नियमांचे दोन प्रकार – नैसर्गिक आणि रूढ

‘पाणी उंच प्रदेशाकडून सखल प्रदेशाकडे वाहते’हा नियम आहे. तसेच ‘वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने हाकावीत’ हाही नियम आहे. ते नियम आहेत अशा अर्थाने की दोन्हींत एकविधता (uniformity) आहे, एकात घटनांची एकविधता तर दुसर्याहत कृतींची एकविधता.
पण एवढे साम्य सोडले तर वरील दोन नियमांत फार अंतर आहे. पाण्याविषयीचा नियम म्हणजे निसर्गात प्रत्यक्ष आढळणारी एकविधता आहे, तर वाहनांविषयीच्या नियमात वाहन चालकांनी पाळावयाची एकविधता आहे. निसर्गात आढळणारी एकविधता कुणी निर्माण केलेली नसते, तो वस्तूंचा निसर्गसिद्ध स्वभाव असतो. पण वाहनांविषयीचा नियम निसर्गसिद्ध नाही; तो मनुष्याने मनुष्यांवर लादलेला असतो, आणि त्याचा भंग केल्यास त्याबद्दल शिक्षेची तरतूद केलेली असते. पहिल्या प्रकारच्या नियमांना नैसर्गिक नियम (laws of nature) असे नाव असून दुसन्या प्रकारच्या नियमांना राज्याचे नियम किंवा कायदे असे म्हणतात. या दुसर्यास प्रकारच्या नियमात चालीरीती, रूढी यांचाही अंतर्भाव होतो. त्या सर्वांनाच रूढी हे नाव देता येईल, कारण राजकीय नियमही सामाजिक नियमांप्रमाणेच एका अर्थी रूढ केलेलेच नियम असतात.
नैतिक नियमांचाही या दुसर्या प्रकारात अंतर्भाव करावा लागतो. कारण तेही माणसे निसर्गतः पाळत नाहीत; ते प्रयत्नपूर्वक पाळावे लागतात. या नियमांना आदर्शात्मक (normative) नियम म्हणतात. त्या सर्वांत कर्माचा एकेक आदर्श समाविष्ट असतो. उदा.‘खरे बोलावे,’ ‘अहिंसा पाळावी’.आदर्शात्मक नियमांना विधी म्हणतात, आणि भाषेत त्यांचे ग्रथन विध्यर्थी क्रियापदाच्या साह्याने करावे लागते. उदा. अमुक कर्म करावे.’ उलट नैसर्गिक नियम निवेदक (indicative) विधेत व्यक्त होतात. उदा.‘पाणी १००° सेंटिग्रेड उष्णतेवर उकळते.’
प्राचीन मानवाची प्रवृत्ती नैसर्गिक नियम सामाजिक नियमांसारखेच कायद्याच्या (विधींच्या) स्वरूपाचे आहेत असे मानण्याची असते. म्हणून निसर्गाच्या नियमांना कायदे म्हणण्याची आणि त्यांचा कोणी भंग केल्यास शिक्षा होते असे मानण्याची उदाहरणे प्राचीन साहित्यात आढळतात. ईश्वराने जग निर्मिले तेव्हा त्याने काही कायदे त्यात प्रस्थापित केले. उदा. ग्रहांना त्याने अशी ताकीद दिली की त्यांनी विशिष्ट पद्धतीनेच भ्रमण करावे. परंतु ग्रहांचे भ्रमण ठराविक नियमांनी होते याचे कारण ते बुद्धिपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक ते नियम पाळतात म्हणून नव्हे. पण राजकीय नियमांचे पालन बुद्धिपूर्वक, प्रयत्नपूर्वक करावे लागते.
म्हणून या दोन प्रकारच्या नियमांची भाषाही वेगळी आहे. निसर्गाचे नियम ‘अमुक प्रकारच्या वस्तूंच्या हालचाली अमुक पद्धतीने होतात’ असे वर्णनात्मक शैलीत असतात. ते विध्यर्थी शैलीत असत नाही. कारण त्यांच्या बाबतीत नियमबाह्य घटनेची शक्यताच नसते; म्हणून वस्तूंच्या हालचाली अमुक नियमांप्रमाणे होतात असे आपण म्हणतो, त्या नियमाप्रमाणे व्हाव्यात असे म्हणत नाही. नैसर्गिक नियमाला अपवाद संभवत नाही. त्याला जर अपवाद आढळला तर त्याचे नियमपणच नाहीसे होते. निसर्गनियम निरपवादअसतात.
राजकीय, सामाजिक किंवा नैतिक नियमांचे स्वरूप कोणीतरी लादलेल्या एकविध आचरणाचे असते. ते माणसे पाळू शकतात, आणि त्यांचा भंगही करू शकतात. नैतिक नियमाचा भंग झाल्याने त्याचे नियमत्व नष्ट होत नाही; भंग करणार्याू व्यक्तीला शिक्षा केली जाते, आणि या प्रकारे नियम अस्तित्वात आहे हे प्रस्थापित केले जाते.
प्राचीन मानवाची स्वाभाविक कल्पना निसर्गाचे नियम ईश्वराने घालून दिलेले आहेत अशी असते. त्याच्या श्रद्धाभिमुख आणि भाबड्या मनाला निसर्गनियमांची प्रतिष्ठा फार वाटते. या श्रद्धेतूनच सामाजिक नीतीचे नियम नैसर्गिक नियमांसारखेच आहेत असे मत प्रसृत होते. त्यामुळे काही तत्त्वज्ञांचे मत असे असते की नैतिक नियम नैसर्गिक नियमांवर आधारावेत. उदा. निसर्गात सर्वत्र ‘जीवो जीवस्य जीवनम्’ हा न्याय दिसतो. मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो असा मात्स्यन्याय सगळीकडे प्रचलित आहे. म्हणून तोच नियम नीतीतही असावा असे मत अनेक तत्त्वज्ञांनी व्यक्त केले आहे. निसर्गात क्षमतम प्राणीच फक्त टिकून राहतात, दुर्बळ प्राणी नष्ट होतात; म्हणून मानवसमाजातही तसाच नियम स्वीकारला जावा अशी हिंसक स्पर्धेची भलावण अनेक करतात. या प्रकारच्या प्रथा काही ठिकाणी प्रत्यक्ष अस्तित्वातही होत्या असे दिसते. उदा. प्राचीन ग्रीसमध्ये स्पार्टानावाच्या नगरराज्यात हे मत बन्याच प्रमाणात अमलात आणले जात असे. अशक्त बालके टाकून देण्याची प्रथा स्पार्टात होती.
यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो? नैसर्गिक नियम आणि राजकीय नियम यांच्यात काही संबंध असू शकेल काय?वर उल्लेखल्याप्रमाणे एकमत असे आहे राजकीय नियम नैसर्गिक नियमांच्या आधारे बनविले पाहिजेत.‘निसर्गाकडे चला’ अशी हाक देणार्या् मंडळींचे हेच मत असते. पण हे मत ‘नोऽपपद्यते’ (non sequester – does not follow) चे उदाहरण आहे. अमुक अमुक गोष्ट नैसर्गिक आहे, म्हणून ती योग्य आहे असा हा युक्तिवाद आहे. पण त्याचा निष्कर्ष साधकापासून (premise) कसा निघू शकेल हे सांगणे कठीण आहे.
आणि खरे म्हणजे ‘आहे’ वरून ‘असावे’ हा निष्कर्ष, किंवा अस्ति’ वरून ‘तव्याचा निष्कर्ष निघू शकतो (from is’ `ought follows ) हे मत एक मोठा तर्कदोषआहे ही गोष्ट इतिहासात वारंवार दाखवून झाली आहे. तिचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे डेव्हिड ह्यूम’ या ब्रिटिश तत्त्वज्ञाचे पुढील वचन देता येईल. तो म्हणतो : ‘नीतिशास्त्रीय ग्रंथांत मला असे दिसते की आरंभी लेखक सर्वसाधारण पद्धतीने सुरुवात करतो, आणि ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करतो किंवा मानवी व्यवहारासंबंधी काही विधाने करतो, आणि नंतर एकाएकी ‘आहे’ आणि ‘नाही’ या शब्दांऐवजी ‘असावे’ आणि ‘नसावे’ अशी वाक्ये उच्चारू लागतो. हा बदल प्रथम लक्षात येत नाही इतक्या बेमालूम पद्धतीने होतो; पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि त्याचे स्पष्टीकरण करणे अवश्य आहे; आणि हे नवीन प्रकारचे निष्कर्ष सामान्य (निवेदक) भाषेतून कसे निघू शकतात हे दाखविले पाहिजे.’ हे दाखविणे अशक्य आहे असे मत सामान्यपणे व्यक्त केले जाते. या मताला Autonomy of Morals” (नीतीची स्वायत्तता) असे नाव असून त्याचे प्रतिपादन असे आहे की नैतिक अवधारणे (judgments) नैतिक वास्तवावर आधारली जाऊ शकत नाहीत.
पण नैतिक नियम नैसर्गिक नियमांवर आधारले जात नसतील तर ते कशावर आधारलेले असतात?
पण हा वेगळा आणि फार मोठा प्रश्न आहे. त्यासंबंधी पुढे केव्हा तरी.
१ थोर ब्रिटिश तत्त्वज्ञ (१७११-१७७६). काहींच्या मते सर्वश्रेष्ठ ब्रिटिश तत्त्वज्ञ.
धर्मनिरपेक्षता आणि शासनसंस्थाःधर्मनिरपेक्षता-संकल्पनेचा इतिहास
– रा. प. नेने
धर्मनिरपेक्ष शासन हे धर्मनिरपेक्षता या व्यापक संकल्पनेचे अविभाज्य अंग आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मविहीनता नव्हे किंवा धर्मविरोधही नव्हे, धर्माचा तिरस्काराने उच्छेद करणे हे तर निश्चितच नव्हे.
धर्मनिरपेक्ष-शासनाचा तीन अंगांनी ऊहापोह केला जातो. धर्म आणि व्यक्ती यांचा संबंध, शासनसंस्था आणि व्यक्ती यांचा संबंध, आणि शासनसंस्था आणिधर्म यांचा संबंध कोणत्या स्वरूपाचा असावा याची सुस्पष्ट मांडणी या विवेचनात अंतर्भूत केलेली असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला धर्मनिष्ठेचे आणि धर्मप्रसाराचे अथवा कोणताही धर्म न मानण्याचे स्वातंत्र्य असावे, शासनसंस्था आणि व्यक्ती, म्हणजेच त्या त्या देशातील नागरिक, यांचा संबंध त्या त्या नागरिकाच्या धर्मनिष्ठेवर अवलंबून असता कामा नये, आणि शासनसंस्थेने कोणत्याही एका धर्मावर निष्ठा व्यक्त करू नये, त्या धर्माचा प्रसारही करू नये, अथवा त्या धर्माच्या तत्त्वमीमांसेत अगर व्यवहारात हस्तक्षेपही करू नये असा या विवेचनातील सारभूत निष्कर्ष आहे.
विवेचनातील विशुद्ध आशय वरीलप्रमाणे जरी असला तरी शासनाने धर्माच्या कोणत्याही तात्त्विक अथवा नैतिक घटकाविषयी भूमिका घेऊ नये अथवा जनतेच्या हिताशी सुसंगत असा हस्तक्षेप करूनये असा प्रत्यक्षात त्याचा अर्थ होतो असे नाही आणि म्हणूनच देश-काल-परिस्थित्यनुसार या संकल्पनेची व्याख्या बदलते. त्यात काटेकोरपणा असू शकत नाही असे आढळते. उदाहरणार्थ एखाद्या धर्मानुसार कर्ज देणे अथवा त्यावर व्याज घेणे हे पापमय आणि म्हणूनच निषिद्ध कृत्य आहे असे समजले जात असेल. परंतु तो धर्म मानणारे बरेच लोक संबंधित देशात आहेत या कारणाकरिता बैंक, आयुर्विमा महामंडळ किंवा अन्य वित्तीय संस्थांच्या कर्ज देण्याच्या व्यवहाराला धर्मात हस्तक्षेप होईल म्हणून शासनसंस्थेने उत्तेजन न देणे किंवा बंदी घालणे हे प्रत्यक्षात घडत नसते; किंवा दुसर्यास एखाद्या धर्मानुसार अस्पृश्यता पाळणे, सती जाणे, नरबली देणे,देवदासीचा व्यवसाय करणे हे इष्टकर्तव्य असू शकेल, परंतु समता, न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तीची प्रतिष्ठा या आधुनिक मूल्यांशी वरील आचार जर विसंगत असेल तर शासनसंस्थेने हस्तक्षेप करणे व या प्रथा कायद्याने बंद पाडणे हे धर्मनिरपेक्षतेच्या वर उल्लेखिलेल्या विशुद्ध आशयाशी विसंगत असू शकेल; परंतु धर्माची अधिसत्ता ही मानवाच्या ऐहिक जीवनावर नसावी या तत्त्वाशी शासनसंस्थेचा हा हस्तक्षेप सुसंगत असतो हे लक्षात घ्यावयास हवे.
अन्य एका उदाहरणावरून धर्मनिरपेक्ष-शासनाच्या एका तत्त्वाला बाधा कशी येऊ शकते हे लक्षात येईल. शासनसंस्थेचा व्यवहार हा त्या देशातील लोकांच्या नागरिकत्वाशी केवळ संबंधित असला पाहिजे, ते नागरिक कोणत्या धर्माचे आहेत याच्याशी त्या व्यवहाराचा संबंध असला कामा नये या तत्त्वाचा वर उल्लेख आलेलाच आहे. इंग्लंड हा देश बहुतांशी धर्मनिरपेक्ष आहे असे मानले जाते. परंतु सलमान रश्दी यांचे ‘सटॅनिक व्हर्सिस” हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि इराणच्या आयातोल्ला खोमेनीयांनी सुपारी देऊन पुस्तकाच्या लेखकाची हत्या करण्यात यावी असा हुकूमनामा काढला तेव्हा इंग्लंडमध्ये एक अनपेक्षित पेचप्रसंग निर्माण झाला. त्या पुस्तकामुळे जर धर्माची किंवा धर्मसंस्थापकांची बदनामी होत असेल तर अशा बदनामीबद्दल लेखकावर खटला भरण्याची तरतूद इंग्लंडमधील एका कायद्यानुसार आहे. म्हणून इंग्लंडमधील धर्मभावना दुखावलेल्या नागरिकांनी खोमेनींचा फतवा फेटाळून लावावा आणि लेखकावर रीतसर खटला भरून कोर्टाचा जो निर्णय मिळेल तो मान्य करावा अशी इंग्लंड सरकारच्या गृहखात्याची भूमिका होती आणि ही भूमिका इंग्लंडमधील काही सुशिक्षित, प्रतिष्ठित मुसलमानांना पटवून देण्यात गृहखात्याला यश आले. त्यानुसार काही प्रतिष्ठित मुसलमान वकिलांचा सल्ला घेण्यासाठी गेले. बदनामीविषयकसदरहू कायद्याची तपासणी ज्या वेळेस वकिलांनी केली त्या वेळेस अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेला हा कायदा ख्रिश्चन धर्मीयांपुरताच मर्यादित आहे, म्हणजे ख्रिश्चन धर्माची अथवा त्याच्या संस्थापकांची, त्या धर्माशी निकटपणे संबंधित अशा मान्यवरांची बदनामी झालेली आहे असे जर एका किंवा अधिक नागरिकांना वाटत असेल तर त्या कायद्यानुसार खटला भरता येईल असे आढळून आले. ख्रिश्चन धर्मीयांव्यतिरिक्त अन्य धर्मीयांशी या कायद्यामुळे पक्षपात होतो आहे हे लक्षात घेऊन एका मजूरपक्षीय खासदाराने या कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी असे प्रतिपादन करणारे एक विधेयक इंग्लंडच्या लोकसभेला सादर केले आहे.
शासनसंस्था आणि धर्मसंस्था यांत एक अभेद्य भिंत उभारलेली असणे(“impassable wall between the Church and the State”) हे धर्मनिरपेक्ष शासनाचे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे हे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष थॉमस जेफर्सन यांचे विधान सुप्रसिद्ध आहे. अमेरिकेमध्ये ते बहुतांशी पाळले जाते हेही खरे आहे. परंतु भारतात जर अशी भिंत उभारली आणि धर्माधिष्ठित तत्त्वाला आणि आचरणाला शासनाने जर यत्किंचितही आव्हान दिले नाही तर धर्मोद्भूत विषमता जशीच्या तशी चालू ठेवावी लागेल. अमेरिकेत धर्मामध्ये जवळ जवळ हस्तक्षेप न करण्याचे तत्त्व अमलात आणणे जे शक्य आहे ते भारतात का शक्य नाही हे समजावून घेण्याकरिता धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा विकास कसा होत गेला हे समजावून घेणे उचित ठरेल.
धर्मनिरपेक्षतेची कल्पना सर्वात प्रथम येशू ख्रिस्ताने दिलेल्या एका प्रवचनात बीजरूपाने आढळते. त्या काळातील रोमन सत्ताधीशांना सीझर असे म्हणत असत. अशा एका सीझरने आपल्या प्रजाजनांवर जो कर बसविला त्याला काही लोकांचा विरोध होता. आपला असंतोष व्यक्त करण्याकरिता ते यशू खिस्ताकडे आले. त्यावेळेस त्यांना उद्देशून आपला संदेश देताना येशू ख्रिस्ताने सांगितले की कर लादणे हा सीझरचा (सत्ताधीशाचा) अधिकार आहे. देवाचा दूत या नात्याने आपण देवाचा दरबार चालवितो. या दरबारात पारमार्थिक जीवनातील प्रश्नांबद्दल निवाडा करिता येईल, परंतु सीझरच्या कक्षेतील अधिकारात ईश्वराला हस्तक्षेप करता येणार नाही. या प्रवचनावरून ऐहिक जीवनात धर्माला आपले वर्चस्व प्रस्थापित करिता येणार नाही असा निर्णय खिस्ताने दिला असे मानण्यात येते. येशू ख्रिस्ताचा हा आदेश त्यांच्या अनुयायांनी पुढे मानला नाही.
ख्रिस्ताच्या या उपदेशाला जे महत्त्व दिले जाते ते यासाठी की तत्पूर्वी अस्तित्वात असलेल्या ग्रीक नगर-राज्यांमध्ये आणि पुढे रोमन आधिपत्याखालील प्रदेशांमध्येसुद्धा तत्कालीन धर्म आणि ऐहिक जीवन ही एकमेकांशी घट्टपणे निगडित झालेली होती. ग्रीक नगरराज्यांची नांवेसुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी दैवतावरून दिली जात असत आणि या राज्यांचा विस्तार त्या त्या दैवताच्या मंदिराभोवतालच्या प्रदेशात होत असे. उदाहरणार्थ अॅथेन्स या राज्याचे नाव अॅथीना या देवतेवरून, अॅपोलोनिया हे नाव अपोलो या देवावरून तर पॅसिडोनिया हे नाव पॉसिडिंयन या देवावरून पडले होते. सत्ताधीशांचा जो धर्म तोच धर्म त्या त्या राज्यातील प्रश्नजनांचा असे आणि या सत्ताधीशांचे हुकूम जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करीत असत. राज्यकारभारसुद्धा धर्ममंदिरातील आसनावरूनच चालत असे.
खिश्चन धर्माचा उदय व प्रसार जसजसा होऊ लागला तसतसे खिश्चन धर्माचेअनुयायी रोमन सत्ताधीशांचा धर्म व त्यांच्या वागणुकीच्या नैतिक अधिष्ठानाला विरोध करू लागले. या विद्रोही खिश्चनांचा अनन्वित छळ रोमन सत्ताधीशांनी केला. कोणाच्याही धार्मिक निष्ठेवर सत्ताधार्यांननी अतिक्रमण करू नये कारण धर्माची अधिसत्ता ही मनुष्य आणि परमेश्वर यांच्या संबंधांपुरती मर्यादित आहे असे येशू ख्रिस्त सांगत होता. मनुष्य आणि शासनसंस्था यांचे संबंध हे सत्ताधार्यां च्या कक्षेत येतात म्हणून धर्मसंस्थेने आपली मर्यादा ओळखून सत्ताधार्यांसच्या क्षेत्रात पाऊल टाकू नये. सत्तेचे असे विभाजन केल्यास, मनुष्याला आपले तात्कालिक अथवा दैनंदिन जीवनांतील ध्येय आणि परमेश्वराशी संबंधित असलेले शाश्वत ध्येय सुसंवादीपणे गाठता येईल हाच आशय येशू ख्रिस्ताच्या प्रवचनातून व्यक्त होतो. सत्ताधीश हाच परमेश्वर म्हणून जीवनाच्या सर्व अंगांवर सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार आहे, या रोमन सम्राटांच्या कल्पनेला हादरा देणारे हे प्रवचन असल्यामुळे धर्मनिरपेक्षता या संकल्पनेच्या विवेचनात त्याला महत्त्व देण्यात येते.
येशू ख्रिस्ताचा वरील संदेश पुढे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेल्या राजेसम्राटांनी पाळला नाही. इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या अखेरीस धर्मगुरू (पोप) जिलेसिअस यांनी दोन सत्ता-क्षेत्रांचा हा सिद्धान्त पुन्हा मांडला. त्याला ”दोन तलवारींचा सिद्धान्त असे म्हणतात. परंतु येशू ख्रिस्ताच्या प्रवचनातील संदेशाप्रमाणेच या सिद्धान्ताचीही उपेक्षा झाली. याचे मुख्य कारण म्हणजे एका बाजूला ख्रिश्चन धर्माचा प्रसार हा चर्च या धर्मपीठाच्या माध्यमातून होऊ लागला. दुसर्याच बाजूला पूर्वीच्या रोमन राजांचा ख्रिस्त धर्माला विरोध होता तो पुढे राहिला नाही. अंतर्गत बजबजपुरीने रोमन साम्राज्य पोखरले गेले. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीतील प्रभावाने आणि स्वतंत्रपणेसुद्धा रोमन साम्राज्यशाहीतील गुमांनी बंड करण्यास प्रारंभ केला. यामुळेही ते साम्राज्य खिळखिळे झाले. अखेर रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. प्रचंड सत्ता हातामध्ये केंद्रित झालेले रोमन कॅथलिक चर्च म्हणजेच ते चालविणारे धर्मगुरू आणि राजे यांचे एकमेकांत संगनमत झाले. राजांच्या उन्मत्त, बेगुमान कारभाराला धर्मगुरूंनी पाठिंबा दिला तर राजांनी चर्चला जमीनजुमला, जडजवाहीर इत्यादि संपत्ती दान करून चर्चची ऐहिक संपन्नता प्रचंड प्रमाणात वाढविली. धर्मगुरूंच्या बेबंदशाहीला विरोध करणार्यांनवर अमानुष दडपशाही करण्याची कामगिरी राजांनी म्हणजेच शासनसंस्थेने पार पाडली. राजाच्या विरोधकांना राजा करू इच्छीत असलेल्या शिक्षेला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून धर्मगुरूंनी राजाच्या वतीने न्यायाधीशाची कामगिरी बजावली. दोनही क्षेत्रातील सत्ताधार्यांूनी सामान्य जनतेवर अनेक प्रकारचे जुलूम केले. इतिहासाची ही वाटचालदेशोदेशी कमी-अधिक फरकाने १३ व्या शतकाच्या अखेरपर्यन्त अशीच चालू राहिली.
अधूनमधून एखादा धर्मगुरू किंवा एखादा राजा “दोन तलवारींच्या सिद्धान्ताची आठवण करून देत असे. परंतु त्यांचे आवाहन परिस्थितीत बदल घडवून आणण्याइतके प्रभावी ठरत नसे. १४ व्या शतकात इटलीमध्ये पादुआ येथील मार्सिग्लिओ नावाच्या एका लेखकाने, मानवी हक्क हे धर्मनिष्ठेवर अवलंबून नसतात आणि म्हणून कोणाचीही कोणतीही धर्मनिष्ठा असो त्या निष्ठेबद्दल तो शिक्षेस पात्र ठरू शकत नाही या व तदनुषंगिक मुद्द्यांचे विवरण मोठ्या ठाशीवपणे केले. परंतु अशा वैचारिक प्रतिपादनांपेक्षा १४ व्या शतकापासून तो अठराव्या शतकापर्यन्त युरोप खंडामध्ये ज्या अनेक घटना घडल्या त्यातून सारा समाज ढवळून निघाला आणि मानवाच्या ऐहिक जीवनाला अग्रस्थान प्राप्त होऊन धर्मसंस्थेचा आणि धर्माधिष्ठित विचारांचा पगडा क्षीण होत गेला. ही प्रक्रिया कशी घडत गेली हे समजण्याकरिता प्रमुख घटना व आंदोलनांचा संक्षिप्त परामर्श घेणे आवश्यक आहे.
मार्को पोलो, इब्न बटुटा, कॅप्टन कुक, कोलंबस, वॉस्को द गामा व अशा इतर अनेक साहसी पर्यटकांनी युरोपबाहेरील भूखंडांचा, तेथील रहिवाशांचा, तेथील धर्माचा व ज्ञानभांडाराचा परिचय आपल्या देशबांधवांना या कालखंडात करून दिला. युरोपकेन्द्री संकुचित दृष्टीला आत्मपरीक्षण करावयास लावणारी ही महत्त्वपूर्ण घटना होती.
राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या जुलुमाखाली भरडल्या गेलेल्या जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला तसतसे हा असंतोष व्यक्त करणारे, लोकांच्यामध्ये नव्या जाणिवा निर्माण करणारे नवे नेतृत्व निर्माण झाले. प्रबोधनाचा कालखंड, मानवतावादाचा कालखंड, धर्मसुधारणेचा कालखंड आणि ज्ञानवृद्धीचा-सुसंस्कृतीचा कालखंड अशा चार टप्प्यांतून युरोपमधील विचारविश्व घुसळून निघाले. प्राचीन ग्रीक वाड्याचा वैचारिकआणि ललित – अशा दोनही वाङ्यांचा, तसेच ख्रिस्ती धर्मापूर्वीच्या धर्मसंकल्पनांचा नव्याने अभ्यास सुरू झाला. मानवसमाजाचा अभ्यास करणे हे मानवी प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून हा अभ्यास मानवकेंद्रीच असला पाहिजे, तो ईश्वरकेन्द्री ठेवल्याने मानवसमाजाच्या स्थितिगतीचे ज्ञान प्राप्त होणार नाही यावर मानवतावादाचा आग्रही पुरस्कार करणार्या सर थॉमस मोर, कॉलेट, इस्मस इत्यादि लेखकांनी भर दिला. ख्रिश्चन धर्मातील कर्मठपणावर, धर्मगुरूंच्या भ्रष्टाचारावर, धर्माच्या नावाखाली चालणान्या ढोंगावर प्रहार करणारे लेखक निर्माण झाले. त्यामुळे रोमन कॅथलिक चर्चच्या निरंकुश सत्तेला जबरदस्त धक्का बसला. धर्मग्रंथांचा अर्थ लावण्याचा हक्क धर्मगुरूंपुरताच मर्यादित नाही असा खणखणीत इशारा देऊन मार्टिन लूथर या जर्मन धर्मसुधारकाने आपले९५ कलमी निवेदन विटेनबर्ग चर्चच्या दरवाजावर १५१७ साली जाऊन चिकटविले. रोमन कॅथलिक चर्च आता एकसंघ राहिले नाही. प्रथम प्रॉटेस्टंट व त्यांनंतर अनेक लहानमोठे पंथोपपंथ निर्माण झाले. राजे आणि धर्मगुरू यांच्यातील सत्तास्पर्धाही तीव्र झाली. नव्याने निर्माण झालेल्या पंथोपपंथांच्या अनुयायांमध्ये घनघोर युद्धेही झाली. वेगवेगळ्या धर्ममतांना स्वातंत्र्य देणे राजसत्तेला भाग पडले आणि त्यांतून एकसंध धर्मसत्ता आणि निरंकुश राजसत्ता यांच्यातील संगनमतही कालांतराने नष्ट झाले. हे संगनमत नष्ट झाल्यामुळे शिक्षण, प्रशासन, आर्थिक व्यवहार, न्यायदान या व अशा ऐहिक बाबींवर असलेले धर्मसत्तेचे वर्चस्व जवळ जवळ नष्ट झाले.
धाडसी प्रवाशांनी शोधून काढलेल्या नव्या देशवासीयांशी युरोपातील विविध राष्ट्रांचा व्यापार सुरू झाला. हा व्यापार विविध धर्मीयांशी असल्यामुळे तो जर सुरळीतपणे चालावयाचा असेल तर धमपिक्षा आर्थिक व्यवहाराला अधिक महत्त्व देणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे या कालखंडात धार्मिक सहिष्णुतेवरही भर देण्यात येऊ लागला. व्यापार वाढू लागला तसतशी शहरेही वाढू लागली. व्यापारातून धनसंचय होऊ लागल्यामुळे जमिनीची मालकी हे संपत्तीचे एकमेव साधन उरले नाही. व्यापार्यांोचे समाजातील स्थान व प्रतिष्ठा वाढू लागली. सरंजामदारांच्या आधिपत्याखालील स्वायत्त जहागिरी कोलमडू लागल्या. व्यापारातील धनसंचयातून गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारे भांडवल निर्माण झाले आणि यातूनच औद्योगिकीकरण वेगाने होऊ लागले. कंपन्या व बँका स्थापन होऊ लागल्या तसतसा या सर्व व्यवहारांत निमग्न असलेला समाजातील एक वर्ग उदयाला आला. लवकरच उद्योगपतींच्या या वर्गाला प्रतिष्ठाही प्राप्त झाली. गरजा मर्यादित ठेवणे, काटकसर करणे हा धर्माचा, साधु-संतांचा उपदेश मागे पडू लागला आणि ऐहिक सुबत्ता, उच्चतर राहणीमान, ऐषआराम, वैयक्तिक स्पर्धेतून व्यक्तीने उन्नती साधून प्रतिष्ठा प्राप्त करून घेणे या मूल्यांची जोपासना होऊ लागली. थोडक्यात म्हणजे पारलौकिक जीवनातील अज्ञात सुखापेक्षा या पृथ्वीतलावरील ऐहिक जीवनात सुख-समृद्धी प्राप्त करून घेण्याचे ध्येय उपेक्षणीय नाही येवढेच नव्हे तर ते समर्थनीय आहे हा मतप्रवाह मोठ्या जोमाने पुढे सरसावला.
ऐहिक जीवन धर्माच्या वर्चस्वापासून मुक्त करणे, म्हणजेच ते धर्मनिरपेक्ष बनविणे, या विचारप्रवाहाला गती प्राप्त करून देणारा अखेरचा पैलू म्हणजे विविध क्षेत्रात झालेले वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन हा होय. न्यूटन, लाइञ्जित्स यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडला. गिलबर्ट व फ्रैंकलिन यांनी विद्युन्निर्मिती व लोहचुंबकत्त्वाचे सिद्धान्त मांडले. ल्यूवेनहोएक आणिग्यू यांनी सूक्षदर्शक यंत्र तर गॅलिलिओ व हर्षल यांनी दुर्बीण जगासमोर आणली. हार्वे व मॅलपिगी यांनी रक्ताभिसरणाची प्रक्रिया शोधून काढली, शरीरशास्त्राच्या ज्ञानात भर टाकली. डार्विनच्याही आधी ट्रेम्ब्लाये आणि बफन यांनी उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचे ठोकताळे मांडले.
या संशोधनात अजून अनेक नावांची आणि विषयांची भर घालता येईल. परंतु या सर्व संशोधनाने जी मुख्य कामगिरी बजावली ती ही की पृथ्वी सपाट आहे यासारखे धर्मग्रंथांनी धरलेले आग्रह कोसळून पडले. विश्वाचे गूढ हळू हळू उकलता येते, निसर्गाचे नियम समजावून घेता येतात आणि मानवी जीवन हे सर्वस्वी पराधीन अथवा ईश्वराधीन न राहता मनुष्य त्याला दिशा देऊ शकतो हे हळू हळू लोकांना पटू लागले. रॉजर व फ्रान्सिस बेकन, डेकार्ट, बॉईल, फ्रेंकलिन, लोमोनोसोव्ह यांसारख्या तत्त्वज्ञांनी व वैज्ञानिकांनी प्रयोगसिद्ध ज्ञानावर भर दिल्यामुळे, ज्ञान हे मुख्यतः साक्षात्काराचे फलित असते किंवा कित्येक वरकरणी न उमगणान्या नैसर्गिक घटना या चमत्कारांचा किंवा ईश्वरी कोपाचा आविष्कार असतात यावरील लोकांचा विश्वास पूर्णतया नष्ट झाला नाही तरी बरयाच अंशाने तो कमी होऊ लागला. या सर्व संशोधनातून मानवाचे तंत्रज्ञानही समृद्ध झाले. नवे नवे धातू उपलब्ध झाले. स्वस्त इंधनाचा शोध लागला, शेती करण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली, कष्ट कमी करणारी यंत्रे निर्माण झाली, सुखावह गृहरचना होऊ लागली. थोडक्यात म्हणजे धर्मसंस्थेला जे शेकडो वर्षांत साधले नाही ते विज्ञान-तंत्रज्ञानाने साध्य करून दाखविले. याचाच परिणाम म्हणून मानवाने निर्माण केलेल्या धर्मसंस्था, विवाहसंस्था, न्यायसंस्था यांसारख्या संस्थांचे विश्लेषण करण्यास व त्यांमध्ये सुधारणासुचविण्यास भय वाटेनासे झाले.
लोकांचा धर्मावरचा किंवा ईश्वरावरचा विश्वास संपूर्णतया नष्ट झाला असे नाही, परंतु त्याला आव्हान देणारा वस्तुवादाचा किंवा जडवादाचा सिद्धान्त जर कोणी मांडला तर जाचक शिक्षा देण्याची प्रथा बंद पडली. ते विचार ऐकून घेण्याची प्रवृत्ती लोकांच्यात दृढ होऊ लागली.
प्रत्यक्ष जीवनात धर्मनिरपेक्ष ऐहिक जीवनाला हळू हळू मान्यता कशी मिळत गेली हे आपण वर पाहिले. या संपूर्ण प्रक्रियेची आणि त्यातून निघणारया सिद्धान्ताची व्यवस्थित मांडणी पहिल्या प्रथम जर कोणी केली असेल तर ती १८४६ साली हॉलयोक यांनी “प्रिन्सिपल्स ऑफ सेक्युलरिझम्” आणि “द ऑरिजिन अॅण्ड द नेचर ऑफ सेक्युलरिझम्’ या ग्रंथांतून केली.
माणसाने कोणते शिक्षण घ्यावे, ते किती काळ घ्यावे, कपडे कोणते घालावेत, आहार कोणता घ्यावा, रोगनिदान व त्यावरील उपचार कसे करावेत हे धर्माने ठरवू नये, तर वैज्ञानिक संशोधनाच्या प्रकाशात विवेकबुद्धीने याबाबतचे निर्णय वैयक्तिक पातळीवर व सामाजिक पातळीवर घेण्यात यावेत हे धर्मनिरपेक्षतेच्या व्यापक संकल्पनेत अभिप्रेत असते. अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने असे म्हणता येईल की माणसाने गोमांस अगर डुकराचे मांस खावे की नाही हे धर्माने ठरवू नये तर व्यक्तीने आपल्या आवडी-निवडीनुसार किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा. दाढी ठेवण्याचे, बुरखा घेण्याचे अगर डोक्यावर पदर घेण्याचे बंधन धर्माने घालू नये. याचाच पुढील निष्कर्ष असा की मनुष्यसमाजाचे नीतिनियमसुद्धा त्या त्या समाजानेच विवेकबुद्धीने ठरवावेत व कालपरत्वे त्यात योग्य वाटतील ते बदलही करावेत.
धर्मनिरपेक्षतेची ही व्यापक संकल्पना एकदा मान्य झाल्यानंतर इंग्लंडसारख्या एखाद्या देशात अॅग्लिकन चर्च या धर्मसंस्थेला सरकारी मान्यता असली तरी तिचा इतर धर्मीयांच्या धर्मस्वातंत्र्यावर अथवा तेथील लोकांच्या ऐहिक जीवनावर दुःसह परिणाम होत नाही. राजेशाही नष्ट झालेल्या देशात राजाला जे स्थान तेच ऐहिक जीवनावरील प्रभाव नष्ट झालेल्या अँप्लिकन चर्चना इंग्लंडमध्ये आहे असे आढळते.
वरील सर्व विवेचनावरून हे लक्षात येईल की धर्मसुधारणा, प्रबोधन, वैज्ञानिक संशोधन अशा विविध टप्प्यांतून गेलेल्या देशांमध्ये धर्माचे ऐहिक जीवनावरील अनन्यसाधारण वर्चस्व क्षीण किंवा नष्ट झालेले आहे. अशा देशांमध्ये शासनसंस्थेने धर्मसंस्थेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करून नये ही अपेक्षा रास्त ठरते. परंतु ज्या देशांमध्ये धर्माचे व त्यातील अनिष्ट पैलूंचे वर्चस्व अद्याप नष्ट झालेले नाही त्या देशांमध्ये धर्मसुधारणेची जबाबदारी शासनसंस्थेने घेतल्यास ते लोकहितविरोधी ठरत नाही आणि म्हणून व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा न आणता शासनसंस्थेने धर्मसंस्थेच्या अनिष्ट व्यवहारांत हस्तक्षेप करणे समर्थनीय ठरते.