आहे असा कवण तो झगडा कराया?

पु. ल. देशपांडे यांच्या कलेचे वैशिष्ट्य असे आहे ,की तिने जसा आणि जितका आनंद जीवनसंग्रामातल्या विजयी वीरांना दिला आहे तसा आणि तितकाच तो पराजितांना आणि पळपुट्यांनाही दिला आहे. जीवनात येणाऱ्या विसंगतीकडे त्यांनी विनोदबुद्धीने पाहायला आम्हाला शिकविले आहे. त्यामुळे ते सर्वांनाच आपले वाटत आले आहेत. टिळकांना जसे जनतेने आपल्या मर्जीने ‘लोकमान्य’ केले तसेच पुलनांही जनतेनेच ‘महाराष्ट्रभूषण’ मानले आहे. सरकारने केवळ या लोकमान्यतेवर राजमान्यतेची मुद्रा उठविली आहे इतकेच. तसे नसते तर ठाकरे यांनी क्षणिक शीघ्रकोपाच्या उद्रेकात जे असभ्य आणि अश्लाघ्य उद्गार काढले त्यावर अख्खा महाराष्ट्र प्रक्षुब्ध सागरासारखा खवळून उठला नसता आणि ठाकरे यांनी कितीही नाही म्हटले तरी जनक्षोभासमोर ते जे तूर्त मूग गिळून बसले आहेत तसे, चूप ते बसले नसते. सुमारे चार वर्षांपूर्वी पु.लं. च्या अमृतमहोत्सवात पु.ल. हे शाळेत आपले शिक्षक होते हे ठाकरेंनी अभिमानाने सांगितले होते. आपल्यालाही त्यांचे साहित्य आवडते, आपणही विनोद या माध्यमाची महती मानणारे कलावंत आहोत, असे म्हणणारे बाळ ठाकरे पु.लं. च्या एका लहानशा भाषणातल्या, एका स्वल्पशा उद्गाराने किती बरे चवताळून उठले आपल्या या बालपणीच्या गुरूवर? ‘झक मारली आणि पु.लं.ना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला’ असा वैताग त्यांनी भर सभेत जाहीर करून स्वत:च्या फजितीची कबुलीच देऊन टाकली. आपल्या जेमतेम पाच मिनिटांच्या भाषणात असे काय बरे बोलले पु.ल. की, त्यामुळे या हिंदुहृदय सम्राटाची झोप उडावी?
पु.ल. म्हणाले :
१. माझ्या लिखाणांतून, भाषणांतून मी विचारस्वातंत्र्याचा पाठपुरावा करत आलो आहे. हे स्वातंत्र्य दडपून टाकू पाहणाऱ्या आणीबाणीच्या काळात मी माझ्या परीने विचारस्वातंत्र्याच्या बाजूने निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या प्रचारसभांत भागही घेतलेला आहे.
२. एखाद्या विचाराला विरोध करायचा तर तो आपला स्वत:चा विचार मांडून करावा.
३. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे आपल्या देशाचे बोधवचन; पण प्रत्यक्षात फार विपरीत असे पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळते.
‘निराशेचा गांव आंदण आम्हांसी’ ही संत तुकोबांची ओळ पुन:पुन्हा आठवायला लागते.
४. ‘लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांत निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ‘लोकशाहीपेक्षा आम्ही ठोकशाहीच पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात तेव्हा माझ्यासारख्यांना किती यातना होत असतील, ते कुठल्या शब्दांत सांगू?
स्वत:च्या जीवनग्रंथाच्या अखेरच्या पर्वाचा निर्देश करून आपली आर्तता त्यांनी बोरकरांच्या पुढील दोन ओळींतून व्यक्त केली.
विझवून दीप सारे, मी चाललों निजाया।
इथल्या अशाश्वताची आता मला न माया
आणि त्यांचे हे आभाराचे शब्द होते .
५. माझ्या हातून सांस्कृतिक क्षेत्रात जे काही घडले त्याची दखल घेऊन शासनाने इतक्या मोठ्या प्रमाणात माझा हा जो गौरव केला त्याबद्दल शासनाचा मी आभारी आहे.
हा पु.लं. च्या भाषणाचा त्यांच्याच शब्दांत दिलेला सारांश.
कोणते आव्हान आहे यात? काय धमकी आहे या शब्दांत? कृष्णाच्या भावी आगमनाची आकाशवाणी ऐकून कंसाने धास्ती घ्यावी अशी ताकीद देणारी भाषा नाही ही. चेटकिणींच्या भविष्यकथनाने मनाची शांती हरवून बसलेल्या मॅक्बेथने चेकाळून जावे, तसे काहीच नाही पु.लं.च्या उद्गारांत. पु.लं.जवळ ना आध्यात्मिक शक्ती, ना पक्षीय संघटनेचे बळ. त्यांनी ना भगवी वस्त्रे परिधान केली, ना रुद्राक्षाच्या कंठमाळा घातल्या. त्यांच्या भाषणात आहे ती एक वेदना. ती सांगायलाही प्रभावी शब्द नसल्याची व्यथा.
हां, पु.लं. जवळ एक गोष्ट आहे. तिचेच सामर्थ्य इतर साऱ्या शस्त्रास्त्रांना भारी आहे. ते आहे त्यांचे चारित्र्य. एक निष्कपट आणि निर्व्याज मन, त्याने त्यांनी जनताजनार्दनाची केलेली सेवा. सत्यकथनासाठी बलिष्ठ राज्यकर्त्यांकडून शांतपणे सहून केलेला उपहास आणि वेळ आली तेव्हा लोकशाही मार्गाने सत्तेचे पारडे पालटण्यासाठी आपल्या मगदुराप्रमाणे पण निर्हेतुकपणे उचललेला वाटा आणि केलेले विचारस्वातंत्र्याचे रक्षण. लोकादराला पात्र झालेल्या चारित्र्यसंपन्न प्रतिभावंताच्या या एकाच साधनेने त्यांच्या शब्दांना सामर्थ्य आले आहे. साध्या शब्दांनी सत्तांधांच्या वर्मावर बोट ठेवले आहे.
वर्तमान युतिशासन हे लोकशाहीतच केवळ शक्य असलेल्या निवडणुकांत निवडून आलेले आहे, हे सत्य आहे, असे असूनही स्वतःला युतीचे सर्वेसर्वा समजणारे सेनापती ‘ठोकशाही’चीच भलावण करतात, हेही सत्य आहे. ही भाषा ऐकून विचारस्वातंत्र्यावर, व्यक्तिस्वातंत्र्यावर प्रेम करणारा पुलंसारखा कलावंत – लेखक आपल्याला ‘यातना’ होतात, हे म्हणतो. ही काही झगड्याची भाषा नाही. पण सेनापती तेवढ्याने डिवचले जातात. आपल्या पूर्वाश्रमीच्या शिक्षकाला एकेरी संबोधून बाष्कळ कोटी करीत ते म्हणाले की, “जुने ‘पुल’ मोडकळीस आल्याने शासनाला नवे ‘पुल’ उभारावे लागणार आहेत. याच भाषणात आम्ही ठोकशाहीवाले आहोत तर आमचा पुरस्कार घेता कशाला? हा पुरस्कार वास्तविक आपल्याला देण्यात येणार होता पण… म्हणून तो पुलंना द्यायला आपणच संमती दिली.
या दुसऱ्या लहानशा भाषणात औचित्याचे भान आणि सदभिरुचीची जाण यांचा जो अभाव दिसतो त्याचे मर्म काय? भीष्मार्जुन युद्धाचे वर्णन करताना वामन पंडितांनी स्वपराक्रमावर प्रसन्न असलेल्या अर्जुनाच्या तोंडी जी भाषा घातली आहे, तिची येथे आठवण होते. आपण आजवर मारलेल्या महान असुर-गोसुरांची आठवण होऊन –
गर्वोक्ति फाल्गुन वदे, जगदेकराया।
आहे असा कवण तो झगडा कराया।।
महाराष्ट्राचे वर्तमान हिंदुहृदयसम्राट आपल्या आजवरच्या पराक्रमावर निश्चितच प्रसन्न आहेत. आपल्याला डिवचणारा कोण हा संप्रति नवा पुरुषावतार?’ म्हणून ते पुलंना भलेही हिणवोत. त्यांची दर्पोक्ती त्यांना एक दिवस महागात पडणार, यात शंका नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.