पत्रव्यवहार

आस्तिकता आणि विज्ञान
– हेमंत आडारकर
जानेवारी ९७ च्या अंकातील प्रा. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स…’ हा लेख आणि मार्च ९७ च्या अंकातील दि. य. देशपांडे यांनी लिहिलेला, ‘प्रा. ठोसर, प्रा. एकल्स …’ हा लेख वाचून मनात आलेले विचार आजचा सुधारकच्या वाचकांपुढे मांडावेत ह्यासाठी हा लेखनप्रपंच.
आस्तिकता आणि विज्ञान ह्या परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. माझा स्वतःचा विज्ञानक्षेत्रातला दहा वर्षांचा अनुभव आणि अवांतर वाचन जर गाठीशी धरले तर एक वेगळीच स्थिती समोर येते. वैज्ञानिक पेशा आणि आस्तिकता ह्यांचा घनिष्ठ संबंध दिसतो. मला असेही काही पाश्चात्य वैज्ञानिक भेटले ज्यांची ठाम खात्री होती की ईश्वरानेच त्यांना नैसर्गिकरहस्ये उलगडण्यासाठी खास नेमले आहे. वैज्ञानिक हे बहुतांशी आस्तिक, धार्मिक एवढेच नव्हे : तर अंधश्रद्धाळू देखील असतात. इलस्ट्रेटेड वीकली साप्ताहिक बंद होण्यापूर्वीच्या अंकात अनिल धारकरांनी केलेला गौप्यस्फोट वाचनीय आहे : काही परदेशी शास्त्रज्ञ एका दक्षिण भारतीय शास्त्रज्ञाकडे पाहुणे म्हणून आले होते. भोजनानंतर पाहुण्यांनी कुतूहलाने ‘सोवळे ओवळे’ व इतर रूढींबद्दल माहिती विचारली. यावर भारतीय प्राध्यापक उद्गारले, “तुम्ही गेल्यावर आम्ही हा दिवाणखाना शुद्ध करू.”
वैज्ञानिकाचे पूर्वायुष्य, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी ह्यांना कोणी विचारवंतआज फारसे महत्त्व देत नाहीत ही एक शोकांतिका आहे. कोपर्निकस हा एका सूर्यपूजक (sun -worshipper) घराण्यात जन्माला आला, तर रामानुजम्चे ते वाक्य सुप्रसिद्ध आहे : “त्या गणिताचे उत्तर मला देवीने स्वप्नात येऊन सांगितले.”
विज्ञान विवेकावर अवलंबून आहे ह्या विधानाचा आपण विचार करू या. विज्ञान हे गृहीतांच्या (assumptions) संचावर आधारित तर्कावर वृद्धिंगत होते. ह्या गृहीतकांची सत्यासत्यता पडताळणे वैज्ञानिकांना नेहमीच शक्य नसते. एकोणिसाव्या शतकातील विज्ञान विशेषतः भौतिकशास्त्र हे वाजवी गृहीतांवर आधारित आहे असे सर्वच शास्त्रज्ञांना वाटते. परंतु ह्या शतकात लहरी गतिशास्त्र (wave or quantum mechanics) ह्या शास्त्राच्या गृहीतांबद्दल पराकोटीचे संघर्ष आइनस्टाइन-बोर यांच्यापासून आजतागायत चालू आहेत. यात आश्चर्य असे की अणूची संरचना समजण्यासाठी केलेले सर्व यशस्वी शोध काही वादग्रस्त गृहीतांवर आधारित आहेत. अलंकारिक भाषेत म्हणायचे झाले तर अशा वेळेला वैज्ञानिकांना देव आठवतो. आल्बर्ट आइनस्टाइन म्हणाला, “देव जुगारी नाही”, तर बोरचे त्याला उत्तर देवाने कसे वागावे हे तुम्ही शिकवणारे कोण?”
आता काही खाजगी. मी स्वतः एका अतिशय धार्मिक कुटुंबातला. लहानपणीच गुरुचरित्राचे मी पारायण केले होते. विज्ञान आणि साम्यवाद ह्यांच्या अध्ययनाने मी अधार्मिक (irreligious) नक्कीच झालो, परंतु मी मला नास्तिक म्हणू शकत नाही, कारण ईश्वराचे अस्तित्व वा त्याउलट ह्या दोन्ही गोष्टी falsifiable नाहीत. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अणुकेंद्रकावर आणि जडवस्तुमान असलेल्या तान्यांच्या गाभ्यावर संशोधन करताना मला असे काही अनुभव आले ज्यामुळे विश्वाच्या उत्पत्तीत किंवा संरचनेत कोण्या सूत्रधाराचा हात नाही असे ठामपणे सांगता येत नाही. एवढ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया केवळ chance मुळे होतील ही देखील एक टोकाची भूमिका वाटते. एवढे मात्र खरे की मी त्या सूत्रधाराच्या शोधात नाही. ह्याला एक प्रकारची agnostic भूमिका.. असे म्हणता येईल. ह्याचा अर्थ असा नव्हे की माझा वैज्ञानिक दृष्टिकोणाला विरोध आहे. वैज्ञानिक दृष्टिकोणच मानवजातीला संहारापासून वाचवेल.
श्रद्धा, ईश्वर, धार्मिकता वा आस्तिकता या कल्पना अशास्त्रीय (unscientific) नसून त्या अतिशास्त्रीय (non-scientific) आहेत. विज्ञान सर्व गोष्टींचे रहस्य उलगडेल हा एक आशावादी दृष्टिकोण आहे. ह्याला scientism असे संबोधले जाते. ismया तीन अक्षरांनी संपणारे कोणतेही इंग्रजी शब्द प्रत्यक्षात उतरत नाहीत हे आपण अनुभवाने जाणतोच.
वैज्ञानिक, कवी, कलावंत व इतर सर्जनशील माणसांना काही प्रश्न नैसर्गिक आहेत. “Who am I?” नंतर “Who is my father?’ हा प्रश्न येणारच. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मार्ग ही ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. तिचा विज्ञानाशी वा वैज्ञानिक दृष्टिकोणाशी काही संबंध नाही.
२०२ ‘रामनिमी’ ८ मंडलिक रोड, कुलाबा, मुंबई ४००००१

2
वैज्ञानिक आणि आस्तिकता
संपादक, आजचा सुधारक यांस,
मार्च १९९७ च्या अंकात प्रा. ठोसर, प्रा. एकल्स आणि ईश्वर या टिपणीत दि. य. देशपांडे यांच्या प्रतिपादनात काही त्रुटी वाटल्या त्या येथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
(१)दि. य. देशपांडे यांनी केलेल्या चर्चेत ईश्वर आहे की नाही हा प्रश्न फक्त विश्व निर्माण झाल्यानंतर आणि माणसाला सध्याचे रूप प्राप्त झाल्यानंतरच उद्भवतो असे दिसते. ईश्वर नावाची मानवी जीवनाची दैनंदिन काळजी करणारी शक्ती नसेलही. परंतु विश्व आणि ब्रह्मांड निर्माण कसे झाले व कोणी केले, ते मानवी बुद्धीतून निर्माण झाले काय याचे उत्तर दिले जाणे आवश्यक वाटते. आपण राहतो ते विश्व जर एक सत्य घटना असेल तर त्या घटनेचे विवेकावर आधारित उत्तर असले पाहिजे. असल्यास ते कोणते?
(२)पृ. ३५५ वर देशपांडे म्हणतात की ‘‘शास्त्रीय संशोधन आणि आस्तिकता या दोन गोष्टी परस्परांशी असंबद्ध अशा दोन हवाबंद कप्प्यांमध्ये ठेवता येत नाहीत असे मला वाटते. प्रत्यक्षात अनेक वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. ते त्या दोन गोष्टींची सांगड कशी घालतात हे गूढ आहे. कारण त्यांची सांगड घालणे अशक्य आहे असे मला वाटते.”
पृ.३५८ वर देशपांडे स्वतःच्या वर उल्लेखिलेल्या विधानांच्या उलट विधान करून (माझ्या मते) स्वतःचे पूर्वीचे विधान खोडून काढतात. ते म्हणतात की “काही माणसे मूळचीच श्रद्धावादी असतात. त्यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास केला तरी त्यांना श्रद्धेला पोषक पुरावे मिळतात.”
जर श्रद्धेला पोषक पुरावे मिळतात असे देशपांडे म्हणतात तर असे पुरावे (देशपांड्यांच्याच व्याख्येवरून) विवेकावर आधारित असले पाहिजेत. माझा हा तर्क बरोबर असेल तर विवेकावर आधारित असे श्रद्धेला (आस्तिकतेला) पोषक पुरावे निर्माण होऊ शकतात असा निष्कर्षदेशपांड्यांच्या विधानातूनच निघत नाही का?
(३)देशपांडे पुढे म्हणतात की “विज्ञान आणि आस्तिकता यांचे वाकडे आहे. यावर अनेक वैज्ञानिक आस्तिक होते आणि आहेत याकडे लक्ष वेधले जाते. पण त्यांची आस्तिकता त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा भाग नसतो. जर त्यांच्या संशोधनात आस्तिकता लुडबुड करू लागली तर ते संशोधन वैज्ञानिक होणार नाही. वैज्ञानिक आपल्या फावल्या वेळात श्रद्धेला खतपाणी घालत असले तरी प्रयोगशाळेत त्यांना विवेकाची बंधने काटेकोरपणे पाळावीच लागतात. त्यांच्या विचारसरणीवर जगातल्या सर्व वैज्ञानिकांचा पहारा असतो.”
ह्या ठिकाणी संशोधन आपण अशाच समस्यांबाबत गृहीत धरतो की ज्यांच्याबाबत मानवी ज्ञानाच्या सीमा गाठल्या गेल्या आहेत व समस्यांच्या उत्तरांबाबत संदिग्धता आहे. अशा संदिग्धतेतच श्रद्धा पोसली जाऊ शकते.
जर देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे संशोधक फावल्या वेळात श्रद्धेला खतपाणी घालत असतील पण प्रयोगशाळेत विवेकाची बंधने काटेकोर पाळत असतील तर विवेक आणि श्रद्धा यांचे दोन कप्पे स्वतः देशपांडेच सुचवीत नाहीत का?
आस्तिक संशोधकांच्या विचारसरणीवर जगातल्या सर्व वैज्ञानिकांचा पहारा असतो असे देशपांडे गृहीत धरतात. पण पृ. ३५५ वर देशपांडेच म्हणतात की “प्रत्यक्षात अनेक वैज्ञानिक
आस्तिक असतात हे खरे आहे.” मग हे आस्तिक असलेले आणि जगभर पसरलेले अनेक वैज्ञानिक एकमेकांच्या विवेकावर कसा पहारा ठेवणार?
१३, नवनिर्माण सोसायटी प्रतापनगर, नागपूर – ४४० ०२२ श्रीनिवास खांदेवाले

3

प्रिय श्री. दि. य. देशपांडे यांस
आपला मार्च ९७ च्या आजचा सुधारक मधील ‘प्रा. ठोसर, प्रा. एकल्स आणि ईश्वर’ या शीर्षकाचा लेख वाचण्यात आला. लेख अप्रतिम आहे. त्यातील प्रतिपादन सहजी खोडता येण्याजोगे नाही.
आपल्या प्रस्तुत लेखातील शेवटचा परिच्छेद वाचून मनात असा विचार येतो की वैज्ञानिक वृत्ती म्हणजे विवेकवादी वृत्ती, आणि विज्ञान आणि आस्तिकता यांचे जर वाकडे आहे तर जे अनेक वैज्ञानिक त्यांच्या वैज्ञानिक कार्याच्या भागाव्यतिरिक्त, ‘फावल्या’ (?) वेळात श्रद्धेला, म्हणजे तुमच्याच मते अंधश्रद्धेला, खतपाणी पुरवीत असतील तर अशा वैज्ञानिकांची वैज्ञानिक वृत्तीच नाही किंवा नहूती असे म्हणण्याची आपत्ती येते कारण प्रत्यक्ष आचाराशिवाय विवेकवादाला तसा काहीचअर्थ नाही.
जिथे नामवंत वैज्ञानिकच अंधश्रद्धेचे बळी ठरतात तिथे विवेकवादाचा सामान्य माणसावर कितपत परिणाम होईल याची शंका येते. विवेकवाद्यांना प्रवाहाच्या विरुद्ध तर पोहावे लागणारच. पण ते हरणारी लढाई तर खेळत नाहीत ना असे वाटून जाते.
विश्वाच्या विराट पसाव्यात, मानवाच्या पराधीन पुत्राची ‘ईश्वर’ ही भावनिक वा आंतरिक गरज आहे हेही न मानण्यात निखळ विवेकवादातील एक त्रुटी तर नसेल ना!
गं. र. जोशी
७, सहजीवन हौसिंग सोसायटी.
ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स, दर्यापूर – ४४ ८०३

4

श्री संपादक, आजचा सुधारक यांस,
दिवाकर मोहनी ह्यांनी आपल्या मासिकामधून मांडलेले विचार मी आवडीने वाचतो. ते काही समस्यांचा धीटपणे उल्लेख करतात त्याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटते. त्यांनी सुचविलेले उपाय मात्र बहुधा अव्यवहार्य असतात, आणि त्याबद्दल त्यांची कानउघाडणी अधूनमधून करायलाच पाहिजे. तशी त्यांची कानउघाडणी श्री. के. रा. जोशी ह्यांनी केली व आपण ती मागच्या अंकात प्रसिद्ध केली ह्याबद्दल आपणाला मनःपूर्वक धन्यवाद.
मोहनी ज्यांना समाजधुरीण म्हणतात त्यांचे प्रतिनिधित्व श्री. के. रा. जोशी ह्यांनी आपल्या लेखात केले आहे. असे म्हणूया की श्री. जोशी त्या (म्हणजे समाजधुरीणाच्या) भूमिकेत सहजपणे शिरले आहेत. पण त्यांनी जरा खोलात जाऊन मोहनींच्या विधानांमधले तर्कदोष दाखवून त्यांचा समाचार घेतला असता तर बरे झाले असते. त्यांच्या लेखाला जास्त वजन आले असते. अजूनसुद्धा त्यांना ते काम करता येईल. म्हणजे विवाह हा करार न होता संस्कारच का असावयाला पाहिजे, भारतातल्या यच्चयावत् पुरुषांसाठी विवाहाचे वय एकवीसपेक्षा कमी का नको, ते त्यांनी सविस्तर सांगावे. तसेच आणखीही एक काम करावे. आपल्या हिंदुस्थानातली पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. मोहनींना त्यामुळे काही पुरुषांवर त्यांची इच्छा नसताना ब्रह्मचर्य लादले जाईल असे वाटते. इतकेच नव्हे तर ब्रह्मचर्याच्या बाबतीत बहुसंख्य पुरुषांच्या मनांचे आणि सगळ्याच मतिमंद स्त्रीपुरुषांचे उन्नयन करणे अशक्य आहे असेही मोहनींना वाटते ते कसे चूक आहे तेही श्री. के. रा. जोशींनी साधार पटवून द्यावे.
आपण हा विषय येथेच थांबवू नये. ही चर्चा एकदा झालीच पाहिजे. ती फार वाचनीय होईल, तिच्यामुळे आजच्या सुधारकाचे नाव आणखी थोडे पसरावयाला मदत होईल व शिवाय तीउद्बोधकही होईल असे मला वाटते. एखादा बाहेरचा संपादक बोलावून आपण एक विशेषांकुही ह्या. विषयावर काढायला हरकत नाही.
माझ्या विनंतीचा आपण गंभीरपणे विचार करावा ही विनंती.
रत्नाकर थेरगावकर
७६, फार्मलँड, दगडी पार्कजवळ, रामदासपेठ, नागपूर -४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.