पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
श्री. केशवराव जोशी यांच्या (फेब्रु. ९७) पत्राला हे उत्तर.
श्री. जोशी लिहितात ‘‘इंदुमती यार्दी ह्यांचे विचार बरोबर असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चुकीचे आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज यांनी जावयास नको होते. दारू पिलेल्या गिलने त्यांना जवळ बोलावल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापटी मारली.”
थोडक्यात श्री जोशींच्या न्यायाने श्री. गिल हे (गुन्हेगार) दारू प्यालेले म्हणून निर्दोष, तर त्यांच्या गुन्ह्याला बळी पडणारी व्यक्ती दोषी.
श्री. जोशी हे दारू पिणा-यांना गैरवर्तन करण्याची परवानगी देतात का? दारू पिणार्या्ने खून केला तरी तो माणूस निर्दोष का?
बायकांच्या बाबतीत श्री. जोशी यांच्यासारख्या विचारसरणीमुळे स्त्रियांची मुस्कटदाबी होऊन त्यांच्यावर अन्याय होतो. स्त्रीचा विनयभंग झाल्यास गुन्हेगार राहतो बाजूलाच, उलट स्त्रीच्या बाबतीतच वेडेवाकडे प्रश्न विचारले जातात. उदा. बाई तिथे (गुन्ह्याच्या ठिकाणी) गेलीच का होती?तिने घातलेले कपडे उत्तान होते का? तिने आपल्या वागणुकीने पुरुषाला उत्तेजन दिले का? तिच्याबरोबर कोण होते?ती एकटीच कागेली?
थोडक्यात गुन्हेगाराला शिक्षा होण्याऐवजी बाईच्या चारित्र्याचे वाभाडे निघतात व अन्यायाची दाद मागायला गेल्यास तिला न्याय मिळण्याऐवजी शिक्षाच होते. म्हणून अनेक स्त्रिया अन्याय गिळून गप्प बसणे पसंत करतात.
व्यासांनी स्त्रियांच्या वागणुकीबद्दल जे नियम घालून दिले ते त्या काळी योग्यही असतील. पण ह्या विसाव्या शतकालाही तेच नियम लागू का?
द्रौपदी किंवा त्या वेळच्या स्त्रिया बसमधून कॉलेजला जात नव्हत्या, ऑफिसात नोकर्याग करत नव्हत्या, द्रौपदी श्रीमती बजाजांसारखी आय्. ए. एस्. नव्हती, तिला करिअर नव्हती. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हा की द्रौपदीचा ज्यांनी विनयभंग केला (दुःशासन, दुर्योधन) त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली.“तू तेव्हा तिथे गेलीसच का?” असे प्रश्न कुणी तिला विचारले नाहीत.
द्रौपदीचा विनयभंग झाला तेव्हा तिला न्याय मिळाला. आपल्या आत्ताच्या समाजात स्त्रियांनी द्रौपदीसारखे असावे म्हणणारे अनेक स्त्रीपुरुष आहेत. पण जरूर पडली तर बायकांचे संरक्षण करायला उभा राहाणारा समाज कुठे आहे?
आपला समाज बाईलाच दोषी ठरवून मोकळा होतो. स्वतःवरची नैतिक जबाबदारी टाळण्याचा हा मार्ग आहे का?हल्ली अनेक क्षेत्रांत, विशेषतः धंदेवाईकांच्या क्षेत्रात पाट्यमहत्त्वाच्या असतात. करिअरचे निर्णय ह्या पाट्यत होतात. अशा पाट्र्यांना त्या ओल्या म्हणून बायका गेल्या नाहीत तर त्यांची करिअर खुटेल.
श्री. जोशी म्हणतात गिल हेप्यालेले होते म्हणून त्यांनी बजाज यांना चापट मारली. माझ्या दृष्टीने हे पूर्णतः बरोबर नाही. पिण्यामुळे माणसाचा स्वतःवरचा ताबा थोडाबहुत जात असेल. पण म्हणून चापट मारणे हा प्रकार पिण्यामुळेच होतो असे नाही. गर्दीत रस्त्यावर व बसमध्ये पुरुष (व स्त्रिया) प्यालेल्या नसताना धक्के, चिमटे असे प्रकार चालूच असतात.
दारूमुळे मनावरचा ताबा कमी झाला की माणसे जे काही गैरवर्तन करतात ते त्या त्या समाजात प्रचलित असते. उदा. श्री. जोशी म्हणतात तसा दारुडा भटांना शिव्या देतो कारण दारुड्याच्या मनात भटांवर राग असतोच. दारू पिऊन मनावरचा ताबा जाताच राग उफाळून येऊन दारुडा शिव्या देऊ लागतो. (भटांवरचा राग आपल्या समाजात प्रचलित आहेच).
पार्टीत अनेक स्त्रीपुरुष उपस्थित असताना ओळखीच्या पुरुषाने स्त्रीला बोलण्यासाठी बोलावले व ती बाई जवळ गेली तर ते गैरवर्तन कसे?नुसते बोलायला जाणे ‘‘अंगचटीला” जाणे कसे होते?दारू प्याल्यावर गैरवर्तणुकीचे माणसांना लायन्सेस मिळते का?
श्री. जोशी मला बहुतेक वस्तुस्थितीच तशी आहे”, “दारूचा परिणाम तसाच होतो, “पुरुष तसेच वागतात’ असे उत्तर देतील. पण ते मला मान्य नाही.
उत्तर असे आहे की, “दारू पिऊन, गैरवर्तन करणार्यादला शिक्षा झाली पाहिजे.”
बायकांच्या विनयभंगाचे (चापटीपासून बलात्कारापर्यंत) जे गुन्हे असतात त्यांचा लैंगिक आनंदाशी काही संबंध नसतो. हे गुन्हे सत्ता गाजवण्याच्या उन्मादाचे असतात (power crimes). गिल बजाज यांना म्हणत होते, “तू आय्. ए. एस्. किंवा आणि कुणी असशील. पण तू शेवटी बाई आहेस. एक चापटी मारून मी तुझा अपमान करतो. तुला तुझं समाजातलं स्थान दाखवतो. तू मला काही करू शकणार नाहीस.”
श्री गिलना त्यांच्या वागणुकीबद्दल शिक्षा झाली पाहिजे. त्यांना योग्य शिक्षा ही हातातली सत्ता जाणे ही आहे. नोकरीवरून बडतर्फी हा सर्वांत उत्तम उपाय. तुरुंग नव्हे.
(श्री केशवराव जोशी यांना, त्यांच्या नकळत ते दारुड्यांच्या वागण्याचे समर्थन करीत आहेत हे समजत आहे का?)
सर्बिया-बॉस्नियाचे जे युद्ध झाले त्यात असंख्य स्त्रियांवर सर्बियन सैनिकांनी बलात्कार केले. त्यांच्या दृष्टीने बॉस्नियाच्या विरुद्ध लढाईत “बलात्कार” हे एक शस्त्रच होते. हे बलात्कार मी power crimes मानते.
लिंगभेद, जात, वंशभेद, धर्म इत्यादि कारणेही अशा रीतीने सत्ता गाजवण्याची इच्छा असलेल्यांना पुरतात. फक्त हे गुन्हे करण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. पण मूळ हेतू एकच,
दुसर्या. माणसाला खाली पाडणे, त्याचा अपमान करणे, त्याचे स्थान समाजात दुय्यम आहे हे सिद्ध करणे, आपली सत्ता टिकवणे.”
श्री. जोशी यांच्या पत्रातील साम्यवादाच्या उल्लेखाबद्दल थोडेसे लिहिते.
मूळ साम्यवादाचे तत्त्व “कामगारच उद्योगधंदे यांचे मालक” असे होते. अमेरिकेत आता थोडेफार तसे झाले आहे. (हा प्रचंड विरोधाभास किंवा irony असं म्हणायला हवं.) कामगारांचे पेन्शन फंड वेगवेगळ्या उद्योगधंद्यात गुंतवले जातात. थोडक्यात हे कामगार शेअर-होल्डर्स, अप्रत्यक्षपणे त्या धंद्याचे मालक आहेत. अमेरिकेत ५० ते ६० टक्के धंदे पेन्शन फंडांच्या मालकीचे आहेत’ असे मी ऐकलेय. ह्याबद्दल कुणी फार काही बोलत नाही व हे शेअरहोल्डर्स एकत्र येऊन मालकी हक्क गाजवत नाहीत.
अमेरिकेत शेअरहोल्डर्सची कंपनी त्यांच्या इच्छेप्रमाणे चालत नसेल तर शेअर्स विकून टाकतात.
जर शेअरहोल्डर्स एकत्र होऊन कंपनीशी भांडू लागले तर कंपनी माघार घेते. हल्लीच शेलकंपनीचे फक्त१ टक्का शेअरहोल्डर्स कंपनीच्या नायजेरिया व एन्व्हायरन्मेंटल पॉलिसीबद्दल तक्रार करू लागताच कंपनीने माघार घेतली व आपली पॉलिसी बदलायला सुरवात केली.
माझ्या मते हा एक प्रकारचा साम्यवादच आहे.
श्री. जोशींच्या मते जगात सर्व भांडवलशाही देशात भ्रष्टाचार आहे. हे मला मान्य आहे. मी श्री. जोशींच्या उलट विचार करते. जगातली कुठलीच राज्यव्यवस्था निर्दोष नाही. राजेशाही, हुकूमशाही, साम्यवाद, लोकशाही, धार्मिक राज्यव्यवस्था सगळ्यांतच भ्रष्टाचार आहे. (रामराज्य हा Utopia कुठेही नाही). तेव्हा त्यातल्या त्यात जास्तीत जास्त नागरिकांना ज्या देशात अन्न, वस्त्र, निवारा मिळतो व कमीत कमी लोकांवर जिथे अन्याय होतो तो देश त्यातल्या त्यात चांगला असे मी मानते. देशामधील गरिबांत गरिबांची परिस्थिती, मुलांना व वृद्धांना मिळणारी वागणूक, स्त्रियांचे समाजातील स्थान ही समाजाच्या अधोगतीची किंवा उन्नतीची महत्त्वाची मापे आहेत.
असा जगातला कुठला देश त्यातल्या त्यात उन्नत हे ज्याचे त्याने ठरवावे.
श्री. जोशी यांच्या खाजगी उद्योजक चैनीच्या वस्तूंतून नफा मिळवतात’ ह्या मुद्यावर येवढंच लिहिते की लोक स्वतःहून त्या वस्तू विकत घेतात. “कोक’हा प्रकार साखरेचे पाणीच म्हणायला हवा. त्यावर किती नफा होतो. मुद्दा हा की लोकांना चैनीच्या वस्तू हव्या असतात. मग उद्योजकांनी त्या विकून नफा मिळवला तर तक्रार कशाला?जोपर्यंत ह्या वस्तूंच्या धंद्यामुळे कुणाला इजा होत नाही व लोक स्वखुषीने त्या विकत घेतात तोपर्यंत कुणाचे काय बिघडले?चैनीच्या वस्तूमुळेही लोकांना नोकर्याक मिळतातच.
– ललिता गंडभीर 65, Oxford Road, Newton, M A 02159
U. S. A.

श्री. देशपांडे,
सादर नमस्कार
डॉ. ललिता गंडभीरांकडून आ. सु. चे ३/४ अंक मागवले. पुरवून पुरवून वाचले, आणि ‘युरेका’च झालं. मराठीत माझ्या माहितीप्रमाणे असं मासिक नाही.‘सुधारक’ वाचल्यावर जाणवतं की त्याची केवढी गरज, उणीव होती व आपण ती कशी भोवतालच्या मेंदूंना ढोसून ताकावरभागवत होतो. (आपलं खास टूलबुद्धी वापरायचा कंटाळणारा बहादुर प्राणी, माणूसच!)
त्यानंतर नंदा खरे या सन्मित्रांकडे चौकशी केली. कै. जयवंत दळवींचं पत्र वाचल्यावर जाने. ९४ पर्यंत भारतात असून आपल्याला आ. सु. विषयी काहीच माहीत नव्हतं याबद्दलची लाज, अपराधी भाव मावळला. १९९० पासून मी कमी अधिक अत्यवस्थ होते आणि मग, देशाबाहेर)
फावल्या वेळात डोक्यात घोळणारे, स्पष्टता मागणारे, स्वतःशीच स्वतःची हुज्जत मांडणारे विषय नेमके सुधारकात भेटले. उदा. अध्यात्म आणि तत्त्वज्ञान. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. निरगाठींच्या सुरगाठी झाल्या. मुख्य, आपलं गणगोत सापडल्यासारखं झालं.
विषय हाताळण्याची सचोटीयुक्त, प्रगल्भ आणि खणखणीत पद्धत आवडली. अभिरुची न सोडता, दर्जा टिकवून संवाद साधणं – सर्वच उत्तेजक, आश्वासक.
अशा प्रकारच्या खुराकाची, खराव्याची गरज प्रत्येक सुबुद्ध मनालाअसते, असायलाहवी!
अशा प्रकारची मासिकं कुठेही जेमतेमच चालणार. स. प्र. पत्रिकेची, वा. वि. भटांच्या ‘संग्रहालया’ची हलाखी, धडपड जवळून, त्याबद्दल फारसं काही करू नशकता, पाहिलेली आठवते. पु. लं. शी, त्यासाठी संपर्क साधला होता. दूरदर्शनवरही मी त्यावेळी राम पटवर्धन (सत्यकथा), स. ह. (स.प्र. प.) आणि बाळ सामंत (वीणा?) यांच्यात चर्चा घडवून आणली होती : मराठी मासिकं बंद का पडतात?
या चर्चेत पहिल्या दोघांनी मांडलेली दोन अनुभवजन्य मतं :
१. एखादं ललित, वाङ्मयीन मासिक बंद पडणं वाईटच; पण वैचारिक नियकालिक बंद पडणं ही भरून न येणारी सांस्कृतिक हानी, कारण ज्या समाजातला विचार संपला, तो समाजच
संपला!
२. तुरळक वर्गणीदार वाढून उलट आमच्यावरचा भार वाढतोच.
आपले ७५० वर्गणीदार हे लक्ष्यकेन्द्र असल्याचं वाचनात आलं. माझ्या प्रयत्नांना आता आणखीच मर्यादा आहेत. परंतु नववर्षाचा एक शुभारंभ म्हणून मी येथल्या परिचितांतून – ‘सुधारक’ला किमान पाच वर्गणीदार मिळवून द्यायचा संकल्प केला आहे व त्यासाठी दळवींच्या पत्रासह काही वेगळ्या xerox प्रती काढून योग्य व्यक्तींकडे पाठवीत आहे. ललितांचे अंक परत करावे लागले. आपण गेल्या वर्षातले (९६-९५) काही अंक नमुन्यादाखल पाठवू शकाल?
मला इथे दोन प्रश्न विचारले गेले:
(१) हे अनियतकालिक आहे की दरमहा, वेळच्यावेळी निघतं?
(२) एखाद्या विशिष्ट विचारसरणीची बांधिलकी असल्यास, ती नक्की कोणती?
तीन वर्गणीदार मी आताच मिळवलेले आहेत. त्यांना कृपया अंक पाठवायला सुरवात करावी.
श्री.खरयाकडून कळलं की आपण ऐंशीच्या घरात ही धडपड इतक्या सातत्याने, समर्थपणे करत असता व आता हक्काची निवृत्ती घेऊ इच्छिता. हे वाचून आपल्याविषयीचा आदर दुणावला. आपल्याहून २५/२६ वर्षांनी लहान असून माझा आताच निकाल लागला आहे/एवढं पत्र लिहिणं म्हणजेही प्रचंड परिश्रम! असो.
व्यक्तिशः तुमच्या लेखनाची ढब, मांडणी, शैली व अर्थात् त्यातले विचार मला आवडले. संपादन सोडलंत तरी लेखन चालू ठेवाल अशी उमेद आहे. धन्यवाद व शुभेच्छा.
आ.
8325 S W Mohawk, # 133 (पद्मजा फाटक)
Tualatin, OR 97062
U. S. A.

संपादक
आजचा सुधारक
सप्रेम नमस्कार,
आजचा सुधारक चे काही अंक माझ्या वाचनात आले. त्यातील लेख वाचून मी प्रभावित झालो. अशा पुरोगामी आणि विवेकी विचारांच्या लेखांनी समाज प्रबोधनाचे कार्य साध्य होईल ही आशा. सध्याच्या मूलतत्त्ववादी विचारांनी बुरसटलेल्या समाजाच्या जागृतीला अशा लिखाणाची अत्यंत गरज आहे. आद्य सुधारकाने सुरू केलेले कार्य आपला आजचा सुधारक तडीस नेवो हीच मनीषा.
स. वि. सुंठणकर
‘तरंग’, २२४ शीव पूर्य, मुंबई ४०००२२

संपादक,
आजचा सुधारक यांस
फेब्रु. ९७ च्या अंकातील श्री. ह. च. घोंगे यांचे पत्र वाचले. यापूर्वी याच विषयावर बर्यााच वर्तमानपत्रांनी टीकेचे मोहोळ उठविले होते.
श्री. घोंगे यांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांना मकबूल फिदा हुसेन यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य आहे. मात्र त्यांच्या कलेच्या दर्जावर आक्षेप आहे. ते हुसेन यांची चित्रे सुमार/रद्दी दर्जाची समजतात. म्हणजेच घोंगे यांचा मुद्दा सौंदर्यमीमांसेचा आहे. परंतु सौंदर्यशास्त्रदृष्ट्या ही चित्रे टाकाऊ ठरवताना त्यांचे सांगोपांग विवेचन करण्याची शुचिता घोंगे पाळत नाहीत. हुसेन यांच्या रेखाटनातील रेषांमध्ये ‘वक्रता, जोम, तोल’ नाही आणि कंटुर्स नाहीत एवढेच म्हणून त्यांनी त्यांची हुर्यो उडवली आहे. यानंतर माधुरी दीक्षितच्या आकर्षणाने ‘मदनशरदग्ध’ ‘केरसुणीसारखा ब्रश’, मल्लखांबी तोडी’ इ. शब्दप्रयोगांनी टीकेच्या पातळीला हेटाळणीचा दर्जा प्राप्त करून दिला आहे.
हुसेन किंवा भीमसेनच नव्हे तर तानसेन ते मायकेल जॅक्सनपर्यंत कोणाही कलावंताची दिंगल घोंगे यांच्या पद्धतीने केली जाऊ शकते. थोडा बेरडपणा आणि उद्दामपणा अंगी असला की पुरे. अशाने दुसर्यातची कला हीन असल्याचा मुद्दा सिद्ध होतो का?
कलाकृती सौंदर्यशास्त्रीय निकष लावूनच श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवावी असा माझा आग्रह आहे. श्री घोंगे यांनी अभिप्रेत निकषांचे आधी विवेचन करून वानगीदाखल काही कलावंतांच्या कलाकृतींना ते लावून नंतर तेच निकष हुसेन किंवा भीमसेन यांना लावले तर अनभिज्ञ वाचकालाही त्या कलाकृतीची प्रत कळू शकेल. सौंदर्यशास्त्रबाह्य घटक, विशेषतः कलावंतांच्या खाजगी जीवनाला स्पर्श न करण्याचा दंडक समीक्षकाने पाळावा अशी माझी धारणा आहे.
लोकेश शेवडे
शाळिग्राम अपार्टमेंट्स डिसूझा कॉलनी, गंगापूर रोड,
नासिक (४२२००५)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.