पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक
डिसेंबर १९९४ च्या अंकात श्री. धारप यांचे पत्र वाचले. “स्त्रीमुक्ती व स्त्रीपुरुष समानता” याविषयी लोकमत-संग्रहाची कल्पना त्यांना आवडली नसून त्याबद्दल त्यांनी आपले मत तत्परतेने कळविले हे चांगलेच आहे. प्रत्येकाला स्वतःची मते असतात व ती व्यक्त करण्याचा अधिकारही असतो. प्रश्नावलीसोबतच “सुधारकाने” वाचकांच्या प्रतिक्रिया आमंत्रित केल्या होत्याच.
परंतु आपले मतच बरोबर व इतरांचे चूक असा अत्याग्रह धरणे योग्य नाही आणि हा आग्रह इतरांचा उपरोध करून मांडणे सभ्यतेच्या संकेताविरुद्ध आहे. महाराष्ट्रातील ब्राम्हण तरुणांच्या संसाराचा, महिलांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे, खुळखुळा झाला आहे असे श्री. धारप म्हणतात, परंतु ते आम्हाला मान्य नाही. केवळ एकाच भूभागातील विशिष्ट समाजगटाचाच विचार आम्हाला करावासा वाटत नाही, तर एकूण संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या विविध स्तरांतील सामान्य जनांना (विशेषतः महिलांना), त्यांत श्री. धारप आलेच, “स्त्रीमुक्ती व स्त्रीपुरुष समानता” याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याची आम्हाला आवश्यकता वाटते; कारण याविषयी खूप मतभिन्नता असावी असा आमचा कयास आहे. आजच्या सुधारकासही अशी गरज वाटते असे त्यांनी प्रसिद्ध केले आहेच. तेव्हा सर्व पूर्वग्रह सोडून अभ्यासूपणे हे सर्वेक्षण व्हावे असे आम्ही मानतो. या सर्वेक्षणात अर्थातच श्री. धारपांच्या मताची नोंद, त्यांची इच्छा असल्यास, अवश्य होईल. तोवर आपलेच मत बरोबर असे काहीशा अशिष्ट भाषेत मांडण्याचे श्री. धारप साहेबांना फारसे कारण नाही.
विनयाचा आणि सार्वजनिक वादातील संकेतांचा थोडासा भंग होत असला तरी मला श्री. धारपांना कळवावे असे वाटते की मी भारतातील विविध प्रांतांखेरीज भारताबाहेरही प्रवास करतो व अनेक देशी-विदेशी सम्पर्कसाधनांशी सम्पर्क ठेवतो. त्यामुळे मी शाबूत बुद्धीने २० व्या शतकाच्या शेवटच्या दशकातच वावरत आहे. मी स्त्रियांचा पक्षपाती वगैरे नसून, कोणत्याही विषयाचा वैज्ञानिक दृष्टिकोणातून विचार करणारा एक सामान्य माणूस आहे. श्री. धारपांप्रमाणे मला स्त्रियांमध्ये “पाळलेल्या कुत्र्या” अथवा “शिंगे उगारलेल्या गायी” मात्र दिसत नाहीत!
आपला विश्वासू
र. वि. पंडित

श्री. संपादक
आजचा सुधारक यांना
एका मैत्रिणीकडे डिसेंबरचा अंक वाचावयास मिळाला. त्यात श्री. धारप साहेबांचे पत्र वाचले. त्यात त्यांनी स्त्रीपुरुष-मानता व स्त्रीमुक्तीसंबंधी लोकमतसंकलनाच्या कल्पनेस विरोध करून हा प्रयत्न “बैल दुमवण्यासारखा आहे” असे लिहिले आहे. त्याचप्रमाणे विवेकवाद वास्तवाकडे डोळेझाक करत नाही असे बजावले आहे. यावरून असे दिसते की श्री. धारप यांच्या मते स्त्रीमुक्ती संपूर्णतः झालेली असून आता “पुरुषमुक्ती”ची गरज आहे. हा त्यांचा निष्कर्ष कशावर आधारलेला आहे? त्यासंबंधी त्यांनी काही संशोधन अथवा सर्वेक्षण केले आहे की कसे? याबद्दल ते गप्प आहेत. आजचा सुधारक हेच सत्य जाणण्यासाठी सर्वेक्षणाची तयारी करीत असावा. डॉ. पंडित यांनी सुचविलेल्या प्रश्नावलीत बऱ्याच तपशिलाने माहिती मिळविण्याचा मानस दिसतो. हा विषय महत्त्वाचा असून स्त्रीमुक्तीविषयी केवळ वैयक्तिक मताचा आग्रह संकुचित वृत्तीचा निदर्शक आहे.
समाजातील विविध स्तरातील लोकांना, विशेषतः स्त्रियांना या विषयाबद्दल काय वाटते हे जाणणे आवश्यकच आहे. धारपसाहेब फक्त ब्राह्मण समाजाबद्दलची त्यांची वैयक्तिक समजूत खरी मानून प्रस्तावित सर्वेक्षणास विरोध करीत आहेत. ब्राह्मण तरुणांच्या संसाराचा ‘खुळखुळा’ कसा झाला याबद्दल “चोलीके पीछे”च्या चालीवर म्हणावयाच्या गाण्याद्वारे श्री. धारप आपला मुद्दा पटविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते विनोद तर करीत नाहीत ना असा प्रश्न पडतो.
ब्राह्मण समाजातील महिला सासरच्या व माहेरच्या मंडळीशी वागताना भेद करतात व आईबापाशी “पाळलेल्या कुत्री”सारख्या वागतात असे ते म्हणतात. यावरून या महिला खरोखरच “मुक्त झालेल्या आहेत” असे का धारपसाहेबांना म्हणावयाचे आहे? डॉ. पंडित महिलांचे पक्षपाती आहेत असे श्री. धारप म्हणतात, परंतु महिलांना “कुत्रीं” आणि “गायीं”ची उपमा देणारे धारप कोणाचे पक्षपाती आहेत हे कळले तर फार बरे होईल.
आपली नम्र
सत्यबाला माहेश्वरी
९०/सी, गाडगे नगर विस्तार, अमरावती – ४४४६०४

संपादक,
आजचा सुधारक,
स.न.वि.वि. आजच्या सुधारकाचे नोव्हें-डिसें. ९४ चे अंक वाचून असे वाटू लागले आहे की त्यास फक्त रघुनाथ धोंडो कर्वे ह्यांच्या “समाजस्वास्थ्य” मासिकाचे स्वरूप येत आहे. आगरकरांच्या लिखाणात स्त्रीपुरुषसंबंधाविषयी फार थोडे लिहिले गेले. समाजापुढील तो एकच एक विषय नाही.
आणि तुमच्या डोळ्यासमोरील समाज तरी कोणता आहे? ज्यांचे मासिक उत्पन्न द.म. ५००० रु. हून जास्त आहे असे फक्त पाचच कोटी लोक भारतात आहेत. त्यांच्यापुढे तुमचे लेखक मांडतात त्या अडचणी असाव्यात. त्यातही जर शृंगारिक मनोवृत्ती असेल आणि प्रकृती चांगली असेल तर स्त्रीपुरुषसंबंध सहसा बिघडणार नाहीत.
डॉ. विठ्ठल प्रभू ह्यांनीसुद्धा स्त्री व पुरुष ह्यांच्यात मानसिक आणि शारीरिक भिन्नता असते असे स्पष्ट केले आहे. स्त्री फक्त मातृत्व, प्रेम, स्थैर्य आणि आधार ह्यासाठी आसुसलेली असते. स्त्रीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची कमतरता असते. सर्व प्राणिमात्रांत नर हा आळशी व मादी जास्त कार्यप्रवण असते. आज स्वार्थी कल्पना वाढीस लागल्यामुळे हे प्रश्न उत्पन्न केले जात आहेत. मूठभरांच्या प्रश्नांचे प्रबोधन करणे ह्यास Esoteric म्हणतात.
ना. गोखल्यांनी म. गांधींना खेडेगावी जाण्यास सांगितले होते. नेरळ खेडेगाव आहे. आदिवासींमध्ये मुले झाल्यानंतर सुद्धा लग्ने होतात. लग्नाच्या खर्चासाठी पैसा जमला की लग्न करतात. भारतात दरवर्षी जी लग्ने होतात; त्यांपैकी सात टक्के लग्नांत मुली दशवर्षांखालील व त्रेचाळीस टक्के लग्नांत मुली १८ वर्षाच्या आतील असतात. ह्या सर्वांवर खटले भरले तर किती तुरुंग लागतील त्याचा विद्वानांनी विचार करावा. आदिवासी स्त्री फक्त सहाशे कॅलरीजचे अन्न खाते. गावच्या मुख्याच्या एका वर्षाच्या मुलीचे लग्नास विरोध केला म्हणून “भंवर” ह्या स्त्रीवर सर्वांनी बलात्कार केला. ज्यांचे उत्पन्न महिना एक हजाराहून कमी आहे असे ५१ कोटी लोक समाजात आहेत.
पस्तीस लाख रु. जमविणारी अंधश्रद्धा निर्मूलनसमिती “ईश्वर नाही’ म्हणण्यास कचरते. निर्गुण-निराकार ईश्वर मला दिसला म्हणणारे विवेकानंद “सिझोफ्रेनिक” असावेत असे कबूल करण्यास दाभोळकर कचरतात. सीता व्यभिचारिणी होती असे लिहिणाऱ्या कोलत्यांची बाजू घेण्यास पत्रकार कचरतात. अंगात येणाऱ्या स्त्रियांच्या पाया पडणे चूक आहे ते सांगण्यास सर्वच कचरतात. अशा प्रसंगी आजचा सुधारक निर्भयतेचा किरण वाटत होता. जी चर्चा नोव्हें.-डिसें. च्या अंकात चालू आहे ती उच्चभ्रू मासिकांतून कायमच चालत असते. त्या चर्चेचे परिणाम होत नाहीत. पतिपत्नी नाते वैयक्तिक आहे. घटस्फोट किंवा दुभंगलेली जोडपी नगण्य आहेत. ती उच्चभ्रू स्वार्थी समाजांतील आहेत.
महाभारतकाळातसुद्धा फक्त व्यास आणि कुंतीनेच नियोग केला. व्यासच लेखक असल्याने त्यावेळी नियोग “समाजास मान्य होता” असे तो म्हणतो. पण इतर कोणीही नियोग अवलंबिलेला दिसत नाही. दुर्योधनाने चुलत भाऊ नसलेल्यांना राज्य नाकारले.. उच्चभ्रूंपैकी कितीजण ह्यांना देवपण देण्यास तयार नाहीत? आजचा सुधारक त्यांना ह्याबाबत विवेकवाद शिकविणार की नाही?
डॉ. पंडितांच्या जैविक तंत्रविद्येचा लाभ किती टक्क्यांना होणार? केवळ एका हकिगतीवरून ललित लिहिणाऱ्या नंदा खऱ्यांनी किती दलितांची चरित्रे वाचली आहेत? उत्तरा सहस्रबुद्धे ह्यांच्या नोव्हेंबरच्या पत्रास बाळ सामंतांनी इंग्लंडचे दिलेले डिसेंबरमधील वर्णन पुरेसे आहे. मोहनी फालतू विषयात (डिसेंबर) रस घेतात ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांनी प्रसन्न दाभोळकर ह्यांना शाहणे करावे. खैरकर ह्यांनी समजावून घ्यावे की ‘मन’ असा अवयव नाही. मानवी संवेदनेला आणि विचारशक्तीला समजू शकणारे, निसर्गविज्ञानाच्या मर्यादेत असणारे ते सर्व भौतिक होय. या पलीकडे काहीही नाही. ‘तसे असते’ हा भ्रम आहे. विकार-भावना इ. सर्व मेंदूतील रासायनिक भौतिक क्रिया आहेत. विशिष्ट रसायनांच्या साहाय्याने विशिष्ट भावना निर्माण करता येतात किंवा दडपूनही टाकता येतात. विचारविकास-नीती सर्व भौतिकच आहेत. त्यात आधिभौतिक काहीही नाही.
आगाशे-रिसबूड-कुळकर्णी व सामंत ह्यांचे लिखाण चांगले आहे. पाच टक्के उच्चभ्रूंना नास्तिक करा आणि सामाजिक बांधिलकीतून त्याग शिकवा. कुटुंबव्यवस्था मोडली तर मनुष्य व पशू ह्यांत फरक राहणार नाही. क्षणिक लैंगिक सुख मिळविण्यासाठी सकस अन्न लागते व ते मिळविण्यासाठी आठ तास कष्ट करावे लागतात. ज्यांना सकस अन्न मिळूच शकत नाही त्यांचा विचार विद्वानांनी करावा. पन्नास वर्षांखालील व्यक्तींनीच लैंगिक प्रश्नाच्या चर्चा कराव्यात. कळावे.
आपला
केशवराव जोशी
तत्त्वबोध, हायवे चेक नाक्याजवळ, नेरळ(रायगड) ४१०१०१

श्री. देशपांडे यांना,
सप्रेम नमस्कार,
आजचा सुधारक डिसेंबर ९४ अंकातील ‘तुमचे भक्ती हे मूल्य आहे काय?’ हा लेख वाचला आणि आपण अगदी कस नसलेले मुद्दे उपस्थित करून चर्चा अगदी खालच्या पातळीवर आणता आहा असे वाटले. आपण ज्या एका तथाकथित बुद्धिवादी पवित्र्याचा आव आणता त्या पवित्र्यात असेच कितीतरी बाष्कळ प्रश्न उपस्थित करता येतील आणि त्यांच्यावर पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष करणे कालापव्यय ठरेल. आपल्या चालीवर असेच अन्य उथळ सवंग प्रश्न खालीलप्रमाणे उपस्थित करता येऊ शकतील : (१) अंगात कपडे घालणे यासारखा परंपरागत ढोंगीपणा कोणताच नव्हे. तेव्हा नागवे वावरणे हा श्रेष्ठ आचार नव्हे काय? (२) जीवनात दुःखेच फार. जीवन आवडिलांनी दिले म्हणजे आपल्या दुःखाचे मूळ कारण आईवडील, अशा आईवडिलांना कठोर शासन का करू नये? (३) किडामुंगी, माणूस, झाड प्रत्येकाचा जीव सारख्याच मोलाचा. मग हजारो किडामुंग्या आपण सहज मारतो. एखाद-दुसरा माणूस ठार मारला तर काय बिघडले? (४) खरे बोलावे, चोरी करू नये. कारण तसे केले तर समाजस्वास्थ्य बिघडते. ते बिघडले म्हणजे आपले स्वतःचे अस्तित्व धोक्यात येते. याचा अर्थ चोरी करू नये, खोटे बोलू नये ही विचारसरणी स्वार्थापोटी निर्माण होते. स्वार्थ हा दुर्गुण म्हणून या दुर्गुणाचा समूळ उच्छेद करण्यासाठी खोटे बोला, चोऱ्या करा. (५) स्वैर लैंगिक व्यवहार हा एक शिष्टाचार का न व्हावा. कारण ती एक नैसर्गिक प्रेरणा आहे.
‘मामेकं शरणं व्रज’ हे गीतेतले एक वाक्य तोडून घेऊन आपण अज्ञानाचा कळस गाठला आहे. गीतेतला प्रथमपुरुषी एकवचनी निर्देश हा सर्व भूतमात्रांच्या ठायी वसत असलेल्या चित्शक्तीचा एक वैश्विक आविष्कार आहे.
आपण फक्त पंचेंद्रियांची प्रमाणे ग्राह्य मानता. त्या पलिकडचे विश्व नाकारता. पंचेंद्रियांना स्वैर सोडून मिळणारी परिमाणे तुम्हाला मंजूर आहेत. तथापि या इंद्रियांची उलट दिशेने चाल घडवल्यास अध्यात्माची पहाट दिसते. त्या प्रदेशात जाण्यासाठी असलेली प्राथमिक अट postulate आपण नाकारता. आणि मग पलंगावर बसून खिडकीतून डोकावत तुम्ही म्हणता तो दूर डोंगर दिसतो ना दगड आहेत तिथे. त्या ठिकाणी चालत जाऊन निर्विकल्प मनाने अनुभूती घेण्याची तुमची तयारी नाही.
अशा तऱ्हेने पाणी घुसळून समाजसुधारणेचे लोणी येते का हे पहात राहणे यात मला काही स्वारस्य दिसत नाही. चर्चेची पातळी पर्यंकपण्डिताची वाटते. त्यामागे समाजसुधारणेची तळमळ किंवा बौद्धिक पातळी अभावाने आढळते.
प्रस्तुत मासिकाची वर्गणी सांगलीतील माझे मित्र व आपले वर्गणीदार श्री. म. वि. गाडगीळ यांनी मला न सांगता माझ्या वतीने मजवरील प्रेमाखातर भरली आहे. आपण कृपया माझ्याकडे अंक पाठवणे थांबवावे. उर्वरित वर्गणी परत पाठवली नाही तरी चालेल.
क. हे. वि.
आपला,
म वि कोल्हटकर

संपादक, आजचा सुधारक
अंधश्रद्धानिर्मूलनाची एक अतिशय उपयुक्त चळवळ आता एका नव्याच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डॉ. नरेन्द्र दाभोळकरांनी ‘विचार तर कराल’ या नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे, त्या संदर्भात मी हे लिहीत आहे.
धर्माला विरोध करायचा की नाही, विरोध करायचा झाल्यास तो नेमक्या कोणच्या मुद्यावर करायचा, कोणच्या मुद्यावर विरोध करणे चळवळीच्या दृष्टीने व्यवहार्य ठरेल, कोणच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले तरी तूर्त चालेल, या प्रश्नावर उहापोह चालू असतानाच एका राजकीय विषयाची भर दाभोळकरांनी आता घातली आहे, ती या चळवळीस हानिकारक ठरण्याची शक्यता दिसते. या पुस्तकांत पृष्ठ ४९ वर त्यांनी म्हटले आहे :- विशिष्ट धर्माचे (म्हणजे अर्थातच हिंदूधर्माचे) राष्ट्र म्हणून उद्घोषित करण्याच्या उपद्व्याप काही मंडळींनी चालवला आहे. त्या कारस्थानातले धोके लोकांना समजावून सांगणे हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या आशयाशी अत्यंत सुसंगत आहे. आता हा उपद्व्याप कोणी चालवला आहे ते निदान मला तरी ठाऊक नाही. हिंदूधर्म नावाची अशी कोणतीही एक संहिता नाही. जिचा अंमल या देशावर लादण्याचे मनसुबे कोणी करू शकेल. धर्माधिष्ठित राष्ट्र या कल्पनेला मीच काय, कोणीही समंजस माणूस विरोधच करील. दाभोळकरांना या उपद्व्यापातले धोके कोणते दिसतात ते त्यांनी पृष्ठ ५० वर सांगितले आहेत, पण तसे सांगताना त्यांनी ‘हिंदूधर्माचे राष्ट्र’ हा शब्द न ठेवता ‘हिंदूंचे राष्ट्र’ असा शब्द ठेवला आहे. (त्यांना हे दोन्ही शब्द समानार्थीच वाटत असावेत.) या ठिकाणी ते विचारतात, “राष्ट्र हिंदूंचे झाले तर मुसलमानांचे करायचे काय?” या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जे दिले आहे ते माझ्या पिढीचे लोक गेली पन्नास वर्षे ऐकत आहेत. विपर्यस्त प्रचाराचा तो एक इरसाल नमुना आहे. ‘१२ कोटी मुसलमानांना देशाबाहेर घालवणे, किंवा त्यांना ठार मारून नष्ट करणे, किंवा युद्ध करून त्यांना गुलाम करणे, एवढे तीनच पर्याय हिंदूंच्या राष्ट्रापुढे आहेत’ असे दाभोळकर म्हणतात. श्री. स. ह. देशपांडे यांनी त्यांच्या ‘सावरकर ते भाजप’ या पुस्तकांत पृष्ठ ८४ व ८५ वर या आरोपांची चर्चा केलेली आहे, म्हणून मी जास्त लिहीत नाही. दाभोळकरांच्या समितीला हे भयानक धोके दिसतात, म्हणून तिने हिंदूराष्ट्र या कल्पनेविरुद्ध उभे राहिले पाहिजे असे ते म्हणतात.
हे राष्ट्र हिंदूराष्ट्र व्हावे की न व्हावे हा विषय राजकारणाचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाशी त्याचा काय संबंध आहे हे मला कळत नाही. ही चळवळ राजकारणापासून अलिप्त राहील अशी ग्वाही सुरुवातीच्या काळात देण्यात आली होती, म्हणून माझ्यासारखे धर्मविरोधी असलेले पण त्याचबरोबर हिंदुसमाजवादी असलेले लोक तिच्यात सामील झाले. परंतु आता दाभोळकरांनी आपले राजकारण उघडपणे तिच्यात आणले आहे, हे या चळवळीचे दुर्दैव आहे असे मला वाटते.
कळावे ही वि.
आपला
मा. श्री. रिसबूड
२१०१ सदाशिव, पुणे ३०

सम्पादक
आजचा सुधारक यांस,
आपल्या नियतकालिकाच्या नोव्हेम्बरच्या अंकांतील रा. प्रदीप पाटील यांचे पत्र, विशेषतः त्याचा शेवट वाचून नवल वाटले. अनेक वर्षे महाराष्ट्राबाहेर रहात असल्याने आमची मराठी त्यांचेच शब्द वापरायचे तर ‘उन्नत’ होण्याऐवजी ‘भ्रष्ट’ झाली असल्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही आणि तरीही आमचा आशय अजिबातच स्पष्ट होऊ नये इतकीही तिची इमारत ढासळलेली नाही असे मात्र वाटते. ‘धर्माचे उन्नत अर्थ’ मांडण्याचा ‘अनर्थ’ आम्ही केलेला नाही. धर्म व दर्शने ह्याची उन्नत व अवनत दोन्ही स्वरूपे असतात. त्या अर्थाने दार्शनिक व धार्मिक परंपरांचा विचार त्यांचे अनित्य किंवा द्वंद्वात्मक (डायलेक्टिकल) स्वरूप ध्यानात घेऊन व्हायला हवेत हा खरे म्हणजे आमचा मुद्दा होता. मुख्य म्हणजे हा तर्क ‘हिंदू’ दर्शनापुरता मर्यादित नाही. हेच तर्कशास्त्र जैन, बौध्द, इस्लाम आदि धर्मांनाही लावले जावे असेच आमचे म्हणणे आहे. धर्म/दर्शने व कला व साहित्य व्यवहार यांचा संबंध आहे व होता हे रा. पाटील ह्याना अमान्य असेल तर बोलणेच खुंटले. किंवा भक्तीकविता आणि अजिंठ्याची लेणी यांचा धर्मश्रद्धेशी काही संबंध नव्हता (तुकाराम शुद्ध कविताच लिहीत होते असाही पक्ष सांप्रत महाराष्ट्रदेशी रूढ होत आहे असे कानावर आले!) असे त्यांना म्हणायचे असेल तर तसे मानण्याचा व तद्द्वारे रा. पाटील ह्यांच्या दृष्टीने धर्माचे ‘उन्नत अर्थ’ लावण्याचा ‘अनर्थ’ आम्ही करतो, केला आहे हे मान्य करायलाच हवे. तथापि हे ‘उन्नत अर्थ’ आमच्या लेखी ‘हिंदू धर्म किंवा दर्शने’ ह्यापुरते मर्यादित नाहीत. रा.पाटील ह्यांच्या बंगल्याला ज्यांचे नाव आहे त्या चार्वाकांचे दर्शनही त्यात मोडते एवढे मात्र नोंदवायला हवे!
आमची विधाने एकूणच धर्मव्यवहाराशी संबंधित होती. ती विधाने हिंदुत्वाचा अर्थ (उन्नत किंवा अवनत) लावण्याचा प्रयत्न नव्हता हा खुलासा करणे जरुरीचे वाटते. धर्म/दर्शने म्हणजे अंधश्रद्धा किंवा फार तर उन्नत अंधश्रद्धा हे समीकरण स्वीकारणे म्हणजे धर्म व दर्शने ह्यांच्याकडे अनैतिहासिक दृष्टीने पाहणे असे आम्हास वाटते. विवेकवाद्यांच्या धर्मविषयक भूमिकेवरचा आम्हासारख्यांचा आक्षेप ती भूमिका धर्म, श्रद्धा, आणि दर्शने ह्यांचा विचार कालनिरपेक्ष (atemporal) व इतिहासनिरपेक्ष (ahistorical) परिभाषेत करू पाहाते हा आहे. ती भूमिका त्यामुळे फारशी आकलनीय आणि उपयुक्त नव्हे असे आम्हास वाटते. प्रत्यक्षप्रमाण हे एकमेव प्रमाण मानण्याचा तर हा परिणाम नव्हे?
गोविन्द पुरुषोत्तम देशपांडे
११५ उत्तराखंड जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नवी दिल्ली ११००६७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.