पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक,
स. न. वि. वि.
आपण आपल्या एका टिपणात (फेब्रु. ९५) इंग्रजीतील व्हस्व दीर्घ उच्चार मराठीत दर्शविण्याकरिता काही खुणा सुचवल्या होत्या त्यावरील माझी प्रतिक्रिया मी आपल्याकडे पाठवली होती. परंतु जागेअभावी ती आपण प्रसिद्ध केली नसावी. आपल्याच विचारांचे सूत्र धरून श्री. दिवाकर मोहनी यांनी लिहिलेले ‘पाठ्यपुस्तक-मंडळाची चमत्कारिक लेखनपद्धती’ हे टिपण मे ९५ च्या अंकात आपण प्रसिद्ध केले त्याबद्दल अभिनंदन. बर्यााच वर्षापूर्वी श्री मोहनी यांचे देवनागरीतील जोडाक्षर-लेखनपद्धती यावरील एक व्याख्यान मी नागपुरातच ऐकले होते. त्याचेही या निमित्ताने मला स्मरण झाले.
श्री मोहनी यांनी हे सर्व या अगोदरच लिहावयास हवे होते. ते एक मुद्रणकलातज्ज्ञ आहेत आणि गेल्या दोन दशकांत मुद्रणतंत्र आमूलाग्र बदलले आहे. इलेक्ट्रॉनिक व संगणकीय टंकलेखनयंत्रांमुळे मराठी भाषेचा कागदी व्यवहार बराच सुलभ व सुबक झाला । आहे. त्यामुळे यांत्रिक गरज म्हणून मराठी लिपिकांमध्ये एके काळी म्हणजे या शतकाच्या सहाव्या दशकात, शासनाने केलेली तडजोड आता अर्थहीन ठरत आहे.
मुंबई शासनाने आपल्या २१ जाने १९६० च्या व महाराष्ट्र शासनाने २० जुलै १९६२ च्या निर्णयांनुसार मराठीची मानक लिपी जाहीर केली व तिचा वापर अर्थातच अधिकृत ठरला. पाठ्यपुस्तकमंडळाने आपली पुस्तके या निर्णयातील पद्धतीनुसार छापावीत असेही आदेश देण्यात आले. त्यानंतर पुन्हा मराठी टंकलेखनयंत्राचा कलफळक अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने आणखी काही लिपिविषयक सुधारणा २४ सप्टें. १९६६ रोजी शासनाने जाहीर केल्या.
१९७५ नंतर मुद्रणकलेत आणि मुद्रणयंत्रांत बरेच क्रांतिकारक बदल झाले. फोटो टाईपसेटिंगचे तंत्र अधिक लोकप्रिय झाले. आता टाइपांचे खिळे हातांनी जुळवून मुद्रण करणे हे जवळजवळ कालबाह्य होत आले आहे. टंकलेखनयंत्रेही आता मोठ्या प्रमाणावर संगणकीय होत आहेत आणि द्विभाषीही. एकाच संगणकीय यंत्राच्या साहाय्याने इंग्रजी व मराठी असे दोन्ही प्रकारचे टंकलेखन करता येते. पारंपारिक सर्वच जोडाक्षरे या नवीन प्रकारच्या टंकलेखनयंत्रावर टंकलेखित करता येतात. टंकलिखित मजकुराच्या एकाच वेळी हव्या तितक्या प्रतीही काढता येतात.
या क्रांतीमुळे एके काळी यंत्रशरणता पत्करून केलेली तडजोड आता कालबाह्य ठरत आहे. मराठी जोडाक्षरे पूर्वीसारखीच म्हणजे ४०-५० वर्षांपूर्वी लिहिली जात होती तशीच छापता येणे शक्य झाले आहे. मागील पिढी (म्हणजे गेल्या ३० वर्षांत आपले शिक्षण पूर्ण केलेली) तिच्या वाचनात येत असलेल्या ५० वर्षांपूर्वीच्या पुस्तकांद्वारा, त्या जोडाक्षरलेखनपद्धतीशी परिचित आहे.
उच्चारानुसार व उच्चारक्रमानुसार वर्णलेखन व जोडाक्षरलेखन व्हायला पाहिजे यावद्दल दुमत असण्याचे कारण नाही. जोडाक्षरांतील उच्चारांचा क्रम लेखनात दर्शविताना डावीकडून उजवीकडे व वरून खाली असाच असतो. उदा. धन्य, कर्म, राष्ट्र, उद्विग्न, कृष्ण इत्यादि. सद्यःस्थिती लक्षात घेऊन शासनाने १९६०, १९६२ व १९६६ चे वर उल्लेखिलेले शासननिर्णय रद्द करून जोडाक्षरे पारंपारिक पद्धतीने लिहिण्याची मुभा असल्याचे शासननिर्णयाद्वारे जाहीर करणे व पाठ्य-पुस्तक-मंडळालाही तसे आदेश देणे इष्ट ठरेल. शासनाने तसे करावे यासाठी मराठी साहित्य महामंडळाने शासनाला तशी शिफारस लवकर करावी त्याचबरोबर शुद्धलेखन-नियमांच्या मानकीकरणाचीही शिफारस करावयास हवी. या नियमात अजूनही अराजक आहे आणि प्रचलित नियम सर्वत्र पाळले जात नाहीत. सर्वच साहित्यिक संस्थांनी आणि प्रसिद्धिमाध्यमांनी याबाबत आग्रह धरावयास हवा. प्रमाण भाषा हे सर्वांगीण प्रगतीचे एक साधन आहे हे विसरून चालणार नाही.
आपला
अ-३७, कमलपुष्प न. ब. पाटील
जन, ऋण कुमार वैद्य नगर (सेवानिवृत्तभाषासंचालक, महाराष्ट्र)
वांद्रे रक्लमेशन (प.), मुंबई, ४०० ०५०

संपादक, आजचा सुधारक,
‘समतेचे मिथ्य’ या नी. र. वर्हा०डपांडे यांच्या लेखातील पुढील दोन विधानांविषयी. (आ. सु. एप्रिल ९५)
१) स्त्रियांच्या कामव्यापाराचे बाहुल्य पुरुषाच्या चतुर्थांश असते व स्त्रीच्या कामवासनेची तीव्रता देखील पुरुषाच्या वासनेपेक्षा अत्यंत सौम्य असते.
२) रजोदर्शनाच्या दिवसांत स्त्री संभोगासाठी उपलब्ध नसते.
वरील दोन्ही विधानांना छेद देणारी मास्टर्स आणि जॉन्सन यांची विधाने पुढे देतआहे?
अ) One commonly held belief is that males have a greater sexual capacity than females. The reverse is actually true …… There is no evidence whatsoever to suggest that because women have less testostcrone than men, they have lower sexual interest.
ब) The notion that sexual activity, including intercourse, is “Jangerous” to either partner during menstruation has no basis in fact.
वर्हाuडपांड्यांनी दिलेली किन्सेची मते ही १९५० च्या आसपासची आहेत. स्त्रीपुरुपांच्या कामजीवनाच्या पाहणीवरून (तीही एका देशाच्या) वरील निष्कर्ष काढण्याऐवजी जैविक व शरीरशास्त्रावरून निष्कर्ष काढणे योग्य होईल. किन्सेची इतर अनेक मतेही इतर तज्ज्ञांनी चुकीची आहेत असे दाखवले आहे. किन्सेच्या पहिल्या पुस्तकाबद्दल (Sexual behavior in the Human male 194S) सर्वसाधारण अनुकूल मत होते, परंतु त्याच्या दुसर्याi पुस्तकाविषयी (Sexual Behavior in the Human Female 1953) असे म्हणता येणार नाही, असे मास्टर्स आणि जॉन्सन म्हणतात.
वहाडपांड्यांच्या नंबर दोनच्या विधानाविषयी. त्यांनी फेमिना, वुमेन्स इरा, सावी किंवा डेबोनेर, फँटसी यासारख्या नियतकालिकांत येणार्याफ तज्ज्ञांचे (Scxologists) सल्ले वाचले असते तर वरील विधान केले नसते. डॉ. विठ्ठल प्रभूच्या पुस्तकातही ‘मासिक पाळीत समागम केल्यास गर्भ राहात नाही किंवा कोणताही रोग होत नाही असे म्हटलेलेआहे. यावरून ‘समतेचे मिथ्य’ या नी. र. वर्हासडपांड्यांच्या लेखातील वरील दोन्ही विधाने ‘मिथ्य’ आहेत हे लक्षात येते.
१) Masters and Johnson on Sex and Human Loving – Jaico Publishing House. आवृत्ती १९९२.
२) कामविज्ञान – संपादक – डॉ. विठ्ठल प्रभू व बी. ए. सनदी – मनोविकास प्रकाशन १९९०.
टी. बि. खिलारे
A.R.D.E; Pushan, PUNE – 411021

Other References:
Masters and Johnson – an American research team best known for pioneering studics of human sexual behavior. They were married in 1971. Publications
– Human Sexual Response – 1966
– Hunman Sexual InadequaCy – 1970
– The Pleasure Bond- A New look at Sexuality & commitment – 1975
– Ethical Issues in Sex Therapy & Research. 1977
– Homosexuality in Perspective
– 1979 -Textbook of Sexual Medicine – 1979
– Encyclopedia Americana – 1994

भक्ती हे मूल्य आहे काय?”
– बा. वि. ठोसर
मार्च १९९५ च्या आजचा सुधारकच्या अंकात Einstein या श्रेष्ठ शास्त्रज्ञाविषयी बरेच काही लिहिले आहे. या संदर्भात Brian Magee यांनी Karl Popper बद्दल लिहिलेल्या पुस्तकाचा मी उल्लेख केला आहे. वास्तविक याची काहीच गरज नव्हती हे मी प्रथम मान्य करतो. कारण Einstein यांचे विचार आणि वेगवेगळ्या विषयांवरचे विवेचन हे आता त्यांनीच प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत मिळू शकते. हे पुस्तक म्हणजे Ideas and Opiutions, Bonanza Books, New York. “I believe in Spinoza’s God’ हे त्यांचेच या पुस्तकातील एक वाक्य. त्यांच्या “Science and Religion” या लेखाला सर्वसाधारण वाचकवर्गातही बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. स्पिनोझा या एका थोर विचारवंताकडे तत्कालीन पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांनी द्यावे तसे लक्ष दिले नाही, उलट हेटाळणी केली. हे सर्व स्पिनोझावर लिहिलेल्या खालील पुस्तकावरून स्पष्ट होते. Spinozu by Stuart Hampshire, Pelican Books (1987).स्पिनोझा पूर्णतः विवेकवादी असून त्याचे विचार Scientific Materialism कडे झुकलेले दिसतात. ‘भक्ती’ हे मूल्य आहे काय या प्रश्नाशी Einstein आणि Spinoza या तत्त्वज्ञांचा, ते ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारे असूनही जवळचा संबंध येतो असे मला वाटते.
(१) विज्ञानाविषयीचे तत्त्वज्ञान- Philosophy of Science या नवीन विकसित होणार्या विषयाकडे आपले वैज्ञानिक द्यावे तसे लक्ष देत नाहीत असे मला वाटते.KarlPopper हे या विषयातील थोर विचारवंत. ‘मूल्य’ या शब्दाचा साधारणपणे अभिप्रेत असलेला अर्थ लक्ष्यात घेऊन, भक्ती हे मूल्य आहे काय या प्रश्नाविषयी Karl Popper यांच्या विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाला योग्य ते महत्त्व दिले पाहिजे असे मला वाटते. आपल्या शास्त्रज्ञांमध्ये सैद्धांतिक वैज्ञानिकांना (theorical scientists) या विषयाचा अभ्यास करणे अधिक आकर्षक व योग्य होईल असे वाटते. प्रा. देशपांड्यांनी त्यांच्या आ. सु. च्या मार्च १९९५ च्या चर्चात्मक लेखांत, ‘विवेकवादात भावनांना स्थान आहेच’ असे लिहिलेले वाचून बरे वाटले. पण काम, क्रोध इ. पासून उत्पन्न होणार्यां सदोष आणि नकारात्मक (negative) भावनांपेक्षा, विवेकवादात प्रेम व करुणा (love and compassion) यांसारख्या निर्दोष आणि positive भावनांना महत्त्व असावे असे मला वाटते.
(२)या चर्चेच्या संदर्भात ‘मूल्य’ या शब्दाचा सर्वसाधारण वाचक जो अर्थ म्हणजे value असा घेईल, तोच माझ्याही लेखात गृहीत धरला आहे.
(३) Einstein हे या शतकातील श्रेष्ठतम वैज्ञानिक होते असे मानले तरी या चर्चेच्या विषयाबद्दल त्यांची साक्ष घेतलीच पाहिजे असे नाही हे मला मान्य आहे. पण ईश्वराचे अस्तित्व मानणारा आणि धार्मिक प्रवृत्तीचा एक थोर विचारवंत या दृष्टिकोनांतून त्यांच्या तात्त्विक भूमिकेला विशेष महत्त्व आहे.
(४) केवळ चर्चेसाठी चर्चा या भावनेतून माझ्या मार्च १९९५ च्या चर्चात्मक लेखाच्यासंदर्भात हे टिपण लिहिलेले नाही. त्या लेखातील काही विचार स्पष्ट व्हावेत, गैरसमज असल्यास ते दूर व्हावेत हाच मुख्य उद्देश.
(५) पण एका गोष्टीबद्दल माझ्या पहिल्या चर्चात्मक लेखात मांडलेले मत बदललेले नाही. ते म्हणजे ‘भक्ती हे मूल्य आहे काय?’ या प्रश्नाचे उत्तर एक सामान्य माणूस, एक निष्ठावंत भक्त, या भूमिकेवरून होकारार्थी देईल असे मला वाटते.
टेरेसव्ह सोसायटी, सी-२ जीवनबीमा निगम बोरिवली (प.) मुंबई -४०० १०३
क्षमस्व!
मे ९५ च्या संपादकीयात आम्ही असे लिहिले होते की ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ या अमेरिकेतील अनिवासी महाराष्ट्रीय श्री सुनील देशमुख यांनी स्थापलेल्या संघटनेने आजचा सुधारकला पुरस्कार दिला आहे. त्या संबंधात आम्हाला पुण्यातील श्री. वि. ग. कानिटकर यांचे पुढील पत्र आले आहे.

संपादक, आजचा सुधारक यांना,
आपले मासिक माझ्या वाचनात असते, कारण माइसी सून डॉ. सौ. शुभांगी ही तुमच्या नियतकालिकाची वर्गणीदार आहे. मे १९९५ चा अंक वाचला. संपादकीयात दानशूर अनिवासी भारतीय श्री सुनील देशमुख यांनी आपल्या मासिकाला जी रु. ५०,०००/- ची देणगी दिली, याबद्दल आपण आनंद प्रगट केला आहे परंतु देणगीची माहिती देताना श्री सुनील देशमुख यांना आपण ‘महाराष्ट्र फाउंडेशनचे जनकत्वही बहाल केले आहे!
यासंबंधात वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून आवश्यक ते संदर्भ सोबत धाडले आहेत.*
कै, यशवंत हा माझा धाकटा भाऊ असल्याने (९ वर्षांनी लहान) मी हे पत्र आपणास धाडले आहे. कोणाचे ‘श्रेय’ कोणाच्या खांद्यावर जाणे बरोबर नाही. अन्यथा दानशूर श्री देशमुख यांची कृती अभिनंदनीय आहेच.
१३६२ सदाशिव आपला वाचक
पुणे ४११ ०३० वि. ग. कानिटकर

या पत्रामुळे आमच्या विधानातील चूक आमच्या लक्षात आली आहे. वस्तुतः महाराष्ट्र फाउंडेशन ह्या संस्थेची स्थापना १९७८ साली झाली होती आणि तिचे संस्थापक श्री यशवंत कानिटकर हे होते हे आम्हाला प्रथमच कळले आहे. विशेषतः श्री यशवंत कानिटकर यांच्या १९९० साली झालेल्या दुःखद निधनानंतर त्यांचे श्रेय दुसर्याव कोणाला देण्यातील चूक अधिकच आक्षेपार्ह होते. त्यामुळे आमची चूक दुरुस्त करणे आवश्यक होते. ते श्री वि. ग. कानिटकर यांनी केले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि अभावितपणे झालेल्या चुकीबद्दल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.
* संदर्भ प्रकाशित केले नाहीत. – संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.