खरं, पुनर्जन्म आहे?

आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’. पुढच्या जन्मी मिळेल. सविचाराला असा पाठिंबा या जन्मी मिळतो’. ‘देवाजवळ देर असेल पण अंधेर नाही’ असे मानणार्यांवच्या न्यायनिष्ठेला पाठबळ देणारा हाच विचार कर्मसिद्धान्तात परिणत झाला आहे. हा सिद्धान्त स्वीकारल्यावाचून धर्माचे रहस्य उकलत नाही. नीतीचा निवाडा करता येत नाही. हाच कर्मसिद्धान्त स्वीकारला की पुनर्जन्म सिद्ध होतो. इ. इ.
अश्रद्ध बुद्धिवादी म्हणतो, ‘नाही’. पुनर्जन्म नाही. माणसाला हवी ती सुसंगती निसर्गात नाहीच मुळी. निसर्गात आहे तो मात्स्यन्याय. ‘बळी तो कानपिळी’हा प्राकृत न्याय आहे. आपल्याला सांस्कृतिक न्याय हवा असतो. दुर्बलाला बल देणारा. तो मनुष्यकृत आहे. तो इह-लौकिक, ऐहिक आहे. पारलौकिक नाही. आपल्याला समता हवी आहे. निसर्गतः विषमता असूनही आपल्याला सदय न्याय हवा आहे. निसर्ग निष्ठुर असूनही श्रद्धावादी विचारसरणी आश्वासक – भ्रामक आहे. माणसाला जे हवेसे वाटते ते आहेच असे मानून चालणारे हे तत्त्वज्ञान आहे.
विद्वानांच्या या कलहात सामान्याने काय करावे?
आपल्या स्वभावधर्माप्रमाणे जवळच्या पक्षात बसावे. प्रस्तुत लेखक असाच विचार करून अश्रद्धांच्या पंथात सामील झालेला. आपल्यापुरता निःशंक! पण गेल्या महिन्यात पुणे मुक्कामी एका घटनेने त्याच्या ठाम मताला थोडा हादरा बसला. निवृत्तीनंतर पुण्याला विसावलेल्या आपल्या जुन्या ज्येष्ठ प्राध्यापकांची त्याने भेट घेतली. भेटीत त्यांनी काही वर्षांपूर्वी संशोधन केलेल्या एका पुनर्जन्माच्या प्रकरणाचा विषय निघाला. किंबहुना सगळी चर्चा त्या प्रकरणावरच झाली. निरोप घेतेवेळी त्यांनी आपला ह्याविषयीचा शोधनिबंध वाचायला दिला. तो मुक्कामाच्या ठिकाणी आल्यापासून आतापर्यंत त्याने अनेकदा वाचला. तो निबंध त्याला जसा चिंतनीय वाटला तसा आजचा सुधारकच्या वाचकांनाही वाटू शकतो.म्हणून त्यातला निवडक भाग पुढे दिला आहे. वाचकांनी आपले विचार कळवले तर चर्चा होऊ शकेल. कदाचित् तत्त्वबोधही!
मूळ निबंध ३९ पृष्ठांचा आहे. तो जर्नल ऑफ दि अमेरिकन सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च या शोधपत्रिकेत जुलै १९९२ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. संशोधक आहेत प्रा. व. वि. अकोलकर.
* * * * *
पुनर्जन्माची ही कहाणी आहे एका ३२ वर्षे वयाच्या युवतीची. सुसंस्कारित, उच्चविद्याविभूषित या तरुणीचे नाव उत्तरा. ती इंग्रजी आणि लोकप्रशासन या दोन विषयांत एम.ए. झाली होती. १९७३ ते ७५ अशी दोन वर्षे आणि १ वर्षाच्या खंडानंतर आणखी काही वर्षे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर वर्गामध्ये ती अंशकालीन व्याख्याता म्हणून काम करीत होती.
१९७४ च्या प्रारंभी आपल्यात काहीतरी बदल होत आहेत असे तिला वाटू लागले. तिला एक प्रकारचा रिक्तपणा जाणवे. स्मरणशक्ती नाहीशी होत आहे असे वाटू लागे. तासन् तास अनिमिष चंद्राकडे पाहात बसणे, रात्र – रात्र क्षणभरही झोप न येणे असे प्रकार सुरू झाले. आधी कधी न पाहिलेल्या व्यक्ती, प्रसंग, प्रतिमा डोळ्यांपुढे दिसू लागत. बंगाली भाषेची मुळाक्षरे दिसत. बंगालीतले बोलणे ऐकू येई. बंगाली वाक्येच्या वाक्ये तोंडी येत. ही दृश्ये, हे ध्वनि-श्रवण कधी १० मिनिटे तर कधी ३० मिनिटांपर्यंत चाले. यावेळी उत्तरेचे वास्तव्य नागपूरच्या होमिओपॅथी व निसर्गोपचारांसाठी प्रसिद्ध अशा, शहरापासून सुमारे ७ कि. मी. दूर असलेल्या, एका आश्रमात होते. तेथील प्रधान वैद्य स्वतः साधक होते. ध्यान – धारणा करणारे होते. उत्तरेच्या या आवेगांची, उन्मनीसदृश स्थितींची, तिच्या पुटपुटण्याची ते तपशीलवार नोंद ठेवत.
येऊ घातलेल्या ऊर्मीचा प्रस्फोट सर्वप्रथम १९७४ च्या मार्चमध्ये झाला. तो शुक्लपक्षातील अष्टमीचा दिवस होता. उत्तरा स्वतःचे उत्तरापण विसरून शारदा बनली होती. आपण बरद्वान येथील संस्कृत पंडित ब्रजेन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांची कन्या आहोत असे ती म्हणू लागली. या शारदेची स्वमुखातून बाहेर आलेली कहाणी अशी :
आपले पती शिवपूर येथील कविराज विश्वनाथ मुखोपाध्याय हे आहेत. त्यांनी बाळांतपणासाठी आपल्याला आपल्या मावशीकडे सप्तग्राम येथे आणून घातले होते. गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात, बागेत फुले तोडत असताना आपल्या पायाच्या उजव्या अंगठ्याला सर्पदंश झाला. त्यात आपल्याला वयाच्या २४ वे वर्षी मृत्यू आला. तो दिवस शुक्लपक्षातील अष्टमीचा होता.
१. प्रा. व. वि. अकोलकर. ‘स्वरमाला, 70/9 अभिनव विद्यालय गल्ली, नळस्टॉप, कर्वे रोड, पुणे (411 004) फोन. 335586
२. बरद्वान – पश्चिम बंगालमधील शहर. नागपूरपासून सुमारे ९५० कि. मी. दूर
३. शिवपूर – बांगला देशातील खुलना या शहराजवळचे गाव.
४. कविराज – आयुर्वेदीय उपचार करणारा वैद्य ५. सप्तग्राम – बरद्वानजवळ आग्नेयेला सु. ५० कि. मी. दूर असा ग्रामसमूह.
तिचे बोलणे अस्खलित बंगालीत चाले. उत्तरेमध्ये शारदा आविष्कृत होई त्या दिवसांत- जागेपणी तिचा व्यवहार बंगालीतून चाले. झोपेतले पुटपुटणे किंवा तोंडावर पाणी शिंपडून अचानक उठवले तरी तिचे बोलणे बंगालीच असे.
शारदेचे सर्जन झाले की उत्तरा आईवडिलांची ओळखही विसरे. आईला ती ‘मासी माँ म्हणे. इतर आप्तेष्टांशी ती अगदी परक्यांसारखी वागे. त्यांनी मराठीत, हिंदीत किंवा इंग्रजीत काही विचारलेले तिला अगदी कळत नसे. तिच्या बोलण्यावरून असे वाटे की, ही अजूनही ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली राहाते आहे. नेटिवांशी ब्रिटिश सोजिरांच्या उडालेल्या चकमकी तिच्या बोलण्यात येत. सोजिरांच्या भाषेला ती ‘दुर्भाषा म्हणे. एरवी ऊन पाण्याने स्नान करणारी उत्तरा शारदा झाली की बंगाली स्त्रियांप्रमाणे थंडपाणी डोक्यावर घेऊन आंघोळ करी. १९ व्या शतकातील कुलवधूला साजेशी वेषभूषा करी. नवागतासमोर डोक्यावर पदर घेई. दोन्ही हात जोडून सलज्ज स्मिताने अभिवादन करी. सकाळी देवघरात स्वतः दुर्गामातेचे चित्र रांगोळीने चितारून बंगाली भक्तिगीतांनी तिला आळवी. दुपारी तिच्यासाठी आणलेली बंगाली पुस्तके वाची. तिला मराठीपद्धतीने जेवण जमत नसे. दुसर्यााकडे पाहात तसेच जेवायची ती खटपट करी. थोड्या दिवसांनी खाणाखुणांच्या जोडीला नवे शिकलेले मराठी शब्द बोलून ती आपल्या गरजा व्यक्त करू लागली. तिचे बंगाली बोलणे शुद्ध आणि भाषा संस्कृत-प्रचुर असे. भेटायला आलेल्या बंगाली भाषिकांच्या बोलीवरून ते कोणीकडचे असावेत हे ती बरोबर ओळखी. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी तिची आयुर्मर्यादा १८०५ ते २९ किंवा १८०७ ते ३१ अशा कालखंडातील (२४ वर्षांची) असावी असे ठरविले.
उत्तरा शारदा होण्याचे लहानमोठे कालखंड आहेत. १९७४ ते ८३ या ९ वर्षांत जवळजवळ महिन्यातून दोनदा ती शारदा असे. ती चाळिशीत गेल्यावर ही सर्जने कमी झाली. पुढे पुढे, आधी नेहमी दिसणारी दृश्ये, व्यक्ती न दिसता तिला नुसते दीप्यमान वार्यालचे झोत दिसत. १९८५ नंतर सप्तमी, अष्टमी आणि नवमी या नवरात्रातल्या तीन दिवशी शारदासर्जन होई. १९८८ साली दोनच दिवस-अष्टमी आणि नवमी-शारदा प्रकटली. शारदेच्या व्यक्तित्वातील उर्वरित शेष-भाग उत्तरेच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात बुडाशी असलेला गाभा बनला असावा अशी अकोलकरांची उपपत्ती आहे. शारदेचे प्रगटणे चालू याचा अर्थ शारदा उत्तरेचा भाग बनून राहिली होती असाच ते करतात.
उत्तरेच्या ठिकाणी शारदासर्जनाच्या २८ प्रसंगांची नोंद ठेवली गेली आहे. १९७४ साली ३१ मार्च ते २९ एप्रिल या १ महिन्यातले प्रसंग १० ते ३० मिनिटांइतकेचे अल्पकालीन असत. मात्र ऑक्टोबरमध्ये आलेला आवेग १७ दिवस टिकला. यावेळी एकदा तर शारदा घरापासून ७ कि. मी. दूरच्या आश्रमात अनवाणी पायांनी चालत गेली. १९७५साली जाने. १७ पासून २६ फेब्रु. १९७५ पर्यंत सलग ४१ दिवस हे शारदापण राहिले. त्यावेळी नागपूर – पुण्याच्या मराठी वृत्तपत्रांमधून ह्या घटनेचे वर्तमान झळकले. त्यामुळे प्रा. अकोलकर आणि इतर संशोधक या प्रकरणाकडे वळले.
आता प्रश्न पडतो तो हा की, ही बंगाली मुळाक्षरे दिसणे, बंगाली बोलणे- सारेच बंगालीपण- हे कुठून आले? याचे रहस्य काय?
त्याचे उत्तर असे की, उत्तरेचे वडील बंगाली क्रान्तिकारकांचे, सुभाषबाबूंचे मोठे चाहते होते. १९२० ते ३० या दशकातल्या बंगाली नेत्यांशी त्यांची जवळीक होती. त्यांना स्वतःला योगी व्हायचे होते. ते झाले नाही म्हणून त्यांनी मुलीला योगसाधनेसाठी उत्तेजन दिलेले होते. ध्यान-धारणा शिकवली होती. उत्तरेच्या अहमदाबाद येथील मामांना बंगाली येत असे. तिच्या मामेबहिणीला-रांचीच्या सोनलला–बंगाली येत असे. शाळेत अकराव्या वर्गात असताना आपल्या एका वर्गमित्रासमवेत तिने शं. गो. चट्टे या महाराष्ट्रीय अभ्यासकांकडे बंगालीचे प्रारंभिक धडे घेतले होते. एखादे बाळबोध बंगाली पुस्तक वाचण्याइतपत त्यांची प्रगती झाली होती.
आणखी एक गोष्ट म्हणजे बंकीमचन्द्र चट्टोपाध्याय, शरदबाबू, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या मराठीत आलेल्या कादंबच्या ती आवडीने वाचीत असे.
उत्तरेला डॉक्टर व्हायचे होते. पण अशक्त प्रकृतीमुळे तिला तिकडे जाण्यापासून परावृत्त करण्यात आले. बायोलॉजीत बी. एस्सी. झाल्यावर तिने काही वर्षे हायस्कूलांत शिक्षिकेचे काम केले.
१९६५ मध्ये तिने नियमितपणे ध्यानधारणा सुरू केली.
१९६७ मध्ये कन्याकुमारी येथे गेली असता सुचींद्रासाठी हाती वरमाला घेऊन तिष्ठत उभ्या असलेल्या, आणि त्याला वरण्याची मनोकामना अतृप्त राहिलेल्या कन्याकुमारीच्या मूर्तीने तिला दीर्घकाळ भारून टाकले होते. १९६८ मध्ये तिने एम. ए. करायचे ठरवले. इंग्रजीसाठी तयारी करताना तेव्हा तिने टी. एस्. इलियटची वेस्ट लँड (१९५२) ही कविता वाचली. ती वाचताना आपल्याला असा अनुभव आलेला आहे असे तिने लिहून ठेवले. भूतभविष्यवर्तमानात हवे तसे संचार करण्याचा अनुभव!
१९७० मध्ये तिच्या आजारांनी उचल खाल्ली तेव्हा उपचारासाठी पूर्वोक्त आश्रमातील प्रधान वैद्यांशी तिचा संबंध आला. ते पन्नाशीत होते. त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता. रुग्णसेवेकडे ते व्रत म्हणून पाहात. त्यांनी तपासणीसाठी केलेल्या पहिल्या स्पर्शानिच उत्तरेला अवर्णनीय अनुभव आला. तो स्पर्श पूर्वपरिचित असल्यासारखा वाटला. यातनांच्या प्रदीर्घ छळवादानंतर तिचे मन आता पूर्ण विसावले होते. उपचार सुरू झाल्याच्या कित्येक रात्रीनंतर पुष्कळ महिन्यांनी तिने गाढ निद्रा अनुभवली. लोहकणाने चुंबकाकडे आकृष्ट व्हावे तद्वत ती प्रधान वैद्यांकडे ओढली गेली. त्यांना पुनः पुन्हा भेटावे अशी उत्कट इच्छा तिला होऊ लागली. आपल्याला कधी स्वप्नी, कधी ध्यानी दिसणारा उंच, सडसडीत, गौरांग पुरुष ‘आणि हे प्रधान वैद्य यांच्यात कुठेतरी दुवा असलाच पाहिजे असे तिला वाटे. पण त्याचवेळी हे आकर्षण वेगळे आणि आपल्याबरोबर बंगाली शिकणाच्या वर्गमित्राबद्दलची अजूनही कायम असलेली ओढ वेगळी हे तिला स्पष्ट जाणवे. त्या स्पर्शाच्या गूढ सामर्थ्याने तिला ती शोधत असेल्या दैवी सत्याच्या सन्निध आणले होते जणू! । उपरोक्त आश्रमात उपचारासाठी उत्तरा ८ डिसेंबर १९७३ रोजी भरती झाली होती. तेव्हा तेथे तिचा बहंश काळ धार्मिक ग्रंथ – गीता, ज्ञानेश्वरी, नवनाथ ह्यांच्या वाचनात जाई. याच वास्तव्यात तिच्यातले शारदेचे व्यक्तित्व प्रथम प्रकटले. चारपाच महिन्यांनी १९७४ च्या मे च्या पहिल्या आठवड्यात प्रधान वैद्यांच्या सल्ल्यावरून, पण तिच्या इच्छेविरुद्ध तिला घरी नेण्यात आले. त्यावेळी तीन योगभ्यासकांचा सल्ला घेतला गेला. त्यांचे मत पडले की तिची जी आध्यात्मिक विकासाकडे वाटचाल सुरू होती तिचा शारदेच्या प्रगटण्याशी संबंध आहे. कुंडलिनीजागृतीमुळे तिच्या पूर्वायुष्यातील स्मृती जाग्या झाल्या असे त्यांपैकी दोघांचे मत पडले. श्री. जनार्दन स्वामी या संन्यासी योग्याचे म्हणणे पडले की, उत्तरेने शीतली प्राणायामाचा अभ्यास आणि रामनामाचा किंवा ॐकाराचा जप करावा. प्रा. किणींनी तर्जनीने उत्तरेच्या कपाळाला स्पर्श करताच शारदेचे सर्जन झाले. आणि थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा काही तांत्रिक प्रक्रिया करताच शारदेचे विसर्जन होऊन तिची उत्तरा झाली. म्हणून हा कुंडलिनी जागृतीचाच प्रकार आहे असे त्यांचे मत पडले.
* * * * *
आणखी दोन शंका. एक, उत्तरा खरेच शारदा होई की तशी आपली समजूत करून घेई?
दुसरी, खरोखरीची शारदा कोणी होती का? शारदा हे ऐतिहासिक व्यक्तित्व होते की तो उत्तरेच्या कल्पनेचा विलास होता?
उत्तरेत होणारा बदल खरोखरीचा असावा यासाठी नोंदलेली निरीक्षणे अशी.
१. आपल्याच घरात ती नवख्यासारखे वागू लागे. तिला न्हाणीघर दाखवावे लागे. पाण्याचे टाके – तोटी पाहून ती म्हणे- आमच्याकडे तलाव आहे. विजेची उपकरणे, रेडिओ यांच्याकडे ती भयचकित होऊन पाही. टेपरेकॉर्डरला तर ती ‘डाकन (चेटकीण) म्हणाली.
२. तिला आपलेच आईवडील अनोळखी होऊन जात. त्यांच्या बोलीला ती ‘दुर्भाषा म्हणे. वडिलांनी उत्तेजनासाठी पाठीवर हात ठेवला तेव्हा परपुरुष म्हणून ती तो दूर करते.
३. ती बशीत दोन्ही ओठ बुडवून कॉफी घेई. जेवताना उजव्या हाताने पाण्याचा पेला उचली. दुपारच्या प्रहरी पाणी प्यायचे तर लाकडी बैठकीवरून उठून जमिनीवर बसून ती पाणी पिई.
* * * * *
६. (१) प्रा. एन. जी. एस. किणी – नागपूर विद्यापीठातील राज्यशास्त्राचे नामवंत प्राध्यापक.
(२) श्री. मनोहरराव हरकरे (योगिराज).
४. नेहमी आईला ‘बाई म्हणून संबोधणारी ही भावंडे होती. आता ‘बाई या शब्दाला ‘अभद्रकथा म्हणून ती हिणवी. एरवीही ‘बाईं ऐवजी ती ‘देवी’ हे उपपद जोडायला सांगी.
५. आल्यागेल्यांना, ‘काय, बैलगाडीने आलात? रस्ते ठीक होते ना?’ असे विचारी.
६. आल्यागेल्यांना ती ‘सीताभोग हा बंगाली पदार्थ द्यायला सांगे. सुवासिनी जातेवेळी त्यांच्या डाव्या हातातल्या कांकणावर कुंकू लावायला सांगे. एका सुवासिनीच्या हातातल्या सावित्री हे (सोन्याचा मुलामा असलेले लोहकंकण) कडे, ती टक लावून बघत होती. हवंय का, म्हणून तिने विचारताच ही म्हणते, तुमच्याकडून कसे घेऊ, मला माझ्या सासूकडून ते येणार! कांकणे ल्यायचा क्रम ती आपणहून सांगू लागली. आधी सावित्री, मग शंख, नंतर सोन्याच्या बांगड्या इ.
७. आपल्या मोठ्या बहिणीला तिने बंगाली व्याकरण शिकवायचा प्रयत्न केला. कानडे मामा आणि श्रीमती कोठारे यांच्या बोलण्यातले व्याकरणदोष तिने दाखवले.
८. मामेबहिणीने वाचायला दिलेल्या बंगाली पुस्तकात फ्लॅट हा शब्द आला तेव्हा ती अडखळली. तिला फ्लॅट माहीत नव्हता.
९. डॉ. राजलक्ष्मी भट्टाचार्य- या वाडिया कॉलेजातील तत्त्वज्ञान व मानसशास्त्राच्या प्राध्यापिका. बंगालीतील एक मान्यवर लेखिका. त्यांनी प्रा. अकोलकरांना दुभाषी म्हणून साहाय्य केले. त्यांच्या तोंडून शारदेला उद्देशून ‘तू’ असा शब्द बाहेर पडला तेव्हा तिने भद्रजनांप्रमाणे संबोधन वापरावे असे त्यांना बजावले.
१०. शारदेसाठी साडी आणि सीताभोग आणणाच्या गृहस्थाचे नाव पाल होते हे कळताच तिच्या डोळ्यात पाणी तरळले. पाल कायस्थ असतात. आमच्या घरी कायस्थाच्या हातचे पाणी चालत नाही. म्हणून ती नाराज झाली.
शारदा नामक ऐतिहासिक कोणी व्यक्ती होती का? याचा तपास डॉ. आर. के. सिन्हा आणि प्रो. पी. पॉल या शोधकांनी १९७५ मध्ये घेतला. शारदेने दिलेली जी माहिती तपासाअंती खरी निघाली ती अशी.
शारदेने दिलेली वाडवडिलांची नावे बरोबर निघाली. अगदी खापरपणजोबा, आजोबा- (ठाकूरदा रामनाथ, बांसबेरिया) पासून, चुलते, भाऊ याची नावे बिनचूक ठरली. १९७५ मध्ये बंगालमधील बांसबेरिया येथील सतीनाथ चट्टोपाध्याय यांनी त्यांची जी वंशावळ दिली तिच्याशी शारदेची माहिती जुळते. सध्या गोआबागान (उत्तर कलकत्ता) येथे राहणारे अशोकनाथ शारदेच्याच वंशातील असून त्यांच्याजवळील कुलवृत्तांतात ही नावे आढळली. श्री. अशोकनाथ चट्टोपाध्यायांनी आपल्या माहितीत वाडवडिलांचे किताबदेखील लिहिले आहेत. त्यावरून ही मंडळी नामांकित तार्किक होती असे दिसते. शारदेने जो स्ववृत्तान्त कथन केला त्यात आपण संस्कृत पंडितांच्या कुटुंबातील आहोत असे म्हटले होते ते बरोबर निघाले.
(७) प्रो. पी. पॉल यांनी चट्टोपाध्याय कुटुंबीयांचे वाटणीपत्र १८२७ चे, पाहिले आहे त्यात • वाटणीशी संबद्ध पुरुष मंडळीची आलेली नावेच शारदा बरोबर सांगते असे ते म्हणतात
तिचे आजोबा ठाकूर रामनाथ हे बांसबेरियाच्या हंसेश्वरी मंदिरांचे पुजारी होते. त्यांना बरद्वानच्या राजाने ३० बिघे करमुक्त जमीन दान दिली होती. त्यांच्यानंतर तिचे वडील ब्रजेन्द्रनाथ पुजारी झाले. त्यांच्या मागून काका देवीनाथ पुरोहित बनले. त्यांच्या २ मुली लहानपणीच गेल्याने शारदेचे त्यांनी मुलीसारखे लाड केले. काकाबाबूंनीच तिला लिहायलावाचायला शिकवले. मनुस्मृती शिकवली. तेराव्या वर्षी याज्ञवल्क्यस्मृतीही तिने वाचली होती,
नवग्याचं नाव काय होतं? या प्रश्रावर चमकून ती म्हणते, ‘होतं? की आहे?’ आपला नवरा आता नाही या खुलाशाने ती रडू लागली. तिने नाव सांगितले ते आडून काशी येथील देव असे. विश्वनाथ मुखोपाध्यायांनाही एका जमीनदारांकडून त्याच्या पत्नीच्या उपचाराबद्दल ५ बिघे जमीन देणगीदाखल मिळाली होती. तिने नवग्याबरोबर १४ वर्षे संसार केला. ते वैष्णव होते. कांदा, मासे त्यांना अभक्ष्य होते. वर्जित तिथींना ते पत्नीसहवास टाळीत. घरी शिकाऊ विद्यार्थी असत. रोजच्या रांधावाढा-उष्टी काढा याचा तिला उबग येई. त्यामुळे नवरा मारी याचा तिला अपमान वाटे.
आपण एकावर्षापूर्वी मासी माँ च्या घरी आलो. नवरा इथे आला होता पण आता इथे नाही. आई दुर्गे ने मला नवर्या ला भेटायला आणले आहे. इ. इ.
या माहितीतले सगळे तपशील तपासताच आले नसतील हे उघड आहे.
* * * * *
१९७५ च्या ४ मार्च ला नागपूरच्या मनोरुग्णालयात (EEG Recording) तपासणी केली असता काहीही विपरीत आढळले नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात शारदासर्जन झालेले असता, पुन्हा EEG रेकॉर्ड करण्यात आला. डॉक्टारांनी अभिमत दिले की सेंद्रिय दृष्ट्या पाहता मेंदू अगदी असावा तसा आहे.
आणखी एका दिशेने तपास घेण्यात आला.
उत्तरेचा वर्गमित्र – बरोबरच बंगाली शिकलेला – त्याची मैत्री बराच खंड पडून पुन्हा उजळू लागली होती. वयाच्या २४ वे वर्षी, पहिल्यांदाच उत्तरेला लग्न करण्याची इच्छा झालेली होती. तिचे मन त्या वर्गमित्राकडे ओढ घेऊ लागले. पण त्याने प्रतिसाद दिला नाही. तिला हा मोठा तडाखा वाटला. जीवनाचा आधारच जणू कोसळला असे झाले.त्यावेळी तिला मानसिक शीण येई.
आश्रमातल्या प्रधान वैद्याच्या स्पर्शाची जादू तिने अनुभवली तेव्हा तिला वाटले, पूर्वी स्वप्नात दिसणारा, ध्यान करत असता मनश्चक्षुसमोर येणारा उंच, गौर, कृशतनु तरुण आणि हे वैद्य यांच्यात काहीतरी दुवा असला पाहिजे. आणखी एक विचार घोळू लागला.या विश्वातल्या एका अणुमात्र अशा सूक्ष्म चैतन्यांशाला आपली गरज आहे. किंवा पुरुषाच्या, साहाय्यावाचून प्रकृति कार्यप्रवण होऊच शकत नाही असे सांख्य तत्त्वज्ञान आहे तसे आपले झाले का? असे तिला वाटे. तसेच आपले आश्रमातले दीर्घ वास्तव्य समाजसंमत व्हावे या हेतूने तिने प्रधान वैद्यांशी विवाहाचा विचार केला. आपल्याला रामकृष्ण परमहंस आणि शारदादेवी यांच्यासारखे विशुद्ध दाम्पत्यजीवन अभिप्रेत होते असे तिला वाटे. परंतु तिच्या दुर्दैवाने तिची ही आत्मिक गरज प्रधान वैद्यांना कळू शकली नाही. पटू शकली नाही.
* * * * *
शारदेचे सर्जन होणे, शारदा ही ऐतिहासिक व्यक्ति असणे ह्या गोष्टी संशोधकांना पटल्या आहेत. मग ह्या सर्जनामागची कारणे काय असावीत किंवा त्याची उपपत्ती काय द्यावी असा प्रश्न शिल्लक राहतो. एखादी घटना घडण्यापूर्वी निकटवर्ती असणारा घटक निमित्तकारण असेलही. पण ती काही समग्र कारणमीमांसा नाही. एखाद्या प्रस्फोटाचे, घटनाचक्रांचे, कारकतत्त्व काय असू शकेल हे शास्त्रीय उपपादनात अपेक्षित असते. वर्गमित्राचा विवाहास नकार किंवा सांख्यतत्त्वज्ञानातले प्रकृति-पुरुष संबंधातले नातेही वठविण्यास प्रधानवैद्यांचा असहकार या घटना फार तर निमित्त-कारणाच्या सदरात मोडतील. संशोधकांना उत्तरेच्या ठिकाणी असामान्य अशा शक्तींचा प्रत्यय आला आहे. भावी घटनांचे तिला मिळणारे पूर्वसूचन आश्चर्य वाटावे इतक्या प्रमाणात खरे ठरले आहे. बंगाली भाषेत सफाईदारपणे बोलणे, १९ व्या शतकातील आणि आज चलनात नसलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग सहजगत्या करणे, ह्या गोष्टींचे ती बालपणी बंगाली थोडीबहुत शिकली होती या म्हणण्याने स्पष्टीकरण होण्यासारखे नाही. तर मग हे काय आहे?
संशोधक अकोलकरांनी ३ उपपत्ती सादर केल्या आहेत आणि त्यांपैकी एक सर्वात जास्त समर्थनीय मानली आहे. ती आहे पुनर्जन्माची. त्यांचे म्हणणे असे :
१. हे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन(ESP) म्हणता येत नाही. कारण अतींद्रिय ज्ञानाची सीमा भूतकाळातील शारदेच्या जीवनातल्या जाणतेपणीच्या आठवणीपुरतीच मर्यादित करता येत नाही. शारदेची आयुर्मर्यादा जेमतेम २४ वर्षांची. शिवाय उत्तरा उत्तरा राहून शारदेच्या जीवनकथेत डोकावते असे होत नव्हते. ती स्वतःच शारदा होत असे. शिवाय परभाषेतील लिखाण वाचता येणे किंवा परभाषेतील संभाषण ऐकू येणे एवढेच अतींद्रिय ज्ञानात संभवते. परभाषेत विचार करता येणे, तिच्यातून संभाषण करणे, हे त्यात बसत नाही. उत्तरा शारदेचे जिणे जगू पाहात होती. तिच्या दृष्टीने जे वर्तमान होते तो आपल्यासाठी भूतकाळ होता.
२. हे प्रकरण बाधा या प्रकारात मोडते असेही म्हणता येत नाही. कारण बाधा होते तेव्हा व्यक्तीमधील दुय्यम सुप्त चरित्र तिचा ताबा घेते. त्यात व्यक्तीच्या वर्तमान जीवनातले अंश एकत्र गुंफले जातात. अशरीरी अशांत आत्मा समंध होऊन व्यक्तीला झपाटतो. पण असा झपाटा फार थोडाकाळ, काही दिवस किंवा आठवड्यांपुरता असतो. ह्या ठिकाणी सुमारे१००० कि. मी. दूरच्या बंगाली सुवासिनीने या मराठी युवतीला का झपाटावे याचे काही कारण दिसत नाही. समंध झालेली व्यक्ती नात्याची, जवळिकीची असते. निदान ती नावाने खूप परिचित असते. ज्याला बाधा होते ती व्यक्ती मनोरुग्णातील एखाद्या प्रकारात मोडते. बाधा झालेल्यांना मृताचे पुनरागमन का हवे असते याची कारणे असतात. यातले प्रस्तुत ठिकाणी काहीच लागू पडत नाही.
समंध स्वतःचे वेगळेपण जाणून असतो. बाधित व्यक्तीला तो ‘झाड’ म्हणून संबोधत असतो. तो या झाडाला आपण का पछाडले याचे कारण सांगत असतो.
३. पुनर्जन्माची उपपत्ती लावण्यात एक अडचण कालखंडाची आहे. शारदेचा मृत्यू आणि उत्तेरचा जन्म यांच्यात १०० – ११० वर्षांचे अंतर आहे. दुसरे, सामान्यतः पूर्वजन्मीची संस्मरणे बाळपणी येतात. यावर उत्तर म्हणून महाराष्ट्रातीलच एक उदाहरण पुरेसे आहे. संत बहिणाबाईने (१६२८ ते १७००) मृत्युशय्येवर असता १२ पूर्वजन्मांची हकीकत सांगितली आहे. प्रत्येकवेळी आपले, आपल्या आईवडिलांची नावे काय होती, गावाची नावे, आपली आयुमर्यादा अशी १० जन्माचे तपशील तिने दिले आहेत.
शारदा नाथसंप्रदायी कुटुंबात जन्मली होती. हा संप्रदाय शिवशक्ति (कुण्डलिनी योग) उपासक आहे. आदिनाथ, गोरखनाथ, मच्छिद्रनाथ यांनी बंगाली हिंदी, मराठी अशा लोकभाषांतून स्वपंथाचा उपदेश केलेला आहे. उत्तरा नवनाथ हा ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी नियमाने वाची हे येथे प्रस्तुत आहे. ज्ञानेश्वर स्वतः नाथ सम्प्रदायी होते हेही लक्षात घेण्यासारखेआहे.
यावरून अकोलकर निष्कर्ष काढतात की शारदेचे अवशिष्ट व्यक्तित्व उत्तरेच्या रूपाने अवतरले. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा बनून राहिले. आश्रमातील वास्तव्यात फेब्रुवारी १९७४ मध्ये माँ योगशक्ति या योगिनीने उत्तरेला योगनिद्रा शिकवून उपदेश केला होता की, ‘जे कांही अंतःकरणात असेल ते निर्भयपणे बाहेर येऊ दे!’ दुसरे दिवसापासून आपल्याला काही होते आहे असे तिला वाटू लागले. ती बंगाली बोलू लागली. हे उत्तरेच्या खोल – गंभीर मानसाचे मंथन सुरू झाल्याचे चिन्ह असावे. तिच्यात समाविष्ट असलेली शारदाच ३२ वे वर्षी सर्जन पावली होती. उत्तरेला अतोनात वैफल्याचा आलेला अनुभवमातृत्वाची अतृप्त आकांक्षा- केवळ पूर्वजन्मी आपण शारदा होतो या स्मरणाने तृप्त होणार नव्हती. तर मातृत्व दृष्टिपथात आलेली शारदा खुद्द होण्याने ते साफल्य लाभणार होते.