पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स.न.वि. वि.
आजचा सुधारक नोव्हेंबर ९४ च्या अंकातील स्त्रीपुरुषसमता व स्त्रीमुक्तीसंबंधी सर्वेक्षण’ या संबंधातील डॉ. र.वि. पंडित यांची प्रश्नावली वाचली. डॉ. पंडित कोणत्या कालखंडात वावरत आहेत?आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर खरोखरी सुखवस्तु मध्यमवर्गीय, विशेषतः ब्राम्हण, समाजात पुरुषमुक्तीची गरज आहे. परंतु या बटबटीत वास्तवाकडे कोणीच लक्ष देत नाही ही खेदाची बाब आहे. विवेकवाद वास्तवाकडे डोळेझाक करून भावनांच्या आहारी कधीच जात नसतो. खालील कवितेत, स्त्रीमुक्तीच्या अतिरेकाने ब्राह्मण युवक कसा अगतिक बनला आहे हे पहायला मिळेल.
।। मॉडर्न ब्राह्मण युवक ।।
(चाल – चोली के पीछे ची)
आपलं चांगलं सोडलं । हीन पाश्चात्त्य घेतलं ।।।
करुनी पत्नीची गुलामी । स्वतः समजे पुरोगामी ।।
पत्नी पतीला दटावी । निमुटपणे ऐकून घेई ।।।
शब्द काढिता चकार । दावी त्राटिका अवतार ।।।
काय करतो बिचारा । सदा तिचाच दरारा ।।
उपमर्द सदा करी । पती तोही सहन करी ।।
पती सदा अँड्जस्ट होतो । तिची कृत्ये खपवुनं घेतो ।।
पत्नी असते सर्वेसर्वा । याला वाटत नाही हेवा ।।।
सगळ्याची ह्या परिणती । कशामध्ये तरी होई ।।
संसाराचा खुळखुळा । करून घेतो मॉडर्न खुळा ।।
करू घातलेले सर्वेक्षण बैल दुभवण्यासारखे आहे. जुन्या काळच्या अशिक्षित किंवा अल्पशिक्षित स्त्रिया व आजच्या पदवीधर ब्राह्मण महिला यांच्या मनोवृत्तीत काडीचाही बदल झालेला नाही. कोकणातील एका लोकगीतात’ आला बायकूचा भाऊ काढले सोनसळे गहूं, आला नवरयाचा भाऊ बाईला भरलं हिंदूं’ अशा ओळी आहेत. डोळे उघडे ठेवून वावरणार्‍यास हल्लीच्या शिक्षित स्त्रियांत. माहेरचे नातेवाईक व सासरचे नातेवाईक यांच्याबाबत हीच वृत्ती प्रकर्षाने जाणवते. स्वतःच्या बहिणीचा नवरा आल्यास जणू राष्ट्रपती आपल्या घरी आल्यासारखा आनंद ओसंडतो. नवर्‍याच्या बहिणीचा नवरा आल्यास त्याची फारशी दखलही घेतली जात नाही. पूर्वीच्या सोवळ्या सासवा स्वतःच्या सुनांशी वागत,त्याच्या वरचढ हल्लीच्या सुशिक्षित सुना स्वतःच्या सासूसासर्‍यांशी वागतात! स्वतःच्याआईबापांशी मात्र पाळलेल्या कुत्रीसारख्या! डॉ. पंडित महिला म्हणजे गरीब बिचार्‍या गायी याच संभ्रमात असलेले दिसतात. परंतु या गरीब बिचार्‍या गायींची सदा उगारलेली शिंगे डॉ. पंडित कशाकरिता दृष्टीआड करितात? त्यावरून ते स्त्रियांचे पक्षपाती असल्याचे जाणवते. विवेकवाद भावनांच्या आहारी जाऊन अपरिवर्तनीय बटबटीत वास्तवाकडे डोळेझाक करीत नसतो.

  • ग. य. धारप

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.