पत्रव्यवहार

सम्पादक, आजचा सुधारक ह्यांस,
आपण आपल्या नियतकालिकाच्या एप्रिल १९९६ च्या अंकात प्रा. स. ह. देशपांडे ह्यांच्या भूमिकेचा जो प्रतिवाद केला आहे त्यासंबंधी काही शंका. ह्या शंकाच आहेत ह्याचा विसर न व्हावा.
(१)“एका बाजूला धर्मसंस्थापक ईश्वर असल्यामुळे…” ह्या शब्दांनी सुरू होणारा तुमचा तर्क घ्या. त्यात ईश्वर व प्रेषित हे शब्द येतात. आता ह्या संज्ञा सेमिटिक धर्मातल्या आहेत; पौर्वात्य धर्मपरंपरात त्या नाहीत, किंवा ईश्वराच्या संकल्पनेत उभय परंपरांत मूलभूतफरक आहे हे लक्षात घेतले तर धर्मसुधारणा अशक्य आहे किंवा तो व्याघात आहे असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरते? थोडक्यात आपल्या परिस्थितीशी व आपल्या वैचारिक वारशाशी जुळणारे विवेकवादी तर्कशास्त्र मांडायला नको का? (धर्मसुधारणा हा व्याघात असेल कदाचित्, पण विवेकवादसुधारणा हा तरी व्याघात ठरू नये!)
(२)सांख्य दर्शन निरीश्वरवादी आहे. ज्या धर्माला मान्य असणारी दर्शने निरीश्वरवादी असू शकतात त्या धर्मात धर्मसुधारणा हा व्याघात आहे हे कसे सिद्ध होते? तुम्ही दिलेला तर्क मग अपुरा तर ठरतोच, पण काही प्रमाणात निरुपयोगीही ठरतो. एरवी यूरपला ज्ञात व मान्य असणारे धर्माचे स्वरूप हेच धर्माचे सर्वत्र स्वरूप असते अशी(वरवर अश्रद्धेचा पुरस्कार करणारी पण प्रत्यक्षात) सश्रद्ध व विवेकविरुद्ध भूमिका तुम्ही घेत आहात असे नाइलाजाने म्हणावे लागते.
(३)प्रत्यक्षात हिंदूही त्यांच्या धर्माचा विचार आजसेमिटिकधर्मविचारात शोभेल अशा परिभाषेत करतात हे खरे. पण मग तोवरधर्मसुधारणा शक्य नाही असे फार तर म्हणता येईल. परंतु शास्त्रार्थाच्या अंगाने धर्मसुधारणा हा वदतोव्याघात आहे असे म्हणता येणार नाही. तसे काही म्हणायचे तर भारतीय धर्मविचार काय आहे व त्या विचाराच्या चौकटीत धर्मसुधारणा अशक्य आहे हे मांडण्याचा फार मोठा खटाटोप करावा लागेल. तसा काही प्रयत्न आगरकरादींनीही केलेला दिसत नाही. फुल्यांचा अपवाद करावा लागेल. ह्याचे कारण एकोणिसाव्या शतकात तरी सत्य धर्म व भटाब्राह्मणांनी हेतुपुरस्सर व स्वहितेच्छु भूमिकेतून केलेला धर्मविपर्यास अशी मांडणी करणारे ते पहिले व एकटे विचारवंत आहेत. बाकीची मंडळी तत्कालीन रूढी-परंपरा व त्या बळकट करणार्याह श्रद्धा एवढा मर्यादित परिघ समोर ठेऊन मांडणी करताना दिसतात. हा धर्मविषयक विचार नव्हे हे तुम्हालाही मान्य व्हायला हरकत नाही.
(४)व्याघात हा वैचारिक व संकल्पनाविशिष्ट असतो हे खरे आहे; पण ज्या संकल्पना किंवा जे विचार इतिहास व परिस्थितिसापेक्ष असतात त्यातले व्याघात परिस्थिती व इतिहासनिरपेक्ष असतात असे कसे म्हणता येईल? स. ह. देशपांड्यांचा “धर्मसुधारणा ही प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी गोष्ट आहे त्यामुळे तिच्यात व्याघात आहे असे म्हणणे बरोबर नाही” हा तर्क त्यामुळेच बाद ठरत नाही. तुम्ही देता त्यापेक्षा काही निराळे व सविस्तर उत्तर त्याना देणे आवश्यक आहे. ते काय असू शकेल ते मला सांगता यायचे नाही, कारण माझ्या दृष्टीने आपल्या देशात विवेकवाद ही काहीशी कट्टरवादाकडे झुकणारी श्रद्धा होऊन बसली आहे. विवेकवादाच्या तार्किक मर्यादा तुम्ही ध्यानात घ्यायला तयार नाही असे तुमचे या विषयावरचे लेखन वाचताना पुनः पुनः जाणवते.
(५)भांडवलशाहीच्या विकासामुळे ‘रीझन्’/विवेक हे मूल्य यूरपमध्ये स्थिरावले आहे. जिथे तो विकास झालेला नाही किंवा पुरेसा झाला नाही तिथे ते स्थिरावलेले नाही.भांडवलशाहीच्या उदयाचा व विकासाचा संबंध वेबर व टॉनी ह्या विचारवंतांनी यूरपमधल्या धर्मपरंपरांशी जोडला आहेच. धर्म विरुद्ध विवेक इतके सोपे गणित मांडता येत नाही. स्तालिनप्रणीत व स्तालिनवादी प्रयोग फसले ह्याचे एक कारण ते सदोष होते हे खरेच आहे. पण तो दोष कोणता असावा ह्याचा बारकाईने विचार केला तर (तुम्ही मांडलेले ढोबळ दोष जमेस धरूनही) विवेक /रीझन् हे इतिहासनिरपेक्ष मूल्य असते, असू शकते व समाजांचा ‘रीझन्’ हे इतिहासनिरपेक्ष मूल्य असते, असू शकते व समाजांचा ‘रीझन्’ च्या दिशेने होणारा प्रवास हा एक ज्ञात तेलोस् कडे एका ज्ञात मार्गाने होणारा प्रवास आहे असे मानणे हा आहे हे लक्षात येईल. ह्या प्रवासाच्या बाबतीत विवेकवादी भूमिका काय आहे, आपल्यासारख्या समाजात काय असायला हवी, हेच मुदलात स्पष्ट झालेले नाही. परिणामी भांडवलशाही- विवेक/रीझन्ऐतिहासिक विकासक्रम हे त्र्यैक्य (trinity) दुर्लक्षिले जाते. ऐतिहासिक विकासक्रमात धर्मसुधारणा शक्य नाही किंवा बसत नाही असे म्हणणे ऐतिहासिक तर्कशास्त्र नाकारण्यासारखेआहे. पर्यायाने विवेकवादाचे नाव घेऊन विबेकविरोध मांडणे आहे.
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे
११५, उत्तराखण्ड जे. एन्. यू. नवी दिल्ली – ११००६७.
—————————————————
डॉ. गो. पु. देशपांडे यांचे एक पत्र वर प्रकाशित केले आहे. त्यात त्यांनी प्रा. स. ह. देशपांडे यांना मी दिलेल्या उत्तराविषयी काही शंका व्यक्त केल्या आहेत. माझ्या लेखाची दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांना उत्तर म्हणून पुढील शब्द लिहितो.
(१) त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की मी माझ्या उत्तरात केलेला ‘एका बाजूला धर्मसंस्थापक ईश्वर असल्यामुळे …’ असा उल्लेख सेमिटिक धर्मांना लागू पडत असला तरी ईश्वर किंवा प्रेषित या गोष्टी पौर्वात्य परंपरांत येत नाहीत. त्यामुळे वदतोव्याघाताचा माझा आरोप बरोबर नाही. हिंदू धर्माला संस्थापक ईश्वर नाही, आणि त्यात प्रेषितही नाही हे म्हणणे तांत्रिकदृष्ट्या खरे आहे हे मी मान्य करतो. पण ज्या वेद आणि उपनिषदांपासून हिंदू धर्माची उत्पत्ती झाली आहे त्या श्रुती अपौरुषेय आहेत असे मानतात. म्हणजे त्या अतिनैसर्गिक (supenatural) आहेत हे लक्षात घेतले तर माझा आक्षेप त्यांनाही लागू पडतो हे उघड आहे. ज्याचा उगम अपौरुषेय आहे त्यात सुधारणा करण्याचे धाष्र्ण्य मानवांनी करावे हे उघडच अनधिकाराचे होईल. म्हणून धर्मात सुधारणा करतो असे मनुष्याने म्हणणे त्याचे अपौरुषेयत्व
नाकारणेच होय.
(२) सांख्यदर्शन हे एक वैदिक दर्शन आहे. ते जरी निरीश्वरवादी असले तरी श्रुतींचा अधिकार अमान्य करीत नाहीत. खरे म्हणजे सांख्यदर्शनाची बीजे काही उत्तर उपनिषदांत आढळतात. आणि सांख्यच कशाला, खुद्द वेदांतही अंततः ईश्वर मानत नाही, आणि पूर्व मीमांसाही निरीश्वरवादीच आहे. पण ती सर्व दर्शने श्रुतींचे प्रामाण्य मान्य करतात आणि धर्माचे मूळ श्रुतींत आहे असे म्हणतात. त्यामुळे सांख्यांचे निरीश्वरवादित्वधर्मसुधारणा करणारे होते असे म्हणता येणार नाही.
(३) छेदक (५) पाहावा.
(४) धर्मसुधारणा कोणत्या अर्थाने वदतोव्याघात आहे हे आता स्पष्ट झाले असेल.
‘विवेकवादाच्या तार्किक मर्यादा तुम्ही ध्यानात घ्यायला तयार नाही असे आपण म्हणता’. पण त्या मर्यादा काय आहेत त्या एकदा कळू द्या. या बाबतीत आपल्याकडून अपेक्षा करावी काय?
(५) ‘विवेक’ ही गोष्ट यूरपमध्ये स्थिरावली आहे ती भांडवलशाहीच्या विकासामुळे हे कदाचित् खरे असेल. पण त्याने भांडवलशाहीशिवाय विवेक स्थिरावू शकत नाही असे म्हणता येणार नाही. निदान विवेकवादाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न करण्यास काही हरकत असण्याचे कारण नाही. ‘विवेकवादी भूमिका आपल्यासारख्या समाजात काय असायला हवी हे मुदलात स्पष्ट झालेले नाही’ हे आपले म्हणणे आश्चर्यचकित करणारे आहे. कारण विवेक म्हणजे काय याचे उत्तर अगदी संक्षिप्त आणि स्पष्ट आहे. आपण कशावर, कोणत्या विधानावर विश्वास ठेवावा याचे उत्तर सरळ आहे. ज्याला पुरावा असेल त्याचा त्या पुराव्याच्या प्रमाणात स्वीकार करणे. हे शिकविण्यास किंवा आचरण्यास ऐतिहासिक विकासक्रम इत्यादि गोष्टींचा विचार अवश्य आहे असे मला वाटत नाही.
(६) शेवटी एक गोष्ट सांगणे अवश्य आहे असे दिसते. माझा लेख बराचसा औपरोधिक होता. धर्माची उत्पत्ती परमेश्वर, प्रेषित किंवा अपौरुषेय (म्हणजे काय कोणाला ठाऊक?) असे एकदा मानले की धर्म परिपूर्ण आहे हे मान्य करावे लागते, आणि त्यात सुधारणा करण्याची भाषा त्याची परिपूर्णता नाकारणारी होते. एवढेच मला प्रामुख्याने सुचवायचे होते, खरी गोष्ट अशी आहे की धर्म मनुष्यकृत आहे आणि म्हणून त्यात हस्तक्षेप करण्यास कसलीही हरकत नाही. पण हे एकदा मान्य केले की धर्माचे प्रामाण्य नाकारावे लागते, आणि विवेकाचे प्रामाण्य स्वीकारावे लागते. ते स्वीकारावे आणि मग सुखेनैव सुधारणा करावी!
-दि. य. देशपांडे
संपादक आजचा सुधारक
नागपूर यांस, सादर नमस्कार,
श्री. घोंगे यांच्या ‘हिंदुत्व-अन्वेषण’ उत्तरार्ध यावरील माझे विचार खाली देत आहे.
उत्तरार्धात् तात्पर्य काढून श्री. घोंगे यांनी ‘हिंदुत्व-अन्वेषण’ हा विषय संपवला आहे. तात्पर्य काढल्यामुळे एक बरे झाले की त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे ठेवली आहे. ती तशी
आहे हे दोन्ही लेख वाचून निश्चित आहेच. तरी पण तात्पर्य काढल्यामुळे त्यांना नेमके काय म्हणायचे आहे याचा बोध घेण्यास किंवा त्या अनुषंगाने चर्चा करण्यास हरकत नसावी.
तात्पर्यातून तर्क लावून त्यांनी रावणाला हिंदू ठरवला आहे. मला वाटते की रावण हा हिंदू होता की राम हा हिंदू होता हा वादच निरर्थक आहे. खरे तर रामायणकाळी कोणीच हिंदू या शब्दाने ओळखले जात नसावेत. आणि परंपरा ‘हिंदू’ होती असे समजायचे झाल्यास दोघेही हिंदूच होते असे म्हणावे लागेल. उपासनापद्धतीचा आधार घेऊन कोण हिंदू आणि कोण हिंदू नाही हाही वाद निरर्थक ठरेल. आजपावेतो हिंदुधर्मात इतक्या उपासना पद्धती, इतके पंथ निर्माण झाले आहेत आणि ते सर्वच स्वतःला हिंदुधर्मीयच समजत असल्यामुळे हा वाद लांबवावा तितका लांबेल. या अनुषंगाने वाचनात आलेल्या महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकाच्या दि. १६ फेब्रु. ९६ या अंकातील लोकसभा ९६’ या सदराखाली श्री. विश्वास पाटील यांच्या लेखाचा नुसता उल्लेख करतो. मूळ लेख विस्तृत असल्यामुळे त्यातील एकदोन वाक्येच येथे देतो.“हिंदूमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य असे शेकडो पंथ आहेत.”हिंदू धर्मात सतत नवेनवे गुरू येतात, नवा पंथ स्थापतात. हे पंथ एका समान मताप्रत येऊ शकतात काय? … हिंदू हे मूलत:च प्लूरलिस्ट’ आहेत. यावरून रावण हिंदू होता की राम हिंदू होता हा वाद किती निरर्थक ठरेल याची कल्पना यावी. पण मला वाटते की या तात्पर्याद्वारे श्री. घोंगे यांना वेगळेच सुचवायचे आहे.आणि ते म्हणजे रावण हा हिंदूचे दैवत ठरू शकेल. कारण आधीच त्यांनी म्हटले आहे की राम हा हिंदूचे दैवत ठरू शकत नाही. नसेलही कदाचित. त्यामुळे फारसे बिघडणार नाही. पण एक मात्र नक्की की रावणाच्या हिंदू असण्यामुळे जेवढे बिघणार नाही त्यापेक्षा जास्तच त्याच्यादैवत” असल्यामुळे बिघडेल. अर्थात् मला या विषयात खोलात जाण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण चर्चा ‘हिन्दुत्व अन्वेषणाची’ आहे, ‘हिंदुधर्माची’ नाही.
पण नेमका इथेच माझा श्री. घोंगे यांच्याशी विरोध आहेत. त्यांनी ‘हिन्दुत्व अन्वेषण करता करता ‘हिंदुधर्म अन्वेषण’ सुरू केले आहे. त्यांच्या समजुतीनुसार हिंदुत्व आणि हिंदुधर्म या दोन वेगळ्या संकल्पना नसून एकच असाव्यात. म्हणूनच सगळा घोटाळा आहे. पुन्हा एकदामला स्वा. सावरकरांच्याच पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की ‘हिंदुत्व याचा अर्थ कांही हिंदुधर्म या शब्दाशीही पुष्कळ लोकसमजतात तसा समान नाही.
… हिंदुत्व हा काही शब्द नाही, तर इतिहास आहे. काही वेळेला काही लोक हिंदुत्व या शब्दाचा हिंदुधर्म या सापेक्ष नावाशी घोटाळा करून केवळ धार्मिक किंवा आत्मिक इतिहास समजतात तसा नाही, तर हा इतिहास सर्वांगीण आहे.” श्री. घोंगे यांनी या संदर्भात किंवा संदर्भाने हिन्दुत्वाचे अन्वेषण करण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चित कांही नवीन माहिती पुढेआणल्याचे श्रेय मिळू शकले असते. पण त्यांनी वेगळाच मार्ग चोखाळत जी दिशाभूल करणारी विधाने केली आहेत त्यापैकी एका संदर्भात जाने. ९६ च्या सुधारक’ च्या अंकातीलच श्री. प्र. ब. कुळकर्णी यांच्या लेखातील एक वाक्य उधृत करतो. “हिंदुत्वाचे अन्वेषण करणारे जे विद्वान झोपडपट्टीपर्यंत जातांना हिंदुत्ववाद्यांच्या पायाला माती लागते म्हणून टोमणे मारतात त्यांनी अवश्य वाचावा असा हा लेख आहे तळागाळातल्या मानवाचे मानसिक आणि आर्थिक प्रश्न समजावून घेण्यासाठीच नव्हे तर सोडविण्यासाठी या हिन्दुत्ववाद्यांचे पंचवीस हजार प्रकल्प चालू आहेत हे त्यांना माहीत नाही हे उघड आहे. वास्तविक ‘हिन्दुत्वाचे अन्वेषण करताना हिन्दुत्ववाद्यांवर घसरण्याची फारशी आवश्यकता नव्हती. विषयाचे विवरण स्वतःला सोयीस्कर असे करण्याचे स्वातंत्र्य श्री. घोंगे यांना अवश्य असावे. पण हिंदुत्वाचे अन्वेषण करता करता हिंदुधर्माचे अन्वेषण करण्याची आवश्यकता नव्हती. रावण हा हिंदू होता की राम हा हिंदू होता याच्या तपशिलात जाण्याची गरज नव्हती. हिंदुधर्माविषयी श्री. घोंगे यांचा अभ्यास माझ्यापेक्षा शतपटीने जास्त असेल. तरीही या संदर्भात आणखी वाक्ये इथे देण्याचा मोह आवरत नाही.हिंदुधर्म हा काही राजकीय धर्म नाही. एकच एक सिद्धांताचा धर्म किवा संघटना नाही. परंतु देशाच्या राजकीय इतिहासात देशात ऐक्य स्थापन करण्याचे प्रयत्न करण्यास पुष्कळदा या धर्माचे सहाय्य झाले आहे…. अन्य धर्माप्रमाणे हिंदूधर्म हा सिद्धांत व काटेकोर नियम यांनी बांधलेला धर्म नाही, तर तो एक सामाजिक संघटनेचा प्रकार आहे…’ ही वाक्ये आहेत डॉ. राम मनोहर लोहियायांची.
आता श्री. घोंगे यांच्या आणखी ऐका विपर्यस्त विधानाकडे वळतो.‘संस्कृत ही भाषा उच्चारदोषातून निर्माण झालेली आहे.’मी भाषाशास्त्राचा अभ्यासक अजिबात नाही. म्हणून मला दुसर्याषच्या आधारे किंवा त्याच्या शब्दातच स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. मराठी भाषा उद्गमआणि विकास’ हा ग्रंथ माझ्या वाचनात आलेला आहे. लेखक. डॉ. कृ. पां. कुळकर्णी. भाषेच्या संदर्भातील त्यांची वाक्ये अशी, “आत्मप्रकटीकरण आणि आत्मनिवेदन (self-expression and self-communication) या दोन गोष्टी भाषेच्या मुळाशी असतात. … हा साचा म्हणजेच त्या माणसाची भाषा”. यावरून मी एवढेच अनुमानकाढतो की कोठलीही भाषा हीउच्चारदोषातून निर्माण झालेली नाही. एका भाषेतले शब्दोच्चार दुसर्याढ भाषेत जाताना दोषास्पद होत असतील. पण म्हणून भाषा उच्चारदोषातून निर्माण होते हे विधान कसे मान्य होईल? संस्कृत भाषेत परभाषिक शब्दांचा दोषास्पद उच्चार होत असेल, पण म्हणून संस्कृत ही भाषाच उच्चारदोषातून निर्माण झाली आहे हे विधानधाष्ट्र्याचे वाटते. श्री. कुळकर्णी यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, “भाषा दिवसानुदिवस अपभ्रष्ट होत चालली आहे असे म्हणण्यापेक्षा भाषा परिणत होत चालली आहे, तिचा विकास होत आहे असे म्हणणेच जास्त सयुक्तिक आहे. पाणिनीच्या धातुपाठात अदमासे २२०० धातु परिगणले आहेत. भाषेत जितके धातू अधिक तितक्या त्या लोकांच्या क्रिया अधिक, जितक्या क्रिया अधिक तितका त्यांचा व्यवहार अधिक. जितका व्यवहार अधिक तितकी त्या लोकांत सुधारणा अधिक… धातूंना भाषिक महत्त्व तरआहेच पण त्यांना सांस्कृतिक महत्त्वही आहे. या वाक्यांवरून तरी संस्कृत भाषेचे महत्त्व सहज सिद्ध व्हावे आणि ‘साच्या संज्ञांचा अर्थ संस्कृत भाषेच्या गोतावळ्यातून शोधण्याचा दुराग्रह चालू ठेवण्यास हरकत नसावी. पुढे जाऊन असेही म्हणेन की मूळ आर्य भाषा किंवा आर्योद्भव भाषा हा जर भाषासंघ मानला तर इराणी पांढराघोडा संस्कृतात अश्व झाल्याबद्दल खेद मानण्याचे कारण नाही. संस्कृत भाषेतल्या गंगा, अश्व अशा शब्दांच्या परकीयपणावरून त्यांची हकालपट्टीही करायला नको. किंवा त्या शब्दांमुळे ‘हिंदुत्वही’ हिणकस ठरण्याचा संभव नाही.
इतिहासपुनर्लेखना संदर्भात श्री. घोंगे यांनी एक चमत्कारिक विधान केले आहे “हा भारतीय समाज एकसंघ आणि सामंजस्याच्या वातावरणात नांदावा अशी प्रामाणिक इच्छा असेल तर सर्वप्रथम गेल्या पाऊणशेवर्षात निर्माण झालेल्या इतिहासाच्या ग्रंथांची होळी करणे आवश्यक आहे.” मी या वाक्याशी सहज सहमत होऊ शकत नाही. इतिहासपुनर्लेखन वादाचा विषय होऊ शकेल, पण इतिहास नाही.“राष्ट्राच्याइतिहासात” पराभवाच्या जळणाच्या स्मृती यांनाही महत्त्व असते. सुप्त ज्वालामुखीप्रमाणे आतल्या आत खदखदणारा जो वैराचा दीप्त लीव्हा असतो त्यालाही महत्त्व असते. पराभवाच्या स्मृती जतन करून शतकानुशतके जळणारी, खदखदणारी मने जर नसती तर पराभूत गुलाम राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्यांना अर्थच आला नसता…. मानवी जीवनाच्या इतिहासात सूड या कल्पनेलाही एक महत्त्व आहे याची नोंद ठेवलीच पाहिजे. हे सूडाच्या इच्छेचे समर्थन नव्हे, पण सूडाच्याही इच्छा असतात याचे भान बाळगणे आवश्यक असते.’ (ले. डॉ. नरहर कुरुंदकर). तेव्हा इतिहासपुनर्लेखन टाळले तरी इतिहास कसा विसरता येईल. आणि अभ्यासक्रमातून हा विषय हद्दपार करणे कितपत आवश्यक ठरेल?
शेवटी पुन्हा एकदा नमूद करतो की श्री. घोंगे यांनी ‘हिंदुधर्म’ आणि ‘हिदुत्व’ यांची अकारण सरमिसळ केलेली आहे. हिंदुत्वाचे अन्वेषण करता करता त्यांनी हिंदुधर्मावरच टीकाटिप्पणी फार केली आहे. हिंदुधर्मासंबंधात किंवा संस्कृत भाषेबद्दल त्यांनी वेगळे विचार जरूरमांडले असतील, पण ते जास्त फसवे आहेत. मीही या फसव्या शब्दांचा आधार घेत माझी प्रतिक्रिया संपवतो. श्री. घोंगे यांच्या मताप्रमाणे गंगा हा शब्द खोंग या तिबेटी शब्दापासून निर्माण झालेला असावा. त्यांच्याच स्पष्टीकरणाप्रमाणे इंडोतिबेटी भाषा गटात कोणत्याही वाहत्या प्रवाहाला ‘खोंग’ म्हणतात. शाब्दिक चावटीचाच आश्रय घेत मी असे म्हणतो की खोंग शब्दापासून गंगा शब्द निर्माण झाला तर सिंधू-ब्रह्मपुत्रा हे शब्द कोणत्या तिबेटी शब्दापासून निर्माण झाले? कारण सिंधू-ब्रह्मपुत्रा या नद्याही तिबेटमध्येच उगम पावतात. त्यांनाही तिबेटी भाषेत खोंग म्हणतात का? मग सिंधू-ब्रह्मपुत्रा ही नांवे केव्हाची? गंगेचा उगम उ. प्रदेशच्या कुमाँऊ भागात हिमनदीच्या टोकाशी हिमगुहेतून होतो. मला वाटते की उगमापाशी तिला भागीरथी म्हणतात. पुढे तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा दुसरा प्रवाह मिळतो. या संयुक्त प्रवाहाला गंगा हे नांव प्राप्त होते. मग प्रत्यक्षात खोंगपासून गंगा झाली असे कसे मानायचे? ऋग्वेदातही गंगेचा उल्लेख आहे. मग ऋग्वेदकाळीच इंडोतिबेटी भाषेच्या माध्यमातून खोंगची गंगा झाली का? माझे कुतूहल दुर्लक्षणीय न ठरो.
सदाशिव गोविंद साठे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.