चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ४)

स्त्रीपुरुषसमागमाची किंवा योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ आणि दुसरी कनिष्ठ ठरते – आणि समतेच्या तत्त्वाला बाधा येते. समतेच्या तत्त्वाला बाधा असणारे कोणतेही वर्तन त्याज्य आहे ह्या मतावर मी ठाम आहे.
हे जे योनीचे पावित्र्य आहे ते गंगेसारखे किंवा अग्नीसारखे पावित्र्य नाही. गंगा किंवा अग्नी स्वतः विटाळत नाहीत, उलट आपल्या स्पर्शाने अशुद्ध वस्तूला शुद्ध करतात. स्त्रीयोनी हे स्त्रीचे शक्तिस्थान नसून मर्मस्थान आहे आणि अत्यन्त नाजुक असे मर्मस्थान आहे. त्याऐवजी ते शक्तिस्थान व्हावे असे वाटत असेल, निदान त्याचा नाजुकपणा घालवावयाचा असेल तर त्याला इतर अवयवांसारखे लेखले पाहिजे. त्याचे पावित्र्य नष्ट झाले की ते मर्मस्थान राहणार नाही.
आजची सुसंस्कृत समाजामधल्या स्त्रियांची परिस्थिती तटस्थपणे पाहिली तर मन अतिशय विषण्ण होते, शरमिंदे होते. आज तेथल्या स्त्रिया पूर्णपणे भर्तृवश आहेत. त्यांच्या स्वतःच्या घराचे दार उघडण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. त्यांच्या घरावर त्यांचा ताबा नाही. त्यांच्या दरवाज्याची किल्ली त्यांच्या आपापल्या नवऱ्याच्या ताब्यात आहे. नवरा येण्याच्या अगोदरपासूनच नव्हे तर तो गेल्यानंतरही ती त्याच्याच ताब्यात असते. नवरा येण्याआधी म्हणजे त्यांच्या कुमारिका अवस्थेत, लग्नाला कितीही उशीर झाला तरी ती त्यांनी व त्यांच्या आईबापांनी त्याला देण्यासाठी जपून ठेवावयाची असते. विवाहसमारंभाच्या योगे ती किल्ली जणू देवाब्राह्मणांच्या साक्षीने पतीच्या हवाली केली जाते. तो थोड्या दिवसांसाठी गावाला गेला, काही वर्षासाठी देशान्तराला गेला, किंवा तिला कायमचा सोडून परागंदा झाला तरी ती किल्ली तो सोबत नेतो. इतकेच नव्हे तर तो व्यसनी असो, छळवादी असो, वेडा किंवा षंढ असो, तिच्या दाराची किल्ली त्याच्याच स्वाधीन असते. इतके दिवस अनेक उच्चवर्णीयांमध्ये भर्त्यांच्या मृत्यूनंतरही ती किल्ली तिला परत मिळत नसे. ह्या जन्मजन्मांतरीच्या गाठी आहेत असे तिच्या मनावर बिंबविण्यात येई. आता काही वर्षांपासून ती किल्ली पुन्हा दुसरा पती येईपर्यंत स्त्रिया अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवतात आणि समारंभपूर्वक चारचौघांच्या साक्षीने नवीन नवग्याच्या हाती देतात. अश्या त्या पूर्णपणे भर्तृनिष्ठ किंवा भत्रेधीन आहेत ह्या बाबीचा अत्यंत गौरव मानतात आणि ज्या त्यांच्यासारख्या सर्वथा भर्तृशरण नाहीत त्यांना हीन, पतित किंवा निंद्य लेखतात. हे स्त्रीपुरुषांचे नाते समानतेवर आधारलेले नाही. स्त्रीला स्वतःच्या भावभावना नाहीत, तिला विवेक करता येत नाही, निर्णयशक्ति नाही अशा गृहीतकावर ते निर्भर आहे. स्त्री ही कोणी जडवस्तू आहे. असाच मला ह्या साध्या व्यवहारात भास होतो. ह्यात स्त्रियांचा गुणगौरव नाही तर हे पुरुषांचे स्त्रीवरचे स्वामित्व आहे. येथे सेव्यसेवकभाव आहे. ही गुलामगिरी आहे, हा घोर अन्याय आहे. म्हणून त्यांची मागणी असो वा नसो, स्त्रियांना न्याय देण्यासाठी त्यांना ह्या बन्धनातून मुक्त केलेच पाहिजे. त्यांच्या घराची किल्ली त्यांच्या स्वतःच्याच ताब्यात पाहिजे. पुरुषाच्या स्वामित्वाचे बाह्य लक्षण म्हणजे कुंकुसिंदूरादि सौभाग्यलक्षणे किंवा त्याचे आडनाव धारण न केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत बदल घडून यावयाला प्रारंभ झाला तरी तेथे थांबता येत नाही हे आता आम्ही समजले पाहिजे; आणि आजची ही एकूण त्यांची परिस्थिती आम्हा न्यायप्रिय स्त्रीपुरुषांना लज्जास्पद आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.
आजच्या सुसंस्कृत समाजामध्ये पुरुष एक तर सदैव अनाघ्रात पुष्पाची कामना करतात (व स्त्रिया त्यांना स्वामीसारखे किंवा देवासारखे लेखून त्यांचे ते कोडकौतुक पुरवितात) किंवा कोणा अन्य पुरुषाने न रक्षिलेल्या स्त्रिया कोणालाही उपलब्ध आहेत अथवा त्या वेश्या नसल्या तरीसुद्धा त्यांच्यासाठी वेश्या आहेत असे मानतात. ही गोष्टसुद्धा आम्हाला अतिशय लाजिरवाणी आहे.
रामकथेचा जो कोणी रचयिता आहे त्याने अगोदर सीतेच्या शुद्धीचा म्हणजे तिच्या अग्निदिव्याचा आणि नंतर कोणा यःकश्चित् रजकाला संतुष्ट करून लोकापवाद टाळण्यासाठी केलेल्या सीतात्यागाचा प्रसंग तीमध्ये घातल्यामुळे आजच्या समाजाचे मोठे नुकसान झाले आहे असे मला वाटू लागले आहे; कारण राम थोर, पण रामाच्या प्रत्येक कृत्तीचे माहात्म्य जोवर आमच्या मनांत नांदत आहे आणि मर्यादापुरुषोत्तम राम आमचा आदर्श आहे तोवर बलात्संभोगाकडे कोणीही स्त्री अपघात म्हणून पाहू शकणार नाही अशी मला भीती आहे. ती आपल्या योनीकडेही पवित्र वस्तू म्हणूनच पाहणार! रामकथेची – रामाची-थोरवी तिच्या मनात कायम असेपर्यंत परपुरुषसमागम – मग तो भलेही बळजोरीने झालेला असोतिला अमंगलच वाटत राहणार आणि आपण अपवित्र झालो, विटाळलो ह्या भावनेमधून बाहेर पडणे तिला अतिशय दुष्कर होणार! रामाचे वर्तन त्याच्या काळी आदर्श होते, आजच्या काळी नाही हे कळेपर्यंत सगळ्या दादा धर्माधिकारींनी आणि त्यांच्यासारख्या विचारवंतांनी कितीही कंठशोष केला तरी काही उपयोग होणार नाही. ते अरण्यरुदन ठरून जळगावसारख्या घटना पुनःपुन्हा घडणार. राम हा कोणत्याच बाबतीत चुकू शकत नाही, त्याच्यासारखे स्त्रीविषयक वर्तन आजच्या काळातही योग्य असे जर आपण मानत राहिलो तर खर्याु अर्थाने स्त्रीमुक्ती कविकल्पनेतच राहील.
स्त्रियांनी स्वातंत्र्य प्राप्त करणे म्हणजे आपल्या घराच्या दरवाज्याची किल्ली आपल्या हातांत घेणे आहे. त्यांच्या घराच्या स्वामिनी त्या स्वतः आहेत हे स्वतःला आणि इतरांना सांगणे आहे. ती किल्ली पुरुषाकडून त्यांच्या हातात गेल्यामुळे किंवा गेल्याबरोबर त्यांच्या घराची धर्मशाळा होत नाही; त्याचप्रमाणे कोणालाही त्यांच्या घराचे दार उघडून दिलेच पाहिजे अशी त्यांच्यावर जबरदस्ती नाही. ते दार आता सगळ्या पुरुषांसाठी सताड उघडलेले आहे असे कोणीही समजण्याचे कारण नाही. त्यांचे घर ही त्यांची खाजगी मालमत्ता आहे. ती काही त्यांच्या सध्याच्या किंवा भविष्यकाळी होऊ घातलेल्या किंवा होऊन गेलेल्या नवरयाची खाजगी मालमत्ता नाही.
स्त्रियांच्या स्नेहाला, प्रेमाला जे पात्र होतील अशांना त्यात प्रवेश मिळेल. त्यात कोणाला वा कोणाकोणाला प्रवेश द्यावा की न द्यावा हा सर्वथैव त्यांचा प्रश्न आहे. मग स्नेही व पती ह्यांत फरक काय? पती हा स्नेह्यापेक्षा जास्त व नियमितपणे कौटुंबिक जबाबदार्यात घेणारा असेल. काही कुटुंबांमध्ये ह्या जबाबदाऱ्या वाटून घेणारे, नेहमीच एकमेकांसाठी झटणारे एकापेक्षा अधिक असतील आणि येथे कोणत्याही प्रकारचा स्वामीसेवकभाव असणार नाही.
माझ्या डोळ्यांसमोर जे आदर्श कुटुंब आहे ते माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्याचे एकमेकांवाचून अडते, त्याला एकमेकांशी देवाणघेवाण करावीच लागते ह्याची जाण असलेले आहे; ह्या गृहीतकावर आधारलेले आहे. म्हणून ही देवाणघेवाण एकमेकांचे ओरबाडून घेऊन लुटून करण्याची त्याला गरज पडू नये तर परस्परांची गरज समजून घेऊन जबाबदारीने ती देवाणघेवाण व्हावी अशी माझी इच्छा आहे. लैंगिक शिक्षणाचा हा मुळी आधारच आहे असे मला वाटते.
श्री. दि. मा. खैरकर हे मला ज्येष्ठ असलेले माझे स्नेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांचे पत्र डिसेंबर ९४ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. ते म्हणतात की मला एकपतिपत्नीक कुटुंबाची कल्पना मान्य नाही.
मला ती कल्पना मान्य नाही असे म्हणण्याऐवजी मला योनिशुचितेच्या कडक (rigid) कल्पनांवर आधारलेले कुटुंब नको आहे असे म्हणू या. मला कुटुंब हवेच आहे आणि ते लवचीक असे कुटुंब हवे आहे. ज्या कुटुंबात आपल्या समग्र समाजातील स्त्रीपुरुषसमस्यांची जाण असेल व त्याप्रमाणे जे स्वतःला वाकवील व घडवील असे कुटुंब हवे आहे. जे योनिशुचितेचा बाऊ करणार नाही म्हणजे आज ज्या स्त्रियांना पाऊल घसरलेल्या स्त्रिया समजून घरातून काढून दिले जाते त्यांचे ते वर्तन क्षम्य समजेल, ज्यांना आपल्या शारीरिक किंवा स्वाभाविक वैगुण्यामुळे, दोषांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे एकेकट्याने जीवन व्यतीत करावे लागते किंवा एखाद्या निष्प्रेम संस्थेचा आश्रय करावा लागतो अशांना सामावून घेईल व तसे करताना अशा स्त्रीपुरुषांच्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक कामप्रेरणेला व्यक्त व्हावयाला वाव देईल असे एकमेकांवर स्नेहाचा वर्षाव करणारे कुटुंब हवे आहे. असे कुटुंब अस्तित्वात आले म्हणजे काय होईल, आज जे एकेकटे लोक कोणत्यातरी कुटुंबाच्या आश्रयाने घरच्यासारखे राहतात ते घरचे म्हणून राहतील. हे कुटुंब आपल्याला मुद्दाम घडवावे लागणार आहे, कारण आजचे एकपतिपत्नीक कुटुंब तसे नाही, त्याच्या ठिकाणी असा लवचीकपणा नाही. माझ्या कल्पनेमधले आदर्श कुटुंब तसे एकपतिपत्नीक असले तरी थोड्या काळासाठी अनेकपत्नीक किंवा अनेकपतिक होऊ शकेल. स्त्रीचे पावित्र्य किंवा योनिशुचिता ही अशा कुटुंबरचनेची मुख्य अट राहणार नाही. प्रत्यक्षात ही कुटुंबे कशी असतील त्याविषयी आपणाकडून सूचना आल्यानंतर आणखी सविस्तर बोलू.
श्री. खैरकर ह्यांचे सर्व मुद्दे विवेचनासाठी मी येथे घेत नाही. कारण माझे ह्याविषयावरचे तीन चार लेख सलगपणे वाचले तर त्यांच्या बर्याुच आक्षेपांची उत्तरे त्यांमध्ये त्यांना सापडतील असे मला वाटते.
आपल्या देशात स्त्रीपुरुषांचे गुणोत्तर विषम आहे. १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण पुष्कळ ठिकाणी फार कमी आहे. अरुणाचलामध्ये शहरी भागात ते १००० : ६२९ येथपर्यंत घसरले आहे. दिल्लीत १००० : ८०८ आहे. महाराष्ट्रातील शहरांत ते १००० : ८५० आहे. पंजाबात ८६५ आहे. सिक्कीममध्ये ६९७ आहे. एक केरळ सोडल्यास ते सगळीकडे कमी आहे. असे Central Bureau of Health Intelligence ने १९८५ मध्ये प्रकाशित केलेले आकडे सांगतात. एकपतिपत्नीक कुटुंबामध्ये ह्या सर्व जास्तीच्या पुरुषांना कसे सामावून घेतले जाणार ते मला समजत नाही, म्हणून मी लवचीक कुटुंबाची कल्पना केली. प्रत्येकाची वैध मार्गाने कामपूर्ती हे माझे लक्ष्य असले तरी कामवासनेला अनिर्बधपणे मोकाट सोडणे मला नको आहे, लैंगिक स्वातंत्र्याला मी सर्वश्रेष्ठ मूल्य मानत नाही हे पुनःपुन्हा सांगण्याची गरज पडू नये.
विद्याभ्यासाच्या काळात विद्यार्थी विषयोपभोगात रममाण झाल्यामुळे त्याचे नुकसान होते असे श्री. खैरकरांना म्हणावयाचे आहे. ते त्यांचे म्हणणे खरे आहे. पण ती प्रेरणा पूर्णपणे दडपता न आल्यामुळेसुद्धा तिचेच चिंतन होत राहिल्यामुळे काही विद्याथ्र्यांचे अभ्यासाचे नुकसान होत असणारच. अनेक स्त्रीपुरुषांनी विवाहानंतरही विद्याभ्यासात चांगले यश मिळविल्याची उदाहरणेही पाहावयाला मिळतील. तेव्हा कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी त्याचे अधिक अध्ययन व्हावयाला पाहिजे इतके मात्र खरे. त्याप्रमाणे स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य दिल्यामुळे प्रेमभंग जास्त होतील किंवा काय ह्याचेही अधिक अध्ययन करूया. मला आज तसे वाटत नाही.
आता आजार आणि लोकसंख्यावाढ हे मुद्दे घेऊ. एच. आय. व्ही. ची लागण स्वैर लैंगिक संबंधामुळे होते असे आपण तूर्त मान्य करू या. पण आपणाला स्वैर संबंध नको आहेत हे सांगून झाले आहे. आणि ही लागण अपघाताने (न्हाव्याच्या वस्तयामुळे) किंवा निष्काळजीपणाने (इंजेक्शनची सुई निर्जंतुक न केल्यामुळे) होऊ शकते हे आपणास माहीत आहे. शिवाय निरोधासारखी साधने वापरल्याने त्या लागणीला प्रतिबंध होतो हेही आपणास ठाऊक आहे. तेव्हा एडसूसारखे आजार वाढू नयेत इतकी काळजी आपल्याला घेता येईल असे माझे मत आहे. त्यासाठी प्रबोधनाची गरज आहेच पण माझ्या मते तो निराळा विषय आहे. त्यावर आपण वेगळी चर्चा करू या.
आपली लोकसंख्या अपेक्षेपेक्षा वाढली ती केवळ कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम फसल्यामुळे नव्हे. ती प्रतिजैविकांच्या उपलब्धतेमुळे व साथीचे रोग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्यामुळे वाढली आहे. त्याचबरोबर आपल्या देशातला अन्नधान्याचा पुरवठा वाढला हेही त्यामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. लोकसंख्यावाढीचा आणि दारिद्र्याचा घनिष्ठ संबंध आहे. आपली सर्व मुले वाचतील असा विश्वास जोपर्यंत दरिद्री जनतेच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत हम दो, हमारे दो हा विचार त्यांना पटणार नाही. शिवाय आज स्त्रियांना अधिक मुले नको असली तरी त्यांचे नवरे आणि इतरेजन ह्यांच्या दडपणामुळे त्यांना जास्त अपत्यांना जन्म द्यावा लागतो. स्त्रियांना निर्णयस्वातंत्र्य मिळाले तर त्यामुळे आजच्यापेक्षा कमी मुले जन्माला येतील अशीही शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतरांच्या मुलांना आपले मानण्याची मनाची तयारी झाली तर स्वतःचीच मुले जन्मास घालण्याची गरज त्यांना राहणार नाही.
सावत्र मुलांना न स्वीकारणारे जसे काही लोक दिसतात तसेच परक्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना पूर्णपणे आपलेसे करणारेही दिसतात. सध्या जीवनकलह पूर्वीइतका तीव्र राहिलेला नाही व जी वृत्ती वाढवावी ती वाढते. म्हणून ती वृत्ती वाढविण्याचा आपल्याला मुद्दाम प्रयत्न करावा लागेल. स्त्रियांचे स्वातंत्र्य हा त्यांचा न्याय्य हक्क आहे. तो ज्यांना मान्य होईल असेच स्त्रीपुरुष बहुपतिपत्नीक होतील व ते आपले मूल कोणाच्या पोटचे आहे ह्याचा विचार न करता एकमेकांच्या मुलांची काळजी घेतील. बाकीचे तसे (बहुपतिपत्नीक) होणार नाहीत. ज्या स्त्रियांना आपला हक्क बजावावयाचा नाही त्या स्वेच्छेने किंवा नाइलाजाने भर्तृवश राहतील. येथे संघर्षाचा संबंध येतोच कोठे ते मला समजले नाही. पतिपत्नींमधले संबंध सुसंवादी राहावे, त्यांनी एकमेकांना समजून घ्यावे ह्याविषयी मतभेद नाही. असे स्त्रीपुरुषांनी परस्परांशी स्पर्धा न करता त्यांनी एकमेकांना पूरक व्हावे म्हणून आवश्यक ते शिक्षण देण्याची गरज आहेच. अशा शिक्षणाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झालेलेआहे.
श्री. खैरकरांच्या शेवटच्या मुद्द्याबद्दल सांगावयाचे म्हणजे मी जडवादी आहे हे त्यांनी माझ्याविषयीचे केलेले निदान आहे. माझ्या मते मी जडवादी (materialist) नव्हे तर इहवादी (secularist) आहे. पण मी कोणताच पवित्रा कायमचा घेतलेला नाही. मी जड किंवा अचल असा पुतळा नाही. तेव्हा त्यांनी मोकळेपणाने चर्चा पुढे चालू ठेवावी व अन्तिम निर्णय दिवाकर मोहनीने एकट्याने घ्यावयाचा नसून आपण सर्वांनी मिळून घ्यावयाचा आहे, स्त्रीमुक्तीच्या आड येणारे अडथळे दूर करावयाचे आहेत ही गोष्ट दृष्टीआड होऊ देऊ नये.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.