पत्रव्यवहार

श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपल्या मासिकाचा एक फार जुना वाचक आहे. जो विवेकवाद आपल्या लेखांमधून आपण वेळोवेळी मांडला आहे तो सगळा मी काळजीपूर्वक वाचला आहे आणि तो मला पटला आहे. त्यामुळे मी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत साशंक झालो आहे. एवढेच नाही तर त्यामुळेच मी कोणत्याही एका धर्माचा अनुयायी नाही असे मानू लागलो आहे. माणूस आपल्या जातीने किंवा धमनि सांगितलेले आचार सोडून देऊ शकतो व आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपले आचरण ठरवू शकतो असे मला वाटू लागले आहे.
पण तरीसुद्धा मला एक गुंता सोडविता आलेला नाही; आणि त्यासाठीच हे पत्र आपणाला पाठवीत आहे. मला पडलेला प्रश्न व्यावहारिक आहे व तो असा आहे :
मला एका मौंजीबंधनसंस्काराचे बोलावणे आले आहे. आमंत्रण फार अगत्यपूर्वक दिलेले आहे. ही मुंज अतिशय थाटात होणार आहे. त्यासाठी घेतलेले कार्यालयच फार महागडे आहे हे मला माहीत आहे.
एकीकडे विवेकवादी म्हणून ब्राह्मणांनीच आपल्या मुलांच्या मुंजी लावाव्या, फक्त मुलांच्या लावाव्या, थाटामाटात लावाव्या हे काहीच मला पटत नाही. व्रतबंध व तो संपत नाही तोच समावर्तन (सोडमुंज) हा निरर्थक असा संस्कार आहे. पण एवढेच नाही. तो स्त्रीपुरुषांमधीलविषमतेला आणि जातिभेदाला पोषक असा संस्कार आहे अशी माझी मनोमन खात्री पटली आहे.आपल्या समाजाचे काही भले व्हावयाचे असेल तर तो ताबडतोब बंद पडला पाहिजे असे मलावाटते.
दुसरीकडे मी ज्या समाजात वावरतो त्याचा घटक म्हणून इतर समाजबांधवांच्या सुखदुःखात सामील होण्याची मी इच्छा करतो. अशा वेळी मुला-नातवांच्या मुंजी हा ज्यांच्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे त्या माझ्या निकटवर्तीयांचा निषेध कसा करावा ते मला उमजत नाही.
मी एकटा अशा प्रसंगांना गैरहजर राहिलो तर समाजात काहीच फरक पडत नाही. त्याचे व्यवहार पूर्वपरंपरेप्रमाणे सुखेनैव चालत राहतात. तर मग मी काय करावे?
एक वाचक
संपादक, आजचा सुधारक, यांस
१९९७ च्या फेब्रुवारीच्या अंकात श्री. केशवराव जोशी यांनी महिलांची सुरक्षितता’ या लेखाबद्दल काही निवेदन केले आहे. त्याविषयी थोडेसे.
श्रीमती बजाज यांनी स्वतःच्या सहकार्यांिनी दिलेल्या ओल्या पार्टीस जावयासच नको होते. याचा अर्थ स्त्रियांनी समस्तरावरच्या सहकार्यांलच्या सर्व क्षेत्रांत वावरू नये व त्यांचे क्षेत्र मर्यादितच असावे असे सुचवावयाचे आहे काय?मद्यप्राशनामुळे गिलसारख्या आय.पी.एस्. उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकार्यागने विवेक सोडून वागणे कितपत समर्थनीय ठरते?असे असेल तर उच्चस्तरीय सेवाक्षेत्रात स्त्रियांचा सहभाग कसा राहणार?मग निम्न स्तरावरील संरक्षण करण्यासाठी जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकार्यांाच्या वागणुकीविषयी हरकत घेण्याची काय जरूरी?
‘नो मॅन इज जन्टल व्हेन ही गेट्स अॅन् ऑपयूनिटी’ ही म्हण असे दर्शविते काय की पुरुषवर्ग संधि मिळाली तर विवेकन बाळगता ह्याचा फायदा घेणारच. मी स्त्री असल्यामुळे पुरुषांच्या मानसिकतेविषयी लिहिण्याचे धाडस करीत नाही. पुरुषवर्गातील कोणीतरी या उक्तीवर प्रकाश टाकावा व आपण खरोखर कशा वृत्तीचे असतो हे प्रातिनिधिक स्वरूपात सांगावे.
स्त्रियांनी अंगचटीला जाऊ नये याचा अर्थ पुरुषांना बलात्कार, अत्याचार करण्याची संधि स्त्रियाकडूनच मिळते असा आहे काय?असे म्हणणे म्हणजे स्त्रियांची मानसिकता समजून न घेण्यासारखे दिसते. आपल्याकडील बहुसंख्य स्त्रिया आपले शील संभाळण्याबाबत जागृत व तत्पर असतात. स्त्री व पुरुषांच्या शीलाबाबत फूटपट्टी निराळी असते हे त्यांना पूर्ण माहीत असते.
२६१, समर्थनगर, इंदुमती यार्दी
औरंगाबाद – ४३१००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.