पत्रव्यवहार

संपादक,
आजचा सुधारक नागपूर
श्री. दिवाकर मोहनी यांनी “कुटुंब’ या शीर्षकाच्या ३ लेखांमध्ये प्रामुख्याने समाजातील कुटुंबरचनेच्या उणीवांचा ऊहापोह करून, कौटुंबिक स्वार्थामुळे समाजाचे अहित होते असा सिद्धांत मांडला आहे, व तो मांडण्यापूर्वी त्यांनी बराच सूक्ष्म मूलभूत मानवीय धारणांचा विचार केल्याचे स्पष्ट जाणवते. कुटुंबाची संकल्पना व कुटुंबातील व्यक्तींच्या स्वार्थावरच कुटुंबाची प्रगती व उत्थान अवलंबून असते या हल्लीच्या सर्वमान्य विचारसरणीमुळे समाजाच्या समस्या अधिक बिकट होतात व त्यांचा अंत होण्याचा सुतराम
संभव नाही असे ते सुचवितात.
या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी सामाजिक रचनेत-विशेषतः समाजाच्या कुटुंबाधारित विभागात – आमूलाग्र बदल केल्याखेरीज तरणोपाय नाही असा त्यांना विश्वास आहे. त्यांच्या प्रस्तावित योजनेनुसार कुटुंब हे हल्लीच्या रक्ताच्या आणि वैवाहिकसंबंधावर आधारित घटकांचे असण्याऐवजी व्यापक असावे व त्यात रक्ताच्या तसेच वैवाहिकसंबंध बंधनाखेरीज अन्य व्यक्ति समाविष्ट असाव्यात व अशा बृहत् कुटुंबातीलघटकांचे परस्परसंबंध अधिक मुक्त असावेत. या कुटुंबांनी कौटुंबिक स्वार्थापेक्षाही सामाजिक (community साठी त्यांनी बिरादरी हा शब्द योजला आहे. Community चा अर्थ देश परत्वे वेगवेगळा आहे. प्रस्तुत संदर्भात “गावगल्ली” ही संज्ञा अधिक समर्पक वाटते) हिताचे अधिक भान ठेवावे, नव्हे तसे ते राहीलच, असे श्री. मोहनींना वाटते. या विचार सरणीसंबंधी काही मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात.
(१) श्री. मोहनी सुचवितात तशी बृहत् कुटुंबे अथवा गावगल्ली समूह ग्रामीण भारतात पूर्वापार अस्तित्वात आहेत. भारतातील असंख्य खेडी आजही एका विशिष्ट जातीच्या व परस्परांशी दूरच्या नात्यांनी जोडलेल्या लोकांची आहेत. मराठवाड्यात काय, खानदेशात काय अथवा आंध्रात काय, अनेक खेड्यात एकाच आडनावाची लोकसंख्या असते व या लोकसंख्येतील केवळ लैंगिक आचार वगळता (त्या बाबतीतही कमी अधिक सूट आढळते) इतर सर्व व्यवहार सार्वत्रिक असतात. म्हणजेच मोहनीप्रणीत सामाजिक व्यवस्था भारतात कित्येक ठिकाणी आढळते. याविषयी अधिक निरीक्षण करणे योग्य होईल.
(२) साम्यवादी राष्ट्रात – विशेषतः जुन्या सोविएट युनियन्स मध्ये – कॉम्यून व्यवस्था राबविण्याचा प्रयत्न कित्येक दशके करण्यात आला, परंतु तो सफल झाला असे म्हणता येत नाही. रशियातील साम्यवादी राज्यव्यवस्था कोलमडल्या बरोबर कॉम्यून्सचीही वाताहत झाली व सर्व कॉम्यून्सचे विघटन होऊन आता रशियात पुन्हा मालकीहक्क व कौटुंबिक “स्वार्थांवर आधारित कुटुंबे प्रस्थापित होत आहेत.
(३) केवळ इस्रायलमध्ये अजूनही ग्रामीण समाजरचनेत “किबुत्झ” व्यवस्था अस्तित्वात असून त्यांचे छान चालले आहे. श्री. मोहनींच्या संकल्पनेसारखे, या किबुत्झमध्ये मोठमोठे समूह, खेडी (settlements) वसवितात व तेथील सर्व व्यवहार सामाईक स्वरूपाचे असतात. सर्व व्यक्ति एकत्र खातात, पितात, मुलांचे संगोपन व शिक्षण सामाजिक स्तरावर होते. तसेच किबुत्झचे उत्पादक व्यवसाय व नागरी संरक्षण हे सुद्धा सार्वजनिक स्वरूपाचे असते. या किबुत्झमध्ये लैंगिक व्यवहार मात्र मुक्त नसून त्यावर वैवाहिक संबंधांचे बंधन ठोकळमानाने असते असे म्हणता येईल. परंतु याविषयी अधिक सखोल माहिती मिळविता येईल. श्री. मोहनींना अभिप्रेत असलेल्या “गावगल्ली” गटाचेच हे किबुत्झनामक स्वरूप पूर्वापार अस्तित्वात आहेच असे म्हणता येईल.
हे सगळे असले तरी, मानवी स्वभाव व नैसर्गिक प्रेरणा ह्या व्यक्तींच्या स्वयंभूपणालाच पोषक असतात हे नाकारून चालणार नाही. वैयक्तिक लाभ व वैयक्तिक प्रगतीची ईर्षा असल्याशिवाय, केवळ गटाच्या अथवा समूहाच्या भल्यासाठी व्यक्ती पुरेशा समर्पण भावनेने काम करीत नाहीत हेही मान्य करावयास हवे. पुरेसे प्रोत्साहन (incentive) असल्याखेरीज बृहत् समाजगटातील व्यक्तींची कर्तव्यभावना (commitment) पुरेशी पडत नाही हे कॉम्यून्सच्या अपयशामुळे सिद्ध झालेलेच आहे. त्यामुळे श्री. मोहनी म्हणतात तसाखाजगी मालकीहक्क विरहित आणि “सारे सर्वांचे किंवा सारे एकमेकांचे” असे मानणारा समाज हे एक दिवास्वप्नच ठरेल. (येथे गांधीजींच्या सेवाग्रामचे स्मरण होते!)
सामाजिक भल्यासाठी आणि प्रगतीसाठी याहून प्रभावी उपाय म्हणजे अधिक चांगले लोकशिक्षण व समाजामध्ये अपमार्गानी “प्रगती” साधणाच्या कुटुंबांचा सामाजिक बहिष्कार हे होत! तसेच समाजात सामाजिक हितरक्षक गट (GoodSamaritans) स्थापन । करून त्यांनी सतत दक्ष राहणे हे सुद्धा हिताचे व उपयुक्त ठरेल.
र. वि. पंडित
‘तेजस्’, १४६ पावनभूमीलेआऊट, वर्धा मार्गाजवळ, सोमलवाडा, नागपूर १५
—————————
संपादक
आजचा सुधारक
आपल्या मासिकाच्या डिसेंबर १९९५ मधील “हिन्दुत्व-अन्वेषण-उत्तरार्ध” या लेखातील काही विधानांबद्दल माझे आक्षेप पाठवीत आहे. हे आक्षेप त्यांच्या प्रतिपाद्य विषयाबद्दल नसून त्यात जे ऐतिहासिक उल्लेख आले आहेत त्यांचेबद्दल आहेत.
१.(पृ. २८५ परि. १) (अधोरेखांकन माझे) “पुष्यमित्र शुंगाने लक्षावधि बौद्धांची कत्तल केली. बुद्धमूर्तीना शेंदराची पुटे चढवूनत्यांचा मारुती करून टाकला.”
पुष्यमित्र शुंग हा वैदिक धर्माभिमानी राजा होता. तो अतिशय पराक्रमी होता. अयोध्येच्या शिलालेखात त्याने दोन अश्वमेध यज्ञ केले असा उल्लेख केलेला आढळतो.
त्याच्या कारकीर्दीत (इ.स. पूर्व १७५ मध्ये) ग्रीक राजा डिमिटूिअस ह्याने भारतावर स्वारी केली होती पण पुष्यमित्राचा नातू वसुमित्र याने सिंधु नदीच्या तीरावर ग्रीकांचा पराभव केला. ह्या विजयानंतर पुष्यमित्राच्या अश्वमेध यज्ञाची सांगता झाली.
बौद्ध वाङ्मयामध्ये पुष्यमित्राने बौद्ध भिक्षुचा छळ केला असा उल्लेख केला आहे, पण त्या मताच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा मिळत नाही, आणि बौद्ध मूर्तीना शेंदराची पुटे चढवून त्यांचा मारुती करून टाकला असे म्हटले नाही.
आणि त्याकाळी (इ.स. पूर्व २ रे शतक) शेंदराची पुटे चढवून केलेली मारुतीची मंदिरे होती का?
२, (पृ. २८७, परि. १)
शैव वैष्णवांनी एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ केली, एकमेकांची मंदिरे फोडली.”
शैव वैष्णवांचे परस्परांशी पटत नव्हते हे खरे, पण त्यांनी परस्परांची मंदिरे फोडली याला पुरावा काय?
३. (पृ. २८५, परि. १)
“बंगाली जनतेवर भोसल्यांनी केलेल्या अत्याचाराच्या कथा इतिहासात शोधून काढता येतात. बंगाली जनतेवर भोसल्यांनी केलेले अत्याचार अगदी अलिकडच्या काळातील आहेत.”
रघुजीच्या बंगालवरील स्वान्या इ. स. १७४२ पासून ते इ. स. १७५१ पर्यन्त चालू होत्या. त्यांचा उद्देश राज्यविस्तार हा होता. मराठ्यांनी ह्या स्वाध्या बंगालचा सुभेदार अलिवर्दीखान याच्या विरुद्ध केल्या. या स्वान्यांस रघुजीस उद्युक्त करण्यास ओरिसाचा पूर्वीचा नायब मुर्सिदकुलीखान याचा इमानी सरदार मीर हबीब हा कारणीभूत होता. कारण त्याला अलिवर्दीखानावर सूड घ्यायचा होता. बंगालवरील तिसर्याण स्वारीत इ. स. १७४४ मध्ये अलिवर्दीखानाने कपटाने मराठे सरदारांना बोलावून त्यांना कापून काढले. यांत मराठ्यांचे वीस सरदार कामास आले. त्यांत रघुजीचा प्रसिद्ध सरदार भास्करपंत हा देखील होता.
या बंगालवरील स्वान्यांच्या कालातच रघुजीच्या सरदारांनी १७४५ च्या सुमारास छत्तीसगड प्रांतही काबीज केला.
अखेरीस रघुजीने अलिवर्दीखानास १७५१ मध्ये तह करण्यास भाग पाडले. त्याप्रमाणे ओरिसा प्रांत मराठ्यांस देण्यात आला व बिहार आणि बंगाल प्रांताची चौथाई प्रतिवर्षास १७ लाख रु. देण्याचे कबूल करण्यात आले.
रघुजीच्या बंगालवरील स्वाध्या हा एक दीर्घकाळ चाललेला अटीतटीच्या युद्धाचा भाग होता. तो केवळ लुटालुटीचा प्रकार नव्हता. या काळात छत्तीसगड व ओरिसा हे दोन प्रांत भोसल्यांच्या प्रदेशात समाविष्ट झाले. ओरिसा प्रांत हा भोसल्यांकडे १८०३ साली झालेल्या देवगावचे तहाप्रमाणे तो इंग्रजांना द्यावा लागला.
मराठ्यांच्या अत्याचारांच्या कथा शोधावयाच्याच असल्यास महाराष्ट्रपुराण सारख्या पुराणात त्या सापडतील. पण त्यामुळे रघुजीसारख्या पुरुषाचे कार्यावर बोळा फिरविता येणार नाही.
४. (पृ. २८५, परि. १)
“१७७५ मध्ये हरिपंत फडक्यांच्या सैन्याने शृंगेरीचा मठ लुटला. या लुटीत बायांचीअबू गेली, ब्राह्मणांची कत्तल झाली.”
बायांची अब्रू गेली व ब्राह्मणांची कत्तल झाली याबद्दल मराठी लावणीत” किंवा इतरत्र काही ऐतिहासिक पुरावा असल्यास तो अवश्य द्यावा.
५. (पृ. २८५, परि. १)
“मठ लुटले याचे दुःख नाही कारण मठातील अमाप धन आचार्यांनी सर्वसामान्यांची पिळवणूक करूनच संगृहीत केले होते.”
त्याचवेळी काय पण आजही कोणत्याही धर्मपीठाला सर्वसामान्यांची पिळवणूक करून धन मिळविण्याची आवश्यकता नाही याचे कारण भारतीय समाजाच्या मनोधारणेतआहे.
त्यावेळी उत्पन्नासाठी शंकराचार्यांना वर्षासने असत, आणि शिवाय कोणाचीही पिळवणूक करण्यास शंकराचार्य म्हणजे कोणी सरंजामी सरदार नव्हते, आणि त्यांना अमाप
धनाची गरजही नव्हती. ।
६. (पृ. २८६, परि. ३)
चंद्रकोरीचे प्रतीक म्हणून शिंगांची शिरस्त्राणे आदिवासींनी वापरलीत….तात्पर्य हेच की हिन्दुधर्म म्हणजे चंद्रपूजकांचा धर्म आणि हाच धर्म सिंधूच्या खोर्याततील टोळ्यांचा
धर्म असावा; कारण सिंधु संस्कृतीच्या उत्खननातून तिथे ज्या पवित्र मूर्तीचे ठसे आढळले * त्या मूर्ति शृंगधारी असून…”
७. (पृ. २८७, परि. १) हिन्दु कोण नाहीत याचे उत्तर वैष्णव. कारण वैष्णवांची परंपरा सूर्यपरंपरा आहे…”
आता वरील ६ व ७ मधील विधानाचे संदर्भात सिंधूच्या खोर्याोतील केवळ तिथे सापडलेल्या शिक्क्यांकडे (अगदी थोडक्यात) आपण पाहू.
सिंधु संस्कृती ही सिंधूच्या खोर्याकत इ. स. पूर्व २५०० ते १५०० च्या दरम्यान अस्तित्वात होती. ती टोळ्यांची संस्कृती नसून ती इजिप्त, मेसोपोटेमिया येथील संस्कृतीशी तुल्यबळ होती. हरप्पा आणि मोहेंजोदारो ही त्यातील महत्त्वाची शहरे होती व त्या दोन्ही नावाने ती ओळखली जाते.
पैकी उत्खननात मोहेंजोदारो येथेच १२०० शिक्के आढळले. सिन्धु संस्कृतीचा संबंध मेसोपोटेमियाशी होता. तेथील ऊर, किश, सुस्त, लागश, उम्मर, तेल असमर इ. ठिकाणी सिन्धु शिक्के आढले. काही इराणच्या आखातातील बेटांत आढळले. आज साधारणतः २५०० शिक्के उपलब्ध आहेत.
शिक्यांवर विविध प्रकारची प्राण्यांची चित्रे खोदलेली आढळतात आणि खुणांच्या साह्याने काही लिहिलेले आढळते. या प्राण्यांबरोबरच काही मानवी प्राणी व काही अमानुष प्राणीही आढळतात.
प्राण्यांमधील लोकप्रिय आकृती म्हणजे बैलाप्रमाणे दिसणारा एकशिंगी प्राणी. याला यूनिकॉर्न (unicorn) हे नाव आहे. या यूनिकॉर्नसमोर एका स्टुलावर एक पिंजर्याकसारखे भांडे ठेवलेले नेहमी आढळते. दुसर्याा एका शिक्क्यावर एका यूनिकॉर्नची मिरवणूक काढलेली दाखविली आहे.
नेहमी आढळणारा प्राणी म्हणजे खांदा असलेला बैल. एका चित्रात एकशिंगी गेंडाव त्याचेसमोर ते सुप्रसिद्ध भांडे आहे. वाघाच्याही समोर ते आहेच. एका चित्रांत हत्ती त्या भांड्यातून खात असलेला दाखविला आहे. मासे खाणारी सुसर अनेक शिक्क्यांवर आढळते. एका शिक्क्यावर गरुड असून त्याच्या दोन्ही पंखांवर साप आहेत.
याशिवाय काही शिक्क्यांवर मानव व प्राणी मिळून झालेले संयुक्त प्राणी आहेत. एका अमानुष प्राण्याला मानवी तोंड असून हत्तीचे सुळे व पाठ आहे, बैलाची शिंगे आहेत, मागचा भाग वाघाचा आहे व शेपटी उभी आहे. याशिवाय अनेक विचित्र प्राणी म्हणजे एकापेक्षा अनेक डोक्यांचे यूनिकॉर्न, गवा, हरिण व वाघ. हे सर्व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे असावेत.
यापैकी तीन शिक्क्यांवर जी देवता दिसते तिला दोन शिक्क्यांवर तीन तोंडे दाखविली आहेत. तिला शिंगाचा मुकुट आहे. तिच्या हातात मनगटापासून खांद्यापर्यन्त बांगड्या आहेत. तिने पद्मासन घातले आहे. एका शिक्क्यावर तिच्याभोवती हत्ती, वाघ, गेंडा व रेडा हे प्राणी दाखविले आहेत. सिंहासनाखाली काळवीट दाखविले आहे. निश्चितच शंकराचे हे मूळ स्वरूप असावे.
एका चित्रांत झाडावर फांद्याप्रमाणे दोन यूनिकॉर्नची डोकी आहेत. एका शिक्क्यावर एका रेड्यापुढे सहा मानवांनी साष्टांग नमस्कार घातला आहे. इथे प्राणिपूजा स्पष्ट दिसते.
याशिवाय अनेक चित्रे आहेत. पण एवढेच पुरे.
या शिक्क्यांवरील लिपी अजून वाचली न गेल्यामुळे सिंधुसंस्कृतीचे गूढ अजून कायम आहे.
पण वरील चित्राच्या वर्णनावरून एवढे निश्चितच दिसून येते की सिंधुसंस्कृतीतील धर्म चंद्रपूजकांचा नव्हे. उलट इथे यज्ञकुंडासारखी काही कुंडे आढळली.यावरून इथे अग्निपूजा प्रचलित असावी असे दिसते.
शिवाय स्वस्तिक व चक्र यांच्या आकृत्या बर्यााच शिक्क्यांवर दिसून येतात. याचा संबंध सूर्यपूजेशी असणे शक्य आहे.
आणि शृंगधारी असणे म्हणजे तिचा संबंध चंद्रपूजेशी असला पाहिजे असेही काही नाही याचे उदाहरण म्हणजे –
सिंधु संस्कृतीशी समकालीन असलेली एक संस्कृती भूमध्यसमुद्रात क्रीट बेटात होती. (इ. स. पूर्व २५०० ते १५००) या संस्कृतीला मिनोअन (Minoan) संस्कृती असे म्हणतात. यातील अनेक देवतांना शिंगे आढळून येतात. मिनोअन संस्कृतीचे नाव मिनॉस (Minos) या राजाच्या नावापासून आले. त्याने सूर्याची मुलगी पॅसिफे (Pasiphae) इचेशी लग्न केले. या पॅसिफेला एका वृषभापासून अर्धा मनुष्य व अर्धा वृषभ असा राक्षसी मुलगा झाला. त्याचे नाव माइनोटॉर (Minotaur). त्याला दोन शिंगे असून बैलाची शेपटी होती. अखेर त्याला थीस्यूस (Theseus) याने ठार केले.
या संस्कृतीत बैलाची शिंगे व चंद्रकोर याचा काहीही संबंध दित नाही. उलट असल्यास तो वृषभाशी आहे.
सिंधु संस्कृतीतील अनेक शिक्क्यांवर वृषभांच्या प्रतिमा आहेत. पण या शिक्क्यांत गाय दिसत नाही. आणि आर्य संस्कृतीत गाईचे महत्त्वाचे स्थान आहे.
श्रीकृष्णाचा आणि गाईपालनाचा संबंध प्रख्यात आहे. श्रीकृष्णाचे भक्त त्याला गोपाल म्हणतात.
अन्नपूर्णा, रामनगर, विवेकानंद आश्रमाजवळ, कृ. अं. आचार्य
अकोला – ४४४००१.

परंपरागत श्रद्धा?
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही ‘कालनिर्णय’च्या दिनदर्शिकेत प्रा. मे. पुं. रेगे यांचा लेख आहे. लेखाचा विषय आहे परंपरागत श्रद्धा.’
हा लेख सुधारकचे वाचक वाचतील असे गृहीत धरून हा लेख वाचल्यावर मला पडलेले प्रश्न यथे मांडले आहेत.
अतिशय अवघड विषय, थोड्या जागेत, अत्यंत सोप्या पण ओघवत्या भाषेत मांडण्याचा प्रा. रेग्यांच्या नेहमीच्या शैलीचा इथे प्रत्यय येतोच. अगदी अकृत्रिम, हृद्य भाषेत
आपल्या आईवडिलांविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडतात.
हा लेख वाचून मला दोन प्रकारचे प्रश्न पडले. काही प्रश्न नीतीच्या संदर्भातले म्हणजेमूल्यात्मक. काही प्रश्न मानवी ‘ज्ञानाच्या संदर्भातील.
प्रा. रेग्यांनी आपली श्रद्धा अशा शब्दांत माडंली आहे. “ज्यानं हे जग घडविलं त्यानं माणसाचं मन असं बनविलं की त्याला सृष्टीचं ज्ञान असेल पण ते मर्यादित असेल. परलोक नेहमी गूढच राहील. पण या गूढाचा भेद करणारे मार्गही त्यानं उपलब्ध करून दिले आहेत. धर्म, गूढानुभव हे असे मार्ग आहेत.” पण याचा अर्थ असा नाही की धर्म, धर्मग्रंथातील विधी हे नीतीच्या पलिकडे असतात. त्यांचे म्हणणे नीती ही माणसाला लाभलेली शक्ती आहे. म्हणून “विधींना मर्यादा आहे ती विज्ञानाची नाही. ती नीतीची आणि तारतम्य बुद्धीची’.
प्रा. रेग्यांचे हे शेवटचे वाक्य जर त्यांनी आधी स्वीकारलेल्या व त्यांनी लेखाच्या सुरवातीला मांडलेल्या इहवादी भूमिकेच्या संदर्भात असेल तर त्यांनी असे का म्हणावे असा मला प्रश्न पडतो. इथे श्री. गोवर्धन पारिखांच्या व त्यावेळी रेग्यांना मान्य असलेल्या इहवादी भूमिकेत नीतीला दुय्यम स्थान होते असे ध्वनित होते. परंतु त्यांनीच लिहिल्याप्रमाणे या इहवादी भूमिकेनुसार वैज्ञानिक दृष्टी समाजात का रुजवायची तर अन्यथा समाज कर्तृत्वहीनबनतो म्हणून. श्रद्धेने श्राद्ध करणारे आपल्या श्रद्धेचं समर्थन ज्या प्रकारे करतात त्याचप्रकारेह्या इतर (अघोरी) प्रथांवरील श्रद्धेचंही समर्थन होतं. म्हणून “समाजहितातासाठी आपल्या जवळच्या माणसाची अप्रीती सहन करून देखील कुठल्याही अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथेप्रमाणे आचरण करायचे नाही”या भूमिकेत नैतिकता आहे. ही भूमिका विज्ञानवादी नाही. इथे धार्मिक विधींना दिलेला नकार हा नैतिक भूमिकेतूनच आहे.
प्रा. रेगे करीत असलेल्या श्राद्धविधिसंदर्भात काही मूल्यात्मक प्रश्न निर्माण होतात.श्राद्धविधी हा केवळ पुरुषांनी करायचा असतो. मग स्त्रियांनी आपल्या पितरांविषयी आदरभाव कसा व्यक्त करायचा? याला उत्तर असे देता येईल की स्त्रियांसाठी ही या विधींच्या नियमात बदल करता येतील. पण आत्ताच्या विधींमधे आक्षेपार्ह अशी पुरुषसत्तावादी मूल्ये गृहीत आहेत हे मान्य करावे लागेल. परंतु प्रा. रेग्यांनी आपल्या मांडणीत याचा उल्लेख केलेला नाही. ते ‘शास्त्रप्राप्त पद्धतीने श्राद्धविधी करतात. मग यात पुरुषसत्तावादी मूल्यांचे समर्थन होत नाही काय?
आणखी एक मुद्दा. दिवंगत पितरांच्या संदर्भात आपला “आदर व प्रेम प्रतीकात्मक रीतीने व्यक्त कसा करावा हे धर्मशास्त्रात सांगितले आहे” असे ते म्हणतात. पण मग रक्ताचे नाते नसलेल्या इतर अनेक दिवंगत व्यक्तींबद्दल आपण आदरभाव कसा व्यक्त करायचा? अशांसाठी आपण करावयाचा श्राद्धविधी नाही. मग अशा आपल्यावर प्रेम असणार्याअ, आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्याा लोकांविषयीचा आपला आदर प्रा. रेगे लौकिकेतर अशा अन्य कोणत्या मार्गांनी व्यक्त करतात? आपल्या दिवंगत सुहृदांचे “सान्निध्य” ते कशाप्रकारे प्राप्त करून घेतात? याबद्दल त्यांनी काहीच लिहिलेले नाही. अन्यथा रक्ताच्या नात्यांना अन्य नात्यांच्या तुलनेत जास्त महत्त्व प्राप्त होते. ही गोष्ट अर्थातच अयोग्य आहे. आधुनिक संवेदनशीलतेच्या विरोधी जाणारी आहे. यात माणसाची आयडेंटिटी संकुचित बनते.“आईवडिलांच्या जीवनाचा सर्वांत हळवा भाग असल्यामुळे त्यांचे श्राद्ध करण्याचा अधिकार” प्रा. रेग्यांना असणं हे समजू शकतं पण “त्यांचा मुलगा म्हणून हा विशेषाधिकार” त्यांना असणं ही भूमिका श्राद्धविधींच्या शास्त्रानुसार असली तरी ती खटकणारी आहे.
प्रा. रेगे नास्तिक कधीच नव्हते असे त्यांनी म्हटलेय. पण ते एकेकाळी पक्के इहवादी होते. त्यावेळेच्या त्यांच्या मतानुसार श्राद्धासारखे विधी निष्फळ असतात. म्हणजे ते आस्तिक होते, पण या विधींना नाकारत होते. मग श्राद्धविधी फलदायी असतात हे त्यांना कसे कळले? ही श्रद्धा केव्हा, कशी उत्पन्न झाली? अर्थात ‘कालनिर्णय ने दिलेल्या जागेत याबद्दल विस्ताराने लिहिणे त्यांना शक्य झाले नसावे किंवा हा प्रश्नही कदाचित गैरलागू असेल. आत्ता अशी श्रद्धा आहे हे सत्य आहे. पण मग ही श्रद्धा प्रा. रेग्यांनी दिलेल्या विज्ञानाच्या स्थानाला धक्का पोहचवते. सृष्टीचं (सदैव अपुरं रहाणारं का होईना) ज्ञान प्राप्त करून घेण्याचा विज्ञान हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची मला समजलेली भूमिका आहे.
‘माणसाचे सृष्टिविषयक ज्ञान नेहमी अपूर्ण असणार’ किंवा ‘पुढे कधी काळी त्यालापूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकेल ही दोन्ही विधाने मला सारखीच सत्य किंवा असत्य वाटतात. ही न-वैज्ञानिक (non-Scientific) विधाने आहेत. त्यामुळे यातील पहिल्या भूमिकेनुसार प्रा. रेग्यांच्या ईश्वराला असे स्थान मिळते की त्यामुळे तो नास्तिकांना व विज्ञानालाही कवेत घेतो. यात मला विसंगती जाणवत नाही. पण काळात व अवकाशात एखाद्या गोष्टीचे असणे, घटनेचे घडणे याचे ज्ञान हा विज्ञानाचा विषय आहे व त्यामुळे आपले पितर श्राद्धाच्या ठिकाणी, त्यावेळी उपस्थित आहेत अशी खात्री बाळगणे हे वैज्ञानिक ज्ञानाशी सुसंगत नाही.
मग वस्तुनिष्ठ ज्ञान याला अर्थ काय? प्रा. रेग्यांनी या विषयावर सविस्तर लिहावे ही विनंती.

ऊर्जस्, ८९२/२/२ चेतनानगर, नासिक -९ मिलिंद मुरुगकर

संपादक
आजचा सुधारक
डिसेंबर ९५ च्या अंकातील श्री. दिवाकर मोहनी यांचा “कुटुंब-आजचे आणि उद्याचे” (२) हा लेख वाचला. लेख अतिशय उत्कृष्ट आहे. समाजातील अपप्रवृत्तीवर चांगलाच हल्ला केलेला आहे. सद्यःकालीन सामाजिक परिस्थितीचे यथार्थ दर्शन घडविले आहे. कुटुंबरचना आणि सामाजिक परिस्थिती यांचा परस्पर संबंध असतो आणि तो असणे अपरिहार्य आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. प्रत्येकजण दुसर्यांिच्या बाबतीत समान असतो हे आपण विसरतो म्हणजे आपल्यावर कोसळलेल्या आपत्तीला समाज जबाबदार आहे असे ठरवून आपण हात झटकतो आणि आपली सुटका करतो. पण आत्मपरीक्षणांच्या अभावामुळे हा सोपा विचार मनात येतो. म्हणून ज्ञानप्राप्तीबरोबर बुद्धीच्या साहाय्याने वैचारिक बदल कृतीमध्ये अवलंबिणे गरजेचे आहे. समाजात भ्रष्टाचार बोकाळला आहे असे आपण म्हणतो . त्यावेळी भ्रष्टाचार करणारा आपलाच कोणीतरी जातभाई, समाजबंधू असतो. मी चांगलाआणि तो वाईट अशी प्रवृत्ती बोकाळली आहे. दुसरयाच्या घरी ज्ञानेश्वर, शिवाजी जन्माला येऊ दे; माझा मुलगा मात्र उच्चविद्याविभूषित होऊन त्याला पैसा मिळू दे-ही शिकवण केव्हाही हानिकारक तरीसुद्धा चालेल, पण आपल्या सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून, जाणीव करून विद्येचा, पैशाचा सदुपयोग झाला तरी पुष्कळसे प्रश्न सुटतील. भिन्नभिन्न कुटुंबे विचारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी Charity begins at home ने सुरुवात केली पाहिजे. कळावे.
१६८F वैद्यवाडी, ठाकुरद्वार, मुंबई- ४०० ००२ सौ. सरस्वती देव

संपादक
आजचा सुधारक
हिंदुत्व-अन्वेषणाच्या निमित्ताने लिहिलेल्या श्री. घोंगे यांच्या लेखातील काही । वाक्ये उद्धृत करून त्यावर माझे विचार व्यक्त करीत आहे:
पृष्ठ २२२ – “या साठीच गेली ७० वर्षे आपण हिंदुत्वाला कवटाळलेले आहे. म्हणजे १९२५ सालापासून आपण हिंदुत्वाला कवटाळलेले आहे. यावर्षी काय घडले? डॉ. हेडगेवारांनी रा. स्व. संघ या नावाची हिंदूची संघटना सुरू केली ही गोष्ट घोंगे यांना अभिप्रेत असावी असे मी समजतो.
पृष्ठ २२३ – “शंभर वर्षांपूर्वी …..जैन, महानुभाव, लिंगायत अशा धर्माची व पंथांची नावे घेतली असती…..:. आपण हिंदुधर्मीय आहोत ही जाणीव ५० वर्षापूर्वी कोणालाच नव्हती.”
घोंगे यांनी वर्षांचे जे आकडे दिले आहेत ते पुनः एकदा तपासून पाहावेत अशी विनंती. ५० वर्षांपूर्वी रा. स्व. संघ आणि हिंदू महासभा अस्तित्वातच नव्हती असे घोंगे यांना म्हणायचे आहे काय?
पृष्ठ २२६ – “एकचालकानुवर्तित्वाच्या आदरातून हे (हिंदुत्वाचे) अर्थहीन व अनैतिहासिक ओझे संभाळले गेले आहे.” हा रोख रा. स्व. संघावर आहे हे उघड आहे. पुढचे वाक्य “हिन्दुत्व म्हणजे नेमके काय हे हिंदुत्ववाद्यांना सांगता आले नाही व येणार नाही.” घोंगे यांचे हे विधान अगदी खरे आहे. हिंदुत्व म्हणजे काय व हिंदू कोणाला म्हणावे यांच्या व्याख्या आजवर कुणाला नेमकेपणाने करता आल्या नाहीत. हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे। असे घोंगे यांना अभिप्रेत असावे.
पृष्ठ २२६ – “पण मुसलमानांना स्वतःला हिंदू म्हणवून अस्मिताच विसरावी। लागेल. घोंगे यांचे हे निरीक्षण फार अर्थपूर्ण आहे आणि त्यातच त्यांना जो यक्षप्रश्न पडलाआहे (हिंदू कोणाला म्हणावे?) त्याचे उत्तर सापडू शकेल, आणि ते असे आहे.
मुसलमान लोक ज्यांना हिंदू समजतात ते हिंदू! भारतापुरते बोलायचे झाल्यास, जे लोक मुसलमान नाहीत, ख्रिश्चन नाहीत, पारशी, यहुदी किंवा अन्य कोणत्याही धर्माचे नाहीत ते सगळे हिंदू, असेही म्हणावे.
घोंगे स्वतःला हिंदू म्हणवून घेत नाहीत. परंतु सरकारी कागदपत्रांत त्यांची नोंद हिंदू म्हणूनच झाली असावी. तशी नोंद झाली म्हणून घोंगे यांची ऋग्वेदी – वैष्णवी – शैव- भागवत अस्मिता विसरल्यासारखी झाली असे घोंगे यांना वाटते काय? तसे त्यांना वाटत नसावे. जैन, लिंगायत, महानुभाव या धर्माच्या किंवा पंथाच्या कोणाही व्यक्तीची नोंद हिंदू म्हणून झाली तरी आपली अस्मिता विसरली असे वाटेल काय? म्हणून व्यावहारिक सोयीसाठी आपण असे म्हणू की ज्यांना हिंदू म्हणून संबोधल्यास आपली अस्मिता हरवली असे वाटत नाही ते हिंदू समजावेत!
श्री. घोंगे यांनी एक मुद्दा ध्यानात घ्यावा. पृष्ठ २२२ वर त्यांनी म्हटले आहे की हिंदुत्व आणि हिंदुधर्म या विषयीचे जयघोष केवळ राजकीय स्वार्थासाठी” असून त्याची सुरुवात १९२५ सालापासून (हिंदुत्वाला कवटाळण्यामुळे) झाली. येथे ‘राजकीय’ हा शब्द आगंतुक आहे. केवळ स्वार्थासाठी एवढेच म्हटले तरी पुरे आहे. याचे कारण म्हणजे ब्रिटिशांच्या अमलाखाली असताना ब्रिटिशांना विरोध एवढाच काय तो राजकीय स्वार्थाचा मार्ग हिंदूंना उपलब्ध होता. हिंदुत्वाचा जयघोष करण्याने राजकीय स्वार्थ काय साधणार होता? एक साधासुधा स्वार्थ जरूर होता, आणि तो म्हणजे, त्यावेळचे मुसलमान ज्यांना हिंदू समजत होते, व ते हिंदू आहेत एवढ्याच एका कारणासाठी, इस्लाम धर्माज्ञांचे पालन म्हणून त्यांच्यावर अत्याचार करीत होते, ते अत्याचार पुनः होऊ नयेत ही कळकळ एवढाच काय तो स्वार्थ. (मोपल्यांचे अत्याचार नुकतेच होऊन गेले होते.) हा स्वार्थ साधण्यासाठी एकच मार्ग होता तो म्हणजे हिंदूंची एकजूट करणे, त्यांच्यात प्रतिकार-क्षमता निर्माण करणे. त्यासाठी हिंदुसंघटन, हा इतिहास झाला.
दुर्दैवाने, या हिंदुसंघटनास कडवा विरोध करणारे निघाले ते पुनः हिंदूच! (हिंदूंचा सगळा इतिहासच तसा आहे.) या विरोधकांनी हिंदुत्वाच्या जयघोषास धार आणून दिली. क्रिया-प्रतिक्रियांची ही साखळी जी एकदा चालू झाली ती आजतागायत चालू आहे, आणि निधर्मी सरकारे ती साखळी चालू राहील याची खबरदारी घेत आहेत! हिंदू आणि हिंदुत्व यांच्या व्याख्यांची नसती उठाठेव करणार्यांरनी ही साखळी कशी तोडायची याची चिंता करावी. हिंदुत्वनिष्ठांना “धर्माच्या रक्षणाची बिलकूल चिंता नाही – त्यांना चिंता आहे हिंदूंच्या रक्षणाची, आणि ते हिंदू म्हणजे कोणते तर मुसलमान ज्यांना हिंदू मानतात ते हिंदू. ते हिंदू तर प्रचंड बहुसंख्येत आहेत, त्यांना कसला व कुणाचा धोका आहे असा प्रश्न शहामृगी वृत्तीचे लोक उपस्थित करतीलच. तशा लोकांना उत्तर देण्याचे सामर्थ्य फक्त काळाच्याच अंगी आहे. १९४७ च्या इतिहासाची पुनरावृत्ती अशक्य मुळीच नाही.
मा. श्री. रिसबूड
२ वासवी, २१०१ सदाशिव, पुणे ३०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.