पत्रव्यवहार

आजच्या सुधारकच्या ऑक्टोबर १९९५ च्या अंकात श्री. घनश्याम कमलाकर वाईकर यांचे पत्र वाचले. त्यातील विचार सर्वसाधारणपणे योग्य आहेत. मला तर असे वाटते की बुद्धिवादी आजचा सुधारक मध्ये कोणत्याही धर्मावर कोणत्याही कारणाने ठाम श्रद्धा ठेवणाच्या व्यक्तीचे अवतरण मुखपृष्ठावर किंवा मलपृष्ठावर, व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व मान्य करूनही, एक तत्त्व म्हणून प्रसिद्ध केले जाऊ नये.
मात्र ‘मग बाई ह्या ख्रिस्ती स्मारकात चोर दरवाजाने कशा शिरल्या?’ असा प्रश्न विचारणे हे पंडिता रमाबाईंवर अन्याय करणारे आहे असे मला वाटते. कारण मुळात एका धर्माने केलेल्या अन्यायाचे निराकरण दुसर्यार धर्मात जाऊन म्हणजे धर्मांतर करून होते हा विचारच अपुरा ठरतो आहे. धर्मातरामुळे कोणतेही सामाजिक वा सांस्कृतिक प्रश्न न सुटता ते गुंतागुंतीचे होतात. पण तरीही त्या काळात बाबा पदमनजी, कवी ना. वा. टिळकयांच्यासारख्या व्यक्तींनीही ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता. हिंदू धर्माच्या पंडिता असूनही रमाबाईंनी जे दुःख सहन केले ते त्यांच्या संवेदनशील मनाला असह्य होऊन विशिष्ट अगतिक अवस्थेत येशू ख्रिस्ताच्या करुणेच्या संदेशाचा आधार वाटून त्यांनी धर्मांतर केले असले तर ते प्रतिक्रियात्मक कृत्य होते हे समजून घेतले पाहिजे.
त्यामुळेच हिंदू धर्माच्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाच्या बाईंना जाणवणाच्या विसंगतीवर त्या जशा तर्ककठोर होऊन हल्ला करू शकल्या तशाच पद्धतीने ख्रिश्चन धर्म-तत्त्वज्ञानाची परखड टीका त्या करू शकत नव्हत्या. ती त्यांची मर्यादा होती.
खरे तर सर्व धर्म कर्मठपणा, अंधश्रद्धा, मूलतत्त्ववाद, कर्मकांड इ.ना नेहमी संरक्षण देत आले आहेत. धर्मचिकित्सा करू पाहणारे पंडित जे निकष दुसर्याव धर्मावर टीका करताना लावतात तेच निकष स्वतःच्या धर्माला लावून स्व-धर्म-चिकित्सा करण्याची सहसा त्यांची मानसिक तयारी नसते. म्हणून समाजसुधारणेसाठी धर्मातराचा उपाय होऊच शकत नाही असे मला वाटते.
विद्यानगर, कराड अ. श्री. भडकमकर
संपादक, आजचा सुधारक
यांस,
नोव्हेंबर ९५ च्या आजचा सुधारक मधील आपला ‘कारण आणि reason’ हा लेख वाचला. त्यासंबंधी थोडेसे –
मराठीत ‘कारण’ हा शब्द काही ठिकाणी ’cause’ या अर्थाने वापरला जातो, काही ठिकाणी ‘reason’ याअर्थाने वापरला जातो हे बरोबर आहे. परंतु कारण’ हा शब्द ‘because या अर्थानेही वापरला जातो. आपण जी दोन उदाहरणे दिलेली आहेत (आजचा सुधारक, नोव्हेंबर १९९५, पृ. २५३), त्यांमध्ये ‘कारण’ हा शब्द ‘because’ या अर्थी वापरलेला आहे. | मराठीतील ‘कारण’ या शब्दाप्रमाणेच इंग्रजीतील ‘because’ हाही शब्द ढ्यर्थीच .
आहे. आपण दिलेल्याच उदाहरणांचे भाषांतर पुढीलप्रमाणे होईल –
(१) A died, because he was bitten by a snake; and he was bitten by a snake, therefore he died.
(२) Socrates is mortal, because he is a man, and all men are mortal; and Socrates is a man and all men are mortal, therefore Socrates is mortal.
माझा मुद्दा असा की ‘कारणकार्यसंबंध आणि (तार्किक) ‘आधारआधेयसंबंध हे अगदी भिन्न संबंध असून देखील ते व्यक्त करण्यासाठी इंग्रजीतसुद्धा ‘because’ ह्या द्वयर्थी शब्दाचा प्रयोग केला जातो. “Therefore’ या शब्दाचेही तसेच. तेव्हा या संदर्भात इंग्रजीला आपण जे दोषमुक्त केले आहे ते अयोग्य नाही काय?
माझ्या माहितीतील सर्वच भाषांमध्ये हा संदिग्धपणा आहे, आणि इंग्रजी त्याला अपवाद नाही.
‘To be a cause of’हा घटनांमधील संबंध आणि ‘to be a reason of हा विधानांमधील संबंध या दोहोंत काही तरी समान असले पाहिजे (असे नसते तर या दोन्ही अर्थांनी एकच शब्दप्रयोग रूढ झाला नसता). ते शोधून काढणे हे विश्लेषक तत्त्वज्ञानाचे काम आहे.
याबाबत मला एक उपपत्ती सुचते ती पुढे मांडतो (ती बरोबरच आहे असा अजिबात दावा नाही).
“Cause असणे’ आणि ‘reason असणे या दोन्ही संबंधांमध्ये ‘अनुमानक्षमता असते. म्हणजे असे की ‘साप चावला’ या घटनेवरून मृत्यू येईल असे अनुमान करता येते, त्याचप्रमाणे ‘सॉक्रेटिस मनुष्य आहे आणि सर्व माणसे मर्त्य आहेत याआधारविधानांवरूनसुद्धा ‘सॉक्रेटिस मर्त्य आहे असे अनुमान करता येते.
पण मग ‘अनुमान’ (आणि इंग्रजीतील inference’ देखील) हाही शब्द द्वयर्थीच मानला पाहिजे- अनुमान म्हणजे (१) कारणांवरून कार्याचा अंदाज (किंवा कार्यावरून कारणाचा), आणि (२) आधारविधानांवरून निष्कर्ष विधानाचा अंदाज (किंवा निष्कर्ष विधानावरून आधारविधानांचा अंदाज).
(‘अंदाज’ हा शब्द पुरेसा अर्थवाही नाही, किंबहुना, गैरसमज उत्पन्न करू शकणारा आहे याची मला जाणीव आहे. पण दुसरा योग्य शब्द न सुचल्यामुळे नाइलाजाने तो वापरला आहे.)
सुधाकर देशपांडे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.