पत्रव्यवहार

श्रीमान संपादक,
“खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?” या चर्चेत आपण काही मौलिक मुद्द्यांची चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने माझ्या मनात काही विचार गेल्या काही वर्षांपासून घोळत आहेत. ते व्यक्त करण्याची संधी मला लाभली म्हणून ते येथे नमूद करीत आहे.
स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे? स्वातंत्र्य देणारे तुम्ही आम्ही कोण? खरे तर त्यांनी आपले स्वातंत्र्य उपभोगायला हवे. परंतु कुटुंबव्यवस्थेच्या उगमानंतर मधल्या काळात संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांच्या “योनीला” अवास्तव महत्त्व दिले गेले व त्याभोवतीच सर्व सुसंस्कृत लोक फेर धरून विचार करतात, करत होते व आजही करतआहेत.
उजेडात न आलेले असे कितीतरी प्रसंग असतील की एक “स्त्री” दोन तीन पुरुषांसोबत आपले शारीरिक संबंध जोपासत असते. ते केवळ पुरुषाचा बलात्संभोग म्हणून नव्हे! तर ती तिची शारीरिक भूक असते.
ज्या एखाद्या दिवशी हे संबंध उजेडात येतात त्या दिवशी स्वतःच्या शीलरक्षणाची केविलवाणी धडपड ती करते व त्यात पुरुषावर बलात्संभोगाचा आळ घेतला जातो. संभोगाचे खरे समाधान बलात्संभोगात नाही. खेदाची गोष्ट अशी की, धर्माच्या व संस्कृतीच्या नावाखाली जीवनाचा विरोधच शिकविण्यात आला आहे. कारण सर्व सुखाचा ऊहापोह स्वर्गात व मोक्षात नमूद असून “स्वर्ग व मोक्ष प्राप्तीसाठी ज्या काही गोष्टींचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथात मिळतो त्यात मुख्यत्वे सेक्सच्या विरोधी शिकवण दिली आहे असे आढळून येते, व ती परंपरा आम्ही जोपासून टिकविण्याचा प्रयत्न करतोय. लैंगिक स्वातंत्र्य असले की, लगेच सर्वच स्त्रिया सर्वच पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवतील असेही नाही. तेव्हां त्यातून वाईट परिणाम होणारच कसे! तेव्हा तुम्ही आता हा विषय इतका सुस्पष्ट मांडतच आहात तर परत त्याला आडपडद्याची झालर चढविण्याचे कारणच काय? कळले नाही.
स्त्रीस्वातंत्र्यासंबंधीचीच नव्हे! स्त्री-पुरुषांच्या शारीरिक रचनेला सांस्कृतिक ढाच्यामधून जे बंधन घातले आहे त्यावरच तुम्ही प्रहार केलेला आहे. व तुमच्यासारख्या वयस्क व अधिकारी माणसांकडून हे लोण तरूणापर्यंत पोहचले तर पुढल्या पिढीला ते सहज स्वीकारार्ह होईल असे मला वाटते.
मूल ४४१२२४ मोरेश्वर वड्लकोंडावार

संपादक , आजचा सुधारक,
महोदय,
जाने. ९५ च्या अंकातील श्री मोहनी यांची स्त्रीमुक्तीबाबतची चर्चा अधिक गांभीर्याने (decorumने ) व्हावी. पाश्चात्यांची सैल नीती मोहनी येथे रुजवू पाहात आहेत का? पाश्चात्यांनी त्यामुळे सुलभ घटस्फोट, Boy friend, dating ( विवाहितांचेसुद्धा) इ.प्रकारांना भरपूर वाव ठेवला आहे. नव्हे तो येतोच आणि तरी त्यांची कुटुंबसंस्था खर्‍या अर्थाने सुखी, समाधानी आहे असे दिसत नाही. आदर्श मला वाटते-जवळजवळ नाहीच. शिक्षणसंस्थांतून कुमारीमातांचे त्यांच्या संततीचे प्रश्न तिकडे भेडसावत आहेत! तेव्हा मोहनी अधून-मधून संयमाची आवश्यकता प्रतिपादीत आहेत तीच या चळवळीला पथ्यकर, हितकर वाटते. हेही विचारार्ह आहे की आज बहुजनसमाज परिस्थितीतून शिकला आहे। की आपल्याकडे स्त्रीवर अन्याय्य बंधन राहिली ती योग्यरीत्या शिथिल वा आवश्यक तेथे पूर्णतया जावयास हवीत. आता सूचित वधू-वरांचे मेळावे होतात, विवाह ठरतात, सामुदायिक पद्धतीने साजरे होतात, संपन्न होतात. असेही दिसते की तत्कालीन परिस्थितीत गरज म्हणून काही सांस्कृतिक निर्मिती झाली. ती काहींनी दुष्ट वा संकुचित मानसिकतेतून विकृत केली. ती आजच्या संदर्भात बदलणे सुज्ञपणाचेच होईल. आपल्या पारंपरिक विचारातून हेही म्हटले आहे की ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’. तेव्हा स्त्रीविषयी अनुदार वा अन्याय्य असे आपले पूर्वज विचारवंत नव्हते असे वाटते. मंडनमिश्रांच्या विदुषी पत्नीने शंकराचार्यांना वादात पृच्छा करून काही काळ संभ्रमात टाकले होते. बहुपतिक पांचाली, महानंदा यांच्या प्रेरणा नवा विचार देऊ शकतील काय?
माणसाची जीवनमूल्ये सखोल व पूर्ण विचारांतून घडलेली वाटतात. त्यात मोहनींना ज्या सुधारणा अपेक्षित आहेत त्या मला त्यांचे निसर्गाला आव्हान असल्यागत जाणवतात. पशु-पक्ष्यांसारखे संसार केवळ निसर्गप्रेरणांतून माणसे मांडू शकतील काय? माणसाची सभ्यता सुविकसित आहे. फेब्रुवारीच्या सुधारक मधील ‘जगभरात विचार-क्रांती’, गेल्या जाने. अंकातील “मर्म-स्थाना” ची चर्चा इ. विचित्र स्वप्नरंजनासारखे मला वाटतात. क्षमस्व. सुवर्णमध्य नाही का साधता येणार? आपलीही विवाहसंस्था कोलमडू नये ही खंत आहे. आज सर्वत्र वैचारिक अस्थिरता आहे.
कासारहाट, कल्याण ४२१३०१ आपला
वि. बा. अलोणी