पत्रव्यवहार – प्रतिक्रिया हवी

प्रतिक्रिया हवी
संपादक, आजचा सुधारक यांस,
आजचा सुधारक मधील काही मतांशी मी सहमत होऊ शकत नाही. ज्या मतांशी मी सहमत होऊ शकत नाही त्यांबाबत माझे आकलनही कमी पडत असेल. तरीसुद्धा ज्याशी आपण सहमत नाही ती मते तरी आपल्याला नीट माहिती हवीत ह्या दृष्टीने आपल्या मासिकाची उपयुक्तता निश्चितच आहे.
‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ या शीर्षकाखाली नागपूरच्या प्रा. श्री. गो. काशीकरांचा एक लेख २८-४-९५च्या तरुण भारतात वाचण्यात आला. माझ्यासारख्या सामान्याला (Layman) या विषयात गम्य नाही; तरीदेखील ह्या लेखासंबंधी आपली प्रतिक्रिया समजून घेण्यास मात्र मी उत्सुक आहे. कळावे.
ज्ञानराज सिव्हिल लाइन्स, दर्यापूर गं. र. जोशी
(टीप : प्रा. काशीकर यांचा हा लेख स्वतंत्रपणे आमच्याकडेही प्रसिद्ध्यर्थ आला आहे. तो व त्यावरील डॉ. पु. वि. खांडेकरांचे उत्तर इतरत्र प्रकाशित करीत आहोत. – सं.)

ऐतिहासिक व्यक्तींचे मूल्यमापन करताना पाळावयाची पथ्ये
संपादक
आजचा सुधारक ह्यांस,
आजच्या जून-जुलैच्या जोड अंकात श्री. फकरुद्दीन बेनूर ह्यांचा ‘आगरकर आणि हिंदु मुस्लिम प्रश्न ह्या विषयावरचा लेख प्रसिद्ध झाला आहे. हे पत्र त्या लेखाच्या संदर्भात लिहीत आहे.
मी लोकमान्यांच्या सामाजिक विचाराचा पुरस्कर्ता नाही. ह्या पत्राचे उद्दिष्ट श्री. बेन्नूर ह्यांनी टिळकांचा गौरव करावा हे मांडण्याचाही नाही. त्यांच्या मांडणीबाबतच (मेथडलजी) एकदोन लहानसे प्रश्न निर्माण मनात निर्माण झाले .ते मांडायचा ह्या पत्राचा हेतू आहे.
१) पहिली गोष्ट अशी की टिळक-आगरकर असा तौलनिक विचार करायचा तरआगरूकरांची अवतरणे त्यांच्या निबंधसंग्रहातून आणि टिळकांची अवतरणे मात्र “टिळक हे पूर्णपणे हिंदूंचीच बाजू घेतात” असे दर्शविणार्याव श्री. वसंत पळशीकरांच्या लेखातून घ्यायची हे काही प्रमाणात तरी इतिहासावर अन्याय करणारे आहे. टिळकांचे समग्र लेखन उपलब्ध असताना पळशीकरांनी वापरलेली अवतरणे वापरणे आणि आगरकर मात्र मुळातून उद्धृत करणे हे संशोधनाच्या शिस्तीत बसणारे वाटत नाही.
२) त्यातही पुनः ब्रिटिश अधिकारी ‘हिंदु-मुसलमानांतील तंटे सुरू करण्यासमुख्यत्वेकरून (तिरपा ठसा प्रस्तुत पत्रलेखकाचा) कारणीभूत होतात” असे टिळकांचे
अवतरण श्री. पळशीकरांनी दिले आहे. बेनूरांच्या मते “आगरकर हे टिळकांप्रमाणे दंग्याच्या बाबतीत ब्रिटिशांना सर्वस्वी जबाबदार (पुनः तिरपा ठसा पत्रलेखकाचा) धरत नाहीत.” मुख्यत्वेकरून चे सर्वस्वी करणे हे श्री. बेन्नूर ह्यांच्या तर्काच्या दृष्टीने खरे म्हणजे आवश्यक वाटत नाही.’
३) राष्ट्रवादी चळवळीत नेते हे आपण आज समजतो त्यापेक्षा जास्त व्यामिश्र दृष्टिकोणाचे, प्रसंगी अंतर्विरोधमय दृष्टिकोण असलेले असतात, होते. ह्याकडे दुर्लक्ष झाले तर आपण फार कायदेशीर वादंगात (legalistic discourse) अडकून पडू. टिळक हिंदुत्वाचे राजकारण करीत होते असे सुचविणे (पृ. ११८, ओळ ५) प्रस्तुत वाचकास मूलतः अनैतिहासिक वाटते. ह्याचा अर्थ पळशीकर किंवा बेन्नूर ह्यांचे दृष्टिकोण सर्वस्वी निरर्थक आहेत असा होत नाही. लखनऊ करारावर सही करणाच्या टिळकांमध्ये कालानुक्रमे संक्रमण होत होते ह्याकडे अशा पद्धतीच्या मांडणीमुळे दुर्लक्ष होते हा खरा मुद्दा आहे. आगरकरांचे मोठेपण मांडण्यासाठी ह्यांची खरेच जरूर होती काय असा प्रस्तुत पत्रलेखकास प्रश्न पडतो. दुसरे लेखाबाहेरचे उदाहरण घ्यायचे झाले तर टिळक राजकारण-समाजकारण करू लागले तेव्हापासून ते सत्यशोधक समाजाने केलेल्या सत्काराला त्यांनी दिलेले उत्तर पाहिले तर जातिव्यवस्थेविषयीसुद्धा ते आपली भूमिका बदलत होते व त्याचा शेवट महर्षी शिंद्यांच्या प्रभावामुळे मला वाटते १९१८ त त्यांनी घेतलेल्या भूमिकेत झाला. हे लक्षात घेतले नाही तर टिळक हे व्यक्तिमत्त्व ऐतिहासिक दृष्टीने समजावून घेतले नाही असा त्याचा अर्थ होईल. असा काहीसा प्रकार ह्या लेखात झाला आहे.
४) श्री. बेन्नूर ह्यांनी टिळकांवर टीका करू नये असा ह्याचा मुळीच अर्थ नाही. फक्त ऐतिहासिक व्यक्तींच्या मूल्यमापनाची काही पथ्ये असतात किंवा असायला हवीत एवढेच प्रस्तुत पत्रलेखकाला सुचवायचे आहे. ह्या दृष्टीनेच वरील आक्षेपांचा श्री. बेन्नूर विचार करतील अशी उमेद आहे.
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
११५, उत्तराखंड,
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी,
नवी दिल्ली – ११० ०६७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.