पत्रव्यवहार

श्री. संपादक,
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या सप्टेंबर ९५ च्या अंकाच्या १८३-८४ पानांवर श्री. प्रभाकर नानावटी ह्यांची खरी स्त्रीमुक्ती कशात आहे ह्याविषयी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्याविषयी माझे मत पुढीलप्रमाणे :
(१) ह्यापुढे पुरुषांनी स्त्रियांना, किंबहुना सर्वांनीच एकमेकांना अधिक मानाने वागवावे, समतेने वागवावे आणि त्यासाठी आवश्यक तो बदल आपापल्या मनात घडवून आणावा अशी गरज आहे असे माझे म्हणणे आहे. त्यासाठी कोणतीही अट स्त्रीपुरुषांनी घालूनये. उदा. स्त्रिया/पुरुष जास्त पैसे मिळवतील तरच आम्ही त्यांना उचित मान देऊ वगैरे. मला जी सामाजिक दर्जाची समता अपेक्षित आहे ती कोणाच्याही धनार्जनयोग्यतेवर अवलंबून नसणारी अशी आहे.
श्री. नानावटी म्हणतात : संपूर्ण आर्थिक शक्ती लाभलेल्या स्त्रियांची संख्या जशी वाढत राहील तशी राजरोसपणे चाललेला पुरुषी अन्याय अत्याचार कमी होण्याची शक्यता आहे. स्त्रियांना आर्थिक शक्ती मिळालीच पाहिजे. त्याबद्दल दुमत नाही. पण त्यांना मान मिळण्याची ती पूर्व-अट नको. त्यांची आर्थिक शक्ती ही त्यांना पुरुषांकडून मिळणार्या् मानाचा परिणाम म्हणून प्राप्त व्हावी. (सारख्या कामासाठी समान वेतन देणे, मालमत्तेत समान हक्क देणे, इत्यादींचाही आर्थिक शक्तीत अन्तर्भाव होतो.)
(२)आपल्याला सर्व समाजघटकांमध्ये (सर्व स्त्रीपुरुष) समानता पाहिजे. समजा, यदाकदाचित, आर्थिक समता आली आणि स्त्रीपुरुषनीती पूर्ववत् राहिली तर मला अभिप्रेत असलेल्या स्वायत्ततेपासून स्त्रिया वंचितच राहतील. काही स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान आणि कोणत्याही स्त्रीबद्दल अफवा उठवून तिला तिच्या न्याय्य स्थानावरून खाली खेचण्याची पुरुषांची शक्ती ह्यांत बदल होणार नाही.
(३) ह्या विषयाच्या संदर्भात श्री. नानावटी ह्यांनी भारतीय स्त्रीजीवन (ले. गीता साने, प्रका. मौज प्रकाशन गृह, मुंबई-४) ह्या पुस्तकामधील ‘स्त्री आणि भारतीय अर्थव्यवस्था हे प्रकरण मुळातून वाचावे अशी त्यांना नम्र शिफारस आहे.
(४)अर्थकारण हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे. आजवरचा आपला अनुभव असा आहे की आम्ही सगळे मिळून संपन्नता मिळवीत नाही. एकेकटे (दुसर्यावचे ओढून) संपन्न होतो, वे जो इतरांचे जास्त ओढतो तो कर्तबगार समजला जाऊन त्याला जास्त मान मिळतो. सर्व स्त्रियांनी जास्त आर्थिक शक्ती प्राप्त करावी असे म्हटल्याबरोबर (आपली आजची मनोरचना बदलू न देता हे घडावयाचे असेल तर) फार मोठी स्पर्धा–चढाओढ – सुरू होईल. तिचे परिणाम समाजस्वास्थ्यावर इष्ट होणार नाहीत. आणि समजा सर्वच स्त्रियांना आर्थिक शक्ती लाभली आणि त्यासोबत आजची आमची जास्त आर्थिक शक्ती म्हणून जास्त मान ही मनोधारणा कायम राहिली तर हा मान, जो सध्या सामाजिक विषमतेमुळे काहींच्या वाट्याला येतो, तो समतेमुळे कोणाच्याच वाट्याला जाणार नाही. स्त्रियांची स्थिती पूर्ववत होईल असे मला वाटते. सर्व स्त्रियांची आर्थिक शक्ती सुधारावयाची तर त्यांना त्यांच्या पूर्वीइतक्याच श्रमांसाठी जास्त मोबदला मिळावयाला पाहिजे. सर्वांना (स्त्रियांना) तेवढ्याच कामासाठी जास्त पगार मिळाला पाहिजे. शिवाय त्यांना नोकर्याोही जास्त मिळाल्या पाहिजेत. त्याचे बाजारपेठेवर काय परिणाम होतील ते तपासावे लागेल. बाजारातला पैसाच नुसता वाढला तर स्त्रियांना त्याचा खरा लाभ होणार नाही. पैशाबरोबर उत्पादन भरमसाठ वाढविले तर पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतील.
आणि तरीसुद्धा मुख्य काय तर उत्पादनाच्या वाट्यावर त्यांचा हक्क मान्य करावाच लागेल. म तरी तेच म्हणतो आहे. उत्पादन कितीही कमी जास्त असो, आपण त्यावरचा एकमेकांचा समान हक्क मान्य करू या.
आपला
बारलिंगे मार्ग, धरमपेठ, नागपूर -४४० ०१०. दिवाकर मोहनी
[खरी स्त्रीमुक्ती कशात आहे ह्या विषयावरील दिवाकर मोहनी ह्यांच्या मूळ लेखाच्या अनुषंगाने ललिता गंडभीर व र. वि. पंडित ह्यांची व इतरही काही पत्रे पूर्वी प्रकाशित झाली आहेत. आज श्रीपाद शं. गलांडे (इंग्लंड) ह्यांचे पत्र संक्षेपाने प्रकाशित करीत आहोत. अशा प्रकाशित पत्रामधले काही व्यक्तिगत उल्लेख गरज वाटली तेथे वगळलेले आहेत, कारण आजचा सुधारकमधील चर्चा ह्या शक्यतो मुद्द्यांना धरून असाव्या, व्यक्तिसापेक्ष नसाव्या असे आमचे धोरण आहे. संपादकांना पत्र लिहिताना वाचकांनी कृपया तेवढे ध्यानात घ्यावे व कोठलाही गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. –संपादक]

संपादक
आजचासुधारक यांस,
आपल्या ऑगस्टच्या अंकात ललिता गंडभीर ह्यांचे ‘अमेरिकेतील वास्तव परिस्थिती ह्या शीर्षकाचे एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यातील काही विधाने सयुक्तिक वाटत नाहीत.
मुख्यतः त्यांच्या दोन वाक्यांवर माझा आक्षेप आहे. ती अशी : पहिले, ‘ह्या मुक्ततेचा फायदा घ्यायला टपलेले अनेक भारतीय (अर्थात् उच्चवर्णीय, विवाहित व अविवाहित) पुरुष मला भेटलेले आहेत. आणि दुसरे, ‘फक्त “लग्नासाठी मात्र व्हर्जिनच हवी” असेही ते म्हणतात.
श्रीमती गंडभीर ह्यांचे हे निरीक्षण फक्त भारतीय पुरुषांनाच लागू होत नाही. पाश्चात्त्य देशांत दोन सज्ञान व्यक्तींत स्वखुशीने असा व्यवहार झाला तर त्यात विशेष काही मानले जात नाही. (ह्याचा अर्थ असा नव्हे की हरेक जोडप्यात व दरवेळी असे व्यवहार नियमाने होतात.) ज्यांच्यात असे विवाहबाह्य लैंगिक व्यवहार होतात ते कधी दोघे अविवाहित, दोघे दुसर्यां्शी विवाहित, कधी एक जण विवाहित, घटस्फोटित, विभक्त, इतकेच नव्हे तर निरनिराळ्या वयाचे असू शकतात. त्याचप्रमाणे अनेकांस दुसर्याफ पक्षाची कौटुंबिक परिस्थिती, जबाबदार्या. ह्यांची पूर्ण माहिती असलेले असे असतात. अशा सबगोलंकार परिस्थितीत कोण कोणाच्या ‘लूज मॉरल्स चा फायदा घेतो हे कोणी कसे ठरवावयाचे? डॉ. गंडभीरांनी कोणत्या कसोट्या लावून भारतीय पुरुषांनाच तेवढे वेगळे निवडले? (कांचनघाणेकरांच्या ‘नाथ हा माझा ह्या पुस्तकात डॉ. काशिनाथ घाणेकरांचा किती विवाहित वे अविवाहित स्त्रियांशी संबंध आला याची जंत्रीच पाहावयाला मिळते. महाराष्ट्रातच वनमाला व आचार्य अत्रे, आनंदीबाई विजापुरे व श्री. बेहेरे अशी पुष्कळ उदाहरणे मिळतात. स्त्रीचाच महिमा पाहावयाचा असेल तर लीला चिटणवीसांचे चंदेरी दुनियेत हे पुस्तक पाहावे).
आता ‘व्हर्जिन’ बाबत. त्याविषयीचा पुरुषांचा आग्रह स्त्री ही कोरी करकरीत वा अननुभवी हवी यापेक्षा दुसर्या’ कोणाकडून ‘बीजारोपण झालेली नसावी ह्यासाठी असावा असे मला पुरुष ह्या नात्याने वाटते.
एक जोडीदार असताना दुसरीकडे लागाबांधा जोडू इच्छिणारे पुरुष आहेत, तशा स्त्रियाही आहेत, आणि तेही भारतात. भले त्यांचे प्रमाण कमी जास्त असेल. पण पुरुषांनी केला तर तो ‘स्वैराचार, व स्त्री करते ते लैंगिक स्वातंत्र्य असे तर ललिताबाई समजत नाहीत?
लैंगिक व्यवहारात मर्यादोल्लंघन झाले तर (ते स्त्रीकडून की पुरुषाकडून ही सर्वस्वी गौण बाब आहे) एड्स् पसरण्याचा संभव उत्पन्न होतो.
डॉ. गंडभीरांच्या समजुतीप्रमाणे भारतात फक्त पुरुषांनाच लैंगिक स्वातंत्र्य आहे. स्वैराचार करणारे सगळे पुरुषच. पुरुषांनी मर्यादा पाळल्या नाहीत म्हणून भारतात एड्स् वणव्यासारखा पसरला. तेव्हा स्त्रियांचीही लैंगिक मुक्ती झाली तर त्यांना आनंदच आहे. आणि स्त्रियांचे आणि समाजाचे भलेच होणार आहे. येथे मी माझा पराभव प्रांजळपणे कबूल करतो. डॉक्टर गंडभीरांचे हे (अजब) तर्कशास्त्र माझ्या डोक्यावरून जाते.
आता स्त्रीपुरुष व त्यांचे लैंगिक संबंध’ ह्या विषयावर माझे मत माझ्या शब्दांत व थोडक्यात येथे मांडतो. (एक गोष्ट मला येथे स्पष्ट करावयाला हवी की मी कोणत्याही विषयातला तज्ज्ञ नाही.)
मुलामुलींची शिक्षणे वाढत चालली आहेत, त्यामुळे अर्थार्जन व अर्थातच लग्ने लांबत चालली आहेत. एकीकडे विवाहपूर्व एकटेपण जितके सह्य असते तितके विवाहोत्तर एकटेपण नसते व दुसरीकडे विवाहानंतर राहावयास जागा मिळण्याची पंचाईत, शिवाय ती सर्वांना परवडू शकत नाही.
शारीरिक वा लैंगिक भूक ही एका विशिष्ट वयोमर्यादित (ही वयोमर्यादा निरनिराळ्या व्यक्तींत थोडीफार मागेपुढे होणे स्वाभाविक आहे) अन्नवस्त्रनिवार्यााइतकीचआवश्यक बाब आहे. बहुसंख्य जोडपी आपापल्या साथीदारासोबत (लग्नाच्या किंवा बिनलग्नाच्या) लैंगिक बाबतींत सुखी असतात. पण जी असमाधानी असतात त्यांचे काय? दोघांपैकी एकाची तक्रार नाही, पण दुसरा असंतुष्ट असतो. त्यांचे काय?
नोकरीव्यवसायानिमित्त वा अन्य काही कारणांमुळे असंख्य स्त्रीपुरुष दररोज आठदहा तास एकमेकांच्या निकट सहवासात येतात. संयम, मनावर ताबा वगैरे सदुपदेश पुराणांतल्या वांग्याप्रमाणे पुराणातच राहतो. हे सांप्रतच्या यथार्थ वस्तुस्थितीचे वास्तवदर्शन आहे. कायदेकानू करून वा अन्य मार्गांनी दडपण/बळजबरी ह्यांचा वापर करून ही लाट थोपवणे शक्य नाही, त्रिवार शक्य नाही. तर मग ह्यावर तोडगा काय?
माझ्या अल्पमतीप्रमाणे सशास्त्र लैंगिक शिक्षण, संततिनियमनाचे शास्त्रोक्त ज्ञान, तसेच लैंगिक रोग, ‘एडस् ह्यांची यथार्थ माहिती, जोडीदाराच्या काय काय अपेक्षा असू शकतात व त्या कशा पूर्ण कराव्या इत्यादींची संपूर्ण साधकबाधक माहिती राजरोसपणे तरुण-तरुणींना (१८ ते २० वयापर्यंत) उपलब्ध करून देणे हाच एकमेव मार्ग होय.
काळ बदलत आहे. मागील शतकात आण्णासाहेब कव्र्यांनाच नव्हे तर ह्या शतकात नानासाहेब गोयांनाही विधवाविवाह केल्याबद्दल नातेवाईकांचा व समाजाचा रोष पत्करावा लागला हे जसे खरे आहे तसेच व त्याच पुण्यात आज सापत्य विधवांची, सापत्य घटस्फोटितांची इतकेच नव्हे तर कुमारी मातांचीही लग्ने होत आहेत हेही खरे आहे. सांगण्याचा मुद्दा येवढाच की काळाप्रमाणे समाज बदलतो. तो भविष्यकाळीहि बदलत राहणार. हे चक्र कोणीही थांबवू शकणार नाही हे खरे असले तरी एक गोष्ट खचितच आपल्या हातांत आहे. ती म्हणजे योग्य दिशा दाखविणे, मार्गदर्शन करणे.
4 Aldridge Court, Medway आपला
High Wycombe, Bucks, U. K. श्रीपाद शं. गलांडे

आजचा सुधारक, यांस
प्रा. ह. चं. घोंगे यांचा लेख वाचण्यात आला. (‘आजचा सुधारकं सप्टेंबर १९९५). मजविषयीचे भाष्य वाचले. मौनं संमतिदर्शकम् असा वाचकांचा ग्रह होऊ नये म्हणूनच थोडेसे लिहितो.
डॉ. व्हाईन, लेडबीटर, पॉल ब्रेटन “ही माणसे सत्य सांगतात हे समाजायचे कसे? हे गूढवादी लेखक धूर्त कोल्ह्याप्रमाणे आहेत”; डॉ. आर. के. सिन्हा आणि प्रा. पी. पाल यांनी दिलेली माहिती खरी आहे हे तरी कशावरून? सतीनाथ चट्टोपाध्यायांच्या आत्मवृत्तात प्रगट झालेले हे सारे नाटकी आविष्कार असावेत, इत्यादि वाक्ये वाचून माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला की (१) उत्तरा ही प्रा. घोंगे याची विद्यार्थिनी असता (कोणत्या साली?) तिला बंगाली येत नसे, (२) पुढे तिने बंगाली भाषा, बंगाली-संस्कृती, आचार विचार, यांवर : कौतुकास्पद प्रभुत्व मिळविले. उत्तरेची हीच एकमेव प्रशसनीय उपलब्धी आहे. उपबोधावस्थेत असणारी शारदा नावाची नायिका कधी जाणीवपूर्वक,” कधी उपनेणिवेद्वारा उत्तर प्रगट करीत असे” ही घोंगे यांची विधाने सत्य आहेत हे तरी कसे समजावे? (३) “गुरुचरित्राचे पारायण करीत असतानाच्या काळात अभंगासारखी काव्ये स्फुरायची” हे खरेकशावरून? त्यांचा शब्द हेच प्रमाण मानावयाचे की काय? (४) “जो उत्तरेवर जीव टाकतो तो तिला नकोसा असतो” या विधानाबाबतही हाच प्रश्न!
‘उत्तरा – शारदा’ हा प्रकार १९७४ मध्ये नागपूर टाइम्स वगैरे वृत्तपत्रांतून प्रसिद्धी पावला. प्रा. घोंगे त्यावेळी नागपूर महाविद्यालयात होते. कृष्णशास्त्री घोंगे स्वतःचे कोण लागतात याचा शोध घेण्याचे श्रम त्यांनी घेतले आहेत. त्यांनी सिव्हिल लाईन्स मध्ये जाऊन डॉ. आर. के. सिन्हांनी स्वतः बरद्वान ते कलकत्ता केलेल्या प्रवासाचा टंकलिखित वृत्तांत व त्याचा वृत्तपत्रीय अहवाल पाहण्याचे कष्ट का घेतले नाहीत? कलकत्त्यास जाऊन सतीनाथ चट्टोपाध्याय यांच्या कागदपत्रात असलेली चट्टोपाध्याय-वंशावळ प्रत्यक्ष पाहून येण्याचे प्रयत्न का केले नाहीत?
उत्तरा हुद्दार ही तर प्रा. घोंगे यांची त्यांना अधिक जवळची अशी, बुद्धिमान आणि आकर्षक” विद्यार्थिनी. १९७४ साली तिचे पिताश्री बाळाजी व तिच्या मातुःश्री ही नागपुरास हयात होते. उत्तरेच्या ‘शारदावस्थेचे स्वरूप निश्चित करण्याचे, तसेच बालाजींना भेटण्याचे माफक कष्ट घेण्याऐवजी प्रा. घोंगे यांनी आता, एकवीस वर्षांनंतर, स्वतःचे तर्क प्रसिद्ध केले आहेत की, (१) उत्तरेचे वडील बाळाजी यांनी बंगालमधे आश्रय घेतला असावा, (२) त्यांच्या संवादातून उत्तरेला शारदेची ओळख झाली असावी, (३) शारदेच्या परिवाराचा इतिहासही, किंवा शारदेच्या नात्यातील एखाद्या व्यक्तीचे चित्र उत्तरेच्या वाचनात आले असावे, (४)
शारदा ही बंगाली कथेतील नायिका असू शकते.”
वस्तुतः, शारदेने सांगितलेल्या स्वतःच्या नातलगांची नावे शरच्चंद्र चट्टोपाध्यायांच्या कथा – कादंबर्यां त नसल्याची ग्वाही बंगाली साहित्याशी दाट परिचय असणार्यांानी दिलेली आहे.
अखेरचा प्रश्न : उत्तरेविषयी व तिच्या शारदावस्थेविषयी लिहून झाल्यावर, लौकिकातील उत्तरा हुद्दारशी या संपूर्ण लेखाचा दूरान्वयाने संबंध लावू नये” असे कंसात लिहून प्रा. घोंगे यांनी स्वबचावाचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. उत्तरा “अतिशय स्पष्टवक्ती” आहे या गोष्टीची भीती वाटून प्रा. घोंगे यांनी हे कंसकवच धारण केले असावेकाय?
व. वि. अकोलकर
स्वरमाला’, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे – ४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.