पत्रव्यवहार

मा. संपादक
आजचा सुधारक यांस स. न.
श्री. ह. चं. घोंगे यांचा ‘हिदुत्व अन्वेषण’ हा आक्टोबर ९५ च्या अंकातील लेख वाचनात आला. या आधीच्या म्हणजे सप्टेंबर ९५ च्या अंकातील ‘शारदेच्या पुनर्जन्मावरील त्यांचा लेख वाचलेला होताच. आधीचा लेख वाचल्यानंतर लेखकाच्याबद्दल काही अपेक्षा आधीच निर्माण झाल्या होत्या. मात्र ‘हिन्दुत्व अन्वेषण हा लेख वाचून भ्रमनिरास झाला. लेखकाच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास केवळ ‘शाब्दिक चावटीचाच नव्हे, तर ‘वैचारिक चावटीचाही आश्रय घेऊन लिहिलेला हा लेख वाटला. जागोजाग ‘हिंदुत्व आणि ‘हिंदु यांतील वैयर्त्य दाखविताना लेखकाने ‘वैचारिक चावटीचा केलेला उपयोग निषेधार्ह वाटतो.
पहिल्या परिच्छेदात त्यांनी आव्हान दिले आहे की ‘हिंदुत्व आणि हिंदुधर्म यांच्या पारंपरिक अस्तित्वाची साक्ष देणारे पुरावे कोणी सादर केल्यास लेखक त्याची नकारात्मक भूमिका सोडून देईल. आणि पुढे याच विषयावर कै. स्वा. सावरकरांची ‘आसिंन्धु सिन्धु पर्यंता…..’ ही हिंदुत्वाची व्याख्या उद्धृत केली आहे. ही व्याख्या ज्या मूळ इंग्रजी ग्रंथात सावरकरांनी प्रथम प्रतिपादिली त्या ग्रंथाचा उल्लेख मात्र लेखकाने कटाक्षाने टाळला आहे. कारण लेखकाच्या जवळपास सर्वच आक्षेपांना स्वा. सावरकरांनी या ग्रंथात (प्रथम प्रसिद्धी इ. स. १९२५) विस्तृत प्रमाणावर उत्तरे दिलेली आहेत. लेखक फार तर म्हणू शकेल कीही विधाने/उत्तरे/विवेचने त्याला मान्य होण्यासारखी नाहीत, किंवा त्याज्यही आहेत. पण म्हणून हिंदुत्व आणि हिंदुधर्म याचे पुरावेच कोणी सादर केलेले नाहीत हे विधान कसे स्वीकारायचे? स्वा. सावरकरांच्या प्रतिपादनावर आक्षेप घेता येतील. पण म्हणून कोणी पुरावे दिलेच नाहीत, विवेचन केलेच नाही असे म्हणजे ‘वैचारिक चावटीचेच निर्देशक नव्हे काय?
येथे एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो. ‘हिन्दुत्व आणि हिंदुधर्म याबद्दल माझ्याही मनात अनेक शंका-कुशंका आहेत. मीही माझ्या हिंदुत्व आणि हिंदुधर्म या विचारांना अनुकूल-प्रतिकूल लिखाण वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. मी हिंदु आहे हे निश्चित. कारण मूलतः व्यवहारातील आचरणपद्धतीमुळे मी मुसलमान किंवा ख्रिश्चन नाही. मी जरी स्वतःला मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणून घेण्याचे ठरवले तरी ते मला तसे समजणार नाहीत. आहे या आचरणपद्धतीमुळे मी मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा इतर कोठलाही धर्मीय असूच शकत नाही. आणखी स्पष्ट करायचे तर मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हणवून घेण्याकरिता तथाकथित धर्मातरच आवश्यक आहे. सुंता केल्याविना मुस्लिम होता येत नाही. आणि बाप्तिस्मा घेतल्याविना ख्रिश्चन होता येत नाही. पार्शी धर्माकडे conversion नाही. त्यामुळे मला स्वतःची ओळख हिंदुधर्मीय अशीच करून द्यावी लागते. गंमतीने म्हणायचे झाल्यास प्रत्येकजण जन्मतः हिंदूच असतो.
आता पुन्हा स्वा. सावरकरांच्या हिंदुत्व या पुस्तकाकडे वळू. लेखकाने वैचारिक चावटीचा किती उपयोग केला आहे हे या पुस्तकातील संदर्भ देत सिद्ध करता येईल. लेखक तिसर्या परिच्छेदात म्हणतो की ‘हिंदुत्व आणि हिंदू परंपरा यामागे इतिहास आणि परंपरा नाहीत.’ हे वाक्य हास्यास्पद वाटते. स्वा. सावरकरांनी त्यांच्या ग्रंथात (मराठी भाषांतर) पान ४९-५० वर विस्तृत विवेचन केले आहे. येथे सर्व उतारे न देता सावरकरांनीच निर्देशिलेल्या चंद बदायी या हिंदी वाङ्मयातील आदिकवीच्या कवितेतील एका कडव्यावर त्यांचेच भाष्य उद्धृत करतो. “ज्यावेळी मुसलमान लोकांचा पाय पंजाबमध्ये रुजला नव्हता तेव्हा अत्यंत मानधनवृत्तीच्या रजपूत लोकांना, आपल्या शत्रूनी शोधून काढलेले हीनपणाचे टोपण नाव खाली मान घालून स्वीकृत करण्याचे व तेच आपल्या राष्ट्रीय अभिमानाचे निदर्शक मानण्याचे काहीच कारण नव्हते.” यावरूनही हिंदु परंपरेचा इतिहास सिद्ध व्हायला हरकत नसावी. या आधी पान ४४ वर सिंधु आणि सिंधुस्तान हे शब्द मागे पडून हिंदु आणि हिंदुस्थान हे शब्द कसे कायम झाले याचेही विवेचन सावरकरांनी केले आहे. हिंदुधर्म आणि तदनुषंगिक येणार्याम आचरणपद्धतीबद्दल आक्षेप समजू शकतो. हिंदुधर्म हे नाव देणारा एखादा महामानव निर्माण झाला होता किंवा नाही हाही मुद्दा विचारात घेण्यायोग्य आहे. परंतु कोणत्याच अभिलेखात ‘हिंदु’ हा शब्द नाही यावर “हिंदु हा शब्द एका संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप आहे आणि म्हणून तो शब्द संस्कृत वाङ्मयामध्ये आढळू नये हे जरी साहजिक आहे, तरीसुद्धा हे प्राकृतरूप देखील काही काही वेळा संस्कृतवाङमयामध्ये आढळून येते ही गोष्ट तर या शब्दाचे महत्त्व सिद्ध करणारे एक सबळ प्रत्यंतर आहे” हे सावरकरांचे वाक्य दुर्लक्षिण्याजोगे नाही. कारण भविष्यपुराण, प्रतिसर्गपर्व अ. येथे व मेरुतंत्रामध्ये ‘हिंदु’ हा शब्द उपयोगात आणलेला आहे हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. त्याचबरोबर बनारस, मराठा, शीख, गुजरात, पाटणा आदि आपण ज्यांचा व्यवहारामध्ये रोज उपयोग करतो असे दुसरेही शब्द आहेत की ज्यांचा उल्लेख आलेला नाही. मुसलमान लोक आपल्याला काफिर म्हणत असत व म्हणतात. मग हे नाव आपल्या पूर्वजांनी धारण केले असते व त्यासच ते चिकटून राहिले असते. मग हिंदु आणि हिंदुस्थान या शब्दांच्या बाबतीत काय म्हणून आपखुषीने हा राष्ट्रीय अपमान गिळून घ्यावा? सावरकर पुढे म्हणतात की ‘हिंदु हा शब्द इराणच्या प्राचीन झेड या भाषेपासून उत्पन्न झाला आहे. तात्पर्य इतकेच की हिंदु हा शब्द काही शिवीसदृश नाही. तो का स्वीकारावा याचे विवेचन मुळातून सावरकरांच्या ग्रंथातूनच समजावून घ्यावे.
पुढे श्री. घोंगे म्हणतात की ‘आपण हिंदुधर्मीय आहोत ही जाणीव पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत कोणालाच नव्हती. पुन्हा एकदा सावरकरांच्याच ग्रंथाचा आधार घेऊन पन्नासच काय पाचशे वर्षांपूर्वीही आपण हिंदुधर्मीय आहोत ही जाणीव येथील जनतेला झालेली होती. आधी नमूद केलेल्या पृथ्वीराज रासोया काव्यातील पान ५१ वर दिलेल्या काही ओळी मुळातूनच वाचाव्या म्हणजे याची सत्यासत्यता पटेल. पण डोळ्यांवर झापडे ओढल्यानंतर मला दिसते तेच खरे ही भूमिका घेणान्यास ‘वैचारिक चावटीचाच अवलंब करावा लागतो. ‘सिंधु’ हा शब्द समुद्र या अर्थाने न घेता नदी या अर्थाने घेतला तर…’ या वाक्यावरून श्री. घोंगे यांची भूमिका स्पष्ट व्हावी. कारण त्यांनी तोच अर्थ ग्राह्य धरून सर्व विवेचने केलेली आहेत. मात्र स्वा. सावरकरांनी असेही नमूद केले आहे की ब्रह्मपुत्रा ही पण सिंधुनदीचीच शाखा आहे. तेव्हा दोन प्रवाहरूपाने पूर्व व पश्चिम दिशांची सरहद्द बनते…. सिंधु नदी पासून सिंधु समुद्रापर्यंत जी भूमी…” यावरून सिंधु हा शब्द समुद्र या अर्थानेही घ्यावाच लागेल. पुढे त्यांनी भरतखंडाचा हिंदुस्थान कसा झाला याचे विस्तृत विवेचन केलेले आहे.
वरील विवेचनावरून निदान एवढे तरी स्पष्ट व्हावे की भरतखंडाची व्याप्ती केवढी होती, त्याचेच नाव पुढे सिंधुस्थान-हिंदुस्थान झाले की नाही इ. आणि एकदा ही व्याप्ती स्वीकारल्यानंतर सिंधुस्थान हेच हिंदुस्थान ठरण्यास आक्षेप नसावा. सिंधु-हिंदु सिंधुस्थान-हिंदुस्थान ही फोड स्वीकारावी यावर वाद होऊ नये. वादच करायचा तर हिंदुस्थान म्हणायचे की सिंधुस्थान म्हणायचे यावर व्हावा. पण श्री. घोंगे यांना हिंदु हा शब्दच खटकतो आहे. तेव्हा हिंदु या शब्दाचा उगम-अर्थ-व्याप्ती याकरिता त्यांना सावरकरांनी प्रतिपादलेली गृहीतके अगोदर त्याज्य ठरवावी लागतील. कारण ग्रंथस्वरूपात ‘हिंदुत्व’ या शब्दावर विस्तृत विवेचन सावरकरांनीच केलेले माझ्या वाचनात आहे.
श्री. घोंगे यांच्या या पूर्वार्धात त्यांनी हिंदुधर्म किंवा चातुर्वण्याधिष्ठित वैदिक धर्मयावरही लिहिले आहे.याही बाबतीत सावरकरांच्याच शब्दांतील त्यांचे वाक्य उद्धृत करतो. “चातुर्वर्ण्य संस्था हिचे जे इच्छितकार्य ते संपल्यावर किंवा ते कार्य तिच्या हातून पुढे न होऊ लागल्यावर बंद पडेल.” स्वतः सावरकर चातुर्वर्ण्यवस्था किंवा जातिभेद याविरुद्ध किती हिरीरीने लढले हे वेगळे सांगायला नको. कर्मकांडे-यज्ञयाग-उपासतापास यांचा त्याग करून अद्ययावत् विज्ञाननिष्ठ व्हा असा आग्रहाचा उपदेश ते करत असत. तेव्हा त्यांना यज्ञयागावर आधारलेला, कर्मकांडावर उभारलेला हिंदुधर्म-वैदिकधर्म अजिबात मान्य नव्हता याबद्दल वाद नसावा. शूद्रांना दूपणे देणारा धर्म हिंदुधर्म असे सावरकर कधीच म्हणाले नाहीत. मग सावरकरांची ‘हिंदू’ची व्याख्या श्री. घोंगे स्वीकारतील काय? अशक्य नाही. कारण मग हा लेखप्रपंचच (हिंदुत्व-अन्वेषण) अनाठायी ठरेल. आणि खरेतर या लेखाचा (पूर्वार्धाचा) फोलपणा स्वतः लेखकानेच त्याच्या एका वाक्यात अनवधानाने का होईना विशद करून ठेवला आहे. श्री घोंगे लिहितात, “त्यांच्या लेखी मुसलमान देखील ‘जेंटूच’ म्हणजे हिंदूच होते. पण मुसलमानांना स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात अस्मिताच विसरावी लागेल.” तेव्हा ही जी विसरावी लागणारी अस्मिता म्हणजे काय याचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्वाचे वेगळे अन्वेषण करण्याची गरजही कदाचित् भासणार नाही.
शेवटी, हा लेख स्वा. सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथाचा परामर्श घेण्याच्या उद्देशाने लिहिलेला वाटतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान-हिंदुधर्महिंदुत्व या शब्दांना प्रतिष्ठा सावरकरांइतकी कोणीच दिलेली नाही. त्यांचे राजकारणच हिंदुत्व या शब्दाभोवती गुंफलेले होते. स्वतः सावरकरच म्हणत त्याप्रमाणे “आणखी दोन शतके तरी हिंदुत्वाच्या तत्त्वज्ञानाची आपल्या राष्ट्राला आवश्यकता आहे. पुढे परिस्थितीत सुधारणा झाली तर उत्क्रांत मानवतावादाचाही अंगीकार करण्याचे त्यांनी या ग्रंथात सूचित केले आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म यांचा जोषपूर्ण पुरस्कार सावरकरांइतका इतर कोणी केलेला नसावा. म्हणून माझ्या मनात विचार आला श्री. घोगे यांचा लेख सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथाचा प्रतिवाद करण्याचा हेतूने लिहिलेला असावा. मात्र त्यांनी केवळ एकदोन वेळाच सावरकरांचा उल्लेख करूनही हिंदुत्व या ग्रंथाचा उल्लेख टाळला आहे आणि त्या ग्रंथांतील प्रतिपादनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच त्यांनी केलेल्या या “वैचारिक चावटीचा अल्पसा परामर्श मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्तरार्धातील त्यांचे प्रतिपादन वाचनात आल्यानंतर त्यावर वेगळा विचार करेन.
कळावे.
आपला
स. गो. साठे
२ यशोदा सोसायटी वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई २८
संपादक
आजचा सुधारक
आगरकर-वाङ्मयातील एक कूटस्थळ” (आ. सु. ६:३३९) या आपल्या लेखासंबंधी थोडेसे.
गोपाळ गणेश आगरकर हे स्पष्ट विचार करून आपली मते परखडपणे मांडणारे एकांडे शिलेदार होते. परंतु आगरकर तत्त्वज्ञ होते काय?ते तसे नसण्याची संभावनाच अधिक. आगरकर समाजचिंतक व समाजसुधारक होते व समाजाच्या अधोगतीला कारणीभूत असणार्यार धार्मिक श्रद्धांना व कर्मकांडांना त्याचा प्रखर विरोध होता.
त्यांच्या लिखाणातील “अहं ब्रह्मास्मि’ या वचनावरून गोंधळण्याचे काही कारण नाही. आगरकरांचा ब्रह्म या संकल्पनेवर मुळीच विश्वास नसणार, तद्वतच आत्मा, द्वैत-अद्वैत या कल्पनाही त्यांना निरर्थकच वाटत असणार. आजही असे मानणारे स्वतंत्र बुद्धीचे विचारी लोक आहेतच ना!
परंतु विश्वाचे स्वरूप जाणण्यासाठी वेदान्ताचे तत्त्वज्ञान हा एक मुख्य पर्याय आहे यावर बहुसंख्य विचारवंताची निष्ठा आहे हेसुद्धा आगरकरांना ठाऊक होते. (हा रानडे, टिळक आदि तत्कालीन सनातन्यांवर एक तिरपा बाण असण्याची शंकाही मनात डोकावते!) मात्र वेदान्त भाबड्या श्रद्धेऐवजी, प्रखर बुद्धिनिष्ठ आधारावर आधारित आहे असे त्यांचे मत असावे. श्री. यशवंत सुमंत यांनी म्हटल्याप्रमाणे (आ. सु., ६ : ९८) आगरकर वेदान्तविचारास धर्मचिकित्सेचा अंतिम निकष मानीत असणेही संभवते. त्यामुळे वेदान्तविचार हा सर्व मिथ्या आणि भ्रामक विचारांची अग्निपरीक्षा करणारी भट्टी असून, आत्मा, परमात्मा, ब्रह्म या सर्व कल्पना या भट्टीतून तावून सुलाखून निघू शकत नाहीत तर भस्मसात होतात असे त्यांना वाटत असावे. परंतु मग ब्रह्म म्हणजे काय उरते व धर्म या संकल्पनेचे काय?असे प्रश्न लोकांना पडणारच हे त्यांना अपेक्षित होते. व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने, आचारविचाराने आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन विश्वातील आपले स्थान व भूमिका निश्चित करू शकते, म्हणजेच व्यक्ती “मीच ईश्वर व मला योग्य वाटते असे वर्तन म्हणजेच धर्म” अशा निर्णयाप्रत पोहचू शकते. ज्या व्यक्तीला हा आत्मबोध अथवा जाणीव झाली तीस लौकिक अर्थाने प्रचलित धर्माचे काहीच महत्त्व उरत नाही. मी स्वतःच ब्रह्म आहे आहे असे मानण्यात कोणता उद्धटपणा आहे? ब्रह्म हे व्यक्तींच्या डोक्यातून, श्रद्धेतून निघालेले खूळ आहे हे सांगण्यासाठी.“मी स्वतःलाच ब्रह्म मानतो” असे सरळ आणि खणखणीतपणे त्यांनी बजाविले आहे. आजही असे स्पष्टपणे म्हणणारे लोक आहेतच.
आपण आपल्या लेखातील शेवटच्या वाक्यात सूचित केले आहे तेच खरे आहे. धर्मविचाराचा फोलपणाच त्यांनी तत्कालीन लेखनशैलीत व्यक्त केला आहे. साध्यासोप्याविचारांना, निष्कारण तत्त्वचिंतनात गुरफटून व्यक्त करणाच्या सामान्य वृत्तीवरील ती एक * व्याजोक्तीच म्हणता येईल.
र. वि. पंडित
तेजस्’,१४६ पावनभूमी लेआउट वर्धा मार्गाजवळ, सोमलवाडा, नागपूर-२५

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.