विज्ञानवादिनी कमला सोहोनी

ब्रह्मवादिनी स्त्रियांबद्दल पुष्कळ ऐकले आहे. मुंबईच्या या खेपेत एका विज्ञानवादिनीचा वार्तालाप ऐकायला मिळाला. ब्रह्मवादिनींनी कोणाचे काय भले केले ते ठाऊक नाही. पण या विज्ञानवादिनीने मात्र लक्षावधी बालकांना मातेचे दूध, म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करून उपलब्ध करून दिले. असंख्य कुटुंबांना निर्भेळ अन्न मिळण्याची सोय हाताशी ठेवून त्यांचे ऐहिक जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक आपल्या मोठ्या बहिणीबरोबर जाहीर गप्पा मारतील अशी बातमी म.टा.मध्ये वाचली. २५ डिसेंबर हा ग्रंथालीचा वाचकदिन असतो. त्यानिमित्त ग्रंथालीने प्रकाशित केलेली पुस्तके ५० टक्के सवलतीत विक्रीला ठेवलेली आणि जोडीला ह्या दोघी बहिणींच्या गप्पा असे जबर आकर्षण होते. या दोघींतली मोठी बहीण ८७ वर्षांची महाराष्ट्रातील ख्यातकीर्त खाष्ट विदुषी दुर्गा भागवत आपली ८५ वर्षांची धाकटी बहीण कमला सोहोनी यांच्या पुस्तक-विमोचनाच्या निमित्ताने त्यांच्याशी प्रकट संवाद करणार, तो ऐकण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासूनच दादरच्या कीर्ती कॉलेजच्या हिरवळीवर–म्हणजे हिरवळ नसलेल्या बंदिस्त मैदानावर – माझ्यासारखेच शेकडो लोक जमायला सुरुवात झाली. कार्यक्रम सुरू होईतोवर ही संख्या हजाराच्या वर गेली. ग्रंथालीच्या श्री दिनकर गांगलांनी उपचार आटोपून पाचच्या सुमारास प्रश्नांना सुरुवात केली. दोन तास कसे गेले ते टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होईस्तोवर लक्षात आले नाही.

लहानपणच्या काही आठवणी सांगा, या गांगलांच्या विनंतीवरून दुर्गाबाईंनी सुरू केलेले कथन जवळजवळ सगळे त्यांच्या ‘गोधडी’ मध्ये येऊन गेलेले वाचले होते. ते परत ऐकून काही क्षण बेचैनीत गेले. वाटले, हे काय सांगण्यासारखे आहे? कमल लट्ठोबा होती. माती खायची, अपुऱ्या दिवसांची, मी किरकिरी, खोडकर, कंपौंडवर चढून शेजारचे पेरू काढणारी, वडिलधाग्यांचा मार आणि राग यांचा अग्रहक्काने धनी होणारी इ.इ. पण दहाएक मिनिटांत ह्या पायलटद्वयांनी भूतलावरून जी अवकाशात झेप घेतली त्याबरोबर श्रोत्यांचेही पाय जमिनीवरून सुटले आणि दोनेक तास गगनविहार करून अलगद जमिनीला कसे टेकले ते कळलेही नाही. या दिव्यानंदाचे काही अंश आमच्या वाचकांना रुचतील, इतकेच नाही तर उद्बोधक होतील, अंतर्मुख करतील, असे वाटले म्हणून सांगत आहे, ऐका.

ही गोष्ट आहे त्रेसष्ट वर्षांपूर्वीची, १९३३ सालची. मुंबईच्या श्री. नारायणराव भागवतांची दुसरी मुलगी कमल आपल्या वडिलांप्रमाणेच पदव्युत्तर संशोधनासाठी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तेथे गेली तर संस्थेचेडायरेक्टर सर सी.व्ही. रामन यांनी तिला प्रवेश द्यायचे साफ नाकारले. कारण? कारण हेच की तिथे मुलींना प्रवेश दिला जातनाही! पण हे उत्तर प्रश्नाचेच पुनरुच्चारण होते. का नाही, या पुन:प्रश्नाला शेवटी, “माझी मर्जी हे उत्तर मिळाले. कमल म्हणाली, मी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी पहिल्या श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहे. मला विज्ञानात संशोधन करायचे आहे. मी स्त्री आहे हा काही माझा गुन्हा नाही. आम्ही कुटुंबीय गांधीजींच्या तत्त्वांवर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही स्त्रीपुरुषांमध्ये अधिकारभेद मानत नाही. तुम्ही आपला नकार असाच विनाकारण चालू ठेवला तर मी तुमच्या ऑफिससमोर सत्याग्रह करीन, पण तशीच परत जाणार नाही. या निर्वाणीच्या बोलण्याने शेवटी भारतातले पदार्थविज्ञानातले पहिले नोबेल पारितोषिक-विजेते सर सी.व्ही. रामन् नमले. एका वर्षाच्या परिवीक्षा (प्रोबेशन) काळानंतर प्रवेश पक्का होईल, आणि मगनंतर दोन वर्षाचे एम्.एस्सी. चे काम एका वर्षातपुरे करावे लागेल अशा कठोर अटींवर कमलला तात्पुरता प्रवेश मिळाला.

या कमल भागवत वरवर पाहता त्यांच्या विक्षिप्त वाटणाऱ्या सुपरवायझरच्या कसोट्यांना तर उतरल्याच, पण सर रामन यांच्या पूर्वग्रहांना धक्का देऊन, ते नाहीसे करून इतर मुलींसाठी इन्स्टिट्यूटचे दरवाजे सताड उघडे करण्यात यशस्वी झाल्या. आज तेथे सुमारे तीस मुली संशोधन करीत आहेत.

प्रबंधाचे काम पूर्ण करून कमल भागवत १९३६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला एम्.एस्सी. झाल्या. त्या अशा – बंगलोरचे विक्षिप्त वाटणारे सुपरवायझर श्रीनिवासय्या यांनी सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत प्रयोगशाळेत काम करावे लागेल अशी अट घातली होती. ती मान्य करण्यापूर्वी, सायंकाळी ४ ते ६ टेनिस खेळायला सुटी द्यावी लागेल अशी प्रतिअट कमलाबाईंनी घातली होती आणि मान्य करून घेतली. वडिलांप्रमाणेच, वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत रोज दोन तास टेनिस खेळण्याचा व्यायाम केल्याने तर नसेल, कमलताई आजही ८५ व्या वर्षी किती खणखणीतपणे, आलेल्या प्रत्येक प्रश्नाला तडाखेबंद उत्तर देत होत्या.

कमलताईंना जीव-रसायनशास्त्रात (बायो केमिस्ट्री) अधिक संशोधन करायचे होते. मुळात वडिलांना मुलीने डॉक्टर व्हावे असे वाटत होते. पण त्यांनी आपला निर्णय कोणावरही कधीच लादला नव्हता. लवकरच दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आणि त्यांनी इंग्लंडची वाट धरली. आतापर्यंतची वाटचाल जशी केली तशीच एकटीने इंग्लंडला प्रयाण तर केले. पण तिथे कोणत्या विद्यापीठात, कोणत्या कॉलेजात प्रवेश घ्यायचा हेही ठरले नव्हते. तेथे गेल्यावर सर विल्यम डन इन्स्टिट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत संशोधन करायचे त्यांच्या मनाने घेतले. प्रोफेसर हॉपकिन्स डायरेक्टर होते. त्यांच्या संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी देशोदेशीचे शेकडो शास्त्रज्ञ क्यू लावून प्रतीक्षेत उभे असत. कमलने बेधडक त्यांची भेट घेऊन प्रवेश संपादन केला. वास्तविक तेथे जागा नव्हती; पण या लहानखोर भारतीय मुलीची धडाडी पाहून डॉ. रिक्टर नामक संशोधकाने आपले टेबल अधविळ तिला देऊ केले. सकाळी ९ ते सायंकाळी ५ कमलने आणि सायंकाळी ५ ते पहाटे १ पर्यंत डॉ. रिक्टरने काम करावे अशी वाट काढली. डॉ. हॉपकिन्स या नोबेल प्राइझ विजेत्या शास्त्रज्ञाने या विज्ञानवेड्या युवतीबद्दल ‘She is a genius’ असे उद्गार एका शिफारसपत्रातकाढले; त्यामुळे केवळ प्रोफेसरांना मिळू शकणारी प्रवासी शिष्यवृत्ती तिला विद्यार्थिदशेतच मिळून युरोप अमेरिकेत उत्तमोत्तम संस्थांना भेटी देता आल्या. त्यातच पुढे नोबेल पारितोषिक विजेते झालेल्या डॉ. सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर यांची शिकागो येथे भेट – चर्चा यांचा लाभ घेता आला. पीएच्.डी. झाल्यावर ‘भारतात जाऊ नकोस, तिथे तुझे, तुझ्या विद्येचे चीज होणार नाही. अमेरिकेतच खरा वाव आहे’ हा डॉ. चंद्रशेखर यांचा सल्ला न मानता कमलताई पुढे भारतात परत आल्या. त्याबद्दल चंद्रशेखरांच्या मनात इतकी अढी राहिली की ते नंतर जेव्हा भारतभेटीला आले तेव्हा त्यांनी त्यांची भेट घेण्याचे टाळले; आणि हे सर्व, त्यांची पत्नी ललिता कमलची बंगलोरपासूनची मैत्रीण असताना, आणि ते स्वत: सर सी.व्ही. रामन् यांचे सख्खे पुतणे आणि बंगलोरच्या इन्स्टिट्यूटचेच माजी विद्यार्थी, कमलचे ज्येष्ठ सहाध्यायी असताना!

कमलताईंचा Ph.D. चा प्रबंध अवघ्या ४० पृष्ठांचा आहे. वनस्पतींची श्वसनक्रिया कशी चालते या संबंधी मौलिक संशोधन केल्याबद्दल ही पदवी संपादन करून त्या भारतात परतल्या. आपल्या ज्ञानाचा लाभ आपल्या गरीब देशबांधवांना दिला पाहिजे ही गांधीजींची शिकवण त्या जन्मभर पाळत आल्या. याचे एखाद-दोन किस्से ऐकवण्यासारखे आहेत. मुंबईला त्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जीवरसायनशास्त्राच्या प्रोफेसर असताना हा प्रकार घडला. आरे गौळवाड्याद्वारे पुरविल्या जाणाऱ्या दुधाच्या बाटल्यांमध्ये किडे निघाले. विधानसभेत प्रश्न झाला. दुग्धविकासमंत्री श्री. दिनकरराव देसाई होते. आरे प्रकल्प त्यांचे लाडके अपत्य होते. त्यांनी या घटनेची कारणमीमांसा करण्याचे काम कमलताईंवर सोपवले. बाटल्या नीट न धुता परत केल्या जातात, तोवर त्यांच्यावर बसलेल्या माश्या किंवा इतर कीटकांची अंडी त्यांत तळाशी जर जमली तर पुन्हा प्रचंड उष्णतामानावर तापवलेले व शीघ्र गतीने शीत केलेले दूध जरी त्यात भरले तरी ती अंडी तगून राहतात आणि सामान्य उष्णतामानात त्यांचे किडे होतात. अशी कारणपरंपरा सप्रमाण सिद्ध करून त्यांनी उपाययोजना पण दिली. त्यामुळे मंत्रिमहोदयांनी त्यांना शाबासकी तर दिलीच, पण काही पारितोषिक देऊ केले तेव्हा त्यांनी ते सविनय नाकारले आणि काय मागितले तर आरे प्रकल्पाचे म्हशीच्या दुधावर प्रक्रिया केलेले दूध मिळण्यासाठी कूपन. ते योग्यवेळी अर्ज न केल्यामुळे त्यांच्याकडे नव्हते आणि ते मिळाले तर आपल्या लहानग्या मुलासाठी आरेचे अत्यंत प्रमाणित सुयोग्य दूध, जे मातेच्या दुधासमान शिशूचे पोषण करण्याइतके चांगले असावे याची प्रक्रिया व तंत्र त्यांनीच प्रयोगांनी विकसित केलेले होते ते दूध! ते मिळाल्यामुळे आपल्या अशक्त मुलाची वाढ चांगली झाली हे त्या आनंदाने सांगू शकतात.

भारतात आल्यावर त्या कुन्नूर येथील न्यूट्रिशन रिसर्च लॅबोरेटरीत स्थिरावल्या. तेथील वास्तव्यात त्यांच्या सत्त्वपरीक्षेचे पुष्कळ प्रसंग आले आणि त्या बाणेदारपणे त्यातून बाहेर पडल्या. केवळ एक स्त्री म्हणून त्यांना असिस्टंट डायरेक्टरच्या पदावर रखडावे लागले. अपात्र ब्रिटिश अधिकाऱ्यांनी  आणलेले बालंट, त्यावरून झालेली चौकशी, त्यातून निष्कलंक सुटका, श्री माधवराव सोहोनी या त्यांच्या समकालीन विज्ञानविशारद तरुणाने कॉलेजच्या दिवसांपासूनच त्यांच्याशीच लग्न करण्याचा ध्यास मनी बाळगून आणि नंतर विमा उद्योगात अॅक्चुअरी हे प्रतिष्ठेचेपद मिळवून मगच घातलेली मागणी आणि तिचा स्वीकार, या घडामोडी कुन्नूरला घडून तिथली नोकरी सोडून त्या मुंबईच्या सुप्रतिष्ठ विज्ञानसंस्थेत राहिल्या. जीवरसायनशास्त्र हा विभाग त्यांनीच तेथे स्थापला. प्रोफेसर पद भूषवून संशोधन स्वतः तर केलेच, पण नामवंत संशोधकही घडवले.

मुंबईची विज्ञानसंस्था ही सरकारी संस्था असूनही तेथे ज्येष्ठताक्रमाने आणि पात्रतेने सुयोग्य असताना त्यांना चार वर्षे डायरेक्टरपद मिळू शकले नाही. कारण तोपर्यंत तेथे कोणी स्त्री डायरेक्टर झालीच नव्हती आणि स्त्री एवढी प्रचंड संस्था सांभाळू शकेल याचा विश्वास वरिष्ठांना नव्हता. मुंबई राज्यातले नामवंत लोकनेते व मंत्री डॉ. जीवराज मेहता यांनी याबाबतीत दाखवलेल्या उपेक्षेची पुढे वेळ आल्यावर त्यांना आठवण करून द्यायला कमलताई कचरल्या नाहीत. बडोदा विद्यापीठात जीवरसायनशास्त्र विषयाची स्थापना करून दिल्यावर प्राध्यापकांच्या निवडीसाठी कमलताईंना जावे लागले. तेव्हा बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. जीवराज मेहता यांच्या पत्नी हंसाबेन मेहता होत्या. त्यांची नेमणूक कुलगुरुपदी करीपर्यंत तुमच्या पुरोगामी विचारांची जी प्रचंड प्रगती झाली त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायला हवं’, असा कमलताईंचा टोमणा डॉ. मेहतांनी निमूटपणे सहन केला.

निवृत्तीनंतर मुंबईला ग्राहक मार्गदर्शन संस्थेत (कंझ्युमर गायडन्स सोसायटी) त्यांनी काम केले. तेथे अन्नपदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी त्यांनी एक लहानसे पोर्टेबल टेस्टिंग किट तयार केले. सामान्य ग्राहकाला घरच्याघरी भेसळ शोधून काढता येईल अशी ही पेटी त्यांनी बनवली. दूध, रवा, मैदा, मिरची पूड, हळद, पिठीसाखर, चहाची पूड, गोडेतेल, धान्य आणि लोणी अशा पदार्थातील भेसळ कशी शोधून काढता येते याची स्वत: प्रात्यक्षिके घेऊन त्यांनी ठिकठिकाणी प्रचार केला. डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या सूचनेवरून नीरा या पेयावर संशोधन केल्याबद्दल व ते गरिबांना पौष्टिक पेय म्हणून कसे देता येईल याबद्दल मौलिक योजना केल्याबद्दल त्यांना डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रपतिपदकाने गौरविले. पण पुढे महिलांच्या अशाच एका संघटनेचा पुरस्कार मात्र त्यांनी नाकारला. कारण तो त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते द्यावयाचा होता. त्यांनी प्रस्तुत संस्थेला आधीच विचारस्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यास, आणि विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार केल्याबद्दल माझ्या बहिणीला तुरुंगात टाकणाऱ्या या पंतप्रधान महिला असल्या तरी त्यांच्या हातून मी सन्मान स्वीकारणार नाही असे ठणकावून सांगितले होते.

खाद्यपदार्थ विकणाच्या बायांकडून पदार्थाचे नमुने घेऊन त्यांनी असे दाखविले की त्यात जो गाय छाप पिवळा रंग ते वापरतात तो प्रकृतीला अपायकारक आहे. त्यावर मग त्यांनी सप्रमाण मागणी केल्यावरून सरकारने बंदी घातली. एकदा सांगलीजवळ औदुंबर येथे सप्रयोगव्याख्यानाला त्या गेल्या तेव्हा त्यांच्या मैत्रिणीनी तिथून दत्ताचा प्रसाद आणायला सांगितला. व्याख्यान झाल्यावर त्यांच्या डोक्यात आले की, देवळातून घेतलेला प्रसादही तपासून पाहावा. सगळ्यांसमक्ष त्यांनी तो तपासला तेव्हा त्यात हा आक्षेपित गाय छाप पिवळा रंग आढळला. सश्रद्ध लोक प्रक्षुब्ध झाले. पण अधिकारीवगनि मध्यस्थी करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. पुढे ६ महिन्यांनी परत सांगलीला गेल्यावर त्यांनी पुन्हा तपासणी केली तेव्हा मात्र हा रंग त्यांना त्या प्रसादात आढळला नाही.

कमलताई सोहोनींनी १९३४ पासून म्हणजे विद्यार्थिदशेपासून १९६८ पर्यंत म्हणजे निवृत्तीच्या आदल्या वर्षापर्यंत वेगवेगळ्या संशोधन पत्रिकांमध्ये १५५ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. कंझ्युमर गायडन्स सोसायटीसाठी सुमारे २० लेख लिहिले आहेत आणि आहारगाथा हे पुस्तक मराठीत लिहिले आहे. त्या सोसायटीच्या त्या अध्यक्ष आहेत.

डॉ. चंद्रशेखरांनी म्हटले तसे आणि तितके त्यांच्या बुद्धिमत्तेचे, व्यासंगाचे आणि संशोधनाचे चीज जरी भारतात झाले नाही तरी त्यांची काही तक्रार नाही. डॉ. रामन ते डॉ. जीवराज मेहता यांसारख्या मेधावी लोकहितकत्र्यांची स्त्रीबुद्धी आणि क्षमता याबद्दलची दृष्टी आपण बदलवू शकलो याचे त्यांना समाधान आहे.

ग्रंथाली या प्रकाशनसंस्थेने डॉ. कमलताई सोहोनी यांच्या कार्याचे आठवणीवजा पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याचे शब्दांकन वसुमती धुरू यांनी केले आहे. विज्ञानविशारदा’ असे त्याचे नामकरण दुर्गा भागवतांनी केले आहे. प्रस्तुत पुस्तक वसुमती धुरूंनी समरसून सादर केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत. मात्र त्यातल्या दोन गोष्टी खटकतात. एक म्हणजे निवेदन स्वत: न करता प्रथम पुरुषी ठेवले असते तर जास्त प्रभावी आणि प्रत्ययकारक झाले असते असे वाटते. दुसरे, भागवत कुटुंबीय आणि सोहोनी कुटुंबीय यांची विस्तृत माहिती दिली ती जंत्रीवजा वाटते. चरित्रनायिकेच्या मोठेपणाला उठाव देणारी त्यांचे वडील श्री. नारायणराव भागवत आणि पती श्री माधवराव सोहोनी यांची व्यक्तिचित्रे पुरेशी झाली असती.

प्रत्येक स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कत्यनि वाचलेच पाहिजे, शक्यतर संग्रही ठेवले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.