर्मग्रंथ उचलतात/पेरतात जेणेकरून त्याला ‘हिंदू मुलामा चढतो. बाकी सर्व स्वतःच्या मनाचे.
इथल्या हिंदूंत आणखी एक विभागणी आहे. ‘अध्यात्मवादी हिंदू आणि पसरट विचाराचे हिंदू. संत विचार/साहित्य, मूल्यांचे अतिरेकीपण, थोडासा विज्ञानाचा मुलामा,आणि नियमित कर्मकांडे (भजनापासून ध्यानापर्यंत)समाजसेवा या सर्वांचे एकत्रित मिश्रण तयार करून फोफावलेल्या वेगवेगळ्या संस्था/यंत्रणांचे/समुहांचे जाळे, म्हणजे ही अध्यात्मवादी मंडळी. दुसरी पसरट विचारांची मंडळी, वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी कर्मकांडे त्या त्या देवतांच्या बुवा/पुजार्याहच्या आदेशात राहून आयुष्यभर करीत राहतात.
वरील दोन्ही विभागण्यांमध्ये ‘अध्यात्मवादी’ काही अंशाने वगळले तर सर्वच जणांत ‘हिंदुपण’ ‘शुद्ध अर्थानेयेते असे आढळत नाही. हिंदुपण या साध्या समाजांत पसरट बनते, किंवा हवे तसे लवचीक बनते. अशा व्याख्येने आपण इथल्या हिंदूंना हिंदू म्हणू शकतो, गो.पु. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे ‘व्याख्या वेगवेगळ्या आहेत हे बरोबर आहे. पण त्या भ्रष्ट आहेत, उन्नत नाहीत. म्हणून इथला माणूस अगोदरच ‘धर्मबाह्य ठरला आहे!
आपणांस धर्मविरोध करावासा वाटतो. दाभोळकर, दिलीप कामत (एरिक फ्रॉम / शूमाकर यांना नव्हे) यांना धर्मविरोध प्रश्नचिन्हांकित करावासा वाटतो. इथला. धर्म हिंदू नसून हिंदू आहे! मग विरोध आणि प्रश्नचिन्ह कोणास करणार? बहुसंख्य अंधश्रद्धा धर्माशी निगडित असतात. प्रश्न उरतो, धर्मउच्छेद / विरोध की धर्माचे आवरण घेतलेली कर्मकांडे/ परंपरा यांचा उच्छेद?र. ग. दांडेकर यांनी मांडलेला मुद्दा इथे येतो. धर्मविरोध केला तर धर्मच माहिती नसलेले हिंदुत्ववादी (जे बहुसंख्य आहेत) तुटून प्रतिहल्ले करणार,आणि परंपरा / कर्मकांडी विरोधातून मूळ धर्म आहे तिथेच रहाणार!
धर्मविरोध हा ‘वेद-रामायण-महाभारत-धर्मग्रंथ यांना करून (अंधश्रद्धा निर्मूलन) धर्मउच्छेद पूर्णाशाने होईल असे वाटत नाही आणि धर्मविरोध प्रश्नचिन्हांकित करूनही अंधश्रद्धेचे निर्मूलन / धर्म उच्छेद करता येणार नाही.
समाजात रुजलेले ‘हिंदुत्व इतके विविध आणि विचित्र आहे की ते निर्मूलन करताना ‘शुद्ध हिंदुत्वाचा’ कुठे मागमूसही आढळत नाही. शुद्ध हिंदुत्वविरोधामुळे अशुद्ध हिंदुत्व खडबडून जागे होते अशी ही गंमत आहे. हा पेच यातच आहे की, इथल्या अफाट विविध चालीरीती, परंपरा, रुढी, ज्यांना ‘हिंदू’च्या व्याख्येत समाविष्ट करण्याचा जो उद्योग आजअखेर झालाय त्या क्लृप्तीत आणि ‘हिंदुत्व’ खरे कोणते हे अजिबात माहिती नसलेल्या अज्ञानीपणात.
ही दोन ठळक कारणे वगळली तर इतर अनेक कारणांचा शोध आजअखेर कुठल्याही चळवळीने / विचारवंताने सखोलपणे घेतलेला नाही. या शोधाच्या अपुरेपणामुळेच आपण आज ‘नेमके काय करावे यातच चाचपडत आहोत. धर्म हा अंधश्रद्धेचा उन्नत प्रकार आहे.डोळस श्रद्धेचा प्रश्नच उद्भवत नाही. मग अंधश्रद्धेचे उच्चाटन करताना धर्म की छद्म धर्माचे उच्चाटन हा मार्ग निवडीचा प्रश्न शिल्लक रहातो. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांचा विवेक कमी पडतो. तो कमी पडण्याची कारणे ‘कारणांच्या शोधा व्यतिरिक्त आणखी काही असू शकतात. जी शोधण्यास नुसता विवेकच नव्हे तर सखोल चिकित्सा अत्यावश्यकआहे.
गो.पु. देशपांडे यांनी मांडलेला ‘स्तालिनवादी विवेक काही अंशीच खरा आहे.‘धर्माला शरण जावे असा अर्थ नसला तर ‘धर्माचे उन्नत’ अर्थ मांडण्याचा अनर्थ त्यांनी केला आहे, जो डॉ. दाभोळकर यांनीही केला आहे. धर्म ही नीतिमत्ता आणि अंधश्रद्धा यांची भेसळ आहे. यातील ‘नीतिमत्ता उन्नत करून ‘हिंदूंची नीतिमत्ता’ हे लेबल तसेच ठेवण्यात कसले निर्मूलन होणार?समाजात नीतिमत्तेची पेरणी करण्यासाठी धर्माचाच आधार घेणे म्हणजे उन्नत अंधश्रद्धेचाच आधार देणे ठरते. अडचण इथे उदभवते की लोकांच्या नैतिकतेत सातत्य राखण्यास कोणती मांडणी / चळवळ चालवावी. आणि नेमकी याविषयी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ अपुर्यात अवस्थेत आहे. ढोबळपणे गाडगे महाराज इत्यादींनी जे केले ते आज अपुरे व कालबाह्य ठरत आहे.
म्हणूनच, पुस्तकी धर्मव्याख्यांऐवजी रुजलेल्या धर्मव्याख्या ह्या धर्मविरोधासाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्याविषयी चळवळीला अंतर्मुख आणि धारदार विवेकी व्हावेलागेल.
डॉ. प्रदीप पाटील
चार्वाक’ २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली.

संपादक आजचा सुधारक
स.न.वि.वि.
सप्टें.९४ च्या अंकात डॉ. नी. र. व-हाडपाण्डे यांनी त्यांच्या मूळ लेखावरील माझ्या प्रतिक्रियेचा परामर्श घेतला आहे.
श्रीरामकृष्णांना मिर्गीचे झटके येत ते हे त्यांच्या आईवडिलांचे व वैद्याचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मी मांडली नाहीत आणि श्रीरामकृष्णांची जातीच्या उच्चनीचतेबद्दलची भावना साधनेनंतर नष्ट झाली या माझ्या विधानाच्या पुष्ट्यर्थ मी उदाहरणे दिली नाहीत असे त्यांनी लिहिले आहे.
मिर्गीचे निदान चूक होते हे उघडच आहे. नाहीतर त्यावरील उपचारांचा त्यांच्यावर थोडातरी परिणाम झाला असता व त्यांना त्यानंतर कधीच ‘भावावस्था (श्री, नीरव यालाचफेफरे म्हणतात) झाली नसती. भावावस्था हे फेफरे नसून साक्षात्कार आहे; अनंताच्या ज्ञानाचे ते एक शास्त्रशुद्ध ज्ञानसाधन आहे, हाच प्रस्तुत प्रकरणी श्री. नीरव यांच्या मते विवाद्य विषय आहे. लिखित चरित्रात या संबंधीची बाधक उदाहरणे नसल्यामुळे त्यांचामी उल्लेख करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे साक्षात्कारानंतर (माझ्या शब्दांत साधनापूर्तीनंतर) श्रीरामकृष्णांची जातीच्या उच्चनीचतेबद्दलची भावना. ही भावना नष्ट झाल्याचे उदाहरण मी दिलेले आहे. ते म्हणजे श्रीरामकृष्णांनी जातिनिरपेक्षपणे आपल्या त्यागी भक्तांना दिलेली संन्यासदीक्षा. उच्चवर्णीय नाहीत म्हणून कुणाला अव्हेरले असे झालेले नाही. आपल्या ज्ञानोत्तर आयुष्यात त्यांनी जातिभेद पाळल्याचे उदाहरण त्यांच्या उक्त चरित्रात (लीला प्रसंगात) उपलब्ध नाही. अशा स्थितीत श्री. नीरव यांचे मूळ लेखातील विधानच प्रमाणरहित ठरते.
तेविसाव्या वर्षी श्रीरामकृष्णांनी नऊ वर्षांच्या शारदेशी विवाह करणे आणि सोळाव्या वर्षी शारदा दक्षिणेश्वरी आल्यावर तिला वैवाहिक सुख न देणे हे श्री. नीरव यांना अत्यंत क्रौर्याचे वाटते. परंतु ह्या मुलुखावेगळ्या दांपत्याच्या वैवाहिक जीवनाकडे पाहिले, तर क्रूरता, दुष्टपणा किंवा कोणत्याही प्रकारची सक्ती येथे मुळीच आढळून येत नाही. उलट दोघांचेही भावजीवन अत्यंत सुसंवादी आणि परस्परपूरक असल्याचे त्यांच्या जीवनातील अनेक घटना-प्रसंगांवरून जाणवते. श्रीरामकृष्णांनी आपल्या ह्या पत्नीला – सहधर्मचारिणीला अखेरपर्यंत अत्यंत सन्मानाने वागवले. कोणत्याही प्रकारचा अत्याचार कोणत्याही निमित्ताने त्यांनी केला नाही. उलट वेळोवेळी त्यांचे मानसिक उन्नयन केलेआणि त्यांना अक्षय्य आनंदाचे भागीदार केले. श्रीशारदादेवींचे जीवन एका उन्नत जीवनाचा एक अत्यंत तेजस्वी असा आलेख आहे. श्रीरामकृष्णांच्या तिरोधानानंतर शारदादेवींनीच श्रीरामकृष्णांच्या भक्तांना अमोघ नेतृत्व दिले आणि असंख्य लोकांच्या जीवनांत त्यांनी ज्ञानाचा प्रकाश आणि आनंद आणला. या सर्व गोष्टींचे बारीक सारीक तपशील उपलब्धआहेत. तेव्हा माझे हे म्हणणे निराधार नाही.
तिसरा मुद्दा ब्रह्मचर्याबद्दल. ब्रह्मचर्य हे जीवनमूल्य (सामाजिक मूल्यही) श्री. नीरव यांना मान्य नाही, हे त्यांच्या अन्य काही लेखांतून जाहीर झालेले आहे. परंतु ब्रह्मचर्यावर निष्ठा असलेल्या व्यक्तींचे जीवन हे निश्चितच समाजाला उपयोगी व आदर्शभूत ठरलेले आहे. ब्रह्मचर्यचे ढोंग ही एक व्यक्तिगत व सामाजिक फसगत आहे हे मलाही मान्य आहे. श्री. नीरव यांनी उल्लेखिलेल्या अन्य बाबी सुखी जीवनाला आवश्यक नाहीत असे मुळीच नाही. कौटुंबिक व सामाजिक जीवन सुसह्य व सफल होण्यासाठी त्या सर्वांची महत्ता कुणीही नाकारीत नाही. त्याकरिता सर्वांनीच नेहमी रसराज शृंगाराला सर्वदा शरण गेले पाहिजे असे ठरत नाही.
‘बलवान् इन्द्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति’ हे जितके खरे तितकेच ‘यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति’ हेही खरे आहे. म्हणजेच ब्रह्मज्ञानाला (ब्रह्मज्ञान्यालाही) ब्रह्मचर्याची नितांत आवश्यकता आहे हा विचार अत्यंत तर्कसंगत व विवेकवादी आहे. परंतु आजच्या सुधारकाच्या ध्येयधोरणात हा विषय कदाचित बसणार नाही म्हणून येथेच थांबतो. श्री. नीरव यांनी माझ्या पत्राच्या निमित्ताने साक्षात्काराबद्दल पुनश्च शास्त्रीय ऊहापोह केला हे चांगले झाले. असो.
आपला न. ब. पाटील
अ-३७ कमलपुष्प ज. अरुणकुमार वैद्य नगर वांद्रे रेक्लमेशन (पश्चिम) मुंबई ४०००५०

आदरणीय श्री. दि. य. देशपांडे यांस,
सा. न. वि. वि.
‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ या श्री. नी. र. व-हाडपांडे यांच्या लेखावर मी जी प्रतिक्रिया पाठविली होती तिच्यावरील त्यांचा प्रतिसाद सप्टेंबर १९९४ च्या अंकात वाचला. वाचून खेद झाला. मूळ लेख, माझी प्रतिक्रिया आणि तिला मूळ लेखकाचा प्रतिसाद हे जे काळजीपूर्वक वाचतील त्यांना आपले मत बनविण्याएवढी चर्चा झालेली आहे असे मला वाटते. त्यामुळे प्रतिसादावरील प्रतिक्रिया पाठवीत नाही.
सप्टेंबरच्याच अंकाच्या मुखपृष्ठावर आपण ‘वैज्ञानिक रीतहा बरड रसेल यांचा उतारा दिला आहे. श्री. व-हाडपांडे यांचा मूळ लेख, माझी प्रतिक्रिया, त्यांचा प्रतिसाद हे तीनही लेख वरील उतार्यालत दिलेल्या निकषावर तपासले तर त्यांना आपण किती गुण द्याल हे मला जाणून घ्यायला आवडेल.
आपला, प्रसन्न दाभोलकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.