संपादक
आजचा सुधारक
गेल्या तीन चार महिन्यांच्या आजच्या सुधारक च्या अंकातल्या काही चांगल्यालेखांमध्ये जी अनवधानाने अगर अति उत्साहाने केलेली चूक अगर अतिवास्तव विधानेजाणवली त्याबद्दल हे पत्र.
१. नंदा खरे (सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे, नोव्हें. १९९५) यांचीसाक्षात्काराविरुद्ध अंतस्फूर्त ज्ञान या विषयाची मीमांसा उत्कृष्ट आहे. खरे तर जे अंतःस्फूर्तीचे अनुभव रामानुजन किंवा केकुले ह्यांना आले तसे थोड्या फार फरकाने बर्या.चसामान्य संशोधकांनाही येत असतातच. निदान मी स्वतः, अत्यंत सामान्य माणूस असूनही, असा अनुभव घेतलेला आहे. (मात्र मी ध्वन्यर्थानेही स्वतःची रामानुजनबरोबर तुलना करीत आहे असा हास्यास्पद अर्थ कुणीही काढू नये.)
या लेखात खरे यांचे गोएडेलच्या प्रमेयाबाबतचे ‘सुसंगत गृहीतके व तर्कपरंपरा यांच्या टप्प्यात न येणारी गणिती सत्ये असू शकतात हे विधान काहीसे गूढगुंजनात्मक झाले आहे. कुठलीही सुसंगत गृहीतके वापरल्यास निदान काही गणिती विधानांची सत्यासत्यता त्या गृहीतकांच्या आधारे तर्कपरंपरेने पडताळून पाहणे अशक्य आहे असे म्हणणे जास्त योग्य असेल. हे विधान फारसे अविश्वसनीय वाटत नाही. जे विधान पडताळून पाहता येत नाही त्यास ‘गणिती सत्य म्हणण्याची खरे यांची चूक अनवधानाने झाली असावी.
याच लेखातील कोणतीही सम संख्या दोन मूळ संख्यांच्या बेरजेच्या रूपात मांडता येते (ज्याला ‘गोल्डबाकच अंदाज’ असे म्हणतात) हे विधान सुधारून दोनपेक्षा मोठी कोणतीही सम संख्या दोन मूळ संख्यांच्या बेरजेच्या रूपात मांडता येते असे लिहावे लागेल. कारण दोन ही संख्या खरे म्हणतात तशी मूळ संख्यांच्या बेरजेच्या रूपात लिहिता येत नाही. त्यांनी दिलेले २ = १ + १ हे उदाहरण चूक आहे. १ ही मूळ संख्या मानली जात नाही. त्यांचे दुसरे उदाहरण ८ = ५ + ३ बरोबर आहे, पण ते जर त्यांनी ७ + १ लिहिले असते तर तेही चूक झाले असते. गोल्डबाकचा अंदाज जर कधी काळी सिद्ध करता आला तर खरे यांचे विधान आपोआपच खरे ठरणार आहे, पण खरे यांच्या विधानाचा खरेपणा सिद्ध करून गोल्डबाकचा अंदाज सिद्ध होणार नाही.
शेवटी ‘गणितात सु-परीक्षित अंदाजांना “सत्या” चे स्थान देतात हे खरे यांचे विधान तर फारच धाष्ट्र्याचे आहे असे म्हणणे प्राप्त आहे. गोल्डबाकचा अंदाज खर्वनिखर्व-पेक्षाही बर्या च मोठ्या संख्येपर्यंतच्या (अलिकडे कदाचित परार्धापेक्षाही मोठ्या) सर्व सम संख्यांच्या बाबतीत पडताळला गेला असूनही त्याला कुणीच गणितज्ञ ‘सत्याचे स्थान देत नाहीत. तो फक्त अंदाजच आहे. तसेच फर्माचे प्रमेय (जे अलिकडे सुमारे चारशे वर्षांच्या परिश्रमानंतर सिद्ध झाले) हे सुद्धा‘प्रमेय’ म्हटले गेले असले तरी तो अंदाजच होता. (गणिती साहित्यात यास ‘प्रमेय म्हटले गेले कारण फर्माला वाटले होते की त्याला या ‘प्रमेयाची सिद्धता माहिती आहे, पण तो फक्त त्याचा भ्रमच असावा असे आजकाल मानले जाते.
या काही चुका सोडल्यास नंदा खरे यांच्या मुख्य विवेचनात काही उणीवा आहेत असे मला अजिबात सुचवायचे नाही.
२. ललिता गंडभीर यांच्या (‘लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, फेब्रु. ९६) मुख्य मतांशी सहमत असूनही त्यांचा बडगा ‘भारतीय व बहुतेक आशियामधील स्त्रीपुरुष यांच्यावरच का पडतो हा प्रश्न मी उपस्थित करू इच्छितो. जशा भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीने पुरुषांना विशेष सवलती दिल्या आहेत (बहुपत्नीकत्व, अंगवस्त्र राखणे, इ.) तशाच त्या वेगवेगळ्या स्वरूपात जगभरही आहेतच. “Boys will after all be boys” वगैरेसारख्या उक्ती अमेरिकेत अलिकडेपर्यंत प्रचलित होत्याच. बलात्कारित स्त्री आजही याच अमेरिकेत वकिलाच्या उलटतपासणीस भिऊन (जो तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्याचे तिला भय दाखवू शकतो) न्याय मिळविण्यासाठी कोर्टाकडे धाव घेण्यापूर्वी अनेक वेळा विचार करते. ‘दहा गुन्हेगार सुटले तरी हरकत नाही, पण एकही निर्दोष माणूस तुरुंगातजायला नको या सर्वांना भुरळ पाडणाच्या तत्त्वावर आधारलेली पाश्चात्त्य न्यायपद्धती प्रत्यक्षात मात्र श्रीमंत अशिलांना सर्व प्रकारच्या गुन्ह्यांतून ‘संशयाचा फायदा (benefit of doubt) मिळवून देण्याचेच कार्य करीत आहे. (अलिकडच्या सुप्रसिद्ध ‘ओ. जे. सिंपसन च्या बाबतीत हेच घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.) तेव्हा गंडभीर यांचे भारतात स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य किंवा मुक्ती असती तर हा सबंध परिच्छेद हे केवळ स्वप्नरंजनच म्हणावे लागेल.
लैंगिक स्वातंत्र्य व (विशेषतः) स्वैराचार यांच्या गंडभीरांच्या व्याख्या स्त्रीच्या दृष्टिकोणातून लिहिलेल्या आहेत असे मला सुचवावेसे वाटते. पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणाजवळ जास्त कामवासना असते याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण कोणाची कामवासना चटकन चाळवली जाऊ शकते याचे उत्तर पुरुष हेच असावे. व स्त्री – पुरुष यांच्या लैंगिक अवयवांची संरचना पाहता ते बरोबर असावे असे वाटते. स्त्रियांच्या वेश्याव्यवसायास जगातील सर्वात प्राचीन व्यवसाय म्हटले जाते पण पुरुष वेश्यांचा समाजातील अभाव हे केवळ धर्म वा पुरुषप्रधानतेच्या स्पष्टीकरणाने सुटणारे कोडे नसावे. त्यास इतरही (जीवशास्त्रीय, इ.) कारणे असू शकतील.
याच संदर्भात जाता जाता आणखी एक उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. कमल पाध्ये ‘बंध-अनुबंध’ मध्ये म्हणतात (पुस्तक हाताशी नसल्यामुळे आठवणीवर विसंबून मी हे अवतरण देत आहे), ‘मी एकदा दाभोळकर यांनी म्हटले की “स्त्री पाहिल्यावर पुरुषांच्या मनात पहिल्याने कोणता विचार येतो” या प्रश्नाचे उत्तर शंभर पुरुषांनी“उपभोग” असे दिले आहे. पण या तक्रारवजा विधानावर दाभोळकर कमलाबाईंना म्हणतात, ‘यापुढे शंभर असे न म्हणता एकशे एक असे म्हणत चला.
तेव्हा लैंगिक स्वातंत्र्य स्त्रियांना सामाजिक न्याय, समता, अशा अनेक कारणांसाठी आवश्यक असूनही स्त्री व पुरुष यांच्या लैंगिक गरजा समानच असतात असे मानण्याची आवश्यकता नाही. खरेतर पुरुष व स्त्रिया यांना लैंगिक स्वातंत्र्य सारख्याच प्रमाणात असावे, फक्त स्त्रीलाच ते असावे असे नाही. पण त्यांची लैंगिक भूक सारखीच की कमीजास्त हा मुद्दा गौण आहे. हे गंडभीर (आणि दिवाकर मोहनी यांनाही) मान्य असावे असे वाटते. पण ते आवर्जून म्हटले जात नाही म्हणून गैरसमजाला वाव राहतो.
३. आता दिवाकर मोहनी यांच्या कुटुंब – आजचे आणि उद्याचे” या लेखमालिकेविषयी थोडेसे. कुटुंब-व्यवस्थेविषयी त्यांचे विचार बरेच अंतर्मुख व्हायला लावणारे व तर्कबुद्धीला पटणारे आहेत यात शंकाच नाही. पण पाश्चात्त्य कुटुंबात ‘मुले एकदा आईपासून सुटी झाली की ती पूर्ण बिरादरीची होतात हे मोहनी यांचे विधान तीस वर्षे अमेरिकेत राहूनही मला पुरेसे समजले नाही. पाश्चात्त्य देशांत मुले आईबापांपासून वयात आल्यावर (व निश्चितच लग्नानंतर) वेगळी राहातात व आपापली भावविश्वे थाटतात हे खरे, पण बिरादरी त्यांची जबाबदारी उचलते म्हणजे काय? अमेरिकन माणसात भारतीयाच्या तुलनेने अधिक नागरी संवेदनशीलता (civic sense) आहे हे मात्र खरे. व या नागरीसंवेदनशीलतेस बिरादरीची जाण असे मोहनी म्हणत असावेत अशी शंका येते. पण या संवेदनशीलतेचे कारण कुटुंब-व्यवस्थेपेक्षा राष्ट्रीय अस्मितेत सापडेल. आपण (आजकाल दूरदर्शनवरून, व माझ्या लहानपणी पुस्तकांतून) मारे भारतीय एकात्मतेच्या, देशप्रेमाच्या,आपल्या प्राचीन संस्कृतीच्या, वैदिक गणिताच्या वा औपनिषदिक तत्त्वज्ञानाच्या गप्पा । माराव्यात, पण आपली नागरी संवेदनशीलता अत्यंत हिणकस दर्जाची आहे. आगगाडीत।बसून शेंगा खाणार्यांलस खिडकीबाहेर टरफले फेकण्याचेही कष्ट घ्यावेसे वाटत नाहीत. गाडीतच कचरा टाकतात व कुणी बाहेर टाकण्यास सुचविले तर डोळे मोठे करून पाहतात.बसमध्ये धूम्रपानास मनाई असूनही बसचे कर्मचारीच त्या नियमाचे पालन करीत नाहीत व विनंती केल्यास मख्खपणे तुमच्याकडे पहात आपले धूम्रपान चालू ठेवतात ही आपली नागरिकता आहे. सार्वजनिक कार्यालयात थुकणारास टोकले तर तुमचं काय जातंय’ असा प्रतिप्रश्न विचारला जातो ही आपली शोकांतिका आहे. बिरादरीची भावना खरे तर आपल्या भारतीय विस्तारित कुटुंबसंस्थेत जास्त चांगली वाढीस लागावी हे तर्कबुद्धीस पटते, पण प्रत्यक्षात उलट आहे. तेव्हा याचे कारण कुटुंबसंस्थेत न शोधता देशाच्या राजकीय इतिहासात (गुलामगिरी, इ.) शोधणेच बरोबर.
‘आपली कुटुंबसंस्था ढोंगीपणाने खाऊन टाकली आहे’; या मोहनी यांच्या विधानाशी मी सहमत आहे. खरे तर कुटुंबसंस्थाच नव्हे तर आपले सबंध जीवनच ढोंगीपणाने खाऊन टाकलेले आहे. पण कुटुंबव्यवस्था मोहनी म्हणतात तशी बदलता येणे जरी कधी काळी शक्य झाले तरी त्यातून आपला ढोंगीपणा नष्ट होईलच याची खात्री वाटत नाही. या उलट जर बिरादरीची भावना वाढीस लावणे हा उद्देश असेल तर थोड्याच कष्टांनी व मानसिकतेमध्ये आवश्यक ते बदल घडवून ते साध्य होऊ शकेल असे मला वाटते. काही उदाहरणे सुचतात ती पुढीलप्रमाणे : अ) आपण ज्या परिसरात राहतो तेथील रस्ते, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी तेथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारावी व शाळांतील विद्यार्थी वगैरेंच्या मदतीने ती अंमलात आणावी. अशा गटांना स्थानिक नगरपालिकेच्या कायद्यात आवश्यक तेवढे बदल करून अंमलबजावणीचे अधिकार देणे शक्य आहे. ब) ग्राहक मंच पद्धतीचे अनेक छोटे छोटे गट निर्माण व्हावे, त्यांना न्यायालयांकडून मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, व त्यांनी एकेका शासकीय कार्यालयाशी (परिवहन मंडळ, वीज मंडळ, दूरसंचार, इ.) संलग्न राहून तेथे भ्रष्टाचाराविरुद्ध मोहिमा उघडाव्यात. उदाहरणार्थ, राज्य परिवहन मंडळात आपण वाहनासाठी परवाना घ्यायला जातो तेव्हा तेथे एजंट मंडळी आपल्या भोवती गराडा घालतात, व लाच न देता काम होणे शक्यच नाही असे सुचवितात. या व्यवस्थेस विरोध करणारे स्वयंसेवी एजंट्स् तेथे असावेत, जे कर्मचार्यांवना नियमाप्रमाणे काम करून द्यायला भाग पाडतील. अशी उदाहरणे आणखी देता येतील. एकदा काही उपक्रम यशस्वी झाले की त्या उपक्रमातून निर्माण होणारी लोकबिरादरीची भावना इतर स्वरूपातही मूर्त होऊ शकेल.
मोहनींच्या लेखमालेत सुचविलेला कुटुंबव्यवस्थेतील आमूलाग्र बदल कधी घडूनयेईल असे मला तरी वाटत नाही. बहुतेक त्यांचे विचार न पटणारे वा न मानवणारे असेच आहेत. या उलट त्यांची बिरादरीची (मला समजली त्या स्वरूपात) कल्पना महत्त्वाची तर आहेच, पण ती बहुतेक लोकांना पटणारी व आवडणारी आहे. काही हितसंबंध गुंतलेले लोक त्यासही विरोध करतील हे खरे, पण त्यांना प्रभावी लोकमताविरुद्ध आपला आवाज उठविणे कठीण जाईल. शिवाय अशा गोष्टी काही थोड्या व्यक्तींनी एकत्र येऊन छोट्या प्रमाणात अमलात आणणे शक्य आहे. माझा मोहनींच्या कुटुंब संकल्पनेस विरोध नाही. पण अवास्तव व स्वप्नरंजित लिखाण करीत राहण्यापेक्षा जमेल तेवढी कृती करण्याची, किंवा शक्यतेच्या पातळीवरील माफक का असेना, प्रत्यक्ष कृतीस प्रोत्साहन देण्याची आता वेळाआली आहे असे वाटत नाही काय?
- मधुकर देशपांडे