पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि. आजचा सुधारक डिसेंबर ९४ च्या अंकातील माझ्या पत्रावर व प्रत्रातील कवितेवर सर्वेक्षणाचे प्रवर्तक डॉ. र. वि. पंडित व अमरावतीच्या सत्यबाला माहेश्वरी अशा दोघांच्या जानेवारी ९५ च्या अंकात आलेल्या प्रतिक्रियात त्यांनी बरेच आक्षेप घेतले आहेत. तसेच दोघांनीही बरेच असंबद्ध (irrelevant) मुद्दे उपस्थित केले आहेत. उदा. डॉ. पंडित यांनी स्वतःच्या विज्ञाननिष्ठेविषयी दिलेली ग्वाही. या दोघांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर देत बसल्यास उत्तर खूपच लांबलचक होईल. म्हणून प्रतिक्रियेतील त्या दोघांच्या असंबद्ध मुद्द्यांसकट सर्व मुद्द्यांचा थोडक्यात परामर्श घेत आहे.
माझ्या पत्रात व पत्रातील कवितेत माझे मत मांडले नव्हते. वस्तुस्थितीचे चित्रण करण्याचा तो एक प्रयत्न होता. प्रचलित स्त्रीमुक्तीच्या कल्पना म्हणजे पुरुषद्वेष व स्त्रियांची आक्रमकता असे समीकरण या विकृत कल्पनांच्या अतिरेकामुळे अगतिक बनलेल्या मॉडर्न ब्राह्मण युवकांपुरतेच कवितेतील विडंबन आहे. सर्व ब्राह्मण युवकांबद्दल नाही. स्त्रियांच्या स्वतंत्र वृत्तीमुळे संसाराचा खुळखुळा झालेला नसून अकारण आक्रमक वृत्तीमुळे झालेला आहे. स्त्रिया या स्वभावतः परंपरावादी व रूढिग्रस्त असतात. अयोग्य परंपरा व अयोग्य रूढी यांचा त्याग केल्याशिवाय खर्‍या अर्थाने स्त्री-मुक्ती अशक्य. वैज्ञानिक दृष्ट्याही स्त्री-मुक्ती (स्त्री-पुरुष समानता या अर्थाने) अशक्य वाटते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ हॅवलॉक एलिस यांनी साधार व सप्रमाण सिद्ध केले आहे की स्त्रियांची प्राकृतिक रचना व रोग यांचे बालकांची प्राकृतिक रचना व रोग यांचेशी साम्य आहे. म्हणून त्यांच्या Man and Woman या ग्रंथात स्त्रियांना ते ‘child type’ म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीनेही स्त्री- पुरुष समानता अशक्य. म्हणून करू घातलेल्या सर्वेक्षणाला बैल दुभवण्यासारखे आहे असे म्हटले. वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद भावनांच्या किंवा पूर्वग्रहांच्या आहारी न जाता वास्तव आहे तसे स्वीकारतो. ते अपरिवर्तनीय असल्यास wishful thinking च्या आहारी न जाता अपरिवर्तनीय म्हणून स्वीकारतो.
भारतात धर्म, जात, पोट-जात, व्यवसाय, वर्ग(श्रीमंत, मध्यम, गरीब), भाषा इत्यादींचे प्राबल्य असल्यामुळे एकसंघ समाज नाही. त्यामुळे आपला जास्तीस जास्त संपर्क ज्या समाजगटाशी येतो त्याबाबतच लिहिणे शक्य होते. म्हणून ब्राह्मण समाजापुरतेच चित्रण आहे. आजचा सुधारकचे वर्गणीदार बहुतांश सुखवस्तू ब्राह्मण व तत्सदृश समाज घटकातील असल्याने सर्वेक्षणाला प्रतिसाद या अल्पसंख्य समाजघटकांचाच मिळणार. त्यामुळे डॉ. पंडित यांच्या अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व स्तरातील समाजघटकांचे मत अजमावता येणे दुरापास्त. कारण सर्वेक्षणापासून महाराष्ट्रातील विशाल समाजघटक अलिप्तच राहणार. मी संशोधन, सर्वेक्षण वगैरे केलेले नाही. निरीक्षण मात्र सतत करीत असतो. निरीक्षणातल्या प्रवृत्ती व्यापक प्रमाणात बळावलेल्या आढळतात त्यांचा ठसा सर्वेक्षणाप्रमाणेच मनावर उमटतो. निरीक्षण अहो येता जाता उठत बसता काम करिता घरी दारी विना खर्च करता येते व निरीक्षणाचे फलित किंवा फलनिष्पत्ती सर्वेक्षणाप्रमाणे असू शकते. प्रचलित स्त्रीमुक्तीच्या विकृत कल्पनेप्रमाणे स्त्री म्हणजे गरीब बिचारी गाय व पुरुष हा क्रूर कसाई समजला जातो. या कल्पनेने भारलेल्या स्त्रियांत आक्रमक वृत्ती प्रकर्षाने आढळते. म्हणून शिंगे उगारलेल्या गायी हा शब्दप्रयोग त्यांच्यापुरताच मर्यादित आहे. सर्व स्त्रियांबद्दल नव्हे. शालीनता हा स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार. या मौल्यवान अलंकाराचा त्याग न केलेल्या स्त्रियांना शिंगे उगारलेल्या गायींची उपमा कोणीच देणार नाही.
वरील विवेचनामुळे प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍या दोघांच्याही आक्षेपांचे निरसन होईल व त्या दोघांचेही समाधान व्हावे ही अपेक्षा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.