पत्रव्यवहार

संपादक
आजचा सुधारक
‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय’ ह्या विशेषांकाविषयी ही माझी प्रतिक्रिया.
अनुक्रमणिकेत बॅ. पालखीवालांचे नाव बघून सखेद धक्का बसला. बॅ. पालखीवाला हे Champion of Democratic Rights म्हणून ओळखले जातात. तरी समाजातील काही अनिष्ट प्रथांवर डोळेझाक करण्यात व ह्या अनिष्ट प्रथांचा ज्यांनी पायंडा पाडला त्या व्यक्तींशी गोडीगुलाबीने वागण्यात बॅ. पालखीवाला निपुण आहेत. दाउदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना बुर्हााणुद्दीन उर्फ बडा मुल्लासाहेब हे जगभर पसरलेल्या दहा लक्ष बोहरांच्या तन, मन आणि धनावर मालकी हक्क गाजवतात. ह्यालाच इंग्रजीत government within government असे म्हटले जाते. इतकेच नव्हे तर सुधारणावादी बोहरांना नेस्तनाबूत करण्यासाठी सय्यदना साहेबांनी सामाजिक बहिष्काराचे हत्यार उपसलेले आहे. जन्म, लग्न व मृत्यू अशा महत्त्वाच्या प्रसंगी जबरदस्तीने कर गोळा करून सय्यदना साहेब आज ज़ारो कोटींच्या मालमत्तेचे मालक झाले आहेत. न्यायमूर्ती छगलांचा धार्मिक बहिष्कृतीवर बंदी घालणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पुढे फिरवला हे सर्वश्रुत आहे. (याच अंकातील डॉ. सत्यरंजन साठे यांचा लेख)
बँ. पालखीवाला हे सय्यदना साहेबांच्या अनेक कार्यक्रमांना अध्यक्ष ह्या नात्याने हजेरी लावत असतात. हे जर कोणाला असत्य किंवा विपर्यास असे वाटत असेल तर त्यांनी श्री. ताहेर पूनावाला (आजचा सुधारक चे एक आजीव वर्गणीदार आणि हमीद दलवाई पुरस्कार मिळालेले सुधारणावादी बोहरा नेते) किंवा कोणत्याही सुधारणावादी बोहरा व्यक्तीला विचारावे.
हा अंक वाचून सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांत एक आश्चर्यकारक साम्य मला जाणवले. ते म्हणजे भारतीय धार्मिक व सामाजिक घडामोडींकडे पाश्चात्त्य दृष्टिकोनातून बघण्याची वृत्ती. ह्याला आपण the problem of Indian Elite असे संबोधूशकतो. ह्याचे उदाहरण म्हणजे विविध धार्मिक संस्था ह्या जणू club च्या धर्तीवर चालवल्या जातात ही मनोधारणा सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांतून अजाणतेपणी डोकावते.
डॉ. हेमंत आडारकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.